डार्करूम / ज्योत्स्ना देवधर
₹25.00 ₹10.00
सकाळी उठून नेहमीप्रमाणे विक्रमनं चांगला तीन कप चहा केला. किटलीत गाळला. दुधाचं भांडं, कपबशी आणि खारी असा सगळा सरंजाम ट्रेमध्ये मांडला. स्वतःवरच खूष होत त्यानं आपल्या आवडत्या खुर्चीजवळ टीपॉय ओढून त्यावर ट्रे ठेवला. दार उघडून वर्तमानपत्र पडलं होतं ते उचललं आणि चहाचे घोट घेत वर्तमानपत्र वाचू लागला. दाराबाहेर काहीतरी पडल्याचा आवाज आला. बाकीची दोन वर्तमानपत्रं आली होती. बस! आता छान जमलं. वर्तमानपत्रं वाचेपर्यंत हा तीन कप चहा सावकाश प्यायचा. आनंद!
असा हा नित्याचा परिपाठ तो प्रत्येक नव्या दिवसाबरोबर नव्या आनंदात उपभोगत होता. स्वतःशीच मोठ्यानं बोलायचा, ‘वा, मजा आला! बातम्या पण खूप चटकदार, चमकदार आणि मसालेदार आहेत. आज चहा पण छान जमलाय.’
हो. एकटाच. सुवर्णा आयुष्यात बायको म्हणून आली ती जणू त्याचा संसार मांडून देण्यापुरतीच. त्यानं हौसेनं छानशी क्रोकरी आणली. तिनं काचेच्या बरण्या जमा केल्या. दोघांना काचेच्या भांड्यांची फार हौस. डिशमध्ये जेवणाचा थाट चांदीच्या ताटापेक्षा जास्त असायचा. निरनिराळ्या आकाराचे बाऊल्स, ग्लासेस, इतकंच काय चिनीमातीचे चमचे पण असायचे. काचेची भांडी तुटणारी, जरा धक्का लागला तर तडा जाणारी. पण सुवर्णा एक माणूस. ती का अशी तडा लागून फुटणार–तुटणार होती! शक्यच नाही. पण शक्य झालं आणि सुवर्णा लहानशा अपघातानं मरून गेली. दोघांची पुरती ओळखसुद्धा झाली नव्हती. एकमेकांचे स्वभाव धड कळलेच नव्हते. एकमेकांच्या शरीर–आकर्षणाची नवलाई पण शिळी झाली नव्हती. क्रोकरीचा नवेपणाही गेला नव्हता. पण सुवर्णा गेली होती, कायमची.
मोठ्या हौसेनं, कौशल्यानं केलेल्या मटणाचा तुकडा घशात अडकतो काय नि काय झालं, काय झालं म्हणता म्हणता सुवर्णा जाते काय! हे सगळं घडूनही कुणालाच खरं वाटू नये इतकं क्षणात घडलं होतं. तो तर थिजून गेल्यासारखा संज्ञाहीन झाला होता.
त्यानंतर त्याचा तो एकटा जगायला शिकला होता. स्वतःशीच मोठ्यानं बोलायचं, आरशाशी बोलायचं आणि खूप खूप वाचायचं. त्याहीपेक्षा फ्री लान्स फोटोग्राफी हा त्याचा आवडता छंद, पोटापाण्याचा छंद झाला होता. छायाचित्रणात त्यानं नाव नि प्रतिष्ठा मिळवली होती.
Reviews
There are no reviews yet.