Now Reading
हुंडी

हुंडी

Menaka Prakashan

सुरेखा ए सुरेखा, खूप दिवसांत रिक्लायनर सीटवर रेलून सिनेमा नाही चेपलाय. जाऊया का या रविवारी संध्याकाळच्या शोला? बुक करतो तिकिट्स. तू फ्री आहेस ना?’’
‘‘हो रे. कर, जाऊया. मीनल नाही येणार पण, तिचे वेगळे ॅन्स असतात. उगीच तिचं तिकीट काढू नकोस. एकतर तिला बळे बळे न्यायचं महागडं तिकीट काढून आणि चेहर्‍यावर एरंडेल प्यायल्याचे भाव सोसायचे आपणच.’’ सुरेखातला मुनीम बोललेला!
रवीनं मागच्या सहाएक महिन्यांत एकसुद्धा सुट्टी घेतलेली नव्हती. मागचे चार-सहा रविवार पण तो इमर्जन्सी ड्युटीवर होता. त्याच्या सगळ्या कलीग्जच्या मुलांच्या परीक्षा होत्या, म्हणून ड्युटीज् याच्या गळ्यात पडलेल्या. तसाही रवी दुसर्‍याच्या सुखात स्वतःचं सुख बघणारा. ‘ीज रवी, कर ना रे अ‍ॅड्जस्ट’ म्हणायचा अवकाश, की रवी हळवा होई आणि ड्युटी त्याच्या गळ्यात येई.

रवी शहरातल्या उत्कृष्ट सेवा देणार्‍या इस्पितळात सीनिअर भूलतज्ज्ञ म्हणून कामाला होता. कामाची वेळ दहा ते सहा, पण एकदा का स्वारी चेंबरमध्ये पोचली, की पीटर हेन्लेईन घड्याळाचा शोध करायचे विसरले की काय, असा तो कामात गुंतून जाई. रवीला पेशंट्सशी अवांतर गप्पा मारायला जाम आवडे. खरंतर त्याचं काम शस्त्रक्रियागृहात भूल देण्याचं, पण हा अधिक वेळ आदल्या दिवशी त्यांच्याशी गप्पा मारण्यात घालावी. पेशंट रिलॅक्स झाला, की त्याला कमी औषधात बेहतर भूल देता येते, अशी त्याची पक्की खात्री. काहीशा अशाच विषयावर त्याचा एक शोधप्रबंध एका उच्च दर्जाच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेला आणि नावाजलेला सुद्धा.
‘काँग्रॅच्युलेशन्स रवी, यू कम्प्लिटेड टेन किमी इन फिफ्टी एट मिनिट्स. धिस इज युअर न्यू बेस्ट!!’ रवीच्या आयफोनवर मॅसेज पॉप अप झाला. त्याच्या घामेजलेल्या चेहर्‍यावर लहानसं स्मित आलं. रविवारची छान सुरुवात झालेली.
रवीनं घराची बेल वाजवली आणि त्याला हव्या तशा ब्लॅक कॉफीचा मग घेऊन सुरेखानं दार उघडलं. घराच्या गॅलरीत रवी पाय लांब करून बसला. पक्ष्यांचा किलबिलाट, हलक्या आवाजात भीमसेनबुवांचा भैरव राग, गार वार्‍यावर वाळत चाललेला घाम, दीडशेवरून साठीत येणारी हृदयाची गती आणि जिभेवर कॉफीची चव, व्वाऽऽऽ!…
ही रवीची स्वर्गाची व्याख्या!

मीनल तेवढ्यात येऊन त्याला बिलगली. ‘‘बाबी, लंचला मॅक-डीला जायचं का?’’ मॅक-डी आणि रवीचं हाडाचं वैर! तो ‘नाही’ म्हणणार हे तिला नक्की माहीत असे. मग तिचा नेक्स्ट डायलॉग- ‘‘बघ हं… मी यायला तयार आहे तुझ्याबरोबर, तूच ‘नाही’ म्हणतोयस. मी जाते आता माझ्या फ्रेंड्स गँगबरोबर.’’ तो चिडचिड करण्याचा आव आणे, पण आतून त्याला हे सगळं आवडे.
‘‘सुरेखा, आज मस्त अंडाकरीचा बेत करूया. मी करतो सगळं. तू आज जरा तुझ्या ‘मी-टाइम’चा आनंद घे.’’
चव कमीअधिक असली, तरी ती बोटं चोखून करीचा आनंद घेत असे. अंड्याचा बलक आवडत नसला, तरी ती मिटक्या मारत खाई.
‘‘रवी, तुझ्या हाताला अशी काही चव आहे ना, की मला ते कमी मीठ/अंड्याचा बलक जाणवतच नाही रे.’’ तिची ही एक ओळ त्याचा सगळा थकवा घालवायला पुरेशी असे.
स्वतः बनवलेला विडा चघळत त्यानं एक झोप काढली. चारचा अलार्म लावला, सिनेमाला जायचं होतं ना, पण डोळा लागतो ना लागतो तोच फोन खणाणला. ‘डॉ. सरपोतदार कॉलिंग… हॉस्पिटल सुपरिंटेंडेंट.’ ‘रविवारी दुपारी का कडमडतोय हा’ म्हणत त्यानं फोन कट केला.
परत फोनची कटकट सुरूच. शेवटी कंटाळून त्यानं फोन रिसिव्ह केला. ‘‘रवी, लगेच हॉस्पिटलला ये.’’ इतकंच बोलून सरांनी फोन कट केला. सर इतकं तुटक कधीच बोलत नाहीत. नक्की काही तरी गंभीर असेल. रवीला उमगलं. तो तडक हॉस्पिटलला पोचला.

सर घाईघाईत बोलत होते, ‘‘रवी, कुठल्या तरी वेगळ्याच आजारानं पीडित वृद्ध लोक दोन दिवसांपासून हॉस्पिटलच्या ओपीडीला येताहेत. आपल्या जवळ जवळ सगळ्या फिजिशियन्सना लागण झाल्याची संभावना आहे. त्यांना आयसोलेशनमध्ये शिफ्ट केलंय. आपल्या दोघांनाच आता गड लढवायचा आहे. फास्ट सेलिना सिस्टर, डॉ. रवींना ‘पीपीई’ द्या आणि त्यांची रूम दाखवा.’’

ओपीडी सेक्शन बघून रवी हबकलाच. रविवार असूनसुद्धा ओपीडी खोकणार्‍या आणि तापानं फणफणणार्‍या स्त्री-पुरुषांनी भरलेली. सिस्टर सेलिना त्याला चेंजिंग रूममध्ये घेऊन गेली. ‘पीपीई’चा याआधी त्यानं कधीच वापर केलेला नव्हता. दरवाज्यामागे लावलेल्या तक्त्यानुसार त्यान् चेंज करायला घेतलं. घातलेले कपडे आधी काढून ठेवले. सर्जिकल गाऊन चढवला. रेड टेपचे भारीतले शूज काढून साधे कॅनव्हास पुश इन घातले. त्यावर एक विशिष्ट प्रकारच्या ास्टिकचं पिशवीसम कव्हर चढवलं. अंगावर त्याचाच अंगरखा घातला. हातात डबल ग्लोव्ह्ज, डोक्यावर कापडी आणि त्यावर ास्टिकची टोपी. तोंडावर कापडी मास्क आणि त्यावर ट्रिपल लेअरचा विशिष्ट मास्क. डोळ्याला चष्मा आणि त्यावर एक पारदर्शक बंद गॉगल. या सगळ्यावर हेल्मेटला पुढे काच असते ना तसं कव्हर. बेसिनच्या वर लावलेल्या आरशात बघितलं आणि पटकन हसू आलं त्याला स्वतःचं ध्यान बघून. झिपकीच्या (लेकीचं लाडाचं नाव) खोलीत भिंतीवर टांगलेल्या फोटोतला नील आर्मस्ट्राँग वाटत होता फुल्टू :). समोरच्याला त्याच्या डोळ्यांशिवाय काही दिसत नसणार.

त्यानं ओपीडी-एक गाठली. पंधरा ु पंधरा फुटांची खोली. मधोमध एक लाकडी टेबल. त्यावर ठेवलेला एक पांढर्‍या रंगाचा स्टील ट्रे. त्यात एक टॉर्च, टंग-डिप्रेसर, स्पिरिट, सॅनिटायझर, पीसीआर किट इतकंच सामान. टेबलाच्या दोन्ही बाजूंना हात नसलेली एक-एक खुर्ची. कोपर्‍यात कॉम्प्रेसर सुरू आहे, याची सतत जाणीव करून देणारा एक आवाज करणारा जुना फ्रीज. भिंतीवर राष्ट्रपुरुषांच्या तसबिरी आणि त्याला घातलेले ास्टिकच्या फुलांचे हार. उजव्या भिंतीला एक छोटीशी खिडकी, ज्याची काचेची कवाडं घट्ट बंद. छतावरचा पंखा एका विशिष्ट लयीत फिरत होता, फ्रीजच्या आवाजाला साथ देत होता जणू. खोलीचा दरवाजा स्प्रिंगच्या बिजागर्‍या असलेला, दोन्हीकडून धक्का दिला की उघडणारा.
‘तो खुर्चीत विसावतो ना विसावतो तोच सिस्टर सेलिना बोलल्या, ‘‘सर, पाठवू का पेशंट?’’ त्यानं होकारार्थी मान डोलवली. पहिला रुग्ण – वय एकसष्ट, कोरडा खोकला, ताप एकशे एक, पल्स एकशे दहा, रेस्पिरेटरी रेट चाळीस, रक्तदाब, मधुमेह आहे. घशातून स्वॅब घेऊन सँपल पाठवलं. दुसरा रुग्ण – ताप, खोकला, पल्स, सँपल. तिसरा, मग चौथा… दहावा… विसावा…

बाहेरच्या रुग्णांचा खोकल्याचा आवाज, सिस्टर सेलिनाचा ‘चला नेक्स्ट पेशंट’ आणि त्याच्या फोनची रिंग – काहीच थांबेना. सुरेखा जाम वैतागली असणार. त्याला फोन रिसिव्ह पण करता येत नव्हता. त्याला तरी कुठे माहिती होतं असं काही तरी पुढे वाढून ठेवलंय ते. असो… रात्रीचे नऊ कधी वाजले कळलंच नाही. मास्कचं इलॅस्टिक कानांमागे काचायला लागलेलं. उजव्या पोटरीला आणि पाठीला खाज येत होती, पण काही इलाज नव्हता. ब्लॅडर इतकं भरलं होतं, की ते फुटेल की काय, अशी सारखी भीती वाटत होती. मानेभोवती घामानं पोवळं उठल्यासारखं जाणवत होतं. हे सगळे विचार मेंदू करत होता. ताप, खोकला, टेस्ट हेच काय ते करायचं होतं. सिस्टर सेलिनाला शेवटी त्याची दया का कीव काहीतरी आली. ‘‘सर, एक ब्रेक घेऊया.’’ ती उद्गारली. तो लगेच उठला. किती बरं वाटलं पाय सरळ करून! तडक चेंजिंग रूममध्ये गेला. चिलखत भिरकावलं आणि गोडमिट्ट चहा घशाखाली केला. चहानं त्याला इतका आनंद याआधी कधीच दिला नव्हता. चहा संपवून सुरेखा आणि मीनलला परिस्थितीची कल्पना दिली. त्याला काही दिवस इथेच राहावं लागणार होतं, नव्या डॉक्टरांची फळी येईस्तोवर तरी. पलंगावर आडवा झाला ते सकाळी सहालाच जाग आली. सिस्टर सेलिनानं दोनदा नॉक केल्याचं ती म्हणाली, पण नंतर तिनं नाद सोडला. चहाबरोबर बिस्किटं खाल्ली, पीपीई चढवलं आणि परत एक, दोन, तीन… ताप, खोकला, टेस्ट… सुरू.

काल घशाला कोरड पडून वैताग आलेला. त्यावर त्यानं आज एक युक्ती शोधली. मॅरेथॉनला वापरलेल्या सिपिंग बॅगेत पाणी, मीठ, साखर आणि लिंबू असं मिश्रण भरून घेतलं. ती बॅग पीपीईच्या आतून पाठीवर घेतली. त्याचं सिपिंग एंड तोंडात ठेवलं. ते पाणी पिताना त्यानं केलेल्या त्या बॅगच्या उपयोगानं त्याला स्वतःचा अभिमान वाटायचा आणि तोच स्वतःची पाठ थोपटून घ्यायचा. कानांमागे काचणार्‍या इलॅस्टिकच्या पट्टीला गॉजचा एक थर दिला, त्यानं खूप सुखावह झालं.
बाहेर लॉकडाऊन झाल्याचं कळालं. काल केलेल्या टेस्ट्सपैकी नव्वद टक्के पॉझिटिव्ह आल्या होत्या. प्रत्येक दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढत होती. आता तर कमी वयाचे रुग्ण पण यायला लागलेले. ‘कोविड-१९’ किती बळावलाय, याची कल्पना येत होती. कबूलच करायचं, तर तो जाम घाबरला होता. घशात जरा जरी टोचल्यासारखं झालं, किंवा डोळ्यांची थोडी का आग झाली, तरी धस्स व्हायचं. तो लगेच इन्फ्रारेड थर्मोचेक स्वतःच्या कपाळासमोर धरी. ‘३७’चा आकडा बघून जीव भांड्यात पडे. शाळेत भूगोल त्याचा जानी दुश्मन. तेव्हासुद्धा प्रगतिपुस्तकावर भूगोलाच्या रकान्यात ‘३७’चा आकडा बघून अगदी इतकाच आनंद होत असे.

दिवसाचे दहा तास काम करून रात्री कधी झोप लागायची कळायचंच नाही.
आज तिसरा दिवस. पहिलाच रुग्ण रशीद. त्याला बघून धक्काच बसला. रशीद पन्नाशीतला एक उत्साही बंदा. कुठल्याशा आयटी कंपनीत मदतनीस म्हणून कामाला होता. रोज सकाळी फ्रेश ज्यूस घेऊन रस्त्याच्या कडेला एक टेबल घेऊन उभा असे. ‘सर, आज गाजर डे, आज कारलं ज्यूस, आज बीटरूट, कधी मिक्स’ असे त्याच्यासाठीचे दिवस त्यानंच ठरवलेले. तो पण रननंतर निमूटपणे तो देईल ते ज्यूस पीत असे. सगळ्यांना तंदुरुस्त राहायला मदत करणारा रशीद आज खोकल्यानं बेजार आणि तापानं थरथरत होता. त्याचं वय झाल्यासारखं स्पष्ट वाटत होतं. आता ओळखीचे लोक पण इथे दिसू लागले, या विचारानंच तो घाबरला, हादरला. काहीही झालं, तरी रुग्णाला हात लावायचा नाही, अशी सक्त ताकीद असूनसुद्धा त्याचा हात आपसूक रशीदच्या खांद्यावर विसावला आणि ‘घाबरू नका, बरे व्हाल लवकर’ असे शब्द तोंडी आले. नुसत्या या कृतीनंसुद्धा त्याला धीर आल्यासारखं स्पष्ट दिसत होतं. त्यांच्या झाकलेल्या चेहर्‍यामुळे त्यानं रवीला ओळखलं नव्हतं. एका अर्थी ते बरंच झालं.

See Also

आज डे – नऊ. आता त्याला रोजच्या दिनक्रमाची सवय झालेली. सकाळी आठला उठून नऊपर्यंत ओपीडी गाठायची. रात्री नऊला अंघोळ करून गादीवर पाठ टेकवायची ती सकाळी आठपर्यंत. त्याच्या ओपीडीच्या खिडकीत एक मनी ांटची कुंडी ठेवलेली. त्यावर सकाळी कोवळ्या उन्हाची तिरीप पडे. त्यानं ते रोप जणू आनंदी होई. त्याची पानं टवटवीत आणि डोलताना दिसत. जसजसं उन्ह माथ्यावर येई, तसं ते रोपटं अंग चोरल्यागत पानं खाली वाकवे. मग तो जाऊन कुंडी सावलीत घेत असे. थोड्या वेळात पानं परत टवटवीत दिसत. सकाळी आल्यावर तिरपीच्या कक्षेत कुंडी ठेवायची आणि नंतर सावलीत. हा त्यांच्या दोघांचा – तो आणि ती वेल रोजचा ठरलेला खेळ.
गेल्या दहा दिवसांत ना रन, ना ते पाय लांब करून बसून कॉफी पिणं, ना भीमसेन, ना तो पक्ष्यांचा किलबिलाट. रवी त्याच्या झिपकीला- त्याच्या लेकीला- सगळ्यात जास्त मिस करत होता. ते तिचं लाडिक ‘बाबी’ म्हणत उगीच गळ्यात बिलगणं, छोट्या छोट्या गोष्टींसाठी हट्ट करणं, रात्री बळेबळेच कॉफी प्यायला लावणं, मॅक-डीचं नाव घेऊन उल्लू बनवत मित्रांबरोबर बाहेर जाणं, सगळं सगळं मिस करत होता.

सरपोतदार सरांचा निरोप आला, ‘उद्या घरी जाऊ शकतोस. रुग्णसंख्या मंदावलीये आणि बाकीचे डॉक्टर्स पण कामावर रुजू झालेत.’ रवीचा आनंद गगनात मावेना. त्यानं लगेच घरी फोन करून सुरेखाला हुकूम सोडला. ‘‘उद्या घरी येतोय. मस्त फोडणीचं वरण आणि फडफडीत भात करून ठेव.’’ हॉस्पिटलच्या डब्याचा वीट आला होता. सकाळी लवकर उठून सरपोतदार सरांचा आणि सिस्टर सेलिनाचा निरोप घेऊन बाहेर पडला. सकाळच्या उन्हाची तिरीप त्याच्या चेहर्‍यावर पडली आणि ते मनी ांट का डोलायचं आणि टवटवीत दिसायचं ते कळलं. तसाच पाच मिनिटं उभा राहिला आणि चौदा दिवसांची कसर भरून काढली.

मागच्या काही दिवसांत रवीनं कमीत कमी हजारच्या वर रुग्ण तपासले असतील. त्यांच्यापैकी कित्येक चेहरे त्याच्या लक्षात आहेत. त्याचा चेहरा मात्र त्यांनी कुणीच पहिला नाही, म्हणजे दिसतच नव्हता ‘पीपीई’मुळे. तिरुपतीला त्यानं पाहिल्यात हुंड्या ठेवलेल्या, गुप्त दान करायला. ज्याची सेवा केली, त्याला पण कळायला नको की कुणी ती केलीये, तीच तर खरी सेवा. गुप्त दान, हुंडीतलं!

– डॉ. केदार आठवले

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.