Now Reading
वपु : इंद्ररंगी स्केचपेन

वपु : इंद्ररंगी स्केचपेन

Menaka Prakashan

आठ दशकांच्या आयुष्यात जवळजवळ सहा दशकं आपल्या जीवनाचा प्रत्येक अंश कवितेसाठी समर्पित असलेलं हे व्यक्तिमत्त्व माझ्या उमेदवारीच्या काळात मायेची शाल पांघरत आलं आणि पुढे मार्गदर्शक, गुरू, स्नेही अशा रूपात प्रेरक ठरलं. ज्या उमद्या मनाच्या, रसिकतेनं ओतप्रोत असलेल्या एका श्रेष्ठ वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाविषयी मी आज बोलत आहे, ते आपलं सर्वांचंच लाडकं आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणजे व. पु. काळे.

प्रीतीप्रमाणेच जिवलग मैत्रीचीही व्याख्या करता येत नाही, आणि त्यात कुणी वेळही घालवू नये… पण व्याख्या न करता असं म्हणता येईल, आपण नेमकं केव्हा, कुठे भेटलो हे जेव्हा स्मरत नाही आणि भेटीचा प्रवास मात्र सुरूच राहतो; त्यात मैत्रीचं रहस्य असावं. वपुंबाबत थोडं तसंच म्हणता येईल.
कथाकथनाच्या गारुडाचे ते दिवस होते. गंमत म्हणजे, कथाकथनांनी वेडे झालेले त्यांचे हजारो श्रोतेच पुढे त्यांचे अगदी वपुनिष्ठ वाचक झाले. त्याचप्रमाणे वपुंच्या; आपल्या मध्यमवर्गीय घरांचं प्रतिबिंब वाटाव्या अशा कथा वाचल्यावर, ‘आपलीच कथा लिहणारा कोण बुवा हा लेखक?’ या ओढीनं त्यांच्या वाचकांची पावलंही कथाकथन ऐकण्याकडे वळली. असा हा काना-डोळ्यांच्या दोन्ही वाटेवर भेटणार्‍या लेखकाकडे रसिकांनी काणाडोळा करणं शक्यच नव्हतं.
माझीही त्यांच्याशी भेट अशीच एका गणेशोत्सवाच्या तुडुंब कथाकथन कार्यक्रमात झाली असावी. खर्‍या अर्थानं ते दूर-दर्शन होतं. विशेष म्हणजे आरंभीचा साधा संवाद ते कथेत असा बेमालूम मिसळून टाकत, की श्रोत्यांना आपण कथेत केव्हा शिरलो ते कळतच नसे. उदा.‘नेहमीप्रमाणे गाड्या विलंबानं. ही तुडुंब गर्दी; म्हटलं शिरता येईल की नाही कोण जाणे! संयोजकांनी प्रथम वर्गाचा खर्च दिला होता; म्हणून सेकंड क्लासचे डबे धावतच दूर सारत मी प्रथम वर्गापर्यंत आलो खरा, पण प्रचंड गर्दीनं प्रथम व द्वितीय हा भेद मिटवलेला- पण तेवढ्यात- अगदी बिनधास्त हाक आली- ‘अरे वसंता-!’

आता कथेतली व्यक्तिरेखा अशा प्रकारे श्रोत्यांच्या वर्तमानात भिडवण्याचं आगळं कसब खास वपुंचंच होतं. त्यांचा असा खास ठळक श्रोतृवर्ग व म्हणूनच वाचकवर्ग जगात जिथं तिथं होता. वपुंनी ही लोकप्रियता प्रचंड परिश्रमानं आणि सातत्यानं जपलेल्या ध्यासानं मिळवली होती. केवळ एकटा कथाकथनकार अडीच तास-अडीच हजार श्रोत्यांना मंत्रमुग्ध करू शकतो, हे नवल आम्ही अनुभवत होतो. अगदी सुवर्णकाळाचा मध्य नव्हे, पण सुवर्णकाळाच्या कलत्या सावल्या मनावर पडलेला काळ माझ्या त्या वेळच्या नव्या पिढीनं अनुभवला.

एकीकडे शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर आणि द. मा. मिरासदार यांच्या त्रि-रंगी कथा बहार उडवत होत्या. प्रत्येकाची धाटणी वेगळी, कथेतला प्रदेश वेगळा, माणसं वेगळी. त्यांची सुखदुःखं वेगळी. त्याच वेळी विंदा करंदीकर स्वतःची शैली जपत शेकडो श्रोत्यांना ‘पहिल्या हिरव्या तृण पात्याचा आज असे सत्कार!’ सांगत संवेदनांच्या झुल्यावर झुलवत होते. त्याच वेळी लोंबकळणारी माणसे, मी माणूस शोधतोय म्हणत चाळीतून जगणारा, मध्यवर्गीयांच्या कुचंबणेची अगतिकता सोसलेला एक लेखक त्याचीच कथा-कथनातून मांडत होता. समस्त श्रोत्यांच्या खांद्यावर जणू हात ठेवून त्याच्या डोळ्याशी हितगुज करत त्यांचीच कथा सादर करत होता. वपु कथनातून आणि पुस्तकाच्या पानातूनही हा मध्यम-मध्यमवर्ग काबीज करत होते. खरं तर शब्दांचा लळा लावत होते. पुलंच्या खेळिया प्रकारच्या कथनापेक्षा हा कथनाचा अंदाज वेगळा होता. तो तेवढाच लोकप्रिय होता. त्या संमोहित श्रोतृवृंदातलं एक टिंब मीही होतो.
बालपणातलीच एक घटना; वपुंच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकणारी आहे. रवींद्र नाट्यमंदिरात वपुंचं कथाकथन होतं. कार्यक्रमानंतर वपुंची स्वाक्षरी घेण्यासाठी झुंबड उडाली. मीही त्यापैकीच. स्वाक्षरी घेण्यापूर्वी मी एक वेगळंच दृश्य मनात साठवत होतो. वपु प्रत्येकाला स्वाक्षरी देत होतेच, पण प्रत्येकाला वेगवेगळ्या रंगांच्या स्केचपेननं. कुणाला गुलबक्षी, कुणाला आकाशी, कुणाला मोरपिशी…

यापूर्वी मी अनेक नामवंतांची स्वाक्षरी घेतली होती, पण जवळ स्केचपेनचा संच ठेवून वेगवेगळ्या रंगांत, एखादी तान घुमावी अशी स्वाक्षरी वपु देत होते. वपुंचं हे स्वाक्षरी दर्शन केवळ विलोभनीय होतं. जगण्यातलं, लेखनातलं अनेकरंगीपण स्वाक्षरी देण्याच्या साध्या कृतीतूनही प्रकट झालं होतं.
एरवी व्यवहारासाठी स्पष्ट वाटणारे वपु भावनेच्या ओलाव्यानं माणसांचं मन कसं जपतात, याची ओळख कॉलेजमध्ये घडलेल्या प्रसंगानं झाली. ठाण्याच्या बेडेकर कॉलेजमध्ये मी मराठी वाङ्मय मंडळाचा विद्यार्थी प्रतिनिधी होतो. उद्घाटनाला वपुंना बोलवावं असं मी सुचवताच, प्राध्यापक म्हणाले, ‘अशक्य! वपुंचं मानधन आपल्या कॉलेजला झेपणार नाही.’ मी म्हटलं, ‘मी प्रयत्न तर करतो, त्यांच्या घरी जाऊन येतो.’

मी ‘झपूर्झा’ साहित्य सहवासमध्ये धडधडत्या अंतःकरणानंच गेलो. दारावर लयदार स्वाक्षरीरूप नाव. बेल दाबताच वपुंनीच दार उघडलं. एक विद्यार्थी समोर आहे, तरी मोठ्या व्यक्तीचं स्वागत करावं तसं केलं. मी आता वपुंना अगदी जवळून, त्यांच्या घरातच भेटत होतो. घरातलं नेटकेपण, सौंदर्यदृष्टी, रसिकता- सारं काही मनात भरणारं. मी वपुंचं टेबल उत्सुकतेनं मला ते पहायचंच आहे, या आग्रहानं पाहिलं. लेखणी, पेन्सिली, लेखन साहित्य, कागद, फाईल्स यांच्या जागा वपुंच्या शिस्तीतल्या. पसार्‍यातला प सुद्धा नव्हता. हे सर्व झाल्यावर मी भेटण्याचं प्रयोजन सांगितलं नि म्हटलं, ‘वपु, आमचं कॉलेज जास्तीत जास्त एकशे एक रुपये मानधन देऊ शकतं. पण सर्व विद्यार्थ्यांना त्यांचा आवडता लेखक प्रत्यक्ष पाहायचाय.’
‘एवढंच ना! येतो.’
त्या वर्षीची तुडुंब गर्दी! वाङ्मय मंडळाचा प्रमुख म्हणून मला वपुंसमोर बोलण्याची संधी… या सर्व प्रसंगांनी एका दिवसातच, मी कॉलेजमधला अतिमहत्त्वाचा विद्यार्थी झालो. ‘प्रवीणनं वपुंना मराठी वाङ्मय मंडळाचा उद्घाटक म्हणून आणून दाखवलं ही त्या वर्षीची सर्वांत ठळक बातमी ठरली.
पुढे कित्येक वर्षांनी कॉलेजमध्ये, पण आता प्राध्यापक या नात्यानं मी त्यांना बोलावलं. आता वपुंचं मानधनही मध्ये आठ-दहा वर्षं गेल्यामुळे वाढलं होतं. फोनवरच मी त्यांना एकशे एकच्या मानधनाची मजेमजेत आठवण करून दिली. मिस्कील वपु म्हणाले, ‘तेव्हा तुम्ही चहा पीत होता, आता बीअर पीत असाल!’
हसू आवरेना. चटकन् नि मार्मिक सुचणं वपुंची खासियत होती.

पंचवीस मार्च हा वपुंचा वाढदिवस! योगायोगानं माझ्या पत्नीचाही वाढदिवस त्याच दिवशी. मी त्यांना वाढदिवसाच्या अभिनंदनाचा फोन केला आणि थोडं खट्याळपणे म्हटलं, ‘आज तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं घरी बासुंदी केलीय. येताय का घरी जेवायला?’ तर लगेच वपु म्हणाले, ‘यायला आवडलं असतं, पण तुमच्या पत्नीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं माझ्या घरी श्रीधरची (फडके) गाण्याची मैफल ठेवलीय हो!’
दोघंही खळखळून हसलो.
एका कार्यक्रमात असंच लो बजेट प्रॉब्लेम होता. वपुच हवे होते. आता आत्तापर्यंत त्यांना विनवणीच्या दोन फेर्‍या झाल्या होत्या. वपुंना म्हटलं, ‘खरं तर, आपलं मानधन अगदी योग्यच आहे, इतकंच काय, कमीच आहे. पण श्रमजीवी विद्यार्थ्यांसाठी ही शिक्षणसंस्था कार्य करते आहे. माझी एक इच्छा आहे, याच वयात त्यांनी प्रतिभेचे हिमालय बघावेत, नाहीतर रस्त्यावरच्या स्पीड ब्रेकर्सना ते हिमालय समजून बसतील.’’
वपुंनी तात्काळ होकार दिला. पुढे ‘माणसं’ या त्यांच्या पुस्तकात वपुंनी माझ्या उल्लेखासह या प्रसंगाचा उल्लेख केला.
आता अगदी माझ्याही नकळत इतक्या दिलखुलास प्रतिभेच्या लेखकाशी मैत्र जडू लागलं होतं. लोकप्रियतेच्या बाबतीत वपु खूप पुढे होते, तरीही घरगुती गप्पांना, खासगी कथावाचनासाठी ते आवर्जून बोलवू लागले. स्वतःचं लेखक असणं, प्रतिभेचं अचानक प्रकट होणं याचं अनमोल ते जाणत होते. म्हणून आरंभी मला जे अति वाटलं, ते नंतर त्यांच्या टिपकागदी वृत्तीचं दर्शन वाटलं.

अनेकदा ते साध्या गप्पांत छोटा टेपरेकॉर्डर ठेवत असत. त्यांच्या बोलण्यात अचानक एखादं चमकदार वाक्य निघून जाई. एरवी ते विरून गेलं असतं हवेत. पण आता ते ध्वनिमुद्रित झालं, की त्या संदर्भानुसार त्यांच्या लेखनात येई.
ठाण्याच्या एका प्रसिद्ध व्याख्यानमालेत- रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत- आम्हा दोघांच्या एकत्र गप्पांचा कार्यक्रम संयोजकांनी ठेवला. खरं तर सारे रसिक वपुंसाठीच येणार, हे मला माहीत होतं, परंतु माझ्या दृष्टीनं ती संधी होती. त्या वेळी मात्र आमचे एकत्र सूर जमले नाहीत. सूर लागला नाही तो नाहीच! त्यांच्याबद्दलच्या माझ्या मनातल्या प्रतिमेला जपणं मला त्या क्षणी अवघड होतं. पुढे त्याचा ग्रह मनात ठेवून अनेक वर्षांचं अंतर गेलं.
परंतु आणखी एका प्रसंगानं वपुंशी पुन्हा स्नेहजवळीक झाली. धुळ्याच्या एका कार्यक्रमात आम्ही एकत्र होतो. एकाच लॉजमध्ये व्यवस्था होती. जेवून विसावणार एवढ्यात बेल वाजली. समोर वपु!

‘चला, मी तुम्हाला एक टवटवीत वार्धक्य दाखवतो.’
मी उत्सुकतेनं निघालो. त्यांनी मला गरुडबागेत रावसाहेब गरुड आणि सुषमाताई गरुड हे जगण्यावर मुक्त प्रेम करणारं गुलमोहरी वार्धक्य रसिकतेनं दाखवलं. इतकंच काय, स्वतः कॅमेरा हातात घेऊन फोटो काढले. जिथं जिथं ऊर्जा, ताजेपण, निर्झरासारखं हसू असेल, तिथं तिथं वपु स्वतःहून जात. त्यासाठी त्यांना वेगळं बोलावणं लागत नसे. काही वेळा ही लीनता अति खुपरी असायची. एकदा षण्मुखानंद हॉलमध्ये मला उमजलेले ओशो या विषयावर तीन मान्यवरांची व्याख्यानं होती. प्राचार्य शिवाजीराव भोसले, कविवर्य मंगेश पाडगावकर आणि तिसरे मान्यवर व. पु. काळे होते. वपुंच्या जीवनाचा उत्तरार्ध ओशोंच्या विचारांनी, जीवनदृष्टीनं व्यापलेला होता. विशेषतः वसुंधराबाई गेल्यानंतर त्यांच्या आयुष्यात एक कातर रितेपण आलं होतं. त्यांच्या लेखनातही ते प्रतीत होत असे. वपु ओशोंबद्दल काय बोलणार याची अर्थातच उत्सुकता होती. वपुंनी ओशो विचारांचा महोत्सव श्रोत्यांच्या मनात रस-गंधासह उतरवला. भारावून त्यांना भेटायला गेलो, भोवतीची गर्दी ओसरायची वाट पाहत होतो. लगेचच त्यांची माझी दृष्टभेट झाली न् काही कळायच्या आतच चटकन पुढे येऊन माझ्या पायाशी वाकले, मग त्यांनी मायेनं मिठी मारली. मध्ये खूप वर्षांत मी साधा फोन केला नव्हता याचा प्रेमयुक्त राग- ‘इतके का मोठे झालात?’ असा प्रश्‍न न विचारता उपरोधिक नमस्कारातून व्यक्त केला.

वपुंचं मोठेपण यातच होतं, की ते कधी जाणवत नसे. कुणाशी साधा संवाद करताना, पहिला पाऊस पाहताना त्यांच्या नजरेत; बाळाच्या डोळ्यांत दिसणारी उत्सुक निरागसता दिसे. वपु कागदावर ज्या सुबक नेमकेपणानं लिहीत, त्याच नेमकेपणानं बोलत असत. त्यांच्या कथांची देखणी हस्तलिखितं, आदर्श म्हणून काही लेखकांना दाखवण्यासाठी बाजूला ठेवलेली असत, असं खुद्द मेनका संस्थापक पु. वि. बेहेरेसाहेब माझ्याशी बोलले होते. (हे खरं तर मलाच उद्देशून असावं. असो!)
एक दुर्मीळ अशी विलोभनीय रसिकता त्यांच्या ठायी होती. घटना कुठलीही असो, त्यातलं नाट्य टिपत ती उभी करण्याचं सामर्थ्य साध्या संवादात होतं. त्यांच्यात एक पोटतिडीक जाणवे. कुणाचं सुखदुःख ऐकतानाही त्याच्या आयुष्याचा सल त्यांना जाणवे. त्याचीच पुढे कथा होई. मध्यमवर्गीय भावभावनांचा आरसा असल्यासारखं त्यांचं लिखाण समीक्षकांनी अलक्षिलं, तरी त्यासाठी त्यांना खूप प्रयास पडले असतील. गाडगीळ, शांताराम, गोखले, भावे, व्यंकटेश माडगूळकर यांच्यानंतरच्या, पण समीपच्या काळातच बहरलेलं त्यांचं कथालेखन होतं. नवकथेनं कथा या वाङ्मय प्रकाराला सौष्ठव दिलं हे मान्यच करायला हवं, परंतु त्या कथांकडे वाचकाला नेण्याचं कार्य वपु, मिरासदार, शंकर पाटील अशा सादरकर्त्या कथाकारांनी केलं. त्याची पुरेशी दखल घेतली नाही, ही खंत वपुंसारख्या हळव्या मनाच्या कलावंताला वाटत असणारच. संमेलनातल्या करमणुकीच्या कार्यक्रमांपुरतं वपुंना निमंत्रण असे, पण एक कथाकार हजारो जणांची अशी अभिरुचीसंपन्न करमणूक पाच दशकं कसा काय करू शकतो, याचा गंभीरपणे वेध घेतला गेला नाही. वाचक मात्र ग्रंथदालनात भटकंती करताना आपोआप वपुंच्या पुस्तकांच्या मांडणीजवळ थांबतात, नि अगदी सहज- ‘पार्टनर’, ‘ऐक सखे’, ‘वपुर्झा, ‘आपण सारे अर्जुन’ अशी विविध साहित्य प्रकारांतली त्यांची पुस्तकं विकत घेतात.

अशा प्रिय वपुंचे केव्हातरी- अगदी ऐन रात्री फोन यायचे. ‘आता येऊ शकत असाल, तर याल?’
मनातलं एकटेपण त्यांच्यावर दडपण टाकत असे. लेखकाला केवळ माणसांची सोबत नको असते. समविचारांच्या, न बोलता येणार्‍या अव्यक्त सुखदुःखांना जाणणार्‍या मनांची सोबत हवी असते. ‘कुठल्याही हेतूंविना- उत्कट सोबत देणारा पार्टनर’ हीच एकाकी सायंकाळची गरज असते. वपुंचं ते मन- शेवटी अति आर्ततेनं जाणवायचं. वपुंचंच एक वाक्य सहज आठवलं-
‘साहित्य हे निव्वळ चुन्यासारखं असतं, त्यात विचारांचा कात टाकल्याशिवाय ग्रंथ रंगत नाही. आणि लेखकाला हवा असतो संवाद. त्याशिवाय त्याचं पान रंगत नाही!’
संवादाचं जीवनमूल्य मानणारा हा अतिशय तरल मनाचा लेखक.
बालपणी त्यांची स्वाक्षरी घेताना- त्यांच्या जवळची बारा रंगांची बारा स्केचपेन्स मी पाहिली होती.
पुढे त्यांच्या सहवासात कळलं, यातल्या प्रत्येक रंगाला अनंतरंगी छटा देणारं हे व्यक्तीमत्त्व आहे. जणू वाचकांचं पान रंगीत करण्यासाठी देवानं पाठवलेलं स्केचपेन!

– प्रवीण दवणे

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.