Now Reading
लेह लडाख – एक आत्मिक अनुभव

लेह लडाख – एक आत्मिक अनुभव

Menaka Prakashan
View Gallery

देणार्‍याने देत जावे
घेणार्‍याने घेत जावे
वेड्यापिश्या ढगाकडून
वेडेपिसे आकार घ्यावे
रक्तांमधल्या प्रश्नांसाठी
पृथ्वीकडे होकार घ्यावे

आपली अशी अवस्था लडाखला गेल्यावर होते. लडाखचा निसर्ग आपल्याला नि:शब्दपणे इतक्या गोष्टी शिकवतो की आपल्याला विंदांच्या या ओळींचा शब्दशः अर्थ समजतो.

लेहमध्ये आल्यानंतर हळूहळू विरळ हवामान म्हणजे काय याची जाणीव होऊ लागते. हॉटेलच्या खिडकीतून, गच्चीतून चमकणारी बर्फाच्छादित शिखरं दिसत होती. परंतु दोन जिने चढल्यावर धाप लागणं, जास्त भरभर चाललं की थांबावसं वाटणं यातून वातावरणातल्या फरकाची कल्पना येत होती. त्यातच मुंबईकरांच्या दृष्टीनं थंडी असह्य होती. संध्याकाळपर्यंत हळूहळू श्वासोच्छ्वासला होणारा त्रास कमी होऊन आपण नॉर्मल होतोय असं वाटलं. भरपूर पाणी पिऊन पाण्याद्वारे ऑक्सिजनची पातळी कायम राखण्याचा प्रयत्न करत होतो.

दुसर्‍या दिवशी आम्ही कारगिल वॉर मेमोरियल बघण्यासाठी गेलो. कारगिल-श्रीनगर रस्त्यावरच्या द्रास इथलं कारगिल युद्ध स्मारक बघताना आपल्या मनातही कारगिल युद्धाच्या आठवणी जाग्या होतात. त्या वेळी बातम्यांमध्ये ऐकलेल्या ‘टायगर हिल’ व ‘तोलोलिंग टेकड्या’ समोर इतक्या अजस्र स्वरूपात बघून जीव पिळवटून निघतो. आपले सैनिक कशा प्रतिकूल परिस्थितीत लढले ते बघून आणि त्यात जीव गमावलेल्या सैनिकांच्या कथा ऐकून आपला ऊर अभिमानानं भरून येतो, डोळे पाणावतात, आपल्या आयुष्याबद्दल निरर्थकता वाटू लागते. जाताना नमकीला पास, फोचुला पास असे पार करून आम्ही थांबलो ते लामायुरू इथली चंद्रभूमी पाहण्यासाठी. इथे चंद्रावर असावेत तसे खड्डे व खाचखळगे दिसतात म्हणून हिला ‘चंद्रभूमी’ म्हणतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला छोट्या डोंगराच्या राशी असाव्यात तसे मातीचे डोंगर दिसू लागले. परत जाताना आम्ही वेगवेगळ्या रंगांच्या असणार्‍या सिंधू व झंस्कार नदीचा संगम बघितला. सिंधू नदीचा बहुतांश भाग पाकिस्तानात असला तरी जिच्या नावावरून आपल्या देशाचं नाव ‘हिंदुस्थान’ आहे, तिचा काही भाग आजही हिंदुस्थान मध्ये वाहतो. त्यानंतर आम्ही जिथं नैसर्गिकरीत्या ‘चुंबक क्षेत्र’ निर्माण झालं आहे अशी एक जागा ‘ारसपशींळल हळश्रश्र’ व खूप मोठ्या दगडाला देव मानलेलं आहे असं तीर्थस्थळ ‘पत्थर साहिब गुरुद्वारा’ बघून परत आलो.

दिवसभर प्रवासात घडलेलं लडाखचं दर्शन डोळ्यांसमोर होतं. सभोवतालचं जगच बदलून गेलं होतं. हळूहळू आम्ही लडाखमय होत होतो. मातीचे रंग, आकाशाची निळाई, ढगांचे आकार हे सगळं वेगळं होतं. लडाखमध्ये आल्यापासून जणू काही ‘विंडोज’च्या स्क्रीनवर दिसावं तसं लख्ख निळं आभाळ व मधूनमधून छोटे छोटे ढगांचे पुंजके हे डोळ्यांना सुखावणारं दृश्य आपल्यासोबत असतं. वेगवेगळ्या रंगांचे, मातीचे, अजस्र डोंगर व त्यासोबत खळाळत वाहणारी निळी, हिरवी सुंदर अशी सिंधू नदी, त्यातले अतिशय प्रमाणबद्ध व सुंदर असे असंख्य लहान-मोठे दगडगोटे हे सगळं दृश्य नजरेत कायमचं साठवण्यासारखे विहंगम… मातीचे, डोंगरांचे असंख्य रंग, छटा आणि आकार! झाडं हा प्रकारच तिथं फारसा दिसत नाही. ऑक्सिजन कमी त्यामुळे कुठेतरी थोडीशी खुरटी हिरवळ सोडली तर लडाखमध्ये हिरवाई नाही.. त्यामुळे जाताना मन थोडं साशंक होतं की, हिरवाईशिवाय असलेला प्रदेश कसा असेल! पण या ठिकाणी मातीचे रंगच इतके विविध आहेत की झाडांची उणीवच भासत नाही.

लडाखमध्ये बौद्ध गुफा (मॉनेस्ट्रीज) खूप आहेत आणि त्या पाहण्यासारख्याही आहेत. १४३० मध्ये बांधलेली ‘थिकसे मॉनेस्ट्री’ ही एक उत्तम मॉनेस्ट्री आहे. आतमध्ये शाळा, निवासस्थान अशी सर्व व्यवस्था आहे. लडाखमध्ये आम्ही खूप मॉनेस्ट्रीज बघितल्या. त्यामध्ये अगदी छोट्या गावातल्या मॉनेस्ट्रीपासून ते थिकसे, हेमिस अशा मोठ्या व सुप्रसिद्ध मॉनेस्ट्रीजचा समावेश होता. परंतु या सर्वांत एक सामायिक बाब जाणवली, ती म्हणजे प्रार्थनास्थळाचं पावित्र्य! ते इथं कुठल्याही ठिकाणी आपोआप राखलं जातं. अतिशय स्वच्छ, पवित्र अशा या जागा आहेत. रंगरंगोटी, स्वच्छता नुकतीच झाल्याप्रमाणे सदैव पवित्र, शांत वातावरण. कोणतंही धार्मिक अवडंबर नाही, फक्त शांतता अनुभवायची असेल तर या धर्मस्थळाला भेट द्यायलाच हवी. या सर्व साधेपणाचा, रंगसंगतीचा भाग असलेले बौद्ध भिख्खू म्हणजेच ‘लामा’. वर्षातले ४ महिने सोडले तर निसर्गाच्या सर्व प्रतिकूल परिस्थितीत ही माणसं इतकी शांत व सदा हसतमुख असतात की ‘लाईफ स्टाईल’ उंचावत नेण्यासाठी सतत जगणारे आपण अशा ठिकाणी अंतर्मुख झाल्याशिवाय राहत नाही. ही शांतता खरं तर शांतपणेच आपल्याला खूप काही देऊन जाते.

लडाखच्या विमानतळाजवळ असलेले ‘हॉल ऑफ फेम’ हे आपल्यासाठी जणू काही पवित्र मंदिरच आहे. कारगील युद्धाच्या अनेक आठवणी इथं जपून ठेवलेल्या आहेत. युद्ध काळातल्या सैनिकांचे कपडे, त्यांची शस्त्रं तर आहेतच पण पाकिस्तानी सैनिकांना कैद केल्यानंतरचं त्यांचं सामान याही वस्तू इथं आहेत. हे सर्व पाहताना क्षणाक्षणाला दु:ख, राग, अभिमान, प्रचंड आदर, प्रेम या सर्व भावनांची मनात गर्दी होत होती. इथं आल्यावर अजून एक गोष्ट समजली ती म्हणजे कारगिल युद्धात जेव्हा काश्मीरकडून शत्रूलाच मदत होत होती तेव्हा लडाखनं मात्र भारतीय सैनिकांना मोलाची मदत केली. तिथले नेपाळी कुलीच आपल्या भारतीय सैनिकांचं सामान घेऊन वर चढले. म्हणून लडाख प्रांत आजही आपल्याकडे राहिला. इथल्या साध्याभोळ्या, प्रेमळ जनतेविषयी प्रचंड कृतज्ञतेचा भाव मनात दाटून आला.

लडाखी जनतेच्या चेहर्‍यावर असंख्य सुरकुत्या दिसतील पण कपाळावर मात्र अजिबात आठी नाही; उलट प्रेमळपणा ओतप्रेत भरलेला. बाहेरच्या जगाचा अजिबात वारा न लागलेला लडाखी सामान्य नागरिक आजही अगदी अत्यंत माफक गरजा असलेलं, साधं, स्वयंपूर्ण जीवन जगतो. आपल्याला लडाखमध्ये सगळीकडे पर्यावरणाची काळजी घेण्याची वृत्ती लोकांच्या नसानसात भिनलेली दिसून येते. त्यांची जीवनशैली इतकी साधी, सरळ, निसर्गाशी तादात्म्य पावलेली आहे की ते निसर्गाच्या विरुद्ध काही करूच शकत नाहीत. लडाखमध्ये कागदाच्या किंवा कापडाच्या पिशवीतून भाजी किंवा इतर सामान नेतात. कुठेही फारसा प्लॅस्टिकचा वापर नाही. जागोजागी नैसर्गिक पिट बनवून त्याचे संडास ते वापरतात. जेवणामध्ये त्या ऋतूमध्ये उपलब्ध असलेल्या सामग्रीतून ते एक/दोन पदार्थाचं जेवण बनवतात. आजूबाजूच्या मातकट पार्श्वभूमीशी साधर्म्य असणारे कपडे ते वापरतात. घरांना रंगीबेरंगी पताका लावलेल्या असतात. घरं अतिशय उबदार आणि स्वच्छ असतात. माफक गरजा व समाधानी जीवन ह्यामुळे एक निर्मळ हसू चेहर्‍यावर सतत असणारी अशी ही लडाखी माणसं!

पाचव्या दिवशी आम्ही ‘नुब्रा व्हॅली’ इथं जाण्यासाठी निघालो. या ठिकाणी जाण्याची मुख्य उत्सुकता होती ती म्हणजे वाटेत लागणारा ‘खरदुंगला पास’. हा सर्वांत उंचीवरचा मोटर रोड. १८,३६० फूट उंचीवर असलेला हा रस्ता म्हणजे जणू बाइकर्सची पंढरीच…! त्याबरोबर इथं असणार्‍या विरळ ऑक्सिजनमुळे होणार्‍या त्रासाबद्दलही ऐकलं होतं. त्यामुळे थोडीशी भीतीही वाटत होती. खरदुंगला रस्त्यानं जाताना मैलोन्मैल उजाड रस्ता, जो आपल्या (बीआरओ) बॉर्डरच्या जवानांनी एवढ्या दुर्गम भागात तयार केला आहे, तो आपल्याला दिसतो. मधूनच पुढं-मागं प्रवास करणारे धाडसी बाईकर्स, यांच्याशिवाय कोणीच नाही. कुठंतरी एखादं गाव लागलं तर थोडीफार खुरट्या शेतात काम करणारी माणसं किंवा एखादी मॉनेस्ट्री दिसायची.

आम्हाला रस्त्यात दिसणारी गावं बघूनसुद्धा प्रश्न पडले होते- कशी राहत असतील माणसं या ठिकाणी, काय पिकवत असतील, काय खात असतील? दळणवळणाच्या सुविधा वर्षातून ८ महिने जवळपास बंद असलेल्या ठिकाणी जिवंत कसं काय राहतात? की परिस्थिती त्यांना उपाय सुचवत असेल? थक्क व्हायला होतं, मनुष्यप्राण्यांची विजिगिषू वृत्ती पाहून. परत एकदा मन अंतर्मुख होतं. रोजच्या जीवनात काही मनासारखं झालं नाही की आपल्यासारखी माणसं खचून जातात. संकटांशी दोन हात करायची माणसाची नैसर्गिक शक्ती आपल्या सुखलोलुपतेमुळे आपण गमावून बसलोय की काय असं वाटतं.

खारदुंगला पासला पोचल्यावर निसर्गाचं अचाट रूप पाहून आपण स्तिमित होतो. सगळीकडे बर्फच बर्फ व मध्ये केवळ रस्ता… हवा विरळ असल्यामुळे जास्त काळ थांबणं शक्य नव्हतं म्हणून आम्ही लगेच फोटो काढून पुढं गेलो. अर्थात इथंही आर्मीचे जवान आपले प्राण वाचवायला तयार असतातच. अशा इतक्या उंचीवरही आर्मीचं छोटं हॉस्पिटल आहे. तिथं प्रथमोपचार करण्यापासून रवाळीं करण्याची सर्व सोय आहे. रस्त्यानं जाताना समोर सियाचिन ग्लेशियर होतं. तिथं -२२ अंश तापमान वर्षभर असतं व तिथं आपले सैनिक आहेत याची जाणीव होते.

त्या दिवशी आमचा मुक्काम डिस्कित इथं होता. जेवणानंतर जवळच असलेल्या डिस्कित मॉनेस्ट्रीत जाऊन ३२ मीटर उंच मैत्रेय बुद्धाच्या मूर्तीचं दर्शन घेतलं. ही मॉनेस्ट्री उंचावर असल्यामुळं तिथून खालच्या नुब्रा व्हॅलीचं दृष्य अतिशय सुंदर दिसतं. संध्याकाळी आम्ही हुंडर वाळवंटात गेलो. इथं ‘डबल हम्प कॅमेल राईड’ हे एक मुख्य आकर्षण होतंच. पण या उंटावरून फेरफटका मारताना दिसलेली सगळ्यात रोमांचक गोष्ट म्हणजे वाळवंटात दिसणारं ‘मृगजळ’. डोक्यावर सुंदर गडद निळं आकाश, समोर पसरलेलं पिवळसर वाळवंट आणि त्यात मधूनच चमकणारं पाणी… अद्भुत अनुभव होता तो.

दुसर्‍या दिवशी आम्ही लडाखमधलं मुख्य आकर्षण म्हणजे ‘पेंगोंग त्सो’ म्हणजेच तलाव बघायला जाणार होतो. कारू, शक्ती या गावांमधून प्रवास करत आम्ही जात होतो. एका बाजूला दरी, मध्ये हिरवीगार शेती आणि दुसर्‍या बाजूला वळणं घेत जाणारा रस्ता असा हा सुंदर प्रवास सुरू होता. मैलोन्मैल दूरवर आमच्या पुढे किंवा मागे वाहनांचं अस्तित्वसुद्धा नव्हतं. मुंबईत राहणार्‍या माणसाला आपण कुठल्या ग्रहावर आलोय असं वाटावं असा हा रस्ता.

हा रस्ता असा होता की ड्रायव्हरचं कौतुक करावं तेवढं थोडंच! मोठमोठ्या दगडधोंड्यातून वाट काढत ड्रायव्हर ज्या प्रकारे गाडी नेतात त्यामुळे आपल्याला चकित व्हायला होतं. रस्त्यातला ‘पागल नाला’ पार केल्यानंतर एका ठिकाणी असलेला बोर्ड दिसतो की ‘पेनगोंगचं प्रथम दर्शन.’ तिथं एका छोट्याशा कोनातून निळ्याशार पाण्याचा जो तुकडा दिसतो त्यानं आपल्याला पुढं दिसणारं आश्चर्य बघण्यासाठी आपण एकदम सरसावून बसतो.

त्यानंतर दिसणारं दृष्य केवळ अवर्णनीय! दूरदूरपर्यंत फक्त आणि फक्त निळंशार पाणी. त्याला लाभलेली उत्तुंग पर्वतांची पार्श्वभूमी. वरती निळं आभाळ आणि त्याचंच प्रतिबिंब असावं असा अविश्वसनीय निळाशार पेनगोंग लेक. आता आयुष्यात काही पाहिलं नाही तरी चालेल असं वाटायला लावणारं ते दृष्य होतं. पेंगोंग लेकजवळ आम्ही जवळपास ३ तास होतो.. मन भरून व भारून टाकणारे ते क्षण होते. समोरचे भव्य पर्वत व अथांग जलाशय पाहून मातृभूमीबद्दल कृतज्ञता उचंबळून येत होती. जगातलं एवढं सुंदर दृश्य आपल्याजवळ आहे याचा अभिमान वाटण्याचे ते क्षण होते.

लडाखचा निसर्ग आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जातो. लडाखमध्ये प्रवास करताना सतत बरोबर असणारे वेगवेगळ्या रंगांचे अजस्र पर्वत, साथीला खळाळत वाहणार्‍या पांढर्‍या, निळ्या, हिरव्या रंगांच्या शोक, सिंधू किंवा झंस्कर नद्या, त्याच्या काठावरची तुरळक हिरवळ व लांबच्या लांब पसरलेले निर्मनुष्य रस्ते, ह्या सगळ्या गोष्टींत आपण आपले अस्तित्व विसरून जातो. निसर्गाच्या या भव्य साक्षात्कारापुढे आपला ‘मी’पणा संपतो आणि सुरू होतो, स्वत:चा स्वतःशी संवाद! त्यामुळे मला वाटतं की आपल्या आत्म्याला भेटण्यासाठी तरी एकदा लडाखला भेट द्यायलाच हवी.

दीपाली कुलकर्णी

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.