Now Reading
मोडी लिपी संवर्धक रामकृष्ण बुटे-पाटील

मोडी लिपी संवर्धक रामकृष्ण बुटे-पाटील

Menaka Prakashan

खरं तर कोणतीही भाषा ही केवळ एखादी लिपी नसते तर तिथल्या इतिहासाचं, भूगोलाचं आणि संस्कृतीचं प्रतिबिंब असतं. म्हणूनच कोणत्याही प्रदेशाला, संस्कृतीला समजून घ्यायचं असेल तर स्थानिक भाषा महत्त्वाची भूमिका बजावते. पण आज अनेक भाषा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अशीच समृद्ध इतिहासाचा वारसा लाभलेली मोडी लिपी, आता खूपच कमी जणांना अवगत आहे. हे जाणून आणि आपल्या इतिहासाला प्रकाशमान करण्यासाठी मोडी लिपीचं संवर्धन, प्रसार आणि प्रचार करण्यासाठी मनापासून झटणार्‍या रामकृष्ण बुटे-पाटील यांच्याविषयी विस्तारानं जाणणं म्हणजे मोडी लिपीचा समृद्ध प्रवास अनुभवणं…

‘‘आपल्या शूरवीर वाड-वडिलांनी पराक्रम करून जी कीर्ती मिळवली आहे ती मोडी हस्तलिखितात वास करत आहे. ती मोडी समजून घेणं, तो इतिहास जाणून घेणं, ती हस्तलिखितं छापून त्यांचा जीर्णोद्धार करणं म्हणजे त्या कुलाचा आणि त्या विभुतींच्या पराक्रमाचा जीर्णोद्धार करण्यासारखं आहे. म्हणूनच मोडी लिपीचं संवर्धन करणं, ही आपल्या सगळ्यांवर जबाबदारी आहे, हे आपलं कर्तव्य आहे,’’ असं बाणेदारपणे सांगतात मोडी लिपीचे ज्येष्ठ अभ्यासक, प्रशिक्षक, लिप्यंतरकार रामकृष्ण बुटे-पाटील. ते जितक्या हिरीरीनं मत व्यक्त करतात तितक्याच उत्साहानं मोडी लिपी संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्याशी संवाद म्हणजे एका जिद्दीचा आणि इच्छाशक्तीचा प्रवास आहे. चला तर मग आज एकविसाव्या शतकात मोडी लिपीचा प्रसार करण्यासाठी झटणारे रामकृष्ण बुटे-पाटील यांच्याशी संवाद साधूया…

पल्लवी : नमस्कार सर, आज परदेशी भाषा शिकण्याकडे बहुतांशी मंडळींचा कल असतो त्या पार्श्वभूमीवर आपण मोडी लिपीकडे कसे वळलात?
बुटे-पाटील सर : आपला एकविसाव्या शतकात वावर आहे. भारत एक महासत्ता बनू पाहतोय अशा चर्चा झडतात, तेव्हा इंग्रजी आणि परकीय भाषा, ज्ञान अवगत असावे, नवीन भाषा, नवीन गोष्टी या अवश्य आत्मसात कराव्यात तरीही मातृभाषेचा अभिमान हा कायम हवा. आपल्या भाषेचा अमूल्य ठेवा जपताना एक लक्षात घ्यायला हवं की, प्राचीन मोडी लिपी हा मराठी भाषेचा ऐतिहासिक ठेवा आहे. मोडी लिपीला व्यवहारात आणले ते यादव राजांचे प्रधानमंत्री हेमाद्री ऊर्फ हेमाडपंत यांनी असं इतिहास संशोधक सांगतात. मोडी लिपी ही देवनागरी लिपीपेक्षा जलद गतीनं लिहिता येते. त्यामुळे यादव काळापासून राज्य आणि लोक व्यवहाराची ती लिपी होती. प्रशासकीय लिखाण कामाचा आणि पत्र व्यवहाराचा वेग त्याकाळी निश्चितच वाढला.
ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या पुणे जिल्ह्यातल्या राजगुरूनगर तालुक्याच्या मौजे वराळे इथला माझा जन्म, आमचं मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंब! जिल्हा लोकल बोर्डाच्या शाळेत आम्हा भावंडांचं शिक्षण सुरू होतं. माझे ज्येष्ठ बंधू नागनाथ गुरुजी हे शिक्षक होते. मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत असताना मोडीचे कित्ते गिरवले होते. साधारणपणे १९५२ साली तत्कालीन मुंबई प्रांत सरकारनं शालेय अभ्यासक्रमात मोडी लिपी शिकवण्याचं बंद केलं. माझी मोडी तिथेच थांबली. मीही यथावकाश पुढील शिक्षणासाठी मुंबईत मामांकडे आलो.

पल्लवी : मग या सगळ्यात मोडी लिपीशी पुन्हा नाळ जोडली जाणं हा एक योगायोगच वाटतो.
बुटे-पाटील सर : मुंबईत आल्यावर पाचवी ते सातवी पर्यंतचं शिक्षण आर्थर रोड म्युनिसिपल शाळेत घेत असताना विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या अभ्यासिकेत जायला लागलो. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून विविध उपक्रम राबवणार्‍या या संस्थेचं फक्त एक रुपया भरून आजीव सदस्यत्व घेतलं. आजही ते शुल्क तेवढंच आहे बरं का. सांगायचा मुद्दा असा की आयुष्याला कलाटणी देणार्‍या व्यक्ती असतात तशा संस्थाही असतात. खेड्यातून शहरात आल्यावर या संस्थेच्या अभ्यासिकेत अभ्यास करता करता मी संस्थेच्या विविध उपक्रमांत सहभागी व्हायला लागलो. मी छोट्या-मोठ्या विविध जबाबदार्‍या शिक्षणाच्या बरोबरीनं पार पाडत होतो. त्या वेळच्या चाकरमानी कुटुंबाच्या संरचनेप्रमाणे महाविद्यालयीन शिक्षण सुरू असतानाच मुंबई महानगरपालिकेत नोकरी पत्करली आणि चाकरमानी म्हणून कुटुंबात मार्गस्थ झालो.
तरीही मंडळाच्या विविध पदांवर राहून मंडळाचा कार्यकर्ता या नात्यानं, निष्ठेनं काम करणं हे सुरूच होतं. पंचवीस वर्षांनंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मंडळाचा प्रमुख हे सर्वोच्च पद मिळालं. समाधान वाटलं, बरोबरीनं सतत नवीन काही करण्यासाठी उत्सुकही होतो. बघता बघता आयुष्यात निवृत्तीच्या टप्प्यावर कधी आलो ते कळलंच नाही. बरं, रिकामे उद्योग करत वेळ वाया घालवण्याची मानसिकता नव्हती. मग निवृत्तीनंतरच्या आयुष्याला वेगळं वळण देण्यासाठी लहानपणी गिरवलेल्या मोडीच्या कित्त्यांचं स्मरण केलं. निर्णय घेतला, मोडी शास्त्रशुद्ध पद्धतीनं शिकायची. खरं म्हणजे मधल्या काळात आयुष्याच्या पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं. त्यामुळे कितपत अभ्यास झेपेल माहिती नव्हतं, हो; पण जिद्द कायम होती. स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करायचं ठरवलं (हसत हसत) त्या जिद्दीनं अभ्यास सुरू केला. कालांतरानं, मला मोडी लिपीनंच मोडी लिपीचे प्रशिक्षक, लिप्यंतरकार अशी ओळख मिळवून दिली.

पल्लवी : वा! म्हणजे लहानपणीचे दिवस शोधताना, मोडी लिपीकडे वळलात तरी हौस म्हणून लिपी शिकणं आणि प्रशिक्षक होणं यामध्येही बरंच अंतर आहे नाही का?
बुटे-पाटील सर : हो! ते तर आहेच ना!! आज मला असं नेहमी वाटतं, आपण जे काही करतो त्यात ‘ईश्वरी इच्छा बलियेसी’ काय कुठून सुरवात झाली आणि काय कसं सुचत गेलं याचं आजही मला आश्चर्यच वाटतं बघा. मी विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात दुसर्‍यांदा मंडळप्रमुख झालो. यानंतर हीरक महोत्सवी वर्षात प्रशिक्षण केंद्र समिती प्रमुख झालो आणि या संधीचं सोनं करायचं ठरवलं. मंडळात त्या निमित्तानं मोडीचे वर्ग घ्यायचं ठरवलं. तेवीस फेब्रुवारी २०१४ ला माझे मोडी लिपीचे गुरू मोडी महर्षी कृष्णाजी म्हात्रे यांच्या आशीर्वादानं मोडी लिपी प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली. माझे दुसरे गुरू सूर्यकांत पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोडी लिपीचे वर्ग सुरू झाले. आजही विविध पाच पातळ्यांवर हे प्रशिक्षण सुरू आहे. आपल्या वैभवशाली मोडी लिपीचा मान राखत मी कोणतंही मानधन न घेता सेवाभावी वृत्तीनं हा मोडी लिपी प्रशिक्षणाचा विडा उचलला आणि आजही तो सुरू आहे.

पल्लवी : मी पुन्हा तोच एक मुद्दा विचारेन, तो म्हणजे, हे सगळं करताना मोडी लिपीच का असं तुम्हाला वाटतं?
बुटे-पाटील सर : तुमचा मुद्दा रास्त आहे. बघा, आपला इतिहास खूप समृद्ध आहे. विदेशी आक्रमणं, विदेशी सत्ता, आपल्या पूर्वजांनी वेळोवेळी या विरुद्ध केलेला प्रतिकार, त्या राजांची कार्यपद्धती, त्या काळची व्यवहाराची, राज्यकारभाराची न्यायदानाची पद्धत, युद्धं, तह, वाटाघाटी, गुप्त संवाद अशा एक ना अनेक गोष्टींचा, घटनांचा इतिवृत्तांत म्हणजे इतिहास! हा इतिहास मोडी लिपीत लिहून ठेवलेला आहे. मोडी लिपी म्हणजे इतिहासात डोकावण्याची खिडकी आहे.
आज मोडी लिपीचा वापर कमी असला तरी ऐतिहासिक ठेवा प्रकाशात आणण्यासाठी मोडी लिपी अभ्यासून आत्मसात करणं ही काळाची गरज आहे. मोडी लिपी शिवाय इतिहासाचं समृद्ध दालन उजेडात येऊ शकणार नाही. मोडी लेखन बंद असलं तरी मोडी वाचन बंद झालेलं नाही. मोडीत दडलेल्या इतिहासाच्या घडामोडींचा अभ्यास, अभिवाचन केल्यावर आपण त्या घटनांचे साक्षीदार आहोत असं वाटतं आणि शूरवीरांनी गाजवलेल्या पराक्रमाची गाथा उलगडताना आपण विजयी झाल्याच्या भावनेनं एक नवा उत्साह आपल्यात संचारतो, तो शब्दांच्या पलीकडे असतो बघा.

पल्लवी : सर, हे सगळं सांगताना तुमच्या शब्दातला उत्साह, डोळ्यातली चमक खरंच चकित करतेय. आज तेवढ्या प्रमाणात मोडी अभ्यासक आहेत का?
बुटे-पाटील सर : आज शासन दरबारात अनेक विभागात मोडी वाचकांची गरज निर्माण झाली आहे. अनेक कामं मोडी वाचकांच्या अभावी प्रलंबित आहेत. गावकामगार, चावडी, मंडळ अधिकारी, तहसीलदार कार्यालय, प्रांत अधिकारी, भूमापन कार्यालय, नगरपालिका, नगर परिषदा, जिल्हा प्रशासन कार्यालय, पुराभिलेख कार्यालय, जन्म-मृत्यू नोंदी, शाळांच्या जनरल रजिस्टरमधील नोंदी, जमिनीचे दस्तऐवज अशा सर्वच ठिकाणी मोडी लिपीतली कागदपत्रं अगणित प्रमाणात आहेत. त्या सगळ्यांचं वाचन करण्यासाठी वाचकांची आणि मोडी संशोधकांची गरज निर्माण झाली आहे. हे असं आहे, हे माहिती आहे, पण मोडी लिपी अभ्यासक असणं वेगळं आणि प्रशिक्षक म्हणून उभं राहणं फार वेगळं आहे. त्यासाठी मला एका वेगळ्याच प्रांतात उडी घ्यावी लागली. सर्वसामान्यांमध्ये मोडी लिपीविषयी तितकी माहिती नाही. त्यामुळे विद्यार्थी, युवा पिढी किंवा विविध प्रकारचे अभ्यास करू इच्छिणार्‍या गुणिजनांच्या मनात मोडी लिपीविषयी तेवढी आस्था नाही. मग मी मुंबई आणि मुंबई बाहेर शाळा, महाविद्यालयात, विविध संस्थांमध्ये, आस्थापनांमध्ये मोडी कार्यशाळा आयोजित करायला सुरवात केली. मोडी लिपी जागृतीची चळवळ उभी करण्यासाठी काय करता येईल हाच एक विचार मनात कायम असतो. या एकदिवसीय कार्यशाळांमुळे मोडी लिपीविषयक प्रारंभिक माहिती, तिचं महत्त्व उपस्थितांपर्यंत पोचतं, यातून ही मंडळी अधिक मोडी जाणून घेण्यासाठी उद्युक्त होतात आणि मोडी लिपीविषयी अधिक जाणून घ्यायला लागली की, माझं उद्दिष्ट सफल झालंच म्हणून समजा. फार माफक अपेक्षा असते हो माझी, तुम्ही फक्त मोडी लिपी जाणून घ्या, एकदा का त्यात गोडी वाटायला लागली की, मोडी लिपी तुम्हाला आणि तुम्हीही मोडी लिपीला सोडणार नाही हे नक्की! ही मोडी लिपीची जादू आहे असं मला वाटतं. त्यातून इतिहासाची, मार्गदर्शनाची भली मोठी कल्याणकारी कवाडं खुली होतात…

पल्लवी : आपला हा प्राचीन लिपीवर असलेला विश्वास वाखाणण्याजोगा आहे. ही मोडी लिपीची चळवळ म्हणजे नेमकं काय?
बुटे-पाटील सर : बघा… मी तर मोडी लिपी प्रचाराच्या उद्देशानं प्रशिक्षण द्यायला २४ ु ७ तयार असतो. सुरवातीला कार्यशाळा घेतो. त्यांनतर उत्सुक प्रशिक्षणार्थींसाठी प्राथमिक, प्रगत, सराव प्रात्यक्षिक, लिप्यंतर कौशल्यं, शिक्षक-प्रशिक्षण अशा पाच स्तरांवर मोडी लिपी प्रशिक्षण देण्यात येतं. आता यामुळे मोडी लिपी शिकणार्‍यांची संख्या वृद्धिंगत होत आहे. विद्यार्थ्यांना मोडी लिपीचं प्रशिक्षण देऊन साक्षर करण्याबरोबरच त्यांच्या अंगी असलेल्या भाषाविषयक कलागुणांना वाव आणि प्रोत्साहन देण्यासाठी ‘प्रणाम मोडी वैभव’ हे मोडी-देवनागरी हस्तलिखित दर वर्षी प्रकाशित करायला सुरवात केली, हा उपक्रम आजही सुरू आहे.
प्रशिक्षणार्थींना मोडी लिपीचे जुने दस्तऐवज आणि कागदपत्रं प्रत्यक्ष अवलोकन करून वाचता यावेत यासाठी तामिळनाडू-तंजावर इथलं प्रसिद्ध सरस्वतीमहाल ग्रंथालय, धुळ्यातलं इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संग्रहालय आणि पुण्यातलं समर्थ वाग्देवता मंदिर मधलं पुराभिलेखागार (पेशवे दप्तर) आणि भारत इतिहास संशोधक मंडळ अशा मोडी लिपी जागरूक स्थळी सहलींचं आयोजन केलं जातं.
मोडी अभ्यासकांना प्रोत्साहन मिळावं यासाठी, २०१७ आणि २०१९ साली मोडी लिपी अभ्यासक आणि जाणकार यांच्यासाठी दोन यशस्वी संमेलनं आयोजित केली. मोडी देवनागरी लिपीत दोन पुस्तकं प्रकाशित केली. मोडी लिपी अभ्यासकांसाठी राज्यपातळीवर मोडी लिपी सुंदर हस्ताक्षर स्पर्धा आणि मोडी लिप्यंतर स्पर्धा आयोजित केली.
अनेक प्रयत्न केले आणि अविरतपणे आजही सुरूच आहेत. आता टाळेबंदीमुळे सगळे जग ठप्प झालं. खरं म्हणजे मी त्याच्या थोडं आधी, अनावश्यक वेळ वाया जाऊ नये म्हणून सोशल मीडियामधून बाहेर पडण्याचा विचार करत होतो. पण गंमत बघा, आजच्या तंत्रज्ञानाशी मैत्री असलेल्या पिढीनं मला प्रेरित केलं आणि त्यांच्या मदतीनं मोडी लिपीच्या ऑनलाइन कार्यशाळा, प्राथमिक, प्रगत असे वर्ग सुरू ठेवले. आज टाळेबंदीमध्येही जगभरातले अनेक जण आपल्या मोडी लिपी वर्गात उत्साहानं सहभागी होत आहेत. तुम्हाला सांगताना, मला इतका आनंद होतो आहे की सगळं सुरू आहे ते मोडी लिपीच्या संवर्धनासाठी!

पल्लवी : मोडी लिपी शिकण्यासाठी कोणती प्राथमिक कौशल्यं हवीत?
बुटे-पाटील सर : मला हे सांगायला आवडेल. म्हणजे, मोडी लिपीचे विद्यार्थी असं मी जेव्हा वारंवार म्हणतो तेव्हा शाळा-महाविद्यालयीन पिढी, त्याचबरोबर डॉक्टर, नर्सेस, आयटी तज्ज्ञ, इंजिनीअर, विविध व्यावसायिक, बँक अधिकारी, शासकीय अधिकारी, इतिहास अभ्यासक, वकील, न्यायालयीन कामकाज बघणारे, गृहिणी, ज्येष्ठ नागरिक, सतत नावीन्याच्या शोधात असलेली मंडळी, अनेक जागतिक कीर्तीच्या चित्रकला- कॅलिग्राफीमधली कलाकार मंडळी अशी अनेक क्षेत्रांतली व्यक्तिमत्त्वं त्यात आहेत. आपापल्या क्षेत्रात दिग्गज असलेली मंडळी मोडी लिपी शिकताना एका पातळीवर असतात. आता आपले माननीय प्रधानमंत्री महोदय ‘आत्मनिर्भर भारत’ असं आपल्याला आवाहन करत आहेत. या पार्श्वभूमीवर मला आपल्या सगळ्यांना मनापासून सांगावंसं वाटतं, मोडी लिपीत आपण पारंगत झालात तर मोडीचे सुमारे सातशे वर्ष जुने दस्तऐवज आजच्या भाषेत उलगडल्याचं समाधान आणि अर्थार्जन दोन्ही साध्य होईल. खास करून ज्येष्ठ नागरिक, गृहिणी तसंच, ज्यांना घरून काम करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही एक संधी आहे. अर्थात, त्यात तरबेज होण्यासाठी मोडीचा ध्यास हवा, सराव करण्याची इच्छा हवी. कारण, कोणत्याही क्षेत्रात आपण यशस्वीपणे कार्य करायचं तर कष्टाला पर्याय नाही. मी कायम सेवाभावी वृत्तीनं मोडी लिपी संवर्धनासाठी सज्ज आहे.
आज मी अभिमानानं सांगतो, माझे विद्यार्थी माझ्याबरोबर प्रशिक्षक म्हणून नि:स्वार्थ वृत्तीनं कार्यरत आहेत. पाच विद्यार्थी पुण्याच्या पुणे लेखागार (पेशवे दप्तर) इथं माझ्याबरोबर संशोधन करत आहेत, काही विद्यार्थी लिप्यंतरकार म्हणून कार्यरत आहेत. तसंच, काही स्वतंत्रपणे व्यावसायिक प्रशिक्षक आहेत. मोडी तज्ज्ञ तयार झाले की, सरकारी कार्यालयं, पुरातत्त्व विभाग, न्यायालयं इथे रोजगार निर्माण होऊ शकतो.

पल्लवी : सर, मोडी लिपीचं भवितव्य, समाजाचा दृष्टिकोन असा विचार करताना आपल्याला काय जाणवतं?
बुटे-पाटील सर : आज समाजमनात मोडीलिपीविषयी बर्‍यापैकी सजगता येत आहे. आपण कुठल्याही ऐतिहासिक स्थळाला भेट दिली की तिथं मोडी लिपीतले शिलालेख दिसतात. मग ते वेगळ्या पद्धतीनं काही लिहिलेलं दिसतंय म्हणून औत्सुक्यानं त्याचा फोटो काढला जातो आणि मग हे फोटो फिरत फिरत आम्हा अभ्यासकांकडे पोचतात. मग संवाद साधताना ती मंडळी मोडी समजून घेऊ लागतात. हे लक्षात घेता, कार्यशाळा वर्गांना मिळणारा प्रतिसाद किंवा मोडी अभ्यासकांचा शोध घेत कुठून कुठून मंडळी पोचतात तेव्हा समाधान वाटतं. इथून पुढे मोडी लिपीचा भविष्यकाळ उज्ज्वल असल्याचं ते द्योतक आहे. सामान्यांपासून ते सरकार दरबारापर्यंत मोडी लिपीचं आकर्षण सर्वांनाच आहे.

पल्लवी : मोडी लिपी समोर कोणती आव्हानं आहेत तसंच कोणत्या बाबी समाधानकारक आहेत?
बुटे-पाटील सर : विविध प्रशासकीय कचेर्‍या, ऐतिहासिक वास्तू, विविध संस्था यांच्याकडे महत्त्वाचे दस्तऐवज मोडी लिपीत आहेत. जनतेला उपयुक्त असणारे अभिलेख, ऐतिहासिक पत्रे, मोबदला पावत्या, जमीन खरेदी-विक्री व्यवहार, आज्ञापत्रे, मृत्युपत्रे, सनदा आज जीर्ण आणि क्षतिग्रस्त अवस्थेत आहेत. हे सर्व दस्तऐवज मोडी वाचकांच्या प्रतीक्षेत धूळ खात आहेत. सामान्य जनांसाठी सरकार विविध योजना जाहीर करते मात्र आपण त्यास पात्र आहोत हे त्यांच्या जुन्या अभिलेखांमधून उलगडू शकतं, मात्र मोडी वाचक उपलब्ध नसल्यानं हे साध्य होत नाही. जमिनीचे अनेकविध खटले आज सरकार-दरबारी प्रलंबित आहेत ते मोडी वाचकांच्या अभावी! ते निकाली निघाले तर अनेक कुटुंबातले वाद संपुष्टात येतील.
मोडी वाचक या नात्यानं एका जमिनीचा एक मोठा दस्तऐवज माझ्याकडे लिप्यंतरासाठी आला होता. त्या खटल्यात ते लिप्यंतर ग्राह्य धरल्यानं कित्येक करोडोंच्या जमिनीचा वाद अलगद सुटला. आणि मी समाधानानं भरून पावलो. मोडी लिपीत जमिनीची कागदपत्रं, जात प्रमाणपत्रं यांचं लिप्यंतर केल्यानं संबंधित व्यक्तींना आपले हक्क, वंशावळ याबाबत उलगडा होत जातो. या गोष्टींनी मिळणारं समाधान पैशानं मोजता येत नाही हो!
आज मोडी लिपी शिकवण्यासाठी देश-परदेशातून मोठमोठ्या मानधनाच्या मागण्या सांगत अनेक मंडळींचे दूरध्वनी येतात पण माझा ‘मोडी संवर्धन’ हा ध्यास आजही कायम आहे आणि त्यासाठी विनामूल्य प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांची प्रगती हीच मोठी पुंजी असं मला वाटतं. दक्षिणेकडच्या तंजावरपासून उत्तरेकडल्या पेशावरपर्यंत पसरलेल्या मराठी साम्राज्याचा इतिहास हा मोडी लिपीतच आहे. यादवकाल, शिवकाल, पेशवेकाल आणि आंग्लकाल अशा चारही काळात मोडी लिपीचे अधिराज्य कायम होते. तत्कालीन सर्व दस्तऐवज त्या काळातल्या कागदपत्रात दडलेला आहे. त्यामुळे तो समजून घेण्यासाठी मोडी अभ्यासक, संशोधक यांची आपल्या देशाला नितांत गरज आहे. आजही हिंदुस्थानी लिप्यांमध्ये सर्वांत सुंदर आणि लपेटीदार अशी म्हणून मोडी लिपी गणली जाते. संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओडिशा, बंगाल, बुंदेलखंड, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांत तिथल्या स्थानिक भाषेवर मोडी लिपीचा प्रभाव आहे, मोडीने जवळजवळ तेरा भाषा सामावून घेतलेल्या आहेत. जणू ‘एक मोडी, भाषा बहू’ असा हा खेळ आहे.

पल्लवी : आज सेवानिवृत्तीनंतर, तुम्ही मोडी लिपीमुळे जगभरात पोचलेले आहात त्याबद्दल काय वाटतं?
बुटे-पाटील सर : (हसत हसत) अहो काय सांगू तुम्हाला, आत्तापर्यंतच्या खडतर जीवन प्रवासात अनेक यातना, अवहेलना भोगाव्या लागल्या पण मोडी लिपीनं मला अखंड उत्साह, ऊर्जा, जगण्याचं निधान मिळवून दिलं आहे. आयुष्याच्या श्वासापर्यंत मोडी लिपीचा प्रचार-प्रसार हे ध्येय कायम आहे.
जपमाळेतल्या मेरुमण्याला स्पर्श केल्याशिवाय जप पूर्ण होत नाही तद्वत, मोडी लिपीतले माझे गुरुवर्य आहेत तसंच आमचे सहशिक्षक मोडी संशोधक भाऊराव घाडीगावकर आणि मोडी लिपीचे अभ्यासक बहुआयामी व्यक्तिमत्त्व अरविंद कटकधोंड यांच्या अविरत सेवाभावी सहभागाशिवाय हा ज्ञानयज्ञ पूर्ण होऊच शकत नाही. ते माझे जय-विजय आहेत.
बहुत काय बोलणे ‘सारे कृष्णार्पणमस्तु ’

मोडी लिपीच्या प्रसार-प्रचार याचा वसा घेतलेले रामकृष्ण बुटे-पाटील यांच्या कार्याला शुभेच्छा देताना जाणवतं की, त्यांच्याशी बोलणं म्हणजे मोडी लिपी विषयीचा अथक संवाद! इतकंच वाटतं, ‘झाले बहु होतील बहु, परि या सम हाच’

– पल्लवी मुजुमदार

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.