सरकारी खाक्या
गायतोंडे खरोखर गायीसारखे गरीब होते. माणसानं इतकं सरळ आजच्या जगात असू नये. पण काय करणार? गायतोंडे तसे होते. ते एका अपार्टमेन्टमध्ये राहत होते. त्या अपार्टमेन्टची एक पद्धत होती. त्या पद्धतीनुसार सोसायटीचं सेक्रेटरीपद रोटेशननं तीन वर्षांसाठी प्रत्येकाकडे येत असे. त्याप्रमाणे आता ते गायतोंडेंकडे आलं होतं. सोसायटीतले सदस्य काही साधेसुधे नव्हते. मीटिन्गला आडवेतिडवे प्रश्न विचारून सेक्रेटरीला भंडावून सोडायचे. सोसायटीच्या मीटिन्गला हल्ली साठ-सत्तर लोक असायचे, पूर्वी इतके नसत. पण आता बरेचजण निवृत्त असल्यानं वेळ मजेत घालवण्यासाठी भरपूर लोक येत असतात.
एकदा एका सदस्यानं सांगितलं, की ‘आपली बिल्डिन्ग बी टेन्युअरमधली आहे. आता आपण ती बांधून चाळीस वर्षं झाली, पण हे बांधकाम अनधिकृत आहे. सरकार आपल्याला कधीही नोटीस देईल आणि बिल्डिन्गवर बुलडोझर चालवून बिल्डिन्ग भुईसपाट करून टाकेल. मी योग्य वेळी सूचना देतोय. सेक्रेटरीनं तातडीनं याकडे लक्ष द्यावं.’
लगेच आरडाओरडा होऊन सूचना पास झाली. कुणाच्या तरी सूचना मांडण्यानं चाळीस वर्षं जुनी इमारत अनधिकृत झाली.
गायतोंडेंनी विचारलं, ‘‘मी आता काय करू?’’
‘‘गायतोंडे, तुम्ही आता कृषी विभागातल्या उपअभियंत्याकडे जा आणि काय दंडबिंड होत असेल, तर तो वेळीच भरून टाका आणि बिल्डिन्ग वाचवा.’’
दुसरा एकजण म्हणाला, ‘‘हे चुकीचं आहे. तुम्ही कार्यकारी जल अभियंता यांच्या ऑफिसला जा. बिल्डिन्ग बांधण्याआधी जल अभियंत्यांची परवानगी लागते. त्यानंतर कृषी विभागाकडे ‘नो ऑब्जेक्शन लेटर’ची मागणी करायची असते.’’
गायतोंडें म्हणाले, ‘‘जल अभियंत्यांचा काय संबध?’’
कुणीतरी पचकला, ‘‘गायतोंडे, आपल्याला पाणी नाही का लागत? का तुम्ही गायीच्या दुधानं अंघोळ करता?’’
कुणी म्हणालं, ‘‘गायतोंडे, तुम्ही जाताना बायकोला बरोबर घेऊन जा. तुम्हाला या सरकारी ऑफिसेसचा अनुभव नाही. वहिनींनी निदान आरोग्य खात्यात नोकरी केलेली आहे.’’
‘‘तुम्हाला असं म्हणायचं आहे का, की आरोग्य खात्याचीही परवानगी लागेल?’’
यावर कुणीतरी म्हणालं, ‘‘तुमची बायको आरोग्य खात्यातच होती म्हणजे घरातून बाहेर पाऊल टाकतानाच तुम्हाला आरोग्य खात्याची परवानगी लागेल.’’
गायतोंडे किंचित रागावून म्हणाले, ‘‘आणतो बाबांनो, आणतो. जिथे जिथे म्हणून सरकारी बोर्ड दिसेल, तिथल्या सगळ्या इन्जिनीअरांची परवानगी आणतो. पण हे बघा, सरकारी कामात लाच द्यावी लागते. मी त्याचाही हिशोब देईन, पण तो बिनपावतीचा हिशोब सोसायटीनं मंजूर केला पाहिजे.’’
गायतोंडेंच्या या वक्तव्यावर ‘मंजूर मंजूर’ अशा आरोळ्या झाल्या. ते एकून गायतोंडेंना बरं वाटलं.
गायतोंडे उत्साहात कामाला निघाले. त्यांनी सोसायटीतल्या कोवळ्यांना बरोबर घेतलं. गायतोंडे आणि कोवळे या दोन गरीब गायी आता सरकारी कत्तलखान्याकडे निघाल्या होत्या.
पहिलंच सरकारी ऑफिस मिळालं ते लाचलुचपत खात्याचं होतं. तिथल्या ऑफिसरनं दोघांना बजावून सांगितलं, की ‘कुठेही लाच देऊ नका. वेळप्रसंगी आम्हाला बोलवा. आम्ही असताना तुम्ही कशाला काळजी करताय?’
गायतोंडेंचा उत्साह अजून वाढला. त्याच इमारतीत भूमापक उपअभियंत्यांचं ऑफिस होतं. ही दोन पात्रं तिथल्या कारकुनाला भेटली.
तो म्हणाला, ‘‘इमारत बांधून चाळीस वर्षं झाली म्हणता? इतके दिवस काय झोपला होतात का? एका वर्षाला साधारण पन्नास हजार इतका दंड धरला, तर वीस लाख रुपये दंड भरावा लागेल, सर्कलची परवानगी घ्यावी लागेल. त्यालाही काही खर्च येईल.’’
कोवळे म्हणाले, ‘‘सर्कल म्हणजे वर्तुळ ना?’’ गायतोंडे म्हणाले, ‘‘सर्कल म्हणजे जिकडं सरकंल तिकडं सरकंल.’’
कारकून ओरडला, ‘‘अहो, सर्कल म्हणजे आमच्या ऑफिसहून मोठं ऑफिस. तिथे वाघ नावाचे सर्कल आहेत त्यांची परवानगी लागेल.’’
गायतोंडे म्हणाले, ‘‘वाघ म्हणजे सेनेचे वाघ का?’’
‘‘नाही हो, आडनावाचे वाघ. सेनेचा कसलाही संबंध नाही. तुम्ही असं करा, प्रथम ‘सातबारा’चा उतारा काढा आणि मगच सर्कलला भेटा.’’
‘‘उतारा काढायचा म्हणजे मीठ, लिंबू, मिरची, हळद-कुंकू इत्यादी साहित्य लागेल ना?’’
‘‘अहो, काय बोलताय तुम्ही? अहो, तलाठ्याकडून ‘सातबारा’चा उतारा काढायचा असतो. आता तुम्ही आमच्या कॅम्प ऑफिसमध्ये जा. तिथे लांडगेसाहेबांकडून उतारा मागा. तो घेऊन माझ्याकडे या. म्हणजे पुढच्या कामाचं आपण बघू. त्याआधी इथे एक अर्ज करा, की आमची इमारत अनधिकृत आहे, ती अधिकृत करावी इत्यादी इत्यादी.’’
गायतोंडे म्हणाले, ‘‘एक कोरा कागद देता?’’
त्यावर उसळून ते उ. श्रे. सा. म्हणजे उच्च श्रेणी साहाय्यक म्हणाले, ‘‘मी इथे कोरे कागद पुरवठा अधिकारी नाही. बाहेरच्या स्टेशनरीच्या दुकानातून कागद घेऊन अर्ज करा.’’
सुमारे अर्ध्या तासानं गायतोंडे आणि कोवळेंना जवळचं स्टेशनरी दुकान मिळालं. त्यांनी अर्ज लिहिला आणि ते पुन्हा उ. श्रे. सा. कडवे यांच्या समोर उभे राहिले.
कडवेंनी त्या जोडगोळीकडे तुच्छतेनं पाहिलं आणि ते म्हणाले, ‘‘सरकारी ऑफिसमध्ये अर्ज असा गाढवासारखा देतात का? याला दोन रुपयांचा कोर्ट फी स्टॅम्प लावून आणा.’’
गायतोंडेंनी विचारलं, ‘‘म्हणजे पावती तिकीट ना?’’
कडवे आणखी कडवटपणे म्हणाले, ‘‘मी कोर्ट फी म्हणालो, रेव्हेन्यू म्हणालो का?’’
‘‘म्हणजे कोर्ट फी वेगळी, पावती तिकीट वेगळं, रेव्हेन्यू स्टॅम्प वेगळे, पोस्टाची तिकिटं वेगळी.’’
कडवे म्हणाले, ‘‘बाजारात आणखीही तिकिटं मिळतात.’’
कोवळे म्हणाले, ‘‘लॉटरीची का?’’
‘‘हो! पण ती जोडू नका.’’
‘‘पण मला हे सांगा, कोर्ट फी कुठे भरायची? आणि स्टॅम्प कुठून आणायचे?’’
कडवे पुन्हा त्रासून खेकसून म्हणाले, ‘‘बाहेरच्या पानपट्टीच्या दुकानात सगळं काही मिळेल.’’
कोवळे आणि गायतोंडे बाहेरच्या पानपट्टीच्या दुकानात गेले. तिथे त्यांना ब्रह्मज्ञान मिळालं. पानपट्टी मालकानं सांगितलं, ‘‘हे बघा, तुमचं जमिनीविषयी काहीही काम असेल, तर मला सांगत जा. इथल्या लांडगे, कोल्हे, वाघ, लोहार, सुतार या सगळ्यांना मी ओळखतो. नुसतं ओळखत नाही, तर कुणाचे दाढी-कटिन्गचे दर काय आहेत, तेही मला माहीत आहेत. ही सगळी तोडपाणी करणारी मंडळी आहेत. तुम्ही माझ्याकडे बिनधास्तपणे पैसे द्या. इथे सीसीटीव्ही नाही, पावती मिळणार नाही, पण तुमचं काम चोख होईल. मुख्य म्हणजे कोल्ह्या, कुत्र्या, लांडग्यांसारखी माझी बदली होत नाही. माझं इथे तीस वर्षं दुकान आहे.’’ पानपट्टी दुकानदार आपण रिलायन्सचा मालक असल्याच्या थाटात गर्वानं सांगत होता.
या लोकांचं बोलणं ऐकत उभा असलेला एक इसम म्हणाला, ‘‘मामांचा हा मुद्दा बरोबर आहे. इथे मी एकदा एका लांडग्याला दहा हजार रुपये दिले होते. तो माझं काम करणार होता, पण त्याची झाली बदली. त्या जागी आलेला दुसरा पुन्हा दहा हजार दिल्याशिवाय काम करायला तयार होईना. मला म्हणतो कसा, की तुम्ही पैसे दिलेत याला पुरावा काय? आता मला सांगा, इथे पुरावा ठेवून कुणी पैसे घेतो का? इथे सी.सी.टी.व्ही. असतात, इतक्या लख्ख उजेडात पैसे कोण घेईल? माझ्या लक्षात इतकंच आलं, की आपले दहा हजार डुबले.’’
पानवाल्याकडून दोन रुपयांचे कोर्ट फी स्टॅम्प घेऊन गायतोंडे अर्ज द्यायला उ. श्री. सा. कडवे यांच्याकडे गेले.
कडवेंनी सांगितलं, ‘‘आता बिनधास्त पंधरा दिवसांनी या. येताना कॅम्पातल्या आमच्या ऑफिसमधून ‘सातबारा’चा उतारा घेऊन या.’’
कॅम्प ऑफिसमधल्या उसळे या कारकुनानं कोवळे आणि गायतोंडे यांच्यावर भरपूर तोंडसुख घेतलं. कोवळे आणि गायतोंडे हे काही हेमामालिनी, माधुरी नव्हते. पण त्या कारकुंड्यानं घेतलं तोंडसुख. पद्धत जरा वेगळी.
त्या दोघांची कैफियत एकून तो म्हणाला, ‘‘अरे माणसांनो, चाळीस वर्षं झालेल्या इमारतीला आता अनधिकृत करून त्यावर डोझर फिरवायला सरकार काही खुळं आहे का? तरीही मी जरा संगणकावर बघून सांगतो. तुमचा बिल्डिन्ग नकाशा वगैरे काही आणलं आहे का?’’
कोवळे म्हणाले, ‘‘नाही.’’
‘‘तर मग पुन्हा येताना सगळी कागदपत्रं घेऊन या. तुम्ही कोण, ते मी ओळखत नाही. म्हणून पुन्हा येताना स्वत:चं आधार कार्ड, पॅन कार्ड, लेटेस्ट फोटो वगैरे घेऊन या.’’
तरीही सौजन्य म्हणून त्यानं संगणकावर गायतोंडे यांच्या तोडक्यामोडक्या माहितीवरून ‘सातबारा’ बघितला आणि तो म्हणाला, ‘‘तुमची माहिती अगदी चुकीची आहे. ही जमीन बी टेन्युअरमधली नाही, पण ही ‘३२ भो’ची शेतजमीन आहे. या शेतजमिनीवर बिल्डिन्ग बांधल्याचा चाळीस वर्षांचा दंड तुम्हाला भरावा लागेल. पण हे काम अगदी सहजपणे होणारं नाही. आता असं करा, आमच्या कार्यालयाबाहेर बरेच काळे कोटवाले दिसतील, त्यातला एखादा चांगला वकील बघा, तो तुमचं काम करून देईल.’’
गायतोंडेंचा पुन्हा प्रश्न, मनात जसा आला तो त्यांनी विचारूनही टाकला, की ‘सगळ्या काळ्या कोटवाल्या वकिलांमधून चांगला वकील कसा ओळखायचा?’
‘‘सोपं आहे, ज्याच्या कोटाला इस्त्री असेल तो!’’
‘‘वा! छान कल्पना आहे. ज्या वकिलाला कोटाला इस्त्री करायला पैसे मिळत नसतील, तो कसला वकील?’’
बाहेरच्या गर्दीतून गायतोंडेंनी कोटाला इस्त्री असलेला वकील शोधला, त्याची विजारही पांढरी स्वच्छ इस्त्री केलेली होती.
बिल्डिन्गची कहाणी सांगितल्यावर दोंदे वकील म्हणाले, ‘‘अरेरे, तुमच्या बिल्डिन्गवर कधीही नांगर फिरू शकतो. आपण असं करूया, आधी कोर्टाकडून महानगरपालिकेवर या कामासाठी ‘स्टे’ आणूया, म्हणजे सर्व चाळकरी आपल्या जागेत बिनधास्तपणे झोपू शकतील.’’
गायतोंडें म्हणाले, ‘‘आम्ही चाळकरी नाही. अपार्टमेन्टमध्ये राहतो.’’
यावर दोंदे म्हणाले, ‘‘तेच ते. चाळीस वर्षं राहताय नां तिथे, मग ती चाळच की. पण मुद्दा तो नाही. आज महानगरपालिका तुमच्या जिवावर उठली आहे ना? मग तुम्हाला ‘स्टे’ मिळवून देणं माझं कामच आहे. मी मुद्देसूद भांडणारा माणूस आहे.’’
गायतोंडे म्हणाले, ‘‘मग खर्च किती येईल.’’
दोंदे म्हणाले, ‘‘पैसा पाण्यासारखा खर्च होईल, पण ही वेळ खर्च बघण्याची नाही. डोक्यावरचं छप्पर महत्त्वाचं आहे. ते उडालं तर आपण जाणार कुठे? माझी फी मी तुमच्याकडून जास्त घेणार नाही. पण हल्लीची कोर्टंदेखील आतून बाहेरून रंगवावी लागतात. पुढचं तुम्ही समजून घ्या. छपराचा प्रश्न आहे.’’
कोवळे म्हणाले, ‘‘आज किती द्यायचे?’’
‘‘आज वीस द्या. बाकीचे तारखा पडतील तसे सांगू.’’
गायतोंडेंनी विचारलं, ‘‘म्हणजे इथेही तारीख पे तारीख, हा प्रकार आहे का?’’
‘‘होय तर, जिल्हा कोर्टापासून सुप्रीमपर्यंत तारीख पे तारीख हा प्रकार आहेच! त्याशिवाय कायदा सुव्यवस्था चालणार कशी? देशातली बेकारी दूर होणार कशी? कर्मचारी जगणार कसे? बातमीदारांना ब्रेकिन्ग न्यूज कुठून मिळणार? बघा, इथे रोज कोर्टाबाहेर कॅमेरे घेऊन वार्ताहर तयारच असतात. तुम्ही आमच्याकडे आल्याशिवाय आम्हा वकिलांना काम मिळणार कसं, पोलिसांना काम काय, चोरांना काम काय, पुढारी काय करणार आणि या इतक्या अवाढव्य देशाचा गाडा चालणार कसा?’’
कोवळे म्हणाले, ‘‘बरोबरच आहे. पण कोर्टाचा निकाल नक्की आमच्या बाजूनं लागणार, याची काय शाश्वती?’’
एक सुस्कारा सोडून दोंदे म्हणाले, ‘‘९९ टक्के तुमची बाजू बरोबर आहे, पण एक टक्का काही सांगू शकत नाही. आपण म्हणतो कायदा गाढव असतो. पण त्यालाही काही अर्थ नाही. शेवटी कोर्टात जे मिळतं त्याला न्याय म्हणायचं, असा कायदा आहे.
‘‘आम्ही दोघं निरनिराळ्या सरकारी ऑफिसच्या परवानग्या आणत आहोत, ते काम सुरू ठेवायचं का बंद करायचं, ते सांगा.’’
‘‘ते सुरूच ठेवायचं. आपण युद्धपातळीवर सर्व प्रयत्न करत राहायचं, आपल्या डोस्क्यावर छप्पर राहणार की नाही, याचा निर्णय तो सर्वसाक्षी घेणार!’’ दोंदे आकाशाकडे बोट दाखवत म्हणाले, ‘‘पण आपण कुठेही कमी पडायला नको.’’
दोंदे यांचं रीतसर देणं देऊन जोडगोळी परतली आणि नंतरच्या आठवड्यात प्रत्येक सरकारी कार्यालयाबाहेरच्या पानपट्ट्यांवर सुमारे दोन लाख रुपये देऊन आली.
कोल्हे, लांडगे, अस्वले, वाघ यांच्या एकमेकांना खाणाखुणा, फोनाफोनी सुरू झाली. ‘गायतोंडे आपला माणूस आहे बरं का!’ असे परवलीचे शब्द फिरू लागले. (अर्थ असा, की पैसे पोचले आहेत.)
काही खात्यांनी ‘तुमच्या बांधकामाला आमची हरकत नाही’ असे दाखले दिले. (असा दाखला द्यायला कुणाच्या बाचं काय जातंय!) काहींनी ही बाब आमच्या अखत्यारीत नाही, तरी आपण उपर निर्देशित कार्यालयाकडे संपर्क करावा, अशी पत्रं दिली. दोंदे यांनी कोर्टात अर्ज केलेला आहे, त्यावर तारखा पडत आहेत. सोसायटीच्या मीटिन्गमध्ये गायतोंडे यांच्यावर, खिरापतीसारखे पैसे वाटल्याचा आरोप होऊन प्रत्येक मीटिन्गमध्ये त्यांच्या बिनपावतीच्या पैशांचा प्रश्न पुढच्या मीटिन्गला घेऊ, असं म्हणून पुढे पुढे ढकलला जातो आहे. अशी ही सरकारी खाक्याची गोष्ट सुफळ संपूर्ण नव्हे अफल अपूर्ण! कारण ज्या क्रियानिष्ठ माणसानं ही इमारत अनधिकृत आहे, असं मीटिन्गमध्ये सांगितलं, त्याची या इमारतीवर बुलडोझर फिरणार, अशी अजूनही खात्री आहे.
विलास अध्यापक, कोल्हापूर
vilasadhyapak@yahoo.co.in
मोबाईल : ९४२२४ २४२५१