सावरे कहा लगायी देर / अनुराधा गुरव

25.00 10.00

शहाजीराव देशमुखांच्या प्रशस्त वाड्यामध्ये आज गडबड दिसत होती. पाहुण्यांच्या खोलीतलं फर्निचर स्वच्छ, लखलखीत केलेलं होतं. फरशी चमकत होती. दारं-खिडक्यांचे पडदे, खुर्च्यांची कुशन्स, बॅकर्स, टेबलक्लॉथ, बेडशीट्स परीटघडीची होती. झुळझुळीत होती. कोपर्‍यातल्या फ्लॉवरपॉटमध्ये ताजी फुलं रसिक हातानं, कलासक्त मनानं खोचलेली दिसत होती. धर्मा आणि येशा खोलीत गुंतलेले होते. कुणी गायक, वादक अथवा बडा माणूस येणार होता, याचा अंदाज येशाला येत नव्हता.

‘‘धर्मा रेऽ आटोपलं का सारं?’’

मोठे मालक सकाळी घरी आहेत याची येशाला कल्पना नसल्यानं तो एकदम दचकला. त्याचे स्नायू ताठरले.

‘‘जी मालक!’’ धर्मा दाराशी धावला.

‘‘शिस्तीत झालंय ना सारं? नाहीतर आल्याबरोबर तुला ट्रेनिंग द्यायला सुरुवात करील पोरटी.’’

मोठे मालक झपाझपा पावलं टाकत उगाचच मोठ्यांदा हसले. झुपकेदार करड्या-पांढर्‍या मिश्या खुषीत थरथरत राहिल्या.

‘‘धर्मा, बाबासाब खुषीत दिसत्याती. कोन येनार हाय?’’

‘‘ऑऽ आर वसुबाय येनार. मालकाची भाची पार मबईवरन. लई लई जीव हाय सार्‍याच्या तेंच्यावर.’’

‘‘तरी म्हनलं एवडी गडबड कशापाय आईसाबाची.’’

‘अक्षी पोटची पोर मानत्याती दोघबी त्यानला. पदरी पांडवासारखी पाच पोरं पन पोरगी न्हाय. एकुलती एक भन. ह्या वसुमायबी एकट्याच त्यानला.’’

‘‘केवड्या हायती?’’

‘‘बी. ये. का काय झाल्याती अवदा. मैतरीन बी येनार.’’

‘‘हुरडा खायाला? द्राक्षं खायाला?’’

‘‘धर्माऽ वसु शंभर मार्क देईल बघ तुम्हाला. सुरेख लावलीस खोली. ती कॉट जरा खिडकीशी घे. बागेतून येणारं वारं अंगावर घ्यायला फार आवडत वसुला.’’

मोठ्या मालकीण प्रसन्न हसल्या. नथीमधले टप्पोरे मोती हलक्या झोक्यानं डोलले. क्षणभरच. त्यांच्या येण्यानं ती प्रशस्त खोली भरून गेल्यासारखं धर्माला वाटलं. त्या वळल्या. धर्मा मनाशी चुकचुकला. मालकीण वाकल्या. संग्राममालकांच्या अकाली निधनानं त्याची रया गेली. तो मनाशी पुटपुटत राहिला. चुटपुटत राहिला. त्याच्या डोळ्यांसमोर पाचही मुलांचं बालपण तरळून गेलं. आता सगळेच मोठे झाले होते. मोठा राजेंद्रसिंह मेजर होता. जम्मूजवळच्या ठाण्याला होता. दोन नंबरचा विक्रमसिंह डॉक्टर होता. अमेरिकेत स्थायिक झाल्यासारखाच होता. तीन नंबरचा अमरसिंह सी.आय.डी.मध्ये मोठ्या हुद्द्यावर होता. ही तिन्ही मुलं निर्मलाबाईंच्या माहेरी बडोद्याला शिकली होती. मोठी झाली होती. पंखात बळ येताच घरट्यापासून दूर दूरच गेली होती. पाहुण्यासारखी चार दिवस येत. कशीबशी रजा मिळवून. परतण्याच्या दिवसावर नजर ठेवून. वीस खोल्यांचा तो सुबक वाडा नातवंडांच्या धावण्या-पळण्यानं, लपाछपीनं चार दिवस गजबजून उठे. एरवी धान्याच्या पोत्यावरून चाललेला उंदीर-घुशीचा लपंडाव पाहण्याचं दुर्भाग्य वाड्याला आलं होतं.

Category:

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सावरे कहा लगायी देर / अनुराधा गुरव”

Your email address will not be published. Required fields are marked *