Now Reading
समानतेच्या वाटेवरची आशादायी ‘प्रेरणा’

समानतेच्या वाटेवरची आशादायी ‘प्रेरणा’

Menaka Prakashan

‘आवर दादा सावर रं, जिवाला तिच्या जाण रं, वस्तू नाही ती मोल तिचं जाण रं, मानाने जगण्याचा आहे तिला हक्क रं।’ पथनाट्यातल्या या ओळी पुरेशा बोलक्या आहेत. समानता, चळवळ, हक्काचं उल्लंघन हे सगळे शब्द आपल्या परिचयाचे… त्याचे संदर्भ अर्थातच समाजातल्या विविध घटनांशी जोडलेले आहेत आणि मूळ आहे ते संस्कारात दडलेलं. समतेच्या संस्काराची दुसरी बाजू समाजानं समजून घेऊन वागणं ही समाजाची जबाबदारी आहे. समाजात यासाठी गेली तीस वर्षं प्रयत्नशील असणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे, भारती शर्मा!

भारती मॅडम या ‘महाराष्ट्र महिला परिषदे’च्या संस्थापक सदस्य आहेत. ‘प्रेरणा नावीन्यपूर्ण संस्थे’च्या अध्यक्ष आहेत तसंच, संविधान जागृती, असंघटित कामगारांचे प्रश्न, समाजातली समानता या आणि अशा अनेक बाबींवर गेली तीस वर्षं कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याविषयी जाणून घेत, इतरही अनेक मुद्द्यांवर त्यांच्याशी केलेली चर्चा.

ताई, संस्काराची परिभाषा समजून घेत समतेची परिभाषा तुम्ही कशी मांडता?
भारतीताई : स्त्रीला संविधानानं हक्क दिलेला आहे, तिचं कुणीतरी कल्याण, भलं करावं या मानसिकतेमधून आधी समाजानं बाहेर यायला हवं. आपला देश स्वतंत्र झाला तेव्हा महिलांना मतदानाचा हक्क या आपल्या देशानं दिलेला आहे. जो तत्कालीन अनेक पुढारलेल्या म्हणवल्या जाणार्‍या देशात दिलेला नव्हता. आज महिला शिक्षण घेत आहेत, स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून वावरत आहेत. तरीही, आजही अनेक प्रकारच्या चळवळी आजही स्त्रियांना पुरुषी मानसिकतेमधून बाहेर काढण्यासाठी धडपडत आहेत, आजही, एकल महिला संघटना, आदिवासी महिला संघटना, तृतीयपंथी संघटना, दलित महिला संघटना, कामगार महिला संघटना आहेत आणि या प्रत्येक संघटनेकडे येणार्‍या महिलांचे प्रश्न विचार करायला लावतात. स्त्री आणि दलित असणं, स्त्री आणि कामगार असणं, स्त्री आणि आदिवासी असणं असं अनेकविध वास्तवाचं ओझं या संघटनांवर आहे. स्वतः स्त्री असणं, त्याचं आत्मभान येणं आणि समाजात जात, धर्म, आर्थिक वर्ग या पलीकडे वावर याला अनेक पैलू आहेत. मुळात स्त्री अक्षम आहे हे असं मानून आपण तिला भौतिकदृष्ट्या, वैचारिकदृष्ट्या सक्षम करायला लागलो पण मुलग्यांवर- पुरुषांवर हा जो विनाकारण पगडा आहे त्याच्यातून त्यांनाच मुक्त करण्यासाठी संस्कार आवश्यक आहेत. मैत्रीण मुक्त विचारांची असावी आणि पत्नी जबाबदारीनं वागणारी असावी हा विचार म्हणजे मुलग्यांची मानसिक कोंडी करणारा आहे. हा त्यांच्यावर झालेला दुट्टपी संस्कार आहे.
तसंच, आजही मालिकांमधला मुलगा, त्याला पैसे कमवायला, शिक्षणानं, निर्णयानं सक्षम केलेल्या आईला सहजतेनं म्हणतो, ‘आई, तुला कुठे कळतं, पैसे मिळवायला अक्कल लागते,’ तेव्हा गंमत म्हणजे, आजची आई सहजतेनं म्हणते ‘हो खरंय, मला कुठे काय कळतंय,’ तेव्हा जाणवतं महिलाही अजून पुरुषी मानसिकतेतच जगत आहेत. तेव्हा समानतेचा संस्कार आजच्या स्त्रीवर होणं पण तितकंच आवश्यक आहे.

हे सगळं ऐकताना जाणवतं ते म्हणजे खोल विचारातून हे तुमचं व्यक्त होणं आहे. याची नाळ अर्थातच बालपणाशी जोडलेली असणार. त्या काळाविषयी जाणून घ्यायची उत्सुकता आहे.
भारतीताई : (हसत) मी ज्या कुटुंबात वाढले ते गांधी-विनोबा यांच्या प्रभावाखाली असलेलं कुटुंब आहे. माझे आजोबा म्हणजे आईचे वडील दादाभाई नाईक मध्य प्रदेशमधल्या हरद्याचे होते. गांधीजींच्या चळवळीतले होते. कोल्हापुरात त्यांचं शिक्षण झालं, त्यामुळे, त्यांच्या विचारांवर शाहू महाराजांचा प्रभाव होता. माझे वडील डॉ. रविशंकर शर्मा विनोबाजींच्या भूदान चळवळीत होते. डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करण्याऐवजी त्यांनी कुष्ठरोग्यांबरोबर काम करण्याला प्राधान्य दिलं. त्यामुळे लहानपणापासून सामाजिक संस्कार रुजला. अलीकडे आपण जो ‘जेंडर सेन्सटायझेशन’ हा शब्द वापरतो तो संस्कार, माझ्या आईची आई-नानीनं त्या काळी अमलात आणला होता. आनंदीबाई नाईक ही माझी नानी सांगलीची, लग्न करून मध्य प्रदेशात गेली. तिचे मुलीवर संस्कार होते, माझ्या सगळ्या मुली या शिकणारच आणि कुणाचंही लग्न मी जातीत लावून देणार नाही. बंधनातून बाहेर पडायला शिक्षणाशिवाय उत्तम पर्याय नाही. त्यामुळे त्या काळी माझ्या मावश्या डॉक्टर झालेल्या, सगळ्यांची लग्न वेगवेगळ्या प्रांतांत लावून दिलेली. माझी आई महाराष्ट्रीयन आणि वडील उत्तर प्रदेशातले. बरं हा प्रेमविवाह नव्हता. नानीचं म्हणणं होतं मुलगा शिकलेला हवा आणि निर्व्यसनी हवा. यामुळे, लहानपणीच आम्हा भावंडांमध्ये आत्मभान, आत्मसन्मान ह्या भावना कमालीच्या तीव्र रुजल्या.

मग या सगळ्यात बालपणीचे दिवस फार मुक्त विचारांचे असतील?
भारतीताई : हो ना, माझं लहानपण वर्ध्यात गेलं. गांधीवादी चळवळीतले आमचे शिक्षक आणि आमची शाळा, बुनियादी विद्यालय. त्यामुळे पवनारला विनोबाजींकडे संमेलनं असलं की आमची शाळा चार दिवस बंद असायची आणि आम्हाला स्वयंसेवक म्हणून त्यात सहभागी करून घेतलं जायचं. तेव्हा त्याचं महत्त्व कळलं नाही पण आज जाणवतं. बरोबरीनं त्या काळात बाबा आमटे, शिवाजीराव पटवर्धन किती दिग्गज मंडळी आम्ही जवळून बघितली होती. वर्ध्यात त्या सगळ्या निळी-पांढरी किनार असलेल्या खादीच्या पांढर्‍या साड्या नेसलेल्या महिला होत्या. त्यांना दागिन्यांचा सोस नव्हता, त्या सगळ्यांचा राजकीय सामाजिक चर्चांमध्ये सहभाग होता, दुय्यमतेला तिथं वाव नव्हता. त्या वातावरणानं, काळानं माझ्यासह बरोबरीच्या अनेकांची व्यक्तिमत्त्वं घडवली हे नक्की! आम्ही रहायचो त्या ‘कुष्ठधाम दत्तपूर’मध्ये सणवार, लग्न, कौटुंबिक समारोह सगळे एकत्र साजरे व्हायचे. म्हणजे होळी, रंगपंचमीला वडील कुष्ठरोग्यांना रंग लावीत. मग होळी सुरू व्हायची, पोळा असला की तिथले पुरुष रुग्ण, पुरण वाटायला बसलेले मला आठवतात. कारण त्या वेळी तिथं असलेल्या कुष्ठरोग्यांची संख्या एक हजारांहून अधिक होती. महिलांची कामं, पुरुषांची कामं असं काही नव्हतं, सगळेजण सगळी कामं करायचे. असं अतिशय मौल्यवान बालपण मला लाभलं. जाणतेपणी ‘स्त्री’, ‘किर्लोस्कर’ ही विद्याताई बाळ यांची मासिकं मी वाचायचे. त्या वेळी स्त्रीनं रडणं आणि पुरुषानं रडणं यात अकारण समाज किती गहजब करतो हे ठसलं आणि त्यातला खुळचटपणाही जाणवला. आजही जेव्हा अकार्यक्षम राजकीय नेता दिसतो, तेव्हा त्याला बांगड्या पाठवल्या जातात किंवा अगदी सहजतेनं लहान मुलाला म्हटलं जातं, ‘रडतोस काय मुलींसारखा!’ या सगळ्या मानसिकतांना, समानता ही संवादापासून सुरू होते, हेही माहिती नाही.

म्हणजे विद्याताई बाळ यांच्यामुळे तुम्ही स्त्रीवादी चळवळींकडे वळलात, असं म्हणता येईल का?
भारतीताई : काय झालं, विद्याताईंची मुलगी मला पीएच.डी. करताना सिनियर होती. तिनं आम्हाला, सगळ्या जणींना ‘मुलगी झाली हो’ या नाटकाचे पासेस दिले. मग आम्ही छबिलदासमध्ये प्रयोग बघून बाहेर पडलो आणि अंतर्बाह्य ढवळून निघालो होतो. या नाटकानं स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार का, कुंकू, साडी, मंगळसूत्र घातलंच पाहिजे का, तू पोळी लाटली तर मी भाजायची का, असे एक ना अनेक तत्कालीन वादग्रस्त मुद्दे त्या काळात मांडले होते. या नाटकानं समाजाला सकारात्मक दिशा दिली. कामगार वर्ग ते आयएएस अधिकारी सगळ्यांना ते पटायचं. एकप्रकारे तो स्त्रीमुक्तीचा जाहीरनामा मांडलेला होता. ‘युनो’नं १९७५ ते १९८५ हे ‘महिला दशक’ म्हणून घोषित केलं होतं, त्या अंतर्गत पश्चिम महाराष्ट्रात स्त्री मुक्तीच्या यात्रेच्या अंतर्गत या नाटकाचे दौरे आखले होते. आम्ही शंभर जणी दोन बस भरून गेलो होतो. सलग तेरा दिवसांतल्या या दौर्‍यात महाविद्यालयात पोस्टर्स लावणं, परिसंवाद, चर्चासत्रं चालत. रात्री खुल्या मैदानात हजारो प्रेक्षकांसमोर ‘मुलगी झाली हो’ या नाटकाचे प्रयोग होत. निपाणीच्या बिडी कामगार महिला, कोल्हापूरच्या मुलींच्या होस्टेलवर, बारामतीला साखर कारखान्याच्या कौटुंबिक पार्श्वभूमीच्या महिला अशा अनेक स्तरांना या प्रयोगानं वैचारिक दिशा दिली. त्या वेळी एकत्र असलेल्या सगळ्याजणी आम्ही पुढे अनेक चळवळींना जोडल्या गेलो ते आजपर्यंत!

फार वेगळाच प्रवास झाला तुमचा तरीही कामगार संघटना, असंघटित कामगार, संविधान जागृती, माहितीपर पुस्तिकांचं संपादन अशी अनेक कार्यक्षेत्र तुम्ही व्यापलीत, ते कसं घडलं?
भारतीताई : ‘मुलगी झाली हो’ या नाटकाच्या निमित्तानं, धरणग्रस्त, गिरणी कामगार, शेतमजूर यांचे प्रश्न हाताळणार्‍या मंडळींबरोबर माझा संपर्क आला. शेतमजूर असलेल्या रुक्मिणीबाई माने यांना बोलताना ऐकलं.. मनात आलं काय ताकदीनं ही बाई बोलते, कुठून येते ही ताकद? स्त्रीमुक्तीचा प्रश्न व्यवस्थेशी निगडित आहे. व्यवस्था बदलणं, नवीन संस्था तयार करणं, आणि प्रबोधन करणं हे मोलाचं होतं. कौटुंबिक न्यायालयांची स्थापना व्हावी त्यासाठी घरोघरी सह्यांची मोहीम राबवली. असे अनेक उपक्रम आम्ही राबवत गेलो. पुढे मी कामगार संघटनांबरोबर काम करत होते. गिरणी कामगार, इंजिनीअरिंग कामगार, सफाई कामगार या सगळ्यांचे प्रश्न हाताळत होते. त्यात एलएल.बी. पूर्ण केलं.
कामगारांबरोबर काम करताना महिलांच्या मारहाणीचा प्रश्न, घरगुती काम करणार्‍या महिलांच्या पगाराचा प्रश्न, त्यांच्या मुलांना स्कॉलरशिप मिळवून देणं, असे अनेक मुद्दे हाताळले. त्याच वेळी पूर्ण वेळ सामाजिक राजकीय कार्यकर्ता म्हणून काम करू लागले.
या जबाबदारीच्या बरोबरीनं लेकीला सांभाळून लिखाणाची कामं सुरू केली. त्यात अनेक माहितीपर पुस्तिकांचं संपादन केलं. सर्व पक्षांतल्या नगरसेविकांबरोबर महिला धोरण अंमलबजावणी यासंबंधीही काम केलं. रेशनिंग कृती समितीबरोबर होते. वस्तीत काम करणार्‍या मंडळींसाठी पॅरा मेडिकल कोर्सेस सुरू केले. महाराष्ट्र महिला परिषदेबरोबर राहून, बचतगट, ३३ टक्के महिला आरक्षण, मुलांना आईचं नाव लावणं, संपत्तीत समान वाटा, राजकारणात महिलांचा सहभाग, असे अनेक उपक्रम राबवत गेलो. आजवर आम्ही कायमच आपल्या सोयीनं येऊन महिलांना आमच्या कामात सहभागी होण्याची संधी दिलेली आहे. संस्थात्मक रचना, समाज मानसिकता बदलण्यासाठी विविध प्रकारे कृतिशील होत गेलो. यात आयुष्याला वेगळीच दिशा मिळत गेली. लिंगभेद सापेक्ष वर्तणुकीचं एक उदाहरण सांगते.
एका हॉटेलमध्ये महिला कर्मचार्‍यांशी पुरुष कर्मचार्‍यांनी गैरवर्तन केलं. यावर मॅनेजमेंटनं त्या पुरुष कर्मचार्‍याला काढून टाकण्याचा निर्णय घेतला. तर युनियननं त्याला विरोध केला. आता महिलाही त्या युनियनची सदस्य होती. मग मी माझ्या वरिष्ठांशी बोलून उपाय सांगितला, तो म्हणजे कामावर दोघांनाही ठेवणं आणि पुरुष कर्मचार्‍याची कामाची वेळ बदलणं. नोकरीची दोघांनाही आवश्यकता आहेच पण आततायी निर्णय न घेता दोघांचा विचार व्हायला हवा.
क्रूर दहशतवाद्याला आपण ‘ट्रायल’ देतो मग अत्याचार करणार्‍या व्यक्तीला शिक्षा देण्यापूर्वी एकदा शहानिशा करायला हवी. कारण सांगते, बलात्काराच्या एका प्रकरणात एकदा दबावाखाली एका माणसाला पकडण्यात आलं आणि ओळखपरेडमध्ये कळलं हा तो माणूस नव्हेच आणि मग खर्‍या गुन्हेगाराचा शोध सुरू झाला, सुदैवानं तो सापडला. तो भाग चांगला पण लगेच कारवाई करण्याच्या नादात चुकीच्या व्यक्तीला सजा दिली जाऊ शकते. समानता सगळीकडे लागू व्हायला हवी.

‘महिलांनी आपल्या आजूबाजूच्या सत्ता केंद्रावर लक्ष ठेवायला हवं’ असे तुम्ही म्हणता म्हणजे नेमके काय?
भारतीताई ः हा चांगला प्रश्न आहे. काय आहे, आपल्या आजूबाजूला अनेक यंत्रणा असतात. म्हणजे घरात मुलांचे शाळेचे निकाल आणायला बहुतांशी घरात महिला जाते, रेशनच्या दुकानात जाते, पोलीस स्टेशनात महिला दक्षता समिती असते. म्हणजे असायला हवी आणि आधीच असेल तर त्यांची कार्यप्रणाली पारदर्शी नियमांना धरून आहे ना हे तपासायला हवं. इथपासून ते महानगर पालिकेतल्या विविध समित्या, निधी, त्याचा वापर, आपल्या विभागात प्रमुखांशी बोलून संरक्षित वातावरण तयार करता येईल का, हे तपासणं यात सर्वांना समाविष्ट करून घेणं आवश्यक आहे. बर्‍याचदा समूहात, चर्चेत महिला ‘कसं बोलू’ म्हणून गप्प बसतात, तर पुरुष हा महिलांचा प्रश्न म्हणून अलिप्त राहतात आणि धास्तीनं पुढाकार घेत नाहीत. पण समानतेच्या संस्कारांनी हे एकत्र आले तर समाज, परिसर सुरक्षित होऊ शकतो. यानिमित्तानं आम्ही राबवलेला सेफ्टी ऑडिट हा उपक्रम सांगते. विभागातल्या महिलांच्या गटाशी संवाद साधून त्यांच्या मनातली धास्ती, भीती जाणून घेतली. त्या अनुषंगानं परिवहन अधिकारी, पोलीस अधिकारी, नगरसेवक, महापौर यांची मीटिंग घेतली. यामुळे परिसरात दिवे लागले, गर्दुल्यांना हलवण्यात आलं, बससेवा वाढवण्यात आली. हे सगळं संवादानं घडलं. पोलीस संरक्षणासाठी आहेत पण त्यांना त्यांचं काम करू द्यावं, आपण समानतेच्या नात्यानं परिसर विभाग सुरक्षित स्तरावर आणू शकतो.
समानता म्हणताना आजचं उदाहरण सांगते, महिला नगरसेवकांच्या नावापुढे आजही त्यांच्या पतीचे दूरध्वनी क्रमांक दिलेले आहेत. त्यांचे क्रमांक बदलले किंवा अस्तित्वात नसतात. यावरदेखील आम्ही टाळेबंदीपूर्वी काम केलं, पुन्हा सुरू करणार आहोत. छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण तिथं बदल आवश्यक आहेत. अन्याय झालेल्या पीडित महिलेसाठी ‘मनोधैर्य योजना’ आहे. त्याचा लाभ संबंधिंत स्त्रीला मिळायला हवा.

मॅडम, तुमचं कामाचं स्वरूप फार शारीरिक, मानसिकदृष्ट्या धावपळ करायला लावणारं, ताणाचं आहे. ओढाताण होत नाही का?
भारतीताई : ओढाताण तर सगळ्यांचीच होते. पण मी असं म्हणते, हे सगळे माझे प्राधान्यक्रम होते. पेशानं शिक्षक असलेले भाऊ फाटक, स्वातंत्र्य चळवळीतले सक्रिय. आम्हाला घडवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. ते म्हणायचे, ‘विचार शिकाल, पण वृत्ती कशी असावी यावर मेहनत घेतली गेली पाहिजे.’ कडव्या साचेबद्ध लोकांना बघते तेव्हा वाटतं, अरे यांना वेगळं वातावरण मिळालं असतं तर ही मंडळी विचारांनी वेगळी झाली असती.
सध्या नवीन कार्यकर्त्यांची बैठक तयार व्हावी म्हणून संविधानाची ओळख व्हावी म्हणून संविधान संवर्धन समितीकडून आम्ही वर्ग घेतो, यातून एक पाया पक्का होतो. आमच्याकडे आपले व्याप सांभाळून महिला सहभागी होतात. त्यांना आम्ही संगणकाचं प्रशिक्षण दिलं, काही इथं शिकून मोठ्या सेवाभावी संस्थांबरोबर मोठ्या उपक्रमांमध्ये आहेत. काही राजकारणात गेल्या, काही समाजकारणात गेल्या.
आम्ही फंडिंग कोणाकडून घेतलं नाही. त्यामुळे केवळ समानतेच्या दृष्टीनं आम्ही सगळे कृतिशील आहोत. यात सहभागी महिलांना घरच्याही जबाबदार्‍या असतात तर पुरुष कार्यकर्त्यांना घरच्या जबाबदार्‍यांमधून बरीच मोकळीक असते, असं मी आमच्या क्षेत्रातल्या पुरुषांना म्हणत असते. मुद्दा असा आहे की, समानतेच्या वाटेवर ओढाताण कमी होऊ शकते ती म्हणजे, कृतिशीलतेनं, सारासार विचारानं. मला असं वाटतं, भारतीय संविधानातली, समाज कल्याणाची चौकट ही माझी चौकट आहे.

बदल कशातून आणि कसा घडावा?
भारतीताई : काय आहे, वाईट गोष्टींना निर्बंंध नसतो, त्यामुळे समाज त्या लगेच आत्मसात करतो. अगदी अपशब्दही आई, बहिणीवरून दिले जातात. कित्येक वेळा अर्थही माहीत नसतात पण ते वापरले जातात. त्या वेळी कुटुंब, समाज यांनी ठोस भूमिका घ्यायला हवी. विरोध करायला हवा. ८ मार्चला गुलाबाचं फूल, फेशियल-मेकअप किटवर सूट, म्हणजे महिला दिन नव्हे! महिलांच्या विचारात स्पष्टता, कणखरता येईल, ‘मी मार खाणार नाही’ ही जरब नजरेत असेल तेव्हा खरा महिला दिन असेल. महिलांसाठी संकटकाळी तात्पुरते निवास केंद्र, स्वच्छ स्वच्छतागृहे असतील, अगदी तिच्या स्वयंपाकघरातल्या ओट्याच्या कट्ट्याची उंची मिस्त्री नाही तर ‘ती’ सांगेल त्या उंचीची होईल किंवा प्रत्येक बाबतीत तिच्या नजरेतून जग बघितलं जाईल; तो खरा ‘महिला दिन’ असेल.

आज तुमची पुढची पिढीही तुमच्या वाटेवर आहे त्याविषयी काय सांगाल?
भारतीताई : (खुशीत सांगतात) आम्ही कार्यकर्ते एकत्र काम करताना आमच्या मुलांना बरोबर घेऊन यायचो. त्यामुळे तो संस्कार आज पुढच्या पिढीपर्यंत पोचला. माझी मुलगीही शिक्षण क्षेत्राकडे वळली. आज आम्ही दोघी सहकारी, मार्गदर्शक या विविध नात्यानं चर्चा, गप्पा करत असतो.
मनात येतं, आपण आयुष्यात काय शिकलो, साध्य केलं, मिळवलं? असं म्हणतात, चांगल्या विचारांची दहा माणसं तयार केली की आयुष्याचं सार्थक होतं. कारण विचार हे पुढे नेणारे असतात आणि कृतीनं ते साकारतात. जाता जाता एक सांगेन, मोठं-मोठी भाषणं विरून जातात पण गाणी ऐकली की, ती गुणगुणत मंडळी घरी जातात, ते विचार त्यांच्या घरात पोचतात. त्यामुळे आमच्या चळवळीतली गाणी ‘स्त्री नाही देवी, स्त्री नव्हे दासी, स्त्री नव्हे वस्तू उपभोगाची, स्त्री आहे माणूस!’ अशीच शिकवण देतात. हेच आपण सगळे जपूया, असं मला वाटतं, धन्यवाद!

मंडळी, शारीरिक-मानसिक आरोग्य जपणं, सन्मानानं प्रत्येकाला वागणूक मिळणं हा प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे. यात संस्कार, कुटुंबाची भूमिका मोलाची पण सगळ्यात आधी आपली स्वतःची भूमिका लाख मोलाची… नाही का?
भारती शर्मा ताईंचं कार्य बघून वाटतं,
‘फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे,
स्वयें मनात जागते, न सूर ताल मागते।
कुणास काय ठाऊके, कसे कुठे उद्या असू,
निळ्या नभांत रेखिली, नकोस भावना पुसू॥’

– पल्लवी मुजुमदार

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.