स्वागत

भारतीय सैन्य दलात एक पद्धत आहे. एखादा तरुण अधिकारी लग्न करून आपल्या नवपरिणित पत्नीला घेऊन पहिल्यांदा युनिटमध्ये दाखल झाला, की त्या नववधूचं विशेष स्वागत केलं जातं. हवाई दलाचं सीमेवरचं एक रडार स्टेशन, जिथे मी कमांडिंग ऑफिसर होतो, तेही या प्रथेला अपवाद नव्हतं. त्यामुळेच माझा एक अधिकारी लग्नासाठी रजा घेऊन गेल्यापासून युनिटमधले बाकी सगळे अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय नव्या वधूचं स्वागत कसं करायचं याचे प्लॅन्स करू लागले.
नवीन दांपत्याच्या आगमनाची नक्की तारीख कळल्यावर ते येण्याच्या आठवडाभर आधी मी एक अनौपचारिक बैठक बोलावली. रविवारी सकाळी समस्त अधिकारीवर्ग, बायका आणि मुलं मेसमध्ये जमलो आणि गरम गरम छोले-भटुऱ्यांचा आस्वाद घेत एकेकाचे प्रस्ताव ऐकले. काय प्रतिभावान पोरं होती म्हणता! नववधूला किडनॅप करून ओलीस धरण्यापासून ते आमच्या कॅम्पवर अतिरेक्यांचा हल्ला घडवून आणण्यापर्यंत कितीतरी नाट्यमय योजना पुढे आल्या. पोरी पण काही कमी नव्हत्या. रेल्वे स्टेशनपासून वरात काढण्यापासून ते माळरानावर तंबूमध्ये ‘सुहाग रात’ साजरी करायला लावण्यापर्यंत विविध सूचना आल्या. शेवटी एक प्लॅन ठरला.
ठरल्या दिवशी फ्लाईंग ऑफिसर भट्टाचार्य आणि त्याची नवीकोरी पत्नी रेखा रेल्वेच्या फर्स्ट क्लास डब्यातून प्लॅटफॉर्मवर उतरले. स्वागत समिती हजर होती. सामान चेक करण्याच्या मिषानं भट्टाला जरा बाजूला काढण्यात आलं आणि रेखाला दोन बायकांनी सलगीनं ‘इथे काय उभी राहणार? चल, गाडीत बसू’ म्हणत बाहेर आणलं. एअर फोर्सची जिप्सी तयार होती. रेखाला मागे चढवून पोलिसाच्या वेषातल्या दोन बायका- आमच्याच युनिटच्या दोन अधिकाऱ्यांच्या बायका- तिच्या पाठोपाठ आत शिरल्या आणि जिप्सी आमच्या स्टेशनच्या दिशेनं भरधाव सुटली. रेखाला काही समजेना. ‘स्वागताला आलेल्या त्या गोड गोड बोलणाऱ्या बायका सोडून या पोलिस बाया कशा आल्या? नवरा कुठे नाहीसा झाला? मला कुठे घेऊन चाललेत?’ तिनं भीत भीत त्या ‘पोलिसां’ना विचारायचा प्रयत्न केला, पण उत्तराखातर एकजण फक्त डाफरली आणि ‘गप्प बस’ म्हणून तिनं तंबी दिली. दुसरीनं गरागरा डोळे फिरवत तिला गुरकावून विचारलं, ”तू एका एअर फोर्स ऑफिसरशी बिना परवानगी लग्न केलंस?’’
”पऽ पऽ परवानगी?’’ रेखा जाम घाबरली. आयुष्यात पहिल्यांदा कोलकाता सोडून बाहेर आली होती ती. पोलिस वगैरे फक्त दुरून, किंवा सिनेमात बघून माहीत.
”मग? कुठे आहे तुझा दाखला?’’
”कऽ कऽ कसला दाखला?’’ रेखानं धीर करून विचारलं.
”कसला म्हणून वर तोंड करून विचारतेस? महा वस्ताद दिसतीयेस! चल ठाण्यात. एकदा रीतसर तपासणी झाली, की सुतासारखी सरळ येशील.’’ पहिली ओरडली. रेखानं पुन्हा तोंड उघडायची हिंमत केली नाही.
गाडी थेट एअर फोर्स स्टेशनमध्ये घुसून गार्ड रूमसमोर उभी राहिली. बंदूकधारी एअरमेन दार उघडून दोन्ही बाजूंना जय्यत तयार उभे राहिले. एस्कॉर्ट बायका रेखाला धरून आत घेऊन गेल्या. खरीखुरी गार्डरूम होती ती. हडेलहप्पी वातावरण तर होतंच तिथे. पण एक खोली आतमध्ये विशेष तयार करून ठेवलेली होती. हिंदी सिनेमात दाखवतात, तशी एक इंटरोगेशन रूम बनवण्यात आली होती. अंधुक प्रकाश, स्टीलचं टेबल, खड्या पाठीची लाकडी खुर्ची, लाकडीच बैठक, त्यावर गादीसुद्धा नाही. रेखाला तिथे बसवण्यात आलं. दोन भक्कम भक्कम बायका दाण दाण चालत आत घुसल्या. जळजळीत नजरेनं रेखाकडे बघत त्यांनी जरबेच्या आवाजात तिला दटावलं,
”आम्ही तुला काही प्रश्न विचारणार आहोत. खरी खरी उत्तरं द्यायची. उत्तर टाळण्याचा, किंवा खोटं बोलण्याचा प्रयत्न केलास, तर याद राख. तुला माहीत आहे का, तू ज्याच्याशी लग्न केलं आहेस, तो एका अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील जागी काम करतो? सुरक्षिततेच्या दृष्टीनं आम्हाला ही खात्री करून घ्यावी लागेल, की तू कुठल्याही परकीय संस्थेची हस्तक नाहीस. तुझा कुठल्याही आंतरराष्ट्रीय संघटनेशी संबंध नाही. आणि वायुसेनेच्या सुरक्षित कॅम्पमध्ये राहून तू आमच्यासाठी काहीही धोका निर्माण करणार नाहीस.’’
भेदरलेल्या रेखानं त्यांच्या अचाट प्रश्नांना जमेल तशी उत्तरं दिली. ‘पोलिसांचा’ संशय मात्र वाढतच गेला. ‘खरं खरं बोल’ अशी तंबी वारंवार दिली गेली. आता तिचा धीर पुरता सुटणार, असं वाटताच एक उंचापुरा मध्यमवयीन अधिकारी हवाई दलाच्या निळ्या गणवेशात खाड खाड बूट वाजवत आत शिरला आणि रेखाची अशी तपासणी सुरू केल्याबद्दल त्या ‘पोलिसां’ना त्यानं चांगलंच खडसावलं.
”भट्टाला लग्नासाठी मी परवानगी दिली आहे. बंद करा हे नसते सोपस्कार!’’ त्यानं हुकूम सोडला आणि रेखाला त्यानं स्वतःची ओळख ‘विंग कमांडर पळसुले’ अशी करून दिली. तिनं हे नाव भट्टाच्या तोंडून ऐकलं होतं. तिच्या जिवात जीव आला. ‘पळसुले’नं तिला त्याच्याबरोबर चलण्याची आज्ञा दिली आणि पाठ फिरवून तो चालू लागला. सुटकेचा निःश्वास टाकत तीही मागे मागे निघाली.
”पण… पण सर, मेडिकल? ती तरी करावीच लागेल ना?’’ एका ‘पोलिसा’नं धीर करून विचारलं.
‘पळसुले’ विचारात पडल्यासारखे दिसले. ”हं हं, तेवढं तर करावंच लागेल.’’ ते पुटपुटले. ”ठीक आहे तुम्ही मेडिकल चेक करवून घ्या, पण या मुलीला अजिबात त्रास होता कामा नये, लक्षात ठेवा.’’
रेखाचं धाबं दणाणलं. आपल्याला परत पोलिसांच्या ताब्यात देतात की काय? ती गयावया करू लागली. तिला नवऱ्याकडे घेऊन जाण्याची विनंती करू लागली. त्या अधिकाऱ्यानं तिला धीर दिला. भट्टाला तातडीनं बोलावून घ्यायचं आश्वासन दिलं आणि मेडिकलसाठी स्वतः नेण्याचं मान्य केलं. जिप्सीमध्ये बसून मग दोघं वायुसेना स्टेशनच्या वैद्यकीय विभागात आले.
एअर फोर्सच्या गणवेशात समोर उभी मेडिकल ऑफिसर ही खरोखर डॉक्टर होती आणि माझ्याच युनिटच्या एका इंजिनीअरची पत्नी होती. रेखाचा हात धरून ती तपासणीसाठी आत घेऊन गेली. आत आमच्या अजून काही बायका परिचारिकेच्या वेषात हजर होत्या. मेडिकलच्या नावाखाली त्यांनी रेखाला मनाला येईल ते प्रश्न विचारून भंडावलं. मग डॉक्टरीणबाई स्वतः परत आल्या. त्यांनी रेखाला डोळे मिटून एका पायावर तोल सांभाळत उभं राहायला सांगितलं. तिला जमेना. कसं जमणार? कुणालाच नाही जमत. पण डॉक्टरचा चेहरा गंभीर झाला.
”तू ड्रग वगैरे तर नाही घेत ना?’’ त्यांनी रेखाला हलक्या आवाजात विचारलं. रेखानं दचकून ‘नाही’ म्हणून सांगितलं. डॉक्टरीणबाईंनी भुवया आक्रसून विचार केल्यासारखं केलं.
”ठीक आहे, होतं काही काही केसमध्ये. तू असं कर, इथे बस आणि बसल्या बसल्या उजवा पाय पुढे कर. हां. आता पायाचा चवडा उजव्या दिशेनं फिरव. छान! फिरवत राहा, थांबू नको. आता उजवा हात पुढे कर. शाबास! चवडा फिरवत राहा. आता हाताची बोटं डाव्या दिशेनं फिरव बरं. अगं, पाय तसाच चालू दे उजव्या दिशेनं, फक्त हात डाव्या दिशेनं फिरव.’’
रेखानं तऱ्हेतऱ्हेनं प्रयत्न केला, पण हात डावीकडे फिरला, की पायही तसाच फिरे. नेटानं पाय उजवीकडे फिरवला, तर हात तिकडेच वळे. ती चक्रावली. डॉक्टरीणबाई तिच्याकडे रोखून पाहत राहिल्या. ‘जोपर्यंत तिच्या ड्रग्जचा अंमल उतरत नाही, तोवर तिला ॲडमिट करावं लागेल,’ असं त्यांचं मत पडलं. परंतु तोतया पळसुलेसाहेबांनी पुन्हा एकदा मध्यस्थी केली आणि तिला सोडवून भट्टाच्या खोलीत आणून सोडलं.
काहीतरी चावटपणा सुरू असणार, याची भट्टाला कल्पना होती. परंतु नेमकं काय आणि कुठे, हे त्याला माहीत नव्हतं. त्याला पाहताच रेखाचा संयम सुटला. आपल्याला वाऱ्यावर सोडून गायब झाल्याबद्दल तिनं नवऱ्याला चांगलंच फैलावर घेतलं. बिचाऱ्या भट्टाला तिला समजावता समजावता पुरं झालं. पण त्याची ग्रहदशा अजून संपली नव्हती.
दार वाजलं. बायकोला सारं काही एक्स्पलेन करण्याचं काम अजून व्हायचं होतं. कसंबसं तिला जरा शांत करून भट्टानं दार उघडलं. काश्मिरी वेशात समोर एक सुंदर मुलगी उभी होती. भट्टाला पाहताच ती जोरजोरानं रडू लागली आणि ‘का असं केलंस, का मला फसवलंस,’ असं म्हणत त्याच्या छातीवर थपडा मारायला लागली.
रेखानं चमकून पाहिलं. ‘हे काय नवं लचांड?’ पण एका भलत्या पोरीला भट्टाच्या गळ्यात पडून रडताना पाहून ती आधीचं सर्व विसरली. ”ही कोण बया?’’ तिनं किंचाळून भट्टाला विचारलं.
वास्तविक भट्टानं तिला लगेच ओळखलं होतं. आमच्याच स्क्वाड्रन लीडर आनंदची बायको आभा होती ती. पण त्याला बोलायला संधी मिळेल तर ना! आभानं इतका जोरजोरात दंगा सुरू केला, की आजूबाजूला तयार असलेले बाकी लोक लगेच धावून आले. त्यांनी भट्टाला घोळात घेऊन बाहेर काढलं. रेखाही बाहेर आली. आभाचा कांगावा सुरूच होता. गर्दी जमली.
”मला ना, माहीतच होतं असं काहीतरी होणार म्हणून.’’ रेखाच्या कानांवर पडेलसं कुणीतरी बोललं.
”इसका तो चक्कर दो सालों से चल रहा था।’’
”या काश्मिरी मुस्लिम लोकांबरोबर लफडी केली, तर महागच पडणार ना.’’
रेखा एक-एक मुक्ताफळं ऐकत होती. पण तिचा स्वतःच्या कानांवर विश्वास बसेना. ‘माझ्या नवऱ्याचं अफेअर? मुसलमान पोरीशी? कसं शक्य आहे?… पण का नाही? एकटाच तर राहत होता की इथे दोन वर्षं. आपल्याला कसं कळणार? चार महिन्यांपूर्वी तर ओळखत पण नव्हतो एकमेकांना आपण.’
रेखाच्या मनात घालमेल सुरू झाली. काही मंडळी पुढे सरसावली. ”मॅडम, तुम्ही मुळीच विश्वास ठेवू नका. आम्ही ओळखतो ना भट्टाला चांगलं. त्याची काही चूक नाही. या सटवीनंच त्याला नादाला लावला. फार वाईट चालीची मुलगी आहे ती.’’
हा माझा क्यू होता. आम्हा उभयतांकडे आभाच्या काश्मिरी आई-वडलांची भूमिका होती. नकली दाढी लावून, फरकॅप आणि काश्मिरी डगला घालून मी खांबाच्या आड तयार होतो. केसांत पांढरा रंग लावून, काश्मिरी दागिने आणि फिरन घालून बायको पण माझ्या मागेच होती. ”कौन कम्बख्त मेरी बेटी को बदनाम कर रहा है?’’ असं रागानं ओरडत आम्ही एंट्री घेतली. आभानंही लगेच ”अब्बू, देखो ना ये क्या हो गया!’’ म्हणून टाहो फोडला.
”कहाँ है वो बदमाश? मैं उसकी खाल उधेड दूंगा।’’ मी गरजलो.
”नहीं!’’ आभा फिल्मी स्टाइलनं किंचाळली, ”सारा कसूर उस चुडैल का हैं। मैं उसकी जान ले लूंगी।’’
पुढची पाचएक मिनिटं जोरदार ओरडाआरडा, दमदाटी आणि रडण्याभेकण्यात गेली. कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नव्हता. मंडळींनी उघड उघड ओव्हर ॲक्टिंग आणि मनाला येईल तशी डायलॉगबाजी सुरू केली. पण सुदैवानं गोंधळ इतका जास्त होता, की रेखाला फारसा बोध झाला नाही. आधी ठरल्याप्रमाणे आता काही पोक्त दिसणाऱ्या मंडळींनी येऊन रेखाचा ताबा घेतला. रेखा, आभा आणि आम्ही दोघं यांना ‘काही मार्ग काढण्यासाठी’ शांत करून, समजावून एका खोलीत नेऊन बसवण्यात आलं.
मग प्रसंगाचा आढावा घेतला गेला. बिचाऱ्या आभाचा आणि रेखाचा काही दोष नसताना त्यांच्यावर ओढवलेल्या संकटाबद्दल सहानुभूती व्यक्त केली गेली. मग कुणीतरी भट्टाच्या बाजूनंही बोललं. तो तरी काय करणार? समाजानं त्याला मुसलमान मुलीशी लग्न करूच दिलं नाही. घरच्या लोकांनी त्याला इमोशनल ब्लॅकमेल करून दुसऱ्या मुलीशी लग्नाला भाग पाडलं वगैरे वगैरे. इतका वेळ आभाच्या शेजारी बसून तिचे डोळे पुसत बसलेली माझी पत्नी साधना आता उठून रेखाजवळ येऊन बसली.
”बेटी, हम लोगों को तुमसे कोई भी गिला नहीं। तुम भी तो मेरी बेटी जैसी हो। हम सभी इस हालात का शिकार हैं, फिर आपस में झगडा करके क्या फायदा?’’ असं म्हणून तिनं रेखाला जवळ घेतलं. इतक्या गोंधळात एकट्या पडलेल्या रेखाचाही बांध फुटला आणि मुसमुसत ती साधनाला बिलगली. उत्तरादाखल आभानं गळा काढला.
”अब मैं कहाँ जाऊंगी अब्बू? मैं तो जान दे दूंगी।’’
मी उठलो आणि रेखाला म्हणालो, की ‘आता तिलाच या पेचप्रसंगातून मार्ग काढावा लागेल.’ तिनं प्रश्नार्थक मुद्रेनं माझ्याकडे बघितलं. मी सगळ्यांना म्हणालो, की ‘भट्टासुद्धा वाईट मुलगा नाहीये. दोन वर्षांपासून तो आमच्या घरी येतो आहे, आमच्या मुलीबरोबर हिंडतो आहे, तिला दगा देण्याचा त्याचा हेतू नक्कीच नसणार. घरच्या लोकांच्या दबावाखाली त्याला लग्न करायला लागलं, हे दुर्भाग्य. पण म्हणून तीन चांगल्या मुलांचं आयुष्य बरबाद होऊ देता कामा नये.’’ सगळ्यांनी माना डोलावल्या. (डोलावणारच. कमांडिंग ऑफिसर होतो मी त्या सगळ्यांचा.)
साधनानं आभाला आणि रेखाला- दोघींना कुशीत घेतलं. ”कुणाचाच काही दोष नाही,’’ ती दोघींना म्हणाली, ”उगाच एकमेकांच्या जिवावर उठण्यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा दोघी मिळून समजुतीनं एकत्र राहिलात, तर सगळ्यांचं भलं होईल.’’
रेखानं न समजून साधनाकडे बघितलं.
”ठीक है अम्मी।’’ आभा डोळे पुसून म्हणाली, ”उनके लिये मैं कुछ भी कर सकती हूँ। मैं रेखा को अपनी छोटी बहन मान लूंगी। हमेशा खयाल रखूंगी। हम तीनों हमेशा एकसाथ रहेंगे।’’
”मेरी अच्छी बच्ची!’’ साधना आभाच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली, ”कितनी समझदार हो गयी है देखो!’’ मग ती रेखाकडे वळली. ”तुम्हारा क्या खयाल है बेटी?’’
एक मिनिटभर रेखा ‘आ’ वासून आमच्याकडे बघत राहिली, मग खाली मान घालून बारीक आवाजात म्हणाली,
”ठीक है। मैं तैयार हूँ।’’
माझा आपल्या कानांवर विश्वासच बसेना. आम्ही एखादी आक्रमक प्रतिक्रिया होईल, अशी अपेक्षा करत होतो. तर ही पोरगी चक्क तयार झाली सवत स्वीकारायला? हे एवढं अनपेक्षित आणि ॲब्सर्ड होतं, की मला अगदी गदगदून हसायला यायला लागलं. कंट्रोलच करता येईना. तोंड दाबायचा प्रयत्न केला, तर नकली दाढी हातात आली. बाकीच्यांनाही राहवेना. खोलीत जोरदार हशा पिकला. साधना आणि आभाही हसत सुटल्या. रेखाला काय वाटलं, ते समजून घ्यायच्या स्थितीत आम्ही कुणीच नव्हतो. पण मग साधनानं तिला बाजूला घेऊन सत्य परिस्थिती सांगितली. स्वतःची, माझी आणि आभाचीसुद्धा खरी ओळख करून दिली.
संध्याकाळी भलीमोठी वेलकम पार्टी झाली. नवीन जोडप्याचं रीतसर स्वागत करण्यात आलं. रेखाला मनमोकळं हसताना पाहून मलाही खूप बरं वाटलं.
”काय, झाल्या की नाही सगळ्या शंका दूर?’’ मी तिला विचारलं. तिनं लाजत मान डोलावली. तिला शुभेच्छा देऊन मी मागे वळलो आणि तिनं कुजबुजत्या स्वरात भट्टाला विचारलं,
”हे विंग कमांडर पळसुले, तर ते सकाळी भेटलेले कोण?’’
किरण पळसुले (एअर व्हाईस मार्शल – निवृत्त), पुणे.
kppalsule@gmail.com