Now Reading
वरलिया रंगा- डिझाईन्स

वरलिया रंगा- डिझाईन्स

Menaka Prakashan

डिझाईन्स हीदेखील बौद्धिक संपदेपैकी एक महत्त्वाची संपत्ती. म्हणूनच तिची चोरी होऊ नये किंवा एकसारख्या डिझाईन्समुळे ग्राहकांची फसवणूक होऊ नये, म्हणून या संपदेलाही कायद्यानं संरक्षण देऊ केलंय. हा कायदा काय आहे, कोणाच्या बाजूनं आहे आणि त्याचे निकष काय याविषयी विस्तारानं…

‘ऊस डोंगा परि रस नाही डोंगा
का रे भुललासि वरलिया रंगा…’
संतश्रेष्ठ तुकाराम महाजांची ही द्विपदी माणसासाठी मार्गदर्शक आहे. एखाद्या व्यक्तीच्या बाह्य रंगरूपापेक्षा तिचं अंतरंग कसं आहे, हे जास्त महत्त्वाचं असतं, असं महाराज म्हणतात आणि अर्थातच ते
सुयोग्यच आहे.
पण व्यावसायिक जगात मात्र बरोबर विरुद्ध पद्धत आहे. इथं ‘वरलिया रंग’च सगळ्यात महत्त्वाचा!
तुमचं उत्पादन सर्वोत्तम असू दे, एकमेवाद्वितीय असू दे, ‘हटके’ही असू दे, पण जर ते दिसायला ओबडधोबड, मळकट, बोजड असलं तर ग्राहक त्याच्याकडे ढुंकून बघणारही नाही. उलट, तुमचं उत्पादन दिसायला अतिशय आकर्षक असेल, तर ग्राहक ते पटकन उचलून हातात घेईल, निरखून पाहील आणि त्याला गरज नसली, तरी केवळ ते दिसायला छान आहे, म्हणून कदाचित विकतही घेईल. खरं की नाही? म्हणूनच अधिकाधिक व्यवसाय करायचा असेल, अधिकाधिक यशस्वी व्हायचं असेल तर तुमचं उत्पादन गुणवत्ता आणि देखणेपण या दोन्ही कसोट्यांवर उतरायला हवं. अर्थातच कल्पक बुद्धिवंतांना हे आणखी एक नवीन आव्हान वाटतं आणि त्यातून साकार होतात विविध रंग, रूप, आकार धारण करणारी आणि त्याद्वारे ग्राहकांना भुरळ घालणारी उत्पादनं. उत्पादनाच्या या विशिष्ट आकाराला इंग्रजीत म्हणतात ‘डिझाईन’. अर्थातच, ही एक बौद्धिक संपदा आहे आणि या सगळ्या डिझाईन्सना कायदेशीर संरक्षण मिळू शकतं. त्यासाठीच्या कायद्याचं नाव आहे- ‘डिझाईन्स अ‍ॅक्ट, 2000’.

डिझाईन म्हणजे काय?
डिझाईन म्हणजे टू डी किंवा थ्री डी पद्धतीनं निर्माण केलेल्या कोणत्याही वस्तूचा आकार, माप, विशिष्ट रेखन, दागिना किंवा रेघा अथवा रंगांचा वापर करून तयार केलेली एखादी वस्तू. ही वस्तू हातानं किंवा रसायनं वापरून किंवा यंत्राचा वापर करून तयार केलेली असू शकते. एकापेक्षा अधिक प्रक्रिया करूनही या वस्तूची निर्मिती केलेली असू शकते. पण अंतिमत: जी वस्तू तयार होते तिचं मूल्यमापन केवळ ‘ती कशी दिसते’ या एकाच कसोटीवर केलं जातं. याला म्हणतात ‘डिझाईन’. ती वस्तू आतून कशी आहे, ती नेमकं कसं काम करते, त्यात कोणत्या यांत्रिक/रासायनिक/इलेक्ट्रॉनिक करामती आहेत याच्याशी ना निर्माणकर्त्याला, ना वापरकर्त्याला देणं-घेणं असतं.
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, ‘ट्रेडमार्क्स अ‍ॅक्ट’, 1957/1999 अंतर्गत नोंदणी केलेला ‘ट्रेडमार्क’ किंवा कॉपीराईट्स अ‍ॅक्ट, 1957 अंतर्गत नोंदणी केलेली कोणतीही ‘कलाकृती’ म्हणजे डिझाईन नव्हे. ट्रेडमार्क वेगळा, कॉपीराईट वेगळा आणि डिझाईन वेगळं. प्रत्येकाची स्वत:ची वैशिष्ट्य आहेत आणि वेगळेपणादेखील.
थोडक्यात, डिझाईन म्हणजे डोळ्याला दिसणार्‍या वस्तूचा विशिष्ट आकार, रंग, माप आणि वजन.

डिझाईनची नोंदणी
आपली वस्तू इतरांपेक्षा वेगळी दिसावी, आकर्षक दिसावी यासाठी तिचा मालक तिच्या रंग-रूपावर बरीच मेहनत घेतो. मग त्याला या मेहनतीचं फळ मिळायला हवं. त्याचं डिझाईन ‘एक्सक्लूझिव्ह’ म्हणजेच ‘एकमेवाद्वितीय’ असायला हवं. ते इतर कोणीही वापरता कामा नये. त्यासाठी डिझाईनची नोंदणी आवश्यक असते.
भारतामध्ये ‘कन्ट्रोलर ऑफ पेटंट्स’ म्हणजेच पेटंट निबंधकाच्याच कार्यकक्षेखाली ‘डिझाईन्स’ची नोंदणीदेखील होते. इतर कोणत्याही बौद्धिक संपदेपेक्षा डिझाईनची नोंदणी तुलनेनं सोपी असते. अर्ज करणं, त्यात आपल्या उत्पादनाबद्दल सर्वंकश माहिती देणं, नोंदणी शुल्क भरणं वगैरे सोपस्कार असतातच. पण हा कायदा केवळ दृश्य वस्तूंना लागू असल्यामुळे आपलं उत्पादन पडताळणीसाठी निबंधकाच्या हातातच (बहुतांश वेळा) सुपूर्त करता येतं- ‘हा सूर्य हा जयद्रथ’सारखं! म्हणजे, त्याच्या कार्यालयात अर्जाबरोबर सादर करता येतं. अर्जाचा प्रवास साधारणपणे असा होतो-
1) अर्जाची छाननी- पूर्ण माहिती भरली आहे ना, याची खातरजमा केली जाते. यात अनेक तांत्रिक बाबीही समाविष्ट असतात. ट्रेडमार्कप्रमाणे, डिझाईनदेखील विशिष्ट ‘क्लास’ म्हणजे श्रेणीत दाखल करावं लागतं. श्रेणींची यादी संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रत्येक डिझाईनला किमान एका श्रेणीत स्थान पटकवावं लागतं.
2) मालकी- कधीकधी एकसारखी दोन डिझाईन्स नोंदणीसाठी येतात. मग ज्यानं अर्ज आधी केला आहे, त्याला प्राधान्य मिळतं. ‘डिझाईन नक्की कोणाच्या मालकीचं आहे’ यावरही दोन पार्ट्यांत वाद असू शकतात. ते सोडवण्याचं कामही निबंधक करतो. त्यामुळे, मालकी निश्चित करणं ही झाली दुसरी पायरी.
3) एक्स्क्लूझिविटी- मालकीचे वाद सुटले, की डिझाईनच्या ‘वेगळेपणाची’ छाननी होते. खरंच डिझाईन वेगळं आहे का, एकमेवाद्वितीय आहे का, आधीच नोंदणी झालेल्या कोणत्या डिझाईनशी हे नवीन डिझाईन मिळतंजुळतं नाहीये ना याची खातरजमा करणं ही पुढची पायरी.
4) नकाराची कारणं- डिझाईन वेगळं नाही किंवा त्यासारखंच एक डिझाईन आधीच नोंदणीकृत आहे या कारणास्तव नवीन डिझाईनची नोंदणी नाकारली जाऊ शकते. कधीकधी आपल्या देशात ते डिझाईन नवीन असू शकतं, पण जगात कोणीतरी, कुठेतरी त्यासारख्याच डिझाईनची आगाऊ नोंदणी करून त्यावर जागतिक हक्क मिळवलेले असू शकतात. अशा वेळीही नोंदणी नाकारली जाऊ शकते.
नग्नता, अश्लीलता, सामाजिक स्वास्थ्य/ सलोखा कायम ठेवण्यासाठी, धार्मिक भावना दुखावू नयेत म्हणून- या कारणास्तवही डिझाईनची नोंदणी नाकारली जाऊ शकते. त्यामुळे डिझाईनकर्त्याला नवीन रचना करताना या सगळ्याचं भान ठेवणं
आवश्यक असतं.
नकाराचं कारण पटलं नाही, तर उच्च न्यायालयात जाण्याचा मार्ग खुला आहे. तिथं दिवाणी दाव्याप्रमाणे सुनावणी होऊन तुमची बाजू ऐकली जाऊ शकते. दुसर्‍या बाजूनं पेटंट निबंधक त्याची बाजू मांडतो. दोन्ही बाजू ऐकल्यावर न्यायालय जो निर्णय देईल तो बंधनकारक असतो.
5) नोंदणी- डिझाईनच्या नोंदणीमध्ये काही अडचण नसेल, किंवा जे काही आक्षेप आहेत ते दूर केले की मग ‘बौद्धिक संपदा’ म्हणून डिझाईनची नोंदणी होते. निबंधकाच्या कार्यालयात एक नोंदवही असते, ज्यामध्ये तुमच्या डिझाईनसंबंधी सर्व माहिती नोंदवली जाते. हीच सगळी माहिती संगणकावरदेखील नोंदवली जाते.
कॉपीराईटची ‘असाईनमेन्ट’ होऊ शकते, त्याच प्रमाणे डिझाईनसंबंधीचे हक्कदेखील दुसरी व्यक्ती/ संस्था यांच्या नावे हस्तांतरित होऊ शकतात. किंवा नोंदणीकृत डिझाईनच्या मालकाचं निधन झालं, तर त्याच्या वारसांच्या नावे आता डिझाईनची नोंदणी होते. अशा पद्धतीनं मालकीच्या बदलांसंबंधी सगळ्या नोंदीही याच
नोंदवहीत होतात.
पेटंटप्रमाणेच, डिझाईनची नोंदणी झाली, की डिझाईनच्या मालकाच्या नावे तसं एक प्रमाणपत्र पेटंट निबंधकाच्या कार्यालयातून जारी केलं जातं. ते विशिष्ट डिझाईन तुमची नोंदणीकृत बौद्धिक संपदा आहे याचा पुरावा म्हणजे हे प्रमाणपत्र.

नोंदणीकृत डिझाईनचा कालावधी
डिझाईन्स अ‍ॅक्ट, 2000 अंतर्गत नोंदणी झालेल्या डिझाईनला दहा वर्षं संरक्षण मिळतं. म्हणजेच, नोंदणीच्या तारखेपासून दहा वर्षं केवळ त्याचा मालक, किंवा मालक ठरवेल ती व्यक्ती/ संस्था त्या डिझाईनचा वापर करून आपलं उत्पादन बाजारात
विकू शकतो.
दहा वर्षं संपल्यानंतर आणखी पाच वर्षं या संरक्षणाचा कालावधी वाढवता येऊ शकतो. त्यासाठी थोडं शुल्क भरावं लागतं.
थोडक्यात, तुम्ही एकूण पंधरा वर्षं तुमच्या डिझाईनचा पुरेपूर व्यावसायिक वापर करू शकता आणि त्यापासून फायदा मिळवू शकता. पंधरा वर्षानंतर मात्र ही मिरासदारी संपुष्टात येते आणि ते डिझाईन सर्वांसाठी खुलं होतं. त्या नंतर कोणीही त्या डिझाईनचा वापर करून आपलं स्वत:चं उत्पादन तयार करू शकतो आणि विकूही शकतो.

कॉपीराईट ऑफ अ डिझाईन
डिझाईनची आणखी एक गंमत आहे. या एका बौद्धिक संपदेत अनेक बौद्धिक संपदा एकत्र आल्या आहेत:-
– ‘पेटंट्स’चा निबंधक हाच डिझाईनचा प्रमुख निबंधक असतो.
– डिझाईनची नोंदणी झाली की तुम्हाला त्यात ‘कॉपीराईट’ मिळतो. त्यालाच म्हणतात ‘कॉपीराईट ऑफ अ डिझाईन’
– डिझाईन आणि ‘ट्रेडमार्क’ यात तुम्हाला एकाचीच निवड करावी लागते. हा मुद्दा विस्तारानं बघूया. ट्रेडमार्क म्हणजे व्यापार चिन्ह. हे चिन्ह तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या सर्व ठिकाणी, उत्पादनांवर, जाहिरातींत, वेष्टनांवर वापरू शकता हे आपण आधी पाहिलं आहे. आता, डिझाईन म्हणजे उत्पादनाचा आकार. हा आकार म्हणजेच तुमचा ट्रेडमार्कही असू शकतो. त्यामुळे तुम्ही जर या आकाराची नोंदणी ‘डिझाईन’ म्हणून केली, तर ट्रेडमार्क म्हणून तुम्हाला परत त्याच आकाराची नोंदणी करता येत नाही. मग तुम्हाला वेगळा ट्रेडमार्क निर्माण करावा लागेल. आकाराची निवड कशासाठी करायची- ट्रेडमार्क म्हणून, का डिझाईन म्हणून हा निर्णय तुमचा. पण एकदा तो निर्णय झाला, की परत मागे फिरता येत नाही.

डिझाईनचे फायदे
वस्तूचं डिझाईन एकदा ठरलं, की मोठ्या प्रमाणावर त्या डिझाईनबरहुकूम तिची निर्मिती होऊ शकते आणि ती बाजारात विकली जाऊ शकते. तुमच्या डिझाईनच्या आधारे लोक तुमचं उत्पादन ओळखायला लागतात. उदाहरणार्थ- ‘पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर’ म्हणजेच बाटली बंद पाणी. काही वर्षांपूर्वी फक्त ‘बिसलेरी’ या कंपनीची या क्षेत्रात मक्तेदारी होती. साधी एक लिटरची ॅस्टिकची बाटली आणि त्यावर निळ्या रंगात ‘बिसलेरी’ हे शब्द लिहिलेले असत. मग हळूहळू बाटलीबंद पाणी पिण्याची ‘क्रेझ’ वाढली, तशा अनेक कंपन्या या बाजारात उतरल्या- ‘अ‍ॅक्वाफिना’, ‘किनले’, ‘ऑक्सिरिच’ वगैरे. याचबरोबर या बाटल्यांसारख्याच दिसणार्‍या अनेक नकली बाटल्याही सर्रास विकल्या जाऊ लागल्या. गंमत म्हणजे, ‘झेरॉक्स’प्रमाणे अनेक जण ‘बिसलेरी दे रे’ म्हणायचे, आणि हातात पडायची ‘बिसलेरी’सारखी दिसणारी ‘बॉसलेरी’ची बाटली! ही फसवणूक थांबवण्यासाठी मग या सगळ्या कंपन्या एकत्र आल्या आणि त्यांनी आपापली अधिकृत डिझाईन्स तयार केली आणि रंगही. आता तुम्ही बघाल, तर ‘किनले’ची पाण्याची बाटली एका विशिष्ट आकाराची असते, ‘ऑक्सीरिच’ने पांढरा रंग आपलासा केला आहे, ‘अ‍ॅक्वाफिना’ निळीच आहे, तर ‘बिसलेरी’ने बाटलीचा रंग हिरवा केला आहे. आता कोणत्याही निळ्या रंगाच्या बाटलीला ‘बिसलेरी’ म्हणून खपवता येत नाही. आता सजग ग्राहक ‘बिसलेरी’ मागतो तेव्हा पारखून हिरव्या रंगाची बाटलीच घेतो. ही असते ‘डिझाईन’ची महती.

See Also

सारांश
‘डिझाईन’ हा सध्याचा ‘हिट अँड हॉट’ विषय आहे. ‘अ‍ॅपल’ ही कंपनी या डिझाईन-बाजारपेठेचं आदर्श उदाहरण आहे. त्यांचे फोन, लॅपटॉप्स, घड्याळं यांच्या डिझाईन्सवर ते पहिल्यापासूनच प्रचंड मेहनत घेतात. त्यामुळेच आयफोन्सचं देखणेपण, मॅकबुकचं वेगळेपण यावर आजही चर्चा झडतात, आजही अ‍ॅपलच्या उत्पादनांना प्रतिष्ठा आहे ती त्यांच्या ‘युनिक डिझाईन्स’मुळेच.
– उत्पादनाच्या डिझाईनवर आज प्रत्येक उत्पादकच खूप खर्च करतोय, कारण सध्याची संपूर्ण जागतिक बाजारपेठ ही ग्राहककेंद्री आहे.
– आपल्या उत्पादनाचा रंग, आकार, वजन ग्राहकाला आकर्षून घेईल असं हवं.
– आपल्या उत्पादनातून ग्राहकाला जास्तीत जास्त सोयीसुविधा मिळायला हव्यात.
– आपल्या उत्पादनाची छाप ग्राहकाच्या मनावर कायमची पडायला हवी.
– आपल्या उत्पादनाचं वेगळेपण ग्राहकाच्या मनात ठसायला हवं.
– या सगळ्याचं महत्त्व उत्पादकांना कळलं आहे.

आपण हे सगळं केलं, करत राहिलो तर ग्राहक आपल्या उत्पादनांपासून कधीच फारकत घेणार नाही हे उत्पादकांना उमजलं आहे. ग्राहकाचा इतका विचार केला, की आपोआपच उत्पादनाचीही गुणवत्ता वाढते. स्पर्धात्मक बाजारपेठेत आपलं उत्पादन उठून दिसतं.
शिवाय, ही एक बौद्धिक संपदा आहे. नोंदणीकृत डिझाईन्सना कायद्याचं संरक्षण आहे. मालकाच्या परवानगीविना कोणीही त्याचा वापर करू शकत नाही. केला, तर त्याच्याविरुद्ध कारवाई होऊ शकते. या बौद्धिक संपदेचे हे अनेक फायदे आता नव्यानं लोकांना कळत आहेत.
कोणत्याही कायद्याचे फायदे जेव्हा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचतात तेव्हाच तो खर्‍या अर्थानं यशस्वी झाला असं म्हणता येतं. ‘डिझाईन्स अ‍ॅक्ट, 2000’चा लाभ उत्पादकांपासून वापरकर्त्यांपर्यंत सगळ्यांना मिळत आहे. त्या दृष्टीनं हा कायदा अत्यंत यशस्वी झालेला आहे.

– पूनम छत्रे

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.