Now Reading
संवेदनशील नटराज

संवेदनशील नटराज

Menaka Prakashan

नटराजाच्या पाषाण आणि कांस्य प्रतिमांनी मोहित झालेले लोक भारतातच नव्हे, तर विदेशातही आढळतात. तिरूमूलर नावाचे एक तमिळ शैव गूढवादी आणि लेखक होते. त्यांच्या काळाबाबत एकमत नाही. ‘तिरुमंतिरम्’ या त्यांच्या साहित्यकृतीला अकराव्या-बाराव्या शतकाच्या पूर्वी नेता येत नाही, एवढंच मत उपलब्ध होतं. त्रेसष्ट नयनमार किंवा नायनार आणि अठरा सिद्धांमध्ये त्यांची गणना केली जाते. त्यांनी आपल्या लेखनात नटराज शिव प्रतिमेला एक निराळीच उंची प्राप्त करून दिली आहे. ते म्हणतात, ‘’आकाश म्हणजे नटराजाचा देह आहे. आकाशातला काळा ढग हा मुथलक नावाचा दैत्य आहे. चंद्र, सूर्य आणि अग्नी या तीन ज्योती म्हणजे शिवाचे तीन नेत्र आहेत. असा विराट नटराज आमच्या देहाला चिदंबरम् ‘चित् अंबरम्’ (चित्तरूपी आकाश) बनवतो आणि हृदयाच्या सभेत नादान्ते- नृत्य करतो.’’

माणूस जेव्हा एखादा प्रसंग किंवा विषय सांगण्यासाठी जे विशिष्ट अंगचालन करतो, त्याला नृत्य म्हटलं जातं. शिव हा आदि नट आहे. संपूर्ण विश्व, माणसांचे व्यवहार ही त्याची अखंड नृत्यशाळा असते. नटराज हा नर्तक आहे, तसाच तो निरासक्त साक्षीही असतो. त्याच्या नृत्याची गती म्हणजे विश्वाच्या व्यापाराला गती, असं मानलं जातं. त्याच्या नृत्याला विराम म्हणजे विश्वाच्या व्यवहारांना विराम होय. यानंतर तो केवळ स्वतःमध्ये मग्न होऊन राहतो. सर्वसाधारणपणे असं मानलं जातं की, शिवाच्या प्रमुख नृत्याचं नाव तांडव आहे व त्याचे सात प्रकार आहेत. आनंद तांडव, त्रिपुर तांडव, संध्या किंवा सांध्य तांडव, कालिका तांडव, उमा तांडव आणि गौरी तांडव- अशी त्यांची नावं आहेत.

चिदंबरम इथल्या सुप्रसिद्ध नटराज मूर्ती नादान्त नृत्य प्रकारातल्या आहेत. पृथ्वीवर सर्वप्रथम तिल्लईच्या म्हणजे सध्याच्या चिदंबरम् या रंगभूमीवर सादर केले, अशी पारंपरिक कल्पना आहे.

सर्वसाधारणपणे लोकप्रिय असलेल्या नटराजाची मूर्ती चतुर्भुज असते. त्याचा डावा पाय त्यानं वरती उचलून उजवीकडे धरलेला असतो. त्याचे केस माथ्यावर बांधलेले असून, खाली सुटलेल्या मोकळ्या जटा, नृत्याच्या लयीनुसार भुरभुरत असतात. त्याच्या केशबंधात सर्प, कपाल, गंगा, चंद्र व पत्रमाला असते. नटराजाच्या उजव्या कानात पुरुषाचं कर्णणभूषण असतं, तर डाव्या कानात स्त्रीला शोभणारं कुंडल असतं. गळ्यात हार व यज्ञोपवीत शोभून दिसते. कमरेला मेखला असून बोटात मुद्रिका असतात. कमरेवर कटिवस्त्र असून अंगावरचं वस्त्र फडफडत असतं. उजवीकडच्या मागच्या हातात डमरू असतो व पुढचा हात अभयमुद्रा दर्शवत असतो. डावीकडच्या मागच्या हातात अग्नी धरलेला असून पुढचा हात उचललेल्या पायाकडे निर्देश करत असतो. नटराजाच्या उजव्या पायाखाली अपस्मार किंवा मुयकल नावाचा दैत्य असतो. या दैत्याच्या हातात काळा सर्प असतो. नटराजाच्या मूर्तीखाली पद्मपीठ असतं. संपूर्ण मूर्तीला व्यापून टाकणारी प्रभावळ असते. या प्रभावळीला ज्वालांचे पाच अंकुर फुटलेले असतात. शिवानं वरती उचललेला पाय आणि मागचे दोन्ही हात यांचा स्पर्श त्या प्रभावळीला झालेला असतो.

नटराज मूर्तीची ही सर्व वैशिष्ट्यं तत्त्वज्ञान सांगणारी आहेत. नटराज प्रत्येकाच्या हृदयरूपी आकाशात नृत्य करत असतो. त्याच्या कानातल्या कुंडलांचा भेद स्त्री-पुरुषांचं आत्म्याच्या पातळीवरचं अभिन्नत्व आणि शिवाचा अर्धनारीश्वर पैलू सूचित करतो. त्याच्या डमरूच्या नादातून शब्दशास्त्र विकसित होतं. हातातला अग्नी या विश्वात जे हीन आहे, त्याचा नाश सूचित करतो, गोष्टींना दाह देऊन सुसंस्कारित करत असतो. अभयमुद्रेतून सर्वांना वरदायकत्व सांगितले जाते. पायाकडे संकेत करणारा हात सर्वांना मुक्तीकडे जायचा मार्ग दाखवत असतो. त्याच्या पायाखालचा दैत्य हे अज्ञानाचं प्रतीक असून, नटराज शिवानं त्या अज्ञानाचा पार कणाच मोडून टाकलेला असतो. त्याच्याभोवतीची प्रभावळ ही या विश्वातलं मायारूपी म्हणजे परिवर्तनरूपी चक्र आहे. प्रभावळीला असलेले पाच-पाच ज्वाळांचे अंकुर स्थूल आणि सूक्ष्म या दोन्ही पातळींवरच्या पंचतत्त्वांची प्रतीकं असतात.

शिव साऱ्या सृष्टीला चालना देतो आणि शेवटी तिला स्वतःत सामावून घेतो. सृष्टीचा तोल सांभाळून तिला उत्तम गती देण्याचं, जुन्याला संपवून नव्याला जागा करून देण्याचं जे कार्य पृथ्वीवर घडत असतं, त्याचीच विराट प्रतिमा म्हणजे संवेदनशील नटराजाचं रूप होय!

डॉ. सुरुचि पांडे
suruchipande@gmail.com

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.