Now Reading
वाङ्मयीन नात्याचा उत्कट प्रवास!

वाङ्मयीन नात्याचा उत्कट प्रवास!

Menaka Prakashan

आजही मी त्या दारात त्याच कुतूहलानं उभा आहे. वय वाढलंय, पण कुतूहल तेच. गंगाधर गाडगीळ या व्यक्तिमत्त्वाला पूर्ण जाणून घेण्यासाठी अगदी तेवढाच उत्सुक. पण बरंच काही हरवून गेलेला… दरवाजा पूर्ण उघडण्याची वाट पाहत… एका वाङ्मयीन नात्याचा उत्कट प्रवास!

सातवीच्या पुस्तकातून त्यांची माझी पहिली भेट ‘किडलेली माणसं’ अशा शीर्षकाच्या, त्या वयात विचित्र वाटणार्‍या कथेचे लेखक म्हणून. गंगाधर गाडगीळ हे नाव आणि कथेच्या शीर्षकाजवळ त्यांचं रेखाचित्र होतं. जाड भिंगाचा चष्मा आणि चेहर्‍यावरचा एक प्रकारचा खमकेपणा!
‘किडलेली माणसं’ ही कथा मला अनेक कारणांनी वेगळी वाटली. आयुष्याचा अर्थच न कळलेली व जगणं हेच काम मानून कष्टत राहणारी, निसर्गाच्या भुका हेच प्रयोजन मानणारी सामान्य जीवनाची प्रवृत्ती गंगाधर गाडगीळांनी इतक्या चित्रमय शैलीत आणि तीही कथेच्या स्वरूपात मांडली होती, की कथा ही अशाही प्रकारची असू शकते, याचा शोध मला शाळकरी वयातच लागला. त्यानंतर मी गाडगीळांचे कथासंग्रह मिळवून वाचू लागलो. ‘नवकथा’ हे काय प्रकरण आहे हे कळण्याचं ते वय नि ती जाण त्या वेळी नव्हती. परंतु तोपर्यंत वाचलेल्या कथांपेक्षा गंगाधर गाडगीळ कथेत ‘वेगळंच काही’ आहे याचा प्रत्यय मला येऊ लागला. पुढे ‘तलावातले चांदणे’ कथा वाचून तर मी त्यांच्या लेखणीच्या प्रेमात पडलो. आणि ‘साता समुद्रापलीकडले’ हे प्रवासवर्णन वाचून झाल्यावर, प्रवासवर्णन हे ललित लेखनाशी इतकं एकरूप असतं; कवितेची तरलता आणि ललित लेखकाची सौंदर्यदृष्टी यांचा मेळ असलेलं हे अपूर्व प्रवासवर्णन मी एकदा नव्हे, अनेकदा वाचलं. त्यातलं ‘जपान’बद्दलचं प्रकरण वाचताना तर ललित लेखनाचा आनंद घेताना जीवनातल्या सकारात्मक दृष्टीची उमेद देणाराही वेगळा हर्ष मला झाला होता.

जपानी माणसाच्या प्रयत्नवादाबद्दल गंगाधर गाडगीळ लिहितात- ‘‘परमेश्‍वरानं दिलेल्या ‘न’च्या नकाराच्या गाठीत – त्यानं आपला प्रभावी ‘हो’कार भरला आहे.
प्रवासवर्णनातले गंगाधर गाडगीळ हा केवळ एक स्वतंत्र विषय आहे. ‘गोपुरांच्या प्रदेशात’ वाचल्यावर भारतातली प्रेक्षणीय स्थळं बघताना त्यांच्या सूक्ष्म निरीक्षणाचा आणि चिंतनाचा माझ्या अवलोकनावर खोलवर परिणाम झाला.
अशा बौद्धिक आनंद देणार्‍या व मानसिक समृद्ध करणार्‍या लेखकाला फक्त एकदा ‘बघावं’ असं माझ्या लेखक होऊ पाहणार्‍या कुतूहलात न वाटलं तरच नवल. तेव्हा मी नाशिकला रहायला होतो. सुट्टीत मुंबईला येत असे. काकाकडे. सुट्टीत पुणे आणि मुंबई गाठणं हा माझ्या लेखकाला गाठण्याइतकाच भाग होता. त्या तेराव्या-चौदाव्या वयात, ‘आपण माझे अतिशय आवडते लेखक आहात’ या वाक्यापलीकडे माझी मजल जात नसे. आणि हे माझं अगदी ठरलेलं व शुभारंभाचं वाक्य असे. परंतु लेखकाला जवळून ‘बघणं’ आणि त्यांची स्वाक्षरी घेणं; जमलं तर संदेश घेणं आणि सखाराम गटणेच्या उत्साहात ती स्वाक्षरी सर्वांना दाखवत मिरवणं हेच मुळात साहस वाटे.

तेच करण्यासाठी मी गंगाधर गाडगीळ यांच्या, वांद्रे इथल्या साहित्य सहवासातल्या ‘अभंग’ या इमारतीजवळ पोचलो. शाळेतल्या पुस्तकात पाहिलेला गंगाधर गाडगीळ यांचा चेहरा प्रत्यक्षात कसा आहे हे पुन्हा एकदा मनाशी तयारीत नि गाडगीळांशी काय बोलायचं, त्यांच्या कथेतल्या कुठल्या आवडलेल्या गोष्टीबद्दल त्यांना सांगायचं याची मनात जुळवणूक करण्यात मी माझा चांगला तास-दीड तास खर्च केला होता.
छातीतल्या धडधडीला लेखक भेटीची ओढ होती. पायर्‍या चढून मी त्यांच्या घरापाशी दरवाजासमोर उभा राहिलो. अगदी बाळबोध वळणाची, जाड पांढरीशुभ्र स्वाक्षरीच्या ढंगाची अक्षरं त्यांच्या दारावर होती. ‘गंगाधर गाडगीळ!’ मी मनात धैर्य एकवटून बेल वाजवली. काही सेकंदांत दरवाजाची साखळी तशीच ठेवून, दरवाजातून तो चेहरा, जो मी रेखाचित्रात पाहिला होता नि मनात कोरला होता; तोच चेहरा समोर होता.
‘‘कोण हवंय?’’
‘‘गंगाधर गाडगीळ!’’
‘‘काय हवंय?’’
‘‘त्यांना फक्त बघायचंय…’’
‘‘बघितलं ना? मग चला आता.’’ दार खटकन् लागलं.
मी क्षणभर मागे सरकलो.
खूप दुखावून मी पायर्‍या उतरून खाली आलो. माझ्या मनातले गंगाधर गाडगीळ हे असे नव्हते.
डोळे ओलावले नि परतीचा प्रवास उदास होता. वाटलं, या लेखकाचं एकही पुस्तक यापुढे वाचू नये. त्यांना मला वेळ द्यायचा नव्हता, पण असं काहीच न बोलता- ‘बघितलंत ना? मग निघा आता’ हे एवढंच ऐकूनही परतायचं नव्हतं.
गंगाधर गाडगीळ यांच्याबद्दल माझं प्रथम दृष्टीनं हे मत अगदी असं झालं. अर्थात दोन-चार वर्षांनंतर या झणझणीत तुटलेपणाची भावना मी विसरूनही गेलो. मध्ये काही वर्षं गेली.
सुरेंद्र बारलिंगे यांच्या पुढाकारानं अहमदनगर जिल्ह्यातल्या प्रवरानगर इथं आयोजित केलेल्या नवलेखक शिबिरात मी एक लेखक शिबिरार्थी होतो. तोपर्यंत माझे काही ललित लेख, पाच-सात कथा आणि बर्‍याचशा कविता कुठे कुठे प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे प्रवरानगरला भरलेल्या या नवलेखक शिबिरात मी जरा तुर्रेदार मिजाशीनंच मिरवत होतो.

त्याच शिबिरात गंगाधर गाडगीळांचं मार्गदर्शन आम्हा नव्या लेखकांना मिळणार होतं. अर्थात वाचन, चिंतन, निरीक्षण आणि त्यातही वैयक्तिक सुखदुःखांना तटस्थपणे पाहून त्यातून व्यक्त होणार्‍या वैश्‍विकतेवर त्यांचा भर होता.
शाळकरी वर्ष ते कॉलेज असा आठ-दहा वर्षांचा काळ मध्ये गेला होता. आता गाडगीळ माझ्यासमोर होते, नि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधीच जणू त्यांच्या रूपानं समोर होती. पण त्या संधीचंही सोनं कसं झालं ते बघणं हीच मोठी गंमत वाटे.
व्याख्यान संपल्यानंतर मी त्यांना भेटलो. पहिला औपचारिक भाग म्हणून मी म्हटलं, ‘‘गाडगीळसाहेब, आजचं व्याख्यान छान झालं.’’ यावर ते काही बोलतील अशी अपेक्षा होती, पण ते फक्त वरवरचं स्पष्ट जाणवेल असे हसले. त्यांनी माझी मनापासूनची प्रशंसा, एका छद्मी वाटाव्या अशा हसण्याच्या फराट्यानं दूर उडवली. पण मी दटून पुढे म्हणालो, ‘‘आम्हा साहित्याच्या विद्यार्थ्यांन, ‘साहित्याचे मानदंड’मुळे खूपच मदत होते.’’ आता गाडगीळ त्याविषयी काही बोलतील असं वाटलं, पण कसचं काय… गाडगीळ त्या पुढच्या पट्टीत हसले. उत्तर नाही. फक्त हसण्यातच ‘काय मूर्ख आहात!’ हा ध्वनी मला ऐकू येत होता. पण मी कोडग्या उत्सुकतेनं म्हणालो, ‘‘मी तुम्हाला काही कथा दाखवल्या तर आपण मार्गदर्शन कराल का?’’
या प्रश्‍नावर तर गाडगीळ आणखीनच वरच्या पट्टीत हसले.

पुढे पंधरा दिवस गाडगीळांच्या या तीन टप्प्यांत हसण्याची नक्कल करण्यात माझे, व ती नक्कल पाहून प्रचंड हसण्यात इतर नवोदित शिबिरार्थींचे दिवस खुमासदार झाले.
परंतु या वेळी मला बालपणी जसा त्यांचा राग आला होता तसा आला नाही. त्यांनी माझं बोलणं उडवून लावलं, कारण त्यातला पोकळपणा त्या बुद्धिमान व्यक्तिमत्त्वाला लगेच कळला असेल. मलाच खूप वाचन, चिंतन करायला हवं- तेच मी मला समजावलं.
योगायोगानं त्याच वाचनवेड्या काळात गंगाधर गाडगीळांचा बाळ सीताराम मर्ढेकर व त्यांच्यात जेे वाङ्मयीन नातं निर्माण झालं, त्याबद्दलचा अप्रतिम लेख वाचनात आला. मर्ढेकरांसारख्या युगप्रवर्तक कवीनं व मानदंड ठरलेल्या समीक्षकानं आपल्या कथा वाचून त्यावर अभिप्राय द्यावा म्हणून जी धडपड केली, त्याचं हृद्य वर्णन गाडगीळांनी केलं आहे. कार्यालयीन कामावरून जेव्हा मर्ढेकरांनी, गंगाधर गाडगीळांना फटकारलं, तेव्हा ‘त्या सरकारी कारकुनी कामावरून माझी कसली परीक्षा करता? मी ज्या कथा लिहिल्यात त्या वाचून माझी योग्यता पाहा.’ असं म्हणून पुढे गाडगीळ लिहितात, ‘रागात तरी मी अशी अपेक्षा का केली, याचंच आश्‍चर्य वाटलं, पण त्याहीपुढे जाऊन कथा मर्ढेकरांना वाचायला दिल्या. नंतर आता या कथांवर मर्ढेकर काय म्हणतात, याची मला कोडगी उत्सुकता लागून राहिली.’
ही ‘कोडगी उत्सुकता’ समोरच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रचंड कर्तृत्वामुळे असते. ती कुठल्याही क्षेत्रातल्या नवोदित लेखकाची त्याच्या मनातल्या मानदंड लेखकाबद्दल असू शकते. असे संदर्भ माझ्या मनाला दिलासा तर देतच असत, पण त्यांना भेटून आपण त्यांनाही प्रिय व्हायचं, हा संकल्पही निर्माण होत असे.
पुढे मी त्यांना पत्र पाठवत राहिलो. त्याची उत्तरं येत राहिली. कधी थोडक्यात, कधी सविस्तर. पण आता माझ्या सर्वांत प्रिय लेखकाच्या जवळ मी शब्दाशब्दानं जाऊ लागलो होतो. इतका की, त्यांचं पत्र आलं, ‘एकदा या की घरी गप्पा मारायला.’

मला अकारणच ‘तो’ प्रसंग आठवला. आठवावंसं वाटत नाही, ते अगदी अशाच वेळी आठवतं. मी त्यांच्याशी ‘गप्पा’ कराव्या इतका तेव्हाही नव्हतो, पण हा गंगाधर गाडगीळ यांच्या स्वभावाचाच मोठेपणा होता.
ठरलेल्या संध्याकाळी मी त्यांच्या घरी गेलो, तेव्हा गाडगीळ माझी वाटच पाहत होते. वासंतीबाई गाडगीळ कुठल्याशा निमित्तानं घरात नव्हत्या. स्वतः गाडगीळांनी स्टुलावर चढून धडपडत फडताळातल्या डब्यातले लाडू काढताना मला त्यांचा- ‘हाच तो ‘बंडू’ बरं का!’ हे आठवलं. आताचे अतिथ्यशील गाडगीळ वेगळे होते. या गप्पांत मी त्यांना कथाबीज ते त्या बीजाच्या आतला प्रवास याविषयी विचारलं. तेही त्यांच्या मला आवडलेल्या कथांचे संदर्भ देऊन. ‘बाई शाळा सोडून जातात’ किंवा ‘पराभूत’, ‘सरळ रेषा’ या त्यांच्या कथा आयुष्यातल्या एखाद्या क्षणात कळत नकळत कशा सामावलेल्या असतात, हे त्यांनी विस्तारानं सांगितलं.
त्या क्षणी वाटलं, ज्या गंगाधर गाडगीळांना मी भेटू इच्छित होतो, ते गाडगीळ हे आहेत, परंतु ते गाडगीळ मिळेपर्यंत पंचवीस वर्षांची दीर्घ प्रतीक्षा करावी लागली. या आणि नंतरच्या भेटीत गाडगीळ इतके खुलत गेले की, मी चकित झालो! हेच का ते गाडगीळ? बालपणात मला तुटक, अहंकारी वाटलेले! ‘दुर्दम्य’सारखी मानदंड कादंबरी कुठे लिहिलीत, मला त्याची उत्सुकता होती. खिडकीलगतचं त्यांचं लेखन टेबल त्यांनी मला आत्मीयतेनं दाखवलं.
गंगाधर गाडगीळ हे मिस्कीलतेनं प्रतिपक्षाच्या वर्मावर प्रहार करत, पण ते वर्म वैयक्तिक नसे. साहित्यातले तात्त्विक मतभेद व्यक्त करणार्‍या निःस्पृह विचारवंतांचे वैचारिक मतमंथन अनुभवणं ही आमच्या नव्या पिढीची वैचारिक चैन होती. गाडगीळ- दुर्गा भागवत, गाडगीळ- जयवंत दळवी, गाडगीळ- पु. भा. भावे- अशा नामवंतांची निर्भीड मतं ऐकण्यात-वाचण्यात व त्या दृष्टीनं दुसर्‍या दिवशीचे वृत्तपत्र पाहण्यात गंमत वाटत असे.

त्याच दरम्यान ‘अखिल भारतीय साहित्य संमेलन’ दर वर्षीप्रमाणे विविध वादंगांनी रंगलं होतं. शासन आणि साहित्यिक असा कलगीतुरा रंगला होता. संमेलनावर बहिष्कार, शासनानं दिलेली पारितोषिकं परत करणं, निदान ती परत करतो आहोत असा आवेश निर्माण करण्यात वातावरण तापवणं हे सुरू असतानाच रायपूर इथं भरणार्‍या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाधर गाडगीळ झाले. या संमेलनावर बहिष्कार टाकणारं पर्यायी साहित्य संमेलन मालतीबाई बेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत आयोजित केलं होतं.
एक उत्साही व उत्सुक युवक म्हणून एका अर्थानं गाडगीळांच्या विरोधात ठाकलेल्या या संमेलनात मी एक रसिक म्हणून गेलो होतो. गंगाधर गाडगीळ हे एका प्रख्यात उद्योजक समूहाचे अर्थसल्लागार होते, त्यामुळे भांडवलदारांचे प्रतिनिधी साहित्यिक म्हणून टीकेची सल उडवण्याची आयतीच संधी त्यांना प्रतिस्पर्धी मानणार्‍या साहित्यिक गटांना मिळाली होती. गंमत म्हणजे या सार्‍याचा एकत्रित निषेध करण्यासाठी जे पर्यायी साहित्य संमेलन विशेष प्रकारे जनतेच्या मदतीनं भरवलं, त्या संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगीच गंगाधर गाडगीळ दमदार चालीनं, अगदी निर्भय देहबोलीनं आत्मविश्‍वास व्यक्त करत येताना मी पाहिले.
त्या अरुण- तरुण वयात अशा घटनांची विशेष छाप पडते. स्वतःच्या मतांवर अभ्यासपूर्ण ठाम असणारीच व्यक्तिमत्त्वं ठाम असतात आणि गंगाधर गाडगीळ हे त्या साहित्यिकांपैकी होते.
एका भेटीत गाडगीळांना मी माझी शंका- कुतूहल- काही म्हणा- मोकळेपणानं विचारलं, ‘‘गाडगीळसाहेब, हल्ली बहुतेक लेखक- तेही नवे लेखक- आत्मचरित्र- लेखनाला सुरवात करतात- आपलं काय मत आहे?’’
गंगाधर गाडगीळ यांनी जे मत मांडलं ते खरं तर प्रत्येकानंच अंतर्मुख व्हावं असं आहे. गाडगीळ म्हणाले, ‘‘खरं तर आयुष्यातले संघर्ष, मान, अपमान, नात्यातले भोवरे, एकाकीपण- या सार्‍याच्याच कथा, कादंबर्‍या करायच्या असतात. त्यातून पुढच्या अनेक कथांना बीजं मिळतात. यातूनच लेखक विकसित होतो. पण हे लेखक आपलं सारं पुढचं म्हणणं पहिल्याच लेखनात म्हणून मोकळे होतात. मग सांगायला काही उरतच नाही. एकाच पुस्तकात ही मंडळी संपतात…’’
गाडगीळांच्या या म्हणण्याचा माझ्या मनावर नुसता परिणामच झाला नाही, तर पुढच्या लेखनाला- लेखनबीजांना नवं अवकाश देणारी दिशा त्यातून मिळाली. गाडगीळ हे माझे आवडते साहित्यिक नेहमीच होते, पण त्यांच्या अशा निरभ्र चिंतनानं, प्रसंगी परखड विचारांनी ते माझे आवडते माणूसही झाले.
गाडगीळांच्या व्यक्तिमत्त्वात एक फिरकी गोलंदाज दडलेला होता. गंभीर दिसणार्‍या त्यांच्या बाह्यरंगाशी मैत्री जडली की तो खोडकर बुद्धिमान मुलगा जागा होई. गाडगीळांच्या अनेक भेटींत तो खोडकर मुलगा मला भेटला आहे. एका बुद्धिमान पण तापट विदुषी लेखिकेबद्दल बोलताना तेे असेच मिस्कीलपणे बोलून गेले, ‘‘बरं झालं या बाईनं लग्न केलं नाही. एक पुरुष वाचला.’’ तर एका समारंभात एका विख्यात नटाकडे बोट करून मला म्हणाले, ‘‘अभिनेता बराय, पण पक्का बेरड वाटतो.’’ शांतपणे गंमत करून खळखळून हसावं ते गंगाधर गाडगीळांनीच!

तो काळ नामवंतांच्या खर्‍या-खोट्या किश्श्यांचा पण त्यांच्या नात्यांमधलं निरोगीपण सुचवणारा असे. गाडगीळ नि पु. भा. भावे या नवकथाकारांपैकी दोघांचेही आरोप-प्रत्यारोप- त्याची उत्तरं अशीच मिस्कील. त्यातलाच एक मी ऐकला होता.
गाडगीळ भावेंना म्हणाले, ‘‘तुझी ‘मौज’मधली कथा वाचली. अगदी भिकार आहे!’’ भावे पटकन गाडगीळांना म्हणाले, ‘‘मग भिकार कथा लिहायचा मक्ता काय तुम्हालाच दिलाय का?’’
तसाच पुलंचा नि गाडगीळांचाही एक किस्सा मी वाचला होता.
गाडगीळांनी विनोदी लेखनाविषयी म्हटलं होतं, ‘‘विनोदी लेखन हा साहित्यामधला अतिशय दुय्यम साहित्य प्रकार आहे.’’
त्यावर पुलं म्हणाले, ‘‘गाडगीळांचं विनोदी लेखन वाचल्यावर, ते म्हणताहेत त्यात तथ्य जाणवतं.’’
एकदा प्रवासात मी त्यांना मुद्दामच या दोन्ही किश्श्यांविषयी विचारलं, तेव्हा उत्तरं टाळायची, किंवा समोरच्या प्रश्‍नकर्त्याला गप्प करण्याची त्यांची जुनी चलाखी त्यांनी वापरली. ते फक्त सातमजली हसले आणि मग फक्त, ‘घडतात गमती कधीकधी’ म्हणत पुन्हा हसले.
प्रत्येक पत्रात ‘गप्पांना या एकदा घरी’ हा आग्रह असायचाच. मी सप्रेम भेट पाठवलेल्या पुस्तकावर सुखावणार्‍या चार ओळी असायच्या. तर भेटीत स्वतःचं पुस्तक स्वाक्षरी करून सप्रेम भेट देण्यात त्यांना आनंद वाटत असे.

‘एका मुंगीचं महाभारत’ या त्यांच्या प्रदीर्घ आत्मचरित्राबद्दल त्यांच्या खूप अपेक्षा असाव्यात. त्यांना अपेक्षित अशी चर्चा वा दखल घेतली जात नसावी. मग त्यांनी वाचकांशी थेट भेटून चर्चा आयोजित करण्याचा उपक्रम घेतला. त्यांच्या या पुस्तकाबद्दल मी त्यांना बोलतं करावं, त्यांची मी विशेष मुलाखत घ्यावी असंही ठरवलं. पार्ले इथल्या ‘लोकमान्य संघा’तली त्यांची मुलाखत रंगली. त्यांची उत्तरंही मासलेवाईक असत. उदाहरणार्थ, एका मुलाखतीत मी विचारलं, ‘‘गाडगीळसाहेब, तुमच्यानंतर तुमची पुस्तकं वाचली जातील, उरतील असं तुम्हाला वाटतंय का?’’
गाडगीळ त्यांचा एक आतला छद्मी स्वर काढून म्हणाले, ‘‘वाचली गेली किंवा नाही गेली, मला कुठे कळणार आहे ते! आता वाचक प्रेम करत आहेत, त्याचा मी आनंद घेतो आहे. पुढे काय होईल, मला कसं कळणार?’’
सरळ वाटणार्‍या भोळसर उत्तरातली प्रांजळता निर्व्याज होती. गंगाधर गाडगीळ हे माझे जिवलग झाले ते त्यांच्या एका स्वाभाविक गोडव्यामुळे. माझं ‘रूप-अरूप’ हे पुस्तक मी त्यांना अर्पण केलं. त्यानंतर कृतज्ञतेचं हे नातं आणखीनच जिव्हाळ्याचं झालं ते- आणखी एका घटनेनं. मी माझ्या अकरा नव्या पुस्तकांचं प्रकाशन एकाच वेळी त्यांच्या हस्ते व्हावं, अशी विनंती करताच, प्रकृती बरी नसतानाही ते आले. भरभरून बोलले. एका वाङ्मयीन नात्याचा उत्कट, प्रांजळ प्रवास मी त्यांच्याशी जडलेल्या स्नेहाच्या रूपानं अनुभवला.

25 डिसेंबर 1995 रोजी मला लिहिलेल्या पत्रातून ते म्हणतात, ‘‘तुमचे ‘प्रकाशाची अक्षरे’ या संग्रहातले ललित निबंध, विविध अनुभव वाचनीय शैलीत व्यक्त होतात. आणि त्यातून ते तुमची रसिकता, भावपूर्णता, सरळपणा आणि संवेदनक्षमता व्यक्त करतात. या ललित लेखांची शैलीदेखील साधी आणि प्रत्ययकारी आहे.’’ पुढे शेवटी ते म्हणतात, ‘‘तुम्ही एकदा घरी यायचं कबूल केलेलं आहे. समक्ष भेटीत अधिक बोलता येईल.’’
आज या क्षणी त्यांच्या टपोर्‍या सुवाच्च अक्षरातलं ते पत्र माझ्यासमोर आहे. पत्र आलं त्याला आता पंचवीस-सव्वीस वर्षं लोटली. पण त्या वेळी डोळ्यांत आनंदाश्रू आले होते. गाडगीळांनी केलेल्या त्या प्रशंसेनं मी निश्‍चितच सुखावलो होतो.
आता हे पत्र वाचतानाही डोळ्यांत अश्रू आहेत नि त्यांची ती मिस्कील डोळ्यांची पण व्यासंग नि कर्तृत्वाच्या अधिकाराची जरब असलेली मूर्तीही!
गाडगीळसाहेब! खूप बोलायचं राहून गेलं- एवढंच खरं!
आजही मी तो प्रसंग नव्यानं जगतो आहे.
मी भीत भीत दारावरची बेल दाबतो आहे. साखळी लावलेल्या दरवाजातून एक चेहरा मला निरखतो आहे.
‘लेखक गंगाधर गाडगीळांना पाहायचं आहे..’
‘पाहिलं ना? मग निघा!’
आजही मी त्या दारात तसाच उभा आहे. वय वाढलंय, पण कुतूहल तेच!
गाडगीळांना पूर्ण जाणून घेण्यासाठी तसाच उत्सुक… काहीतरी हरवून गेलेला दरवाजा पूर्ण उघडण्याची वाट पाहत…

– प्रवीण दवणे

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.