Now Reading
मुलामा

मुलामा

Menaka Prakashan

सहा महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या अवनीचे; ते नव्या नवलाईचे दिवस होते… तिच्या आई-वडिलांनीही लग्नात सगळी हौस-मौज मनापासून केली. सासरच्या माणसांच्या लग्नाबद्दलच्या अपेक्षाही शून्य, शिवाय सासर एकदम खानदानी, नवराही रुबाबदार, राजा-राणीचा संसार जणू… थोडक्यात सगळं काही स्वप्नवत तरीही काहीतरी रिक्त होतं, काय ते अवनीलाही समजतं नव्हतं…

दोन मजली बंगला- ऐटबाज- बंगल्याचं नाव ‘सुखद’.
सुखवस्तूपणाच्या आणि श्रीमंतीच्या खुणा अंगाखांद्यावर मिरवत ताठपणानं उभा असलेला ‘सुखद’.
पुढच्या बाजूला बाल्कनी. संध्याकाळी तिथं बसल्यावर छान करमणूक व्हायची. आकाशात पसरलेले वेगवेगळे रंग. घरट्यांकडे परत जाणारे छोटे-मोठे पक्षी…
बंगल्याच्या पुढे-मागे आटोपशीर बाग. बागेत थोडी पण दुर्मीळ झाडं. शिस्तीत उभी असल्यासारखी. हे सगळं वातावरण अवनीच्या ओळखीचं झालं होतं.
गेले सहा महिने ती अशी या वातावरणाशी एकरूप व्हायचा प्रयत्न करत होती.
रोजच संध्याकाळी ती बाल्कनीत बसायची.
लायब्ररीतून आणलेलं एखादं पुस्तक हातात घेऊन रोमँटिक कथा-कादंबर्‍या वाचायला तिला फार आवडायच्या. ती त्यात रमून जायची. हळूहळू कथेत गुंतत जायची. आत्ताही तिच्या हातात अशीच एक कादंबरी होती. ‘पहिली रात्र’ नावाची. शृंगाररसात पूर्णपणे भिजलेली ती कादंबरी… अवनीला त्या कादंबरीनं ओढ लावली होती आणि आता तर महत्त्वाचं प्रकरण तिनं उघडलं होतं.

चंद्रप्रकाशात न्हाऊन निघत असेलली सुहाग रात… फुलांनी भरलेला पलंग… फुलांचा संमिश्र सुगंध खोलीभर भरून राहिलेला… कुठलंतरी झिंग आणणारं गाणं सीडी प्लेअरवर वाजत होतं.
पलंगावर सलज्ज मुद्रेनं बसलेली नायिका… तिच्या अंगावर लाल साडी… केसांत घमघमणारा गजरा…
वाचता वाचता अवनी एकदम थांबली. तिनं मग ती कादंबरी बाजूला ठेवून दिली आणि ती तिच्याच विचारांत गढून गेली.
एकंदर सगळी वातावरणनिर्मिती झकासच झालीय. थोड्या वेळानं पांढरा पायजमा आणि लखनवी झब्बा घातलेला नायक स्वप्नांच्या वाटेवरून येईल… तो काय म्हणेल बरं? आणि नंतर?
अवनीला एकदम तिची सुहाग रात आठवली.
सहा महिन्यांपूर्वीची.
खोली छान सजवली होती. ती पण अगदी नटूनथटून या कादंबरीतल्या नायिकेप्रमाणे… तिच्या अंगावरही लाल साडी- जरीवर्क केलेली. आपल्याला लाल रंगाचे कपडे चांगले दिसतात असं तिला वाटायचं आणि ते खरंच होतं.
साडीवरच्या जरीच्या बुंदक्यांकडेच ती बघत होती. मनातून मोहरली होती.
आणि दाराबाहेर पावलं वाजली. महेंद्र आले होते. पांढरा शुभ्र पायजमा-झब्ब्यातले महेंद्र.

अवनीनं त्यांच्याकडे बघितलं. डोळ्यातली उत्सुकता शोधायचा प्रयत्न केला, पण तिथं उत्सुकतेपेक्षा गोंधळलेले भावच ठाण मांडून बसलेले दिसले.
ते तिच्याजवळ पलंगावर बसले. ‘छान दिसतेयस’ असंही म्हणाले.
पुस्तक वाचता वाचता स्वतःच्या भूतकाळात हरवून गेली.
इतक्यात फोन वाजला आणि ती भानावर आली.
महेंद्राचाच फोन होता. ‘यायला उशीर होईल’ असं ते सांगत होते.
‘चला, आता सावकाश खायला केलं तरी चालेल. घाईनं काही करायला नको.’
ती मनाशीच म्हणाली आणि पुन्हा तिनं कादंबरी उघडली.
नायक-नायिकेची सुहागरात.
लेखकानं रसभरीत वर्णन केलं होतं. पण का कोण जाणे, तिला आता ते वर्णन वाचण्यात इंटरेस्ट वाटेना.
ती मग पुन्हा अवतीभवती बघायला लागली. पाच-दहा मिनिटं याच अवस्थेत गेली.
मग तिनं कपाटातून फोटोंचा अल्बम बाहेर काढला. लग्नातले फोटो. ती जणू त्या वातावरणात मिसळून गेली. तिला मंगलाष्टकांचे सूर ऐकू यायला लागले.
प्रत्येक फोटोत ती सुंदरच दिसत होती आणि तिच्या आई-वडिलांच्या चेहर्‍यावर कृतकृत्य झाल्याचे भाव.
एका मध्यमवर्गीय माणसाच्या घरातली मुलगी खानदानी श्रीमंताच्या घरात पसंत पडली होती.
पैसेवाले असूनही त्यांच्या घरातल्यांच्या अपेक्षाही जास्त काही नव्हत्या.

‘मुलगी सुंदर हवी’ हीच त्यांची अट होती आणि ती अट अवनीनं पूर्ण केली होती.
लग्न ठरल्यापासून होईपर्यंतच्या काळात महेंद्र मधून मधून येतील… आपली अवनी त्यांच्याबरोबर फिरायला जाईल… असं अवनीच्या आई-वडिलांना वाटत होतं, पण महेंद्र त्यांच्या व्यवसायात मग्न असल्यानं येऊ शकले नाहीत.
दिलगिरीचे फोन मात्र नेहमी करायचे. मोजक्या शब्दांत बोलायचे.
लग्न धूमधडाक्यात पार पडलं. तिच्या आई-वडिलांनी सगळी हौसमौज केली. रीतीचं म्हणून जे काही असतं ते सगळं केलं. कुठे काही कमतरता ठेवली नाही.
‘‘हनिमूनला कुठे जाणार?’’ असं विचारून मित्रमैत्रिणींनी अवनीला भंडावून सोडलं.
त्या प्रश्‍नावर महेंद्राचं ठराविक उत्तर होतं – ‘‘बघूया- अजून काही ठरवलं नाही.’’
‘शेवटी हनिमून नाहीच झाला. कुठेच गेलो नाही आपण.’ अवनी मनाशीच म्हणाली.
आता तिला जरा कंटाळवाणं वाटायला लागलं होतं. कुणाशी तरी मनसोक्त गप्पा मारण्यासाठी मन आसुसलं होतं, पण कुठे जाणार गप्पा मारायला?
लग्न ठरवताना महेंद्रांनी आणि त्यांच्या घरच्या मंडळींनी काहीही अटी घातल्या नव्हत्या. पण नंतर मात्र तिच्या महेंद्रनी बरंच काही ऐकवलं-समजावलं होतं.
‘कुणाशी फार बोलायचं नाही. शेजारी-पाजारी जायचं नाही. आपल्या घरातलं कुणाला काही सांगायचं नाही.
अवनी, तू अजून लहान आहेस. बाळबोध वातावरणात वाढली आहेस. मुख्य म्हणजे मी ऑफिसला गेलो की घरात तू एकटीच असणार आहेस. आई-बाबा तिकडे गावाकडे- लांब.
कोण कसं आहे हे तुला कळणार नाही. म्हणून मी तुला हे सांगतोय.’

लग्नानंतर लगेचच त्यांनी हे अवनीला सांगितलं होतं. त्यांच्या या अटी तिला जरा जाचकच वाटल्या होत्या, पण त्यांचे ते शब्द तिनं मनात जपून ठेवले होते. आत्ता तिला तेच आठवत होते.
‘गप्पा मारायला इथं कुणी माणसंच नाहीत आपल्याजवळ, पण झाडांशी तर बोलता येईल… खाली जाऊन बागेतून एक फेरफटका मारावा…’
असं मनाशी म्हणतच ती जिना उतरून खाली गेली. बागेतल्या झाडांनी माना डोलावून तिचं स्वागत केलं. काहींनी फांद्या हलवून तिला जवळ बोलावलं.
ती झाडांवरून, पानांवरून हात फिरवत राहिली. काही झाडांवर कळ्या धरल्या होत्या.
कळ्या म्हणजे झाडांची बाळंच. नवनिर्मितीचा आनंद… हा आनंद आपल्याला कधी मिळणार?
हा प्रश्‍न तिच्या मनात भिरभिरत राहिला.
तिच्या डोळ्यांसमोर एक पाळणा हलायला लागला. तिनं विचार बाजूला सारले आणि जरा वेळ ती झाडांच्या सहवासातच रमली.
एक गार वार्‍याची झुळूक आली आणि तिला जराशी हुडहुडीच भरली.
तिनं सभोवताली बघितलं. दिशा अंधारून आल्या होत्या. काळे ढग आकाशात जमा झाले होते.
आता नको इथं उभं राहायला. घरात जाऊन स्वेटर घालावा आणि गरमगरम चहा प्यावा. तिला आलं घालून केलेला चहा प्यायची जबरदस्त इच्छा झाली आणि ती पुन्हा घराचा जिना चढायला लागली.

वर जाऊन दार बंद करून घेणार तर तिच्या मागोमाग ‘तो’ही वर आला. उंचनिंच, काळेभोर डोळे, कोरीव मिशा, पांढरा कुर्ता शोभत होता त्याच्या पुरुषी व्यक्तिमत्त्वाला…
त्याच्या चेहर्‍यावरचे भाव मात्र तिला आवडले नाहीत. ती बागेत उभी होती तेव्हापासून तो तिला बघत असावा.
तो आत आला आणि सरळ खुर्चीवरच बसला.
‘‘कोण तुम्ही? काय पाहिजे आहे तुम्हाला?’’
थोड्या रागानंच तिनं विचारलं.
‘‘तुमचे मिस्टर आहेत का घरात? त्यांच्याकडे थोडं काम होतं.’’
‘‘ते अजून यायचे आहेत. आज उशीर होणार आहे त्यांना यायला.’’
ती बोलून गेली आणि काय होतंय हे कळायच्या आत त्यानं एकदम तिचा हात धरला आणि तिला बेडरूमकडे ढकललं.
‘‘अहो, हे काय करताय?’’ असं म्हणत तिनं स्वतःला सोडवून घ्यायचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही.
त्यानं तिला करकचून मिठी मारली आणि पलंगावर लोटलं.
ती काही बोलूच शकली नाही.
पाच मिनिटांत तो बाजूला झाला.
बाहेर पाऊस सुरू झाला होता. मातीच्या घमघमणार्‍या वासात आणि पावसाच्या टपोर्‍या थेंबात तो दिसेनासा झाला.
कपडे ठाकठीक करून तिनं आरशात बघितलं. तिला स्वतःच्या शरीराकडे, चेहर्‍याकडे बघायची लाज वाटली.
बेसिनवर जाऊन तिनं चेहरा स्वच्छ धुतला.
खिडकीतून बाहेर बघितलं, तर पाऊस आता चांगलाच कोसळायला लागला होता.

‘काही वेळापूर्वी आलेला ‘तो’ही असाच कोसळला का? या पावसासारखा? नक्की काय घडलं होतं? जे घडलं ते खरं की कल्पनेत?’ तिनं मनालाच प्रश्‍न विचारला.
लग्न होऊन सहा महिने लोटले तरी आजवर तिला अशी अनुभूती कधीच आली नव्हती. असंच तिला वाटायला लागलं. लग्न झाल्यापासूनचे कितीतरी क्षण तिच्या मनात गोळा झाले.
लग्नानंतर काही दिवसांनी अवनी माहेरी संगमनेरला गेली होती. तेव्हा नुकतंच लग्न झालेली तिची एक मैत्रीण तिला भेटायला आली होती.
नवर्‍याबद्दल ती किती भरभरून बोलत होती. तिनं पहिल्या रात्रीचं वर्णनसुद्धा काहीही आडपडदा न ठेवता केलं होतं. ते करताना तिचा चेहरा असा काही खुलला होता.
‘तू आता किती दिवस राहणार आहेस इथं?’ अवनीनं तिला विचारलं होतं.
त्यावर थोडं लाजून ती म्हणाली होती, ‘जास्त नाही राहणार. दोन दिवसांनी परत जाणार!’
‘का गं? माहेरी करमत नाही का?’ अवनीच्या या प्रश्‍नावर ती नुसतीच लाजून हसली होती.
आत्ता अवनीला तो प्रसंग आठवत होता आणि असं वाटत होतं, अशी नवर्‍याची ओढ वाटून आपण कधीच संगमनेरहून लवकर परत आलो नाही. का? असं का?
माहेरी येऊन दोनच दिवस झाले की आपल्या मैत्रिणींना नवर्‍याची आठवण यायला लागायची, पण आपल्याला… काहीतरी चुकतंय हे आपल्यालाही जाणवायचं. पण काय चुकतंय हे कळत नव्हतं. आज मनाला पडलेल्या त्या प्रश्‍नांची उत्तरं मिळाली.
ती विचार करत राहिली. लग्नानंतरचा प्रत्येक क्षण तिच्या मनावर कोसळत राहिला. सुखी संसाराचा चेहरा अपराधी दिसायला लागला. त्याच्यावरचा बेगडी मुलामा आजच्या प्रसंगानं खरवडला गेला होता.

– शुभदा साने

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.