डिफीट

माझं अमर्याद स्वातंत्र्य धोक्यात आणणारा, अरेरावी करणारा, आईचीही काळजी घे म्हणत सासूला संसार ‘डिस्टर्ब’ करायला देणारा ‘हजबंड’ मला नको होता. सुशिक्षित लोक म्हणाले असते, आलोक तुझा सखा. असंस्कृत म्हणाले असते, आलोक तुझा ठोक्या… पण मधमाशीसारखं वागले मी…
लेक जाणती झाल्यावर वृषालीनं तिला सगळं नीट समजावलं. होय, सांगूनच टाकलं. शाळकरी मुलगी असतानाच ती विचारू लागली होती, ‘माझे पप्पा कुठे असतात? का येत नाहीत? आपल्याशी भांडून गेले का ते? त्यांना शोधलं नाहीस तू?…’ दहा प्रश्न. जणू नागाच्या फण्यावरचा दहाचा आकडा. कॉलेजच्या अडमिशनच्या वेळी वृषालीच तिच्या मुलीबरोबर- गुड्डीबरोबर- ‘भोंजाळ महाविद्यालया’त गेली होती. त्या आधीच तिनं मुलीपाशी भूतकाळाचं गाठोडं सोडलं. तिला काही त्या भूतकाळाचं भूत भेडसावत नव्हतं. छान आठवणी होत्या आलोकच्या! तोच तर गुड्डीचा पप्पा होता. वृषालीनं हट्टानं ‘एकल मातृत्व’ पत्करलं. मूल हवं, पण नवरा नको असा तो अट्टहास होता. तेव्हा ती टेलिव्हिजनच्या सेवेत होती. मुंबईत तिच्यावर फोकस होता. नंतर तिचं तिथं पटेना तेव्हा कोकणात आली. मुलीचं नाव शाळेत घातलं. ‘मुलीचे वडील कुठं असतात?’ असा अनावश्यक प्रश्न विचारणार्या, मोठ्ठं कुंकू लावून बसलेल्या, अंगभर दागिने मिरवणार्या मुख्याध्यापिकेशी वृषालीचा खटका उडाला होता.
‘‘कुठेही असतील जगात! मी खमकी आहे मुलीचा सांभाळ करायला.’’
‘‘आम्हाला आई आणि वडील दोघांचीही सही लागते.’’ मुद्दामच, जरा खवचटपणे त्या बाई बोलल्या होत्या. त्यांना काहीतरी कुणकुण लागली असावी.
‘‘तसा नियम लेखी दाखवा’’ म्हटल्यावर बाईंनी पडतं घेतलं. पण गुड्डीवर थोडा रागच ठेवला. ‘बिनबापाची’ असं थेट कुणी बोललं नाही, पण कुजबुज व्हायची. नजर थोडी वेगळी असायची. ‘नटीची मुलगी’ असंही वर्गशिक्षिका कोकिळबाई बोलल्या आणि मग जीभ चावली होती. वृषालीनं या टोमण्यांची, उपहासाची सवय करून घेतली. आलोक युरोपात असतो आणि तिथं त्याचा छानसा संसार आहे हे तिला ठाऊक होतं. तिचा निरोप घेताना तो म्हणाला होता, ‘‘बाईसाहेब, आता जपा स्वतःला…’’
त्याच्या आणि वृषालीच्या मुलीचे- गुड्डीचे- बाळसेदार फोटो तिनं त्याला फ्रान्सला पाठवलेही होते. आलोक फ्रेंच शिकला. तिकडेच रमला. तिकडची गोरी बायको केली. पण वृषालीला अचानक कधीतरी वाटायचं, ‘ती त्याची हक्काची पत्नी, पण मग आपण कोण?… मी त्याच्या घनदाट पौरुषाचा, संग-सहवासाचा आनंद मनसोक्त लुटणारी कुमारिका होते… पण कुमारी व्हर्जिन अर्थानं घ्यायची, पण मी अस्पर्श, अक्षतयोनी राहिलेच कुठे? आणि राहायचं नव्हतंच मला. माझं अमर्याद स्वातंत्र्य धोक्यात आणणारा, अरेरावी करणारा, आईचीही काळजी घे म्हणत सासूला संसार ‘डिस्टर्ब’ करायला देणारा ‘हजबंड’ मला नको होता. सुशिक्षित लोक म्हणाले असते, आलोक तुझा सखा. असंस्कृत म्हणाले असते, आलोक तुझा ठोक्या… पण मधमाशीसारखं वागले मी. नर महाशय, तुमचं ‘काम’ उरका आणि मग आयुष्यातून दूर सरका… माझी मी ‘एकल आई’ म्हणून मस्त मजेत असेन! कुणी आलं अंगावर तर दंशही करेन. पैसा ही फार मोठी ताकद आहे माझ्यापाशी…
‘रोज उठून मारणारा, शिव्या घालणारा बेवडा कसा गं चालतो तुला? घालवून दे त्या नवर्याला’ असं ती धुणीभांडी करणार्या राधाबायलासुद्धा सांगून बघायची.
ऋतू कुणासाठी थांबत नाही. नंतर एकदाही आलोक भेटायला आला नाही. मुंबईत नाही, कोकणातही नाही. गुड्डी ग्रॅज्युएट झाली तेव्हा तिनं आलोकला कळवलं, पण त्याच्या आवाजात काही अभिनंदनाचा आनंद किंवा कौतुक जाणवलं नाही. मित्र म्हणून आलोक मस्तच होता, पण नवरा म्हणून नसता चालला! गुड्डी पदवीधर झाल्याचं मात्र त्याला फारसं काही वाटलं नाही. कदाचित तो व्यवसायाच्या काही अडचणीत असेल. फ्रेंच शिकला तरी जगाच्या दृष्टीनं तो गोरा माणूस नाही. शेवटी ‘ब्राऊन’!
गुड्डीनं पार्टटाईम जॉब नोकरीचा अनुभव यावा म्हणून केवळ स्वीकारला. वृषालीइतकीच ती सुंदर दिसायची. त्यामुळेही नोकरी लवकर मिळते. तिचं प्रेम तिनं जुळवलं. लग्न ठरवलं. लाडक्या ममाला सांगून टाकलं. होणारा जावई आशिष हसतमुख होता. जणू सिनेमातला चॉकलेट बॉय! गुड्डी आणि आशू त्याच्या बाईकवरून फिरायला जाऊ लागले आणि अचानक एके दिवशी गुड्डी घरी आली आणि रडायलाच लागली. ‘‘काय झालं गं? गुड्डी, अगं बोल ना! भांडण झालं की काय आशूशी? मला सांग आधी. रडू नको. शोभतं का तुला रडणं? ब्रेव्ह ममा, ग्रेट ममा म्हणतेस ना तू? मग अशा ममाची मुलगी रडूबाई?… सांगून टाक सगळं…’’
गुड्डी म्हणाली, ‘‘ममा, आमचं लग्न आम्ही ठरवलंय हे आशूच्या घरी माहीत नव्हतं. त्यानं ते सांगितलं.’’
‘‘बरं मग?’’
‘‘त्याचे आईवडील म्हणाले, ‘मुलीचे वडील हयात आहेत म्हणतोस ना? मग ते येत का नाहीत?’ आशूला मी सगळं नीट आधीच सांगितलं होतं. त्यानं ते त्याच्या आईला समजावलं. ते लोक समजूनच घेत नाहीयेत. लग्न न करता मुलीला जन्म देणार्या बाईची पोरगी मी सून करून घेणार नाही. तू जास्त शहाणपणा केलास तर आत्महत्या करीन अशी धमकी दिलीय आशिषला त्याच्या आईनं. वडील तर त्याच्याशी बोलायचेच बंद झालेत. ममा, अगं, आशू लग्न करायचं नाही म्हणतोय आता. माघार घेतोय तो. इमोशनली ब्लॅकमेल करतेय त्याला त्याची आई. ते त्याच्यासाठी ‘चांगली’ मुलगी शोधताहेत म्हणे… घरंदाज वगैरे. मग मी कोण आहे? मी काय पाप केलंय? माझा दोष काय ते सांग मला… ममा, तेव्हा तू ‘फ्रीडम’ घेतलंस, मनमानी केलीस, पण ते सगळं आता माझ्यावर उलटलं. मी नाही जगू शकणार आशूशिवाय! मी दुसर्या कुणाचा विचारच करू शकत नाही. मी वेडी होईन तो नसेल तर…’’
जग आपल्या वेगानं धावू शकत नाही याची जाणीव वृषालीला झाली. नंतर गुड्डी जे बोलली, त्याचा आघात मात्र वृषालीलाही सहन होईना.
‘‘ममा, मी तुझ्याबरोबर राहणार नाही!’’
‘‘गुड्डी, काय बोलतेस तू?’’
‘‘खरं तेच बोलतेय. तुझ्यामुळे माझं लग्न मोडलं. मी दूर कुठेतरी एकटी राहीन. ‘अनाथ’ आहे असं सांगीन. सहानुभूती म्हणून कुणी केलं तर केलं लग्न… माझ्या लग्नात येऊ नकोस तू… प्लीज…’’
वृषाली भयचकित होऊन ऐकतच राहिली. गुड्डी तिच्या खोलीत गेली. तिनं धाडकन् रागानं दार आतून बंद केलं. ती काही आत्महत्या करणारी भित्री मुलगी नव्हती, पण तिचं लग्न मोडायला कारणीभूत झालेली ममा तिला आता अजिबात डोळ्यांसमोर नको होती आणि हाच वृषालीचा मोठा पराभव होता… होय, तसंच आता म्हणायला हवं…
माधव गवाणकर