Now Reading
सायको किलर अविनाश

सायको किलर अविनाश

Menaka Prakashan

केवळ एक घटना नराचा पशू कशी करते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे सायको किलर अविनाशचं जिवंत उदाहरण. एखादी घटना माणसाचं आयुष्य कोणत्या वळणावर घेऊन जाईल, हे सांगणं अशक्य. पण त्या गुन्ह्यामुळे जर अट्टल गुन्हेगार घडत असेल तर समाज म्हणून आपण कुठे आहोत, याचं परीक्षण अंतर्मुख होऊन करणं महत्त्वाचं ठरेल…

”चौकशीच्या निमित्तानं उगाच वेळ का फुकट दवडताय? ‘मनोरुग्ण- खुनी अविनाश’ म्हणून नेटवर शोधा ना… तिथं तुम्हाला सगळी माहिती मिळेल!” पोलिस कोठडीत, चौकशी सुरू असताना एखाद्या गुन्हेगारानं असं स्पष्ट शब्दांत शांतपणे सुनावणं ही गोष्ट बिहारच्या मुख्य तुरुंगात प्रथमच घडलेली असल्यानं सगळे चौकशी अधिकारी ‘त्याच्याकडे’ अचंब्यानं पाहू लागले. आतापर्यंत त्या अधिकाऱ्यांनी कित्येक गुंड प्रवृत्तीच्या क्रूर मिजासखोर, थंड रक्ताच्या खुनी गुन्हेगारांना चांगलं हाताळलं होतं, परंतु आता त्यांच्या ताब्यात असलेल्या विविध गुन्ह्यांच्या आरोपावरून अटक करण्यात आलेला, नियोजनबद्ध पद्धतीनं खून-दरोडे घालणारा म्हणून प्रसिद्ध असलेला हा गुन्हेगार वेगळाच होता. तो होता एक मृदूभाषी, सुसंस्कृत, सुशिक्षित व चांगल्या परिस्थितीतला, उच्च खानदानी घराण्याची पार्श्वभूमी असलेला देखणा रुबाबदार तरुण! अशा व्यक्तिमत्त्वाचा, एवढ्या चांगल्या परिस्थितीतला, वयानं इतका कोवळा तरुण इतके गुन्हे करू तरी कसा शकतो? हा प्रश्न साऱ्यांच्याच मनात आला आणि नंतर त्या युवकानं केलेल्या खुनांची कबुली देताच सर्वांनाच प्रचंड धक्का बसला. कारण त्यांनाच काय, तेव्हापर्यंत न उलगडलेल्या खुनांच्या केसमधला मुख्य सूत्रधार, रचनाकार व खुनी ‘तो’ असल्याचा संशय मुळीच कोणालाही आला नव्हता. त्यानं आपणहून कबुली दिली नसती तर कदाचित या खुनामागचं रहस्य कधीच उलगडू शकलं नसतं.

आपल्या एकेक अपराधांची कबुली पोलिसांना सहजपणे, मनाचा तोल जराही ढळू न देता शांतपणे देऊन, संवादफेकीनं थक्क करणाऱ्या त्या गुन्हेगाराचं नाव होतं ‘अमित’ ऊर्फ ‘अविनाश श्रीवास्तव’. ‘गँग्ज ऑफ वासेपूर २’ हा फार पूर्वी पाहिलेला सिनेमा आठवत असेल तर त्यात नवाजउद्दीन सिद्दीकीनं रंगवलेली ‘फैजल खान’ची भूमिका या अविनाशवरच आधारलेली होती.

ज्या खुनी-दरोडेखोरावर- ‘फैजल’ – हे पात्र आधारित होतं, तो अमित ऊर्फ अविनाश हा काही मुळात गुंड वा गुन्हेगारी प्रवृत्ती असलेला अजिबात नव्हता. एका सुशिक्षित, पांढरपेशा, उच्चमध्यमवर्गीय कायस्थ कुटुंबात जन्मलेला तो एक अभ्यासू, तल्लख बुद्धिमत्तेचा, नवीन तंत्रज्ञान चटकन आत्मसात करणारा एक होतकरू, सर्वांत ज्येष्ठ पुत्र होता. त्याच्याकडून सर्व कुटुंबीयांना, ‘त्यानं खूप शिक्षण घ्यावं आणि अस्थिर सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या बिहारमध्ये आयुष्य वाया घालवण्याऐवजी कुठेतरी दूर, दिल्ली-मुंबईसारख्या महानगरांत अथवा परदेशात स्थायिक व्हावं’ एवढीच अपेक्षा होती. त्याचे वडील ‘काला श्रीवास्तव’ ऊर्फ ‘लल्लनजी’ राजकारणात सक्रियपणे भाग घेणारे, लोकप्रिय, लढाऊ नेतृत्वशैली असलेले झुंजार नेते असून, ते एमएलसीही बनले होते. लल्लनजींची लोकप्रियता त्यांना पुढ-मागे सत्ता मिळवून देऊ शकते, अधिक उच्च स्थान देऊ शकते, हे फक्त विरोधी पक्षातल्याच नव्हे, तर त्यांच्याही पक्षातल्या काही प्रतिस्पर्धी व्यक्तींच्या डोळ्यांत फारच खुपत होतं.

अविनाशला राजकारणात फारसा रस नव्हता. वडिलांच्या पक्षाला पाठिंबा दर्शवण्यासाठी तो अधूनमधून रॅलीमध्ये सहभागी होत असे एवढंच! ते सोडलं तर त्यानं काहीही पक्षकार्य केलेलं नव्हतं. कॉम्प्युटरच्या प्रशिक्षणातच त्याला रुची होती आणि त्याच विषयात चांगलं शिकून इंजिनीअर बनावं इतकीच त्याची महत्त्वाकांक्षा होती. लल्लनजी आपल्या मुलाला ओळखत होते. त्यांनाही अविनाशनं राजकारणात पदार्पण करू नये असंच वाटत होतं. बिहारच्या तत्कालिन अस्थिर जीवनामुळे, अंदाधुंदीच्या वातावरणामुळे शिक्षणा़वर परिणाम होऊ नये म्हणून अविनाशला घरापासून दूर, पटन्याहून लांब दिल्लीला शिक्षणासाठी पाठवून दिलेलं होतं.

दिल्लीतल्या प्रतिष्ठित व अत्यंत नावाजलेल्या विद्यापीठातून अविनाशनं उत्तम गुणवत्तेनं ‘इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी’ या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून ‘एमसीए’ची पदवी मिळवली. त्याच्या उत्कृष्ट गुणवत्तेमुळे एका सुप्रसिद्ध कंपनीनं त्याला बोलावून घेतलं आणि ‘सॉफ्टवेअर इंजिनीअर’ या पदावर नियुक्ती होऊन तो तिथं चांगल्या पगारावर नोकरी करू लागला.

ऐन बाविशीत असलेला अविनाश उत्तम नोकरीमुळे आयुष्यात स्थिरावला. नंतर पदोन्नती मिळून त्याचं आयुष्य सुरळीतपणे चालू लागल्यावर त्याच्या घरच्यांनी त्याच्यासाठी वधू-संशोधनाला सुरवात केली. त्याचे वडील पूर्वीच, म्हणजे २००२ मध्ये मरण पावल्यानं आई कंचनदेवी या त्याचं लग्न ठरवत होत्या. त्यांनी अविनाशला फोन करून पटना इथं सुट्टीवर येण्यासाठी गळ घातली. आईच्या विनवणीमुळे अविनाश तातडीनं घरी जाण्यासाठी निघाला अन्‌ तिथंच त्याच्या दुर्दैवाला सुरवात झाली.

अविनाशच्या मनात नोकरीचा राजीनामा देऊन स्वतंत्र व्यवसाय करावा असं घोळत असल्यानं त्यानं आपल्या मनातला विचार समवयस्कांना बोलून दाखवल्यावर एका लब्धप्रतिष्ठित माणसाच्या कानावर ही बातमी गेली. त्यानं अविनाशला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. लागलीच अविनाश एका जवळच्या मित्रासह त्या व्यक्तीशी बोलण्यासाठी आपल्या कंकरबाग इथल्या निवासस्थानाहून निघाला.

अविनाशनं निघण्यापूर्वी आपल्या आईला या बैठकीविषयी माहिती देताच मनातून हादरलेल्या आईनं आपल्या भावाला बोलावून घेतलं आणि या सरळ-साध्या युवकाला आयुष्यात प्रथमच एक भीषण, विदारक सत्य समजलं. वडिलांच्या मृत्यूच्या वेळी एक शाळकरी मुलगा असणाऱ्या अविनाशला जाणूनबुजून ज्या सत्याबद्दल अनभिज्ञ ठेवण्यात आलं होतं, ते सत्य असं होतं की, अविनाशच्या वडिलांचा मृत्यू हा निव्वळ भांडणं, राग, वादावादी यांसारख्या गोष्टीतून हल्ला-मारामारी होऊन झालेला, अपघाती वा अनियंत्रित भावनांपोटी झालेला नसून ती थंड डोक्यानं विचारपूर्वक कट रचून राजकारणातल्या हितशत्रूंशी संगतमतानं केलेली निर्घृण हत्याच होती आणि एमएलसी लल्लनजींचे खुनी पुराव्याअभावी सुटून गेले होते.

पटना इथल्या कंकरबाग इथल्या त्यांच्या निवासस्थानाजवळच्या रस्त्यात, गर्दीच्या वेळी लल्लन श्रीवास्तव यांच्यावर देशी कट्टातून अगदी जवळून लागोपाठ गोळ्या मारल्या गेल्यानं घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला होता. एका गुंडांच्या टोळीला सुपारी देऊन कोणीतरी ‘अनामिक’ व्यक्तीनं ही हत्या घडवून आणलेली होती. स्वतःला कायम अंधारात ठेवण्यात ही अत्यंत प्रभावशाली व्यक्ती जरी यशस्वी ठरलेली असली तरी ती व्यक्ती कोण असावी याचा अंदाज त्या भाडोत्री गुंडांनी दारू पिऊन केलेल्या अमर्याद, बेलगाम बोलण्यातून काही खबऱ्यांना आला होता ही माहिती त्या खबऱ्यांकडून, अर्थातच पोलिसांप्रमाणे लल्लनजींच्या कुटुंबीयांकडेही पोचवण्यात आलेली होती.

वारंवार पोलिस मुख्यालयात, पक्षश्रेष्ठींकडे तसंच मुख्यमंत्र्यांकडे चकरा मारून, पोलिस स्टेशनचे उंबरे झिजवूनही परिस्थितीत फारसा फरक न पडता तपासकाम यथातथाच चालू राहिलं. पुराव्याअभावी या गुन्ह्यामागचा मुख्य सूत्रधार स्वतःला पोलिसांच्या पकडीपासून अलिप्त ठेवू शकला होता आणि या हत्येत प्रत्यक्षपणे भाग घेणाऱ्यांना, ही घातकी योजना आखणाऱ्यांनाही त्या व्यक्तीनं संरक्षण पुरवून आपल्या स्वतःच्या पंखाखाली घेतलं होतं.

प्रयत्न करूनही आपण आपल्या जवळच्या व्यक्तीच्या खुन्यांना शासन करू शकत नसल्यानं लल्लन श्रीवास्तव यांच्या पत्नी व इतर कुटुंबीय तसंच त्यांच्या पक्षातले सहकारी, सामान्य कार्यकर्तेही वैफल्यग्रस्त झाले होते. कंचनदेवींना तर वारंवार उन्मळलेल्या दुःखाच्या भावनांनी, नैराश्यामुळे मनोविकारानं जवळजवळ गाठलंच होतं.

त्या बिकट परिस्थितीत माहेरच्यांच्या आधारानं तसंच स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवून कंचनदेवींनी हृदयावर दगड ठेवून अविनाशला या सर्वांपासून दूर व अलिप्त ठेवण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला होता. प्राप्त परिस्थितीत कुलदीपकाचं संरक्षण व शिक्षणाचं संवर्धन व्हावं म्हणूनच त्यांनी घेतलेला हा निर्णय सुयोग्य होता. आता लग्नासाठी म्हणून सुट्टीवर घरी आलेला अविनाश, ज्या व्यक्तीवर आपल्या पतीच्या खुनामागचा सूत्रधार म्हणून संशयानं पाहिलं जातं, त्याच व्यक्तीशी व्यावसायिक बोलणी करायला जात आहे हे समजल्यावर कंचनदेवींच्या पायाखालची जमीनच सरकली आणि यापुढं त्यांनी सत्य लपवून न ठेवता सारं काही अविनाशला सांगून टाकण्याचं ठरवलं.

आपल्या ममाकडून सत्य समजल्यावर अविनाश मनातून उद्‌ध्वस्त झाला. शिक्षण व सुसंस्कारानं मनात दाबून ठेवलेला क्रोध उफाळून बाहेर आला. पित्याच्या आकस्मात निधनानंतरचा तो उदासवाणा काळ त्याला आठवला आणि तो पुन्हा दुःखी झाला. त्याला एकाकी वाटू लागलं आणि अशा मनःस्थितीत त्यानं ‘शोले’ सिनेमा पुन्हा पाहिला आणि त्यानंतर ‘बदला’, ‘बदले की आग’ अशांसारखे सूडकथा असणारे सिनेमे त्यानं पुनःपुन्हा पाहिल्यावर त्याच्या मनाचा निश्चय पक्का झाला. त्यानं थंड डोक्यानं विचार करून नंतर ज्या गुन्हेगारांच्या टोळीनं ही हत्या घडवून आणली होती, त्या टोळीच्या एकदम विरोधात असलेल्या प्रतिस्पर्धी व कट्टर वैरी टोळीच्या म्होरक्याला एका कुप्रसिद्ध गुंडाला फोन लावला. एक पुत्र म्हणून वडिलांच्या हत्येचा बदला घेण्याचं कर्तव्य निभवण्याच्या हेतूनं, ‘खून का बदला खून’ म्हणून त्यानं त्या खुन्यांवर प्रतिहल्ला करून त्यांना ठार मारण्यासाठी आवश्यक ती मदत करून आपल्यावर उपकार करण्याची विनंती केली. परंतु जगात कोणी सहसा परतफेडीच्या अपेक्षा-अटीविना कोणावर कधीच उपकार करत नाही. सर्व आवश्यक त्या माहितीच्या बदल्यात पैसे व सक्रिय मदत करण्याची अट मंजूर करण्याविना अविनाशकडे कुठलाही पर्याय नव्हता. ‘आपण चुकीचा निर्णय घेऊन आत्मविनाशाच्या दिशेनं चाललो आहोत’ याची पूर्ण कल्पना येऊनही त्यानं त्या टोळीशी हातमिळवणी करण्याचा ‘त्यांच्यातलाच एक’ बनून जाण्याचा निर्णय अगदी कळून-सवरून, जाणून-बुजून घेतला आणि तो घर सोडण्याची तयारी करू लागला. घरातल्या सगळ्यांशी संपर्क तोडून त्यानं एका अज्ञातस्थळी राहण्याची व्यवस्था केली, पण निघण्यापूर्वी पित्याच्या मृत्यूचा बदला घेण्याची प्रतिज्ञा, कंकरबाग इथल्या निवासस्थानातल्या ज्या ठिकाणी पितृहत्या घडली होती, त्या ठिकाणच्या जमिनीवर हात ठेवून घेतली व स्वतःसोबत तिथली मूठभर माती उचलून घेण्यासही तो विसरला नाही.

मिळालेल्या माहितीच्या आधारे अविनाशनं वडिलांच्या साऱ्या हितशत्रूंची, खुनाच्या कटात प्रत्यक्ष सहभागी असणाऱ्यांची, ही कपटी योजना आखणाऱ्यांची व अमलात आणणाऱ्यांची, आर्थिक मदत आणि आदेश देणाऱ्या अनामिक सूत्रधारांची नावानिशी यादी बनवली. प्रत्येकाच्या येण्या-जाण्याच्या वेळा, व्यसनं, सवयी, त्यांची ‘प्रेमपात्रं’, वेळ घालवण्याची ठिकाणं आदीचीही सारी माहिती त्या शत्रूंच्या नाव व पत्त्यासोबत त्यानं व्यवस्थित नोंदवून ‘सेव्ह’ करून ठेवली. साऱ्यांना यमसदनी धाडण्यासाठी अमलात येणाऱ्या योजना तसंच मूळ योजना जर अयशस्वी झाली, तर पर्यायी दोन-तीन उपयोजना व इतर पर्याय यांची तपशीलवार माहितीही त्यानं व्यवस्थित नोंदवून ठेवली. अविनाश हा नवीन पिढीतला ‘नेट सॅव्ही’, ‘कॉम्प्युटर सॅव्ही’ प्रशिक्षित गुन्हेगार असल्यानं आपल्या योजनांची पूर्ती करण्यासाठी, शत्रूंच्या ठावठिकाणाची, वर्तमान परिस्थितीची माहिती अचूकपणे प्राप्त करण्यासाठी इंटरनेटचा वापर करून गुगलचं साहाय्य तो घेत होता. म्हणूनच ‘उगाच माझी चौकशी करत फिरू नका, माझं नाव ‘गुगल’ करा… नेटचा वापर करायला शिका’ अशी तंबीही त्यानं पोलिस उपनिरीक्षकाला फोनवर दिली होती.

अविनाशच्या या ‘हिटलिस्ट’वर सर्वांत प्रथम नाव लिहिलेलं होतं, ते ‘मोईन’ ऊर्फ ‘पप्पू’ खान याचं. त्यानंच सर्वांत पहिल्यांदा अविनाशच्या पित्यावर ‘लल्लनजी’वर गोळी झाडण्याचं धाडस केलं होतं. आपण अविनाशच्या ‘हिट लिस्ट’वर आहे समजल्यावर प्राणभयानं सतत पत्ते, नावं बदलणाऱ्या मोईन खान याला २००३ मध्ये ‘आलमगंज’ इथं एकटं गाठून अविनाशनं त्याच्यावर प्रथम छातीत, मग पोटात गोळी झाडून नंतर गोळ्यांचा वर्षावच केला. एकापाठोपाठ एक अशा एकूण ३२ गोळ्या झाडून त्यानं पप्पू खानच्या देहाची चाळणीच बनवली. (मोईन ऊर्फ पप्पूचे प्राण निघून गेले तरी जवळजवळ तासभर तो त्याच्या देहावर बेभानपणे गोळ्या झाडत होता आणि साथीदारानं हलवून जबरदस्ती वाहनात कोंबल्यावर मगच त्याला शुद्ध आली.’ अविनाशनं केलेल्या या पहिल्या खुनाबद्दल कोर्टात साक्ष देताना एका प्रत्यक्षदर्शी साक्षीदारानं असे उद्‌गार काढले आहेत.)

मोईन खानच्या खुनानंतर एकापाठोपाठ एक असं सत्रच चालू झालं. बंदुका, बंदुकीच्या-पिस्तुलाच्या गोळ्या, नवनवीन बनावटीची अद्ययावत रिव्हॉल्व्हर्स या सर्वांसाठी प्रचंड प्रमाणात पैशाची आवश्यकता होती आणि कोणाचंही आर्थिक पाठबळ नसल्यानं मग अविनाशनं धमकावणं, खंडणी मागणं व लूटमार हा मार्ग स्वीकारला. प्रसिद्ध व्यापारी, ज्वेलर्स यांनी खंडणी न दिल्यास त्यांच्या घर-दुकानावर दरोडे पडू लागले आणि त्यातून मिळणारी रक्कम अपुरी पडल्यावर अविनाशनं आपल्या साथीदारांसह बँकांवर दरोडे घालण्याचं ठरवलं. (शांततेचं प्रतीक असलेला रंग म्हणून निळा रंग हा अविनाशचा अत्यंत आवडता रंग होता व ज्योतिषशास्त्रानुसार हा रंग त्याला शुभ आहे हे कळल्यावर तर तो निळी जीनची पँट व गडद निळा टी शर्ट घालूनच पहिल्या कामगिरीवर गेला होता. ती मोहीम (?) पूर्णपणे यशस्वी झाल्यावर मग तेच कपडे ‘लकी’ ठरत असल्याच्या समजुतीतून तो प्रत्येक वेळी तेच ते कपडे घालत असे.) स्वतःपाशी आवश्यक तितकी रक्कम जमा झाल्यावर अविनाशनं पुन्हा सूड घ्यायला सुरवात केली.

अविनाशनं वडिलांच्या मृत्यूचं कर्ज सव्याज फेडण्यासाठी वडिलांच्या खुनाचा कट रचणाऱ्या चनारिक गोपसह, त्याच्या इतर अजय, विजय, दीना, लालू, अजित या बंधूंना व मदतनीस इम्तियाज याला निष्ठुरपणे आपल्या पिस्तुलानं अचूक टिपून ठार मारलं. या सर्व आरोपींना आपल्या अक्कलहुशारीनं वकिली ज्ञानानं कोर्टात निर्दोष सिद्ध करणाऱ्या वकील सरदारी सिंह या वकिलालाही त्यानं मुळीच क्षमा केली नाही. त्याच्या मते अशा निर्ढावलेल्या आरोपींचं वकीलपत्र घेणं हाच मुळी एक सामाजिक गुन्हा होता. त्याच्या ‘हिट लिस्ट’मधले एक-दोन जण वगळता २०१६ पर्यंत एकूण १८ जण मारले गेले होते.

वडिलांच्या खुनाच्या कटात सहभागी असणाऱ्या व्यक्तींच्या व्यतिरिक्त अविनाशनं आपला मित्र ‘मिठू खान’ याच्या छोट्या बहिणीची छेडछाड करणाऱ्या व जाता-येता तरुण मुलींना सतावणाऱ्या राहूल यादव नामक सभ्यतेचा मुखवटा पांघररून वावरणाऱ्या मनुष्यरूपातल्या कामांध लांडग्याचीही पोस्टल पार्क इथं गोळी झाडून हत्या केली. त्याच्या मते ही हत्या करणं सामाजिक हिताच्या दृष्टीनं आवश्यक होतं. याशिवाय एका ज्वेलर्स शॉपवर दरोडा घालताना त्याच्या हातून मनोज सोनार नावाचा इसम चुकून गोळी लागून ठार झाला. (अविनाशनं पोलिसांच्या समोर गोळी झाडून केलेल्या वीस हत्यांचा कबुलीजबाब लेखी दिलेला असला तरी हा आकडा नक्की किती आहे याचा अंदाज कोणीही लावू शकलेलं नाही. तसंच त्यानं किती दरोडे घातले व कोणा-कोणाकडून जबरदस्तीनं खंडणी गोळा केली याची तपशीलवार व खात्रीलायक माहितीही उपलब्ध नाही.)

अविनाश हा पोलिसांच्या दृष्टीनं एक महत्त्वाचा, ‘मोस्ट वाँटेड’ अपराधी ठरलेला असल्यानं बिहारसह आजूबाजूच्या राज्यांतही पोलिसांचा तपास सुरू होता. पोलिसांनी सर्वत्र अविनाशची फोटोसकट माहितीही प्रसारित केली होती. परंतु स्वतःचं खास असं ‘नेटवर्क’ कार्यान्वित असलेल्या, वेश पालटून निसटण्यात हुशार असलेल्या या सॉफ्टवेअर इंजिनीअरला पकडण्यात पोलिसांना अपयशच येत होतं. कधी फिरता सेल्समन, तर कधी स्पेअरपार्टचा व्यापारी, कधी खासगी कंपनीचा ट्रेनी वा इन्टर्न तर कधी गावंढळ शेतमजूर अशी विविध वेषांतरं करून पोलिसांना चकवा देऊन तो अलगद सटकल्याचंही ऐकिवात आलं आहे. सरतेशेवटी हताश झालेल्या पोलिसांनी खास प्रशिक्षित अधिकाऱ्यांच्या मदतीनं हे अवघड प्रकरण-समीकरण सोडवायला घेतलं व एस.टी.एफ.च्या खास प्रशिक्षित असलेल्या तुकडीला बोलावण्यात आलं. आता अविनाशच्या घरावर खास प्रशिक्षित कर्मचाऱ्यांद्वारे सतत नजर आणि त्याच्या साऱ्या नातेवाईक मित्रांवर नित्याची पाळत ठेवण्यात आली. अत्यंत कार्यक्षम, माहिती काढण्यात कुशल व तत्पर अशा खबऱ्यांचं एक जाळं बनवून ते लागलीच कार्यान्वित करण्यात आलं.

२०१३ मध्ये अविनाशला पकडून तुरुंगात डांबण्यात पोलिसांना यश मिळालं, परंतु त्यांचा हा विजयाचा आनंद अल्पकाळच टिकला. अविनाश जामीन मिळून पुन्हा बाहेर आला आणि त्यानं गायधार इथल्या सोनाराच्या घरावर दरोडा घालून दोन-तीन किलो शुद्ध सोन्याची लूट केली.

एके दिवशी वैशाली जिल्ह्यातल्या महुआ पोलिस स्टेशनला, ‘हरपूर हरदास’ या गावात एक शिवभक्त कावडीयांचा एक जथ्था पाहुणा म्हणून आल्याची खबर मिळाली. श्री शंकरावर जलाभिषेक करण्याच्या हेतूनं आलेल्या या भक्तगणांचं वागणं-बोलणं स्थानिकांना संशयास्पद वाटलं असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कार्यप्रणालीला आरंभ केला.

हरपूर हरदासच्या जवळच ‘बिदपूर’ इथल्या ‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’च्या बाहेरच्या दरवाजाचं कुलूप तोडून बँकेत घुसलेल्या व शटर उघडून, काचा फोडून लॉकर रूममध्ये पोचलेल्या या शिवभक्तांनी आपल्यासोबत लपवून आणलेल्या ड्रील मशिननं एकामागून एक असे लॉकर तोडायला सुरवात करताच ‘देर से आये पर दुरुस्त आये’ या उक्तीनुसार जराशा उशिरानं का होईना पण वेळेला मुकण्यापूर्वी अचानक हजर झालेल्या पोलिसांच्या तुकडीनं या गुन्हेगारांना आपल्या ताब्यात घेतलं. पाठोपाठच एका आलिशान स्कॉर्पिओमधून आलेल्या त्या चोरांच्या तीन प्रमुखांना पकडण्याचा प्रयत्न पोलिसांनी करताच, अंधाराचा फायदा घेऊन दोघंजण निसटून गेले व ड्रायव्हरव्यतिरिक्त एका टोळीप्रमुखाला पकडण्यात स्थानिक पोलिस यशस्वी झाले.

साऱ्या गुन्हेगारांची वरात काढून त्यांना महुआ पोलिस स्टेशनवर आणल्यानंतर, पकडलेला म्होरक्या हा दुसरा-तिसरा कोणी नसून प्रत्यक्ष ‘अविनाश श्रीवास्तव’ आहे हे उमजल्यावर पोलिसांच्या आनंदाला पारावरच राहिला नाही. भराभर फोन करत खास बंदोबस्ताची व्यवस्था करून अविनाशला शहरातल्या पोलिस मुख्यालयात नेण्यात आलं व तिथून त्याची रवानगी सेंट्रल जेलमध्ये करण्यात आली. या सर्व घडामोडींची गोपनीय बातमी जेव्हा प्रसिद्धिमाध्यमांना समजली तेव्हा पत्रकारांची मोहोळ उठल्याप्रमाणे गर्दी झाली. देशी-विदेशी पत्रकार मिळेल त्या वाहनानं हजर होऊन ‘मोस्ट वाँटेड सायको किलर’ अविनाशच्या मुलाखतीसाठी आग्रह धरू लागल्यावर एक मोठी पत्रकार परिषदच घेण्यात आली.

पत्रकार परिषदेत अविनाशनं कोणाही पत्रकाराला निराश केलं नाही. त्यानं अस्खलित इंग्रजीत, ओघवत्या शैलीत मोकळेपणानं आपल्या गुन्हेगारी आयुष्याची माहिती दिल्यावर ख्यातनाम वाहिन्यांचे पत्रकार, विदेशी पत्रकार चकित झाले.

”वडिलांच्या मृत्यूचा व्यवस्थित तपास केला जाऊन, पुराव्यांनिशी कोर्टात गुन्हा सिद्ध होऊन जर त्या कटात सामील असलेल्या गुन्हेगारांना सजा सुनावली गेली असती, माझ्या वडिलांना अशा रीतीनं मृत्यूनंतर न्याय मिळाला असता तर माझ्यासारख्या सुशिक्षित व होतकरू तरुणावर असा गुन्हेगारीचा पेशा स्वीकारण्याची वेळ आली नसती” असं विधान त्यानं सर्वांसमक्ष केलं. गोळी झाडून इतक्या जणांची हत्या केल्याबद्दल त्याच्या मनात पश्चात्ताप वा दुःख अजिबातच नसल्याचं सर्वांनाच सुस्पष्टपणे दिसून येत होतं.

अविनाशच्या पाठोपाठ त्याची आई कंचनदेवी यांनाही अविनाशला ‘सुपारी किलिंग’मध्ये मदत करण्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली. कंचनदेवी या घासाघीस करून, ठार मारण्याबद्दलची रक्कम ठरवून ‘डील फायनल’ करत होत्या आणि त्यांच्याद्वारे बातचीत पक्की झाल्यावर मगच अविनाशकडून हत्या केल्या जात होत्या असं पोलिसांचं म्हणणं होतं, परंतु अविनाशनं व त्याच्या आईनं हा आरोप फेटाळून लावला. ”माझ्या आईचा मी केलेल्या गुन्ह्यांशी काडीमात्र संबंध नाही. गुन्हेगारीच्या विश्वात पदार्पण करण्यापूर्वीच मी घरच्यांबरोबर असलेले सारे संबंध तोडून टाकले होते. माझ्या आईला हकनाकच या सर्व प्रकरणात गोवलं जात आहे,” असं विधानही त्यानं वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींसमोर केलं असल्याचं म्हटलं जातं.

वेळोवेळी अटक होऊन तुरुंगात गेल्यावर लगेच जामिनाद्वारे स्वतःची सोडवणूक करून पुन्हा बाहेर येण्यात यशस्वी ठरणाऱ्या अविनाशला याही वेळेला आपण केस जिंकून, यशस्वी ठरून, मुक्त होऊ असा वेडा आत्मविश्वास वाटत आहे. ”माझ्या हिट लिस्टमधली काही मंडळी अजून बाकी आहेत. जिवंत आहेत… ठीक आहेत… पण मी बाहेर येताच त्यांना योग्य ते शासन करण्याचं काम सर्वांत पहिल्यांदा आटोपणार आहे.” त्यानं नुकत्याच काढलेल्या या उद्‌गारांना प्रसिद्धी मिळाल्यानं बरीच खळबळ उडून बिहारमधलं समाजजीवन ढवळलं गेलं होतं.

एका सुशिक्षित तरुणाच्या जीवनाची शोकांतिका मनाला टोचणी लावते, हे नक्की.

कल्पिता राजोपाध्ये

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.