Now Reading
सकारात्मकता शिकवणार्‍या मायलेकी

सकारात्मकता शिकवणार्‍या मायलेकी

Menaka Prakashan

परिस्थिती कितीही बिकट असली, तरी सकारात्मक राहून खंबीरपणे वाटचाल करत राहिल्या, परिस्थितीवर मात करता येते हे दाखवून देणार्‍या दीपाली आणि सानिका वैद्य या मायलेकींची ही कहाणी.

स्त्रियांमध्ये प्रचंड ताकद असते, याची जाणीव प्रत्येक स्त्रीला जशी असते तशीच ती तिच्या जवळच्यांना, कुटुंबियांनाही जाणवत असतेच. एकाच वेळी वेगवेगळ्या आघाड्यांवर लढण्याचं सामर्थ्य तिच्यात असतं. अगदी धुणं-भांड्यांचं काम करणार्‍या मावशी, दवाखान्यात शुश्रूषा करणार्‍या नर्स, लॅपटॉपवर तेवढ्याच तत्परतेनं काम करणारी अधिकारी पदावरची स्त्री असो किंवा पत्रकार, लेखिका, पायलट, ड्रायव्हर, कंडक्टर असो, प्रत्येक स्त्री आपल्या जीवनात स्वतःला सिद्ध करण्यासाठी घर-संसार सांभाळत संघर्ष करत असते. गृहिणीला तर कधीच सुट्टी नसते, चोवीस तास तिच्या डोक्यात एकामागून एक कामाची यादी फिरतच असते. त्यातही ती तिच्या ताकदीचा पुरेपूर वापर करून अनेक गोष्टी आत्मसात करत असते. प्रत्येक पदार्थ चांगला व्हावा यासाठी जशी ती झटत असते तशीच ती आपलं मूल चांगलं व्हावं यासाठीही धडपडत असते. अशा या प्रचंड ताकदीचा स्रोत असणार्‍या एका आईच्या जिद्दीचा प्रवास आपण बघणार आहोत, अर्थातच ही आई आपल्या सगळ्यांचं प्रातिनिधिक उदाहरण आहे. पण तरीही खंबीरपणे परिस्थितीवर मात करणारी ही आई आपल्याला भरभरून सकारात्मकता देईल, याची खात्री आहे. हा प्रवास आहे मुंबईच्या दीपाली वैद्य आणि त्यांची लेक सानिका वैद्य यांचा!

एक स्त्री जेव्हा आई होते, तेव्हा तिचे प्राधान्यक्रम आपोआप बदलतात. तिच्यात प्रचंड ऊर्जा निर्माण होते. पण जेव्हा तिला समजतं की, आपलं मूल विशेष आहे किंवा इतरांपेक्ष काहीसं वेगळं आहे तेव्हा त्याच्यासाठी आपल्याला अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे, हे ती स्त्री ओळखते. काही काळासाठी, त्या आईच्या पायाखालची जमीन सरकते, पण ती कच खात नाहीच. उलट दुप्पट जिद्दीने आपल्या बाळासाठी उभी राहते. त्या बाळाला खंबीर बनवण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करते. दीपाली वैद्य यांच्याशी बोलताना, त्यांची कहाणी ऐकताना त्यांच्यातली ही जिद्द आपल्यालाही प्रेरणा देत राहते.

दीपाली वैद्य या मूळच्या ठाण्याच्या. त्यांनी बी.ए. फिलॉसॉफी, एम. ए. सोशिओलॉजी केलं आहे. अन्य मुलींप्रमाणेच त्यांचंही शिक्षण, नंतर लग्न असं सामान्य आयुष्य सुरू होतं. यथावकाश मुलीचा – सानिकाचा- जन्म झाला आणि तिच्या बाललीला बघण्यात सगळं घर हरखून गेलं. सानिका अगदी देखणी होती. ती दोन वर्षांची झाल्यानंतर त्यांनी तिला शाळेत घातलं. सगळं सुरळीत सुरू होतं. मात्र शाळेत जायला लागल्यावर काही दिवसांतच तिच्या शिक्षकांच्या लक्षात आलं की, ही मुलगी सामान्य मुलांप्रमाणे नाही. शिक्षकांनी दीपालीताईंच्या हे लक्षात आणून दिलं, तेव्हा सगळ्यांसाठीच हा मोठा धक्का होता. कारण सानिका दिसायला सुंदर होतीच, तिच्या सगळ्या हालचाली अगदी सामान्य वाटाव्यात अशाच होत्या. तिची स्मरणशक्तीही अतिशय तल्लख. दीड वर्षाची असताना ती ‘ए टू झेड’ अक्षरे आणि ‘वन टू हंड्रेड’ अंक अगदी पटापट आणि बिनचूक म्हणायची. त्यामुळे तिच्यात काही तरी कमी असेल असं कुणालाच स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण तरी शिक्षकांनी सांगितलं म्हणून एकदा खात्री करून घेण्यासाठी तिला डॉक़्टरांकडे नेलं तर डॉक्टरांनी ती ‘ऑटिस्टिक’ म्हणजेच आत्ममग्न असल्याचं सांगितलं.

पंधरा वर्षांपूर्वीच्या परिस्थितीचा विचार केला, तर ‘ऑटिझम’, ‘डिस्लेक्सिया’ यांसारख्या संकल्पना सर्वसामान्यांना माहीत नव्हत्या किंवा या समस्या नाहीतच अशीच एक धारणा होती. मूल मोठं होईल तसं, समस्या ठीक होईल, असंच मानलं जाई. दीपाली ताईंनाही ‘ऑटिस्टिक’ असणं म्हणजे काय, हे माहीत नव्हतं. सर्दी, खोकल्यासारखा हा सुद्धा एक आजार आहे आणि थोडे दिवस औषधं घेतल्यानंतर सानिका बरी होईल, अशी दीपालीताईंची धारणा होती. म्हणून त्यांनी सानिका बरी कधी होईल, असा प्रश्‍न डॉक्टरांना विचारला. डॉक्टरांनीही त्यांना आश्‍वस्त करत उपचार सुरू करायला सांगितलं. सहा महिने झाले, उपचार सुरू होते. फरक फारसा दिसत नव्हता. आता सानिकाचं बोलणं पूर्णपणे बंद झालं होतं, ती ‘हायपर अ‍ॅक्टिव्ह’ही होती. तेव्हा जाणवलं, ही समस्या काही महिन्यांत संपणारी नाही, तर आपल्याला आयुष्यभर या समस्येबरोबरच झगडत राहायचं आहे. हा धक्का पचवणं ़सोपं अजिबातच नव्हतं. पण आता मुलीसाठी आपण खंबीरपणे उभं रहायला हवं, ही जाणीवही दीपालीताईंना होत होती.

मूल वाढवणं, त्याला मोठं करणं ही एरवीही सोपी गोष्ट नसते. त्यात जर ते मूल ‘स्पेशल चाईल्ड’ असेल तर मग कुटुंबियांच्या कष्टाला पारावारच उरत नाही. त्यात दीपाली या ‘सिंगल मदर’. त्यामुळे त्यांच्यासमोरचं आव्हान अधिकच मोठं होतं. यात त्यांच्या मदतीला धावून आली त्यांची आई रेखा गुप्ते, वडील दिलीप गुप्ते आणि भाऊ राज गुप्ते. दीपाली यांच्यामागे त्यांची आई खंबीरपणे उभी राहिली. वैद्यकीय उपचार हे किती महागडे असतात हे आपणही जाणतो. त्यात ‘ऑटिस्टिक’ मुलांना तर केवळ औषधं देऊन बरं करणं अशक्य असतं. अशा मुलांना अनेक ‘थेरपीज’ची मदत घ्यावी लागते. त्यामध्ये ‘स्पीच थेरपी’, ‘बिहेव्हिअरल थेरपी’, ‘सेन्सरी इंटिग्रेशन थेरपी’ अशा काही थेरपीजचा समावेश होतो. यासाठी होणारा खर्चही प्रचंड असतो. त्यामुळे या परिस्थितीतही दीपाली यांनी त्यांची नोकरी खंबीरपणे सुरूच ठेवली. त्या ‘टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस’ म्हणजेच ‘टीसीएस’ या कंपनीत गेली पंधरा वर्षं कन्सल्टंट म्हणून काम करत आहेत. त्यांनी आर्थिक बाजू पेलली तर त्यांच्या आई-वडिलांनी सानिकाच्या शाळेची, उपचारांची जबाबदारी स्वतःवर घेतली.

आर्थिक भार पेलणं हे तर नोकरी करण्यामागचं एक ध्येय होतंच पण दीपालीताई सांगतात, ‘‘एक व्यक्ती म्हणून आपण स्वतःला जेवढं व्यग्र ठेवू, तेवढं आपलं शरीर आणि मन दोन्ही निरोगी, सचेत रहायला मदत होते. मी ऑफिसमधून घरी आले की, मग सानिकाकडून डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टी करून घ्यायचे. शिवाय या मुलांचं असं असतं की, तुम्ही या मुलांसाठी जेवढे कष्ट घ्याल तेवढे कमीच असतात. मी माझ्या नोकरीत माझं काम करत आहेे, पैसे मिळवत आहे त्यामुळे एक आत्मविश्‍वास निर्माण होण्यास नक्कीच मदत होते. तेच जर मी तिच्याजवळ चोवीस तास बसून असते, तर कदाचित तेवढ्या चांगल्या पद्धतीनं मला तिच्यावर काम करता आलं नसतं.’’

‘‘सानिकाला मी आधीपासूनच सामान्य शाळेतच घातलं. साधारण सातवीपर्यंत ती त्या शाळेत होती. अर्थात तिला एक मदतनीस आवश्यक असेच. पण तोपर्यंत असं लक्षात आलं की, लोकांमध्ये किंवा तिच्या वर्गातल्या मुला-मुलींमध्ये ती मिसळत नव्हती. म्हणून मग आठवीत तिला ‘स्पेशल स्कूल’मध्ये घातलं. आता ती दहावीची परीक्षा देते आहे. या मुलांसाठी दहावीचं वर्षं हे दोन वर्षांचं असतं. पुढच्या वर्षी तिची दहावी पूर्ण होईल. ‘स्पेशल स्कूल’ आणि या सगळ्या थेरपीजचा तिच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी खूपच उपयोग झाला आहे. सानिका आता बोलायला लागली, संवाद साधू लागली आहे. त्याचबरोबर मी कटाक्षानं एक गोष्ट आजवर कायम पाळत आहे, तिला कधीच वेगळं वाटेल असं काही केलं नाही. मी जिथे जात असे तिथे सगळीकडे मी तिला घेऊन जात असे. माझ्या मैत्रिणींच्या घरी, पार्टी, लग्नकार्यात सगळीकडे तिला घेऊन जात राहिले. त्यामुळे आपोआपच चार लोकांमध्ये गेल्यानंतर कसं बोलायचं, कसं जेवायचं, कसं वागायचं हे ती शिकत गेली. इथे एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते की, अशा मुलांच्या बाबतीत आपल्या समाजाची त्यांना समजून घेऊन त्यांचं वेगळेपण स्वीकारण्याची तयारी किंवा ‘अ‍ॅक्सेप्टन्स’ खूप वाढला आहे. यामुळे या मुलांना, त्यांच्या पालकांनाही दिलासा वाटतोय. शिवाय मी माझ्या मैत्रिणींनीही सानिकाशी कसं वागायचं, हे समजावलं तसंच त्यांच्या मुलांना शिकवलं. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. एकूणच समाजात होणारा हा बदल मला खूप सकारात्मक वाटतोय.’’

ऑटिस्टिक मुलांच्या पालकांसाठी डॉक्टर आणि उपचार पद्धती खूप मोठ्या आधार आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचा असतो, मानसिक आधार. अशा पालकांसाठी दीपालीताई आधाऱ बनतात. ‘‘सानिका ऑटिस्टिक आहे, हे जेव्हा मला समजलं, तेव्हा मलासुद्धा ‘व्हाय मी’ किंवा ‘माझ्याच बाबतीत का असं घडलं’, हा प्रश्‍न सतत त्रास द्यायचा. पण एका क्षणी जाणवलं, आपण जर रडत बसलो, परिस्थितीला दोष देत बसलो तर हाती काहीच लागणार नाही. तिचं आयुष्य वाया जाईलच शिवाय आपणही जीवनाचा आनंद घेऊ शकणार नाही. मी ही समस्या माझ्या आयुष्यात येण्याआधी हळवी, अतिशय संवेदनशील, साधी, मी-माझं घर एवढ्यापुरती मर्यादित विश्‍व असणारी होते. पण या समस्येमुळे मी आपोआप खंबीर झाले. कारण परिस्थितीशी दोन हात करत माझ्या लेकीला आधार देऊन तिच्यात आत्मविश्‍वास निर्माण करण्याशिवाय आपल्यासमोर कोणताच पर्याय नाही, हे माझ्या लक्षात आलं होतं. अर्थात आजही मला रडू येतं, मी रडते. ‘स्ट्राँग’ झाले याचा अर्थ रडू येत नाही, वाईट वाटत नाही, असं अजिबातच नाही. मलाही कधी कधी खूप हताश वाटतं. पण परत दोन दिवसांनी मी उभी राहते. आपण यापूर्वी वाईट परिस्थितीवर मात केली होती, याची स्वतःलाच आठवण करून देते आणि मग पुढच्या आव्हानासाठी अधिक खंबीरपणे उभी राहते. मला असं वाटतं की, प्रत्येक वेळेस स्वतःला वेळ देणं खूप आवश्यक आहे. हेच मी मला फोन करणार्‍या मुलांच्या पालकांना सांगते. आपण सकारात्मक राहिलो तरच या मुलांना सकारात्मकता देऊ शकतो. त्यामुळे आपण स्वतः खूप सकारात्मक, उत्साही रहायला हवं. हे खरंतर सामान्य मुलांच्या पालकांनाही तेवढंच लागू पडतं. ‘तुला काय जमणार’, ‘तुला हे शक्यच नाही’, असं मुलांना कधीच बोलू नका. नकारात्मकता मनातून काढून टाका आणि नकारात्मक वातावरणही आजूबाजूला निर्माण करू नका. सतत चांगला बोला, त्याचे चांगले परिणाम तुम्हाला निश्‍चितपणे दिसतील, हे मला सानिकाच्या बाबतीतही प्रकर्षानं जाणवलं.’’

गेल्या वर्षी कोव्हिडचं संकट संपूर्ण जगावरच अचानक येऊन आदळलं. सामान्य माणसांच्या आयुष्यातही कोव्हिड, लॉकडाऊन यामुळे आमूलाग्र बदल घडले. लॉकडाऊनच्या काळात सानिकाला सांभाळताना काही बदल करावे लागले का, असं विचारताच दीपालीताई म्हणाल्या, ‘‘या मुलांना सांभाळणं एक खूप मोठं चॅलेंज आहे. कारण यांना थोडं मोकळं सोडलं तर ती भरकटण्याची शक्यता असते. म्हणून त्यांच्याशी बोलताना-वागताना सतत खूप काळजी घ्यावी लागते. त्यांना सतत गुंतवून ठेवावं लागतं. सानिकाच्या बाबतीत आम्ही ‘वॉटर थेरपीं’चीही मदत घेतली. या दरम्यान तिला पोहायला शिकवलं. मला सांगताना अभिमान वाटतो की, सानिका समुद्रात अगदी दहा किलोमीटरही खूप छान पोहते. तिला पाण्याची आजिबातच भीती वाटत नाही. एवढंच नाही तर राज्यपातळीवरील स्पर्धांमध्ये तिला सुवर्ण आणि रौप्य पदकंही मिळाली आहेत. तिचा वेळ आणि तिच्यातली ऊर्जा सत्कारणी लावण्यासाठी पोहणं हा खूप चांगला पर्याय आमच्या हाती लागला. पण लॉकडाऊन सुरू झालं आणि बाहेर पडण्यावर पर्यायानं पोहण्यावर बंधन आली. हा काळ सानिकाबरोबरच माझ्यासाठीही कठीण होता. चांगल्या चांगल्या माणसांना या काळात नैराश्यानं घेरलं. त्यामुळे सानिकाचं मानसिक आरोग्य जपणं हे तर खूप मोठं आव्हान होतं. अगदी मलाही या काळात समुपदेशनाची गरज भासली. सानिकाचं मानसिक आरोग्य जपण्यासाठी तिलाही ‘बिहेव्हिएरल थेरपी’ सुरू केली. पोहणं बंद झालं होतं. अशा वेळेस एखादा वेगळा पर्याय शोधण्याची गरज होती. आधी म्हटल्याप्रमाणे सानिका दिसते खूप सुंदर! तिचं हसणं, डोळे अतिशय सुंदर आहेत. मग तिचं एखादं फोटोशूट करावं, असं मनात आलं आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रोफेशनल फोटोशूट केलं. हे सगळं करताना तिला फार मजा आली. विशेषतः फोटोशूटच्या वेळेस आपण जणू राजकुमारीच आहोत अशी मिळणारी वागणूक तिला खूप आवडली. तिने फोटोशूट करतानाही खूप छान रिस्पॉन्स दिला. आणि या महिन्याच्या ‘मेनका’च्या मुखपृष्ठावर तर तिचा फोटोही झळकलाय, याचा मला खूपच आनंद होतोय. सध्या तिचं पोहणं थांबलंय, अर्थातच काही काळाने ते सुरू होईल. पण करिअरचा एक पर्याय म्हणून सानिकानं मॉडेलिंग करावं, रॅम्प वॉक करावं, फोटोशूट करावेत, जाहिराती-मालिकाही कराव्यात असं मला वाटतं. कारण या मुलांमध्ये एक वेगळीच चुणूक असते. त्याला योग्य दिशा देण्याचं काम पालकांनी करायला हवं. तसा एक पर्याय या लॉकडाऊनच्या निमित्तानं आम्हाला सापडलाय…’’

‘‘खरंतर प्रत्येक पालक आपल्या मुलांसाठी जिवाचं रान करतात. तसंच मी पण केलं. फक्त माझ्या प्रवासात अडथळे थोडे जास्त होते एवढंच. अशा विशेष मुलांना वाढवणार्‍या पालकांनी अधिक जागरूक, खंबीर व्हायला हवं. आपण आपली कामं करत रहायला हवीत. आपण सकारात्मक राहिलो तर मुलांना सकारात्मक ठेवू शकतो. आपण कोणीच ‘परफेक्ट’ नाही, त्यामुळे आपल्याही हातून चुका होतील, होऊ द्या. एखादं काम राहिलं तर राहू द्या. ज्या कामातून तुम्हाला आनंद मिळतोय, ते करा. तुम्ही आनंदी रहा, तर तुमच्या मुलांना आनंदी ठेवू शकाल. मला पेंटिंग करायला आवडतं. सुरवातीच्या काळात मला पेेंटिंग करायला वेळ मिळायचा नाही, पण आता मी स्वतःसाठी वेळ काढते, चित्रं काढते आणि ‘जहांगीर आर्ट गॅलरी’तल्या प्रदर्शनातही सहभागी होते. यामुळे थोडा हातभारही मिळतो. त्याचबरोबर आनंद आणि समाधानही मिळतं. हा आनंद, समाधान अतिशय गरजेचं आहे, कारण पालक म्हणून आपण समाधानी राहिलो तरच आपल्या मुलाच्या पाठीशी सकारात्मकतेनं उभं राहू शकतो.’’

दीपालीताईंचा हा प्रवास जाणून घेतल्यानंतर त्यांची सकारात्मकता आपल्याला थक्क करते. त्यांच्याकडून हीच सकारात्मकता आत्मसात करून ती इतरांपर्यंत पोचवता आली तर हे जग अधिक सुंदर होईल यात शंका नाही!

मुलाखत : श्रद्धा पतके

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.