Now Reading
रचनावादी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारं ‘ग्राममंगल’

रचनावादी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारं ‘ग्राममंगल’

Menaka Prakashan

पारंपरिक चौकट भेदून नवा प्रवाह आणणं अन् तो समाजात रुजवणं हे कठीण असतं. शिक्षणात जर असे प्रवाह आणले नाहीत तर हेच शिक्षण पुढं जाऊन कालबाह्य ठरतं. त्यातून विद्यार्थ्यांसोबतच समाजालाही याचे परिणाम भोगावे लागतात. त्यामुळेच शिक्षण हे काळाशी सुसंगत असावं. ते नैसर्गिक पद्धतीनं असावं, यात विद्यार्थ्यांचा विचार प्रथम केलेला असावा. याच विचारातून ऐंशीच्या दशकात पालघर जिल्ह्यात अनुताई वाघ आणि रमेश पानसे यांनी ‘ग्राममंगल’ संस्थेची स्थापना केली. इथं रचनावादी शिक्षण पद्धतीला अनुसरून शिक्षण दिलं जातं, केवळ इथपर्यंत मर्यादित न राहता, आजची ‘टिली-मिली’ संकल्पना प्रत्यक्षात यशस्वी करून दाखवेपर्यंत ‘ग्राममंगल’चं काम अव्याहतपणं सुरू आहे. राज्यातल्या ज्ञानरचनावादी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवण्यात ‘ग्राममंगल’चं योगदान मोठं आहे. संस्थेचा हा सबंध प्रवास जाणून घेतलाय संस्थेच्या बालशिक्षण विभागप्रमुख अश्विनी गोडसे यांच्याकडून…

गेल्या पन्नास वर्षांमध्ये पारंपरिक शिक्षणाला पर्याय म्हणून नवीन शिक्षण विषयक विचार समोर आले. त्यातूनच साधारण मागच्या दोन दशकांपासून शिक्षण हे शिक्षक केंद्रित नाही तर विद्यार्थी केंद्रित असावं ही संकल्पना दृढ व्हायला लागली. पुढं यात बरंच संशोधन झालं. या सर्व मंथनातून रचनावादी किंवा ज्ञानरचनावादी म्हणता येईल अशी ही शिक्षण पद्धती पुढं आली. जगात विशेषतः प्रगत राष्ट्रांत ही पद्धत लोकप्रिय झाली आहे. यात मुलांच्या मेंदूच्या विकासानुसार शिक्षण देण्यात येतं. पारंपरिक पद्धतीत शिक्षक विद्यार्थ्याला शिकवतात, मात्र या पद्धतीत मूल हे स्वतः अनुभवातून शिकतं, कारण या वयात शिकणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत विद्यार्थी हा पूर्णपणे केंद्रस्थानी असतो. महाराष्ट्रातही पारंपरिक पठडीबद्ध ‘घोका आणि ओका’ पद्धतीला उत्तर देण्यासाठी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे यांनी अभ्यास करून ही पद्धत मराठीत आणली.

महाराष्ट्रात बालशिक्षणाला एक गौरवशाली इतिहास आहे. ताराबाई मोडक यांनी गिजुभाई बधेका यांच्यासोबत बालशिक्षणाच्या क्षेत्राला एक अभ्यासपूर्ण अधिष्ठान दिलं. बालवाडी या संकल्पनेला अनौपचारिक परंतु संशोधनात्मक अशी मांडणी करून दिली आणि अनुताई वाघ यांनी ती परंपरा जपत त्याला व्यवस्थापनाचं उत्तम अंग दिलं. याला ‘नूतन बालशिक्षण’ पद्धती म्हटलं जायचं. हे आधी बालवाडीपुरतं मर्यादित होतं. मात्र या बाल शिक्षणाच्या प्रयोगाचा विस्तार झाला पाहिजे, या विचारातून हे काम पुढं गेलं. यासाठी पहिली आदिवासी शाळा पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यातल्या ऐने या ठिकाणी अनुताई वाघ आणि रमेश पानसे यांच्या पुढाकारानं सुरू झाली. १९८२ साली हा प्रयोग सुरू केला. रमेश पानसे हे अनुताई वाघांचे नात्यानं भाचे आहेत. हे दोघं आधीपासून या विषयावर काम करत होते, त्यात गावांचं सर्वेक्षण करत फिरताना मुरबी नावाच्या पाड्यात गेले असता, तिथं एका ज्येष्ठ नागरिकांनी अनुताई वाघ आणि रमेश पानसे यांना ओळखलं. त्यांनीच या ठिकाणी शाळा सुरू करावी अशी मागणी केली. त्यातून एकप्रकारे लोकाग्रहास्तव ही शाळा सुरू झाली. त्यांनी दाभोण इथं राहूनच तीन भिंतीत राहून ही शाळा सुरू केली. मात्र ती शाळा थेट सुरू न करता आधी गावाचं सर्वेक्षण केलं. त्यातून नंतर गावाच्या विकासावर भर दिला. ग्रामविकासासाठी काही प्रकल्प आणले. विहिरी खोदल्या गेल्या, पाण्याची व्यवस्था केली. त्यातून गावकर्‍यांशी चांगला संवाद सुरू झाला. त्याकाळी गावात काही आजार पसरले होते. त्यात खरूज हा आजार मोठ्या प्रमाणात मुलं आणि महिलांमध्ये दिसून येत असे. अनुताई वाघ त्यावर गुणकारी तेल बनवत. अशी औषधं घ्यायला गावकरी येत असत, त्या दरम्यान आलेल्या त्या गावकर्‍याला काही खेळ खेळायला दिले जात. त्यातून त्यांच्यात विश्वास वाढीला लागायचा. शाळा स्थापनेच्या निमित्तानं सुरू झालेल्या या कामामुळे पूर्ण गावाचाच हळूहळू कायापालट होऊ लागला. त्यातूनच ‘ग्राममंगल’ ही संकल्पना प्रत्यक्षात आली.

पुढे संस्थेला देणगी मिळालेल्या सहा एकर जागेत आदिवासी शिक्षणाचे नवीन प्रयोग सुरू झाले. त्याच ठिकाणी आज संस्थेचे मुख्यालय आहे. याच जिल्ह्यात विक्रमगड इथं संस्थेची दुसरी शाखा आहे. या दोन्ही ठिकाणी आदिवासी मुलांच्या शाळा आहेत. या ठिकाणी ज्ञानरचनावादी पद्धतीचा अंगीकार करून अनेक विद्यार्थ्यांना घडवण्याची जणू प्रयोगशाळाच आहे. हा विचार इथल्या विद्यार्थ्यांसोबतच राज्यातल्या हजारो शाळांपर्यंत पोचण्यासाठी वर्षभर विविध अभ्यासवर्ग चालवले जातात. राज्यातल्या हजारो जिल्हा परिषद आणि इतर शाळांमध्ये ज्ञानरचनावाद पोचवण्यात ग्राममंगलचा मोठा वाटा आहे. यात शासन आणि शिक्षण खातं व तिथल्या अधिकार्‍यांची भूमिकाही निर्णायक आहे. कृतिशील शिक्षण हा इथला पाया आहे. लहानपणी मूल रांगणं, चालणं-पळणं या व इतर क्रिया स्वत: शिकतं. त्यांना स्वयंशिक्षण आवडतं. त्यामुळे मूल स्वतःचा विकास स्वतः करू शकतं. नैसर्गिक वातावरणात मूल चांगलं वाढतं. अशा प्रकारे मुलांच्या कलानं व स्वयंशिक्षणाला वाव देणार्‍या शाळा या कृतिशील शिक्षण देणार्‍या शाळा ठरतात असं तत्त्वज्ञान यात आहे. आज संस्थेतले दहावी उत्तीर्ण झालेले काही विद्यार्थी आपलं महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. वातावरण बदललं तरीही संकल्पना स्पष्ट असतील तर उत्तम रीतीनं मुलं शिकू शकतात याचा अनुभव ही मुलं स्वत: घेत आहेत.

आदिवासी मुलींना घेऊन पुढं ‘ग्राममंगल’ने वर्षभरासाठी निवासी शिक्षिका अभ्यासक्रम सुरू केला. निलेश निमकर, सुषमा पाध्ये, आदिती नातू यांनी तर प्रत्यक्षपणे संस्था उभी केली. त्यांनी मॉडेल्स उभी केली. सुषमा पाध्ये या बावीस वर्षे या ठिकाणीच राहिल्यानं रचनावादाचा हा प्रयोग रुजला, टिकला आणि बहरला. यातूनच ‘मुक्त शाळा’ संकल्पना पुढे आली. संस्थेच्या आज दोन मोठ्या शाळा आहेत. त्यात बालवाडी ते दहावीचे चारशे विद्यार्थी शिकतात, तर आजूबाजूच्या पाड्यांत आणि विकासघर नावाची जी संकल्पना आहे, त्यात मिळून आज संस्थेत सातशे विद्यार्थी शिकतात. ही संख्या हळूहळू वाढली आहे. आता संस्थेत निवासी विद्यार्थी नाहीत, मात्र आज या ठिकाणी शंभर जण राहू शकतात एवढी सोय आहे. इथं शिक्षक आणि अधिकार्‍यांसाठी अभ्यासक्रम चालतात. शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या नसतात. वर्षभर शाळा सुरू असते, कारण पावसाळ्यात शाळा अनिश्चित स्वरूपात असते, खूप पाऊस झाला तर मुलांना शाळेत येता येत नाही. शाळा बारमाही असल्यानं प्रशिक्षणाला येणार्‍या बाहेरील शिक्षक आणि अधिकार्‍यांना रचनावादी शिक्षणाची प्रात्यक्षिके बघता येतात.

इथं कृतिशील शिक्षण पद्धतीनं स्वयंशिक्षण देण्यात येतं. प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र दालन, गटानं अनुभव घेत शिकण्याची सोय, मुबलक शैक्षणिक साधनं आणि बालस्नेही वातावरण ही ग्राममंगल शाळेची वैशिष्ठ्य आहेत.
‘ग्राममंगल’ पद्धतीच्या शिक्षणाचे चांगले पडसाद सध्याच्या पाठ्यपुस्तकावर देखील पाहता येतात. राज्याच्या शिक्षण खात्यानंही ‘ग्राममंगल’च्या शिक्षणाचं महत्त्व ओळखलं आहे. या प्रवासात पुढे उद्योगपती अरुण किर्लोस्कर यांच्या आवाहनामुळे सातारा जिल्ह्यातल्या वाई इथल्या ‘भारत विद्यालय’ या शाळेत ग्राममंगलच्या साहाय्याने हा प्रयोग केला. रचनावादी पद्धतीनं शाळेचं नियोजन आणि कार्यवाही उत्तम चालू शकते हे या प्रयोगानं सिद्ध झालं.

स्वत:मधूनच होते शिक्षणाची खरी सुरवात
पारंपरिक शिक्षणात व्याख्या सांगितल्यानंतर त्याचं उदाहरण सांगितलं जातं, मात्र ‘ग्राममंगल’च्या पद्धतीत शिक्षण हे स्वत:पासून सुरू होतं. याठिकाणी विविध विषयांची प्रयोगशाळाच आहे. स्वतः, स्वतःचं घर, गाव इथपासून ते थेट जगाच्या इतिहासाकडे यात वळता येतं. यातून मुलं स्वतः सिद्धांत शोधतात. त्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं जातं. यात विद्यार्थीच जरी स्वतःच्या पद्धतीनं शिकत असेल तरी या पद्धतीत शिक्षकांचं महत्त्व कमी होत नाही. मुलांना मार्गदर्शक म्हणून शिक्षक महत्त्वाचा असतोच. शाळेत बसण्याच्या पद्धतीतही ग्राममंगलनं महत्त्वपूर्ण बदल केला, तो म्हणजे वर्गात एकामागोमाग एक अशा पद्धतीनं न बसता गोलाकार पद्धतीनं बसणं. अशा प्रक्रियेतून मुलांना एकमेकांना समजून घेता येतं.

या व्यतिरिक्त मूल खूप हसलं पाहिजे, मूल खूप बोललं पाहिजे, म्हणजेच शाळा बोलकी पाहिजे तसंच मूल खूप हललं पाहिजे. याचा अर्थ असा की, मुलांना दोन तासांच्या दरम्यान फिरता आलं पाहिजे. यातून मुलं ताजीतवानी होतात. मुलांबरोबरच मोठ्यांनाही हा नियम लागू आहे, त्यामुळे लहानपणापासून ती सवय हवी. त्यात पाणी आणि ऑक्सिजन ब्रेकचे विरंगुळ्याचे क्षण मुलांना दिले पाहिजेत. त्यातूनच एका अर्थी रचनावादाची पायाभरणी होते. केवळ शाळांच्या जमिनी आणि भिंती रंगवणं म्हणजे रचनावाद नव्हे.

मूल स्वतः संकल्पना शोधतं, पण त्यासाठी त्याला अनुभवातून जावं लागतं. इथं मुलांना कामं सांगितली जातात, त्यातूनच ते परिसरात जाऊन शिकतात. मुलांना वर्गात आजच्या तासाचा विषय सांगितला जात नाही, तर मुलांना स्वतः शिकण्यासाठी प्रवृत्त केलं जातं, त्यांना अनुभव घेण्यासाठी वातावरण निर्माण केलं जातं, या बाबी अभ्यासवर्गात येणार्‍या इतर शाळांच्या शिक्षकांनाही माहीत नसतात. अशा अनेक गोष्टी इथं शिकवल्या जातात. असे बदल घडवण्यासाठी ‘ग्राममंगल’च्या माध्यमातून अशा शाळांना तीन-पाच वर्षांसाठी प्रशिक्षित केलं जातं. सुरवातीला या पद्धतीला आक्षेप घेतले जातात, मात्र संयम ठेवल्यावर तीन वर्षांनंतर याचे चांगले परिणाम येऊ लागतात. शाळांसारखेच इतर सर्वसामान्यांनाही मूल कसं शिकतं याबाबत उत्सुकता असते, या ठिकाणी सर्वांसाठीही कार्यशाळा आयोजित करण्यात येतात. एकंदर पाहता या व इतर कार्यशाळांमध्ये ग्राममंगल वर्षभर व्यग्र असते.

‘टिली-मिली’ संकल्पना राबवण्यात मोठा सहभाग
खरं तर ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण हे ‘ग्राममंगल’च्या पठडीत न बसणारं. पण टाळेबंदी काळात सर्वांपर्यंत शिक्षण पोचवायचं होतं. म्हणूनच ‘एमकेसीएल’च्या माध्यमातून ‘टिली-मिली’च्या व्हीडिओ माध्यमातून घरोघरी शिक्षण पोचवण्यात ‘ग्राममंगल’ला यश मिळालं. टाळेबंदी काळात ज्या मुलांकडे अ‍ॅप नाही, मोबाईल नाही, ज्यांच्याकडे फक्त दूरदर्शन आहे अशांना शिक्षण देण्यासाठी ‘बुद्धिमान महाराष्ट्र प्रकल्पा’त ‘एमकेसीएल’च्या विवेक सावंत यांनी शासनाकडे प्रस्ताव मांडला. त्यासाठी त्यांनी ग्राममंगलवर जबाबदारी सोपावली होती. या काळात सर्वाधिक म्हणजेच दोनशे ऐंशी भागांसाठी धडे आधारित संकल्पनेवर रचनावादाचा आधार घेत मुलांना शिकवलं गेलं. यात पहिली ते चौथीचं पूर्ण काम ‘ग्राममंगल’नं केलं आणि पाचवी ते आठवीसाठी समन्वयक म्हणून काम पाहिलं. एरवी जो विषय प्रत्यक्ष मांडायला दीड तास लागतो, दूरदर्शनसारख्या प्रभावी माध्यमामुळे अवघ्या वीस मिनिटांत मांडता आला.

‘ग्राममंगल’ आणि पालकप्रबोधन
पालक सभा यशस्वी करण्यासाठी ग्राममंगलनं ‘युनिसेफ’सोबत ‘संवेदनशील पालकत्व’ या कार्यक्रमाचा प्रयोग करण्यात योगदान दिलं. अंगणवाडीतल्या पालकांसाठी, जन्मापासून ते सहा वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी पालक भूमिका काय असावी असे वेगवेगळे सोळा विषय तयार केले. या सभा अनुभवाधारित कशा होतील याचं नियोजन करून त्याची प्रत्यक्ष कार्यवाही केली. यात मुलांची वाढ आणि विकासासाठी अनुभव आधारित मार्गदर्शन केलं. फक्त वडील पालकांसाठीसुद्धा ही सभा आयोजित केली होती. मुलांच्या वाढीसाठी वडिलांचा महत्त्वपूर्ण सहभाग यातून नोंदवता आला. यात नऊशे आंगणवाड्या होत्या, टाळेबंदीच्या काळात या सभा घेणं थांबलं तेव्हा ‘घरीही शिकते आमचे मूल’ हे ‘यूट्यूब चॅनेल’ विकसित केलं. विद्यार्थी, पालक, संस्था, शासन यांच्या हितासाठी शिक्षणातल्या नव्या उपयुक्त गोष्टींवर अभ्यास करून त्यावर ‘ग्राममंगल’च्या शाळांमध्ये प्रयोग करून ते समाजातल्या शाळांमध्ये पोचवणं हे ‘ग्राममंगल’चं मुख्य कार्य आहे आणि तोच ध्यासही आहे.
अलीकडच्या काळातलं सर्वांत उपयुक्त योगदान म्हणजे पालघर अंगणवाडी प्रकल्प. पालघर जिल्ह्यातल्या १८९२ अंगणवाड्यांसोबत पालघरमध्ये ‘ग्राममंगल’चा प्रकल्प सुरू होता. यात बालशिक्षणाचे आणखी प्रयोग करायचे राहिले आहेत, संस्था ते पुढच्या काळात करणार आहे. अदिती नातू यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेला हा प्रकल्प गुणवत्तेचं एक उत्तम उदाहरण आहे.

महिला सबलीकरणासाठी ‘ग्राममंगल’चे ‘विकासघर’
‘विकासघर’ नावाच्या संकल्पनेअंतर्गत ‘मॅप्रो’ या फूड कंपनीसोबत वाई, पाचगणी, महाबळेश्वर इथल्या जिल्हा परिषदेच्या छप्पन शाळांमध्ये इयत्ता पहिली ते चौथीसाठी दोन तास पूरक वर्ग चालवले जातात. गावातल्याच प्रशिक्षित ताई रचनावादी पद्धतीनं स्थानिक जिल्हा परिषद शाळेत ‘ग्राममंगल’कडून शिकवतात. गेल्या बारा वर्षांपासून हे काम सुरू आहे. यातून महिला सबलीकरणाचं मोठं काम होत आहे. यात सध्या एकशे साठ मुली स्वयंसेविका म्हणून काम करतात.

शाळेबाहेर राहून शिकायची इच्छा असणार्‍या मुलासाठी अध्ययन घर :
प्रसाद मणेरीकर यांच्या नेतृत्वाखाली लर्निंग होम (अध्ययन घर) विकसित झालं आहे. यात मुलांच्या क्षमता विकसित करणं हे ध्येय पाठ्यपुस्तक न वापरता कसं साध्य करता येतं, पालकांची गुंतवणूक मुलांच्या विकासात नक्की कशी करायची आणि आठवीपर्यंत पाठ्यपुस्तक न वापरतादेखील दहावीच्या परीक्षेत उत्तम यश मिळवता येतं हे या प्रयोगानं सिद्ध केलं आहे.

टाळेबंदीचा उपयोग शेतीत मशागतीसाठी
टाळेबंदी काळात ऐने इथं शेती सुरू आहे. यात आठवी ते दहावीची मुलं शेती करत आहेत. या कोरोना काळातही शिक्षक जवळ राहत असल्यानं पाड्यावर जात होते. मुलांना आठवड्याचं काम आणि खेळता खेळता शिकण्यासाठी उद्युक्त करणारी साधनं देऊन येत होते.

‘ग्राममंगल’च्या वाढीत समाजाचं मोठं योगदान
सध्या ‘ग्राममंगल’च्या सर्व संस्थांमध्ये मिळून पन्नास शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी काम करतात. इथं स्वतंत्र पद्धतीनं शिक्षण प्रक्रिया असल्यानं संस्थेला शासनाची आर्थिक मदत घेता येत नाही, त्यामुळे दत्तक पालक योजना आहे, त्यात मुलांचं शिक्षण दत्तक घेता येतं. यातून जेवण, नाश्ता खर्च भागवता येतो, हे जनसहभागातून होतं. याठिकाणी पालकांचे मेळावेही घेतले जातात. पूर्वी पालक या मुलांना दिवाळीत घरीही घेऊन जायचे. मुलांचे युनिफॉर्म ते ‘स्किल डोनेट’पर्यंत लोक मदत करतात. याव्यतिरिक्त संस्था काही कार्यक्रम आयोजित करते, त्यातून निधी उभारणी होते. काही जण या ठिकाणी मुलांसाठी शिबिरं घेतात. एका ‘आयटी’ संस्थेनं तर ‘ग्राममंगल’ला सौर ऊर्जा यंत्रणा, टीव्ही, संगणक संच भेट दिला आहे. संस्थेला शासनाकडून मदत नसल्यानं आणि ‘सीएसआर’च्या माध्यमातून फक्त वस्तुरूपात मदत मिळत असल्यानं कर्मचार्‍यांचं वेतन देणं हा संस्थेसमोर मोठा विषय असतो.

तंत्रज्ञानाबाबत हवा एकात्मिक दृष्टिकोन
ऑनलाईन शिक्षणातल्या स्क्रीनला मुलं कंटाळतात, मुलं रमत नाहीत. सहभाग कमी असल्यानंही ती कंटाळतात. शिक्षक आणि मुलं हे नातं अतूट आहे. मुलांमध्ये आणि शिक्षकांमध्ये ‘केमिस्ट्री’ असेल तर तिथं तंत्रज्ञानाची गरज कमी भासते. असं असलं तरीही मात्र या पुढील काळात विशेषतः शिक्षकांचा एकात्मिक दृष्टिकोन असावा. पण भविष्यातल्या स्वतःच्या विकासासाठी शिक्षकांनी तंत्रज्ञानातल्या नवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत.
नव्या शैक्षणिक धोरणातही ग्राममंगलच्या अपेक्षित बाबींचा अंतर्भाव झालेला दिसतो. या शैक्षणिक धोरणातले बारकावे समजून घेतले तर त्यात रचनावादी पद्धतीनुसार करता येण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. मात्र यात शिक्षक प्रशिक्षणावर मुख्य भर असायला हवा, अन्यथा आधीचीच आव्हानं संपणार नाहीत.
शिक्षणातून मुलांचा विकास साधला जातो, त्यातून परिणामी समाज आणि राष्ट्र उभारणीलाही हातभार लागतो. शिक्षणातून नोकरी करणारे कर्मचारी नव्हे तर समाजाला दिशा देणारे मार्गदर्शक निर्माण व्हायला हवेत. यासाठी पारंपरिक चौकटीत असलेल्या शिक्षण पद्धतीचा पुनर्विचार करण्याची गरज अधोरेखित होते आहे. त्यासाठी रचनावादी शिक्षण पद्धती चांगला पर्याय ठरतो आहे. यातून सिद्ध झालेले प्रयोग हे थक्क करणारे आहेत. केवळ विद्यार्थीच नाही तर सबंध समाजाला वेगळी दिशा देण्याचं काम यातून घडू शकतं, त्यासाठी शिक्षण क्षेत्रात काम करणार्‍या संस्थाचालक आणि शिक्षकांना पुढाकार घ्यावा लागणार आहे. शिक्षणाचा प्रवाह काळासोबत वाहणारा असावा, त्यातलं साचलेपण संपवून सबंध शिक्षण क्षेत्राला अशा नव्या पद्धतींचा अवलंब करण्याची गरज निर्माण होताना दिसते आहे. त्यासाठी किमान एक पाऊल आतापासूनच टाकायला हवं!

शिक्षण हे भावी काळासाठी असावं : रमेश पानसे
प्राथमिक शाळांमधून ज्ञानरचनावाद स्थिरावतो आहे. कारण यातल्या बहुतांशी शाळा शासनाच्या नियंत्रणाखाली आहेत. याउलट माध्यमिक शाळा या खासगी संस्था चालवतात. त्यामुळं तिथं ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धतीचा अभाव जाणवतो. कारण यात पुढे जाऊन पारंपरिक पद्धतीनं दहावीची परीक्षा देणं हा उद्देश असतो. या खासगी शाळांमध्ये जगात होणारे बदल स्वीकारले जात नाहीत. संस्थाचालकांनाच अनेकदा या बदलांची माहिती नसते. त्यांच्यात याबाबत मोठी उदासीनता जाणवते. खासगी इंग्रजी शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा आहे, मात्र त्याची अंमलबजावणी होते का नाही, हे तपासण्याची शासनाची कोणतीही यंत्रणा नाही. ज्ञानरचनावादी शिक्षणाचा अंगीकार करा असं शासनानं वेळोवेळी सांगूनही या खासगी शाळा त्याला धजत नाहीत. हा रचनावाद फक्त शाळेपुरता नाही, तर विद्यापीठांमध्येही आणता येऊ शकतो. तिथंही फार काही होताना दिसत नाही. ग्राममंगलच्या अभ्यासवर्गांना सरकारी अधिकारी पण येतात, त्यात ते ज्ञानरचनावाद समजून घेतात. यातून बी.एड. शिक्षणात, पाठपुस्तकात ज्ञानरचनावादाचा समावेश आणि शैक्षणिक साधनापर्यंत शासनानं पुढाकार घेतला आहे. मात्र आता खासगी संस्थांनी यात पुढाकार घेण्याची गरज आहे.

केवळ शिक्षणात तंत्रज्ञान आणलं म्हणजे शाळा विकसित झाली असं नाही. तर त्यात मूळ आशय बदलण्याची गरज आहे. शिक्षण हे भावी काळासाठी असावं. ते भविष्याशी सुसंगत असावं. मात्र पारंपरिक शिक्षण पद्धतीत शैक्षणिक गरजा भागवता येत नाहीत, त्यामुळे शिक्षणात विसंगती निर्माण झाली आहे. यात मुलांचा विचार व्हावा. जीवन आणि शिक्षण सोबत असावं, ते नसल्यानं मुलांमध्ये आणि त्या ओघानं आवश्यक असणार्‍या शिक्षणात आता साधारण साठ वर्षांचं मोठं अंतर पडलं आहे.

– संतोष गोगले

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.