Now Reading
सहवास

सहवास

Menaka Prakashan

फोनवरून बायका व मुलांची खुशाली पण कळतच होती, पण ते मात्र कंटाळले होते. बाबांची अनुपस्थिती मुलांना व नवर्‍याची अनुपस्थिती बायकोला सातत्यानं जाणवत होती. पण या कठीण प्रसंगी सगळे घराच्या आत सुरक्षित आहेत हीच सर्वांत मोठी गोष्ट होती. सुलेखाच्या आनंदाला तर पारावारच नव्हता. आपण आजारी पडलो होतो हेच तिला विसरायला झालं होतं. दिवसेंदिवस तिची प्रकृती सुधारतच होती. शारीरिक औषधांपेक्षा मानसिक औषध जास्त लागू पडलं होतं.

सुलेखा शांतपणे पलंगावर डोळे मिटून झोपली होती. संथ लयीत तिचा श्‍वास सुरू होता. अचानक तिच्या छातीत दुखायला लागल्यामुळे प्रमोद खूप घाबरला होता. घामानं डबडबलेला सुलेखाचा चेहरा पाहून त्याच्या पोटात गोळा आला होता. पण शेजार्‍यांच्या मदतीनं त्यानं तिला डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी ‘माईल्ड अ‍ॅटॅक ’आलाय असं निदान केलं. ट्रीटमेंट लगेच मिळाल्यामुळे सुलेखाला दोन दिवसांतच आराम मिळाला आणि शेजारी राहणार्‍या वसंताच्या मदतीनं आज प्रमोदनं सुलेखाला घरी आणलं. वसंता त्याचा बालमित्र होता. दोघांची शेजारी शेजारीच घरं होती. बालपण, तरुणपण, प्रौढत्व आणि आता हे उतारवय सगळं त्यांनी एकमेकांच्या साक्षीनं घालवलं होतं.

पण फरक इतकाच होता की, वसंताचा मुलगा-सून-नातवंडं सगळे त्याच घरात होते. एकत्र कुटुंब. पण सुलेखा व प्रमोदची दोन्ही मुलं- सुशांत व प्रशांत- मात्र चेन्नई आणि बंगलोरला त्यांच्या कुटुंबियांसह होती आणि ही दोघं इथे नागपुरात!
रक्ताचं नातं नसलं तरी वसंत व प्रमोद एकमेकांचे जिवलग होते आणि लग्नानंतर त्यांच्या पत्नीही एकमेकींच्या घट्ट मैत्रिणी झाल्या होत्या. दोघांच्या मुलांची शिक्षणं इथंच झाली असली तरी वसंताचा मुलगा इथंच राहिला, पण प्रमोदची दोन्ही मुलं नोकरीनिमित्त बाहेरगावी गेली. उतारवयात सुलेखा व प्रमोद एकटे पडले. पण याची जाणीव वसंत व त्याच्या बायकोनं- वनितानं- त्यांना कधी जाणवू दिली नाही.

सुशांत व प्रशांत खरं तर जुळी भावंडं. पण लहानपणापासूनच दोघांचे स्वभाव वेगळे होते. एकाला लागलं की दुसर्‍याला दुखावं इतकं प्रेमही होतं… कॉलेजपर्यंत एकत्र राहिलेले दोघं नोकरीसाठी वेगळ्या शहरात गेले आणि आपोआपच नात्यात दुरावा जाणवायला लागला. दोघांचं विश्‍वच बदललं. पण सुट्टी घेऊन मुद्दाम एकत्रच नागपूरला यायचे आणि परत एकदा लहान व्हायचे. नोकरीचं बस्तान बसल्यावर दोघांनी आपापल्या मर्जीनं लग्न केलं. संसार सुरू झाला. त्यांच्या पत्नीही नोकरी करणार्‍या होत्या त्यामुळे दोघा भावंडांचं नागपूरला एकत्र येणं फारसं जमायचं नाही. संसार म्हटला की तडजोडी आल्याच. सुलेखा आणि प्रमोदनं कधी तक्रार केली नाही, जेव्हा ते आले तेव्हा त्यांचं हसतमुखानं स्वागत केलं. सुनांचं कौतुक केलं.

‘‘पाणी देता का? तहान लागलीय…’’ सुलेखाच्या आवाजानं भूतकाळात गेलेला प्रमोद भानावर आला.
‘‘हो… देतो… उठतेस का?’’ तिच्या मानेखाली हात घालून प्रमोदनं तिला उठवून बसवलं. हातात पाण्याचा पेला देत म्हणाला, ‘‘तू मला घाबरवून टाकलंस. बरं वाटतंय ना आता? थोडक्यात निभावलं सुलेखा! वसंतानं खूप मदत केली बघ.’’ बोलताना प्रमोदचा स्वर हळवा झाला.
‘‘आता बरी आहे. आराम केला की बरं वाटेल.’’ एवढं वाक्य बोलतानाही तिला थकवा आला.
‘‘झोप झोप… तुला आरामाची गरज आहे.’’ तिला परत झोपवून प्रमोदनं तिच्या अंगावर पांघरूण घातलं.
वसंत आणि वनिता दोघंही अस्वस्थ वाटत होते. ‘‘काळजी वाटते मला दोघांची… तुम्ही मुलांना फोन का नाही करत?’’ वनितानं मनातली शंका बोलून दाखवली.
‘‘तोच विचार चाललाय. प्रमोदला सांगितलं तर तो नाहीच म्हणेल, पण मी या वेळी फोन करणारच. बरेच दिवस झाले दोघंही आलेच नाहीयेत. बोलत नाहीत गं प्रमोद आणि वहिनी… पण अस्वस्थ वाटतात. मुलांना भेटावंसं वाटतच असेल ना?’’
‘‘मग विचार कसला करताय? सांगा त्यांना, येऊन भेटून जा म्हणावं. आई आजारी आहे…’’ वनिताची आज्ञा मनावर घेऊन वसंतनं लगेच फोन लावला.
‘‘हॅलो सुशांत, वसंतकाका बोलतोय.’’
‘‘बोल बोल… कसा आहेस?’’ पलीकडून सुशांतचा आवाज आला.
‘‘मी बरा आहे रे, पण सुलेखावहिनींची तब्येत जरा बिघडली होती.’’ वसंतनं घडलेली सगळी हकिगत सुशांतला सांगितली आणि शेवटी म्हणाला,
‘‘बघ बाबा… जमलं तर दोघा भावांनी एकदा येऊन भेटून जा. मला प्रमोदनं अजिबात सांगितलं नाहीये. मी माझ्या मनानंच फोन केलाय. आता तुझी आई तशी ठीक आहे.’’ वसंत मनातलं बोलून मोकळा झाला आणि त्याला हायसं वाटलं.
सुशातनं ताबडतोब बाबांना फोन लावला. प्रमोदनं फोन उचलताच त्यानं विचारलं, ‘‘बाबा… आई कशी आहे? बरी आहे ना?’’
‘‘हो, बरी आहे आता. ‘माईल्ड अ‍ॅटॅक’ आला होता. अगदी अचानक, पण वेळेवर उपचार झाले म्हणून दोन दिवसांत बरी झालीये. पण तुमच्या दोघांची आठवण काढते आहे.’’ शेवटचं वाक्य बोलताना बाबांचा स्वर हळवा झाल्याचा सुशांतला भास झाला.
‘‘बोलता येईल का आईला?’’ सुशांतनं विचारलं.
‘‘अरे, आताच जरा डोळा लागलाय. ती उठली की मी करतो फोन.’’
‘‘बरं बाबा… प्रशांतला कळवतो. जमलं तर येऊन जाऊ…’’ सुशांतनं फोन ठेवला. सुशांत व प्रशांत येतील असं सांगताच, सुलेखाचा अर्धा आजार तसाच पळाला. मुलं भेटणार, या विचारानंच तिला नवा हुरूप आला. दर्शवलं नाही तरी प्रमोदला आनंद झालाच होता. कधी येणार, हे ठरलेलं नसल्यामुळे आता वाट बघण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय नव्हता.

सुशांतचं प्रशांतशी बोलणं झालं. दोन दिवस सुट्टी काढून जाण्याचं ठरलं. सुशांतची बायको तनुजा व प्रशांतची बायको देविका. दोघीही नोकरी करायच्या. पण त्यांना सुट्टी मिळणार नव्हती. त्यामुळे दोघा भावांनीच जायचं असं ठरलं. त्यांना आई-बाबांना छान ‘सरप्राईज’ द्यायचं होतं. अचानक आल्यावर त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहायचा होता.
तसं दोघा भावांमध्ये भांडण, गैरसमज वगैरे अजिबात नव्हते. पण शिक्षण-नोकरी-संसार यामुळे ते एकमेकांपासून जरा दुरावले होते. वरचेवर भेटी कधी व्हायच्याच नाहीत. दोघं बरेच दिवसांनी भेटणार होते. नागपूरला एकाच वेळेला पोचणार्‍या फ्लाईटचं बुकिंग झालं आणि ठरल्याप्रमाणे; फोनवर बाबांशी बोलणं झाल्याच्या तिसर्‍या दिवशी दोघं नागपूरला हजर झाले. दोघं एकटेच असे, लग्नानंतर पहिल्यांदाच घरी येत होते. बायको-मुलं बरोबर असायचीच. त्यामुळे दोघांनाही आज अगदी मोकळं वाटत होतं. गळाभेट झाली आणि दोघंही रिक्षाने घरी जायला निघाले.

‘‘कसा आहेस प्रशांत? देविका-मुलं ठीक ना?’’ सुशांतनं विचारलं.
‘‘हो हो. सगळे मजेत. वहिनी आणि आर्या कशा आहेत?’’ प्रशांतनं विचारलं.
‘‘छान चाललंय. पण आयुष्यच खूप धावपळीचं झालं आहे रे. नागपूरला यायचं ठरवतो पण जमतच नाही.’’ सुशातनं नागपूरला येणं जमतच नाही याचा प्रांजळपणे कबुलीजबाब दिला.
‘‘सेम हिअर… पण ठीक आहे. आता दोन दिवस आई-बाबांबरोबरच आहोत ना. त्यांनाही बरं वाटेल.’’ मग घर येईपर्यंत भरपूर गप्पा झाल्या.
‘‘थांबवा इथेच. आलं घर…’’ प्रशांतनं रिक्षा थांबवली. आपापली बॅग घेऊन दोघं उतरले.
नागपूरचा हा वाडा चाळीस वर्षांपूर्वीचा होता. त्यांचा जन्म इथंच झाला होता. आई-बाबांनी मोठ्या कष्टानं उभं केलेलं हे घर म्हणजे त्यांचं स्वप्न होतं. वाडा अजूनही त्याच रुबाबात उभा होता. सुशांतनं दारावरची बेल वाजवली.
प्रमोदनं दार उघडलं. दारात दोन्ही मुलगे उभे होते.
‘‘कोण आलं हो एवढ्या रात्री?’’ आतून आईचा आवाज आला तसं दोघांनी बाबांना डोळ्यांनीच खुणावलं आणि न बोलण्याचा इशारा केला. सुलेखा बघत बसली होती. दोघंही एकदम तिच्यासमोर गेले. सुलेखाचा तिच्या डोळ्यांवर विश्‍वासच बसेना. प्रमोद पण अवाक् झाला होता. दोघा मुलांनी आई-बाबांच्या चेहर्‍यावरचा आनंद मनात टिपून ठेवला.
‘‘अरे, आलात? काही कळवलं पण नाही?’’ आश्‍चर्यानं सुलेखानं विचारलं.
‘‘सांगितलं असतं तर हा आश्‍चर्यचकित आनंद बघता आला असता का?’’ तिच्याजवळ सोफ्यावर बसत सुशांत म्हणाला.
‘‘अरे, पण काही तयारी करून ठेवली असती ना? स्वयंपाक पण व्हायचाय अजून. दोघंच असतो त्यामुळे विशेष काही करत नाही रात्री…’’ प्रमोद बोलला.
‘‘बाबा, आम्ही काय पाहुणे आहोत का? आई पहिलं सांग, तुझी तब्येत कशी आहे?’’ प्रशांत.
‘‘तुम्ही येणार आहात हे कळल्यावर ठणठणीत झाली ती…’’ हसत हसत प्रमोद म्हणाला.
‘‘हो ना… मग आम्ही फ्रेश होईपर्यंत मस्तपैकी नागपुरी खिचडी कर… आमच्या लहानपणी करायचीस ना, अगदी तशीच. काय प्रशांत, चालेल ना?’’ सुशांतनं विचारलं.

‘‘चालेल काय विचारतोस? दौडेल… चल चल, आई ऊठ. टीव्ही नंतर बघ…’’ प्रशातनं जवळजवळ आईला हाताला धरून उठवलंच. दोघंही आपापल्या खोलीत गेले फ्रेश व्हायला आणि सुलेखा नव्या जोमानं स्वयंपाकघरात.. आणि तिला मदत करायला मागोमाग प्रमोद पण गेला.
अर्ध्या तासानं चौघंही डायनिंग टेबलाशी बसले होते. गरमागरम मुगाच्या डाळीची खिचडी खायला, सोबत पोह्याचे पापड आणि थंडगार ताक… गप्पांना तर नुसता ऊत आला होता. सुना-नातवंडं न आल्यामुळे थोडे नाराज झाले दोघं. पण त्यांना कारण सांगितल्यावर पटलं. आज कितीतरी दिवसांनी… दिवसांनी काय, कितीतरी वर्षांनी ती चौघंच अशी एकमेकांना भेटत होती. सुशांत व प्रशांतच्या लग्नानंतर ते एकटे कधी आलेच नाहीत. सुना आणि नंतर नातवंंडं असायचीच. बारापर्यंत गप्पा रंगल्या.

पुढच्या दोन दिवसांत कितीतरी जुन्या गोष्टींची, आठवणींची पारायणं झाली. शेजारपाजारचे, मित्र, नातेवाईक सगळ्यांवर बोलणं झालं. दोन दिवसांत फार दगदग न करता, प्रमोद आणि मुलांची मदत घेऊन सुलेखानं सगळे आवडते पदार्थ करून त्यांना वाढले. तिचा आजार कुठल्या कुठे पळून गेला होता.
या दोन दिवसांच्या सुखाच्या शिदोरीवर मुलं आता परत लांब जाणार होती. पण दैवाला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. अचानक कोरोनाचं संकट समोर उभं ठाकलं. दोघांच्याही फ्लाईट्स रद्द झाल्या. कोरोनानं आपलं अक्राळविक्राळ रूप दाखवत होता. त्यांच्या जायच्या आदल्या दिवशी कर्फ्यू जाहीर झाला. अचानक झालेल्या या वारानं दोघंही गडबडले. त्यांचं कुटुंब लांब होतं, पण काही पर्यायच नव्हता. कायदा थोडाफार शिथिल होईपर्यंत कुणीच काही करू शकत नव्हतं. भराभर फोन झाले. ‘थोडं फार नॉर्मल होऊ दे. हा एकवीस दिवसांचा लॉकडाऊन संपला, की यायची सोय होईल. तोपर्यंत तिथंच राहा. आमची काळजी करू नका. घरातूनच काम करणार आहोत. त्यामुळे मुलांबरोबर घरीच आहोत.’ असं सांगून सुनांनीही सगळ्यांना आश्‍वस्त केलं.

आता पुढचे एकवीस दिवस सुलेखा-प्रमोद आणि सुशांत-प्रशांत असे चौघं एकत्र राहणार होते. अगदी आधी राहायचे तसे. एकीकडे मुलं आणि बायकोपासून या कठीण वेळेला आपण लांब आहोत याचं दुःख होतं, तर दुसरीकडे एवढे दिवस भाऊ आणि आई-बाबांबरोबर रहायचं म्हणून दोघा भावंडांना चांगलंही वाटत होतं. दोन्ही मुलगे जवळ असल्यामुळे सुलेखा व प्रमोदला मात्र मनापासून आनंदच झाला.
‘‘आई, आपल्या जवळची दुकानं दहा ते बाराच उघडी आहेत. आजच सगळा किराणा आणि भाजी आणतो. लिस्ट बनव. पुढचा महिनाभर पुरेल इतकं सामान लिही.’’
सुशांतचं ऐकून सुलेखानं भलीमोठी यादी बनवली. आता इथून पुढचे एकवीस दिवस त्या चौघांचेच होते. अगदी सुशांत व प्रशांतच्या लग्नाआधी ते राहायचे तसे.
दुसर्‍या दिवसापासून एक नवीनच रुटीन सुरू झालं. सगळे अगदी आरामात उठले. कारण कुणालाच बाहेर जायची घाई नव्हती. शिवाय रात्री उशिरापर्यंत जुन्या आठवणींना उजाळा मिळाला होता. कितीतरी वर्षांत अशा गप्पा झाल्या नव्हत्या. आज प्रमोदनं सगळ्यांसाठी मस्त आलं घालून चहा केला. मग चवी-चवीनं चहा पिणं झालं. त्यानंतर दोघा लेकांनी आईनं केलेल्या मस्त भाजणीच्या थालीपीठावर ताव मारला. आईच्या हातचं गरमागरम थालीपीठ आणि त्यावर लोण्याचा गोळा. व्वा व्वा! मग सावकाश अंघोळी झाल्या.
मुलांच्या मदतीनं मग तिनं स्वयंपाक उरकला. लहान असताना मुलं तिला अशीच स्वयंपाकात मदत करायची. त्याचीच तिला आठवण झाली नि, चेहर्‍यावर नकळत हसू उमटलं.

‘‘सुलेखाबाई, आज कॅरम खेळायचा की नाही?’’ प्रमोदनं विचारलं.
‘‘म्हणजे तुम्ही रोज कॅरम खेळता आई-बाबा? सॉलिडच आहे!’’ प्रशांत आनंदानं ओरडलाच!
‘‘मग? आमचा तो रोजचा टाईमपास आहे. तुम्ही लहान असताना आपण चौघं खेळायचो. दर शनिवारी रात्री. आठवतंय का?’’ प्रमोदनं मुलांना भूतकाळात नेण्याचा प्रयत्न केला.
‘‘म्हणजे काय? चांगलंच आठवतंय बाबा. चला आजपासून परत खेळायला लागू. रोज दुपारी एक तास चालेल ना रे?’’ प्रशातनं भावाला विचारलं.
‘‘येस. व्हाय नॉट? चला खेळूया..’’ सुशांतनं उत्साहात तयारी दाखवली आणि मग खेळ चांगलाच रंगला. आई-बाबा आणि भाऊ-भाऊ असे गट जमले. मग जेवण… झोप… नंतर दोघंही घरी फोन करायला मात्र विसरले नाहीत.
भावा-भावांच्या गप्पांना रोज नवीन विषय मिळत होते. जुन्या मित्रांबद्दल गप्पा, कॉलेज, शाळेचे दिवस, आईचा खाल्लेला मार… सगळं सगळं काल घडल्यासारखं वाटत होतं. असेही दिवस कधी अनुभवायला मिळतील; असं त्यांना स्वप्नात कधी वाटलं नव्हतं. जणू ते लग्नाआधीचेच सुशात व प्रशांत होते.
चार दिवसांनी दोघांच्या कंपनीतून निरोप आला. त्यांना आता ‘वर्क फ्रॉम होम’ करायला सांगितलं होतं. पण तरीही त्यांच्याकडे गप्पा मारायला भरपूर वेळ असणार होताच!
कधीतरी नागपूरच्या घरात राहिलेले जुने टी शर्ट बाहेर पडले. सुलेखानं ते अगदी जपून ठेवले होते. आपापल्या खोलीतल्या कपाटातल्या जुन्या वस्तू म्हणजे ग्रीटिंग्ज, जिंकलेले मेडल्स, जुनी सर्टिफिकेट्स… सगळं कौतुकानं पाहून झालं.

See Also

आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपणं, बाबांशी भांडत भांडत बुद्धिबळ खेळणं, रमीचा डाव… अगदी सापशिडी आणि लुडो खेळणं पण झालं. बालपणीचे सोनेरी दिवस जणू पुन्हा परतून आले होते. कुणाच्याही घरी जाता येत नव्हतं, पण फोनवरून नागपुरातल्या मित्रांशी मनसोक्त गप्पा झाल्या.
फोनवरून बायबो व मुलांची खुशाली पण कळतच होती, पण ते मात्र कंटाळले होते. बाबांची अनुपस्थिती मुलांना व नवर्‍याची अनुपस्थिती बायकोला सातत्यानं जाणवत होती. पण या कठीण प्रसंगी सगळे घराच्या आत सुरक्षित आहेत हीच सर्वांत मोठी गोष्ट होती. सुलेखाच्या आनंदाला तर पारावरच नव्हता. आपण आजारी पडलो होतो; हेच तिला विसरायला झालं होतं. दिवसेंदिवस तिची प्रकृती सुधारतच होती. शारीरिक औषधांपेक्षा मानसिक औषध जास्त लागू पडलं होतं. प्रमोदला सुलेखासारखा आनंद दर्शवता येत नसला तरी त्याच्या प्रत्येक कृतीतून तो दोघा मुलांना जाणवत होता. त्यांना आवडतो तसा आल्याचा चहा करणं, त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर बोलणं, त्यांच्याशी खेळणं, थट्टा-मस्करी करणं यातून त्याचाही आनंद त्यांच्या दोन्ही लेकांना जाणवत होता. हा लॉकडाऊनचा काळ ‘शाप की वरदान’ हे ठरवता येत नव्हतं. बायको-मुलांपासून दूर राहण्याचं दुःख होतं, पण त्याच वेळी आई-बाबांबरोबर इतक्या वर्षांनी एकत्र राहण्याचा आनंदही होता.

लॉकडाऊन संपला नव्हता पण एकवीस दिवसांनी थोडी सूट मिळाल्यामुळे सुशांत व प्रशांतनं गाडी सुरू करून जायचं ठरवलं. ई-पास मिळवायला लागणार होता. शिवाय अंतरही बरंच होतं. पण आता त्यांनाही घरी जायची ओढ लागलीच होती. त्यांनी सगळं व्यवस्थित जमवून आणलं. ड्रायव्हरबरोबर एकच प्रवासी जाऊ शकतो; असा नियम असल्यामुळे आई-बाबांना ते आपल्याबरोबर घेऊन जाऊ शकत नव्हते, पण एवढ्या दिवसांच्या सहवासानंतर त्यांना सोडून जावं लागतंय, याचं मात्र दोघांना वाईट वाटत होतं.

‘‘आई-बाबा… आता एकदा थोडंसं सुरळीत होऊ द्या. मग तुम्हीच या आमच्याबरोबर एकत्र राहायला!’’ सुशांत अगदी मनापासून बोलत होता. यात त्यांनी कुठेही ‘तुमचं घर’ किंवा ‘माझं घर’ हा उल्लेखच केला नाही. तर आपण सगळे काही दिवस तरी एकत्र नक्कीच राहू शकतो हे सुचवलं.
‘‘हो… आई-बाबा… मलाही तसंच वाटतं. जसे आमच्या मुलांसाठी आम्ही आहोत, तसेच तुम्ही आमच्यासाठी आहात. नात्याची गरज तीच असते, पण जगण्याच्या धडपडीत कधीकधी नाती अडगळीत पडल्यासारखी वाटतात. असं अजिबात होता कामा नये. या लॉकडाऊननं हा एक नवीन विचार मनात रुजवला आहे.’’ प्रशांत बोलताना खूपच भावनिक झाला होता.
‘‘काय प्रशांतराव… तुम्ही तर एकदम लेखकासारखेच बोलायला लागलात. बरे आहात ना?’’ थट्टेनं त्याच्या पाठीवर हलकंसं मारत थोडं वातावरण हलकं करण्यासाठी सुशांत बोलला.

‘‘चला तर मग ठरलं! आम्ही अधूनमधून तुमच्या दोघांकडे हक्कानं राहायला येणार. सुना-नातवंडांमध्ये मन रमवणार आणि परत नागपुरात यावंसं वाटेल तेव्हा येणार… आमची पाळंमुळं इथलीच ना… त्यामुळे मन रमतं इथे…’’ प्रमोदही मोकळेपणानं बोलला.
‘‘खरंच आम्ही येऊ रे नक्की आणि सहवासानंच प्रेम, माया वाढेल ना! तुमच्या सगळ्यांबरोबर रहायला आम्हाला खरंच आवडेल.’’ आपल्या दोन्ही लेकांकडे बघत सुलेखा बोलली.
दुसर्‍या दिवशी सकाळी ठरल्याप्रमाणे दोघंही आपापल्या घरच्या प्रवासाला निघाले. प्रवासाचा पल्ला खूप मोठा होता, पण आता त्यांच्याबरोबर आई-बाबांबरोबर घालवलेले सुखाचे क्षण सोबतीला होते. आता पुढची भेट होईपर्यंत तीच त्यांची सुखाची शिदोरी होती.

– वर्षा भावे

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.