परि पहिले चुंबन घ्यावे! / कमला फडके
₹25.00 ₹10.00
आईच्या मृत्यूनंतर तिनं पाळलेल्या पोपटानं अन्नपाणी वर्ज्य केलं. पंखांत चोच खुपसून तें पांखरूं एका पायावर उभं राहून प्राणांतिक उपोषण घालून बसलं.
तें दृश्य असह्य होऊन तारानं पिंजरा बाहेर अंगणांत नेला. दार उघडून टाकलं, आणि ती पोपटाला म्हणाली, ‘जा बाबा, पिंजर्याचं दार उघडं आहे. आईच्या प्रेमाची कित्येक वर्षांची तुझी कैद संपलेली आहे. पाश तुटले आहेत. तूं मोकळा आहेस. बघ झाडं कशीं डुलताहेत. मोकळीं स्वच्छंद पांखरं कसा किलबिलाट करत आहेत. निळ्या भोर आकाशांत वारा ढगांचीं पिसं कशीं उधळून लावतो आहे. जा, वार्यावर स्वार हो. आकाशांत उंच भरारी मार.’
पण तें दुबळं पांखरूं डोळ्यांची उघडझांप करत तिच्याकडे पाहून संवयीनं बडबडलं, ‘तारा ऊठ. आईला चहा दे.’
तारानं त्याला जुलमानं पिंजर्याबाहेर काढलं. तेव्हां त्याच्या त्या फिक्या रक्तहीन सुतळीसारख्या पावलावर तें डगमगलं. ओढत खुरडत चार पावलं त्यानं टाकलीं. मग वार्याची झुळूक पंखांत शिरतांच केवळ उपजत धर्म म्हणून त्यानं पंखांची दुबळी फडफड केली. पाय ताणले. पण पायांत जणूं मणाची बेडी अडकवल्याप्रमाणें. त्याचं मन आभाळांत गेलं, तरी तो चिमुकला देह धरणीला खिळूनच राहिला. मग दोनदां केविलवाणी फडफड करून तें पांखरूं थकलं. जमिनीला टांच टेकत टेकत परत पिंजर्यांत शिरलं. आणि मेलेल्या मालकिणीसाठीं झुरून गेलं.
त्याच्या मृत देहाकडे पाहून तारानं निश्चय केला. वाटेल ते होवो, पण हें पिंजर्यांतलं मरण नको.
चाळीस वर्षं तिनं एक प्रकारच्या पिंजर्यांत काढलीं होतीं. आतां आईच्या मायेचे पाश तुटले होते. कर्तव्याची कैद संपली होती. पिंजर्याचं दार उघडं होतं.
तिचं मन पंखांत वारं भरल्यासारखं फडफडून तिला म्हणालं होतं, ‘तारा, बघ झाडं कशीं डुलताहेत, निळ्याभोर आकाशांत ढगांचीं पिसं वारा कशीं उधळतो आहे. जा, उंच भरारी मार.’
Reviews
There are no reviews yet.