मित्र
ऋचा गाणं गुणगुणतच घरी आली. पर्समधली किल्ली काढून तिनं लॅचनं दरवाजा उघडला. संध्याकाळचे सात वाजले होते. बाहेर अंधार झाला, तरी घरातला कुठलाच दिवा लागलेला नव्हता.
‘तायडी कशी आली नाही?’ असा विचार करत तिनं हॉलमधला दिवा लावला.
तायडी फ्लॅटच्या छताकडे बघत सोफ्यावर झोपली होती. हात उशाखाली होते. तिच्या उभट, हट्टी चेहर्यावर उदासी होती. तिचं शिडशिडीत शरीर कसल्या तरी ताणानं आकसलं होतं.
काळजीनं ऋचा प्रीतीजवळ गेली. तिच्या कपाळावर मायेनं हात ठेवत म्हणाली, ‘‘काय झालं गं? अशी का झोपलीस?’’
तिच्याकडे दृष्टी वळवत प्रीती म्हणाली, ‘‘नेहमीचा चौकशीवाला फोन आला होता पप्पांचा, पण आज भांडण झालं. नवी आई पण बोलली.’’
ऋचाला जरा ‘हुश्श’ झालं. तिला आजही उशीर झाला होता, पण ताई त्यामुळे नाराज झाली नव्हती.
ऋचाची नोकरी पार्टटाईम होती. सकाळी टी.वाय.बी.कॉम.चे क्लास अकरा वाजता संपले, की घरी यायचं, जेवायचं आणि ट्रॅव्हल एजन्सीत जायचं. तिथलं काम संपलं, की साडेपाचला घरी.
ताईची नोकरी पूर्णवेळची होती. ऑफिसही थोडं लांब. ती नऊ वाजता निघायची ती साडेसहापर्यंत घरी यायची.
पण आता केतनबरोबर मैत्री झाल्यावर ऋचाला यायला उशीर व्हायचा. कधी तो म्हणायचा, ‘‘थांब गं दहा मिनिटं. मी पण निघतोय. सोडतो तुला.’’ मग त्याच्यासाठी रेंगाळायचं. कधी चहाला जायचं. मग त्याच्यामागे बाईकवर बसून घरी.
सुरुवातीला तिनं नेहमीच्या सवयीनं ताईला खरं ते सांगितलं, पण मग ताई चिडायला लागली. मग ऋचा ताईच्या आधी घरी यायचा प्रयत्न करायची. ताईनंतर पोचली तर काहीतरी खोटी कारणं सांगायची. केतनविषयी बोलणं टाळायची.
पण केतनबरोबर संध्याकाळ घालवून आलेल्या ऋचाचा प्रसन्नपणा प्रीतीला जाणवायचाच. ती म्हणायची, ‘‘कशाला थापा मारतेस? केतनबरोबर हिंडायला गेली होतीस ना?’’
पण आज ताई तिला उशीर झाल्यामुळे रागावली नव्हती. ती पपांच्या फोनमुळे अस्वस्थ होती. नवी आई पण काहीतरी बोलली होती.
‘‘काय म्हणाले ते?’’
‘‘तेच पुन्हा, लग्न कर.’’
ऋचा ताईच्या जवळ बसली. उगाच तिच्या हातावर हात ठेवत म्हणाली, ‘‘खरंच तू विचार करायला हवास आता लग्नाचा.’’
तिचा हात बाजूला करत प्रीती उठून बसली. तीव्र स्वरात म्हणाली, ‘‘का? तुला केतूशी लग्न करायची घाई झाली म्हणून? तेवढ्यासाठी नको मला आग्रह करू. तू करून टाक लग्न. मी मजेत राहीन एकटी.’’
प्रीतीला कल्पना येण्यापूर्वी तिचा आवाज थोडा भरून आला. ओठ थरथरले.
ऋचा शांतपणे आणि जपून म्हणाली, ‘‘मी पण तुला खूप वेळा सांगितलंय ताई. माझी आणि केतनची फक्त मैत्री आहे. छान मैत्री. बाकी काही नाही. मी तुला म्हणते, कारण पंचविसाव्या वर्षी आता लग्न करायला हवं. ‘पीआरजी’सारख्या ग्रुपमध्ये नोकरी आहे. पगार बरा आहे. थोडं सेव्हिंग आहे…’’
तिचं बोलणं तोडत ताई खेकसली, ‘‘मला करायचं नाही लग्न. बघितलंय मी, आई गेल्यावर तीन वर्षांत पपांनी नवी आई आणली, चौदा वर्षं आईबरोबर संसार झाला होता. आई गेल्यावर पहिले सहा महिने दाढी काय वाढवली, आईच्या आवडत्या पांघरुणात काय झोपायचे, रात्रंदिवस गझल काय ऐकायचे! आणि तीन वर्षांत या बाईशी लग्न केलं. एफ.वाय.ला होते मी. लाज लाज वाटली. ढोंगी माणूस… फक्त शरीर, बाकी सगळं खोटं. तू मला सांग, आईच्या ऐवजी पपा जाते, तर आईनं केलं असतं दुसरं लग्न?’’
‘‘अगं, पण नव्या आईचं दुसरं लग्नच आहे ना हे? ती बाईच आहे ना?’’
‘‘ती बाई आणि माझी आई, काय तुलना करतेस पण…’’
या क्षणी तार्किक वाद घालण्यात अर्थ नाही, हे ऋचाला कळत होतं.
थोड्या वेळानं ती हलकेच म्हणाली, ‘‘पपांनी आईची शेवटच्या आजारात खूप सेवा केली. दुसरं कुणी इतकं नाही करू शकणार.’’
दोघीही काही वेळ आईच्या शेवटच्या आजाराच्या आठवणीनं मूक झाल्या.
पपांनी आईच्या शेवटच्या आजारात तिला आणि उन्मळून गेलेल्या मुलींना फार जपलं होतं. आईची सेवा केली होती. उपचारांची शर्थ करूनही यश आलं नाही. किडनीच्या आजाराचं निदान झाल्यावर वर्षभरात आई गेली. तेव्हा प्रीती दहावीत होती आणि ऋचा पाचवीत.
दोघींच्या अभ्यासाकडे, खेळण्याकडे पपांनी लक्ष दिलं. दाढी वाढवलेल्या, थोड्या बारीक झालेल्या पपांनी आपलं सगळं बळ एकटवलं आणि मुलींना उभं केलं.
मग काय झालं कुणास ठाऊक? पपांच्या शाखेत मिसेस कर्णिक बदलून आल्या. मिस्टर कर्णिक दहा वर्षांपूर्वी वारले होते. कर्णिकबाईंना मूलबाळ नव्हतं आणि मग पपांनी मुलींच्या ध्यानीमनी नसताना त्यांच्याशी लग्न करून टाकलं होतं.
दोघींच्या डोळ्यांपुढून जणू सगळा काळ सरकून गेला. ताई म्हणाली, ‘‘मी नव्या आईशी नेहमीच फटकून राहिले. तुला मात्र तिनं घोळात घेतलं. ‘बाळा, तुझ्यासाठी पुलाव करू का? केस किती गं गुंतले तुझे? थांब विंचरते.’ ’’
‘‘मुळीच नाही.’’ ऋचा जोरात म्हणाली, ‘‘मीच जास्त चिडचिड करायची. तिनं मला जवळ घेतलेलं मला आवडायचं नाही. तेव्हा नीट काही कळायचं नाही. पण आई-पपांच्या बेडरूममध्ये ती बाई पपांबरोबर गेली, की मला राग यायचा. मी रडायची. मग तू मला जवळ घ्यायचीस.’’
सोफ्यावरून उठून बाथरूमकडे जात प्रीती म्हणाली, ‘‘केतन इफेक्टमुळे तुला आता पपांचं दुसरं लग्न पटायला लागलंय.’’
ताईच्या या म्हणण्यात मात्र तथ्य होतं. केतनमुळे तिची दृष्टी बदलली होती. तिच्या मनातल्या कटुतेची धार त्यानं बोथट केली होती. तिच्या आयुष्यातल्या घटनांचा वेगळा अन्वयार्थ उलगडून दाखवला होता. एकदा बोलता बोलता तो म्हणाला, ‘‘त्या तुमच्या नव्या आईविषयी मला सहानुभूती वाटते.’’
‘‘का रे?’’ ऋचानं दचकून विचारलं.
‘‘बघ ना, पहिला नवरा चाळिशीत हार्ट अॅटॅकनं वारला. मूल नव्हतंच. दहा वर्षं एकटी राहिली. मग तुझ्या पपांशी दुसरं लग्न. सहजीवन कसलं? तू बाहेर अस्वस्थ असलीस, की रात्रीत तीनदा पपा बाहेर येणार. तुला पांघरूण घालून जाणार. तुमची कायम चिडचिड. माया लावूनसुद्धा तुम्ही लावून घेणार नाही. दुभंगलेला नवरा. जणू तिच्यात आणि तुमच्यात वाटणी झालेला. तीन वर्षं अशी गेल्यावर ताई नोकरी धरून पुण्याला. मग तूही कॉलेजसाठी. जणू तुरुंगातनं पळालात. मग पपांच्या पुण्याला चकरा. अपराधी वाटून त्यांचं जास्तच चांगलं वागणं. ती आली की तुमचा मूड जातो म्हणून तिनं पुण्याला यायचं नाही. काय मिळवलं तिनं?’’
तेव्हापासून ऋचाच्या मनातला नव्या आईविषयीचा कडवटपणा कमी झाला. केतू काय म्हणाला ते तिनं ताईला सांगितलं होतं. तिला वाटलं होतं, ताईलाही नवा दृष्टिकोन मिळेल. तिच्या मनातला राग, तिटकारा कमी होईल.
पण प्रत्यक्षात ताई अधिकच कोरडी झाली. तिच्या तिरस्काराला अधिकच धार आली. जणू आता दोघींच्या वाटचा राग तिला एकटीला धगधगता ठेवायचा होता. जणू नव्या आईचा तिटकारा बाळगणं, हाच आपल्या आईची स्मृती जागती ठेवायचा एकमात्र मार्ग होता आणि तिच्या एकटीवरच ती जबाबदारी आली होती.
ताई तोंड धुऊन आली. तिच्याकडे पाहता पाहता ऋचाला अचानक वाटलं, तिला म्हणावं, ‘तूही कर ना एखाद्या मुलाशी मैत्री. त्याच्याशी गप्पा मार. भीती वाटली की त्याचा आधार घे. गोंधळलीस तर त्याचा सल्ला माग. चेष्टामस्करी कर. एखाद्या संध्याकाळी त्याच्याबरोबर हॉटेलात जा. म्हणजे मग तुझ्या डोळ्यांत मुक्कामाला असलेली उदासी वितळून जाईल. कडवटपणाची धार बोथटून जाईल. मैत्रीण, बहीण सगळं छान असतं. पण मित्र तो मित्र गं तायडे.’
प्रसन्न आवाजात म्हणाली, ‘‘आज पोळीवाल्या बाईची दांडी आहे. कंटाळा आलाय. बाहेरच जाऊया कुठेतरी.’’
शनिवारी ऋचा पाच वाजताच घरी आली. तिनं पाहिलं, ताई पण आज लवकर आली होती. खिडकीजवळ तिच्या आवडत्या खुर्चीवर बसून पुस्तक वाचत होती. तिच्या उभट चेहर्यावर हलकं हसू होतं. तिच्या गालांची हाडं जाणवत नव्हती.
ऋचाची चाहूल लागल्यावर पुस्तकातली नजर वर न करता प्रीती म्हणाली, ‘‘ऋचूडे, चहा करून ठेवलाय. गरम करून घे. मला पण दे अर्धा कप.’’
ताई खुषीत आहे हे पाहून ऋचाला धीर आला. तिनं चहा गरम केला. ताईच्या हातात कप दिला. ताईच्या समोर बसत ती सहजपणे म्हणाली, ‘‘अगं ताई, आमचा ग्रुप सिनेमाला जाणारेय. मग बाहेर जेवणारेय. मी जाऊ?’’
ताईनं हातातलं पुस्तक बाजूला ठेवलं. ऋचाकडे रोखून पाहत ती म्हणाली, ‘‘सगळा ग्रुप की तू आणि तुझा केतू?’’
ऋचा क्षणभर घोटाळली. मग ताईच्या नजरेला नजर देत म्हणाली, ‘‘मी आणि केतन दोघंच.’’
केतन तिला नेहमी म्हणायचा, ‘‘कधी तरी तुला खरं सांगावं लागणार. वुई आर फ्रेन्ड्स. वुई एन्जॉय ईच अदर्स कम्पनी. तुमची आई गेली, वडलांनी दुसरं लग्न केलं. खरं आहे, पण किती काळ ते दुःख कुरवाळत बसणार? तुझी ताई स्वतःची कीव करत तिथेच थांबली म्हणून इतर सगळे तसं कसं करणार? जग पुढे जाणारच…’’
ऋचाचं उत्तर प्रीतीला अनपेक्षित होतं. ती चिडून म्हणाली, ‘‘मग खोटं का बोललीस?’’
‘‘तुला खरं आवडणार नाही म्हणून.’’
‘‘म्हणून खोटं? माझ्याशी? वर खोटं विचारतेस जाऊ का? जा ना. तू मोठी आहेस. तो तुला ओरबाडून निघून गेला, तर मग बस रडत.’’
‘‘तो असा नाही ताई. खरंच नाही.’’
‘‘अगं, आपल्याला आपले पपा कसे वागतील ते नाही कळत आणि तू मला वर्षांपूर्वी ओळख झालेल्या मित्राची खात्री देतेस?’’
ऋचाचा मघाचा उत्साह मावळला. क्षणभर वाटलं, केतनला फोन करून सांगावं, रद्द करूया सगळं म्हणून.
पण मग तिला केतन किती नाराज होईल ते जाणवलं. त्याच्याबरोबर ती पहिल्यांदाच सिनेमाला जाणार होती. तिला ते सोडायचं नव्हतं.
दरवेळेला असा मोडता घालणार्या, तिच्या छोट्या छोट्या आनंदांवर विरजण घालणार्या ताईचा तिला राग आला.
तटकन ती म्हणाली, ‘‘आपण बोलू यावर शांतपणे. पण आत्ता मला उशीर होतोय. तू जेवणाचं काय करशील?’’
‘‘मी बघते. तू नको काळजी करू. माझी व्यवस्था पण तू लावू नको. आत्ताच्या जेवणाची नको आणि लग्नाची पण नको. मी समर्थ आहे माझी काळजी घ्यायला.’’
ऋचा वळली. सोसायटीच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर येऊन उभी राहिली. पाच मिनिटांत केतन आला. ऋचा बाईकवर बसली, पण तिला नेहमीसारखी मजा येईना. केतनशी बडबडावंसं वाटेना.
इतक्या वर्षांत पहिल्यांदाच तिनं ताईला असं दुखावलं होतं.
ताईनं तिच्यासाठी काय केलं नव्हतं? आई आजारी पडली तशी ती एकदम मोठी झाली होती. पपा सारखे ऑफिस, हॉस्पिटल, आईची शुश्रूषा यांत गुंतलेले असायचे. मग स्वयंपाकाच्या काकूंच्या मदतीला प्रीती असायची. तीही लहानच तर होती. आपला दहावीचा अभ्यास करून ऋचाला तिच्या अभ्यासात मदत करायची. तिनं डबा नेला का, संंपवला का, लक्ष ठेवायची.
आई गेल्यावर ती हळूहळू स्वयंपाकाचे पदार्थ शिकली. ऋचाच्या आवडीचे पदार्थ ती आवर्जून करायची. ऋचा झोपेत घाबरली, तर आईसारखं जवळ घ्यायची, थोपटायची. स्वतःला नोकरी लागल्यावर ऋचाला पुण्याला घेऊन आली. गेली पाच वर्षं त्या दोघींचंच तर जग होतं.
ऋचाला एकाएकी वाटलं, बाईकवरून उतरावं, पळत घरी जावं.
ऋचाचं काहीतरी बिनसलंय, ती रडतेय हे केतनला जाणवलं. त्यानं बाईक बाजूला घेतली. दोघंही उतरले. केतननं बाईक बाजूला स्टॅन्डवर उभी केली. स्निग्ध स्वरात विचारलं, ‘‘काय झालं गं?’’
ऋचानं त्याला सगळं सांगितलं. म्हणाली, ‘‘आणि प्लीज मला ताईचं कसं चुकतंय आणि रॅशनॅलिटी कशात आहे ते नको समजावून सांगू. ती माझी ताई आहे आणि ती दुखावली गेली, की मला त्रास होतो.
ऋचा गप्प झाली. दूर कुठेतरी पाहत राहिली. केतन शांतपणे तिच्याकडे बघत राहिला.
अचानक तिला वाटलं, तीव्रतेनं वाटलं, की ताईला एक छान मित्र मिळायला हवा. उंच, प्रसन्न, पुरुषी पण गोड व्यक्तिमत्त्वाचा. तिला समजून घेणारा. आपलं असणं जसं केतनच्या मैत्रीनं उजळून गेलं आहे, तसं तिचं असणंही उजळून निघेल. तिच्या जखमा तो टिपून घेईल. कडवटपणा पिऊन टाकेल. तिला ती स्वतः नव्यानं भेटेल. आत्मप्रत्ययानं तिचा उदास, हट्टी चेहरा रसरशीत होईल. त्या मातीच्या मैत्रीतून मातीपलीकडचं काही घडेल. यासाठी तिला मित्र भेटायला हवा. या क्षणी… आत्ता…
तिनं मोबाईल काढला. ताईला फोन लावला. कापर्या, रडवेल्या, आर्जवी स्वरात ती म्हणाली, ‘‘तायडे गं, मी फक्त सिनेमाला जाते. जेवून नाही येत. आपण दोघी बाहेर जेवू. माझ्यासाठी थांब. घरी काही नको करू. मला माहीत आहे, तू एकट्यानं धड जेवायची नाहीस.’’
उमाकांत घाटे, पुणे
umakantghate@gmail.com
मोबाईल : ९८८११ २९२४१