लग्नाचं वय?

सीमा टेबल आवरत होती तोच पाठीमागून अनुराधाची हाक आली. ”सीमा!” तिनं वळून बघितलं. ”वॉव! काय सुंदर साडी नेसलात आज तुम्ही. ऑफिसमध्ये काही फंक्शन आहे का?”
”तेच सांगत होते मी तुला. संध्याकाळी मी जेवायला नाहीये. यायला पण थोडा उशीर होईल. ऑफिसमध्ये आज पार्टी आहे.”
”कशाची?”
”फेअरवेल आहे, माझी.”
”तुमची बदली झालीये का?”
”नाही. मी नोकरी सोडतेय.”
समीर पेपरमध्ये डोकं खुपसत बसला होता, पण त्याचे कान इकडेच होते. अनुराधाचे शेवटचे शब्द ऐकताच त्यानं पेपर बाजूला केला अन् म्हणाला, ”नोकरी सोडतेस तू? का?”
”मी लग्न करतेय.”
आता तर पेपर त्याच्या हातातून गळूनच पडला.
”लग्न! तुला काय वेडबीड लागलंय का? हे काय लग्न करायचं वय आहे तुझं?”
पण त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच सीमा नणदेच्या गळ्यात पडली होती. ”ताई, खरंच लग्न करताय तुम्ही? माझा स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नाहीये. या गोड बातमीची कधीपासून वाट बघत होते मी. खूप खूप अभिनंदन!” मग तिनं फिल्मी स्टाईलमध्ये विचारलं, ”क्या पूछ सकती हूँ वह खुशनसीब कौन हैं।”
अनुराधानं पर्समधून एक कार्ड काढून तिच्या हातात दिलं.
”अरे वा! कार्डबिर्डं छापून लग्न होणार आहे का?” समीरनं खवचट प्रश्न केला.
”लग्नात कार्डं छापत नाहीत का? तुमचं आपलं काहीतरीच.” सीमा म्हणाली अन् कार्ड काढून वाचायला सुरुवात केली.
”अनुराधा अँड प्रदीप रिक्वेक्ट द प्लेझर ऑफ युवर…”
”तुम्ही स्वतःच्या नावानं पत्रिका छापलीत. हाऊ स्वीट… अन् प्रदीप म्हणजे…”
”प्रदीप मेहता. द बॉस. मी म्हणूनच नोकरी सोडतेय.”
”वंडरफुल. पण ताई हे काय… २ तारखेचं लग्न आहे. म्हणजे आज ३० झाली. ३१ आणि १. दोन दिवसांत सगळं कसं जमवणार आहोत आपण.”
”काहीच करायचं नाहीये. तू टेन्शन घेऊ नकोस.”
”आधी सांगितलं असतं, तर तुझं रिसेप्शन काही वेगळं असणार होतं का?”
”ताई, तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. पण दोन दिवसांत खरंच अवघड आहे हे.”
”तुला सांगितलं ना, काहीच करायचं नाहीये. उतारवयातलं लग्न आहे. नो सेलिब्रेशन.”
”हे बघा, लग्न म्हणजे लग्न असतं. कुठल्या पण वयातलं असेना. थोडी धामधूम तर हवीच.”
”माझी मैत्रीण आहे ना सोनाली, ती धामधूम करणार आहे. रविवारी म्हणजे १ तारखेला तिनं संगीत आणि मेंदीचा कार्यक्रम ठेवला आहे. फॉलोड बाय डिनर. तू आणि शमा नक्की या बरं का…”
”या म्हणजे?”
”अगं, मी रविवारी सकाळीच तिच्या घरी शिफ्ट होणार आहे. सोमवारी तिथूनच मंदिरात जाईन.”
”मंदिरात का?”
”अगं, लग्न मंदिरातच होणार आहे. पत्रिकेत तसं लिहिलेलं नाही. फक्त दोन्हीकडची घरची मंडळी असतील. खरं म्हणजे मी फक्त याच फंक्शनबद्दल आग्रह धरला होता. पार्टी, पत्रिका वगैरे घोळ मला नको होता. पण प्रदीप म्हणाले, ‘माझं दुसरं असलं, तरी तुझं पहिलं लग्न आहे. थाटात झालं पाहिजे. नो कॉम्प्रमाईज.’ ”
”हाऊ नाईस ऑफ हिम.”
”मग रिसेप्शनमध्ये काय त्या रॉयल खुर्च्यांवर बसणार आहात दोघं.” समीरनं पुन्हा एक कुजकट प्रश्न फेकला.
”तू येऊन बघ ना, आमंत्रणपत्रिका दिलीय मी तुला. बाय सीमा, येते गं. उशीर होतोय. आज नोकरीचा शेवटचा दिवस. आज लेट व्हायला नको.”
अनुराधा बाहेर पडल्यानंतर त्या बंद दरवाजाकडे बघत सीमा कितीतरी वेळ उभी होती. मग तिनं समीरकडे मोर्चा वळवला. ”ताईंचं लग्न हा तुमच्या जिव्हाळ्याचा विषय कधीच नव्हता. मला माहीत आहे. पण आता त्यांचं त्यांनी जमवलंय, तर आनंद व्यक्त करायला काहीच हरकत नव्हती.”
”आपल्या दोघांच्या वाट्याचा आनंद तू व्यक्त करून टाकला आहेस की. फक्त नाचायचं तेवढी बाकी राहिलं होतं. मला अशी नाटकं करता येत नाहीत.”
”मी नाटक करत नव्हते. मला खरंच खूप आनंद झाला आहे. आयुष्याच्या या टप्प्यावर का होईना, त्या सेटल होताहेत ही किती समाधानाची बाब आहे.”
”आपला आनंद, आपलं समाधान यानं तिला काही फरक पडत नाही. ती परस्पर सर्व ठरवून मोकळी झाली आहे. आपली जरादेखील पर्वा असती, तर आपल्याला आधी सांगितलं असतं. असं वेळेवर कळवलं नसतं.”
”समजा, आधी सांगितलं असतं, तर तुम्ही काय करणार होतात? दाराशी मांडव घालणार होतात, की सनई-चौघडे बसवणार होता? साधा आनंद व्यक्त करता आला नाही तुम्हाला?”
”कसला आनंद गं? त्या थेरड्याशी लग्न करतेय, यात कसला आलाय आनंद? दोन कॉलेज गोईंग मुलं आहेत त्यांना. ठाऊकंय?”
”ताईंचं वेळेवारी लग्न झालं असतं, तर त्यांची मुलंदेखील इतकीच मोठी असती. नाही का? अन् मुलं कॉलेजात गेली म्हणजे बाप थेरडा होत नाही. आपला शौनक आता बारावीला आहे. पुढच्या वर्षी तो पण कॉलेजला जाईल. मग तुम्हाला काय म्हणायचं?”
काहीच उत्तर न सुचल्यामुळे समीर गप्प बसला. सीमाच पुढे म्हणाली, ”उशिरा का होईना, त्यांच्या जीवनात सुखाची एक झुळूक आली आहे. त्याचं अभिनंदन करायचं राहिलं बाजूला, उलट खवचटपणे त्यांना टोमणे मारलेत. मला इतकी लाज वाटली म्हणून सांगू…”
”ही जी सुखाची झुळूक वगैरे म्हणतेस नं तू, हे वादळ आहे वादळ. या वादळात तुझी सगळी स्वप्नं पालापाचोळ्यासारखी उडून जाणार आहेत.”
”माझी स्वप्नं? कुठली?”
”हेच, की मुलाला इंजिनीअर करायचं आहे. मग त्याला अमेरिकेला पाठवायचं आहे. मुलीला मेडिकलला घालायचं आहे. तिच्यासाठी डॉक्टर नवरा बघायचा आहे. ही सगळी स्वप्नं आता स्वप्नंच राहणार आहेत.”
”ही स्वप्नं मी ताईंच्या जिवावर नाही, माझ्या नवऱ्याच्या जिवावर बघितली होती. त्याची ऐपत नसेल तर राहूदे. जगातल्या सगळ्याच मुलींनी डॉक्टर-इंजिनीअर व्हावं, असा काही कायदा नाहीये. तशीच वेळ आली, तर शमा नोकरी करून भावाच्या शिक्षणाला हातभार लावेल, तुमच्या घरात ती परंपरा आहेच. पण मी माझ्या पोरीला बिनलग्नाची राहू द्यायची नाही. शौनकला नोकरी लागताच तिला उजळून टाकीन.”
”मला टोमणा मारतेस?”
”टोमणा कशाला? खरं तेच बोलतेय. मला तुम्हा सर्वांचं विशेषतः आईंचं खूप नवल वाटतं.”
”आता आईनं काय केलं?”
”मुलीच्या लग्नाची सर्वात जास्त काळजी आईला असते. पण तुमच्या आई किती कूल होत्या. त्यांचं एकच पालुपद असायचं, ‘आता या वयात कसलं लग्न करते ती?’ खरं म्हणजे आपलं लग्न झालं, त्या वेळी ताई फारतर तीस-बत्तीस वर्षांच्या असतील. पण आईंचं सतत असं बोलणं ऐकून लग्न करावंसं वाटलं असलं, तरी बोलू शकल्या नाहीत.”
”आईला कदाचित इन्सिक्युअर वाटत असावं.”
”का म्हणून?”
”आमचे दादासाहेब, एकदा जे परदेशी गेले ते पुनश्च मागे वळून बघितलं नाही. एकदा लग्न करायला म्हणून आले होते. त्यानंतर थेट आईच्या तेराव्याला आले. त्यामुळे आईला धास्ती वाटत असेल, की थोरल्याप्रमाणे धाकटा पण गेला, तर आपल्याजवळ कोण आहे. म्हणून तिनं ताईला धरून ठेवलं.”
”पण तुमचा तर परदेशी न जाण्याचा आधीपासून निर्धार होता ना! मग तुम्ही आईंना दिलासा द्यायचा. तुम्ही पुढे राहून ताईंचं लग्न करून द्यायचं.”
”तुला लग्न म्हणजे गंमत वाटते का? पोतंभर पैसे लागतात त्यासाठी. ते रावसाहेब सगळ्या जबाबदाऱ्या झटकून मोकळे झालेत अन् अमेरिकेत मजा मारताहेत. मीच एकट्यानं खर्चाचा बोजा का म्हणून उचलायचा?”
”ताईंनी असा विचार केला असता तर? तुम्हा दोघांची शिक्षणं झाली असती का? आपल्या स्वार्थासाठी तुम्ही त्यांची स्वप्नं गहाण टाकलीत अन् आता त्या ती सोडवायला निघाल्या आहेत, तर तुमचा तिळपापड होतोय. शी…”
”हे बघ, ताईचं लग्न आईनं होऊ दिलं नाही. माझा त्याच्यात काहीच स्वार्थ नव्हता.”
”होता. बरोबर होता. एक पर्मनंट अर्निंग मेंबर तुम्हाला मिळाला होता, म्हणूनच तुम्ही बिनधास्त बिझनेसचे प्रयोग करत होता, करू शकत होता. तुमच्या त्या बिझनेसमध्ये कधी अमावास्या व्हायची, कधी पौर्णिमा उगवायची. मला कधी कळलंच नाही. घर अक्षरशः ताईंनी उचलून धरलं होतं म्हणून कधी जाणवलं नाही, पण खरं सांगू? त्यामुळेच हा संसार मला कधी आपला वाटलाच नाही. इथली प्रत्येक वस्तू ताईंच्या पैशानं, ताईंच्या पसंतीनं आणलेली आहे. मग तो फ्रीज असूदे. टीव्ही असूदे, सोफासेट किंवा पडदे असूदेत, गोदरेजचं कपाट असू दे. प्रत्येक वस्तूवर ताईंची मोहोर आहे. जुनं सगळं सासूबाईंचं, नवं सगळं ताईंचं. माझं खरंच काहीच नाहीये. माझ्या संसाराचा गाडा ताईंनीच ओढला आहे. लग्न केलं नाही, तरी हा व्याप काही त्यांना चुकला नाही.”
”उगीच काहीतरी बडबडू नकोस. हे घर तिचंही आहे. तिनं घरासाठी काही केलं, तर काही फरक पडत नाही.”
”घराचं जाऊदे, पण मुलं तर आपली आहेत ना. त्यांना सुद्धा तुम्ही ताईंच्या अंगावर टाकून दिलं आहे. लहान होती तोवर ठीक होतं. खाऊनं अन् खेळण्यानं भागत होतं. पण मुलं आता मोठी झाली आहेत. त्यांच्या गरजा वाढल्या आहेत. मुख्य म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी आत्यासमोर हात पसरायला त्यांना आवडत नाही. पण त्यांनी आढेवेढे घेतले, की तुम्ही सरळ ताईंना सांगता. ‘बघ गं, याला काय हवंय ते.’ मुलांना या गोष्टीचा खूप राग येतो. मागच्या महिन्यांत शौनकला ब्लेझर हवा होता, तेव्हा तुम्ही हेच केलं. नंतर तो काय म्हणाला सांगू?”
”काय म्हणाला?”
”तो म्हणाला, की ‘ममा तुम्ही आम्हा दोघांना आत्याच्या भरवशावर जन्माला घातलंय का?’ ”
”तो नालायक असं म्हणाला? त्याचं मुस्काट फोडलं पाहिजे.”
”मलासुद्धा संताप आला होता. मी त्याच्या मुस्काटात ठेवून दिली होती. नंतर दिवसभर टिपं गाळत होते. पोराची काय चूक होती? तो खरं तेच बोलत होता. खरं होतं म्हणूनच मला झोंबलं होतं.”
काही क्षण खोलीत निस्तब्ध शांतता पसरली होती. मग सीमा एकदम उठून उभी राहिली. ”बाई गं! किती वाजले? माझं घड्याळाकडे लक्ष नव्हतं. आज तुमची तहानभूक हरपली असेल म्हणा. पण माझी शाळेतून भुकेली येतील. त्याच्यासाठी काहीतरी करायला हवं ना?” असं म्हणत ती स्वयंपाकघरात निघून गेली.
बरोब्बर दीड वाजता मुलं शाळेतून परतली अन् इतका वेळ झोपी गेलेलं घर एकदम जागं झालं. निरनिराळ्या आवाजांनी भरून गेलं. सीमाच्या सूचना सुरू होत्या. ”युनिफॉर्म लाँड्री बॅगमध्ये टाका रे. जोडे जागेवर ठेवा. मोजे धुवायला टाका. टिफीनचा डबा आठवणीनं बॅगमधून काढा. नाहीतर सोमवारपर्यंत तसाच पडून राहील, मग त्या वासानं वेड लागायला होईल. हात-पाय स्वच्छ धुवा अन् मगच पानावर या.”
मुलांच्या पण गर्जना सुरू होत्या, ”ममा, माझा पिंक फ्रॉक कुठंय? ममा, आज मला एस्सेमध्ये गुड मिळाला. ममा, माझं व्हॉलीबॉलमध्ये सिलेक्शन झालं. ममा, सायन्सच्या मिसना कुत्रं चावलंय. त्या आठवडाभर येणार नाहीत.”
हा चिवचिवाट पानावर बसल्यावरच थांबला. दोन घास खाऊन झाल्यावर शमानं विचारलं, ”ममा, आज कुठला सण आहे का? तू शिरा केला आहेस.”
”सण नाही, पण त्यापेक्षाही आनंदाची बातमी आहे.”
”कसली?”
”आत्याचं लग्न ठरलंय.”
”वॉव!” शमा चित्कारली. ”कुणाशी गं?”
”मिस्टर मेहतांशी.”
”वॉव!” तिनं पुन्हा चित्कार केला. समीर एकदम उखडला.
”हे ‘वॉव वॉव’ काय चाललंय? कुठली भाषा आहे ही?”
”पपा, धिस इज जस्ट एन एक्स्प्रेशन,” शौनक शांतपणे म्हणाला, ”आनंद व्यक्त करायची ती एक पद्धत आहे.”
”एवढा कसला आनंद झाला आहे तुम्हाला?”
”तुम्हाला झाला नाही का?”
सीमा लगेच मधे पडली. ”ए मुलांनो, आधी शांतपणे जेवा बघू. वादविवाद नंतर.”
”ममा, तू स्वीट संध्याकाळी बनवायचं होतं. सकाळी आत्या जेवायला नसते.”
”आज संध्याकाळी पण ती जेवायला नाहीये. ऑफिसमध्ये पार्टी आहे.”
”कसली?”
”फेअरवेल पार्टी. आत्याची फेअरवेल आहे आज.”
”का?”
”ती नोकरी सोडतेय.”
वा… शमा पुन्हा ‘वॉव’ म्हणणार होती, पण तिनं कसातरी तो शब्द गिळला अन् म्हणाली, ”म्हणजे आत्या आता फुलटाईम हाऊसवाईफ होणार. हाऊ एक्सायटिंग!”
”वंडरफुल. फँटॅस्टिक.” शौनक म्हणाला.
मुलांचा तो निरागस आनंद बघून सीमाला खूप बरं वाटलं.
रात्री अनुराधा घरी परतल्यावर तिला मिठी मारून मुलांनी असा काही जल्लोष केला, की सीमाला अगदी भरून आलं. ‘देवा! माझ्या मुलांची मनं अशीच निर्मळ अन् निरागस राहू देत. ऐश्वर्याचा लवलेशसुद्धा त्यांच्यात नसावा.’
सकाळी सकाळी अनुराधानं जाहीर केलं, ”सीमा, आज आम्ही तिघं जेवायला नाही आहोत बरं का! आज आम्ही वीकेंड एन्जॉय करणार आहोत. मी मुलांना आज ट्रीट देणार आहे.”
”आम्ही काय पाप केलंय?”
”तुझा तो नवरा तिकडे तोंड सुजवून बसला आहे. त्याला घरी सोडून चलणार आहेस का?”
”मी गंमत केली. आज मला खूप कामं आहेत. एन्जॉय वगैरे करायला मुळीच सवड नाहीये. तुम्ही निर्धास्तपणे जा.”
आणि खरंच, ती तिघं बाहेर पडताच सीमा पण तयार झाली. समीरला म्हणाली, ”जेवण तयार आहे. वेळेवारी जेवून घ्या. माझी वाट बघू नका. बाहेर जायचं असेल, तर खुशाल जा. माझ्याजवळ किल्ली आहे. ताईंजवळ त्यांची किल्ली आहे.”
चार वाजता मुलं उड्या मारतच घरात शिरली. आजचा दिवस खूप मजेत गेला होता. आईला काय सांगू अन् किती सांगू, असं त्यांना झालं होतं. पण सीमा घरात नव्हती. बिचारी हिरमुसली झाली. मुख्य म्हणजे पार्टीत घालायला म्हणून आत्यांनी दोघांना मस्त ड्रेस घेतले होते. ते मम्मीला दाखवायची घाई झाली होती. पण ती घरात नव्हती. मन अगदी खट्टू होऊन गेलं.
नाही म्हणायला पपा घरात होते. पण त्यांच्या मूडचं काही सांगता येत नाही. कोणत्या गोष्टीवर भडकतील याचा नेम नसतो.
सीमा सहाच्या सुमारास घरी परतली. आल्या आल्या तिनं मुलांना हाताशी धरलं अन् कामाला लागली. शमाला तिनं दारावर मण्यांचं तोरण बांधायला सांगितलं. म्हणाली, ”उद्या चौधरींच्या बागेतून ओव्याची पानं आणूया. त्याचं तोरण अवश्य लावायचं असतं.”
मग शौनकच्या मदतीनं तिनं माळ्यावरून दिवाळीत लावायच्या विजेच्या माळा काढल्या अन् सगळीकडे लावून टाकल्या. समीर आणि अनुराधा आपापल्या खोलीत बसून होते. बाहेर काय चाललंय, याची त्यांना काहीच कल्पना नव्हती. संध्याकाळी सगळीकडे एकदम लखलखाट झाला. शेजारीपाजारी ‘विशेष काय?’ म्हणत विचारायला आले, तेव्हा ते पण चकित झाले.
”ताई, स्पेअर असतील थोडी कार्ड्स द्या ना. शेजारी देईन म्हणते.”
अनुराधानं एक गठ्ठा तिच्यासमोर टाकला. ‘नको नको’ म्हणताना प्रदीपनं दिला होता, तो कारणी लागला.
रविवारी सकाळी दोन भल्यामोठ्या सूटकेसेस अनुराधानं मुलांच्या मदतीनं हॉलमध्ये आणून ठेवल्या.
”अगं, ती सोनाली मला पिकअप करायला येणार आहे. म्हणून तयार होण्यापूर्वी हे काम उरकलं.”
”ताई, तुमच्या मैत्रिणीला सांगा, ब्रेकफास्ट इकडेच करायचा आहे.”
”ओके.” म्हणत अनुराधा खोलीत निघून गेली. समीर थोडा वेळ त्या सूटकेसेसकडे बघत बसला अन् म्हणाला, ”ही एवढं काय घेऊन चालली आहे?”
”उघडून दाखवायला सांगू का?” असं म्हणत सीमानं ‘ताई’ म्हणून हाक मारायचा प्रयत्न केला. समीरनं लगेच तिच्या तोंडावर हात ठेवला. ”तुला वेडबीड लागलंय की काय?”
”वेड्यासारखं कोण वागतंय? तुम्ही की मी?” सीमा फणकारली, ”हे असं काहीतरी बोलताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? अठ्ठेचाळीस वर्षांच्या मिळवत्या स्त्रीजवळ इतकं सामान पण असू नये? आणखी एक सांगू? त्यांनी जर आपल्या सर्व वस्तू न्यायच्या ठरवल्या ना, तर तुमचं घर क्षणार्धात ओकंबोकं होऊन जाईल.”
समीर गप्प बसला. त्याशिवाय गत्यंतरच नव्हतं. परवापासून सीमानं त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. अन् बोलण्याची एकही संधी ती सोडत नव्हती.
बरोबर साडेनऊला अनुराधाच्या मैत्रिणी आल्या. नाश्त्याचा थाटमाट बघून त्याही चकित झाल्या. टेबल मांडून तयार होतं. अनुराधासाठी चांदीची ताट-वाटी होती. भोवती फुलांची रांगोळी घातली होती. मेनू पण जबरदस्त होता. श्रीखंडपुरी, मटारपुलाव, फ्लॉवरची भाजी, काकडीची कोशिंबीर अन् गरमागरम कचोरी… कचोरीसाठी पुदिन्याची अन् चिंचेची अशा दोन चटण्या. फक्त श्रीखंड बाहेरून आणलं होतं. बाकी सर्व सीमानं घरी बनवलं होतं. पहाटे पाचला उठून ती तयारीला लागली होती.
”माय गॉड! हा काय ब्रेकफास्ट म्हणायचा? पूर्ण जेवण आहे हे.”
सीमा उत्तरादाखल फक्त गोड हसली. सर्वांनी अगदी आस्वाद घेऊन नाश्ता उरकला. सीमा शमाला म्हणाली, ”मी किचनमध्ये चहा करून ठेवला आहे. सर्वांना देतेस का जरा?”
मग अनुराधाला म्हणाली, ”ताई, जरा माझ्याबरोबर येता का?” अनुराधेला ती देवघरात घेऊन गेली. देवासमोर एक पाट मांडून तिला बसवलं अन् म्हणाली, ”ताई, मुलीची पाठवणी कशी करतात, ते या घरात बघायचा योग आला नाही. मी माहेरी जे बघितलंय, जे शिकलेय, तसा प्रयत्न करतेय.”
तिनं अनुराधाला कुंकू लावलं, तिची ओटी भरली, चार दाणे तिच्या डोक्यावर टाकले. नंतर ती ओटी एका सुंदरश्या पिशवीत काढून घेतली. मग तिनं बांगड्यांचा डबा उघडला. त्यात हिरवा चुडा होता.
”ए, बांगड्या राहू दे गं. मी सेट करून आणलेत.”
”ते पार्टीला घाला. पण लग्नात हा हिरवा चुडा घालूनच उभ्या राहा,” असं म्हणत सीमानं तो चुडा तिच्या हातात चढवलासुद्धा.
”खरं म्हणजे चार बोटं हळदीची लावावी, असं माझ्या मनात होतं. पण हळद लागल्यावर बाहेर पडू नये म्हणतात. म्हणून…”
”बरं, उठ आता. ती सोनाली वाट बघतेय.”
”थोडं थांबा हो. घाई काय आहे?” असं म्हणत सीमानं एक मोठा बॉक्स तिच्या हातात दिला.
”हे काय आहे?”
”उघडून बघा की.”
अनुराधानं बॉक्स उघडला. आत केशरी रंगाची, झगमग करणारी बनारसी साडी होती.
”अगं, आता ही इतकी भडक साडी कुठे नेसणार आहे मी?”
”उद्या लग्नाला हीच साडी नेसून उभ्या राहा. मला माहीत आहे, तुमचे सगळे सेट्स तयार करून झाले असतील. लग्नाची साडीसुद्धा तुम्ही ठरवून ठेवली असेल. पण ती नंतर कधीतरी नेसा. आता पुष्कळ प्रसंग येतील. पण लग्नाला ही माहेरची साडी नेसा. नाही म्हणू नका. मी अर्जंटमध्ये ब्लाऊज शिवून आणलाय.”
”बरं बाई, उठू आता की आणखी काही बाकी आहे?”
”आहे नं…” असं म्हणत सीमानं एक लाल डबी उघडून तिच्यासमोर ठेवली.
”ए वेडाबाई, काल किती पैसे उधळलेस तू?”
”उधळायला माझ्याजवळ इतके पैसे तरी आहेत का? या तुमच्या आईच्या पाटल्या आहेत. मी काल पॉलिश करून आणल्या आहेत. तुम्ही सासरी रिकाम्या हातानं नाही जाणार आहात. आईंचे आशीर्वाद तुमच्याबरोबर असतील.”
”ए बाई, मला रडवायचा बेत आहे का तुझा?”
”सासरी जाताय ना! मग शकुनाचं थोडं रडून घ्या. म्हणजे सगळं काही यथासांग झाल्यासारखं वाटेल.”
इकडे सोनाली अगदी अधीर झाली होती. ”ए शमा! आत्या कुठे गडप झाली गं तुझी. बोलाव तिला. अकरा वाजताची पार्लरची अपॉईंटमेंट आहे.”
”आत्या पार्लरला जाणार आहे? वॉव!”
”वॉव काय त्यात.. सगळ्या नवऱ्या मुली पार्लरमध्ये जातात. मी तर उद्या ब्राइडल मेकअपसाठी ब्युटिशयन बोलावली होती, पण ती निक्षून ‘नाही’ म्हणाली. म्हटलं, निदान फेशियल आणि पेडिक्योर, मेनिक्योर तरी करून घे.”
शमा नाचतच देवघराकडे गेली अन् दारातच थबकली. दोघी गळ्यात गळे घालून उभ्या होत्या अन् हुंदके देत होत्या. ते दृश्य बघून शमाला साक्षात्कार झाला. आत्याचं लग्न म्हणजे नुसता जल्लोष, नुसतं सेलिब्रेशन नाहीये. त्याला दुसरी पण एक बाजू आहे. आत्या आता कायमचं हे घर सोडून जाणार आहे.
ही जाणीव होताच तिला गलबलून आलं. आत्याला मिठी मारत तिनं आपल्या अश्रूंना वाट करून दिली.
***
– मालती जोशी
९९९३० ६८००७