एका कादंबरीची सुरुवात… / गुरुनाथ धुरी

25.00 10.00

अंगात विलक्षण थकवा दाटून यावा तशी कातरवेळ खिडक्यांच्या काचांवर साकळून आली होती.

श्रांतपणे खांद्याची पर्स उतरून टेबलावर ठेवताना तिनं पाहिलं, कपड्यांचे बोळे आपण घराबाहेर निघताना पडले होते तसेच अजूनही फर्निचरवर पडले होते. घरातल्या सर्व वस्तू जिथल्या तिथे ठेवायची तिची सवय. हा व्यवस्थितपणाही अगदी लहानपणापासून शिकली होती. शिवाय नेहमी म्हणायच्या भूपाळ्या, श्‍लोक, अभंग, ‘दिव्या दिव्या दीपत्कार…’ हे सगळंच. सगळं काही जागच्या जागी आणि वेळच्या वेळी. प्राचीन भारतीय परंपरेनं भारलेल्या घरात तिचं बालपण गेलं होतं. इथे त्याचा मागमूसही नव्हता. संस्कृती जपण्याचा प्रश्‍न बाजूलाच राहूद्या, पण निदान दैनंदिन जीवनातला व्यवस्थितपणा तरी जपावा माणसानं! चहा करून प्याले, पण या उष्ठ्या कपबश्या विसळायच्या कुणी? बिस्किटांच्या फोडलेल्या पुड्यांचे कागदते उचलायचे कुणी? अर्धवट ओढून फेकून दिलेल्या सिगारेट्सची थोटकं खाली फरशीवर इतस्ततः पसरली होती. विझलेल्या काड्या नि राख. हस्तकला प्रदर्शनातून इतका सुंदर अ‍ॅश ट्रे विकत घेतलेला, तो काय नुसता शोभेसाठी?

ऑफिसातून आल्या आल्या साडी बदलून घरातली नित्याची विटकी साडी वापरायची तिची सवय. पण आज ती न बदलताच तिनं केरसुणी हाती घेतली आणि चिडूनच तिनं कचरा काढायला सुरुवात केली. पण काढला गेलेला कचरा उडून पुन्हा स्वच्छ केलेल्या जागीच परत. तिचं वरती लक्ष गेलं, तेव्हा तिला धक्काच बसला. जाताना फॅन बंद करायचीही या माणसाला शुद्ध असू नये? दिवसभर काम न करता इथे बसून राहायचं, ज्यातून काहीही निष्पन्न होणार नाही अशा निष्फळ चर्चा करायच्या आणि या घराशी संबंध नसल्यासारखं निघून जायचं. नशिब या माणसाला बाहेर जाताना दरवाजाला कुलूप तरी लावायची शुद्ध राहते. तीही नसती तर सगळा सत्यानाशच! इतरांचं ठीक आहे, चळवळीच्या नावाखाली रिकामटेकडे हिंडणारे हे सगळे भणंग भिकारी! पण यानं तरी?

कुठवर चालणार हे असं? कुठवर?

Category:

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “एका कादंबरीची सुरुवात… / गुरुनाथ धुरी”

Your email address will not be published. Required fields are marked *