Now Reading
मायेची शाल : कविवर्य शंकर वैद्य

मायेची शाल : कविवर्य शंकर वैद्य

Menaka Prakashan

आठ दशकांच्या आयुष्यात जवळजवळ सहा दशकं आपल्या जीवनाचा प्रत्येक अंश कवितेसाठी समर्पित असलेलं हे व्यक्तिमत्त्व माझ्या उमेदवारीच्या काळात मायेची शाल पांघरत आलं आणि पुढे मार्गदर्शक, गुरू, स्नेही अशा रूपात प्रेरक ठरलं. उमद्या मनाच्या, रसिकतेनं ओतप्रोत असलेल्या एका श्रेष्ठ वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाविषयी मी आज बोलत आहे. ‘शब्द जिवलग’मधून…

उगवत्या पिढीच्या कवितेवर मायेची उबदार शाल पांघरणारं मधुर व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रा. शंकर वैद्य. वयाचं कॅलेंडर दूर ठेवून अखंड तरुणाईशीच नातं ठेवणारे वैद्य सर एखाद्या आधारवडाप्रमाणे माझ्या पिढीला लाभले. ओळख होण्याआधी ‘स्वर गंगेच्या काठावरती वचन दिले तू मला’ किंवा ‘आज हृदय मम विशाल झाले’ अशा गीतांमधून ते मला भेटले होते. मराठी कवितेत केवळ कवी म्हणून नाही, तर संत-पंत आणि नव्या पिढीच्या कसदार कवींच्या कवितेवर भाष्य करणारे मर्मज्ञ जाणकार म्हणून शंकर वैद्य यांचा दबदबा होता. ‘दूरदर्शन’च्या कृष्ण-धवल रंगाच्या काळात साहित्यिक कार्यक्रमात त्यांची उपस्थिती असेच. लता मंगेशकर यांची मुलाखत घेतानाही वैद्य सरच दिसत होते, तर पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिलेल्या माउलींच्या विराण्यांवर ओघवतं तरीही सुगम असं भाष्य करणारे निरूपक म्हणूनही शंकर वैद्य माझे आवडते होते.
हे नातं इतकं दूरस्थ राहणार नव्हतं, माझ्या आदराचं अंतस्थ होणार होतं. त्याला एक अभिमानास्पद निमित्त झालं.

त्या सुमारास (१९७७-७८ दरम्यान) ‘महाराष्ट्र टाईम्स’नं संवाद पुरवणीत खूप महत्त्वाचा काव्यविषयक उपक्रम केला होता. दर महिन्यातल्या महत्त्वाच्या सहा कविता मान्यवर कवी निवडत असत. त्यात मंगेश पाडगांवकर, शिरीष पै, नारायण सुर्वे असे अनेक ज्येष्ठ कविवर्य होते. याच निवड करणार्‍या कवींमध्ये प्रा. शंकर वैद्य हे नाव होतं.
तोवर मी माझ्या कविता, कविता प्रसिद्ध करण्यासाठी पुढाकार घेणार्‍या सर्व नियतकालिकांमध्ये पाठवू लागलो होतो. त्यात दर्जेदार लघु अनियतकालिकांचीही चळवळ जोमात होती. अगदी वेगळा प्रयोग करणार्‍या रूढ संकेतांपलीकडे जाऊन निराळ्या प्रतिमाविश्‍वाच्या कविता प्रसिद्ध करण्याचं सर्जनशील धाडस ही अनियतकालिकं करत होती. ‘कोनटिकी’ या कल्याण इथून प्रसिद्ध होणार्‍या, कवी रवींद्र लाखे संपादित करत असलेल्या अंकात माझी एक कविता प्रसिद्ध झाली होती.
अशी एक कविता प्रसिद्ध झाली आहे हेही मी विसरून गेलो नि एकदम अवाक् व्हावं असा धक्काच बसला. रविवारच्या ‘निवड ः शंकर वैद्य’ या कविता विभागात ‘महाराष्ट्र टाईम्स’मध्ये महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेल्या सहा सर्वोत्कृष्ट कवितांमध्ये माझी कविता शंकर वैद्य यांनी निवडली होती. आज त्या अपार आनंदाची कल्पना, कल्पनेनंही करणं अशक्य आहे. वैद्य सरांना माझी कविता आवडणं आणि त्यांनी ती ‘निवडणं’ ही गोष्ट सतरा-अठरा वर्षांच्या होतकरू कवीला, स्वतःचा सूूर शोधू पाहणार्‍या नवोदिताला ‘‘काहीतरी’’ सापडल्याची खूण होती.
डोंबिवलीचे नि महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी- द. भा. धामणस्कर म्हणालेही, ‘‘प्रवीणजी, कविता वैद्यांनी निवडली याचा अर्थ याची वाट योग्य आहे व भविष्यकाळ उज्ज्वल आहे.’’

मला वाटतंं, कविववर्य द. भा. धामणस्कर यांची वाणी भविषयवाणी असावी. भोवती उत्तम लिहिणार्‍या अनेक कवींचा गोतावळा असूनही शंकर वैद्य वेगवेगळ्या निमित्तानं मार्गदर्शक गुरू झाले.
खरं तर शंकर वैद्य सरांच्या कोणत्या पैलूविषयी किती बोलावं हा प्रश्‍न पडला आहे. कारण त्यांच्याच पिढीतल्या अन्य श्रेष्ठ कवींपेक्षा ते एक व्यक्ती म्हणून अतिशय वेगळे होते. मी एरवी नवोदितांशी एक धाकयुक्त अंतर ठेवून असणारे कवी पाहत होतो. वैद्य सर व्यासंग, वक्तृत्व आणि प्रतिभा या दृष्टीनं तेवढेच मोठे असूनही नव्यातल्या नव्या कवीच्या पाठीवर हात ठेवायला संकोचत नसत. याचा अर्थ ते केवळ प्रशंसक होते असा नाही, परंतु त्यांचा परखडपणा प्रेरक असे, अंकुर खुडणारा नसे.
विविध कवी संमेलनात आता वैद्य सर भेटू लागले. एकशेवीस कवी व्यासपीठावर एकाच सूत्रसंचालकानं-ताज्या सहनशीलतेनं ‘हँडल’ करणं ही जगातली सर्वांत अवघड गोष्ट सर लीलया करत. पाच-पाच तास मांडी घालून बसणं व मध्ये एकदाही उठून ‘दोन मिनिटांसाठीही’ बाहेर न जाता शेवटपर्यंत प्रत्येक कवीला योग्य त्या निरूपणासह सांभाळणं ही किमया शंकर वैद्य सरच करू जाणोत. दोन-चार वाक्यं पण इतकी नेमकी असत, की त्या सामान्य नव्या कवीचं बलस्थान ओळखून रसिकांपुढे त्याला ‘मोठं’ करण्याचं आगळं ‘मोठेपण’ केवळ शंकर वैद्य सरांमध्ये होतं.
पुढे त्यांच्या-माझ्यातल्या औपचारिक नात्याचं अंतर संपलं आणि वैद्य सरांच्या अधिक जवळ जाण्याचे योग आले. मग कळू लागली त्यांच्यातली गोड मिस्कीलता.

ते घरी आले होते तेव्हा आदित्य अवघ्या तीन-चार महिन्यांचा होता. त्याला त्यांनी आजोबांच्या मायेनं कुशीत घेतलं. तेव्हा आदित्यला आपल्याला एका नामवंत कवीनं जवळ घेतलं आहे हे माहीत नसल्यानं तो अचानक टँ हँ करत जरा अधिकच मोठ्यानं रडू लागला. शंकर वैद्य सर जवळच्या मित्रांना म्हणाले, ‘‘पाहा, कवीचा मुलगा आहे म्हणून तीन कडव्यांत रडत आहे.’’
वैद्य सरांची रसिकता पदोपदी जाणवायची. एकदा मी घातलेला शर्ट त्यांना आवडला.
‘‘सदरा छान आहे.’’
‘‘मरून रंग तुम्हाला आवडतो?’’
‘‘हा मरून रंग नाही, आमसुली रंग आहे. कोकणात ओली आमसुलं येतात ना, तो हा रंग!’’
वैद्य सरांनी रंगातली छटा किती सहज सोप्या उदाहरणातून दिली. मी तो शर्ट जेव्हा जेव्हा घालत असे, तेव्हा तेव्हा त्या ‘आमसुली’ शब्दाचं, त्यातून प्रतीत होणार्‍या रंगाचं नि अर्थातच रातांब्याच्या गोडव्याच्या वैद्य सरांचं स्मरण होत असे.
माझ्या अनेक प्रयोगांना ते सप्रेम उपस्थित राहत. मी कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांचा समूह घेऊन थेऊरच्या जंगलात एक वेगळीच सफर काढली. कोवळ्या सकाळी हिरव्या रानात विद्यार्थ्यांबरोबर शंकर वैद्य सरांना बोलावलं. मी वैद्य सरांना विनंती केली, ‘‘सर, निसर्गातच- निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांच्याविषयी आपण बोलाल का?’’

वैद्यसरांना ती कल्पनाच ‘रोमँटिक’ वाटली. त्यांनी चटकन ‘हो’ म्हटलं.
त्या अपूर्व पूर्वरंगात शंकर वैद्यांचा जो सूर लागला, तो अविस्मरणीय होता. समोर सव्वाशे-दीडशे विद्यार्थी अन् हिरव्या गर्द जंगलात सकाळच्या गारव्यात मिसळलेल्या हळदी उन्हात ‘माझी माय सरसोती मले शिकविते बोली, लेक व्याहिनीच्या मनी किती गुपीत पेरली’ या ओळी अशा काही मार्दवतेनं उलगडत होते की ते फक्त आम्हा विद्यार्थ्यांना नि झाडा-वेलींनाच माहीत!
व्याख्यानाचा समारोप करताना वैद्य सर म्हणाले, ‘‘तुम्ही इतकं उत्तम श्रवण केलंत की झाडांप्रमाणे तुम्हीही मनानं दोन इंच उंच झाला आहात असं मला जाणवतं आहे.’’
ही किमया वैद्य सरांच्या प्रेमळ निरुपणाची होती.
साध्या सहज संवादात एखादा समृद्ध व दिशा देणारा विचार ते सांगून जात. ‘दूरदर्शन’ला आमचं ध्वनिचित्रमुद्रण आवरलं नि निघताना बाहेरच्या व्हरांड्यातच मी त्यांना विचारलं, ‘‘वैद्य सर, उत्तम गीतात काय असावं लागतं?’’ शंकर वैद्य चटकन् म्हणाले, ‘‘एक चांगली कविता कलात्मकतेनं चुरगळावी लागते व मुरवावी लागते.’’

या वाक्यानं माझा अक्षरशः पाठलाग केला. गीतात अपेक्षित असणार्‍या तरल काव्यात्मकतेबद्दल वैद्य सरांनी किती मार्गदर्शक भाष्य केलं होतं. शंकर वैद्य यांनी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज आणि मनमोहन नातू यांच्या कवितांची संपादनं व विशेष म्हणजे त्यांच्या प्रदीर्घ प्रस्तावना हे काव्य रसिकांना, विद्यार्थ्यांना दीपस्तंभ ठरले आहेत. परंतु अशी ओघानं येणारी वाक्यं, त्यांची विविध कार्यक्रमांची निरूपणं योग्य संकलनानं एकत्र करणं हा सुद्धा तरुण संशोधकाचा प्रकल्प होऊ शकेल.
त्यांचं कुठलंच बोलणं, विचारणं मला उगीच वाटत नसे.
एकदा एका कार्यक्रमात वैद्य सर भेटले, सोबत मुलगा आदित्य होता. मध्ये चांगला अठरा वर्षांचा काळ गेला होता. त्याला पाहताच मिस्कीलपणे वैद्यसर म्हणाले, ‘‘व्वा! हाच का तो? तीन कडव्यांत रडणारा?’’
आम्ही हसलो. पुढं चटकन् त्यांनी विचारलं, ‘‘तू संध्याकाळी काय करतोस?’’
आदित्य हडबडला. मीही गडबडलो. कारण अठरा-वीस वर्षांचा कुणीही युवक भेटला की, ‘तू काय करतोस?’ किंवा ‘करतेस?’ हे ऐकायचीच आत्तापर्यंत सवय होती. पण ‘तू संध्याकाळी काय करतोस?’ हे ‘संध्याकाळी’ ऐकण्याची सवय ना मला होती, ना आदित्यला!
आमचा आतला गोंधळ वैद्य सरांच्या लक्षात आला. मग आदित्यच्या नजरेत नजर घालून निक्षून ते म्हणाले, ‘‘तुझी संध्याकाळ कुठे नि कशी जाते यावर उद्याची सकाळ ठरणार आहे. म्हणजे संध्याकाळी तू मैदानावर, ग्रंथालयात किंवा एखाद्या व्याख्यानाला जातोस का? यावर भविष्यकाळच्या वाटा ठरतात.’’
पुढे केवळ एका प्रसंगावर मी माझ्या अध्यापनात पूर्ण व्याख्यान दिलं. आदित्यचं एक निमित्त झालं, पण संपूर्ण युवक पिढीलाच त्यांनी जणू प्रश्‍न विचारला होता.
‘‘तुम्ही संध्याकाळी काय करता?’’

वैद्य सरांशी हे नातं आणखी गडद होण्याचं अजून एक कारण घडलं, ते म्हणजे सरोजिनी वैद्य. या मला एम. एम.साठी मार्गदर्शक- प्राध्यापक म्हणून होत्या. शंकर वैद्य आणि सरोजिनीबाई हे दोघंही साहित्यिक पति-पत्नी असूनही दोघांचेही स्वभावाचे व लेखनाचे पैलू भिन्न होते. मी वैद्य बाईंबरोबर अखंड दोन वर्षं विद्यार्थी म्हणून वावरूनही पुढे त्यांच्या घरी जाऊनही, काही वाक्यांपुढे त्यांची-माझी जवळीक होऊ शकली नाही. वैद्य बाईंच्या स्वभावात बोलताना प्रेमळपणा असूनही समोरचा अधिक मिसळू नये असा धाक होता. वैद्य सर मात्र पहिल्या चार वाक्यांतच अजून चार वाक्यं बोलावीत अशा जिव्हाळ्यानं वागत. आफ्रिका हाऊस, एडनवाला रोड अशा परीकथेतल्या वाटाव्या अशा त्यांच्या पत्त्यावर मी वैद्य सरांना भेटण्यासाठी अनेक निमित्तानं जात असे. विशेष म्हणजे मी सरोजिनीबाईंचा विद्यार्थी असूनही ‘सरांकडे ना?’ असं विचारून त्या आतल्या खोलीत निघून जात. दोघांचं कार्यक्षेत्र एकच होतं, पण व्यवहार, भेटीगाठी यांच्याबाबत दोघांनी पुरेशी शिस्त आणि वेगळेपण जपलेलं जाणवे. मनात असूनही तिघांच्या एकत्रित गप्पा झाल्या असं घडलं नाही. अर्थात मी इतका बाविशीचा नवखा विद्यार्थी होतो त्यामुळे माझंही त्यांच्या विद्वत्तेला दिपून तेवढं धारिष्ट्य झालं नसेल.

या भेटीत प्रा. शंकर वैद्य सरांच्या स्वभावाबाबत आणखी एक वैशिष्ट्य जाणवलं, ते म्हणजे त्यांची समर्पित मातृभक्ती! ‘आई’ हे त्यांचं दैवतच होतं. वृद्ध आईच्या आजारपणात सेवा शुश्रूषेसाठी ते अनेक कार्यक्रम नाकारत असत. शंकर वैद्य व सरोजिनी वैद्य दोघांनाही व्याख्यानांसाठी सतत निमंत्रणं असत. पण मी पाहिलं, दोघांपैकी एक-‘आई’साठी घरी थांबेल अशाच प्रकारे ते कार्यक्रम स्वीकारत असत. दोघंही व्याख्यानासाठी बाहेरगावी आणि आजारी वृद्ध आई घरी एकटी असं कधीही झालं नाही.
वैद्य सरांना जुन्नर या त्यांच्या गावाचा, आपण शिक्षकाचा मुलगा आहोत या गोष्टीचा भक्तिपूर्ण अभिमान वाटत असे. त्यांच्या गप्पांत तो अभावितपणे येत असे. आणि जुन्नर गावी कधी मी कार्यक्रमाला गेलो, की तिथले संयोजकही अभिमानानं सांगत, ‘ते प्रसिद्ध कवी शंकर वैद्य आहेत ना? ते आमच्याच गावचे!’
कधीही भेटले तरी चेहर्‍यावर एक लाघवी स्मित असलेले, व्यक्तिमत्त्वात एक रसिक नीटनेटकेपणा असलेले, स्वतःच्या कपड्यांच्या रंगसंगतीत आकर्षकता जपणारे, देखणे, तजेलदार शंकर वैद्य सर, हलकेच मावळताना पाहणं हा अतिशय हृदयद्रावक अनुभव होता. वैद्य सरांचे निळसर घारे डोळे नि चेहर्‍यावरचं तेज मिटू मिटू झालं ते सरोजिनी वैद्य यांच्या दुर्धर व्याधीनंतर. बुद्धितेजानं करारी भासणार्‍या, गुरुपदीचं आगळं मांगल्य ल्यालेल्या आमच्या बाई- त्या व्याधीनं पार खंगवून टाकल्या. आधी वृद्ध आईची सेवा नि मग लगोलग म्हणावा असा हा आघात!

एकाकी- एकाकी होत गेलं. मुलगा निरंजन हा तेव्हा परदेशी राहत असे. त्यामुळे त्या एकाकीपणाला आणखीनच कातरता आली. जेवणही बाहेरून डबा मागवावा लागे. अधिक संध्याकाळ व्हायच्या आत त्यांना कार्यक्रमातून घरी जावं लागे. जणू जीवनचैतन्याचे, जगण्याच्या उद्दिष्टाचे सारे दोरच कुणी कापले होते.
मी त्या दिवशी मनानं मलूल आणि देहानं अशक्त झालेले, एकाकी पण उदास दिसणारे वैद्य सर पाहिले. नायगाव इथल्या मराठी ग्रंथ संग्रहालयातून, कार्यक्रमानंतर आम्ही एकत्रच बाहेर पडलो. गर्दीतून रस्ता क्रॉस करणं अवघड होतं. मी वैद्य सरांना हात दिला.
स्पर्श अगदी वात्सल्याचा.
मी म्हटलं- ‘‘येऊ का घरापर्यंत?’’
‘‘नको. मी टॅक्सीतनंच जाईन.’’
‘‘वैद्य सर, प्रकृती खालावलेली वाटते. जपा, नवं लिहा.’’
‘‘तुम्हाला मुलींचा तो खेळ माहितीये का? खेड्यात असायचा पाहा.’’
‘‘?’’
‘‘सागरगोट्यांचा..’‘
‘‘हो-’’
झेललेले सागरगोटे बाजूला ठेवून, उरलेले खेळत राहायचे. आता थोडेच उरलेत रे.’’
पुढे मी काही बोलणं शक्यच नव्हतं.
ती शेवटची भेट-
पण शंकर वैद्य सर आठवणीत राहिले ते ‘स्वर कवितेचे’ या कार्यक्रमातल्या माझ्या निरुपणाला नियमानं दाद देणारे!
‘कवीचा मुलगा म्हणून तीन कडव्यात रडतो’ असं म्हणणारे!
स्वरगंगेच्या काठावर कवितेनं ज्यांना व ज्यांनी कवितेला वचन दिलं आहे असे!
नव्या पिढीतल्या उमलत्या कवितेला जोपासणारे शंकर वैद्य! पाच दशकांच्या अविरत ध्यासानं- कवीच्या पाठीवर मायेची शाल पांघरणारे!

वैद्य सर!

– प्रवीण दवणे

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.