Now Reading
राजस्थानी खाद्यसंस्कृती

राजस्थानी खाद्यसंस्कृती

Menaka Prakashan

राजस्थान म्हणजे वाळवंट तरीही राजवाडे, स्थापत्यकलेनं समृद्ध प्रदेश. या भागात पाण्याची कमतरता असली तरी खाद्यसंस्कृती मात्र विविधतेनं नटलेली. सततच्या लढाया आणि उष्ण हवामान यामुळे इथं टिकणार्‍याआणि गरम न कराव्या लागणार्‍या पदार्थांवर भर दिला जातो. वाटण-घाटण, फार सोपस्कार नसूनही राजस्थानी खाद्यसंस्कृती खवय्यांची जिव्हा तृप्त करते. अशाच काही जायकेदार पदार्थांविषयी…

भारताच्या वायव्य दिशेला असलेला राजस्थान म्हणजे पूर्वीचा राजपुताना. हा प्रदेश वैदिक संस्कृती तसंच सिंधू आणि हरप्पा संस्कृतीचा साक्षीदार आहे. वैदिक काळातलं ब्रह्मावर्त याच भागात होतं, तसंच मनुस्मृतीचा जनक मनु आणि भृगु ऋषी इथलेच. हरप्पा संस्कृतीचे अवशेष उदयपूरजवळ सापडतात. राजस्थान म्हणजे राजांची भूमी. महाराणा प्रतापसिंह, उदयसिंह यांच्यासारख्या पराक्रमी आणि स्वाभिमानी लढवय्यांची ही भूमी. परकीय शत्रूच्या हातात जाऊन विटंबना होण्यापेक्षा जोहार करणार्‍या रजपूत स्त्रियांची भूमी हीच एकेकाळी राजांची भूमी असल्यामुळे इथे किल्ले, राजवाडे, महाल यांचं एकेकाळचं वैभव अजूनही दिसतं आणि त्या काळातल्या शाही राहणीची कल्पना येते. तिथल्या स्थापत्य, शिल्पकला यावर मोघल साम्राज्याचा प्रभाव जाणवतो. तिथल्या राजवाड्यांमधली कार्पेट्स, पेंटिंग्ज, कलाकुसर त्या काळच्या शाही वैभवाची साक्ष देतात.

राजस्थान म्हणजे रंगांची उधळण. विशिष्ट प्रकारच्या पगड्या, अंगरखे घातलेले पुरुष आणि अंगभर लाल, पिवळ्या, हिरव्या अशा भडक रंगांचे कपडे आणि नखशिखांत दागिन्यांनी मढलेल्या स्त्रिया हे राजस्थानचं वैशिष्ट्य. इथलं बाटिक प्रिंट, जरी भरतकाम प्रसिद्ध आहे. या पोशाखांसारखी इथली शहरंही रंगीबेरंगी आहेत. जयपूर हे गुलाबी शहर तर जोधपूर निळं, जैसलमेर सोनेरी. उदयपूर शुभ्र रंगात तर झालवाड जांभळ्या रंगाचं शहर म्हणून ओळखलं जातं.
भारतातलं एक अतिशय लोकप्रिय पर्यटनस्थळ असा राजस्थानचा लौकिक आहे. तिथलं एकमेव थंड हवेचं ठिकाण म्हणजे माऊंट अबू. तिथलं दिलवाडा टेंपल, जयपूरचं जंतरमंतर, भरतपूरसारखी राष्ट्रीय उद्यानं, चितोडगडसारखे किल्ले, भव्य राजवाडे, वाळवंटी प्रदेश असूनही सॉल्ट लेकसारखं सरोवर या प्रदेशात आहे. ही प्रेक्षणीय स्थळं पाहायला पर्यटकांची गर्दी असते.

राजस्थानला जाणार्‍या पर्यटकांसाठी आणखी एक आकर्षण म्हणजे चोखी दानी. राजस्थानी संगीत, नृत्य कलेचं दर्शन घडवता घडवता अस्सल राजस्थानी पाककृती खिलवणारी चोखी दानी. पर्यटक खूष नाही झाला तरच नवल!
भारतातलं सर्वांत मोठं असं थरचं वाळवंट राजस्थानात असल्यामुळे हवा विषम, पाऊस अगदीच कमी. त्यामुळे पाण्याची कमतरता असते. परिणामतः ताजा भाजीपाला, फळं मिळणं दुरापास्त. तरीही राजस्थानी खाद्यसंस्कृती समृद्ध झाली आहे. बेसन, कॉर्न, कडधान्य, बाजरी, बार्ली यांपासून विविध पदार्थ तयार होतात. त्यासाठी लाल मिरच्या, धने, जिरे, बडीशेप, चिंच, सुंठ, लसूण असे मसाले वापरून चविष्ट असे अन्नपदार्थ तयार होतात. वाटण-घाटण, ओले मसाले असं काहीही न वापरता चटपटीत मसालेदार पाककृतींसाठी राजस्थान प्रसिद्ध आहे. वाळवलेल्या भाज्या, सांडगे, पापड, लोणची यांचाही उपयोग करतात. सतत चालणार्‍या लढाया आणि ताज्या अन्नघटकांची टंचाई- त्यामुळे बरेच दिवस टिकणार्‍या आणि गरम न कराव्या लागणार्‍या पदार्थांवर भर दिला जातो. पंचकुटासारखी भाजी काही दिवस टिकू शकते. दाल बाटी हा खास राजस्थानी पदार्थ.
आपल्याकडे जसे पोळ्यांचे गोड-तिखट असे वेगवेगळे प्रकार आहेत तसे बाट्यांचेही आहेत.

पूर्वी बाट्या तंदूरमध्ये किंवा चुलीत भाजल्या जायच्या. आता ओव्हनमध्ये भाजतात. बाटी आधी वाफवून मग भाजली की ती झाली बाफला बाटी, पिठात मसाले घालून केलेली मसाला बाटी. बाटीत बटाटा किंवा मटाराचं सारण भरून केलेली भरवॉ बाटी. या बाट्या बहुधा तळल्या जातात. मावा भरून केलेली गोड बाटी. तयार बाटी चुरडून त्यावर भरपूर तूप घालून खायची ही खास राजस्थानी शैली. बाटीबरोबर गट्टेकी सब्जी, पापडकी सब्जी किंवा चटणी-लोणचं.
चुरमा लाडू, बालुशाही, मालपुआ, घीवर हे राजस्थानचे विशेष गोड पदार्थ. याशिवाय जिलेबी, गुलाबजामुन, मुगाचा हलवा ही पक्वान्नं असतातच. जेवणानंतर मसाला छाछ हवंच. वाळवंट असलं तरी तिथं दूधदुभतं भरपूर. इथे जैनांचं प्रमाण जास्त असल्यामुळे शाकाहारी पदार्थांची चंगळ असते. शाकाहारी लोकांची जास्तीत जास्त संख्या असलेलं हे भारतातलं राज्य आहे. देशाच्या अनेक भागात शाकाहारी जेवण देणारी मारवाडी भोजनालयं दिसून येतात.
आपण फक्त शाकाहारी पदार्थांचाच विचार करणार आहोत.

मारवाडी कैरी-चणा लोणचं
साहित्यः तीन कप कैरीचा कीस, अर्धा कप छोले, एक टी स्पून हळद, दोन टे. स्पून लाल तिखट, तीन टे. स्पून मेथी दाणे, अर्धा टी स्पून मेथी पावडर, दोन टी स्पून कलौंजी, दोन टे. स्पून बडिशेप, अर्धा टी स्पून हिंग, दहा-बारा लाल सुक्या मिरच्या, तीन कप मोहरीचं तेल, दोन टे.स्पून मीठ
कृतीः एक टे. स्पून मेथी दाणे, कलौंजी, लाल मिरच्या आणि बडिशेप थोडीशी भाजून घ्यावी. कैरीचा कीस, मीठ, हळद एकत्र करून ठेवावं. अर्ध्या तासानं पिळून त्यातलं पाणी बाजूला करावं. उरलेले मेथी दाणे आणि छोले रात्रभर पाण्यात भिजवावे.
दुसर्‍या दिवशी कैरीच्या किसात मेथी पावडर, तिखट, हिंग, बडिशेप, कलौंजी, लाल मिरच्यांचे तुकडे आणि भिजलेले छोले एकत्र करावे. मोहरीचं तेल धूर येईपर्यंत तापवावं, पूर्ण गार करून कैरीच्या किसात मिसळावं. लोणचं बरणीत भरावं आणि एक आठवडा बरणी उन्हात ठेवावी.

आमकी लौंजी लौंजी म्हणजे आंबट-गोड चटणी
साहित्यः कैरीच्या साल काढून केलेल्या लांब फोडी तीन कप, तीन टे.स्पून मोहरीचं तेल, एक टी स्पून बडिशेप, अर्धा टी स्पून जिरे, पाव टी स्पून मोहरी, अर्धा टी स्पून कलौंजी, पाव टी स्पून मेथी दाणे, अर्धा टी स्पून हळद, अर्धा टी स्पून लाल तिखट, अर्धा कप साखर, अर्धा टी स्पून गरम मसाला, पाव कप पाणी, चवीपुरतं मीठ
कृतीः कढईत तेल गरम करून त्यात बडिशेप, जिरे, मोहरी, कलौंजी आणि मेथी घालावी. ते तडतडलं की कैरीच्या फोडी घालाव्या. नंतर त्यात हळद, गरम मसाला, तिखट, साखर आणि मीठ घालावं. पाणी घालून, ढवळून नऊ-दहा मिनिटं शिजू द्यावं.

केर-सांग्री लोणचं
केर म्हणजे बोरासारखी आंबट फळं आणि सांग्री म्हणजे चवळीच्या शेंगांसारख्या शेंगांमधले दाणे. राजस्थानच्या वाळवंटात मिळणार्‍या या दोन पदार्थांपासून लोणचं बनवलं जातं. दोन्ही वाळवून ठेवलेली असतात. केर ताकात किंवा मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवायचं आणि सांग्रीदेखील पाण्यात भिजवून वापरायची आणि त्याचं लोणचं करायचं.
साहित्यः दोनशे ग्रॅम वाळलेलं केर आणि दोनशे ग्रॅम सांग्री, तीन कप ताक किंवा मिठाचं पाणी, दोन टे. स्पून मोहरीची पावडर, एक टी स्पून मेथी दाणे, दोन टी स्पून पिवळ्या मोहरीची डाळ, तीन टे.स्पून बडिशेप, एक टी स्पून कलौंजी, एक टी स्पून आमचूर, अर्धा टी स्पून हिंग, एक टी स्पून हळद, दोन टी स्पून लाल तिखट, तीन टी स्पून मीठ, अर्धा कप मोहरीचं तेल
कृतीः केर तीन दिवस ताकात भिजवून ठेवावं. म्हणजे त्याचा कडवटपणा जाईल. सांग्री पण रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावी. नंतर केर ताकातून काढून दोन-तीन वेळा स्वच्छ पाण्यानं धुवून पाण्यात सात-आठ मिनिटं उकळून घ्यावं. सांग्रीपण पाण्यातून काढून, धुवून उकळत्या पाण्यात पाच-सात मिनिटं शिजवावी. केर आणि सांग्री पाण्यातून काढून फडक्यावर टाकावी आणि कोरडी करावी.
कढईत तेल घालून ते गरम झालं की केर आणि सांग्री त्यात घालून तळून घ्यावी.
मोहरी, मेथी दाणे, पिवळी मोहरी, बडिशेप आणि कलौंजी एकत्र करून मिक्सरमध्ये पावडर करावी. ही पावडर केर आणि सांग्रीच्या मिश्रणात घालून ढवळावं. आमचूर, हळद, लाल तिखट, हिंग त्यात मिसळावं. उरलेलं मोहरीचं तेल त्यात घालावं.

पंचकुटा भाजी
पंचकुटा भाजी ही खास मारवाडी पाककृती आहे. ही भाजी काही दिवस टिकणारी असून वाळवंटातल्या प्रवासाला अतिशय उपयुक्त समजली जाते. केर, सांग्री, आमचूर, गुंदा (भोकरं) आणि कोमटिया अशा पाच भाज्यांच्या मिश्रणातून ही भाजी बनते. या वाळवलेल्या एकत्र भाज्या बाजारात उपलब्ध असतात.
साहित्यः एक कप सांग्री मिक्स (पाच भाज्या), दोन सुक्या लाल मिरच्या, चिमूटभर हिंग, पाव टी स्पून मोहरी, अर्धा टी स्पून जिरे, पाव टी स्पून हळद, अर्धा टी स्पून लाल तिखट, दोन टी स्पून धने पावडर, एक टी स्पून आमचूर पावडर आणि चवीपुरतं मीठ
कृती ः केर-सांग्री मिश्रण धुवून पाण्यात भिजत घालावं. दुसर्‍या दिवशी परत तीन-चार वेळा धुवून कुकरमध्ये मऊ होईपर्यंत शिजवावं. गार झाल्यावर त्यातलं पाणी काढून टाकावं.
तेल तापवून त्यात मोहरी, जिरे, हिंग, लाल मिरच्या घालून परतावं. शिजलेली केर सांग्री, हळद, धने पावडर, तिखट, आमचूर पावडर आणि मीठ घालून पाच मिनिटं शिजवावं.

गट्टेकी सब्जी
साहित्यः गट्ट्यांसाठीः दोन कप बेसन, चिमूटभर हिंग, पाव टी स्पून हळद, अर्धा टी स्पून ओवा, अर्धा टी स्पून लाल तिखट, एक टी स्पून धने पावडर, तीन टे. स्पून तेल, दोन टे. स्पून दही, चवीपुरतं मीठ आणि लागेल तसं पाणी
ग्रेव्हीसाठीः अर्धा कप चिरलेला कांदा, तीन-चार लसूण पाकळ्या, अर्धा टी स्पून बारीक चिरलेलं आलं, दोन टे. स्पून तूप, एक टी स्पून जिरे, तीन लवंगा, एक दालचिनीचा तुकडा, दोन हिरव्या वेलच्या, एक तमालपत्र, एक लाल सुकी मिरची, एक कप दही, चिमूटभर हिंग, अर्धा टी स्पून हळद, एक टे. स्पून धने पावडर, चवीपुरतं मीठ, मूठभर कोथिंबीर
कृतीः गट्ट्यांसाठी पाण्याखेरीज असलेले सर्व जिन्नस एकत्र करावे, त्यात लागेल तसं पाणी घालून पीठ भिजवावं. पीठ फार घट्ट किंवा फार सैल नको. चार-पाच कप पाणी उकळत ठेवावं. भिजवलेल्या पिठाचे सहा गोळे करून प्रत्येकाची एक सुरळी बनवावी. या सुरळ्या उकळत्या पाण्यात टाकत जाव्या. शिजल्यानंतर त्या वर तरंगतील. हे गट्टे बाहेर काढून ठेवावे. गार झाल्यावर एकेक इंचाचे तुकडे करावे.
कांदा, लसूण आणि आलं एकत्र करून वाटून घ्यावं. वाटताना थोडं पाणी घालावं. दोन टे.स्पून तेल तापवून त्यात जिरे, लवंगा, दालचिनी, तमालपत्र आणि लाल मिरची घालावी. मसाले परतल्यावर त्यात कांद्याची पेस्ट घालावी. पेस्ट परतून दही घुसळून घालावं. तेल सुटायला लागलं की मिश्रणात हळद, मीठ, तिखट, धने पावडर आणि हिंग घालावा. गट्टे शिजवलेलं पाणी घालावं. गट्टे घालावे. ग्रेव्ही दोन-तीन मिनिटं उकळू द्यावी. नंतर कोथिंबीर घालून गॅस बंद करावा.
याच गट्ट्याच्या पिठाच्या गोळ्यात पनीर किंवा मटार भरून त्याचाही रस्सा केला जातो. या गट्ट्यांना गोविंद गट्टे म्हणतात.

पापडकी सब्जी
साहित्यः एक कप उडदाच्या पापडाचे तुकडे, दोन टोमॅटो, एक हिरवी मिरची, आल्याचा एक तुकडा, तीन टे. स्पून तेल, अर्धा कप दही, एक टे. स्पून कसुरी मेथी, अर्धा टी स्पून जिरे, पाव टी स्पून हळद, एक टी स्पून धने पावडर, अर्धा टी स्पून लाल तिखट, चवीनुसार मीठ
कृतीः दह्यात अर्धा कप पाणी घालून घुसळून घ्यावं. टोमॅटो चिरून, मिरची आणि आल्याबरोबर मिक्सरमध्ये पेस्ट करावी. कढईत दोन टे. स्पून तेल घालून त्यात जिरे घालावं. हिंग, हळद, धने पावडर आणि कसुरी मेथी घालावी. नंतर त्यात टोमॅटोची पेस्ट घालून मिश्रण परतावं. लाल तिखट घालून तेल सुटेपर्यंत परतावं. एक कप पाणी घालून उकळत ठेवावं. मग घुसळलेलं दही घालावं. परत तेल सुटेपर्यंत परतावं. मीठ आणि कोथिंबीर घालावी. पापडाचे तुकडे घालून गॅस बंद करावा.

दाल-बाटी
साहित्यः बाटीसाठीः दोन कप गव्हाची कणीक, पाव कप रवा, पाव कप तूप किंवा तेल, पाव टी स्पून बेकिंग पावडर, पाव टी स्पून ओवा, चवीपुरतं मीठ
डाळीसाठीः अर्धा कप तूर डाळ, पाव कप चणा डाळ, पाव कप मूग डाळ, दोन टे. स्पून तूप, एक टी स्पून जिरे, चिमूटभर हिंग, दोन तमालपत्र, एक दालचिनीचा तुकडा, दोन हिरव्या वेलच्या, तीन लवंगा, दोन लाल सुक्या मिरच्या, ठेचलेलं आलं एक टी स्पून, ठेचलेला लसूण एक टी स्पून, बारीक चिरलेली एक हिरवी मिरची, बारीक चिरलेला टोमॅटो एक कप, एक टे. स्पून दही, अर्धा टी स्पून कसुरी मेथी, अर्धा टी स्पून गरम मसाला, एक टी स्पून लाल तिखट, एक टी स्पून लिंबाचा रस, चवीनुसार मीठ
कृतीः तिन्ही डाळी धुवून कुकरमध्ये एकत्र मऊ शिजवून घ्याव्या. शिजताना त्यात हळद घालावी. कढईत दोन टे. स्पून तूप गरम करावं. त्यात जिरे, हिंग, तमालपत्र, दालचिनी, वेलची, लवंगा आणि सुक्या मिरच्या घालाव्या. हे मिश्रण एक मिनीट परतून त्यात आलं, लसूण, हिरवी मिरची घालावी. टोमॅटो, लाल तिखट, कसुरी मेथी आणि दही घालावं आणि मिश्रण परतावं. पाव कप गरम पाणी घालावं. शिजलेली डाळ घालावी. गरम मसाला, लिंबाचा रस आणि मीठ घालून दहा मिनिटं बारीक गॅसवर उकळू द्यावं. शेवटी कोथिंबीर घालावी.
बाट्या करण्यासाठी कणीक, रवा, पाव कप तूप, ओवा, बेकिंग पावडर आणि मीठ एकत्र करावं. नंतर त्यात दही आणि लागेल तसं कोमट पाणी घालून घट्ट पीठ भिजवावं आणि अर्धा तास झाकून ठेवावं. नंतर पीठ मळून त्याचे दहा-बारा गोळे करावे. मधोमध अंगठ्याने खळगा करावा. १९० सें. वर ओव्हन तापवावा. बेकिंग ट्रेवर हे गोळे ठेवून खाली-वर तेल लावावं आणि तापलेल्या ओव्हनमध्ये पंधरा ते वीस मिनिटं गोळे भाजावे. मग गोळे उलटून परत पंधरा-वीस मिनिटं भाजावं. बाट्या भाजून झाल्या की किंचित दाबून तुपात बुडवून दालबरोबर खायला द्याव्या.

प्याजकी कचोरी
साहित्यः तीन कप मैदा, सहा टे. स्पून तेल किंवा तूप, चवीपुरतं मीठ, चार कप कांद्याच्या फोडी, दोन कप उकडलेल्या बटाट्याच्या फोडी, एक टी स्पून मोहरी, एक टी स्पून जिरे, चिमूटभर हिंग, दोन टे. स्पून भरडलेले धने, दोन टे. स्पून बेसन, दोन टी स्पून आमचूर पावडर, ठेचलेला लसूण एक टे. स्पून, ठेचलेलं आलं एक टी स्पून, बारीक चिरलेल्या दोन हिरव्या मिरच्या, दोन टी स्पून लाल तिखट, अर्धा टी स्पून गरम मसाला, एक टी स्पून साखर, अर्धा कप चिरलेला कांदा, चवीपुरतं मीठ, तळण्यासाठी तेल
कृतीः मैदा, मीठ आणि तेल एकत्र करून त्यात लागेल तसं पाणी घालून घट्ट पीठ भिजवावं. खूप मळून अर्धा तास झाकून ठेवावं. कढईत दोन टे. स्पून तेल गरम करावं. त्यात हिंग, धने, जिरे, मोहरी घालून मिश्रण परतावं. मिश्रणात कांदे घालून मिश्रण परतावं. कांदा लालसर झाला की त्यात आलं, लसूण, मिरच्या, तिखट, आमचूर घालून ढवळावं. मग बटाटे, बेसन, साखर आणि गरम मसाला घालावा. तीन-चार मिनिटं शिजू द्यावं. शेवटी त्यात एक मध्यम कांदा बारीक चिरून घालावा.
कचोरी करण्यासाठी मळलेल्या पिठाचा एक गोळा घेऊन त्याची वाटी करावी. त्यात कांद्याचं सारण भरून कडा बंद कराव्या. गोळा हलकेच दाबून चपटा करावा. कचोरीला दोन-तीन ठिकाणी काट्यानं टोचावं आणि गरम तेलात कचोर्‍या तळाव्या.

चना दालके फरे
साहित्यः दोन कप कणीक किंवा मैदा, पाव कप तेल, अर्धा टी स्पून मीठ, अर्धा कप चणाडाळ, तीन-चार हिरव्या मिरच्या, एक टी स्पून आलं-लसूण पेस्ट, चिमूटभर हिंग, एक टी स्पून धने पावडर, अर्धा टी स्पून जिरे पावडर, अर्धा टी स्पून लाल तिखट, मूठभर कोथिंबीर, चवीनुसार मीठ
कृतीः चण्याची डाळ तीन-चार तास पाण्यात भिजवावी. त्यात पाव टी स्पून मीठ घालून बारीक वाटावी. वाटताना त्यात मिरच्या मिसळाव्या. त्यात हिंग, आलं-लसूण पेस्ट, धने-जिरे पावडर, कोथिंबीर मिसळावी.
कणकीत मीठ आणि तेल घालून लागेल तसं पाणी घालून कणीक भिजवावी. अर्धा तास झाकून ठेवावी.
भिजवलेल्या पिठाची पुरी लाटावी. पुरीच्या अर्ध्या भागावर हे मिश्रण पसरून घडी घालावी. असे सर्व फरे तयार करावे. हे फरे कुकरमध्ये वाफवून घ्यावे.
पुदिना किंवा चिंचेच्या चटणीबरोबर खावे.

कांजी वडा
साहित्यः दीड लिटर पाणी, तीन टे. स्पून मोहरीची पावडर, दोन टी स्पून मोहरीचं तेल, एक टी स्पून काळं मीठ, एक टी स्पून साधं मीठ, पाव टी स्पून हिंग, दोन टी स्पून लाल तिखट, अर्धा टी स्पून हळद
वड्यांसाठीः एक कप मूग डाळ, अर्धा कप उडीद डाळ, एक टी स्पून आल्याचा कीस, पाव टी स्पून हिंग, एक टी स्पून लाल तिखट, चवीपुरतं मीठ
कृतीः कांजी करण्यासाठी एका मोठ्या बरणीत पाणी, मोहरीचं तेल, मोहरीची पावडर, हिंग, हळद, तिखट, काळं मीठ आणि साधं मीठ घालावं. फडक्यानं या बरणीचं तोंड बांधून उन्हात किंवा उबदार जागी तीन ते सहा दिवस ठेवावं. अधूनमधून ढवळावं. मिश्रण आंबट होईपर्यंत ठेवावं.
वड्यासाठी मुगाची डाळ आणि उडदाची डाळ पुरेशा पाण्यात रात्रभर भिजत घालावी.
नंतर धुवून, निथळून वाटून घ्यावी. वाटताना आलं घालावं. वाटलेल्या डाळीत मीठ, हिंग आणि तिखट मिसळावं. डाळ खूप घोटावी म्हणजे हलकी होईल. तेल तापवून त्यात या डाळीच्या मिश्रणाचे लहान लहान गोळे करून खमंग तळावे. तळलेले वडे कोमट झाल्यावर तयार कांजीमध्ये घालावे. काही तासांनी ते कांजीत मुरतील. मग खायला द्यावे.

घीवर
साहित्यः अर्धा कप तूप, बर्फाचे क्युब्ज, दोन कप मैदा, चिमूटभर मीठ, अर्धा कप दूध, तीन कप खूप थंड पाणी, एक टी स्पून लिंबाचा रस, एक कप साखर, पाव कप पाणी, चिमूटभर केशर, अर्धा टी स्पून वेलची पावडर, तळण्यासाठी तूप, सजावटीसाठी बदाम पिस्त्याचा चुरा
कृतीः बर्फाचे क्यूब घालून तूप भरपूर फेटावं. त्यात मीठ आणि मैदा मिसळावा. मग दूध आणि पाणी घालत गुळगुळीत पीठ तयार करा. त्यात लिंबाचा रस घालावा. घीवर तळण्यासाठी अरुंद पण उभट भांडं घ्यावं. त्यात तूप तापवावं. पिठात हात बुडवून पाची बोटांनी उंचावरून तेलात धारा सोडत रहावं. तेलात पडलेल्या पिठाला जाळी पडत जाईल. तुपाचा पृष्ठभाग या जाळीनं भरला की घीवर तयार होईल. त्या भांड्याच्या तळाएवढा घीवर तयार होईल. विणायच्या लांब सुईने नाजूकपणे तो बाहेर काढावा. एकीकडे साखरेत पाणी, वेलची, केशर घालून पाक तयार करावा. घीवर झाल्याबरोबर हा पाक घीवरवर घालावा. त्यावर बदाम-पिस्त्याचा चुरा पसरावा. रबडीबरोबरही खाता येतो.

माखन वडा (बालुशाही )
साहित्यः दीड कप मैदा, अर्धा कप तूप, तीन टे. स्पून दही, अर्धा टी स्पून बेकिंग पावडर, अर्धा टी स्पून मीठ, अर्धा टी स्पून वेलची पावडर, तीन कप साखर, दीड कप पाणी, दोन टे. स्पून बदाम-पिस्त्याचे काप, तळण्यासाठी तूप
कृतीः मैदा, मीठ, तूप, बेकिंग पावडर हातानं एकत्र करावं. त्यात दही घालून पीठ भिजवावं. शक्यतो पाणी वापरू नये. लागल्यास आणखी थोडं दही घालावं. पीठ अर्धा तास झाकून ठेवावं. साखर, पाणी, वेलची एकत्र करून एकतारी पाक करावा. पिठाचे लहान लिंबाएवढे गोळे करावे. अंगठ्यानं मध्यभागी खळगा करावा. तूप मध्यम तापवून त्यात हे गोळे घालावे आणि मध्यम गॅसवर लालसर तळावे. तळल्यावर पाकात घालून अर्धा तास ठेवावे. नंतर बाहेर काढून त्यावर बदाम-पिस्त्याचे काप घालावे.

छेन्ना मालपुआ
साहित्यः एक कप किसलेलं पनीर, अर्धा कप मैदा, पाव कप बारीक रवा, एक कप दूध, पाव टी स्पून वेलची पावडर, अर्धा टी स्पून मीठ, अर्धा टी स्पून बेकिंग पावडर, एक कप साखर, एक कप पाणी, चिमूटभर केशर, तळण्यासाठी तेल
कृतीः दूध आणि रवा एकत्र करून पंधरा मिनिटं झाकून ठेवावा. मैदा आणि पनीर एकत्र मळावं. लागलं तर दूध घालावं. दोन्ही मिश्रणं एकत्र करावी, त्यात वेलची पावडर, बेकिंग पावडर आणि मीठ मिसळावं. पीठ भज्यांच्या पिठाइतपत घट्ट हवं. साखर आणि पाणी एकत्र करून उकळावं, त्यात केशर घालावं. पाक पाच मिनिटं उकळावा. गरम तेलात एक टे. स्पून पीठ घालून तळावं. सोनेरी रंगावर तळलेले मालपुवे गरम पाकात घालावे.

मावा कचोरी
साहित्यः दोन कप मैदा, पाव कप तूप, चिमूटभर मीठ, दोनशे ग्रॅम मावा, पाऊण कप पिठीसाखर, अर्धा टी स्पून वेलची पावडर, दोन टे. स्पून बदाम-पिस्त्याची भरड आणि दोन टे. स्पून काप, एक कप साखर, पाऊण कप पाणी, चिमूटभर केशर, तळण्यासाठी तूप
कृतीः मैदा, तूप आणि मीठ एकत्र करून हातानं कुस्करून एकत्र करावं. त्यात बर्फाचं थंड पाणी घालून पीठ भिजवावं. पीठ फार घट्ट नको. मावा कढईत परतावा, गार झाल्यावर त्यात पिठीसाखर, बदाम-पिस्त्याची भरड पावडर आणि वेलची घालावी. साखर आणि पाणी एकत्र करून गॅसवर ठेवावं आणि एकतारी पाक करावा. पाकात वेलची-केशर घालावं. पिठाचे बारा गोळे करावे. एकेका गोळ्याची वाटी करून त्यात माव्याचं सारण भरून कडा बंद कराव्या आणि थोडा पिठाचा हात घेऊन हलक्या हातानं हा गोळा थोडासा लाटावा. सारण बाहेर येऊ देऊ नये. या कचोर्‍या कमी तापलेल्या तेलात मंद आंचेवर तळाव्या. तळून झाल्यावर पाकात टाकून बाहेर काढाव्या.

राजस्थानी हरे चने का हलवा
साहित्यः एक कप वाटलेले ओले हिरवे हरभरे, एक कप साखर, पाव कप तूप, अर्धा टी स्पून वेलची पावडर, सात-साठ पिस्ते आणि दहा-बारा-बेदाणे
कृतीः कढईत तूप गरम करून त्यात वाटलेले हरभरे घालून मंद गॅसवर सात-आठ मिनिटं परतावे. मग त्यात साखर घालून शिजवावं. साखर विरघळून मिश्रणाचा गोळा झाला की त्यात वेलची पावडर आणि पिस्ते, बेदाणे घालावे.

– वसुंधरा पर्वते

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.