
About Us
थोडंसं ‘मेनका प्रकाशन’बद्दल
काही गोष्टी कायमच तरूण असतात.
बाळबोध मराठी साहित्यात बंडाचे अंगार फुलायला नुकतीच सुरवात झाली होती. त्या म्हणजे साठच्या दशकात मराठीत शृंगार आणि साहस असं ब्रीद घेऊन ‘मेनका’चा जन्म झाला. ‘मेनका’ या नावाबरोबरच येणारं मुसमुसतं तारूण्य या अंकात होतं. मराठी कादंबरी वयात यायला सुरवात झालेला हा काळ होता आणि मराठी माणूस धोतर-नऊवारीतून बाहेर येण्यास प्रारंभ झालेला तो काळ होता. त्यामुळे फुलू पाहणाऱ्या मराठी माणसाच्या शृंगाराला ‘मेनका’मुळे नवा गंध लाभला. मराठीतील नामवंत लेखकांबरोबरच लिहिण्यासाठी अधीर असणाऱ्या तरूण अनोळखी लेखकांनी ‘मेनका’ला जवळ केलं, त्यांचा शृंगार ‘मेनका’च्या पानापानातून टपटपू लागला. ‘मेनका’ने कारकूनाला क्लार्क केलं. साहेबाला बॉस केलं. अण्णा, आबा यांना बाबा केलं. मराठीतील हा नवा साहित्यमोहोर फुलायला ‘मेनका’चं मोठं योगदान राहिलेलं होतं. त्याअर्थाने ते पुढे पडलेलं पाऊल होतं.
काळाच्या ओघात ‘माहेर’ नावांच महिलांचे विषय कवेत घेणारं मराठीतील एका दर्जेदार मासिकानं जन्म घेतला. ‘मेनका’ची ही भगिनी महाराष्ट्रातील घराघरांत राज्य गाजवू लागली. त्यानंतर ‘जत्रा’ सुरू झालं. मराठीतील इब्लिस, चहाटळ विनोदाचा रंग बेभानपणानं रंगवणारा ‘जत्रा’ महाराष्ट्राच्या गळ्यातील ताईत बनला. ‘मेनका’, ‘माहेर’ आणि ‘जत्रा’ या एकाच कुटुंबातील तीनही भावंडांचे स्वभाव मात्र भिन्न राहिले. पण प्रत्येकानं आपापल्या वाचकांच्या मनात घर केले. महाराष्ट्रासह देशातील नामवंत लेखक ‘मेनका’, ‘माहेर’ व ‘जत्रा’मध्ये लिहीणे भूषणावह मानू लागले. नव्या दमाच्या लेखकांना आधार वाटू लागला. ग्रामीण भागातील मध्यमवर्गापलिकडच्यांना ‘जत्रा’ आपलंसं वाटू लागले. याच्यातून झाले काय की, हजारो मराठी कथांनी या तीनही मासिकांत आपला पहिला श्वास घेतला.
‘मेनका’ अजूनही चिरतरूणच आहे, हे ठामपणानं म्हणता येतं. अनेकांच्या लेखणीतून हजारो कथांनी ‘मेनका’ कायम बहरली.
२०१० मध्ये ‘मेनका’ला पन्नास वर्षे पूर्ण होत असताना आणखी एकदा तरूण होण्याची संधी आली. मीडियानेक्स्ट इन्फोप्रोसेसर्स प्रायव्हेट लिमिटेडनं ‘मेनका प्रकाशन’ची सूत्र स्वीकारली. तेव्हा लक्षात आलं की याच्यातील दमदार आशयाला नव्या जमान्यातील आयुधांची जोड द्यायला हवी. त्यातूनच ‘मेनका प्रकाशन’ची वेबसाइट अस्तित्वात आली. पाठोपाठ ‘मेनका प्रकाशना’सह विविध प्रकाशकांची १० हजारांहून अधिक पुस्तकं खरेदीसाठी उपलब्ध करून देणारे ‘मेनकाबुक्स डॉट कॉम’ हे वेबस्टोअर आले. मराठी ‘मेनका’, ‘माहेर’, ‘जत्रा’च्या आयपॅड आवृत्त्या सुरू झाल्या.
हा मराठीतील अजरामर ऐवज टिकवण्याचे आणि वाचकांसमोर आणण्याचे मोठे आव्हान आमच्यासमोर होते. त्यामुळे पन्नास वर्षांचा हा कथाऐवज डिजिटाईझ करून घेण्याचा निर्णय आम्ही घेतला. डिजिटल स्वरूपामुळे दोन फायदे झाले – एक म्हणजे जुने अंक प्रत्यक्ष टिकवण्यासाठीची उत्तम सुविधा उपलब्ध झाली आणि दुसरे म्हणजे ऑन सर्च उपलब्ध असलेला हा ठेवा लोकांना पुनर्मुद्रित करून देणे सोयीचे झाले. जुने अंक, कथा तुम्हाला मिळू शकतात हे आम्ही सांगितल्यावर मराठी माणूस हा गतकाळाशी किती घट्ट बांधल्या गेलेला आहे, याचा अनुभव आम्ही घेतला. मे १९६४च्या ‘मेनका’तील अमुकअमुक कथा मी वाचली होती, ती मिळेल का, १९६९चा दिवाळी अंक घ्यायचा आहे, अशा मागण्यांना सुरूवात झाली. लोकांना ते दर्जेदार साहित्य आजही धरून ठेवते आहे, हा विलक्षण आणि सुखावणारा भाग होत. त्यानंतर ‘मेनका’, ‘माहेर’ आणि ‘जत्रा’चे दिवाळी अंक ‘स्टोरीटेल’ या ऑडिओबुक सेवेवर ऐकण्यासाठी उपलब्ध करून देण्याचा यशस्वी उपक्रम केला.
हे झाल्यानंतर आम्ही तिसरे पाऊल टाकत आहोत. ‘मेनका’, ‘माहेर’ आणि ‘जत्रा’च्या जुन्या अंकांतील निवडक कथासाहित्य वेबसाईटवर युजर-फ्रेंडली स्वरूपात उपलब्ध करून देत आहोत. जुन्या कथा वाचायची इच्छा असंख्य वाचक व्यक्त करतात. या वाचकांना प्रतिसाद म्हणजे ही नव्या स्वरूपातील वेबसाईट आहे. या वेबसाईटवर तुम्हाला अत्यंत अल्प दरात हा शब्दखजिना खुला होतो आहे. त्याचा आपण जरूर आनंद घ्याल, ही अपेक्षा.
