Now Reading
मिट्टी

मिट्टी

Menaka Prakashan

लहानग्या मिट्टीला स्वप्नांच्या दुनियेत रमायला खूप आवडायचं. तिला एक अद्भुत शक्तीही प्राप्त झाली होती. या शक्तीच्या जोरावर ती हव्या त्या माणसाच्या शरीरात प्रवेश करून त्या माणसासारखी जगायची. या जगात रमताना तिला खूप मजा यायची, खरं तर ती स्वतःचं भान विसरायची आणि ते जग अनुभवायची.

बसस्टँडच्या त्या फलाटावर दोन हातांवर टेकून, पाय दुमडून बसलेली, वाकून वाकून आबाजीकडं टक लावून पाहत बसलेली मीता बाय-बापूची मिट्टीच ती. आबाजी- तिचा आजा- पूर्ण तर्र… प्लॅटफॉर्मवर पडलेला. लोळत त्याच्यात नशेत देहभान हरपलेला. ना कसलं भय, ना काही. बापूच्या शेजारी बसून मिट्टीचं निरीक्षण चाललेलं.

बापू जोरजोरात ‘आबानूऽऽ आबानूऽऽ’ करत ओरडत राहिलेला. मध्येच कपाळावर हात ठेवून आबाच्या निचेष्ट देहाकडे बघत, त्याच्या धपापणार्‍या उराकडं लक्ष ठेवत, तो जिवंत आहे की नाही याची खात्री करत बसलेला. विषण्ण-विमनस्क बापू मध्येच उठायचा, नळावरून बाटलीतून पाणी आणायचा. आबाच्या तोंडावर, डोळ्यांवर उभारूनच ओतत राहायचा. आबा मग जरासाच हलायचा. इकडून तिकडं नुसती कूस बदलायचा. डोळ्यांवरचं पाणी झटकत मान इकडची तिकडं करत राहायचा. परत परत पाण्याचा मारा करणारा बापू थकत नव्हता नि आबाही जराही हलत नव्हता. त्याची उतरत नव्हती. तर्र झालेला, नशेतला आबा… उपरणं धुळी-मातीत लाल-तांबडं-काळं होऊन गेलेलं मळत गेलेलं. मध्ये मध्ये कसंनुसं तोंड करत तो पुन्हा नशेत गुडूप होऊन रहायचा. मग बापू डोक्यावर हात मारत रहायचा. आबा-बापूकडे आळीपाळीनं बघत राहिलेली मिट्टीही जमिनीवरच फतकल मारून बसलेली. मध्ये मध्ये धाकल्या गणप्याला बुक्की मारत जवळ करत राहिलेली.

मिट्टी- बापू-बायची कोण लाडली! त्यांची ती प्यारी छकुली होती. तिच्या त्या टपोर्‍या टपोर्‍या डोळ्यांत तिच्या तोंडावरचं आकर्षण साठून राहिलेलं. बाय तिच्या कमरेएवढ्या केसाला कधीतरी आठ-दहा दिवसांनी तेलाचा नुसता वरवर हात फिरवायची. दोन वेण्या घट्ट बांधायची. जुन्या पातळाच्या किनार कापून दोर्‍या बांधून रिबिनीची फुलं दोन कानांवर यायची. एवढीशी मिट्टी मग मोठी तरतरीत दिसायची. काजळ डोळ्यांत घालून दोन बाजूला रेघ ओढायची तिची बाय. मग त्या डोळ्यांच्या मासोळ्या व्हायच्या. काळे, टपोरे डोळे मग अगदीच मोठे वाटायचे. उगीचच वटारल्यासारखे. आ करून राहिलेले. सगळ्या जगाला जाब विचारत असल्यासारखे. बांधकामाच्या जागेवर त्यांचं ते एवढुसं खोपटं. चार भांडी, चार विटा, पाण्याचा मडका एवढा संसार. बाय-बापू दिवसभर बिल्डिंग कंत्राटदाराकडे मजुरी करायचे. रोजच्या रोजगारावर घर चालायचं. धाकला गणप्या एक-दीड वर्षाचा असेल तेव्हा ते इथं आलेले. इथे मोठंच काम मिळवलेलं बापूनं. दोन-तीन वर्षं तरी काम चालणार होतं. त्या भागात मोठमोठे मॉल्स उभारण्यात येत होते.

मिट्टी तोंडाचा आ वासून आजाकडे टक लावून पाहत बसलेली नि अचानक तिचं लक्ष त्या मुलीकडे गेलं. ती गोरटेली, गुलाबी, गोबर्‍या गोबर्‍या गालांची…गुलाबी फ्रॉकवर पांढर्‍या फुलांची लेस… लेसची फुलं अन् फुलपाखरं… रंगीबेरंगी छटा त्यांच्या पंखांवर… फुलांच्या पाकळ्या पाकळ्यांवर… ‘मम्मी मम्मी’ करत डॅडींचा हात धरून चालणारी. मोठ्या ऐटीत, तोर्‍यात, ठसक्यात चालणारी तिची ती ढब-ऐट सारंच मिट्टीच्या मनात ठसलेलं, व्यापलेलं नि अचानकच ते झालं… होऊन गेलं… क्षणार्धातच केवढ्यांदा दचकली मिट्टी… काय झालं तिलाही कळलं नाही. तिनं चक्क डॉलीच्या शरीरात प्रवेश मिळवलेला. ‘ती मी असते तर’ हा विचार तिच्या मनात डोकावतो काय नि ती एका क्षणातच त्या शरीरात शिरते काय!

‘‘हाय डॅडी, मला चॉकलेट पेस्ट्रीज हव्यात…’’ म्हणतच तिनं डॅडींना थांबवलं. डॅडीनं मग लगेच तिला शोकेसमधले कितीतरी चॉकलेट्स, पेस्ट्रीज दिल्या. त्या खात खात, चॉकलेट्सची चव घेत घेत, ती चव आयुष्यात प्रथमच चाखत होती मिट्टी. ती मजा चाखत, सावकाश घेत, मोठ्या मजेत डॅडी-मम्मीच्या मध्ये बोटं पकडून उड्या मारत-मारत चालत राहिली तिची स्वारी! आणि मग… त्या आलिशान घरात… ‘मम्मी मम्मी’ करत सुंदर गुलाबी कपड्यांतल्या मम्मीच्या पायांवर चक्क लोळत पडलेली. सारंच कसं रुबाबदार, मऊशार होेतं. महालच म्हणायचा तो. गुबगुबीत, मुलायम गादीवर अंग टाकताच ती गाढ झोपून गेली. मऊ मऊ रजईत गुडुप झालेली ती स्वप्नराज्यात रममाण मश्गुल होऊन गेली. ‘डॉली डॉली’ करत मम्मीनं उठवताच जरासं आळसावलेलं शरीर लटक्या रागानं कलती मान करून, डोळे किलकिले करून पाहिलेलं. सारं विश्‍वच न्यारं होतं तिला. सगळंच कसं मोहवणारं, आकर्षक होतं तिथं. मग डॅडीच्या कडेवरून गरम गरम पाण्याचे माऊथवॉश, फेसवॉश, टर्किश टॉवेलमध्ये गुंडाळलेलं तिचं गुलाबी गोबरं शरीर. मम्मी-डॅडींच्या मुलायम हातांनी गोंजारलेलं. किती सुखद लहरी येत होत्या तिच्या अंग-प्रत्यंगातून! सारंच सुरेल, सुगम संगीत होऊन गेलेलं जीवन! आणि मग चक्क ती जागी झाली. डोळे आ वासून निरखत राहिली… तो मोठ्ठा पलंग, भिंतीवरचा आरसा, ते वेलफर्निश्ड घर… सारं निरखत राहिलेली बराच वेळ.

कोपर्‍यातल्या टीव्ही स्क्रीनवर ती फॅशनेबल अँकर कशी लाडं लाडं बोलत होती. मग ती मुलगी स्टेजवर आली. गाऊ लागली. सगळेच प्रेक्षक नि मम्मी-डॅडींसोबत तीही रंगून गेली त्यात. हे काय? पुन्हा तोच विचार… नि हे काय- ही तर मीच गातेय. केवढा मोठा प्रेक्षक वर्ग समोर. बापरे! ती गात राहिलेली. आता मल्हार राग. एकेक मंत्रमुग्ध करणारे स्वर गळ्याबाहेर पडत होते. आलेले गेस्ट नि प्रेक्षक बेहोश होऊन गेलेले. वाह! वा! वाह वा! वन्स मोअर’ची दाद… टाळ्यांचा कडकडाट… यात ती तल्लीनतेनं गात राहिलेली. स्तुतिसुमनांनी ती अगदी गहिवरून गेलेली. भरून आलेलं तिला. प्रेक्षकांतून कोण कोण मध्येच उठत तिच्याभोवती पैसे ओवाळून देत, नोटांच्या पावसात… प्रशंसा, कौतुकांच्या सन्मानात ती न्हात राहिलेली नखशिखांत! हसत होती, मोहरत होती.

आणि त्याच वेळी तिला तिचा आबा, आजा आठवला. फलाटावर उताणा पडलेला. बेहोशीत. पाहतो तो काय, ती तर चक्क बापूसवे खोपटातच होती. बाय-बापूची काळीसावळी छकुली मिट्टी. तिच्या पुढ्यातच बाय जुन्या फाटक्या लुगडं-चोळीच्या अवतारात फुटक्या कपातून चायचा भुरका मारत फतकल घालून बसलेली. बायचा च्या झाल्यावर तिनं लगबगीनं आवरायला घेतलेलं. मिट्टीपण तिला हातभार लावायला पुढे सरसावलेली. मग दोघी माय-लेकी बापूबरोबर बांधकामावर चालल्या. धाकल्याला कडेवर घेत मध्येच मिट्टीची इवली पावलं पाठी रहायची. बापू वरच्या दोन-तीन मजल्यांवर सिमेंटची घमेली द्यायला सरसावल्यावर तिथल्याच रेतीत मिट्टी गणप्याबरोबर खेळत बसली. बाय बापूला इतर मजुरांबरोबर मदत करण्यात गुंतलेली. दुपारची भात-भाकरी खाऊन झाल्यावर वाळूत पहुडलेली. कुशीत धाकल्याला त्याची आई होऊन थोपटत राहिलेली मिट्टी. जराशी लवंडली. तिचा डोळा लागतो न लागतो, तोच त्या आवाजानं किती दचकली ती! तिनं चक्क जोरात चौकार मारला होता की! नि त्या समोरच्या खिडकीच्या काचा खळकन् फुटलेल्या. रस्त्यावर काचांचा चुरा झालेला. मिट्टी धावतेय इतरांबरोबर.. हे काय? हा तर ब्रिजेश. नलेश, नवीन… कितीतरी मित्रांच्या गराड्यात ती धावत होती. इतके ते सगळेच जणं पळत सुटलेले. सगळेच दमलेले… एव्हाना तो घरमालक गॅलरीत येऊन त्या सगळ्यांच्या नावानं ठणाणा करत ओरडत राहिलेला. त्यांच्याबरोबर धावता धावता, दमछाक झालेली मिट्टी तर त्यांची बॉस होती की! अक्षयच होता तो त्या सगळ्या मुलांचा कॅप्टन- चक्क पँटमध्ये! सगळंच कसं न्यारं नि प्यारंही!

अजा, विजा, तो सूर्या सगळेच अक्षयला ‘बॉस बॉस’ म्हणत मागेपुढे करत राहायचे. त्याच्या अवतीभोवती फिरत राहायचे.
‘‘आता काय करायचं बॉस? गेम तर आपला अर्ध्यावरच राहिलाय.’’ सूर्या.
‘‘आपण पलीकडच्या मैदानात जाऊ नि डाव पूर्ण करू. माझा चौकार नि आता किती झाल्यात रन्स… एकोणऐंशी…?’’
‘‘चौैकार नाही हं! पंच्याहत्तरच, तुमच्या. आमच्या एकवीस झाल्यात.’’ विजा.
‘‘ए, एक लगावून देईन सांगून ठेवतो हं तुला विजा! नव्वदला आहात तुम्ही.’’ ब्रिजेश.
‘‘ए ए, काय चाललंय? डोकी ठिकाणावर आहेत ना तुमची?’’ बॉस जोरजोरात भांडायला आलेला. सगळेच मग त्वेषानं भांडायला लागलेले. उन्हात, घामात लालबुंद झालेले चेहरे आणि मग रडीचा डाव, ती हमरातुमरी… पुन्हा परत मग तो टॉस… आणि सगळ्यांनीच नवीन गेम सुरू केला. डाव रंगत चाललेला. सांज सरायला लागली तशी प्रत्येकाच्या आईनं हाका मारायला सुरवात करताच जो तो घरी धूम ठोकायला लागलेला.
मिट्टी बाय-बापूसवे खोपटात बसलेली. आजा खाटेवर बसलेला खोकत. त्याला ढास लागलेली… एकदा का त्याला खोकला आला की कितीतरी वेळ थांबायचाच नाही असं वाटत रहायचं, आता गचकतोय की नंतर!
‘काय पत्ताच लागायचा नाय त्याच्या जाण्याचा. कवा जाईल कळायचंबी नाय.’ बाय नेहमीच करवादत रहायची. चुलीच्या जाळाबरोबर तिचीही बडबड चालायची. हात चालायचे. मग भाकरी- कांद्याच्या चटणीवर सगळेच मिळून ताव मारायचे. सगळीकडे निजानिजीला सुरवात व्हायची. बापूसंगे मिट्टी खोपटाबाहेरच्या पडवीत त्या मोडक्या खाटेवाणी फळीवर पहुडायची. चांदण्याच्या सफरीत ती बाय बापूला, गण्याला सगळ्यांनाच विसरून जायची.
चांदण्याच्या त्या रातराणी मुलायम नक्षीदार आकाशीच्या काळोखात ठिपक्यांची रांगोळी निरखत राहिली. केव्हा तिचा डोळा लागला नि अर्धवट झोपेत हसत, थोडंसं बरळत एका कुशीवर वळली मिट्टी.

मिट्टी तर आता राजकन्या झालेली. त्या इतरत्र विखुरलेल्या चांदण्या तिच्या दासदासी होऊन अवतीभवती फिरत होत्या की! पंखानं वारं घालत अदबीनं तिला विचारत राहिलेल्या निळ्याशार त्या जलाशयात मिट्टी आनंदानं स्नान घेत होती. कोण तिला तेलानं मर्दन करत होतं, उटण्यानं न्हाऊ घालत होतं, चंदन-पावडरनं, फुलांच्या पाकळ्यांवर तिची गौर पावलं उमटत राहिली. ते नाजूक ठसे, गौरांगावरून मग सुवासिक तेल, अत्तर, शिकेकाई, वाळा-कस्तुरीचा सुगंध. मिट्टी मनापासून सुखसागरात डुंबत राहिलेली. देदीप्यमान प्रकाशित दालनं… सोनेरी प्रकशात न्हाऊ घातलेली कवाडं… सगळीकडेच कसं झगमगीत, लखलखीत, चमचमीत, सुस्नात होऊन राहिलेलं… मिट्टी गालातल्या गालात हसत राहिलेली आपली आपणच!

ती ताडकन उठून बसली. त्या मोडक्या-तोडक्या खाटेवर! बाय तिला उठवत होती. कामावर जायला तयार रहायला सांगत होती. केवढं धस्स झालं मिट्टीला. तिचंच तिला मनातल्या सुख-स्वप्नांचे मनोरेच्या मनोरे कोसळलेले बघवत नव्हतं. ती मनोमन जाणून होती, ती काही स्वप्नात रमत नव्हती किंवा दिवास्वप्नातही. ती जे जगायची, जे अनुभवायची त्यात तर ती तन-बदनानं विलीन होऊन राहायची. त्यात एक होऊन पूर्ण समाविष्ट. ते सत्यच होतं. ती सत्यच अनुभवत रहायची. बघता बघता तिला नवीन शरीरात प्रवेश मिळायचा नि तिचंच तिला कळेनासं व्हायचं. रातच्याला- दिसाला केव्हाही ती स्वप्न बघत रहायची. नवीन जीव दिसू लागायचा, नवीन शरीर… तो प्रवेश, ते सगळं सत्य अनुभवणं… सगळंच विलक्षण… अशीच ती बराच वेळ बसून रहायची. बाय-बापूला सांगायचा प्रयत्न करायची बराच वेळ. पण छे! ती दोघं तर इतकी त्रस्त असायची नेहमीच. तिच्यावरच करवादत राहायची. रोजच्या जेवणाच्या, रातच्या खाण्याच्या भ्रांतीत. बाय मग तिच्यावर डाफरत राहायची. ‘‘चल गं कार्टे, निमूट. जरा हातभार लाव. पाणी भरून आण. ध्यान असू दे कामात…’’ तिची बडबड कानावर येताच मग मिट्टीची लगबग सुरू व्हायची. तिचंच तिला आश्‍चर्य वाटत रहायचं. तिनं जे अनुभवलेलं ते सत्य होतं. ते प्रत्यक्षात तिनं उपभोगलेलं होतं, ते तीच फक्त जाणत होती. बाकी कोणी कोणीसुद्धा नाही. कोणालाच हे माहीत नाहीय. गणप्या तर किती लहान. त्याला सांगूनही काहीच समजणारं नव्हतं, हे ती जाणून होती. मग ती आपसूकच गप्प गप्प होऊन रहायची.
अशीच रेतीवर बसलेली मिट्टी… दुपारची वेळ… रणरणती दुपार… ऊन तापलेलं डोक्यावर. तिच्या नजरेत तो आला. त्याची आलिशान गाडी उन्हात चमचमत राहिलेली रस्त्यावर. तो त्यातून उतरला. सुटाबुटातला तो… ती त्याला निरखत राहिलेली…

अरे, हा तर इंजिनीअर बाबूच! अरे, अरे मी कुठे चाललेय? हे तर माझ्याच बुटांचे आवाज. खाड् खाड् उमटताहेत जिन्यावर, पॅसेजमध्ये. हे काय, केवढा हा रुबाब… मी तर इथला सिनिअर इंजिनीअर. मोठा ऑफिसर. माझ्या सहीशिवाय काहीच पान हलत नाही इथलं. सगळेच खोळंबलेत माझ्या येण्याची वाट बघत.
‘‘हं! इथला हा पोल नकोय इथं. एक्स्ट्रा डिझाइनला ऑड वाटतोय. त्याऐवजी एन्ट्रन्स असा एक्स्टेंड केला तर…’’ माझ्या नवीन प्लॅनकडे सगळे कसे नीट लक्ष देऊन ऐकत होते.
‘‘अरे हो, मी विसरलोच. आजच मोठ्या साहेबांची मीटिंग होणाराय.’’ पी. ए. सांगायला आला तेव्हा मीच केवढ्यांदा बोललो,
‘‘चला तर मग टेरेसवरच..’’
‘‘काय, अजून सीलिंग ठीक झालं नाहीय? तर मग शेड बसवूया टेंपररी.’’
‘‘हं, झाली ना व्यवस्था?’’
सगळे कामगार कामाला लागलेले. एकच गडबड उठलेली. साहेबांच्या गाड्या यायला लागल्या. सुटाबुटातले साहेब उतरू लागले. बांधकाम जवळजवळ पूर्ण होत आलेल्या मॉलच्या टेरेसवर सगळे जमलेले. चहा-पाण्याची व्यवस्था चोख झालेली. बांधकामाची चौकशी, नवीन प्लॅन्सचे आराखडे, नवीन डेव्हलपमेंट्सची चर्चा चाललेली… मीटिंग रंगात आलेली. आणि हे काय? मी तर चक्क माझे हे हात नोटांच्या पुडकीच्या पुडकी सरकवताहेत…मोठमोठ्या साहेबांचे खिसे फुगताहेत… माझी बॅग रिकामीच. हा कोण तर टॅक्स ऑफिसर आणि हा तर पोलिस ऑफिसर!
‘‘काय? आणखी डिमांड्स आहेत त्यांच्या? द्या, देऊ करा… किती आणखी… लाख? मग, काय तर… बांधकाम तर व्हायला पाहिजे ना…’’
सगळाच अवैध कारभार!

पण हे सगळं एन. ओ. सी. साठीच तर ना! सगळंच कसं जमणार? हा काळा पैसा त्यांच्या खिशात गेला तरी माझ्या रिकाम्या खिशाचं खालीपण खालीच राहणाराय थोडं? दोन नंबरचा स्रोत ओघत येतच राहणाराय? काय? हे काय? हे तर मीच बोलतोय, पुटपुटतोय, स्वगतच… इंजिनीअरबाबू येरझार्‍या घालू लागलेला…
सगळाच गैरव्यवहार, काळाबाजार नि मीच तर त्यात सामील…
पटावर सह्यांचे शिक्के झाले. झटदिशी पेपर्स फायलीत गेले. सगळंच कसं पट्दिशी झालं.
मीपण गाडी स्टार्ट केली.
बंगल्याच्या पोर्चमध्ये गाडी ठेवली. वॉचमन सलाम ठोकत उभा. मग गरमगरम लज्जतदार जेवणावर ताव मारून मऊशार सोफ्यावर रेलता रेलता केव्हा डोळा लागला कळलंच नाही.
‘‘अरे, हे काय रे? तुझी लोळायची सवय जात नाहीय. ऊन्हं बघ डोक्यावर आलीत. अकरा वाजायला आलेत. कामावरून फोन येताहेत बघ… अरे ऊठ…’’ मिसेस इंजिनीअर ओरडत राहिलेली आणि तो खाडकन उठलाच. मोबाईल सतत वाजत होता. रिंग कानावर आदळत होती. काहीतरी घडलंय, घडतंय. काय झालं? दारात ही नुसती माणसं जमलेली. नवीन बांधलेलं कन्स्ट्रक्शन धाडधाड कोसळलेलं. ती भेसळ… सिमेंट कमी पैशातलं… केवढा पैका हाती आलेला. कोटीच्या कोटी दोन नंबरचा.. ठेवता ठेवता मुश्किल झालेली आपल्याला… काय ही मुसिबत आलीय. उठल्या उठल्या सगळ्यांचे आवाज एकदमच कानावर आदळताहेत. साईट व्हिजिट… डेब्री… ढिगार्‍याखालून येणार्‍या आर्त किंकाळ्या… गाडलेले मजूर… त्यांच्या लोकांचा आरडाओरडा… किंकाळ्या, कल्लोळ… सगळ्यांचं रडणं ओरडणं… सगळं भरडलं जात होतं.

त्या झुलप्याकडे लाल तपकिरी केसांची झुलपं उडवणार्‍या इंजिनीअर बाबूला जमावानं घेराव घातलेला… जो तो त्याच्याकडेच रोखून बघत होता. मिट्टी तर त्याच्या त्या झुलप्यांकडे बघत राहिलेली… नुसतीच… तिच्या पोटात आता भुकेचा खड्डा पडलेला. बायच्या हातची चटणी-भाकरीच्या तुकड्यावर ती तोंडातल्या तोंडात जीभ फिरवत राहिली. मनातच… ‘बाय बाय कुठे आहेस तू? आणि ही कोण ढिगार्‍यातून बाहेर काढताहेत तिला… कोणाची बॉडी ती? अरे, बाय बाय…’ काळजाला चर्र होऊन गेलं. बायचा श्‍वास वरखाली होत होता. एवढीशी मीट्टी बायचं तोंड मांडीवर घेऊन बसली होती. रडून रडून डोळे सुजून दिसेनासे झालेले गालात. आणि हे काय मिट्टी म्हणत राहिली… ‘मी तर बायच्याच शरीरात शिरतेय आता! आणि हे काय? बायच आत्ता मिट्टीच्या शरीरात शिरलेली आरपार! हंबरडा फोडत असतानाच मिट्टीचं शरीर ताठ, निश्‍चल, निर्जीव होऊ लागलेलं. बसल्या जागीच तिला तिच्यात बाय दिसू लागलेली. अगदी हुबेहूब बायची प्रतिकृतीच! होय, बायचीच तर ती हाक! तिची ती नेहमीचीच साद, ‘‘मीहे, चल हात धर. बिगीबिगीनं जायचंय तर येेतेस ना?’ बाय विचारात होती मिट्टीला. मिट्टीच्याच शरीरातली बाय तिला जाब विचारत राहिलेली नि मिट्टी नुसतीच मान डोलावत राहिलेली. चक्रीवादळात वादळवार्‍यानं फांदीवरच्या तुटलेल्या पानागत गरगरत राहिली. देठातून तुटून… वार्‍यासवे हेलकांडत भिरभिरत राहिली मिट्टी…

सगळेच जमलेले… आसपासच्या खोपटांतून आलेली मंडळी… त्यांचे आवाज पडत होते आबाच्या क्षीण कानी.
‘‘आवं, अशी कशी मायसंगं गेली मिट्टी… एक शरीर होऊन गेल्याती दोगीबी…’’ बायच्या कुशीत शांत झोपलेल्या मिट्टीला बघून सगळेच हळहळत राहिलेले. कबाडाभोवती ही गर्दी नि खाटेवर पडलेला आबाचा आ वासलेला… खोकून खोकून कृश झालेला त्याचा अस्थिपंजर देह खाटेत दिसेनासा झालेला. खाटेला चिकटून राहिलेला. बापू नि गणप्या दगडावानी कोपर्‍यात दगडची होऊनी गेलेले. गणप्याला काय बी समजत नव्हतं. तो टुकूटुकू बघत राहिलेला सगळ्यांना.
ते खोपटं मात्र मूक रुदन करत राहिलेलं बराच वेळ.

– मानसी जामसांडेकर

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.