Now Reading
मीनाताई कुर्लेकर कृतिशीलतेचा वसा घेतलेलं कणखर नेतृत्व

मीनाताई कुर्लेकर कृतिशीलतेचा वसा घेतलेलं कणखर नेतृत्व

Menaka Prakashan

स्वतःसाठी तर सगळेच जगतात, अगदी हवं तसं जगतात. पण काही जण निर्धारानं समाजासाठी, वंचितांसाठी जगण्याचं ठरवतात. ‘घेतले व्रत हे नच अंधतेने’, ही त्यांची पक्की समजून असल्यानं अनेक सामाजिक-वैयक्तिक अडचणींची शर्यत यशस्वी पार करून या व्यक्ती समाजासाठी जिवापाड मेहनत करतात. त्यांच्या कामाचं कौतुक होतं, पण त्यांना मात्र सतत अनेक पातळ्यांवर लढतच राहावं लागतं. असंच एक लढाऊ आणि प्रेरक व्यक्तिमत्त्व म्हणजे ‘वंचित विकास’ संस्थेच्या संचालक आणि मीनाताई कुर्लेकर…

‘‘प्रवाह पुढे जातो तेव्हा तो मागे वळून बघत नाही. आपणही तिथेच थांबायचं, अपेक्षा ठेवायच्या नाहीत. मायेची वीण घट्ट असली तरी त्याचा कधी पाश होऊ द्यायचा नाही. माझ्याशिवाय संस्थेचं कार्यालय उत्तम चालतं ते माझं यश! तसंच, माझ्याशिवाय मुलांचं कुटुंब उत्तम चालतं ते आपल्या संस्कारांचं यश! रोजचा दिवस ही एक मोठी भेट असते. मग आपण त्या बदल्यात ‘रिटर्न गिफ्ट’ म्हणून चांगलं कार्य करावं त्यातून काही चुकलं तरी त्यातून बोध घेत पुढे जावं, खंबीर व्हावं. आपल्याला सकाळी उठल्यावर आपली आन्हिकं स्वतःची स्वतः कुणावरही अवलंबून न राहता करता येणं हे जगातलं किती मोठ्ठं सुख आहे. कितीही मोठा बंगला बांधला तरी मृत्यूनंतर कुणीही त्या देहाला घरात ठेवू देत नाही, कितीही मोठी गाडी घेतली तरी शेवटी रुग्णवाहिकेतून नेतात तेव्हा प्रत्येकाचा सातबारा ठरलेला आहे. मग कशाला घाबरायचं? कशावर माज करायचा? आयुष्यात सुखाचे दिवस आपण अनुभवतो, मग दुःखात खचून न जाता, रडत कुढत न बसता हात-पाय हलवायला हवेत. प्लॅन ए चुकला, तर प्लॅन बी, तो चुकला, तर प्लॅन सी, असा विचार सतत ठेवावा. कितीतरी कुटुंबातल्या व्यक्ती आपल्या माणसांसाठी किती मोठे त्याग करतात आणि त्याचा ते कुठंही गवगवा करत नाहीत. त्यांना पुरस्कार मिळत नाहीत, तरी ते त्यातून पुढे जातात.’’ हे सगळं अतिशय शांतपणे पण तितक्याच ठामपणे सांगतात मीनाताई कुर्लेकर.
प्रसन्न चेहरा, कामावर निष्ठा आणि समाजातल्या प्रत्येक वंचित घटकासाठी कणखरपणे उभ्या असलेल्या मीनाताईंचं कार्य समजून घेणं अतिशय औत्सुक्यपूर्ण ठरतं. मीनाताई कुर्लेकर या ‘वंचित विकास’ संस्थेच्या कार्यवाह आणि संचालक आहेत. एकल महिला, एचआयव्ही एड्स ग्रस्त, लालबत्ती विभागातल्या महिला, आदिवासी विभागातल्या महिला, किशोरवयीन मुलं, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी त्या कृतिशील आहेत. त्यांची दोन पुस्तकं आहेत. त्यांच्या विक्रमी आवृत्त्या निघालेल्या आहेत. पुणे महानगरपालिकेनं त्यांच्या कामाचा विशेष गौरव केला आहे.

मीनाताई आपल्या आयुष्यातली व्यवधानं सांभाळून समाजभान जपावं हे कधी जाणवलं ?
मीनाताई : जेव्हा आपल्याला कळतं डोक्यावर छप्पर, दोन वेळा चहा, दोन वेळा जेवण, तीन साड्या ही चैन आहे. तेव्हा काही तक्रारच राहत नाही. म्हणजे आपल्याकडे किती पर्याय आहेत. आपल्याला हव्या त्या रंगाची साडी आपण नेसतो, सणाच्या दिवशी गोडधोड, आपल्या आवडीचं खातो. त्यातूनही वाटलं तर पिठलंही खातो. तेव्हा जाणवतं किती पर्याय आहेत आपल्याकडे मग का आणि कशासाठी माज करायचा? आपण खूप नशीबवान आहोत मग आता स्वतःच्या आयुष्यातले प्रश्न सांभाळून समाजासाठी उभं राहावं. एकदा ही जाणीव झाली की ‘समाजभान’ येतंच.

म्हणजे छोट्या गोष्टीतला आनंद, समाजसेवेतून गवसला आणि आयुष्याला दिशा मिळाली नाही का?
मीनाताई : (हसत) हो, असं म्हणता येऊ शकतं. समाजातला वंचित, तळागाळातला घटक आजही विकासाच्या प्रतीक्षेत आहे. स्त्रिया हा मोठा वंचित घटक आहे. बायकांमध्ये स्वतःच्या ‘स्टेटस’चीही एक उतरंड आहे. म्हणजे, लग्न झालेली, लग्न न झालेली, घटस्फोटित, परित्यक्ता, नवरा नसलेली/असलेली, त्यातही पुन्हा मुलगा असलेली/नसलेली, मूल नसलेली वगैरे नकळत या उतरंडीमध्ये बायका स्वतःच स्वतःला जोखत असतात. तुम्ही मला काही म्हणतही नसता तरीही कुढत बसतात की, ‘बाई माझं हे असं आहे.’ अरे तुम्ही काय केलंय, तुम्ही खून केलाय का चोरी केलीय, तुम्ही का स्वतःला कमी लेखता? तुम्हीच या उतरंडीला छेद द्यायला हवा. स्वतंत्र एकल स्त्रीला गृहीत का धरता? तिला तिचं अस्तित्व; व्याप आहेत, उद्दिष्टं आहेत ते तिला पूर्ण करताना मदत नाही तरी निदान सन्मान द्यायला हवा. गृहीत धरता कामा नये. समाजात आपण काही व्याख्या मनात ठेवून चालतो. सरळ नाक, गोरा वर्ण, मध्यम उंची वगैरे वगैरे यापेक्षा काही वेगळं असेल तर उगीचच त्या स्त्रीकडे संशयाच्या नजरेनं समाज बघतो. रंग-रूप आपल्या हातात नाही पण गुण आहेत ते ह्या समाजानं बघायला हवेत. विधवा महिलांसाठी आम्ही ‘वंचित समाज विकास’च्या माध्यमातून हळदी-कुंकू समारंभ आयोजित करतो. त्या वेळी एका वीरपत्नीला प्रमुख पाहुण्या म्हणून आमंत्रित केलं. तेव्हा त्या म्हणाल्या की, ‘15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला लोकांना माझी आठवण येते पण एरवी हा समाज मला सगळ्यातून वगळतो. का तर मी विधवा आहे.’ पण मला सांगा तिचा नवरा सीमेवर उभा होता म्हणून आपला नवरा, मुलगा घरात होता हे हा समाज विसरतो. आमच्या एका सहकारी मैत्रिणीनं पती निधनानंतर सांगितलं, मी सगळ्या गोष्टी वापरणार; मी का बरं दुःखी-कष्टी आयुष्य जगायचं? आणि ती ठामपणे, आत्मविश्वासानं रहायला लागली. तेव्हा समाजानं, तिच्या छोट्या गावानं तिचा स्वीकार केला. कुणीतरी वाट मोकळी करून द्यावी लागते; ती तिनं दिली.

जो शब्द उच्चारायला हा समाज भेदरतो, त्या वस्तीतल्या स्त्रियांसाठी तुम्ही काम सुरू केलंत ते म्हणजे ‘लालबत्ती विभाग’ ते कसं सुरू झालं?
मीनाताई : माझे मार्गदर्शक चाफेकर सरांनी सांगितलं की, समाजासाठी काम करायचं असेल तर माणुसकीचा तोंडवळा कधी सोडायचा नाही. खरंच काम करायचं असेल तर रस्त्यावर उतर, तेव्हाच कळेल या समाजाचे-लोकांचे प्रश्न काय आहेत! लालबत्ती विभागात आम्ही संस्थेच्या माध्यमातून फिरता दवाखाना सुरू केला. व्हॅन घेऊन आठवड्यातले तीन दिवस जाताना जाणवलं की, आधी या महिलांना गंडे-दोरे, अंधश्रद्धा या विळख्यातून बाहेर काढायला हवं आणि मग त्या विश्वासानं उपचारासाठी दवाखान्यात येतील. मग एक संवाद सुरू झाला. अनौपचारिक गप्पांमधून आजार समजला की, गोळी दिली की बरं वाटलं. मग विश्वास वाढला. काही बायका आमची परीक्षाही घेत. (हसत) एक गंमत सांगते. एका बाईनं आमच्या डॉक्टरांकडून रक्तदाब तपासून घेतला. कागदावर लिहून घेतला आणि मग चार वेगवेगळ्या दवाखान्यात जाऊन तपासला. सगळीकडे तपासल्यावर तिची खात्री पटली तेव्हा येऊन सांगितलं, ‘कळतं की तुम्हाला’ आणि मग हीच बाई वस्तीत सगळ्यांना सांगायला लागली यांना तपासता येतं. आम्ही 1995 ला वस्तीत दवाखाना स्थापन केला, जो आजतागायत सुरू आहे. संवादानं विश्वास आणि मग त्यांचे प्रश्न लक्षात यायला लागले. मी आणि ती बाई यांच्यात काही फरक नाही. ती त्या परिस्थितीत आहे. मी सुदैवाने इथं आहे. पण तिला त्या परिस्थितीत कोणी आणलं तर ज्या व्यक्तीवर तिनं प्रेम केलं – विश्वास ठेवला त्यांनीच तिचा घात केला आणि आज तिच्या पैशांवर त्यांचं आयुष्य सुरळीत सुरू आहे आणि ती मात्र बदनाम होते, फसवली जाते. ही बाई, व्यवस्थेची बळी आहे. ती बाई आहे का बुवा हे नंतर पण ती आधी माणूस आहे. आम्ही त्यांच्यासाठी सांस्कृतिक उपक्रम आखायला सुरवात केली. त्यांच्या साठी हळदी-कुंकू किंवा तिळगूळ समारंभ आयोजित करायला लागलो. पिना, टिकल्या, क्लिपा, हातरुमाल अशा वस्तू लुटण्यामध्ये त्यांना आवर्जून सहभागी करून घ्यायचो. वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करायला सुरवात केली. भाजी निवडणं, रांगोळ्या काढणं, मेंदी, केशरचना वगैरे. नंबर येईल त्यांना बक्षीस ठेवलं. काय झालं, स्पर्धेपेक्षा आपला नंबर येणं, आपल्याला कुणीतरी समाजात मान देऊन बरोबरीनं वागवतं. या भावनेनं त्या स्वतःच्या नजरेत स्वतःला आनंदानं पाहू लागल्या. त्यांना ताणतणावाचा विसर पडायला लागला.

म्हणजे तू सबळ आहेस हे तिला सांगण्याचे उपक्रम सुरू झाले नाही का?
मीनाताई : हो म्हणजे आमचे डॉक्टर, समुपदेशक त्यांच्याशी बोलत तेव्हा लक्षात आलं, त्यांच्याशी आपुलकीनं कोणी बोलतच नसे. सहज संवादातून गाडी पुढे सरकायची. मग आम्ही हळूहळू त्यांच्या सोयीनुसार साक्षरतेचे वर्ग घ्यायला सुरवात केली. त्यांच्यासाठी पेन्सिल-पेन-वही दिल्यावर ‘हे आपलं आहे’ याचं त्यांना अप्रूप वाटायचं. काही दिवस गोल, चौकोन काढल्यावर विचारलं, सही शिकणार का? मग त्या खूष झाल्या. कोणी म्हणाल्या, मराठीतून, कोणी म्हणाल्या इंग्रजीतून. मग हळूहळू त्या अक्षरांकडे वळल्या. काय आहे, तोंडी आकडेमोड त्यांना लगेच समजायची, पण त्यांच्या व्यवसायात हिशोबाचा भाग घरमालकिणीला सांगताना त्या रंगीत बांगड्यांच्या माध्यमातून नोंदवून ठेवून सांगायच्या. पण कधी त्यांच्या बांगड्या पळवल्या जात आणि त्या हिशोब पाठ असूनही काही बोलू शकत नसत. मात्र आता त्यांना आम्ही डायरी ही संकल्पना पटवून दिली. वेगवेगळ्या रंगाचे गोळे नोंदवून ठेवायला शिकवलं आणि मग महिनाअखेरीस तिच्या डायरीत हिशोब व्यवस्थित राहत असे. आता कोणी आपल्याला फसवू शकत नाही हे लक्षात आल्यावर त्याच आमच्या कामाची ‘माऊथ पब्लिसिटी’ करायला लागल्या. हे सगळं एका दमात सांगितलं तरी ही एक खूप मोठी संयमी प्रक्रिया होती. बचतीचं महत्त्व त्यांना पटवून देताना त्यांना आम्ही सांगायचो पाच रुपये, दहा रुपये जेवढे जमतील तेवढे बाजूला काढून आम्हाला द्या. मग त्या देत आणि पुन्हा थोड्या वेळानं येत घेऊन जात. त्यांच्या कलानं घेताना विश्वास वाढला. मग हळूहळू त्यांची बँक खाती उघडली, ओळखपत्रं काढली, मतदान पत्रं काढली. मतदानाचा हक्क नव्हता असं नाही, पण त्यांना त्याविषयी माहितीच नव्हती, ती मिळाली. बचतीची सवय लागली. एका भगिनीनं स्वतःच्या बचतीच्या पैशानं तिरुपती विमान प्रवासाचं स्वप्न पूर्ण केलं. सामान्यांच्या आवाक्याबाहेर असलेला विमान प्रवास तिनं कष्टानं, बचतीनं साध्य केला. एक ना अनेक असे बोलके किस्से आहेत.

मग यातून स्त्रियांची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरू झाली असेल नाही का?
मीनाताई : त्यांच्याशी बोलताना त्यांना हे सांगितलं की, ‘हा व्यवसाय करणं हा नाइलाज होता. त्यात तुमची काहीही चूक नाही. आता मुलासाठी समाजात मिसळा, वेगवेगळं काम सुरू करा.’ एचआयव्ही एड्सच्या विळख्यात अडकलेल्या मैत्रिणींना मुलं सांभाळण्याचं प्रशिक्षण दिलं, पुढे जाऊन त्या आत्मविश्वासानं त्यांना सांभाळू लागल्या. भाजी/मटकी विक्रीचा व्यवसाय करू लागल्या. यातूनच एचआयव्ही एड्स ग्रस्तांसाठी माझंही काम सुरू झालं. मुळात शरीरसंबंध, गुप्तरोग या विषयावर बोलायला, माहिती द्यायला समाज कचरतो, ज्यावर बोलायला पाहिजे त्यावर बोलणं टाळतो. मग या महिलांना निरोध, त्याचा वापर या गोष्टी शिकवल्या. यातही आधी आम्हाला कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणात सांगितलं गेलं की त्यांना सांगायच्या आधी तुम्ही निरोध खरेदी करून या. मी, माझे पती शिरीष यांना म्हटलं, ‘‘तुम्ही या माझ्याबरोबर.’’ ते म्हणाले, ‘‘मी आलो तर तू शिकणार आणि शिकवणार कशी? हे तुलाच केलं पाहिजे!’’ मग त्या वेळी मनातल्या खळबळीवर मात करताना जे मनात आलं त्यामुळे, पुढे त्या महिलांना समुपदेशन करताना अडथळे आणि मात करणं हे दोन्ही प्रशिक्षण आम्ही द्यायला शिकलो. पुढे निरोध आरोग्यासाठी आवश्यक आहे आणि त्याच्या वापराबाबत मानसिक द्वंद्वात न अडकता त्याही आग्रही रहायला शिकल्या.

किशोरवयीन मुला-मुलींसाठी काम कसं सुरू झालं?
मीनाताई : पुण्यात शाळेत आम्ही वर्ग घ्यायला सुरवात केली. वयात येताना शारीरिक पातळीवर होणारे बदल, स्वछता, देह, प्रेम वाटणं, हे सगळं छान आहे, सिनेमात ते तीन तासांत घडतं. प्रत्यक्ष आयुष्यात तीन तासांत पेपर लिहितानाही धावपळ होते. त्यात वास्तवता नाही. या अशा संवादाबरोबर, ‘इथं मोकळेपणानं बोला. जे बोलतो ते वर्गाबाहेर जाणार नाही. ताई, आई-बाबा, सर, मॅडम कुणालाही कळणार नाही’ असा त्यांना विश्वास दिला. त्यांच्या मनातली खळबळ मग हळूहळू बाहेर येऊ लागली. रात्र शाळेतल्या मुलांना वाटतं आम्ही रात्री शाळेत जायचं, डबा, शाळेची रिक्षा असं सगळं आम्हाला का नाही बरं मिळत? मग त्यांना प्रोत्साहन देऊन शिक्षणाच्या वाटेवर घट्ट ठेवावं लागतं. आपण सगळे सुंदर आहोत आणि गुणांनी अधिक सुंदर दिसतो तेव्हा चांगले गुण, अभ्यास याचं महत्त्व हे त्यांना पटवून द्यायला लागतं.

एकल महिलांसाठी काम कसं सुरू झालं?
मीनाताई : सबला महिला केंद्राच्या माध्यमातून काम करताना जाणवलं की विधवा, परित्यक्ता, प्रौढ, कुमारिका, कुटुंबात राहून एकट्या असणार्‍या महिला या आतल्या आत कुढत असतात. त्या उगाचच स्वतःला दुय्य्म लेखत असतात. समाजातही कधी कधी ‘यांची जबाबदारी आपल्यावर नको यायला’ अशी मानसिकता असते. खरं म्हणजे असं काही नसतं. पण उगाच एक अनामिक भीती आयुष्य व्यापून टाकते. म्हणून मग कल्पना पुढे आली आणि त्यातून ‘अभया ’ हा गट तयार झाला. ‘इथं माझी ओळख फक्त मीना एवढीच! नवरा, मुलं, घर काहीही नाही. तरी इथं मला माझी शेअरिंगची जागा मिळते. आत्मविश्वास गवसतो आणि मग मी समाजातही आत्मविश्वासानं वावरू शकते हा विश्वास महिलांना मिळतो. कुठलंही दडपण न घेता आपण जगू शकतो हा विश्वास त्यांना मिळतो आणि त्या एकमेकींनाही हाच विश्‍वास देतात. एक किस्सा सांगते, एक बाई आमच्याकडे आल्या, छान होत्या, अठराव्या वर्षी लग्न झालं. घर, संसार, मुलंबाळं- नणंद, दीर, सासू-सासरे सगळ्यांचं त्यांनी बघितलं आणि आयुष्याच्या एका टप्प्यावर त्या एकट्या पडल्या. या घरात ‘त्यांना काय कळतं’ असं म्हणत सुना, जावा, नणंद त्यांना नकळत बाजूला काढायच्या. त्या सजग होत्या. त्यांना आत्मविश्वास पुन्हा हवा होता, त्यांना विचारलं, ‘‘तुम्ही काय करू शकता?’’ त्या म्हणाल्या, ‘‘मी उत्तम केक करते.’’ मग त्यांना प्रोत्साहन दिलं. आज त्या आत्मविश्‍वासानं सगळं करतात. शिवाय ‘मी घरातली करती-सवरती’ असल्याचाही त्यांना अभिमान आहे.
अशा अनेकविध अनुभवांची साखळी ‘अभया’ मध्ये गुंफली गेली आहे. ‘मी एकटी राहते’ हे सांगतानाही महिलांना विचित्र वाटतं. समाजही उगाचच ती दोषी असल्याच्या भावनेनं बघतो. मग आम्ही वर्कशॉप्स घेतली, ‘एकटेपणा पेलताना’, एकटेपणा म्हणजे काय, एकटेपणा कसा निभवायचा, एक ना अनेक मुद्दे त्यात येतात. रक्ताची नसली तरी मैत्रीची नाती आपण समाजात जोडलेली आहेत, हा एक विस्तृत परिवार आपला आहे हा विश्वास तिला बळ देऊन जातो. फक्त नवरा-मुलं ही चौकट नाही, आपली वेगळी चौकट असू शकते, याची जाणीव होते.

म्हणजे ‘स्वतःचा स्वीकार’ ही भावना या वेगवेगळ्या समूहांमध्ये त्यांच्या कलानं वसवण्यात आली असं जाणवतं. बदल हा स्वतःपासून सुरू होतो असं म्हणताना तुम्ही ‘डायलिसिस सह’ जगताना ही पुस्तिका लिहिली आणि या पुस्तिकेनं अल्पावधीत विक्रमी आवृत्त्या गाठल्या त्याविषयी-
मीनाताई : माझे यजमान बँकेत होते. आयुष्याच्या एका टप्प्यावर त्यांना डायलिसिस सुरू झालं. तेव्हा अनेक प्रश उभे राहिले. माझा भाऊ तसंच जवळचे नातेवाईक डॉक्टर आहेत. आम्हाला तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळालं तरी जाणवलं, अनेक प्रश्न पडतात. मी अनेक प्रकारे डायलिसिसची माहिती करून घेत असे. तरीही रोज पडणारे प्रश्न डॉक्टरांना विचारू असं म्हटलं तरी त्यांचा मर्यादित वेळ, इतर महत्त्वाच्या आरोग्यबाबी यात ते प्रश्न विचारायचे राहून जात. आर्थिक ताळमेळ, मनोधैर्य एक ना अनेक मुद्दे असतात. छोटा किस्सा सांगते, एकदा यजमानांना घेऊन डायलिसिसला गेले असताना एक महिला म्हणाली, ‘तुम्हाला माहिती नाही का त्यांना लांब बाह्यांचा शर्ट घालावा त्यामुळे हाताला धक्का लागणार नाही.’ मग पुढे असे अनेक लहान-सहान पण महत्त्वाचे मुद्दे एकत्र घेऊन पुस्तिका आली ‘डायलिसिससह जगताना’! जे काटे मला बोचले, ते इतरांना बोचू नयेत म्हणून किंवा त्यांच्या वेदना कमी व्हाव्यात ही त्यामागची भावना आहे. मला खरं तर विश्वास होता की, डायलिसिस-ट्रान्सांट या सगळ्यांनी माझे यजमान लवकरच बरे होतील पण तसं झालं नाही. पण त्या काळात माझे भाऊ, भावजय, आई यांनी मला भक्कम पाठिंबा दिला. आईला परिस्थितीचा अंदाज आल्यावर ती म्हणाली, ‘‘चांगले दिवस अनुभवलेस तशी या दिवसानांही खंबरपणे सामोरी जा. माझ्या यजमानांनी आजारपण कळताच शांतपणे आर्थिक ताळेबंद मांडला आणि मला आणि माझ्या भावाला समजावून सांगितला. त्या काळात मला वॉशिंग्टनला जायची संधी चालून आली. त्या वेळी शिरीष यांनी अतिशय खंबीरपणे मला जाऊन यायला सांगितलं! ‘मी आहे तू जाऊन ये, समजा माझं बरं-वाईट झालं तरी ते तुझ्यासमोर इथंही होऊ शकतं. मग तू इथे असल्यानं काहीच फरक पडणार नाही आणि तू काही फिरायला नाही तर कामासाठी जात आहेत. अवश्य जा.’ असं बोलून भक्कम पाठिंबा दिला. आणि मी खरंच जाऊन आले. माझ्या भाऊ-भावजयीनं त्या काळात मला पाठिंबा दिला. ‘मृत्यूनंतर देहदान करा, दिवस करायचे नाहीत. सांत्वनाला लोक आले की मन अधिक हळवं होतं. त्यामुळे सरळ महाबळेश्वरला जाऊन रहा सगळे.’ हे असं शिरीषनं मला आणि मुलगा अक्षयला सांगून ठेवलं होतं.

समाजभान जपणं आणि कुटुंबीयांनी ते जपणं याविषयी…
मीनाताई : साध्या पण सुसंकृत कुटुंबात मी आणि माझा भाऊ वाढलो. माझी आई कमल गजेंद्रगडकर आणि वडील व्यंकटेश गजेंद्रगडकर हे पुरोगामी विचारांचे होते. मुलगा-मुलगी हा भेद कधीच नव्हता. बुद्धीला चालना देऊन संस्कारसक्षम वातावरणात आम्ही वाढलो. वडलांना वाचनाची आवड. विविध पुस्तकांवर घरात चर्चा होत असे. घराबाहेर चपलांचा अखंड ढीग असे, आई कुणालाही हातावर काही दिल्याशिवाय जाऊ द्यायची नाही. तुझे निर्णय तू घे आणि त्याच्या परिणामांची जबाबदारीही घे. आपले निर्णय विचारपूर्वक आपल्याला घेता यायला हवेत असे घरातले संस्कार होते. लग्न ठरलं तेव्हा मी एकवीस वर्षांची होते. आई-वडील म्हणाले, ‘तुला तुझ्या सुनेनं आणि तुझ्या भावाच्या बायकोनं कसं वागावं असं वाटतं, तसं तुझं वर्तन असावं. प्रत्येक घराचे एक संस्कार असतात ते शिकून घे. काही गैर वाटलं तर आम्ही आहोतच, पण निभावून न्यायला शीक. माझ्या सासरची मंडळीही साधी होती. सासू-सासरे, दोन दीर, खूप मोकळं वातावरण होतं. यजमान शिरीष माझ्या पाठीशी होते. मी बी. कॉम., बिझनेस मॅनेजमेंट , इंडस्ट्रियल मॅनेजमेंट असं विविध प्रकारचं शिक्षण घेतलं होतं. आनुषंगिक काम करत होते. पण एकाच टप्प्यावर ‘महिला सेवाग्राम’च्या माध्यमातून सेवाभावी संस्थेसाठी काम करण्याची संधी मिळाली. आणि शून्य ते चाळीस अशा वयोगटासाठी काम करताना अनेक बोध मिळाले. अत्यंत साधेपणानं मी उत्तम काम करायला शिकले. घरात स्त्री-पुरुष समानतेच्या मुद्द्यावर कधी खिंड लढवावी लागलीच नाही. माझ्या प्रत्येक गोष्टीत शिरीषची साथ होती. मी समाजकार्यासाठी बेल्जियमला गेले, तेव्हा मुलगा पाच वर्षांचा होता. दोघांचेही पालक होते तरीही, शिरीषनं दहा दिवस सुट्टी घेऊन त्याला उत्तम सांभाळलं. ‘लालबत्ती विभागा’त काम करताना एका गृहस्थांनी मला तिथं बघितलं आणि वडील आणि यजमान दोघांनाही मी तिथं दिसल्याचं सांगितलं. त्यावर दोघांनीही ‘मीना तिथं का गेली आहे ते आम्हाला माहिती आहे, पण तुम्ही तिथं काय करत होता,’ असं विचारून त्या व्यक्तीला निरुत्तर केलं आणि माझ्या कार्याला मोठं बळ दिलं. माझ्या सासूबाईंनाही माझं खूप कौतुक होतं. पुणे महानगरपालिकेनं माझ्या कार्याची दखल घेत सत्कार केला त्या वेळी, माझे सासरे दवाखान्यात होते. तरीही सासूबाई सत्काराला अतिशय कौतुकानं पोचल्या. त्यानंतर सासरे पंधरा दिवसांत दुर्दैवानं गेले. पण आज मागे वळून बघताना जाणवतं, सासूबाईंनी त्या वेळी तिथं येणं किती बळ देणारं होतं. यांना बरं वाटलं की, मी तुला साडी घेणार आहे हे त्यांचे आशीर्वादाचे बोल किती प्रेरणादायी होते.

वा! यशस्वी स्त्री मागे तिचं कुटुंब खंबीरपणे उभं असतं याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. ज्येष्ठ नागरिक कल्याण उपक्रम आणि अवयवदान याविषयी आपण जनजागृती कशी सुरू केलीत?
मीनाताई : हो नक्कीच. कुटुंबाची साथ भक्कम होती, आजही आहे. यजमानांना देहदान, अवयवदान करायचं होतं, पण त्या वेळी ते इन्फेक्शन झाल्यानं शक्य झालं नाही, पण मुद्दा असा आहे, की त्यांना कुणीतरी किडनी दिली म्हणून त्यांचं डायलिसिस थांबलं. त्यांचं आणि आमचं आयुष्य सुकर झालं. इतरांनाही असं आयुष्य मिळालं तर त्यांचंही आयुष्य सुकर होईल. आता, ‘कुर्लेकर ट्रस्ट’च्या माध्यमातून आमचं काम सुरू आहे. शेवटी सगळ्यांची तीन चिमूट राख होणार. ती करायची का इतरांचं आयुष्य उभं करायचं, हा प्रत्येकाच्या विचारांचा भाग आहे.
आपल्या आयुष्याची सकाळ सोनेरी तशीच संध्याकाळ ही रुपेरी हवी. प्रत्येक प्रहराची मजा आयुष्यात भरभरून घ्यायला हवी. आपल्याकडे वृद्धाश्रमात राहणं याला उगीचच कीव वाटते अशी भावना असते. पण प्रत्येकाला आपली स्पेस हवी असते. ती जपली जाण्याचा हा पर्याय म्हणून याकडे बघायला हवं. वय हा केवळ आकडा आहे. मनासारखं जगण्याची ती संधी आहे. तिचा आनंद घ्यायला हवा. आम्ही त्यासाठी ‘संध्याक्त’ हा उपक्रम राबवतो तसंच, ज्येष्ठांसाठी ‘सेकंड होम’ यादृष्टीनं देखील प्रयत्नशील आहोत.

काट्याकुट्यातली लेकरे-आदिवासी त्यांच्यासाठी-शिक्षणासाठी उभं राहणं याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
मीनाताई : ‘वंचित विकास’ संस्थेबरोबर काम करताना आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी पाटणपुरी इथं काम करण्याची संधी मिळाली. तिथं मुलींना शिक्षणासाठी आणायला सुरवात केली. सुरवातीला मुली पळून जात पण नंतर समुपदेशनानं त्यांना शिक्षणाचं महत्त्व उमगलं. त्या शिकू लागल्या. त्या काळात त्यांच्या पालकांचंही समुपदेशन करावं लागायचं. लहान वयात मुलींचं लग्न- कुपोषण-गरोदरपण-आजार- आयुष्याला धोका हे सगळं दुष्टचक्र थांबायला हवं. तिला तिच्या पायावर उभं करायला हवं. आज त्यातल्या अनेक मुली पुण्यातदेखील नर्स म्हणून कार्यरत आहेत. ते काम चांगलं झालं, प्रेरणादायी ठरलं.
याबरोबर आज सगळ्यांची ‘कोविडविरुद्ध लढाई सुरू आहे. या काळातही आम्ही धान्याचे किट दिलं. त्यातही, एकल महिला, कमी उत्पन्न गट यांना आम्ही याच प्राधान्यानं मदत केली.
‘वंचित विकास’च्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मला स्वीकारलं, चाफेकरसरांचं मार्गदर्शन आणि सुनीता जोगळेकर या माझ्या मैत्रिणीचं मार्गदर्शन ह्या सगळ्या बाबी माझ्या प्रवासात फार मोलाची भूमिका बजावतात. मी एकटीनं हे काम करू शकणार नाही.
एक नेहमी वाटतं, माणूस जसा आहे तसा मान्य केला तर खूप प्रश्न सुटतील. वेगळ्या वाटेनं जाणं सोपं नसतं. त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागते. माणसानं माणसाशी माणसासम वागणं एवढंच किमान पथ्य आपण सगळ्यांनीच पाळायला काय हरकत आहे, नाही का?

मीनाताईंचा प्रश्न अंतर्मुख करतो. स्वीकाराची किमया स्वत:पासून सुरू होते. ती अनुभवण्यात आनंद आहे. तो शोधला, समजून घेतला, संयमानं वृद्धिंगत केला, तर आयुष्याची गंमत आहे हे नक्की !
त्यांचं कार्य समजून घेताना सहजच या ओळी आठवतात,
‘हा झेंडा भल्या कामाचा
जो घेउनी निघाला,
आरं काटं कुठ वाटे मंधी
बोचती त्येला।
रगत निघंल तर बी
हसल शाबास त्येची।
जो वळखीतसे औक्ष म्हणजी,
मोठी लडाई मोठी लडाई।
गल्यामंदी पडंल तिच्या
माळ इजयाची,
तू चाल पुढं तू चाल पुढं,
तुला रं गड्या भीती कशाची ॥’

– पल्लवी मुजुमदार

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.