नांगी / अरविंद गोखले
₹25.00 ₹10.00
मी लग्न करायचं ठरवलं, अन् माझ्या ध्यानात आलं, की असं मी ठरवून काही उपयोग नाही. माझं लग्न दुसर्यांनी ठरवलं पाहिजे. मी नुसता निश्चय करून, मनाची नि शरीराचीही तयारी करून काही घडणार नाही. भोवतालच्या लोकांनी मनावर घ्यायला हवं, मदतीला सरसावायला हवं. माझं लग्न जमवून द्यायला हवं.
मी जेव्हा लग्न करायचं नाही, आयुष्यभर अविवाहित राहायचं, असं म्हणत होते, तेव्हा कितीतरी लोक भोवती गोळा होत होते. कुतूहलानं, काळजीनं. काळी व लुकडी का असेना, पण थोडासा पैसा नि शिक्षण असलेली अन् चांगली सव्वीस वर्षांची स्वतंत्र स्त्री नवरा न करता, संसार न थाटता जगू पाहते याचं सार्यांना नवल वाटत होतं. माझं काही चुकतंय, मी फसतेय, असं एकजात सर्वांना वाटायचं. मी वेडेपणा करू नये, वेळीच लग्न करून चारचौघींसारखा सरळ संसार करावा, असं प्रत्येकजण सांगत. शेजारी, नात्यातले, स्नेहातले, म्हातारे, संसार थाटलेले, अन् अजून लग्नाचं वय न झालेलेही. माझी मतं विचारायचे, माझ्या अटी विचारायचे, मला स्थळं सुचवायचे, मला सल्ला द्यायचे. लग्न न करायला मला खास असं काही कारण नव्हतं. नवरा नि संसार आड येईल असं ध्येय डोळ्यांपुढे नव्हतं, की कुणावर प्रेम जडलं नव्हतं. लग्नाचा विचारच मला फारसं वेडं करत नव्हता. कुणासाठी तरी जीव ओवाळून टाकावा अशी ओढ लागली नव्हती. कुठल्या तरी कुटुंबात आपलं एकटं, स्वतंत्र आयुष्य अडकवून घ्यावं, अशी गरजच भासत नव्हती. मी उगाचच अविवाहित राहिले होते, एवढंच.
Reviews
There are no reviews yet.