ब्रिटिश खाद्यसंस्कृती

इंग्लंड, ग्रेट ब्रिटन, युनायटेड किंग्डम या तिन्ही शब्दांसाठी आपण साधारणपणे एकच शब्द वापरतो आणि तो म्हणजे इंग्लंड. पण त्यात थोडा थोडा फरक आहे. इंग्लंड, स्कॉटलंड आणि वेल्स यांचा मिळून ग्रेट ब्रिटन होतो. युके म्हणजेच युनायटेड किंग्डम. त्यात इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि नॉर्दन आयर्लंड समाविष्ट आहेत. राजकीयदृष्ट्या हे सगळे देश युनियन जॅक या एकाच झेंड्याखाली आहेत. शिवाय त्यातले बहुसंख्य लोक ख्रिश्चन धर्माचे आहेत. या सगळ्यांचं पार्लमेंट एक आहे. सर्वांचं नागरिकत्व ब्रिटिशच आहे. या सर्वांना युकेचा पासपोर्ट आहे. त्यामुळे आपण सर्वांना सरसकट ब्रिटिश म्हणतो. पण एखाद्या वेल्श किंवा स्कॉटिश माणसाला ब्रिटिश म्हटलं तर त्याला राग आल्याशिवाय राहणार नाही. हे तिन्ही वेगळे घटक देश स्वायत्त आहेत. स्थानिक कारभारात त्यांना स्वातंत्र्य आहे. त्यांना आपापली स्वतंत्र ओळख आहे. या तिन्ही घटक देशांतल्या संस्कृतींचं आदान-प्रदान झालेलं आहे तरीही हे सगळे देश आपापली वैशिष्ट्यं राखून आहेत.
इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि नॉर्दर्न आयर्लंड ही सगळी बेटं आहेत. त्यातलं सर्वांत मोठं इंग्लंड. इंग्लंडमधल्या कुठल्याही ठिकाणापासून फार तर ७०-७५ मैलांवर समुद्र असेल. इंग्लंडच्या पश्चिमेला वेल्स, वायव्येला स्कॉटलंड आणि स्कॉटलंडच्या नैर्ऋत्येला चिमुकलं नॉर्दन आयर्लंड.
एकट्या स्कॉटलंडमध्ये सातशेच्या वर बेटं आहेत. स्कॉटिश लोक आतिथ्यासाठी प्रसिद्ध आहेत. ग्लासगो ही स्कॉटलंडची राजधानी. स्कॉटलंडनं अनेक जगप्रसिद्ध व्यक्तींना जन्म दिला. रडारचा जनक रॉबर्ट वॉटसन, लाखोंना जीवदान देणार्या पेनिसिलीन या अँटिबायोटिकचा निर्माता अलेक्झांडर फ्लेमिंग, मॉडर्न फिजिक्सचा जनक जेम्स मॅक्सवेल हे स्कॉटलंडचे. टेलिफोनचा शोध लावणारा ग्रॅहम बेल, स्टीम इंजिनचा शोध लावणारा जेम्स वॉट, टेलिव्हीजनचा निर्माता जॉन बेअर्ड हे सगळे स्कॉटिशच होते. जगातली पहिली क्लोन केलेली डॉली स्कॉटलंडमध्ये जन्माला आली, शेरलॉक होम्सचा निर्माता ऑर्थर कॉनन डॉयल स्कॉटिश होता. स्कॉटलंड यार्डची पोलिस यंत्रणा आणि स्कॉटिश बॅगपायपर जगात प्रसिद्ध आहे.
स्कॉटलंडची राजधानी एडीनबर्ग आणि सगळ्यात मोठं शहर ग्लासगो आहे.
इंग्लंडच्या पश्चिमेला असलेल्या वेल्सची राजधानी कार्डिफ. जगातले अति सुंदर बीचेस असलेल्या या देशात शेळ्या-मेंढ्यांची भरपूर पैदास होते. वेल्स लोक पटकन मैत्री करणारे म्हणून प्रसिद्ध आहेत. रेड ड्रॅगन हे त्यांचं राष्ट्रीय प्रतीक आहे. वेल्स हा प्रदेश डोंगराळ असून त्यात सहाशेच्या वर किल्ले आहेत. तसंच कोळसा आणि लोखंडाच्या खाणी आहेत. रग्बी हा त्यांचा आवडता खेळ.
वेल्समध्ये जगातलं सर्वांत मोठं सेकंडहँड बुकशॉप आहे. ब्रिटनचे प्रसिद्ध पंतप्रधान लॉईड जॉर्ज वेल्सचेच. हिमालयाच्या सर्वोच्च शिखराला ज्याचं नाव दिलंय तो जॉर्ज एव्हरेस्ट वेल्श होता. सुप्रसिद्ध अभिनेते रिचर्ड बर्टन आणि अँथनी हॉपकिन्स वेल्सचे.
युनायटेड किंग्डमचा निम्म्याहून मोठा भाग इंग्लंडनं व्यापलेला आहे. युरोपमधलं मध्यवर्ती आर्थिक केंद्र समजलं जाणारं लंडन हे इंग्लंडचं राजधानीचं शहर आहे. १९व्या शतकाच्या पूर्वार्धात इंग्लंड हे युरोपातल्या औद्योगिक क्रांतीचं मुख्य केंद्र होतं. कारखाने आणि उद्योगधंदे यांनी गजबजलेल्या इंग्लंडमध्ये धान्यं, फळं, भाज्या यांची अजूनही मोठ्या प्रमाणावर आयातच करावी लागते.
विनोद, परंपरा आणि चांगले मॅनर्स यासाठी इंग्लिशमन प्रसिद्ध आहे. इंग्लिश भाषा तर आज जागतिक भाषा म्हणून ओळखली जाते. केवळ युरोपातच नव्हे तर जगातल्या अनेक इतर देशांत तिला प्रमाणभाषेचा मान आहे. हॅम्लेट, रोमिओ ज्युलियटसारख्या अजरामर साहित्यकृती निर्माण करणारा शेक्सपिअर, अपंगत्वावर मात करून आपल्या संशोधनानं जगाला दिपवणारा स्टीफन हॉकिंग्ज, मानवजातीच्या उत्पत्तीची मीमांसा करणारा चार्ल्स डार्विन, भौतिकशास्त्रातलं विख्यात नाव सर आयझॅक न्यूटन इंग्लंडचे. याशिवाय सुप्रसिद्ध कवी विल्यम वर्ल्ड्स्वर्थ, लसीकरणाच्या शोधामुळे मानवजातीवर उपकार करणारा एडवर्ड जेन्नर इंग्लंडचाच. विनोदाचा बादशहा चार्ली चॅपलिन इंग्लंडमधलाच. ‘डब्ल्युडब्ल्युडब्ल्यु’ म्हणजे ‘वर्ल्ड वाइड वेब’ या इंटरनेटचा जनक टिम बर्नर्स हा इंग्लंडचा नागरिक आहे.
युकेमध्ये लोकशाही असली तरी अजूनही राजसत्ता अस्तित्वात आहे. लंडनमधला बकिंगहॅम पॅलेस हे राणीचं निवासस्थान आहे. ऑक्सफर्ड आणि केंब्रिज या जगविख्यात विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी जगभरातल्या देशातले विद्यार्थी उत्सुक असतात.
ब्रिटिशांनी जगावर जिथं जिथं राज्य केलं तिथं तिथं ब्रिटिशांचे कायदे, न्यायपद्धती, वाहतुकीची साधनं आणि मुख्य म्हणजे इंग्लिश भाषा यांचा प्रसार केला. त्यामुळे भारतासह अनेक देशांत अजूनही त्याच पद्धती चालू आहेत असं दिसतं. भारतातले कायदे, शिक्षणपद्धती यावर आजही ब्रिटिश प्रभाव आहे. इंग्लिश भाषा तर राष्ट्रभाषा झाल्यासारखी वाटते. डाव्या बाजूनं वाहतूक हा ब्रिटिश राजवटीचाच परिणाम. त्याचबरोबर या देशांच्या संस्कृतीचाही परिणाम ब्रिटिशांवर झाला आहे असं दिसतं.
बातम्या देणारी सर्वांत मोठी वाहिनी ‘बीबीसी’ म्हणजेच ‘ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’ ही इंग्लंडमधलीच. १९२० मध्ये बीबीसीनं जगातल्या बातम्या सर्वांपर्यंत पोचवायला रेडिओपासून सुरवात केली. आता या बातम्या दूरदर्शनच्या माध्यमातून जगातल्या चाळीस भाषांतून दिल्या जातात आणि जगाच्या कानाकोपर्यातल्या ताज्या घडामोडी देशोदेशी पोचवल्या जातात. बीबीसीवरील बातमी म्हणजे तिच्याबद्दल शंका घेण्याचं कारण नाही, असा एक विश्वास या वाहिनीनं मिळवला आहे.
इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स, आयर्लंड ही सगळी बेटं असल्यामुळे हवा दमट, सुपीक शेतजमीनही कमीच त्यामुळं तिथं पिकणारी धान्यं, भाज्या यांचं प्रमाण खूपच कमी आहे. बहुतेक सर्व ठिकाणी गहू, बार्ली, ओटस यांची पिकं काढतात. बटाटे, बीट मात्र भरपूर पिकतात. बटाट्याबरोबर वाटाणा, कोबीसारख्या भाज्या आणि स्ट्रॉबेरी, रासबेरी, सफरचंदं यांसारख्या फळांचं उत्पादन होतं. अर्थात मांसाहारी पदार्थ आणि समुद्रसान्निध्य असल्यामुळे सीफूड यांचा आहारात प्रामुख्यानं समावेश होतो हे सांगायलाच नको. सबंध ब्रिटनमधल्या तेहतीस टक्के मेंढ्या फक्त वेल्सच्या डोंगराळ भागात आहेत. त्यांचं मांस, त्यांच्या दुधापासून बनलेलं योगर्ट, चीज यांचाही वापर आहारात होतो.
साहजिकच या देशात लागणारं धान्य, भाजीपाला, फळफळावळ यांची आयात जगातल्या अनेक देशांतून होते. रोज लागणार्या अन्नाची गरज भागवण्यासाठी ब्रिटनला लागणारा तीस टक्के माल युरोपियन युनियनमधल्या ऑस्ट्रिया, फ्रान्स, ग्रीस, इटली, पोलंड अशा अनेक देशांतून येतो. याशिवाय लॅटीन अमेरिकेतून केळी, स्पेनमधून संत्री, कॉस्टॉरिकातून अननस अशी फळंही आयात होतात.
ब्रिटनची खाद्यसंस्कृती स्कॉटलंड, वेल्स, आयर्लंड यांची संमिश्र संस्कृती आहे. इतकंच काय तर ब्रिटनच्या आधिपत्याखाली असलेल्या अनेक देशांच्या खाद्यसंस्कृतीचाही प्रभाव जाणवतो. भारतात राहिलेल्या ब्रिटिशांना अनेक भारतीय पदार्थांची गोडी लागली आणि मग ते पदार्थ त्यांनी मायदेशातही रूढ केले. इंग्लंडनं भारताला क्रिकेट खेळायला शिकवलं असं म्हणायचं असेल तर भारतानं इंग्लंडला इंडियन करीची देणगी दिली असंच म्हणावं लागेल. कुठलंही मसालेदार तोंडीलावणं म्हणजे करी असाच अर्थ इंग्लंडमध्ये प्रचलित आहे. तिथं दर ऑक्टोबरमध्ये ‘नॅशनल करी वीक’ साजरा केला जातो. २००१ मध्ये ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्र्यानं भारतीय ‘चिकन टिक्का मसाला करी’ हा पदार्थ ‘ब्रिटिश नॅशनल डीश’ आहे असं जाहीर केलं, हे समजल्यावर आपल्याला आश्चर्य आणि थोडासा अभिमानही वाटतो.
तसंच मलई कोफ्ता, छोले, रोगन जोश, पालक पनीर, चाट असे पदार्थ तिथं अँग्लो इंडियन फूड या नावानं तिथल्या रेस्टॉरंटमध्ये मिळतात. ब्रिटनमध्ये दहा हजारांच्या वर भारतीय रेस्टॉरंटस आहेत. अर्थात तिथं मिळणारे भारतीय पदार्थ स्थानिक लोकांच्या चवीशी मिळतेजुळते असतात.
दुपारचा चहा हा मुख्यत्वेकरून इंग्लिश रिवाज आहे. त्या वेळी चहा (खूप उकळून भरपूर दूध-साखर घातलेला नव्हे) आणि त्याबरोबर केक्स, पेस्ट्रीज, स्कोन्स आणि सँडविचेस असे पदार्थ देण्याची पद्धत आहे. ही सँडविचेस आपण करतो तशीच म्हणजे ब्रेडच्या कडा काढून त्यांना लोणी-चटणी लावून आणि मध्ये काकडी-टोमॅटोचे काप घालून केलेलीही असू शकतात. खरं तर ही पद्धत आपण इंग्लिश लोकांकडूनच घेतली.
एकंदरीत मूळ ब्रिटिश अन्नपदार्थांना तिखट, मसालेदार पदार्थांचं वावडंच आहे. बहुतेक पदार्थ सपक, काळी मिरी सोडली तर इतर मसाले क्वचितच वापरात असतात. म्हणूनच कदाचित भारतीय पदार्थांची गोडी त्यांना वाटत असावी.
तरीही ब्रिटनमधल्या प्रत्येक घटक देशाचे काही वैशिष्ट्यपूर्ण पारंपरिक पदार्थ आहेत. त्यातल्या अनेक पदार्थांत बटाटा प्रामुख्यानं आढळतो.
लीक-पोटॅटो सूप
वेल्समध्ये लीक ही भाजी फार मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. लीक हे त्यांचं राष्ट्रीय प्रतीक आहे. लीकच्या पाती कांद्याच्या पातीपेक्षा खूप रुंद आणि जाड असतात. पातीच्या टोकाला जाड पांढरा बुंधा असतो. त्याच्याही चकत्या करून पदार्थात वापरल्या जातात. लीकची चव कांद्याच्या जवळपासची असते. लीकचे पातळ काप करून ते एक तर वाफवतात, मायक्रोवेव्हमध्ये शिजवतात किंवा परततात.
साहित्य : दोन टे. स्पून बटर, लीकच्या दोन मोठ्या पाती, तीन-चार मध्यम बटाटे, एक लिटर व्हेजिटेबल स्टॉक, एक कप क्रीम, थोडीशी पार्सली, चवीला मीठ आणि काळी मिरी पावडर.
कृती : लीकचे पातळ आडवे काप करावे. बटर गरम करून त्यात काप घालून परतावेत. बटाटे सोलून त्यांचे बारीक काप करून ते घालावे. स्टॉक, मीठ घालून बारीक गॅसवर पंधरा ते वीस मिनिटं शिजवावं. बटाटे मऊ शिजले की डावानं घोटावं. क्रीम घालावं आणि गॅस बंद करावा. पार्सली घालावी.
वेल्श स्पेकल्ड ब्रेड (इरीर लीळींह)
साहित्य : दोन कप मैदा, दोन टी स्पून यीस्ट पावडर, एक टी स्पून मीठ, एक कप दूध, लवंग, दालचिनी, वेलची आणि जायफळ मिळून एक टी स्पून पावडर, अर्धा कप साखर, पाव कप बटर, एक अंडं, अर्धा कप सुका मेवा, पाव कप मध.
कृती : दूध कोमट करून त्यात एक टी स्पून साखर आणि यीस्ट विरघळवून पंधरा मिनिटं झाकून ठेवावं. मैदा, लवंग-दालचिनी पावडर, मीठ एकत्र करावं. त्यात बटर आणि फेसलेलं अंडं मिसळावं. यीस्टचं फुगलेलं मिश्रण घालून पीठ भिजवावं. भिजवलेलं पीठ आठ-दहा मिनिटं मळावं आणि झाकून दीड तास फुगण्यासाठी ठेवावं. पीठ दुप्पट फुगलं की त्यात सुका मेवा मिसळून ग्रीज केलेल्या पॅनमध्ये ठेवावं आणि पुन्हा फुगण्यासाठी उबदार जागी ठेवावं. तासाभरानं ते पुन्हा फुगेल. ओव्हन १९० सें. वर तापवून त्यात अर्धा तास ब्रेड भाजावा. ब्रेड करपू नये म्हणून वर अल्युमिनियम फॉईल लावावी. ब्रेड भाजून झाल्यावर त्यावर मध फासावा.
वेल्श फ्रूट केक
साहित्य : दोन कप मैदा, एक टी स्पून बेकिंग पावडर, पाव कप बटर, पाऊण कप साखर, अर्धा कप बेदाणे, तीन अंडी, पाव टी स्पून मीठ, पाव टी स्पून जायफळ पावडर, लागेल तसं दूध.
कृती : मैदा, बेकिंग पावडर, जायफळ आणि मीठ एकत्र करावं. या मिश्रणाला बटर चोळून मग त्यात साखर आणि बेदाणे मिसळावे. अंडी फेसून त्यात घालावी. मिश्रण डावातून पटकन पडेल इतपत दूध त्यात मिसळावं आणि हे मिश्रण ग्रीज केलेल्या एका केकच्या पॅनमध्ये घालावं. ओव्हन १८० सें. वर तापवावा आणि त्यात हा केक वीस मिनिटं भाजावा. त्यानंतर ओव्हनचं तापमान १७० सें. करून हा केक आणखी अर्धा तास भाजावा.
स्कॉटिश ओट्केक्स
साहित्य : एक कप ओटचं पीठ, अर्धा टी स्पून बेकिंग सोडा, दोन टी स्पून बटर, गरम पाणी, चिमूटभर मीठ.
कृती : ओटमील, मीठ, बटर आणि बेकिंग पावडर एकत्र करावी. त्यात लागेल तसं गरम पाणी घालून पीठ भिजवावं. या पिठाच्या जाड पुर्या लाटून तव्यावर भाजाव्या. किंवा १९० सें. वर तापलेल्या ओव्हनमध्ये अर्धा तास भाजाव्या.
ओटकेक ब्रेकफास्टला जॅमबरोबर खातात.
स्कॉटिश व्हेजिटेबल सूप
साहित्य : दोन टे. स्पून ऑलिव्ह ऑईल, शंभर ग्रॅम बार्ली, दोन कप गाजराचे काप, एक कप बारीक चिरलेली कोबी, सेलिरियाकचे काप अर्धा कप (सेलिरियाक हे एक कंदमूळ आहे, जे बटाट्याऐवजी वापरलं जातं), बुके गर्नी (थाईम, रोजमेरी, सेलरी इ. ताज्या वनस्पतींची जुडी जी सूप उकळताना घालायची आणि नंतर काढून टाकायची- आपण कढिपत्त्याचे डहाळे आमटीत घालतो तसं) सेलरीच्या दोन काड्या, अर्धा कप कांद्याचे काप, एक-दोन लसूण पाकळ्या ठेचलेल्या, मूठभर चिरलेली पार्सली, अर्धा लिटर व्हेजिटेबल स्टॉक, चवीला मीठ आणि काळी मिरी पावडर.
कृती : तेल गरम करून त्यात लसूण आणि कांदा परतावा. कांदा अर्धवट शिजला की त्यात गाजर, सेलेरियाक, सेलरी घालून परतावी. बार्ली घालून परतून त्यात व्हेजिटेबल स्टॉक घालावा. बुके गर्नी घालून मध्यम गॅसवर शिजत ठेवावं. पंधरा-वीस मिनिटांनी मीठ-मिरपूड घालावी, पार्सली आणि कोबी घालून गॅस बंद करावा.
स्क्रर्ली
साहित्य : चार टे. स्पून बटर, दीड कप ओटमील, अर्धा कप बारीक चिरलेला कांदा, चवीला मीठ आणि काळी मिरी पावडर.
कृती : बटर गरम करून त्यात कांदा परतावा. त्यात ओटमील घालून ढवळत राहावं. पाच मिनिटांनी गॅस बंद करावा.
स्कॉटिश डंडी केक
साहित्य : एक कप मैदा, अर्धा कप बटर, अर्धा कप साखर, एका मोठ्या संत्र्याचा रस आणि किसलेली साल, दोन टी स्पून बेकिंग पावडर, एक टी स्पून लवंग-दालचिनी-जायफळ पावडर, तीन अंडी, दोन कप सुका मेवा (बदाम, पिस्ते, बेदाणे, क्रॅनबेरीज इ.), अर्धा कप सोललेले बदाम.
कृती : मैदा, बेकिंग पावडर आणि लवंग, दालचिनी पावडर एकत्र करावी. बटर फेसावं, साखर घालून फेसावं. त्यात एकेक अंडं घालून फेसावं, त्यात हलक्या हातानं मैदा मिसळावा. बदाम, पिस्ते, अक्रोड इ. चा बारीक चुरा करावा. हा चुरा आणि बेदाणे, क्रेनबेरीज इ. मिसळावं आणि ग्रीज केलेल्या केकच्या भांड्यात मिश्रण ओतावं. ओव्हन १६० सें. वर तापवून त्यात हा केक एक तास भाजावा. सोललेले बदाम त्यावर लावून परत केक ओव्हनमध्ये ठेवावा आणि वरून लालसर होईपर्यंत परत भाजावा.
स्कॉटिश ओट पुडिंग
साहित्य : पाऊण कप ओटमील, पाव किलो रासबेरीज, दोन कप क्रीम, तीन टे. स्पून संत्र्याचा रस, एक टे. स्पून मध.
कृती : ओटस खमंग भाजून घ्यावे. मूठभर रासबेरी वगळून उरलेल्यांचा रस काढावा, त्यात मध मिसळावा. ग्लासमध्ये ओटस, क्रीम, रासबेरीचा गर, एक आड एक घालावं आणि थंड करून खायला द्यावं.
आयरीश स्ट्यू
साहित्य : एक टे. स्पून तेल, एक लहान कांदा बारीक चिरून, दोन-तीन लसूण पाकळ्या ठेचून, पाव किलो मश्रुम्स, पाव कप मैदा, तीन गाजरं काप करून, दोन पार्सनिप (सलगम) काप करून, अर्धा किलो लाल बटाटे लहान चौकोनी तुकडे करून, दोन-तीन कप व्हेजिटेबल स्टॉक, एक कप वाईन किंवा संत्र्याचा रस, दोन टे. स्पून वुर्स्टरशायर सॉस, एक टे. स्पून टोमॅटो पेस्ट, दोन तमालपत्र, एक टी स्पून थाईमचा चुरा, एक टी स्पून रोजमेरीचा चुरा, पाव कप चिरलेली पार्सली, अर्धा टी स्पून काळी मिरी पावडर, चवीला मीठ.
कृती : तेल गरम करून त्यात कांदा आणि लसूण परतावी. मश्रुम्स आणि थोडं मीठ घालून परतावं. मश्रुम्स शिजले की त्यात पीठ घालून परतावं. गाजर, सलगमचे काप आणि चिरलेले बटाटे घालावे. व्हेज स्टॉक घालावा. वुर्स्टरशायर सॉस, टोमॅटो पेस्ट, वाईन, तमालपत्र, रोजमेरी आणि थाईम घालून उकळत ठेवावं. जवळजवळ अर्ध्या तासानं स्ट्यू तयार होईल. नंतर मीठ, मिरपूड आणि पार्सली घालावी.
आयरीश पोटॅटो पॅनकेक
साहित्य : एक किलो बटाटे, अर्धा कप बारीक चिरलेला कांदा, पाऊण कप दूध, पाव कप बटर, सव्वा टी स्पून मीठ, पाव टी स्पून काळी मिरी पावडर, एक अंडं, अर्धा कप मैदा.
कृती : अर्धा किलो बटाटे उकडून, सोलून मॅश करावे. उरलेले सोलून जाड्या किसणीवर किसावे. अंडं, दूध, दोन टे. स्पून बटर आणि मैदा एकत्र करून फेसावा, त्यात उकडलेल्या बटाट्याचा लगदा, बटाट्याचा कीस, कांदा, मीठ, मिरपूड मिसळून एकजीव करावं. गॅसवर पॅन तापत ठेवावा. त्यात थोडं बटर घालून एक डावभर पीठ ओतून पसरावं. आणि झाकण ठेवावं. दोन्ही बाजूंनी लालसर झाल्यावर पॅनकेक काढावे.
फनेल केक
साहित्य : एक कप मैदा, अर्धा टी स्पून बेकिंग पावडर, चिमूटभर मीठ, दोन टी स्पून तूप, एक अंडं, पाऊण कप दूध, एक टे. स्पून साखर, अर्धा टी स्पून व्हॅनिला इसेन्स, तळण्यासाठी तेल, पाव कप पिठीसाखर.
कृती : मैदा, बेकिंग पावडर आणि मीठ एकत्र मिसळावं. तूप, अंडं फेसावं, साखर आणि व्हॅनिला घालून फेसावं, त्यात मैदा आणि दूध मिसळून पीठ तयार करावं. जिलबी करण्यासाठी बाटली मिळते त्यात पीठ भरावं. तेल तापवून त्यात एक मोठी जिलबी घालून ती सोनेरी रंगावर तळून घ्यावी. बाहेर काढल्यावर त्यावर पिठीसाखर पेरून फनेल केक खायला द्यावा.
यॉर्कशायर पार्किन्स
साहित्य : एक कप मैदा, अर्धा टी स्पून सुंठ पावडर, चिमूटभर मीठ, एक टी स्पून बेकिंग सोडा, पाव कप साखर, पाव कप बटर, पाव कप मध, एक अंडं, एक कप दूध.
कृती : मैदा, सुंठ पावडर, सोडा आणि मीठ एकत्र करावं. त्यात साखर मिसळावी. बटर आणि मध एकत्र करून गरम करावा. अंडी आणि दूध एकत्र फेसावं. बटरचं मिश्रण आणि पीठ एकत्र करून त्यात अंड्याचं मिश्रण मिसळून फेसावं आणि ग्रीज केलेल्या केकच्या पॅनमध्ये ओतावं. ओव्हन १६० सें. वर तापवावा. हा केक एक तास भाजावा.
इंग्लिश क्रम्पेट्स
साहित्य : सव्वा कप दूध, एक कप कोमट पाणी, साडेतीन कप मैदा, दोन टे. स्पून वितळलेलं बटर, अडीच टी स्पून यीस्ट पावडर, अर्धा टी स्पून बेकिंग पावडर, एक टे. स्पून मध, एक टी स्पून मीठ, पाव कप बटर, पाव कप मार्मलेड किंवा जॅम.
कृती : दूध कोमट करावं. दूध, पाणी, वितळलेलं बटर, मध एकत्र करावं. मैदा, यीस्ट, बेकिंग पावडर एकत्र करावं. त्यात दूध-पाण्याचं मिश्रण घालून बीटरनं एकजीव करावं. मिश्रण एकजीव झाल्यावर झाकून उबदार जागी तास-दीड तास ठेवावं.
तवा गरम करून त्यावर थोडं बटर घालून पाव कप पीठ ओतून थोडंसं पसरावं. दोन्ही बाजूंनी क्रम्पेटस भाजावे. क्रीम आणि मार्मलेडबरोबर खावं.
व्हेज शेफर्डस पाय
साहित्य : तीन कप लाल भोपळ्याचे काप, चार-पाच लसूण पाकळ्या, पाव कप ऑलिव्ह ऑईल, दोन कप ब्रेड क्रम्ब्स, एक कप दूध, पाव कप अक्रोडाचे तुकडे, अर्धा कप मैदा, अर्धा टी स्पून बेकिंग पावडर, एक टे. स्पून बेसिलची पानं, एक टे. स्पून थाईमची पानं, एक टे. स्पून चिरलेली पार्सली, सात-आठ मोठे बटाटे, पाव कप वितळलेलं बटर, अर्धा कप गोट चीज, एक कप क्रीम, दोन कप चिरलेला कांदा, एक कप गाजराचे काप, अर्धा कप सेलरीचे काप, तीन कप मश्रुम्सचे काप, एक कप शिजलेल्या मसुरा, चवीला मीठ आणि काळी मिरी पावडर.
कृती : भोपळा शिजवून त्याचा लगदा करून घ्यावा. शिजवताना एक टे. स्पून ऑलिव्ह ऑईल, चवीला मीठ, काळी मिरी पावडर आणि दोन लसूण पाकळ्या घालाव्या. एका भांड्यात ब्रेडक्रम्ब्स आणि दूध मिसळून ठेवावं. मैदा, बेकिंग पावडर, अक्रोड, बेसिल, थाईम आणि पार्सली एकत्र करावी. बटाटे उकडून, मॅश करून त्यात चीज आणि उरलेली लसूण ठेचून घालावी. त्यात मैद्याचं मिश्रण आणि क्रीम मिसळावं. मीठ आणि मिरपूड घालावी. उरलेलं ऑलिव्ह ऑईल गरम करावं. अर्धा कांदा परतावा. गाजर, सेलरी, मश्रुम्स घालून परतून झाकण ठेवून शिजवावं. शिजलेल्या मसुरा आणि ब्रेडचं मिश्रण मिसळावं. मीठ आणि मिरपूड घालावी. एका मोठ्या बेकिंग डीशला तळाला बटर लावावं, त्यात परतलेल्या भाज्या पसराव्या. त्यावर भोपळ्याचं मिश्रण पसरावं. मग मॅश केलेले बटाटे पसरावे. २३० सें. वर तापलेल्या ओव्हनमध्ये हा ट्रे ठेवून अर्धा तास पाय भाजावा. उरलेला कांदा तळून त्यावर घालावा.
इंग्लिश स्कोन्स
साहित्य : दोन कप मैदा, एक टे. स्पून बेकिंग पावडर, अर्धा टी स्पून मीठ, अर्धा कप साखर, सहा टे. स्पून बटर, पाऊण कप क्रीम, एक अंडं, अर्धा कप बेदाणे आणि अक्रोडाचे तुकडे.
कृती : मैदा, बेकिंग पावडर, मीठ, साखर आणि बटर एकत्र करून फूड प्रोसेसरमधून काढावं (एक टे. स्पून साखर वगळावी.) अंडं फेसावं, त्यात क्रीम मिसळावं. त्यात मैद्याचं मिश्रण घालून हलक्या हातानं एकत्र करावं, बेदाणे आणि अक्रोड मिसळावेत. जाड पोळी लाटून वाटीने गोल पाडावे आणि ग्रीज केलेल्या ट्रेवर ठेवावं. ओव्हन १९० सें. वर तापवून त्यात हे स्कोन्स पंधरा मिनिटं, वरून सोनेरी होईपर्यंत भाजावे.
अॅपल क्रम्बल
साहित्य : अर्धा किलो सफरचंदं, पाव टी स्पून दालचिनी पावडर, एक कप मैदा, पाऊण कप साखर, अर्धा कप बटर.
कृती : सफरचंदं सोलून त्याचे काप करावे. एका खोलगट डीशमध्ये काप ठेवावे. त्यात दालचिनी आणि दोन टे. स्पून साखर मिसळावी. दुसर्या भांड्यात मैदा, उरलेली साखर एकत्र करावी. त्यात थंड केलेलं बटर बारीक तुकडे करून मिसळावं. फूड प्रोसेसरमध्ये एकत्र केलं तरी चालेल. सफरचंदावर हे मिश्रण पसरावं आणि १९० सें. वर तापलेल्या ओव्हनमध्ये ठेवून अर्धा तास भाजावं. कस्टर्ड किंवा आईस्क्रीमबरोबर खायला द्यावं.
वसुंधरा पर्वते
vgparvate@yahoo.com