Now Reading
हृदय परिवर्तन

हृदय परिवर्तन

Menaka Prakashan

क्षमा हा सगळ्यात मोठा गुण आहे असं म्हणतात. पण माणसानं किती क्षमाशील असावं की, आपल्या मुलीच्या हत्यार्‍याला आपला मुलगा मानावा आणि त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करावा? एवढं क्षमाशील कोणी असतं का? असाच प्रश्‍न तुमच्याही मनात आला असेल, पण असं घडलंय. सिस्टर रानी मारियाची हत्या झाली, गुन्हेगारानं तिच्या शरीरावर तब्बल पंचाहत्तर वार केले. तरीही तिच्या कुटुंबीयांनी गुन्हेगाराला माफ केलं आणि चांगलं जीवन जगण्यासाठी प्रेम आणि प्रेरणा दिली. अशा मोठ्या मनाच्या कुटुंबाची अस्वस्थ करणारी कहाणी.

तारीख : ४ डिसेंबर
वेळ : रात्र
स्थळ : इटली

मानवतेचा संदेश प्रसारित करणारा तो सिनेमा संपला… ‘द एन्ड’चं शीर्षक झळकलं पण तरीही प्रेक्षक आपल्या जागेवरून उठलेच नाहीत कारण त्या सिनेमानं सर्व लोकांना अंतर्मुख केलं होतं. त्या सिनेमानं सर्व प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेतला होता. सगळेच जण व्याकूळ झाले होते. तिथं उपस्थित असलेल्या पोप फ्रान्सिस महाशयांच्या डोळ्यातून तर अश्रू ओघळत होते. ऑस्ट्रेलियन-इटालियन फिल्म डायरेक्टर कॅथेरीन मॅकगिलवारी ह्यांच्या पारितोषिक विजेत्या ‘द हार्ट ऑफ ए मर्डरर’ या सत्य घटनेवर आधारित लघुचित्रपटाचा खास खेळ इटलीत रोममधल्या व्हॅटिकनमध्ये ठेवलेला होता. आणि त्या खेळाला पोप फ्रान्सिस महाशयांच्या बरोबर सगळेच धर्मगुरू आवर्जून उपस्थित राहिलेले होते. एका खुन्यानं गाठलेली क्रौर्याची परिसीमा आणि करुणा व क्षमाशीलता या दैवी सद्गुणांनी त्यावर मिळवलेला विजय ही त्या सिनेमाची ‘थीम’ होती.

‘‘कृपया माझी त्या पूर्वाश्रमीच्या खुन्यासोबत, त्या समंदरसोबत एक मीटिंग ठरवू शकाल का?’’ आपल्या डोळ्यातून वाहणारे अश्रू कसेबसे थोपवण्याचा प्रयत्न करत असलेले पोप फ्रान्सिस; त्यांचे मुख्य साहाय्यक असलेल्या आर्च बिशप व्हिन्सेंझो यांना म्हणाले, ‘‘मला नक्कीच त्याला आणि त्या सिस्टरना भेटायला आवडेल.’’ आर्च बिशप व्हिन्सेंझो यांनी पोपची आज्ञा शिरोधार्थ मानून ताबडतोब, भारतातल्या मध्य प्रदेशात असलेल्या छिंदवाड्याला फोन लावला आणि फादर स्वामी सदानंद यांच्याशी बोलणी केली. लगेचच एक-दिवसातच व्हॅटिकन इथून, पोप फ्रान्सिस यांच्या कार्यालयातून, एक कार्यालयीन पत्र गेलं. त्या पत्रातून खुद्द पोप महाशयांनी फादर स्वामी सदानंद, समंदर सिंह आणि बळी गेलेल्या निष्पाप व्यक्तीची सख्खी बहीण असलेल्या सिस्टर सेल्मी; यांना व्हॅटिकन इथं आपल्या निवासस्थानी येऊन भेटण्याची विनंती केलेली होती.
‘पोप ज्याला भेटण्यासाठी उत्सुक होते तो पूर्वाश्रमीचा गुन्हेगार समंदर सिंह कोण आणि ती सिस्टर सेल्मी व फादर स्वामी सदानंद यानांही भेटण्यासाठी व्हॅटिकनकडून का निमंत्रण आलं असावं?’ असा प्रश्न त्या दुर्दैवी घटनेबद्दल अनभिज्ञ असणार्‍या, भारतातल्या बर्‍याच लोकांना पडला, आणि नाना शंका-कुशंकाही त्यांच्या मनात उद्भवल्या पण नंतर तो लघुपट पाहिल्यानंतर सर्वांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आणि त्यांच्या मनातल्या सार्‍या शंका-कुशंका दूर झाल्या.

हा लघुपट ज्या घटनेवर आधारित होता; ती घटना निःसंशय दुर्दैवी होती! एका स्वार्थी, दुष्ट व्यक्तीनं एखाद्याच्या भावना भडकावल्यानं आणि गैरसमजापोटी ही घटना घडली होती. तसंच बेकारी व आर्थिक चणचण ह्या बाबीही त्या निर्घृण हत्येला कारणीभूत होत्या.
दूर परराज्यात राहणार्‍या आपल्या घरच्यांना भेटण्यासाठी मुद्दाम रजा काढून; बस पकडून प्रवासाला निघालेल्या एका निष्पाप महिलेची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती आणि जगातल्या सगळ्याच प्रमुख वृत्तपत्रांतून याला पहिल्या पानावर ठळक प्रसिद्धी मिळाल्यानं, सर्व जनतेला ह्या घटनेविषयी माहिती मिळाली होती. सेवाव्रती स्त्रीचा असा निर्घृणपणे खून केल्यानं सगळेच हळहळले होते. समाजात खळबळ उडाली होती. त्यामुळे संसदेत गदारोळही उडाला होता. लोक त्या खुन्यावर आणि त्याच्या कुटुंबीयांवर भयंकर क्षुब्ध झाले होते. लोक आता कायदा हातात घेऊन त्या व्यक्तीला ‘जशास तसे’ ह्या उक्तीप्रमाणे शासन करण्याची भाषा बोलू लागले होते. त्या राज्यात असंतोष आणि अशांती पसरलेली होती आणि कोणत्याही क्षणी काहीही घडू शकणार होतं. पण तेवढ्यात त्या स्त्रीच्या घरच्यांनी (मुख्यत्वे त्या दुर्दैवी स्त्रीच्या बहिणीनं) आणि फादर स्वामी सदानंद व काही प्रमुख धर्मगुरूंनी वृत्तपत्रातून जाहीरपणे ‘आम्ही त्या गुन्हेगाराला क्षमा केलेली आहे. कृपया इतरांनीही त्याला माफ करून करुणा, शांतीचा मार्ग अनुसरावा’ असं आवाहन केलं आणि सारं काही शांत झालं. समाजजीवन पूर्ववत झालं.
ज्या व्यक्तीच्या हत्येमुळं एवढी खळबळ माजली ती व्यक्ती होती सिस्टर रानी मारिया! सद्यस्थितीतल्या ब्लेस्ड सिस्टर मारिया!

१९९५ सालच्या फेब्रुवारीतली ती पंचवीस तारीख होती. सकाळचे सव्वा आठ वाजले होते. मध्य प्रदेशातल्या देवासजवळ असणार्‍या उदईनगर इथल्या बस थांब्यावर, एक चाळिशीची नन तिथून इंदौरला जाणार्‍या बसमध्ये चढताच बस सुरू झाली. ‘आपण कधी इंदौर स्टेशनवर पोचतोय आणि कनेक्टिंग ट्रेन पकडतोय’ असं त्या ननला वाटत होतं. जरा उशिरा सुटलेली ही बस वेळेत इंदौर स्टेशनवर पोचेल की नाही याबद्दल तिच्या मनाला थोडी धाकधूकही वाटत होती. ती थोडी चिंतीत होती. कारण तिला इंदौरहून भोपाळला जाऊन, केरळला कोचीन इथे जाणारी एक्सप्रेस ट्रेन पकडायची होती आणि त्यासाठी वेळेत पोचणं अत्यंत आवश्यक होतं. ट्रेननं त्या ननला खूप दूरचा प्रवास करायचा होता. आपल्या आजारी वडिलांना भेटण्यासाठी, चर्चच्या खास परवानगीनं मोठी रजा काढून मध्य प्रदेशातून, दूरवर दक्षिण भारतातल्या केरळ इथल्या कोचीन जवळच्या, कोट्टायमजवळ असलेल्या, आपल्या छोट्याश्या गावात निघालेल्या त्या ननच्या मागावर असलेली एक व्यक्तीही; तिला कायमचं संपवण्यासाठी, तिच्यामागेच त्याच दिशेनं, त्याचं रोखानं, तिच्यासोबत सहप्रवासी म्हणून त्याच बसमधून प्रवास करायला आधीच घरून निघालेली होती.

उदईनगर इथून सुटलेली बस पुढे २० किलोमीटर अंतरावर वाटेतच इंदौर जवळच्या ‘नाचणबोरी हिल्स’ या जंगलसदृश्य असणार्‍या, तुरळक वस्तीच्या, निर्जन भासणार्‍या ठिकाणापाशी येताच, ती बस मुद्दाम जबरदस्तीनं थांबवण्यात आली. वाटेत एका पायवाटेवरच्या छोट्याश्या देवळात, आपल्याला नारळ फोडायचा आहे असा बहाणा करून; एका युवकानं ती बस त्या जंगलसदृश्य परिसरात जाणून-बुजून थांबवली. विशीतला वाटणारा पण चेहेर्‍यावर दाढीमिशांचं जंगल असल्यानं; एखाद्या डाकूप्रमाणे क्रूर दिसणारा तो युवक; बसमधून खाली उतरला व नारळ फोडून झाल्यावर बसमध्ये परतला. त्यानं नारळाचा एक एक तुकडा प्रत्येकाला प्रसाद म्हणून वाटायला सुरवात केली. जवळ जवळ पन्नासहून अधिक प्रवाशांच्या दाटीनं गच्च भरलेल्या त्या सध्या छोट्या स्थानिक बसमध्ये तो युवक कोणाला तरी शोधू लागला. प्रत्येक सीटवरच्या प्रत्येकाचा चेहरा नीट निरखून पाहत तो पुढं-पुढं सरकू पाहणारा तो युवक, ती नन जिथं बसली होती त्या सीटपाशी येताच आकस्मिकपणे थांबला. तो आपल्या सीटपाशी येताच त्याला सर्वांना असं खोबरं वाटत असलेलं पाहून ती नन गमतीनं म्हणाली, ‘‘काय रे, आज मोठ्या खुशीत नारळ फोडून सर्वांना खोबरं वाटत आहेस… काही चांगलं झालंय का?’’ यावर काही न बोलता त्यानं आपल्या हातातल्या खोबर्‍याचा एक छोटा तुकडा त्या ननच्या हातावर ठेवला. त्या नननं तो खोबर्‍याचा तुकडा खाल्ल्यावर, तो युवक थंडपणे आणि कठोर आवाजात म्हणाला, ‘‘शुभ झालेलं नाही… आता होणार आहे!’’ त्याच्या चेहर्‍यावर एक क्रूर हास्य पसरलं आणि मग अचानक त्यानं स्वतःजवळचा सुरा बाहेर काढला. त्याच्या तोंडावर कसला तरी क्रूर निर्धार केल्यासारखे, अमानुषतेचे भाव उमटले. त्याचा तो भलाथोरला सुरा आणि त्याच्या चेहर्‍यावरचे क्रौर्याचे भाव बघताच सगळेच प्रवासी भांबावून गेले. सारे जण चिडीचूप झाले… सगळीकडे एक विचित्रशी शांतताच पसरली.

त्यानं हातातला सुरा दाखवत, मोठ्यानं एक आरोळी ठोकून, त्या भेदरलेल्या ननच्या हाताला धरून तिला फरफटत बसच्या बाहेर आणलं आणि काही अंतर खेचत खेचत एका कडेला आडोशाला नेलं.
हा सारा प्रकार पाहून प्रथम स्तंभित झालेल्या प्रवाशांनी, नंतर भानावर येऊन सुरू केलेल्या आरड्या-ओरड्याकडे आणि ‘त्या बिचार्‍या बाईला सोडून दे’ अशा आशयाच्या केलेल्या विनवण्यांकडे; दुर्लक्ष करून त्यानं आपल्या हातातल्या धारदार सुर्‍यानं त्या ननच्या अंगावर, एकामागून एक असे घाव घालण्यास सुरवात केली. ती तीन-चार घावातच जमिनीवर निश्चेष्ट होऊन पडली. ती आता मृत झालेली आहे हे जाणूनदेखील, त्या बावीस वर्षांच्या युवकानं घाव घालणं थांबवलं नाही. पन्नासाहून अधिक वार झाल्यावर, ‘आता कदाचित गर्दी जमा होऊ शकेल.’ हे लक्षात आल्यावर मग त्या युवकानं तिथून; जंगलाच्या अंतर्भागाच्या दिशेनं पळ काढला. ईश्वराची एक सेवाभावी व्रतस्थ सेविका, प्राणांतिक वेदनांनी तडफडून, एखाद्या बेवारशासारखी; त्या जंगलसदृश्य परिसरातल्या पायवाटेवर मृत होऊन पडली होती… तब्ब्ल चार तास…! तिच्या एकाकी पडलेल्या कलेवराकडे चार तास कोणाचंही लक्ष गेलं नाही किंवा कोणीही काहीही केलं नाही.

ननच्या खुनाची बातमी समजल्यानंतर बर्‍याच वेळानं घटनास्थळी जमलेल्या लोकांनी घाईघाईनं त्या ननला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्याची व्यवस्था केली. पण हॉस्पिटलमध्ये पोचण्यापूर्वीच तिचे प्राण गेले होते. तिच्या शरीरावरच्या त्या चोपन्न मोठ्या व खोल गंभीर जखमा पाहून, अनुभवी डॉक्टरदेखील चरकले. (चोपन्न खोल आणि वीस-बावीस उथळ अशा जवळ जवळ एकूण पंचाहत्तर जखमा त्या देहावर होत्या.) तिथल्या डॉक्टरनं शवचिकित्सेनंतर ‘धारदार शस्त्रानं शरीराला झालेल्या खोल जखमांमधून अधिक प्रमाणात रक्त वाहून गेल्यामुळे, आत्यंतिक रक्तस्राव झाल्यानं झालेला मृत्यू’ असा निर्वाळा दिला. त्या दुर्दैवी आणि दुःखद घटनेचं वृत्त एखाद्या वणव्याप्रमाणे सगळीकडं पसरलं आणि स्थानिकांमध्ये भयाच्या सोबत क्रोध-असंतोषही निर्माण झाला. वृत्तपत्रातून सरकारवर टीकेची झोड उठली. जनजीवन अशांत झालं. स्थानिक पुढार्‍यांच्या सोबत कॅथलिक धर्मगुरूंनीही लोकांना शांत राहण्याचं आवाहन केलं. ‘लवकरात लवकर खुन्याला पकडून बळी गेलेल्या निष्पाप ननला न्याय मिळवून देण्यात येईल,’ असं सरकारतर्फे वचन मिळताच सारं काही शांत झालं.
गुन्हा घडल्यानंतर काही काळानं, मृत व्यक्तीची ओळख पटली. बळी गेलेली नन ही सिस्टर रानी मारिया वाट्टलील असल्याची खात्री पटल्यावर लगेचच पुढच्या हालचालींना सुरवात झाली. पोलिसांना त्या ननचा ठावठिकाणा समजताच चर्चकडून त्वरित, त्या ननच्या केरळमधल्या गावातल्या पोलिसांना ही बातमी देऊन, तिच्या घरी ह्या अघटिताबद्दल कळवण्याची विनंती करण्यात आली. प्रवाशांनी केलेल्या वर्णनानुसार खुन्याचं एक स्केच बनवून घेण्यात आलं व सर्वत्र त्याचा शोध चालू झाला.

(बर्‍याच उशिरानं ही बातमी भोपाळ इथं मिशनरीचं काम करणार्‍या सिस्टर रानी मारियाच्या सख्ख्या बहिणीपर्यंत, सिस्टर सेल्मापर्यंत पोचल्यावर भावनातिरेकानं तिचा बांध फुटला. समोर असलेल्या ख्रिस्ताच्या तसबिरीकडं पाहून आक्रोश करत जेव्हा ती प्रभूला उद्देशून वारंवार, ‘‘हे प्रभू, माझी बहीण तुझी सेविका होती आणि तुझ्याचसाठी ती काम करत होती ना… मग तू तिला असं बेवारश्यासारखं मरण का दिलंस?’’ असा प्रश्न करू लागली; तेव्हा तिला प्रत्यक्षपणे ख्रिस्ताचं दर्शन झालं, ‘‘मी आणि माता मेरी तिच्या अंतिम समयी निकट उभे असताना माझी बहीण बेवारसपणे मरण पावली असं तू कसं म्हणू शकतेस?’’ असा प्रतिप्रश्न करणारी प्रभूची वाणी तिला ऐकू आली, असं ऐकिवात आहे. आपल्या मुलाखतीतून तिनं असं जाहीरपणे म्हटलेलं आहे.)
सिस्टर रानी मारीया हिला भोसकून ठार मारल्याची बातमी कळताच, केरळमधल्या कोट्टायम जिल्ह्यातल्या पुल्लूवाझ्झही या छोट्याश्या खेड्यात असलेल्या त्या लहानशा घरात एकच आकांत माजला. केवळ सिस्टर रानी मारियाचे आई-वडीलच नाही तर, सारे गावकरीही ह्या दुर्दैवी घटनेमुळे दुःखी झाले. कारण प्रेमळ आणि सेवाभावी वृत्तीची सिस्टर रानी मरिया सार्‍यांचीच लाडकी होती.

एकोणतीस जानेवारी १९५४ मध्ये पैली आणि एलिस्वा वाट्टलील या दांपत्यांच्या पोटी सिस्टर रानी मारियाचा जन्म झाला. सिस्टर रानी मारिया ही त्यांच्या सात अपत्यांपैकी दुसरी. शालेय शिक्षण संपल्यानंतर, १९७२ मध्ये पलाई जवळ असलेल्या किदांगुर इथल्या ‘द फ्रान्सिस्कन क्लारिस्ट कन्व्हेंट’मध्ये तिनं प्रवेश मिळवला. १९७५ मध्ये तिला नॉर्थ इंडियन मिशनमध्ये, मिशनरी कामासाठी पाठवण्यात आलं. प्रथम बिजनौर इथं तिनं आपल्या कामाची सुरवात केली. सुरवातीला तिला अतिसामान्य लोकांमध्ये मिसळून, त्यांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचं काम देण्यात आलं. व्यसनी लोकांची व्यसनं सोडवून त्यांना पुन्हा रोजगार मिळवून देणं, शिक्षणाचा प्रसार करणं अशांसारखी कामं ती यशस्वीरीत्या पार पाडू लागली.
त्यानंतर एकवीस जुलै १९८३ मध्ये तिला को-ऑर्डिनेटरचं काम देण्यात आलं. तिला बिजनौर इथून ओडागढी इथं पाठवण्यात आलं. तिच्या वाट्याला आलेलं बेरोजगार आणि दारिद्य्ररेषेखालच्या लोकांना आर्थिदृष्ट्या सक्षम बनवण्याचं अवघड काम ती जरादेखील न कुरकुरता मोठ्या तडफेनं पूर्ण करू लागली. सदैव हसतमुख राहणार्‍या सिस्टर रानी मारियाला तिच्या सहकार्‍यांनी ‘स्मायलिंग नन’ असं नाव दिलं.

त्यानंतर १९९२ मध्ये तिची बदली मध्य प्रदेशातल्या उदईनगरमधल्या ‘स्नेहसदन’ इथं करण्यात आली. तिथे तिनं स्त्रियांसाठी एक छोटी संघटना बनवून स्वयंरोजगार योजना निर्माण केली. तिथल्या अशिक्षित किंवा अल्पशिक्षित स्त्रियांना, थोडेफार व्यवसायाभिमुख शिक्षण देऊन त्यांना आपल्या पायावर उभं करण्यासाठी तिनं अथक परिश्रम घेतले. ती रोजंदारीवर असलेल्या मजुरांना रोजच्या मजुरीचे हिशेब सांभाळण्यातही मदत करू लागली. ‘सावकार-जमीनदार खोटेपणा करून गरिबांचे पैसे लुबाडत आहेत’ हे सत्य कळल्यानंतर ती त्या सतत नाडल्या जाणार्‍या पीडित लोकांच्या पाठीशी उभी राहिली. त्यांची सरकार-दरबारी अडलेली कामं पार पाडण्यासाठी, त्यांना सरकारकडून आर्थिक साहाय्य प्राप्त करून देण्यासाठी; ती वारंवार इंदौरला फेर्‍या मारत असे. म्हणून गावातल्या लोकांनी प्रेमानं व मजेनं ‘इंदौरवाली रानी’ वा ‘इंदौरी रानी’ असं तिचं टोपणनावही ठेवलं होतं.

ती स्वभावानं मृदू असली तरी, प्रसंगी अन्यायाच्या विरुद्ध उभं राहताना, जुलमी व्यक्तीला चार खडे बोल सुनावतानाही ती मागे-पुढे पाहत नसे. मुद्दाम अडेलतट्टूपणा करणार्‍या एका टवाळखोर सरकारी अधिकार्‍याला; आपल्या गळ्यातल्या क्रुसावर लटकलेल्या येशूचं पदक दाखवत ती बाणेदारपणे म्हणाली, ‘‘हे बघा, मी यांच्यासाठीच ननची जीवनप्रणाली म्हणजेच एक व्रतस्थ आयुष्य स्वीकारलेलं आहे. माझ्या आई-वडिलांनी मला जबरदस्तीनं ढकललं वा माझी उपासमार होत होती म्हणून, निरुपायानं मी हे व्रतस्थ आयुष्य स्वीकारलेलं नाही. हा माझा स्वतःचा निर्णय होता. आपण जर मनापासून गरिबांना मदत केली तर नक्कीच आपल्याला ईश्वर सान्निध्य प्राप्त होईल.’’
सिस्टर रानी मारियाचं हे समाजकार्य गरिबांचं शोषण करून आपली तिजोरी भरणार्‍या दूरच्या काही सावकारांना आणि जमीनदारांना अजिबात आवडत नव्हतं. सिस्टर रानी मारिया त्यांच्या डोळ्यात सारखी खुपत होती कारण सिस्टर रानी मारिया गरिबांना सरकारकडून विविध सवलती आणि बँकांकडून कमी व्याजात कर्ज मिळवून देत होती. म्हणून त्यांनी तिची सुपारी कोणाला तरी देण्याचं ठरवलं. त्यासाठी ते कोणत्या तरी गुंड-पुंड व्यक्तीचा शोध घेऊ लागताच समंदर सिंहचं नाव त्यांच्यापुढं आलं.

बावीस वर्षांच्या समंदर सिंहचं लग्न झालं होतं. त्याला एक छोटा मुलगाही होता. त्याच्या वाटणीच्या शेतीतून त्याला अत्यंत तुटपुंजं उत्पन्न मिळत असल्यानं त्याची परिस्थिती फारशी बरी नव्हती आणि बाहेरही त्याला काहीही काम मिळत नव्हतं. त्यामुळे तो बायको-मुलाचं पोट कसं भरायचं याबद्दल नेहमी चिंतित असायचा. तसंच तो भडक डोक्याचा, कोणावरही विश्वास ठेवणारा, हलक्या कानाचा आणि भावनिकदृष्ठ्या अस्थिर म्हणूनही कुख्यात होता. त्या जुलमी सावकार-जमीनदार यांनी समंदर सिंहला गाठलं आणि त्याच्या डोक्यात सिस्टर रानी मारियाविषयी वाईट-साईट भरवून दिलं. तसंच त्याला भरपूर पैश्यांचं आमिषही दाखवलं. या सर्वांच्या एकत्रित परिणामानं समंदर सिंह एका निष्पाप आणि निःशस्त्र अशा महिलेची, प्रभूच्या सेविकेची हत्या करण्यासाठी प्रवृत्त झाला.

समंदर सिंहला सिस्टर रानी मारियाच्या जाण्या-येण्याच्या वेळांचे तपशील पुरवण्यात आले. तसंच त्याला तिच्या हत्येसाठी एक धारदार सुराही देण्यात आला. सिस्टर रानी मारियाच्या मागावर असलेल्या व्यक्तींकडून ती उदईनगर येथून बसनं इंदौरला लांबच्या प्रवासाला जाणार असल्याचं समजताच वाटेतल्या नाचणबोरी इथल्या जंगलसदृश्य परिसरात तिची हत्या करण्याचा बेत आखण्यात आला.
असंही म्हटलं जातं की १९९४ च्या डिसेंबर महिन्यामध्ये देवास जिल्ह्यातल्या सेमिलिया रायमल इथं जमिनीच्या तंट्यावरून, ‘दलित विरुद्ध ठाकूर’ असा मोठा झगडा झाला. तोंडी बोलाचाली किंवा बाचा-बाची वरून सारं प्रकरण हाणामारीवर येऊन ठेपलं. यामध्ये दोन्हीही पक्षांचे लोक जखमी झाले. जीवन सिंह या ठाकूर समाजातल्या जुलमी सावकाराची तर सर्व शेतमजुरांनी यथेच्छ पिटाई केल्यानं तो जबर जखमी झाला आणि त्याला रुग्णालयात हलवावं लागलं. ह्या पिटाईमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून पकडल्या गेलेल्या आणि तुरुंगात डांबलेल्या; आदिवासी आणि पददलितांची सिस्टर रानी मारियानं, स्वतः वकिलाच्या मदतीनं जामिनावर सुटका केली होती. पूर्वी डोळ्याला डोळा न भिडवणारे हे पददलित लोक, हल्ली अरे-तुरेची भाषा करतात, अंगावर हात उचलतात, कारण त्यांना या मिशनरी लोकांची फूस आहे असा ठाकूर समाजातल्या सर्वांचा आधीपासूनच गैरसमज झालेला असल्यानं सारेच मिशनर्‍यांच्या विरोधात होते. या घटनेमुळे त्यांच्या क्रोधाग्नीत जणू तेलच ओतलं गेलं. त्यानंतर चवताळलेल्या जीवनसिंहनं समंदर सिंहाला आपल्या हवेलीत बोलवून घेतलं आणि झालेलं सारं रामायण मीठ-मसाला लावून रंगवून-रंगवून त्याला ऐकवलं व ठाकूर समाजाच्या झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी, ठाकूर समाजाच्या इभ्रतीसाठी, सिस्टर रानी मारियाची हत्या करणं आवश्यक असल्याचं सांगून, समंदर सिंहसुद्धा त्याच समाजातला असल्यानं, त्यानंच शूराप्रमाणे (?) पुढाकार घेऊन ते कार्य तडीस न्यावं अशीही गळ त्यानं समंदर सिंहाला घातली. हा जीवनसिंह समंदर सिंहाचा दूरचा नातेवाईक होता. म्हणून त्याच्या सांगण्यानुसार, आपल्या समाजाच्या तथाकथित इभ्रतीसाठी, असले निंदनीय दुष्कृत्य करण्यासाठी समंदर सिंह तयार झाला.

ज्या बसथांब्यावर सिस्टर रानी मारिया बसमध्ये चढली, त्याच्या बर्‍याच आधीच्या थांब्यापासून जीवनसिंह आणि त्याचा एक मित्र धर्मसिंह बसमध्ये चढून मोक्याची जागा अडवून बसले होते आणि त्यांनीच समंदर सिंहला सिस्टर रानी मारिया कुठे बसली होती ते खुणेनं दर्शवलं. हत्येनंतर तिघांनीही पळून जाऊन जंगलात आश्रय घेतला होता.
नेमून दिलेलं कुकर्म बिनभोबाट आटोपून, पळ काढण्यात समंदर सिंहला यश मिळालं होतं. पण बघ्यांनी केलेल्या वर्णनानुसार, त्याच्या काढलेल्या रेखाचित्रावरून आणि लोकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे त्याचा शोध लावणं पोलिसांना फारसं कठीण मुळीच जाणार नव्हतं, आणि झालंही तसंच! अवघ्या तीन दिवसांतच माळव्याच्या त्या घनदाट जंगलात लपलेल्या समंदर सिंहचा शोध लावून त्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश मिळालं.
पकडल्या गेलेल्या समंदर सिंहची पोलिसांद्वारे व्यवस्थित चौकशी झाली. या चौकशी दरम्यान त्यानं आपला गुन्हा कबूल केला. त्यानंतर त्याच्यावर कोर्टात भरण्यात आलेल्या खटल्यानं पुन्हा सार्‍या प्रसिद्धिमाध्यमांचं लक्ष या दुर्दैवी घटनेकडे वेधलं गेलं. खटल्याच्या घडामोडींनी वृत्तपत्रात रकानेच्या रकाने भरू लागले. देश-विदेशातल्या सार्‍याच वृत्तपत्रातून, ह्या खटल्याच्या हकिकतीला ठळक प्रसिद्धी मिळाली.

खटल्याच्या निकालाकडे सर्वांचेच डोळे लागलेले होते. ‘न्यायाधीश काय निर्णय देणार?’, ‘त्या समंदर सिंहला फाशी होणार की नाही?’, ‘समंदर सिंह स्वतःचा बचाव करण्यात कितपत यशस्वी होईल?’ अशा प्रश्नांबद्दल विविध वृत्तपत्रे, प्रसिद्धिमाध्यमे यांच्याद्वारे ऊहापोह आणि चर्चा होत होत्या तर फावल्या वेळेत जनतेत होत होत्या. ‘समंदर सिंहच्या भावनांचं असंतुलन झाल्यानं हे दुष्कृत्य घडलं म्हणून त्याला जन्मठेप व्हावी’ असं काहींचं मत होतं तर ‘एका सेवाभावी, व्रतस्थ स्त्रीची हत्या हा अक्षम्य गुन्हा असल्यानं त्याला फाशीच व्हावी’ असंही काही जण म्हणत होते.
कोर्टात दोन्ही बाजूंचे वकील आपापली बाजू मांडत होते. न्यायाधीशांनी शांतपणे दोघांचीही बाजू ऐकून घेतली. माननीय न्यायमूर्तींच्या लक्षात आलं की, ‘समंदर सिंह जरी एक हत्यारा असला, तरी तो निर्ढावलेला वा पेशेवार खुनी नव्हता. त्यानं हा गुन्हा भावना भडकावल्यामुळे केला होता. खुनाचा कट अगोदर दुसर्‍या कोणीतरी रचला होता आणि त्याला गुन्हा करण्यासाठी उद्युक्त केलं होतं वा भावनात्मक बळजबरी करून त्याला तसं करायला भाग पाडलेलं होतं. आणि ह्या सर्व गुन्ह्याच्या घटनेत त्याची भूमिका फक्त एखाद्या भाडोत्री मारेकर्‍याचीच होती. त्याचा हा पहिलाच गुन्हा होता. तसंच त्यानं स्वतःहून खुनाची संपूर्ण जबाबदारी स्वतःवर ओढून घेतली होती. ‘लोकांनी माझ्या डोक्यात वाईट-साईट भरवलं पण तरीही मी विचार करायला हवा होता. डोकं वापरायला हवं होतं. रागाच्या एका सणकेत खून करायला नको होता. मी निष्पाप जीवाचा बळी घेतला. माझ्यामुळे, केवळ माझ्यामुळेच एक चांगली व्यक्ती आपल्या प्राणांना मुकली. मी… मी एकटाच गुन्हेगार आहे,’ असं भर कोर्टात बोलून, स्वतःच सत्यकथन करून त्यानं आपण केलेल्या गुन्ह्याचा स्वीकार केला होता. तसंच त्याचं वयही तरुण म्हणजे फक्त बावीस वर्षांचं होतं.

याशिवाय त्याला फाशी होऊ नये म्हणून चर्च आपणहून अथक प्रयत्न करत होतं. चर्चकडून सरकारला तसं अपीलही करण्यात आलेलं होतं. त्यावर सिस्टरच्या घरच्यांच्या, नातेवाइकांच्या आणि तिच्या सहयोगी नन्सच्याही सह्या होत्या. या व्यतिरिक्त सिस्टर सेल्मा आणि सिस्टर रानी मारिया यांच्या आई-वडिलांनी, राष्ट्रपतींकडे आणखी एक वेगळा दयेचा अर्जही पाठवून दिला होता. सार्‍या स्थानिक मिशनरी त्याला फाशी होऊ नये म्हणून प्रयत्नशील होत्या. ‘आम्ही आमच्या धार्मिक शिकवणुकीप्रमाणे त्याला क्षमा केलेली आहे, सरकारनंही त्याला माफ करावं’ असं त्यांनी जाहीरपणे घोषित केलं होतं. प्रभूसाठी म्हणून (फॉर ख्राईस्टस सेक) सरकारला त्याला माफ करण्यासाठी विनवलं होतं.
कोर्टात समंदर सिंह गुन्हेगार असल्याचं सिद्ध झाल्यावर; माननीय न्यायमूर्तींनी उपरोक्त गोष्टी ध्यानात घेऊन फाशीऐवजी त्याला जन्मठेपेची सजा सुनावली. इंदौरच्या मध्यवर्ती कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली.
* * *

२००२ साल उजाडलं. मार्च महिना लागलेला होता. उन्हाळा नुकताच सुरू झाला होता. इंदौरच्या मध्यवर्ती कारागृहात एकेकाळी सुदृढ प्रकृती असणार्‍या पण सद्यस्थितीमध्ये अस्थिपंजर झालेल्या; एका बटबटीत डोळ्यांच्या, मोठमोठ्या छपरी मिशा ठेवलेल्या कैद्याला भेटायला कोणीतरी आल्याचं समजल्यावर जेलरसह सारे जण आश्चर्यचकित झाले. कारण त्या कैद्याला भेटण्यासाठी म्हणून तिथं बरेच दिवसांत कोणीही मुळीच फिरकलं नव्हतं. जेलरकडून आपल्याला स्वामी सदानंद म्हणून कोणीतरी भेटायला आल्याचं कळल्यावर ‘हा कोण सदानंद? मला कशाला भेटायला आला आहे तो? आणि मी कोणा स्वामी-बिमीला ओळखत नाही… मला नाही भेटायचं कोणाला!’ असं त्या कैद्यानं तिरसटून उत्तर देताच; जेलरनं त्याला फादर स्वामी सदानंद हे सिस्टर रानी मारियाचे बंधू असून, पिठमपूर इथून बर्‍याच मैलांचा प्रवास करून खास त्याच्याच भेटीला आले आहेत आणि त्याला भेटल्याशिवाय जायचंच नाही असा त्यांनी पक्का निर्धारच केलेला आहे, हे सांगितल्यावर तो कैदी कसाबसा त्यांची भेट घेण्यासाठी तयार झाला. ‘सिस्टर रानी मारियाच्या कुटुंबीयांनी तुला माफ केलं आहे. ते तुला भेटू इच्छित आहेत’ असं त्या शुभ्र दाढीवाल्या पाहुण्यानं सांगताच, समंदर सिंहनं नुसतंच तोंड फिरवलं आणि त्यांच्यासोबत काहीही बोलण्यासाठी नकार दिला. पण तरीही आशा व धीर न सोडता, फादर स्वामी सदानंद त्याला दोन महिने सतत भेटत राहिले. दोन महिन्यांनंतर प्रथमच समंदर सिंह फादर स्वामी सदानंद यांच्याशी बोलण्यासाठी तयार झाला. ‘त्या सिस्टरचे आई-वडील मला का माफ करत आहेत? मी त्यांची कधीही माफी मागितली नाही. मी तर त्यांच्या मुलीला ठार मारलं आहे, आणि मी खुनी, एक गुन्हेगार आहे!’ समंदर सिंह असं उत्तरल्यावर फादर स्वामी सदानंद त्याची समजूत काढत म्हणाले, ‘हे पहा प्रत्येक माणूस आयुष्यात कधी ना कधी तरी चुकतोच. त्याच्या हातून कळत-नकळत अपराधही होतात. तू चुकलास… पण तू सत्य बोलून आपली चूक कबूल केलीस. तू आयुष्याची सात अमूल्य वर्षं ह्या तुरुंगात एक कैदी बनून खितपत काढलीस. तू पश्चात्तापदग्ध आहेस आणि आपल्या कृत्याबद्दल तुला मनोमन खेदही होतोय.. खरं ना? मग झालं तर! सिस्टर रानीचे कटुंबीय तुला आपला मुलगा मानत आहेत. सिस्टर रानीची आई तर सर्वांना सांगत आहे की, ‘प्रभूनं जरी माझ्या मुलीला आपल्यापाशी बोलावून घेतलं तरी त्याची भरपाई म्हणून एक पुत्र दिला आहे.’ तुझी इथून लवकर सुटका व्हावी म्हणून ते सारे प्रयत्नशील आहेत… मग तू त्यांना का भेटत नाहीस?’
यावर समंदर सिंहने नजर बाजूला वळवली पण त्याचे डोळे पाण्यानं डबडबले होते. त्यानं काहीही न बोलता फक्त मान हलवून रुकार दिला.

ऑगस्ट महिना उजाडला. एकवीस तारखेला एक मिनीबस कारागृहाच्या आवारात आली आणि त्यातून फादर स्वामी सदानंद आपल्या सोबत भोपाळ इथं कार्यरत असलेली सिस्टर रानीची बहीण सिस्टर सेल्मा आणि आणखी सहा सहयोगिनी नन्सना घेऊन उतरले. तो राखी पौर्णिमेचा दिवस होता म्हणून जेलरच्या खास परवानगीनं, सिस्टर सेल्मासह त्या सहाही नन्सनी समंदर सिंहला राखी बांधली. हाताला राखी बांधली जाताच त्याचा बांध फुटला आणि रडत रडत तो वारंवार ‘दीदी माफ करो… मुझे माफ करो… गलती हो गई… बहुत बडी गलती हो गई’ असं वारंवार म्हणू लागताच सार्‍यांचेच डोळे भरून आले. राखीची ओवाळणी म्हणून इथून पुढे मानवतेवर विश्वास ठेवणारा एक चांगला नागरिक म्हणून आयुष्य व्यतीत करण्याचं वचन त्याच्याकडून प्राप्त करून घेऊन सार्‍या नन्स परतल्या.
यानंतर प्रत्येक वर्षी राखी पौर्णिमेला सिस्टर सेल्मा त्याला भेटत राहिली. तिनं त्याला पॅरोल मिळावा म्हणून खूप प्रयत्न केले आणि तिच्या प्रयत्नांनी अखेर त्याला पॅरोलही मिळाला.
अखेर अकरा वर्षे सहा महिन्यांच्या कारावासानंतर त्याच्या शिक्षेतली उरलेली वर्षं माफ करण्यात आली व त्याची तुरुंगातून मुक्तता झाली.
सिस्टर रानी मारिया हिच्या समाजकार्याची दखल घेऊन व्हॅटिकननं २००७ मध्ये तिला ‘सर्व्हन्ट ऑफ गॉड’ हा किताब दिला.

२००९ साल उजाडलं. सिस्टर रानी मारिया हिच्या निर्घृण हत्येला वीस वर्षं उलटून गेली होती आणि भारतात प्रवासी म्हणून आलेल्या, कॅनडाच्या नागरिक असलेल्या सिनेदिग्दर्शिका कॅथेरीन हिला पुल्लूवाझ्झही गावच्या एका कॅथॉलिक मिशनर्‍याकडून सारी कहाणी समजताच; तिनं या कथेवर एक लघुपट बनवण्याचा निश्चय नव्हे ठाम निर्धारच केला. २०१० मध्ये तिनं या कथेवर काम करायला सुरवात केली व लवकरच शूटिंगही सुरू केलं. घटनास्थळी तसंच उदेईनगर आणि पुल्लूवाझ्झही इथंही चित्रीकरण करण्यात आलं. २०१३ मध्ये हा लघुपट पूर्ण झाला.

लॉस अँजेल्स इथल्या ‘वर्ल्ड इंटरफेथ हार्मोनी फेस्टिवल’मध्ये ह्या लघुपटाला सर्वोत्तम लघुपटाचं अवॉर्ड मिळालं. नंतर इटली इथल्या ‘फिल्म फेस्टिव्हल’मध्येही हा लघुपट पारितोषिक विजेता ठरला. याशिवाय जकार्ता इथल्या ‘फिल्म फेस्टिव्हल फॉर स्पिरिच्युआलिटी, रिलिजिन अँड व्हिजनरी’ मध्येही ह्या लघुपटानं प्रथम पारितोषिक पटकावलं. आपल्या सिनेमाविषयी बोलताना कॅथेरीन म्हणाली, ‘महत्त्वाची गोष्ट म्हणजे समंदर सिंहला सर्वांनी माफ केलं पण कॅथॉलिक धर्मामध्ये कन्व्हर्ट केलं नाही. तो हिंदू होता आणि हिंदूच राहिला. त्याचं धर्मपरिवर्तन झालं नाही तर, त्याचं हृदय परिवर्तन झालं! हृदय परिवर्तनासारखी अतिशय कठीण गोष्ट प्रयत्नांनी का होईना साध्य झाली. आणि हेच माझ्या ह्या लघुपटाचं सार आहे.’

इंग्लिशसह स्पॅनिश, इटालियन, फ्रेंच यांसाख्या युरोपमधल्या विविध भाषांमधून आणि हिंदीमध्येही लघुपट डब करण्यात आला. ह्या लघुपटाच्या डीव्हीडी तुरुंगातल्या सर्व कैद्यांना दाखवण्यासाठी जगभर पाठवल्या जाव्या अशी कॅथरीनची मनापासून इच्छा आहे आणि त्यासाठी ती झटत आहे.
चार नोव्हेंबर २०१७ ला व्हॅटिकननं आपल्या अधिकाराद्वारे सिस्टर रानी मारियाला सन्मानपूर्वक ‘ब्लेस्स्ड’ म्हणून घोषित केलं. ‘ब्लेस्स्ड’ हा किताब व्हॅटिकनकडून आपल्या अनुयायाला मिळणं ही त्या पंथाच्या चर्चच्या दृष्टीनं अत्यंत अभिमानाची गोष्ट असते; कारण हा सर्वोच्च सन्मानाचा किताब मिळणं ही गोष्ट अत्यंत अवघड, जवळजवळ दुर्मीळच असते आणि हा किताब मिळालेल्या धर्मगुरूंची पुढे संतपदाकडे वाटचाल सुरू होते.
सिस्टर रानी मारियाच्या चमत्कारांच्या बर्‍याच कहाण्या मध्य प्रदेशातल्या स्थानिक जनतेत प्रसिद्ध आहेत. तिचं नाव घेतल्यावर संकट-पीडा यांतून मुक्ती मिळून मनःशांतीचा लाभ होतो असंही ऐकिवात आहे. ह्या सार्‍या हकिकतींची नोंद अगदी तपशीलवार व व्यवस्थिपणे चर्चद्वारे करण्यात येत आहे. सिस्टर रानी मारिया हिची संतपदाकडे वाटचाल सुरू झालेली असून; तिलाही मदर टेरेसांच्याप्रमाणे संतपदाची प्राप्ती होईल, असा विश्वास फादर स्वामी सदानंद, फादर स्टिफन्स, तिच्या चर्चचे अनुयायी, कॅथॉलिक बांधवांना वाटत आहे.
* * *

उपसंहार
* ऑगस्ट २००६ मध्ये समंदर सिंह ह्याला, चांगल्या वर्तणुकीबद्दल बक्षीस म्हणून, त्याची उरलेली कैद माफ करून तुरुंगवासातून मुक्त करण्यात आलं. त्याला शिक्षेत माफी मिळावी आणि त्याची लवकरात लवकर सुटका व्हावी म्हणून सिस्टर रानीच्या कुटुंबीयांनी व चर्चनंही बरेच प्रयत्न केले असल्याचे सर्वश्रुत आहे. सुटका झाल्यानंतर; लागलीच केरळला जाऊन, तो सिस्टर रानीच्या कुटुंबीयांना भेटला व त्यानं सर्वांची मनःपूर्वक माफी मागितली.
* ज्या ठाकूर समाजाच्या तथाकथित इज्जतीसाठी, समंदर सिंह ह्यानं खुनासारखं दुष्कृत्य केलं त्याच समाजानं त्याला बहिष्कृत केलं आहे. त्याच्या सार्‍या नातेवाइकांनी, घरच्यांनी इतकंच नव्हे तर त्याच्या पत्नीनंही; त्याच्याबरोबर असलेले सारे संबंध तोडले. ते त्याला माफ करायला तयार नाहीत. तो तुरुंगात असताना त्याचा एकुलता एक लहानगा मुलगा, किरकोळ आजारानं हे जग सोडून गेला. तो समंदर सिंह आता एकटा व अत्यंत एकाकी आयुष्य जगत आहे. उपजीविकेसाठी तो शेती करत आहे. कधी कधी फारच उदास वाटल्यावर तो, सिस्टर रानी मारियाच्या समाधिस्थळाला भेट देऊन, मनःशांतीसाठी प्रार्थना करतो. तिथं गेल्यावर मनाला शांती मिळते असं फक्त त्याचंच नव्हे तर इतरही बर्‍याच जणांचं म्हणणं आहे.
मी जेव्हा सिस्टर रानी मारियांची निर्घृणपणे हत्या केली, त्या दिवशीपासून मला खंत वाटू लागली. तुरुंगात गेल्यावर तर मी स्वतःच स्वतःला काठीनं बडवून काढलं. रोज रात्री मी अशीच स्वतःच्या हातानं, स्वतःला शिक्षा करून घेत असे… पण सिस्टर रानी मारिया यांच्या घरच्यांनी जेव्हा मला क्षमा केल्याचं कळलं; तेव्हाच माझ्या मनाला शांती मिळाली. मला सुरवातीला वाटत होतं की, ज्यांनी मला हे दुष्कृत्य करायला भाग पाडलं त्या दोघांची हत्या करून नंतर स्वतः मरणाला कवटाळावं. पण सिस्टर सेल्मा यांच्या उपदेशानं मला त्यापासून परावृत्त केलं. मी त्यांना माफ केलं. सुरवातीला मला भेटायला येणार्‍यांनी, घरच्यांनी आणि नातेवाइकांनी नंतर हळूहळू भेटण्याचं प्रमाण कमी करत करत शेवटी भेटणं बंद केलं; तेव्हाच मला उमजलं की मला आता एकट्यानेच आयुष्य काढायचं आहे.

मी कुसंगतीत सापडून कुविचार केला, मूर्खासारखे वागलो व नंतर पश्चात्तापाच्या आगीत होरपळून निघालो. माझ्या अत्यंत अश्लाघ्य वर्तनाचा मला मनातून खेद वाटत आहे. रानी मारियाच्या कुटुंबीयांनी आणि सर्वांनी मला माफ करून, त्यांच्या कुटुंबातला एक मानलं… हा जो चांगुलपणा दाखवला, त्याबद्दल मी त्या सर्वांचा नेहेमीच ऋणी राहीन. माझं आता हृदयपरिवर्तन झालेलं असून, मी चांगला माणूस म्हणून जगायचा प्रयत्न करेन. सिस्टर रानी मारिया यांच्याप्रमाणे मीसुद्धा, समाजातल्या दुर्बल घटकांच्या तसंच आदिवासी व पददलितांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करेन,’ असं तो स्वतःविषयी बोलताना म्हणतो.

* ‘समंदर सिंह हा आपल्या मुलीचा हत्यारा आहे हे जाणूनदेखील, सिस्टर रानी मारिया यांच्या आईनं त्याला माफ करून, आपला पुत्र मानलं आणि कुटुंबातला एक घटकच बनवलं. तसंच त्याला क्षमा प्रदान करून त्याच्यावर मायेचा वर्षावही केला. पण हे सारं का आणि कशासाठी?’ ह्या काही सामान्यांना पडणार्‍या आणि काही कुत्सित लोकांकडून विचारल्या जाणार्‍या प्रश्नाचं उत्तर देताना, सिस्टर सेल्मा शांत-संयतपणे जाहीररीत्या बोलताना म्हणाल्या, ‘शेवटच्या श्वासापर्यंत प्रभूच्या सेवेत मग्न राहावं… त्यानं नेमून दिलेलं कार्य करत रहावं अशी माझ्या बहिणीची अगदी लहानपणापासून आंतरिक इच्छा होती. ती प्रभूनं पूर्ण केली. तिच्या मृत्यूबद्दल आम्ही कोणालाही दोषी धरत नाही. जिझसनं आम्हाला शत्रूवरही प्रेम करण्याचा उपदेश केला आहे. तसंच जिझसनं क्षमा, करुणा आणि शांती हे गुण अंगी बाळगण्याचा आग्रहही धरला आहे. आम्ही फक्त त्याचा मार्ग अनुसरत आहोत.’

– कल्पिता राजोपाध्ये

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.