Now Reading
त्यांचा लिहाफ, माझी मर्यादा

त्यांचा लिहाफ, माझी मर्यादा

Menaka Prakashan

बारावी म्हणजे विद्यापीठाच्या अंगणात जवळ जवळ पोचलेले विद्यार्थी. त्यात आमच्या मस्कतच्या शाळेत त्यांच्या सुलतानाच्या धोरणांमुळे मुलां-मुलींना अगदी इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यांसारख्या देशांतल्या विद्यापीठांच्या चांगल्या स्कॉलरशिप्सही दिल्या जातात, त्यामुळे या भरारी मारू पाहणाऱ्या नव्या पिढीची स्वप्नंदेखील तशीच ‘आकाशाला गवसणी घालू’ या सदरातली असतात. त्या वर्षीची बॅच भारीच होती. मग नेहमीप्रमाणे ‘पुढे काय करणार’ अशा विषयावर वर्गात एकदा गप्पा सुरू झाल्या. भाषेचा शिक्षक असला, की त्याला विषयांचं बंधन नसतं, त्यामुळेच कदाचित शिक्षक-विद्यार्थी हे नातं जास्त जवळिकीचं झालेलं असतं. हुशार हुशार मुलं-मुली परदेशी विद्यापीठांत जाण्याची स्वप्नं बघत होती. पायलट, पेट्रोलियम इंजिनीयर, बँकिंग, फायनान्स, एमबीए, डॉक्टर असं काय काय सांगत होती.

त्याच वर्गात मुजून नावाची एक अगदी साधारण मुलगी होती. आपण यांच्यासारखे फार हुशार नाहीत, हे तिला माहीत होतं, आणि त्यामुळे तिला करीअर, स्कॉलरशिपची स्पर्धा यांतून एका अर्थानं सुटका झाल्यासारखंही वाटे. नेहमी आनंदात असे. पासिंगपुरता अभ्यास करून ती घरात लक्ष घाले. पण तिचे वडील तिच्या शिक्षणाबाबत जागरूक होते. नेहमी पालकांच्या मीटिंगला यायचे. ‘पास झाली की इथल्याच विद्यापीठात जाईल. तिला जे काही शिकायचंय ते शिकेल. शाळा पूर्ण होईपर्यंत तिचं चांगलं शिक्षण व्हावं, असं मला मनापासून वाटतं. कारण शाळेतलं शिक्षण फार शेवटपर्यंत स्मरणात राहतं,’ असे त्यांचे विचार ते अनेकदा बोलून दाखवत. मला त्यांचा हा निर्मळ दृष्टिकोन आवडे.

कितीही नाही म्हटलं, तरी आपले सगळे वर्गमित्र/मैत्रिणी मोठी स्वप्नं बोलून दाखवतात आणि आपल्याजवळ निदान बोलून दाखवण्यासाठीही एखादं मोठं स्वप्न नाही, याची दुखरी जाणीव त्या वेळी तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. पण हळूहळू तिच्या चेहऱ्याचा नूर बदलला. सगळ्यांचं सांगून झालं, तशी ती उठली आणि बोलू लागली, ”मला काय वाटतं माहितीये का, आम्ही हा जो अबया वापरतो ना, तो फक्त काळ्या रंगाचाच आहे. मी इथून बाहेर पडले, की विद्यापीठात फार अवघड काही शिकत बसणार नाही. मी फॅशन डिझायनिंगचा कोर्स करणार. माझं स्वत:चं बुटिक काढणार आणि त्यात मी एक वेगळी गोष्ट करणार.”

”काय ते?” शेजारच्या भावी डॉक्टरीणबाईंनी लगेच विचारलं.

”मी वेगवेगळ्या रंगातले अबया तयार करून विकणार! छान वाटेल. मॅडम, तुम्ही इंडियन्स कित्ती निरनिराळे, चमकदार रंग वापरता! आमच्यात मात्र एक काळा तो काळा, आणि पुरुषांचा पांढरा तो पांढरा! बोअर नाही होत?” तिनं वर्गातल्या मैत्रिणीकडे नजर टाकत हसून विचारलं. बाकीच्या हसल्या, काही उत्साही होत्या. त्या म्हणाल्या, ”आम्ही शिकून परदेशातून आलो, की तुझ्याकडून रंगीत अबये घेऊ!! घरातले आम्हाला हाकलून देतील, तर तुझ्याकडे येऊन राहू…” त्यांच्यात्यांच्यात हसणं, चिडवाचिडवी सुरू झाली. मग रंगीत अबये असतात का, कुठल्या देशात घातले जातात, यावर पुन्हा गप्पा. मग मी भारतातल्या मुस्लिम बोहरा समाजातल्या बायका वेगवेगळ्या रंगाचे, छान प्रिंट्सचे, लेस लावलेले अबये वापरतात ते सांगितलं. मुजूनला अर्थातच त्या विषयी अधिक माहिती पाहिजे होती. तिला गुगलायला सांगितलं.

मला राहून राहून अजूनही मुजूनची आठवण येते. जे अनेकींना वाटतं, ते तिनं त्या दिवशी बोलून दाखवलं. तिनं पुढे खरंच ते करीअर म्हणून केलं की नाही, माहीत नाही. पण जिथे परदेशी जाऊन एकट्या मुलीनं शिक्षण घ्यायला इथले पालक मोकळीक देतात, मुजूनचे वडील स्वत: मुलीच्या आधुनिक शिक्षणाविषयी इतकी प्रांजल जागरूकता दाखवतात, तिथे अबया आणि त्याच्या रंगाबाबत कुणी वेगळा विचार फारसा करत नाही. मुजूननं विचार तरी केला, याचं त्यातल्यात्यात कौतुक.

त्यापुढच्या बॅचमध्ये रिहाम नावाची एक गुणी मुलगी होती. अकरावीत येता येता ती लिहाफ घालायचं टाळू लागली. बारावीपर्यंत आमच्या शाळेत गुडघ्यापर्यंत पिनोफर, आतून लेगिंग्ज आणि डोक्याला पांढराशुभ्र लिहाफ असा ‘गणवेश’ आहे. बाकीच्या बहुतेक शाळांमध्ये दहावीनंतर मुली अबया घालतात, त्यामुळे आपोआप गणवेश होतोच. तर, रिहाम लिहाफ टाळू लागली, घेतला तरी न घेतल्यासारखा मानेभोवती नुसताच गुंडाळलेला. असं करणारी ती शाळेतली एकमेव मुस्लिम मुलगी होती. तिला काय सांगावं, हे माझ्या भारतीय, त्यातल्या त्यात हिंदू मनाला काय कळेना. लिहाफ शाळेचा गणवेश मानावा, की तिच्या धर्माचा मानावा… मी जरा गोंधळले. शाळेचा गणवेश मानावा, तर शाळेतल्या अन्य धर्मीय मुली वापरत नाहीत, मग हिलाच का विचारा, आणि धर्माचा गणवेश(?) मानावा, तर त्यात मी, म्हणजे शाळेनं का हस्तक्षेप करावा, तो तिच्या घरचा विषय समजून गप्प राहावं, असं सगळं होतं. असेच काही दिवस गेले. त्यातल्यात्यात इस्लामिक विषय शिकवणारे अहमद कुराणी नावाचे इजिप्शियन शिक्षक मुलींच्या पेहरावाबाबत जास्त जागरूक असत. त्यांनी तिला एक-दोनदा यावरून हटकलं होतं, तर ‘माझ्या घरात चालतं’ (तर तुम्ही कोण विचारणारे) असं म्हणून तिनं त्यांना झटकलं होतं. ते त्यांना खटकलं होतं. तेवढ्यात पालक मीटिंग आली. त्यात तिची आई आली. तिच्याजवळ उस्ताद कुराणी यांनी मोठ्या हिरीरीनं विषय काढला. त्यावर ती पन्नाशीची माता म्हणाली, ”मुलगी ऐकत नाही. मी सांगून पाहिलं, पण कुठवर सांगणार? घरात वडील, काका, किंवा आजोबा दिसले, की तेवढ्यापुरता घेते, पण एरवी घेत नाही म्हणते!” उस्ताद कुराणी दाढीवर हात फिरवत ऐकत होते, त्यांच्या कर्मठ कपाळावर आठी पडली होती. पण यात आपण काही करू शकत नाही, म्हणून ते काढता पाय घेणार इतक्यात ती आई म्हणाली, ”उस्ताद, धर्मात नेमकं काय सांगितलेय मला माहीत नाही, कारण माझा तेवढा अभ्यास नाही. माझ्या घरात मी लिहाफ बघत आले, कुणी सांगायच्या आधी आपसूक घ्यायला सुरुवात केली. मी जन्मभर लिहाफ घेतला, मरेपर्यंत घेईन. पण आता मुली जग बघत आहेत…! आणि उस्ताद, लिहाफ नाही घेतला, तर माझी मुलगी वाईट ठरत नाही, तिच्यातले चांगले गुण नाहीसे होत नाहीत, बरोबर?” शांतपणे प्रश्न विचारणारी ती आई मला धीरोदात्त वाटली. तिनं ना धर्माच्या नावानं खडे फोडले, ना मुलीच्या बंडखोरपणानं ती गडबडून गेली. मला हायसं वाटलं. हा ना शाळेचा गणवेश आहे, ना धर्माचा… खरंच असता, तर इस्लाम शिकवणारे आमचे अहमद कुराणीसर गप्प बसलेच नसते.

जेव्हा जेव्हा मुस्लिम स्त्रियांच्या पेहरावाचा विषय निघतो, तेव्हा तेव्हा मला ही दोन उदाहरणं कायम आठवतात.

इतकी वर्षं या मुस्लिम देशात राहून आपल्या पारंपरिक पेहरावाविषयी फारशी तक्रार करणारे स्त्री वा पुरुष मी पाहिले नाहीत. स्त्रिया जसा काळा अबया वापरतात, तसा पुरुष पांढरा डिशडाशा वापरतात. मुलं आठवी संपली, की नववीपासून त्यांच्या पारंपरिक पोषाखात शाळेत येऊ लागतात. कुणी सांगायची गरजच नाही. त्यामुळे ‘आम्हाला हे बंधन का’ म्हणून बायकांचा उठसूटचा विरोध नाही. तसंच पुरुषांना सहज शक्य असूनही त्यांनी डिशडाशा सोडलेला नाही.

मुजून, किंवा रिहामसारखा विचार करणाऱ्या मुली आत्ताच्या पिढीत आहेत. पण त्याला कुणी फार धोकादायक म्हणून ट्रीट करताना दिसत नाही. या वेगळ्या विचारांकडे हा ओमानी समाज कसा बघतो, त्यांना कसा वागवतो, याचं चित्र अजून पुरेसं स्पष्ट नाही. सौदीसारखा कर्मठ देश याला लगेच कडाडून विरोध करेल, हे वेगळे सांगायची गरज नाही. परंतु ओमानसारखा बऱ्यापैकी उदारमतवादी देश, तुर्कस्तानसारखा पूर्व आणि पश्चिमेचा संगम असलेला देश, दुबईमुळे जगात श्रीमंतांमध्ये गणना झालेले ‘युएई’सारखे मुस्लिम देश अशा बिनालिहाफच्या स्त्रिया, रंगतदार अबया, किंवा इतर पेहराव थोड्याफार प्रमाणात का होईना, खपवून घेताना दिसतात.

आपल्याकडे सर्रास मुस्लिम बायकांना अबया आणि लिहाफ घालावा लागतो म्हणून हळहळ व्यक्त केली जाते, त्या किती बंधनात आहेत, त्यांचं स्वातंत्र्य कसं हिरावून घेतलं जातं, या विषयी मत व्यक्त केलं जातं. ते बऱ्याच अंशी खरंही आहे. परंतु या बायकांनी हा पेहराव अनेक कारणांनी स्वीकारला आहे. बहुतेकींनी धर्म, परंपरा सांगतो म्हणून प्रश्न न विचारता स्वीकारला आहे, काही धर्माचं अभिमानदर्शक चिन्ह वागवल्यासारख्या वापरतात, अनेकजणी सुरक्षा म्हणून वापरतात, तस्लिमा नसरीनसारख्या मागच्या पिढीतल्या लेखिकांनी सनातन्यांना प्रश्न विचारून त्याची किंमत चुकवली आहे. पण सरसकट मुस्लिम स्त्रिया या पेहरावाविरुद्ध बंड करून, तो फेकून देऊन स्वतंत्र होण्याची आस बाळगताना दिसत नाहीत. यांच्यातल्या बायका कितीही शिकल्या, विचार करू लागल्या, लिहू-बोलू लागल्या, तरी पेहराव झुगारून देण्याची फारशी मानसिकता दिसत नाही. एकतर, नुसते पेहराव बदलून काय होणारेय? पेक्षा उत्तम शिक्षण, चांगलं राहणीमान, आर्थिक स्वातंत्र्य, राजकारणात आपला आवाज, साहित्यात आपला ठसा, येणाऱ्या पिढीला उत्तम बनवणं या गोष्टी जास्त महत्त्वाच्या वाटत असाव्यात. नुसत्या कपड्यांवर आपली उणीपुरी शक्ती घालावी, असं इथल्या मर्यादित स्त्रीशक्तीला वाटत नसावं. किंवा धर्म, परंपरा या बंड करून मोडून काढायच्या गोष्टी नसून, त्या पाळायच्या गोष्टी आहेत, हे पिढ्यान्‌ पिढ्या इतकं सखोल बिंबवलं असेल, की याला विरोध करावा, हे त्यांच्या समूहस्मरणातून पुसट झालं असावं. किंवा पुरुष त्यांच्या डिशडाशातून बाहेर येत नाहीत, तर आपण आपल्या अबयाचा का एवढा गवगवा करावा, असा एक गतानुगतिक विचार असू शकतो. अर्थात, हे सगळे अंदाज, कारण मी एका मर्यादेनंतर काही बाबतीत त्यांच्या विचारांचा तळ गाठू शकत नाही, ही माझी मर्यादा.

शिवकन्या शशी, ओमान
shivkanyashashi@gmail.com

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.