Now Reading
शीतला आणि मनसा

शीतला आणि मनसा

Menaka Prakashan

प्रत्येक माणसामध्ये जसे चांगले-वाईट गुण सामावले आहेत, तसंच प्राण्यांमध्येही चांगले-वाईट गुण आहेत. याबाबतीत आपला दृष्टिकोन काय, हे महत्त्वाचं ठरतं. गाढव या प्राण्याकडूनही शिकण्यासारखं खूप काही आहे, याचं उत्तम प्रतीक म्हणजे रासभस्या शीतला देवी तर हंस, साप हे माणसाकडून दुर्लक्षित राहणारे प्राणीही आपल्याला ज्ञान, धैर्याची शिकवण देतात. याची उत्तम सांगड अध्यात्मात घातली आहे, त्यावर एक प्रकाशझोत…

रासभस्था शीतला

‘शीतला’ नावाच्या देवतेसह गाढव या चतुष्पाद पशूला मानाचं स्थान दिलं गेलं आहे. गाढवाचे दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. रानटी आणि पाळीव. फिकट पिंगट रंगाचं रानटी गाढव फार देखणं दिसतं. कच्छच्या छोट्या रणात तसंच लडाखमध्ये आपण रानटी गाढव पाहू शकतो. गुजराती भाषेत त्याला ‘घुडखर’ असं म्हणतात. साधारण दोन हजार वर्षांपूर्वी उज्जैन इथं राजा विक्रमादित्याच्या काळात गाढवांचा बाजार भरत असे असं अभ्यासक म्हणतात. अजूनही आपल्याला गाढवांचा बाजार पाहायला मिळतो. पुण्याच्या जवळच जेजुरीला पौष पौर्णिमेच्या सुमारास म्हणजे डिसेंबर-जानेवारीच्या आसपास हा बाजार भरतो. मल्हारी मार्तंडांचं जे मूळ मंदिर कडेपठारावर आहे, तिथं लागणार्‍या सामानाची ने-आण गाढवांवरून केली जाते. काटकपणा, चिकाटी, कष्टकरी वृत्ती, सहनशीलपणा आणि अवघड परिस्थितीत तग धरून राहण्याचा चिकटपणा हे सारे गुण गाढवाच्या अंगी असतात. मात्र मानवप्राणी त्याकडे दुर्लक्ष करून गाढवाचं अवमूल्यन करणारे शब्द वापरतो. गाढवाच्या ठायी जी चिवट, घट्ट वृत्ती आहे, त्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी अमेरिकेतल्या ‘डेमॉक्रॅटिक पार्टी’चं चिन्हही गाढव असल्याचं दिसतं.

अकराव्या-बाराव्या शतकाच्या आसपासच्या शीतला देवीच्या अनेक मूर्ती आढळतात. ‘शब्दकलाद्रुम’ नावाच्या ग्रंथात तिचं रूप वर्णन करताना ती ‘रासभस्था’ आहे म्हणजे गाढवावर आरूढ झालेली असते असं म्हटलं आहे. शीतलेला विविध प्रकारे वेगवेगळ्या प्रांतात पूजलं जातं. ही देवी ‘ज्वरासुरा’ला म्हणजे तापाच्या रूपानं आलेल्या असुराला दूर करते, माणसाला शीतल करते असं मानलं जातं. प्रदेशानुसार तिच्या नावांमध्ये भेद आढळतो. काही परंपरांमध्ये शीतलेला पार्वतीचं एक रूप मानतात, तसंच आरूढ झालेल्या शीतलेला ठाकुरांनी, दयामयी, मंगला, करुणामयी अशी छान नावंही आहेत. बंगाली साहित्यात ‘मंगलकाव्य’ नावाच्या काव्यरचना पंधराव्या शतकापासून आढळतात. त्याच परंपरेतलं ‘शीतलामंगल काव्य’ नावाचं काव्य आढळतं. ‘देब देबी ओ तादेर बाहन’ नावाच्या बंगाली पुस्तकात, शीतलादेवीचं वाहन असलेल्या गाढव प्रतीकाबद्दल छान चर्चा केली आहे. माणसाचे रोग दूर करणार्‍या शीतलेनं गाढव आपलं वाहन म्हणून निवडलं याचं कारण गाढव सात्त्विक गुणी असतं म्हणून. किंचितही लोभ नसतो. माणसानं निर्लोभता, निष्कामता, त्याग आणि निःस्वार्थता हे गुण गाढवाकडून शिकावेत म्हणून शीतलेनं त्याला आपल्यासह मानाची जागा दिली. माणसाला सद्गुण शिकवू इच्छिणार्‍या देवीला, तिच्या आदर्शांना गाढव आपल्यावरून वाहून नेतं. आपल्या आसपास आढळणार्‍या, शांतपणे काम करणार्‍या या प्राणिमात्रांकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष द्यावं, याचं मोठं प्रतीक ‘रासभस्था शीतला’ आहे.

हंसारूढा मनसा

आपल्या देशात प्रदेशाच्या भेदानुसार वेगवेगळ्या देवतांना महत्त्व मिळालेलं दिसतं. अनेक देवतांच्या उद्भवाबद्दल पुराणात किंवा वैदिक वाङ्मयात वा अन्य संस्कृत साहित्यात स्पष्ट वा अस्पष्ट उल्लेख मिळतात. उदाहरणार्थ ऐतिहासिक संदर्भ पाहिले की कळतं की, मारवाडच्या राठोड घराण्यात वेगवेगळ्या युगात वेगवेगळ्या देवता मानल्या गेल्या आहेत. मानवजातीची निर्मिती माया व ब्रह्मापासून झाली आणि ही सृजनाची इच्छा ज्या शक्तीमुळे झाली, ती मनसा देवी होय. सत्ययुगात तिची पूजा राठोड घराण्यात होई. नंतर द्वापारयुगात पंख असलेल्या पंखिनी देवीची म्हणजे बहिरी ससाण्याची पूजा होऊ लागली. त्रेतायुगातही ससाण्याची पूजा होई आणि कलियुगात नागनकी किंवा नागनेची देवीची पूजा सुरू झाली. बंगाल, आसाम व बिहार या प्रांतात मनसादेवीला खूप महत्त्वाची देवता मानतात. ती सर्ववेष्टिता असते. ही मनसा हंसावर आरूढ असते. बंगाली साहित्यात ‘मनसा मंहलकाव्यं’ हा साहित्यातला एक वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे. सर्प हे क्रूरतेचं प्रतीक समजून मनसा त्यांच्या सान्निध्यात राहत असते. त्यांना आपल्या जवळ स्थान असतं. यातून भूदेवीसारखी ती अत्यंत करुणामयी मानली जाते. वस्तुतः मनसा देवी ही कल्पना तात्त्विक आहे. मनसा ही मनाची अधिष्ठात्री देवता होय. मन हेच माणसाचा शत्रू असतं आणि मित्र असतं. मनसादेवी मनातल्या दुष्ट विचाररूपी सर्पाचं विष दूर करते म्हणून तिला ‘विषहारी’ मानली जाते. सरस्वती देवीप्रमाणे मनसाही हंसवाहिनी आहे. याचाच अर्थ असा की, मनसादेवी ‘ज्ञान’ हे लक्षण सांगणारी आहे. पाण्यातून जलदगतीनं जाणारा हंस हे शुद्ध, वृद्धिंगत होणार्‍या ज्ञानाचं प्रतीक आहे. अशा प्रकारे अंगाखांद्यावर सर्पांना बाळगणारी हंसवाहिनी मनसादेवी एक निराळीच देवता आहे.

सर्प वा नाग यांना भारतीय पौराणिक साहित्यात मोठं स्थान आहे. नागाची स्वतंत्ररीत्या पूजा होते तसंच शिव, विष्णू, गणेश या देवतांबरोबरही नाग असतो. नाग हे शक्तीचं चिन्ह मानलं जातं. बंगालमध्ये ‘नाग मंडल नृत्य’ हा लोकनृत्याचा एक प्रकार आढळतो. रणवीरा किंवा पद्मावती नावाची योगिनी सर्पावर उभी असल्याचं शिल्प ओडिशात आढळून येतं.

सर्प हे सौंदर्याचं तसंच वैद्यकीय शास्त्राचं प्रतीक मानलं जातं. सापांचे विषारी आणि बिनविषारी प्रकार असतात. साप शेतीतल्या उंदरांना खाऊन मोठ्या प्रमाणात त्यांचा नायनाट करतात. निसर्गाच्या साखळीत पक्ष्यांची अंडी व पिलं यांचा काळ म्हणजे साप होय. साप थंड रक्ताचा सरपटणारा प्राणी असल्यानं थंडीच्या दिवसांत तो गरम रस्त्यांवर येतो आणि भरधाव वाहनांच्या खाली येऊन मृत्युमुखी पडतो. आजही चुकीच्या समजुतींमुळे सापांची हत्या केली जाते किंवा अज्ञानापायी घरात निघालेल्या बिनविषारी सापांनाही मारून टाकलं जातं. पण दिलाशाची गोष्ट ही आहे की, सर्पमित्रांच्या अनेक संस्था सापांना वाचवण्यात मोठं योगदान देत आहेत. आग्नेय आशियात जेव्हा भारतीय संस्कृतीचा प्रसार झाला होता, तेव्हा अंगकोरवट इथल्या अतिभव्य मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी मोठ्या नागांच्या प्रतिमा शिल्पांकित झालेल्या होत्या. त्या आजही पहायला मिळतात. साप व भारतीय संस्कृती नागमंडलाप्रमाणे एकमेकांत कायमच्या गुंफल्या गेलेल्या आहेत.

डॉ. सुरुचि पांडे
suruchipande@gmail.com

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.