Now Reading
मानसी

मानसी

Menaka Prakashan
View Gallery

”तुला काही जाणवले का रे? या मानसीचा नवरा काय करतो? त्याच्याविषयी एक चकार शब्द निघाला नाही आज? ..तिच्या घरी कोण असतं त्या दोघांशिवाय, त्याचा काही पत्ताच लागला नाही.” प्रीतीच्या या वक्तव्यावर त्याने लॅपटॉपवरची नजर काढून तिच्याकडे वळवली. खरं तर त्यालाही हा प्रश्न विचारायचा होता. पण गप्पांच्या ओघात राहूनच गेलं ते. ”गेला असेल गं कुठेतरी बाहेर टूरवर वगैरे किंवा इंडियाच्या बाहेरच असेल.” खरं तर त्याच्याही मनात आता उत्सुकता वाढली. हा विषय कसा राहिला बुवा आपल्या गप्पांत. ”तिच्या घराच्या पाटीवर पण तिचंच नाव होतं.” प्रीतीच्या या वाक्यावर मात्र त्याने तिला हटकलं.. ”काय वकिलीणबाई, आजकाल किती बायका लग्नानंतरही स्वतःचं नाव बदलत नाहीत आणि असेल घर तिच्या एकटीच्या नावावर घेतलेलं फॉर फायनान्शिअल मॅटर्स.”

आज ऑफिसला जायला तसा उशीरच झाला होता. एक डोळा घड्याळावर ठेवत रोहितने भरभर स्वराचा डबा तिच्या बॅगेत भरला. स्वतःचा लॅपटॉप, मोबाईल, चार्जर आणि डबा बॅगेत कोंबत त्याने स्वराला आवाज दिला.

”सवि लवकर आटप. डॅडी इज गेटिंग लेट.”

आज प्रीतीची पण अ‍ॅन्यूअल जनरल मीटिंग होती. ती रात्रभर बसून केलेल्या सर्व रिपोर्ट्सवर शेवटची नजर टाकत होती. रोहितची लगबग बघून ती बाहेर आली. स्वराला शूज चढवत तिने तिचा बो आणि बेल्ट लावून दिले. रोहितने नजरेनेच प्रीतीला थँक्स म्हणत तिच्या मस्तकावर एक गुड बाय किस दिला आणि कारची चावी उचलत, स्वराची व स्वतःची बॅग खांद्यावर अडकवली.

”बाय मम्मा. आज डब्ब्यात काय आहे, ” सवयीचा रोजचा प्रश्न. तिला रोज काहीतरी कॉन्टिनेण्ट्ल डिश डब्यात हवी असते. मग फोडणीचा भात असला तरी.. ‘चिली गार्लिक फ्राइड राइस’ असं काहीतरी नाव दिलं की मॅडम खूष.

सवि उशीर झाला आहे. बस चुकणार आता… रोहित गुरकावला तसा स्वराने घरातून निमूट काढता पाय घेतला.

रोहित या कॉम्ेक्समध्ये येऊन एकच महिना झाला होता. त्याला या एमएनसीची एमडीची ऑफर आल्यावर प्रीतीनंही स्वतःची बदली त्याच्याबरोबर पुण्याला करून घेतली. पहिले काही दिवस स्वराला कठीण गेले. मग हळूहळू स्वारी रुळली नवीन फ्रेंड्समध्ये आणि शाळेतपण.
तिची बस कॉम्ेक्सच्या दाराशीच यायची. तशी रोज प्रीतीच स्वराला बसमध्ये चढवून द्यायची. पण आज तिची घाई असल्यामुळे रोहितने कटकट न करता ही जबाबदारी घेतली होती. दोघं जेमतेम गेटपाशी आले आणि बस आली. रोहितने सुटकेचा निःश्वास टाकला.
हो, बस चुकली तर परत स्वराला शाळेत सोडायला जावं लागलं असतं. मग त्याला निश्चित उशीर झाला असता. स्वराला बाय करून त्याने स्वतःची कार काढली. गेटमधून बाहेर पडणार इतक्यात त्याची नजर त्या दोघांवर पडली.

”ऑटो.. ऑटो..” अशी आर्त साद देत स्वराच्याच शाळेचा युनिफॉर्म घातलेल्या एका छोट्याला घेऊन त्याची आई सुसाट धावत येत होती. बस चुकली असणार. पुण्याचे ऑटो ड्रायव्हर्स… सगळे पेशव्यांचे अवतार. आवाज दिल्यावर वळून बघतील तर पेशवाई अस्ताला जाईल, अशी त्यांची भीती असते बहुतेक. रोहितला स्वतःच्याच विचारांचं हसू आलं. गाडीचा हॉर्न वाजवून त्यानं पुढच्या ऑटोवाल्याला ती मागून येत असल्याचे सूचित केलं. आता बीएमडब्ल्यूचा मालक काहीतरी सांगतो म्हटल्यावर त्या ऑटोवाल्यानं पण चुपचाप नोंद घेतली. ती धावत जाऊन त्या ऑटोत बसली. जाताना ‘थँक यू’ पुटपुटली बहुतेक. आणि रोहितची नजर छोट्यावरून त्याच्या आईकडे गेली आणि तो उडालाच.

”अर्रे…मनू .. ही इथे कशी. तिचं लक्षच नव्हतं त्याच्याकडे. बराच बदल झाला की हिच्यात. हेअर स्टाईल बदलली होती. निळी जीन्स आणि तलम हिरव्या कुर्तीमध्ये एकदम ग्रेसफुल आणि कॉन्फिडन्ट दिसत होती. रिक्षा भर्रकन निघूनही गेली आणि रोहित ऑफिसला पोहचेपर्यंत मनूच्या आणि कॉलेजच्या विचारात बुडून गेला.

काय गोल्डन डेज होते ते. ही सगळी कॉमर्सची मुलं. हाफ डे कॉलेज असल्यामुळे बरेचदा कॉलेज सुटलं की जिमखाना किंवा कॅन्टीनमध्ये एकत्र जमायचे. तसा त्यांचा ग्रुप मोठा होता, पण त्यातही या पाच-सहा जणांत खूपच घट्ट बंध होता.. रोही, मनू, अरू, श्री, राज, ऋषी आणि अवी. कुणाचीच पूर्ण नावं घेतली जायची नाहीत. त्यांना एकमेकांची सारी टॉप सिक्रेट्स माहीत होती. ऋषीच्या आईवडिलांचं पटत नव्हतं, राजच्या वडिलांचा बिझिनेस लॉसमध्ये चालत होता. त्यांची गाडी, बंगला सगळे बँकेकडे मॉर्गेज होते. अवीला अरू आवडायची आणि मनूला अवी. पण अरूला आणि अवीला या एकतर्फी प्रेमाचा थांगपत्ता नव्हता. मनू आणि अरू खूपच जिवाभावाच्या मैत्रिणी. म्हणजे श्रीने अरूला प्रपोज केल्यावर मनूने हो म्हणेपर्यंत अरूने आपला होकार श्रीला कळवला नव्हता. पण नंतरही बिचाऱ्या श्रीला कुठेही अरूला फिरायला नेताना मनूला बरोबर न्यावंच लागायचं. त्यावरून सारा ग्रुप त्याची डबल मजा और कम दाम अशी चेष्टाही करायचे.

विचारांच्या नादात रोहित त्याच्या ऑफिसला कधी पोहचला ते कळलंच नाही.

”सर, आज संजय नाही का?”

सिक्युरिटी गार्डने रोहिला टोकलं. मुंबईत कोणीही एकमेकांशी हिंदी किंवा इंग्लिशमधून संभाषण साधतात आणि पुण्यात अस्खलित मराठी. संजय हा रोहितचा ड्रायव्हर आज आजारी असल्याने रजेवर होता. हसून मानेनेच गार्डला नाहीची खूण करत रोहितने त्याच्याकडे गाडीची चावी दिली आणि लिफ्टच्या लॉबीकडे वळला.

‘धत.. जरा आधी लक्षात आलं असतं तर तिचा नंबर तरी घेतला असता.’ रोहित अजून मनूच्याच विचारात.

आता तर तिला हुडकून काढणं नदीतून गोटा शोधण्यासारखंच मुश्किल. एक तर त्यांचा कॉम्ेक्स प्रचंड मोठा. जवळजवळ २५ बिल्डिंग्स होत्या त्या. त्यातही १० टॉवर प्रोजेक्ट्स. त्यातही शोधलं असतं पण आता या मुलीचं नावही बदललं असणार. मग कुठल्या नावाने शोधणार. रोहितला एकदम हताश झाल्यासारखं वाटलं.

”गुड मॉर्निंग सर. राठोड सर हॅड कॉल्ड. ही वॉन्ट्स टू प्रीपॉन दि इन्क्वॉयरी टू टेन एएम इन्स्टेड ऑफ पोस्ट लंच. ” सेक्रेटरीच्या मंजुळ ध्वनीने रोहित भानावर आला.
”ओके. नो प्रोब्लेम. आर दि रिपोर्टस रेडी?”

नेहमीच्या शांत स्वरात त्याने तिला प्रतिप्रश्न केला. त्याच्या या शांत वृत्तीमुळे सगळे त्याला मिस्टर कूल म्हणून ओळखायला लागले होते. नंतरचे दहा तास कसे गेले तेच रोहितला कळलं नाही. तसं हे त्याचं रोजचंच वेळापत्रक होतं.

सव्वासातला ऑफिसमधून निघताना स्वराची टॉकिंग टॉमची लाडीक मागणी त्याला आठवली.
सुटलो बाबा. नाहीतर घरी गेल्यावर परत बाहेर पडावं लागलं असतं. या मुलांचे आनंद किती भौतिक आहेत… आपल्या लहानपणी…..
अंहं.. आपण कधीपासून असं सामान्य माणसासारखं रडायला लागलो. इथे अजून काहीच मित्र परिवार नाही त्यामुळे ही भावना बळावत असावी. थोड्या दिवसांत होईल सुरळीत.

मुंबईत ही तिघंही आपापल्या व्यापात दंग असायची. सोसायटीचे मित्र, दर वीकेंडच्या पार्टीज, क्लब मेम्बरशिप. पण यातही स्वराची सर्वांगीण वाढ व्हावी म्हणून संगीताचा क्लास, बॅडमिंटनचा क्लास, रविवारचे संस्कार वर्ग असायचेच. त्यात वेळ काढून प्रीती आणि रोहित तिला महिन्यातून एक तरी निसर्ग सहल घडवून आणायचे. मुलांनी मातीत खेळलंच पाहिजे या ठाम मताची प्रीती होती आणि आठवीपर्यंत मुलं घरीच अभ्यास करू शकतात ..बाहेरच्या शिकवणीची गरज नाही या मतावर रोहित ठाम होता.

मोबाईलवर रिंग वाजली तसा रोहितने ब्लूटूथ ऑन केला.

”रोही कुठे आहेस?” प्रीतीचा एक्सायटेड आवाज त्याच्या कानी पडला. मीटिंग जोमात झालेली दिसते. स्वारी खूष दिसत होती.
”अगं पोहचतोच आहे. सवीचे टॉय घेऊन आलोच दहा मिनिटांत. तू कुठे आहेस?”
”मी पण पोहोचलेच आहे जवळजवळ. आज डिनरला बाहेर जाऊ या का? थोडा चेंज होईल.”

रोहितच्या चेहऱ्यावर हलकंच स्मित उमटलं. तो प्रीतीला चांगलंच ओळखायचा. तिला काहीतरी खूप बोलायचं असलं की ती घरी जेवण टाळते. तेवढा मोकळा वेळ मिळतो बोलायला.

तसंही हा एमडी, ती लीगल अ‍ॅडव्हायजर. दोघं प्रचंड व्यग्र. त्यामुळे रोजच्या दैनंदिन घडामोडी सांगण्यासाठी वेळ मिळायचा नाहीच पण तो काढावा लागायचा. रोहितने विचारांच्या तंद्रीतच गाडी बिल्डिंगपाशी आणली. घरी पोहोचून भराभर ड्रेस चेंज करून तो तयार झाला. स्वरा आणि प्रीती आधीच तयार होत्या, त्यामुळे फार वेळ न काढता त्यांना बाहेर लवकर पडता आलं. तसंही बाहेर जायचं म्हणजे स्वरा एक्सायटेड असतेच, त्यात आज नवीन खेळणं मिळाल्याने स्वारी जास्तच खूष होती.

”कॅम्पला नवीन रेस्टोरंट ओपन झालं आहे, क्रेझी फुडीज म्हणून. तिथे जाऊया.” प्रीतीच्या सूचनेवर त्याने गाडी कॅम्पच्या दिशेने वळवली. जॉईंट छानच होते. स्पेशिअस आणि ओपन गार्डनमुळे स्वराही थोडी वेगळी खेळायला गेली. तिच्यावर एका डोळ्याने नजर ठेवत रोहितने प्रीतीकडे हसून पाहिलं.

”शूट नाऊ.. कशी झाली मीटिंग तुझी?”
”अरे धमाल. मी केलेल्या रिपोर्ट्समुळे आज एम डी जाम इम्प्रेस्ड झाले. मीटिंग झाल्यावर स्वतः बोलावून घेऊन मला म्हणाले की या वर्षी तयार रहा हां प्रीती. तुझी केबिन रेडी होत आहे.” प्रीती फुललेल्या नजरेने सांगत होती.

रोहितच्या नजरेत तिच्याविषयीचा अभिमान एकदम ठासून दिसत होता. चीफ लीगल अ‍ॅडवाईझर या पोजिशनला येण्यासाठी तिने घेतलेली मेहनत त्याने सुरवातीपासून पाहिली होती आणि त्यात हे प्रमोशन गेल्याच वर्षी ड्यू होतं. पण रोहितच्या बरोबर पुण्याला यायला लागल्याने तिला एक वर्षाचा सिनिऑरिटीचा क्लेम सोडावा लागला होता. त्यामुळे आता या मिड टर्म प्रमोशनमुळे ती भलतीच खूश होती आणि रोहितच्याही मनातली सल गेली की आपल्यामुळे तिची करिअर कुठे अडकली नाही.

अचानक भानावर येत त्याची नजर स्वराला शोधू लागली. पण ती आता झोपाळा सोडून तिथे आलेल्या अनोळखी मुलांबरोबर खेळण्यात मग्न होती.

आपण असे निर्व्याज मन का नाही ठेवू शकत? कोणाही अनोळखी व्यक्तीशी मुलं जितकी बिनधास्त बोलू शकतात तितके आपण नाही मोकळे होत. आपला हुद्दा, वय आणि जेंडरही मधे येतं. रोहितच्या मनात हे विचार तरळत होते आणि त्या अनोळखी मुलाला पाहत असताना त्याला परत सकाळची घटना आठवली.

”अरे प्रीती, आज एक किस्सा झाला. तुला आठवत आहे ना श्री, अरू, मनूचा ग्रुप. त्यातली मनू आज सकाळी आपल्या कॉम्ेक्सच्या गेटशी दिसली. तिला मुलगाही आहे एक आणि तो पण स्वराच्याच शाळेत आहे…” रोहित
”सॉलिड. काय म्हणाली मग? एकदम खूश झाली असेल तुला पाहून..” प्रीती

”अगं काय म्हणणार. तोच तर घोळ झाला. मी गाडीत होतो. आणि ती जेटच्या स्पीडने ऑटो पकडून निघून गेली. जाम हळहळलो. आता या कॉम्ेक्समधून तिला शोधणं अशक्यच.”

”अरे भेटेल रे. तिचा मुलगाही बसने जात असेल तर स्वराला रोज सोडायला जा. निश्चित भेटेल…प्रीतीच्या नजरेत मिस्कील भाव होते. स्वराला सोडणं हे रोहितला अजिबात नावडणारं काम. एक तर लवकर उठावं लागतं आणि त्यात स्वराचे सकाळचे सगळे नखरे. रोहित नेहमीच प्रीतीच्या पेशन्सची तारीफ करायचा. ”

रोहितने प्रीतीच्या टोमण्यावर तिच्याकडे नुसतेच भुवई उंचावत हसून पाहिलं.

प्रीतीला रोहितच्या या कॉलेज ग्रुपविषयी पूर्ण माहिती होती. अगदी कोणाला भेटली नसली तरी नावा-गावासकट सगळ्यांविषयी तिला रोहितने इत्थंभूत माहिती दिली होती. त्यामुळे रोहितची हळहळ प्रीतीला चांगलीच जाणवली. रोहितच्या दंडाला स्पर्श करत ती त्याला सांत्वनाप्रत काही बोलणार इतक्यात स्वरा खेळून परत आली आणि तो विषय तिथेच थांबला.

पुढचे काही दिवस कसे सरले त्या दोघांना कळलंही नाही. मधे प्रीतीचे आई-बाबा पुण्याला येऊन महिनाभर राहिले हवाबदल करण्यासाठी. मग तर सगळे वीकएन्ड त्यांना पुण्याची सैर करवण्यातच गेले आणि रोहित मनू किस्सा विसरूनही गेला.

”ऐक ना रे डॅडी. मला काही तरी आयडिया दे ना. मला या फिफ्टीन्थ ऑगस्टला आपल्या कॉम्ेक्सच्या फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा आहे. थीम स्वराज के बाद का हिंदुस्थान अशी आहे…” स्वराच्या टुमण्याने रोहितने पेपर बाजूला सारला. स्वराला घेऊन तो सरळ थिम ड्रेस स्टोअरमध्ये गेला. आजकाल पालकांना या स्टोअर्सनी वाचवलं आहे. कुठलीही थीम असो त्यांना सांगितलं की ते ड्रेस रेडी देतात किंवा आपल्याला हवा तसा बनवून देतात. फक्त तुमच्याकडे पैसा हवा, मग सर्व काही या शहरांत आरामात मिळतं.

स्वरा जाम खूश होती. तिला एकदम नवीन ड्रेस बनवून मिळणार होता, डॅडीने सांगितलेल्या आयडियाप्रमाणे. आणि तिचा डॅडी अशा आयडिया देण्यात जाम हुषार होता. आजपर्यंत सगळ्या स्पर्धांत स्वरा नेहमीच पहिली आली होती, आणि त्या गोष्टीचा तिला खूप अभिमानही होता.

फिफ्टीन्थला नेहमीप्रमाणे ट्रॉफी मिळवून स्वरा, प्रीती आणि रोहितही तिथेच प्रीतिभोजनासाठी सर्वांबरोबर बसले होते. कॉम्ेक्समधल्या लोकांशी इतर दिवशी फारसं बोलणं होतच नसे. फक्त त्यांच्या मजल्यावरच्या आणि बिल्डिंगमधल्या काही निवडक कुटुंबांशी त्यांचा घनिष्ट घरोबा होता. त्यामुळे या अशा कार्यक्रमांना दोघेही आवर्जून हजेरी लावायचे.

”ममा, मला अजून पाव हवा आहे…” प्रीती स्वराच्या मागणीवर उठण्याआधीच रोहित उभा राहिला होता. इतक्यात त्याच्या पाठीवर मागून कोणीतरी हलकेच थाप मारली. कोण आहे ते पाहण्याआधीच त्या बाईने, हो बाईच होती ती, त्याला घट्ट मिठीपण मारली.

”रोही, वॉट अ प्लेझंट सरप्राईज. तू पुण्यात काय करतो आहेस आणि माझ्या सोसायटीत कसा काय तू? ओह माय गॉड, आता हे नको सांगूस की तू इथेच राहतोस.” रोहित मनूच्या अचानक हल्ल्याने पुरा गांगरून गेला होता.

”ए..हाय.. मनू..” तिचे दोन्ही हात हातात घेऊन हलकेच दाबत रोहित उद्‌गारला.
”अरे, कधीपासून शोधतो आहे तुला. बाय द वे … ही प्रीती आणि प्रीती ही…”

मनू… मानसी.. प्रीतीच्या नजरेत थोडी मिस्कील छटा आणि थोडं कौतुकही. अगं, याने तुला मागे गेटपाशी पाहिलं होतं आणि स्वारी एकदम अपसेट होती की तुझी आणि त्याची चुकामूक झाली ..प्रीती एकदम मोकळेपणाने मनूशी बोलायला लागली. प्रीतीने थोडक्यात त्या दिवशीचा किस्सा मानसीला सांगितला आणि त्यांच्या बदलीपासून आजपर्यंतचा प्रवासही रंगवून झाला.

या बायका एकदा बोलायला लागल्या की आजूबाजूचं जग विसरूनच जातात साला. आता यांना बघून ही माझी मैत्रीण की हिची बालमैत्रीण हे सांगणं पण कठीण होईल… रोहित मनाशीच हसत हसत विचार करत होता.
पण त्याला प्रीतीची ही माणसं आपली करण्याची नॅक चांगलीच माहीत होती आणि त्यातूनही ती रोहितला आवडणाऱ्या लोकांना तर खास आपलेसे करून टाकायची.

”अरे, तुम्ही इंद्रधनूमध्ये राहता? मी विश्वंभर मध्ये, ए-टू नॉट फोर. चला ना घरी. थोडी कॉफी पिऊ आणि गप्पा मारू.” मनूच्या प्रस्तावावर प्रीती भानावर आली.

रोहितच्या प्रतिक्रिया आजमावत तिने हळूच मनूला नकार दिला.

”अगं खूप उशीर झाला आहे गं आणि उद्या परत ऑफिसही आहे आणि शाळा पण.” प्रीतीच्या या उद््गारांवर हलकेच मान डोलावत मनूने पुढचा प्रस्ताव लगेच मांडला.

”ओ के. मग या रविवारी लंचला माझ्या घरी आणि मला नाही अजिबात ऐकूच येत नाही ते. रोहिला चांगलंच माहीत आहे.. मला हवं असलं की मी गोष्टी कशा करवून घ्यायची ती कॉलेजमध्ये.” मनूच्या या वाक्यावर रोहितने हसून कानाला हात लावला.

”बाई गं, नाही कोण म्हणत आहे.. होय म्हणायला तू गप्प बसशील तर ना.” रोहित म्हणाला.
आत्ता कसं या अर्थाचे हसत मनूने त्यावर थम्स अप केलं आणि मंडळी आपापल्या घरी पांगली.
रात्री सगळं आवरून झोपताना परत मनूचा विषय निघणं स्वाभाविकच होतं.

”छान आहे रे ती स्वभावाने. एकदम बोलकी आणि मोकळी.” प्रीतीच्या या उद््गारांवर रोहित नुसताच हसला.
”तिचा नवरा काय करतो रे. आय मिन तिच्या घरचा काहीच विषय निघाला नाही. फक्त, नील तिचा मुलगा स्वरूच्या शाळेत आहे इतकंच कळलं नाही?”

”मला काही कळायला तुम्ही वावच कुठे दिलात. इतक्या बोललात, जणू वर्षानुवर्षांनंतर तुम्हीच भेटलात.” रोहितने मघासचं दुःख आता हळूच प्रकट केलं. प्रीतीने त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही म्हणून वळून बघतो तो ती गाढ झोपी गेलेली आणि तो विषय तिथेच संपला.

रविवारी नीलसाठी इंपोर्टेड चॉकलेट्सचा डबा घेऊन तिघंही मानसीच्या घरी अकराच्या दरम्यान पोहोचले. विश्वंभरच्या खाली बोर्ड वर ए-टू नॉट फोर वर मिस. मानसी रेगे लिहिलेलं कन्फर्म करून तिघंही लिफ्टमध्ये शिरले. गेल्यागेल्या हातातला चॉकलेट्सचा डब्बा नीलच्या हातात देत स्वराने त्याला आपली नवी डॉल दाखवली. नीलने पण अंकल आणि आंटीला थँक्यू म्हणत हातातले चॉकलेट आईच्या हाती सुपूर्द केलं. दोघंही लगेच हातात हात घालून नीलच्या खोलीत खेळायला गेलेही. नील खरंच गोड मुलगा होता. हसरा आणि चांगल्या वळणात वाढलेला.

”मानसी घर खूप सुंदर ठेवलं आहेस गं.” तिच्या हॉलवर नजर टाकत रोहितने कॉमेंट दिली. तिचं घर खरंच सुंदर होतं. ३ बेडरूमचा प्रशस्त फ्लॅट, वर हॉलला लागून छोटीशी टेरेस. टेरेसमध्ये छोटीशी बाग पण फुलवलेली. पण झाडांची गर्दी नव्हती. त्यातले मोठ्या कुंडीतलं निशिगंधाचं रोप पाहून तर प्रीती हरखून गेली. घरात मोजकंच पण किमती आणि सुबक फर्निचर होतं. जमिनीवर आधुनिक पद्धतीची सतरंजी घातली होती. भिंतींवर काही सुंदर पेंटिंग्स आणि काही कारविंग्स होती. रंगसंगती, बैठक, फ्लॉवरव्हास मधली ऑर्चिड्स आणि व्हाईट लिलीची फुलं सारंच उत्तम अभिरुचीचा दाखला देत होतं. तिच्या बेडरूममध्ये तिची छोटीशी लायब्ररी होती.

”अरे वा, पुस्तक वाचायचा छंद तुझा की…” प्रीतीच्या उद््गारावर मानसी हसून लगेच म्हणाली,

”अगं हो. मला खूप आवडतात पुस्तकं वाचायला. सगळीच आवडती पुस्तकं नाही मिळत लायब्ररीत. मग ही काही संग्रही ठेवलीत मी.”
मुलांना त्यांचे चॉकलेट ड्रिंक देत मानसीने त्यांच्यासाठी पन्हं आणि थोडे कबाब्स ठेवले टीपॉय वर आणि गप्पांना बसली.

रोहितच्या लग्नापासून ते अमेरिकेमधून परत भारतात येणं आणि पुण्याला स्थायिक होण्याचा प्रवास त्याने आणि प्रीतीने रंगवून सांगितला. एकमेकांच्या आई-वडिलांची ख्यालीखुशाली विचारत रोहितने मानसीला तिच्याविषयी विचारलं. मानसीची स्वतःची पुण्यात रेवा आणि मेघना नावाची दोन बुटिक्स होती. प्रीती ते ऐकून खूपच चकित झाली होती. खूपच प्रसिद्ध ब्रँड होते पुण्यातले. मानसी स्वतः दोन्ही बुटिक्स चालवायची. तिचे रोजचं वेळापत्रक ऐकून तर रोहीतही उडालाच. सुपर वूमन झाली होती ती. सकाळी पाच वाजता उठून मॉर्निंग वॉक, मग शाळेची तयारी, त्यानंतर दुपारपर्यंत बुटिक्स, मग लंच ब्रेक. दुपारी जवळच्या एका मूक आणि बधिर शाळेत स्वेच्छेने शिकवणं आणि त्यांनी तयार केलेल्या क्राफ्ट्ससाठी नियमित प्रदर्शन भरवण्याऱ्या संयोजकांना गाठणं आणि त्यांचा स्टॉल ठेवणं. संध्याकाळी परत बुटिक्स. रोज रात्री सोसायटीत एक खूप वृद्ध आजी होत्या, त्यांना ज्ञानेश्वरी वाचून दाखवणं किंवा कधीतरी त्यांना सोसायटीतच रात्री फेरफटका मारून आणणं. बरं, यात नीलच्या सर्वांगीण विकासावरही बारीक नजर. त्याचे स्वीमिंग आणि गायनाचा क्लास, शाळा, प्रोजेक्ट्स, सर्व काही तीच मॅनेज करत होती. प्रीतीच्या नजरेतही कौतुकाची छटा तरळली. प्रीतीला तशाही कर्तबगार स्त्रिया फार आवडतात.

”जाम मालदार पार्टी झालीस गं तू ..” रोहितने तिला हसत हसत कोपरखळी दिली.

”मग कॉलेजमधल्या कोणाच्या टचमध्ये आहेस तू?” रोहितने तिला विचारलं, तेव्हा, ”नाही रे. फारसं कोणीच नाही.” एवढंच मोघम उत्तर आलं.

रोहितला भारतात आल्यापासून फारसं कोणीच भेटलं नव्हतं. मध्ये एकदा अवी फेसबुकवर सापडला पण फारसं बोलणं झालं नाही. त्याच्या बोलण्यात फक्त एकच शॉकिंग बातमी रोहितला कळली होती की, श्री आणि अरू अ‍ॅक्सिडेन्टमध्ये आठ वर्षांपूर्वी गेले. कदाचित अरूचा विषय टाळायचा असेल मनूला किंवा तिला ते दुःख अजून त्रास देत असावं. रोहितच्या मनात विचार चमकून गेला. अरू आणि मनू बालपणापासून एकत्र होत्या. अरूचं आणि श्रीचं लग्न या सर्व ग्रुपने एकत्र अटेंड केलं होतं. त्यानंतर ग्रुप जो पांगला तो परत एकत्र असा येऊच शकला नाही. अर्थात करिअरमुळे सर्व दूर झाले आणि ते स्वाभाविक होतं. पहिले काही दिवस फोन आणि मेल्सवर टचमध्ये होते. पण हळूहळू तेही कमी होत बंदच झालं.

बोलता बोलता दीड कधी वाजला ते कळलंही नाही त्यांना.

”आई भूकू”नीलच्या आवाजाने तिघांच्या गप्पा तिथेच थांबल्या. मानसीने तिच्या मेडला ताटं घ्यायला सांगितली.

कोणी येणार आहे की सुरवात करायची… लगेच प्रीतीच्या सूचक वाक्यावर ‘नाही आता कोणीच नाही’ असं म्हणून मनूने मेडच्या मदतीने वाढणं सुरूही केलं. सगळाच मेनू छान होता. जेवण झाल्यावर डेझर्टही मुलांना लक्षात ठेवून खास चॉकलेट फ्लेवरचं होतं. मनू खरंच उत्तम होस्ट होती. निघताना स्वराच्या हातात खूप वेगळ्या प्रकारची कंपास बॉक्स आणि एक पुस्तक देत तिने स्वतःचं वेगळेपण पुन्हा सिद्ध केलं. कुठलंही इंपोर्टेड खेळणं न देता पुस्तक आणि खूप खणांचं कंपास विथ मिरर. स्वरा प्रचंड खूष झाली होती. निघायला तयारच नव्हती होत. शेवट पुन्हा लवकर नीलला भेटण्याच्या प्रॉमिसवर स्वारी शेवटी निघाली. घरी परतल्यावर स्वरा लगेच झोपूनही गेली. रोहित लॅपटॉप उघडून इम्पॉर्टन्ट मेल्स चेक करत बसला. त्याच्या कंपनीने नुकतीच एक इंडियन कंपनी विकत घेतली होती. त्याच्या संदर्भात बरंच वर्कलोड वाढलं होतं. प्रीतीचंही काही रुटीन काम चालू होतं.

”तुला काही जाणवलं का रे? या मानसीचा नवरा काय करतो? त्याच्याविषयी एक चकार शब्द निघाला नाही आज? …तिच्या घरी कोण असतं त्या दोघांशिवाय त्याचा काही पत्ताच लागला नाही.” प्रीतीच्या या वक्तव्यावर त्याने लॅपटॉपवरची नजर काढून तिच्याकडे वळवली. खरं तर त्यालाही हा प्रश्न विचारायचा होता. पण गप्पांच्या ओघात राहूनच गेलं ते.

”गेला असेल गं कुठेतरी बाहेर टूरवर वगैरे किंवा इंडियाच्या बाहेरच असेल. खरं तर त्याच्याही मनात आता उत्सुकता वाढली. हा विषय कसा राहिला बुवा आपल्या गप्पांत.”

”तिच्या घराच्या पाटीवर पण तिचंच नाव होतं.” प्रीतीच्या या वाक्यावर मात्र त्याने तिला हटकलं.. ”काय वकिलीणबाई, आजकाल किती बायका लग्नानंतर पण स्वतःचं नाव बदलत नाहीत, आणि असेल घर तिच्या एकटीच्या नावावर घेतलेलं, फॉर फायनान्शिअल मॅटर्स.”

”हं.. तेही खरंच म्हणा” प्रीती उद््गारली. तशी प्रीती ही गॉसिप गर्ल कधीच नव्हती. पण तिचं लक्ष मात्र चौफेर असायचं.

त्या दिवसानंतर नील आणि स्वरामध्ये घट्ट गट्टी जुळली. दोघं रोज संध्याकाळी एकत्र खेळायला जायचे. कधी स्वरा त्याच्याकडे तर कधी तो यांच्या घरी खेळायला यायचा. प्रचंड व्यग्र वेळापत्रकामुळे मोठी लोकं मात्र एकमेकांकडे फारशी येऊ नाही शकली. प्रीतीची इच्छा खूप होती, मानसीला आणि तिच्या कुटुंबाला एकदा जेवायला बोलवायची पण योग काही जुळत नव्हता. नील आणि स्वरा मात्र दोन्ही घरी छानच रुळले होते.
असेच एका सुट्टीच्या दिवशी दोघे सकाळी स्वराच्या खोलीत खेळत होते. रेवतीची हॉलमध्ये काहीतरी साफसफाई चालू होती. अचानक रेवतीने प्रीतीला विचारलं, ”हा त्या रेगे मॅडमचा मुलगा ना हो ताई?” प्रीतीने हो म्हणण्याआधीच तिचं पुढचं पालुपद चालूही झालं.
”किती गोड पोरगं आहे बिच्चारं.”

”अगं, बिच्चारा काय?” प्रीती हसून म्हणाली.

”अहो वैनी, तुम्हाला माहीत नाही या सोसायटीच्या गोष्टी. तुम्ही नवीन आहात इथे. बिनबापाचं पोर आहे ते. तुम्ही पाहिलं नाही का, फ्लॅटपण रेगे मॅडमच्या नावावर आहे.”
”अगं काहीतरी काय बोलतेस तू. इंडियाच्या बाहेर असेल तिचा नवरा. उगाच कोणाविषयी भलतंसलतं बोलू नये गं.” प्रीती थोडी वैतागूनच बोलली.

”आता त्यांच्या घरी कामाला असते ती सरला माझ्या थोरल्या जावेची बहीण. मॅडम इथे आल्यापासून आहे त्यांच्या घरी. तिने पण कधी पाहिलं नाही मॅडमच्या मिष्टरांना इतक्या वर्षांत. मॅडमचे ओळखीचे खूप येतात जातात घरी पण नातेवाईक कोणीच नाहीत त्यांना. म्हणायला एक आजोबा येतात वर्षातून एकदा, ते पण नीलच्या वाढदिवसाला. त्यांना पण मॅडम काका म्हणतात. काय या मोठ्या लोकांच्या गोष्टी काय कळत नाही बुवा.”

”प्रीती, तुझा फोन वाजतो आहे…” रोहित बाहेर येत बोलला. त्याच्या कपाळावरची आठी स्पष्ट दिसत होती. खरं तर तीही गॉसिपना कधीच थारा द्यायची नाही. पण अचानक विषय निघाल्यामुळे रेवतीला थोडी ढील मिळाली.

प्रीती काही न बोलता आत वळली. रोहितच्या आईचा कॉल होता. संडेला बहुतेक करून सासू-सुनेचा सकाळी वीकली अपडेटचा लाँग कॉल असायचाच. त्यात दीड तास कसा गेला ते कळलंच नाही प्रीतीला. नील खेळून घरी गेला आणि रविवार असल्याने रेवती पण अर्धा दिवस काम करून निघून गेली आणि तो विषय तसाच सुटला. त्याच आठवड्यात स्वराची गणिताची वही संपली म्हणून झोपण्याआधी प्रीती तिची नवीन वही तयार करत होती. वहीच्या कव्हरवर नाव टाकताना अचानक स्वराने विचारलं ममा, माझं नाव ‘स्वरा प्रीती सामंत’ का नाही? नील कसा त्याच्या मम्माचं नाव लावतो, नील मानसी रेगे म्हणून?

प्रीतीची आणि रोहितची नजरानजर झाली.

”सोन्या, काही जण मम्माचं नाव लावतात, काही जण डॅडीचं. आता नीलची ममा पण तिचंच नाव लावतं, म्हणून नील तिचं नाव लावतो आणि आपली ममा माझं नाव लावते. मग तुम्ही दोघी मॅचिंग मॅचिंग होता ना.” स्वरा ओठांचा चंबू करून ऐकत होती. बहुतेक हे लॉजिक तिला पटलं असावं कारण अजून काही प्रश्न आले नाहीत परत.

”मला वाटतं मी एकदा मनूशी बोलायला हवं. काय चॅलेंज आहे तिचं ते तर बघू.” रोहित रात्री झोपताना उद््गारला.

”खरं आहे, माझ्याही मनात होतं तुला सुचवावं म्हणून, तू बोल तिच्याशी. हवं तर एकटाच भेट तिला. मग मोकळेपणाने बोलता येईल तुम्हाला…” प्रीती समजूतदारपणे म्हणाली.

”नको, तू पण राहा बरोबर. तुला ऑकवर्ड परिस्थिती छान हाताळता येते आणि मनूला आता तू नवीन नाहीस. माझ्यापेक्षा जास्त तुम्ही एकमेकांच्या संपर्कात आहात आता.” रोहित म्हणाला.

दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून प्रीतीने लंच टाइम बघून मानसीला कॉल केला.

”हाय, कशी आहेस? या रविवारचा काय प्रोग्रॅम आहे तुझा?”
”एकदम फ्री आहे. तू जेवायला बोलावणार असशील तर फिश कर मात्र. तुम्हा सारस्वतांची फिश करी खाऊन जमाना झाला. रोहितच्या आईकडे बरेचदा खाल्लेली आम्ही.” मानसी मोकळेपणे हसत हसत म्हणाली. प्रीतीला हसायलाच आलं. किती मोकळी मुलगी आहे ही. रविवारचा बेत पक्का करून आणि इतर अवांतर गप्पा मारून दोघींनी फोन ठेवला.

आठवडा भर्रकन गेला. शनिवारी प्रीतीने जाऊन नीलसाठी त्याच्या आवडीचा माऊथ ऑर्गन विकत घेतला. रविवारी सकाळी नील लवकरच आला खेळायला. तो आणि स्वरा तिच्या खोलीत खेळायलाही लागले. स्वराने त्याला खेळता खेळता त्याच्यासाठी एक सरप्राईज आणलं आहे हे गुपित फोडून टाकलं.
साधारण अकराच्या सुमारास बेल वाजली. स्वरा दार उघडून हाय आंटी म्हणून परत आत पळून गेली. मानसी, सुंदरसा निळ्या रंगाचा शॉर्ट कुर्ता आणि त्याखाली हॅरेम घालून आली होती. खूपच ग्रेसफुल दिसत होती. हातात एक छोटं रोपटं होतं आणि खांद्याला कॉटनची एक छानशी पिशवी होती.

रोहितकडे बघत हसत म्हणाली… ”बघ, तुझ्या बायकोला आवडतं ना म्हणून निशिगंधेचं रोपटं आणलं आहे.”
”अरे तुझ्या लक्षात किती राहतं गं…” प्रीती खर्‍या कौतुकाने म्हणाली.
”ये बस. रेवती हे रोपटं जरा बाल्कनीत ठेव ना.”

रेवती लिंबू सरबताचे ग्लास ठेवलेला ट्रे घेऊन बाहेर आली. प्रीतीच्या हातातलं रोपटं घेऊन ती बाल्कनीच्या दिशेने वळणार तोच मानसी स्वतःच उठत म्हणाली, ”मीच लावते गं ते, तू फक्त मला एक मोठीशी कुंडी दाखव असेल तर.”

आणि उत्तराची वाट न पाहता बाल्कनीत जाऊन रेवतीच्या मदतीने रोपटं लावून मोकळीही झाली. रेवतीने मग लगबगीने तिला वॉश बेसिनवर नेलं आणि नॅपकिन हातात तयार ठेवला.

सगळं उरकून ती परत येऊन आरामात सोफ्यावर बसली.
”एकदम नमुना आहेस तू. जरा पण नाही बदललीस. तिने केलं असतं ना. रोहित हसत म्हणाला.”
”अरे, ही झाडं पण मुलांसारखीच असतात. त्यांना पण माया कळते. आपण मायेने एकदा कुरवाळलं की कशी फुलतात बघ आनंदाने…” मनू नाक उडवत म्हणाली.

तिघांच्या मग हळूहळू गप्पा रंगल्या. रेवती मधूनमधून फिश टिक्का, हराभरा कबाब असे पदार्थ आणून समोर ठेवत होती. गप्पांच्या नादात प्लेट्स पण भराभर संपत होत्या.

प्रीतीने लक्षात ठेवून जेवायला मानसीच्या आवडीचा सगळा मेनू फिशचा ठेवला होता. जेवण आणि मागचं सर्व आटोपून रेवतीची प्रीतीने पिटाळणी केली. मुलंही दुपारी सोसायटीच्या हॉलमध्ये मुलांचे काही गेम्स होते, तिथे खेळायला गेली. आता हे तिघंच निवांत बोलत बसले.
रोहितला मुद्द्यावर कसं यायचे ते जरा अवघड जात होतं. नाही म्हटलं तरी विषय नाजूक होता.

थोडासा घसा साफ करत शेवटी त्याने सुरुवात केलीच… ”मनू… बरं झालं तू मोकळी भेटलीस. कधीपासून तुला काही विचारायचं होतं…”
मनूच्या चेहऱ्यावर मंद स्मित उमटलं. त्यात बरेच भाव होते.

”मला माहीतच होतं रोही, तू मला विचारणार ते. आणि खूप स्वाभाविक पण आहे ते. खरं तर मीच तुला सांगणार होते, पण आपण नेहमीच घाईत असायचो, त्यामुळे विषयाला तोंड कधी फुटलंच नाही…” मानसी स्वतःहूनच म्हणाली.

साहजिकच रोहित आणि प्रीतीने काही न बोलता आता श्रोत्यांची भूमिका घेतली.

”तुला नीलविषयीच बोलायचं आहे ना. त्याचे वडील कोण, तो माझं नाव का लावतो, माझे नातेवाईक इकडे का दिसत नाहीत? बरेच प्रश्न असणार तुझ्या मनात.” मानसी एका क्षणासाठी थांबली. जणू ती शब्दांची जुळवाजुळव करत होती.

”तुला अरू आणि श्रीच्या अ‍ॅक्सिडेंटविषयी कळलेच असेल ना?”
रोहितच्या चेहऱ्यावर एक आश्चर्याची छटा उमटली. त्यांच्या अ‍ॅक्सिडेंटचा याच्याशी काय संबंध?

”हो काही महिन्यांपूर्वीच कळलं मला. अवीकडून कळलं.”
”तुला कळणार कसं म्हणा? तू तर आमच्याशी अजिबात टचमध्ये नव्हतास. दोष नाही देत आहे रे. पण या मधल्या काळात बरीच उलथापालथ झाली इथे.. नील, अरू आणि श्रीचा बायोलॉजिकल मुलगा.”

आता मात्र रोहितचे डोळे विस्फारले. ती काय म्हणते आहे हेच त्याला आकलन होईना. प्रीती मुकाटपणे सगळे ऐकत होती. जणू ती त्या खोलीत नव्हतीच.

”सांगते तुला सगळं. अरू आणि श्रीचं लग्न तसं श्रीच्या घरच्यांना पसंत नव्हतंच. पण लग्न केलं म्हणून त्यांनी श्री साठी अरूबरोबर तोंडदेखले संबंध ठेवले. पण खानदानी व्यवसायामध्ये त्याला घेतलं नाही. श्रीही मग अरूबरोबर स्वतःहून वेगळा झाला. त्यांनी भाड्याने घर घेतलं. त्याचे आईवडील अतिशय नाखूष होते. त्यांनी अरूलाच सगळ्यासाठी जबाबदार धरलं.. आणि ती वेडी पण स्वतःला दोष द्यायची.

श्रीने मग अरूला जॉब करायला भाग पाडलं, घरात रिकामी बसण्यापेक्षा थोडी बाहेर पडेल या हेतूने. मला मात्र नेहमी कॉल करून अरूच्या टचमध्ये राहायला सांगायचा. त्या काळी मी माझे ड्रीम करिअर परस्यू करत होते, डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग. तसा माझा अरूबरोबर पण नेहमी कॉन्टॅक्ट नसायचा. श्रीने स्वतःचा नवीन बिजिनेस काढला होता. त्यांचे खरंच स्ट्रगलिंग दिवस होते. दोन वर्षं कशी गेली कळलंच नाही.
आणि एके दिवशी मला अरू आणि श्री संध्याकाळी भेटायला आले. दोघांनीही परस्पर बाबांना सांगून मला जेवायला बाहेर नेण्याचा प्लॅन केला होता. दोघं अतिशय खूष दिसत होते. हॉटेलमध्ये बसल्या क्षणी मला घट्ट मिठी मारत अरूने मी मावशी होण्याची बातमी मला दिली. आम्ही दोघी तर आनंदाने रडायलाच लागलो. श्री आम्हाला चिडवत होता, की हॉटेलचा स्टाफ मला मारणार, दोन सुंदर मुलींना रडवलं म्हणून.

त्यानंतर मात्र मी नियमितपणे अरूला भेटायची. तिची आई आजारीच होती पहिल्यापासून. त्या काळात तर तिचं आजारपण बळावलंच होतं. त्यामुळे अरूचे सगळे लाड, डॉक्टरच्या अपॉईंटमेंट्स श्री बरोबर मी सांभाळायची. काय झालं निश्चित कळलंच नाही, पण सहाव्या महिन्यात अरूला काही कॉम्प्लिकेशन्स आली आणि तिचं अबॉर्शन झालं. सासरहून एकही जण तिचं सांत्वन करायला आले नाहीत. अरू प्रचंड डिप्रेस झाली होती.

मी, तिचे बाबा व श्री इतकेच जण तिला सांभाळायला होतो. त्यात थोड्या महिन्यांत अरूची आई दीर्घ आजाराने वारली. श्री आणि अरूने खूप विनंती करूनही अरूच्या बाबांनी त्यांच्या घरी राहायला जायला नकार दिला. तिचे सासरचे काय बोलतील ही भीती असावी त्यांना बहुतेक.
काही काळ लोटला. अरू थोडी थोडी सावरायला लागली होती. त्यात एके दिवशी अचानक रात्री अरूचे सासरे आणि धाकटा दीर (श्री चा छोटा भाऊ) त्यांच्या घरी आले. त्यांना म्हणे बिझिनेसमध्ये तोटा आला होता व घर मॉर्गेज करायचं होतं म्हणून श्री ची पॉवर ऑफ अ‍ॅटर्नीसाठी सही घ्यायला आले होते. काही न बोलता श्री ने सांगितल्या ठिकाणी मुकाट सही केली. जुजबी बोलून ते निघून गेले.

श्री त्या दिवशी मात्र खूप अपसेट झाला होता. त्यांचं वडिलोपार्जित घर विकून तिथे बिल्डिंग बांधण्याचा त्याच्या घरच्यांचा मनसुबा त्याला त्याच काळात त्याच्या बिल्डर मित्राकडून कळाला होता. श्रीला दुःख घर जाण्यापेक्षा त्यांनी खोटं बोलल्याचं झालं. ती लोकं जर खरं बोलली असती तरी मी कुठे अप्पांना नाही म्हणणार होतो, असं त्याचं म्हणणं. त्यानंतर श्री ने स्वतःला बिझिनेसमध्ये झोकून दिलं. या सर्वांत अरू अधिकाधिक खचत गेली.

मध्ये काही एक्झिबिशनसाठी मी पुण्याला गेले होते, तेव्हा मला अवी अचानक भेटला. आम्ही ऑलमोस्ट ३ वर्षांनी भेटत होतो. मला बघून तो एकदम आश्चर्यचकित झाला होता. कॉलेजपेक्षा माझ्यात खूपच सुखद बदल झाला आहे असं त्याचं म्हणणं होतं. आम्ही खूप गप्पा मारल्या. अरू आणि श्रीविषयी ऐकून तोही जरा अपसेट झाला होता. लवकरच भेटण्याचं प्रॉमिस देऊन आम्ही परत निघालो. त्यानंतर अवीचे मला नियमित फोन असायचे. तो नोकरीनिमित्त पुण्यात सेटल झाला होता. पण सतत फिरतीवर असायचा..

अरू आणि श्रीही माझ्यामुळे त्याच्या परत कॉन्टॅक्टमध्ये आले होते. माझं शिक्षण संपलं होतं आणि मी एका प्रसिद्ध डिझायनिंग हॉऊसमध्ये असिस्टंट म्हणून लागले होते.

अशात परत एकदा अरूकडे गुड न्यूज आहे असं कळलं. या वेळी तिने काळजी घेणं आवश्यक होतं. श्रीचा बिझिनेस पण चांगला चालायला लागला होता. अरू मनातून काहीशी पहिल्या अनुभवाने घाबरलेलीच होती. त्यामुळे तिचं देव-देव करणं, देवळांना भेटी देणं हळूहळू वाढत चाललं होतं. त्यात ती हल्ली एका साध्वीच्या नादी लागू लागली होती. खरं तर मला आणि श्री ला हे अजिबात पटत नव्हतं, पण केवळ अरूला बरं वाटतं म्हणून आम्ही तिला फारसं अडवत नव्हतो.”

मनूने हळुवार पाणी ग्लासात ओतून ते प्यायलं. बराच काळ नॉन स्टॉप बोलत होती ती. रोहित आणि प्रीती एकदम शांत बसले होते. जणू ते या काळात नव्हतेच. मनूच्या बरोबर भूतकाळात गेले होते. मनूने ब्रेकनंतर जिथे गोष्ट सोडली होती तिथूनच परत चालू केली.

”त्याच काळात घरच्यांना माझ्या लग्नाचे वेध लागले होते. बाबांनी मला विचारलं पण, माझ्या मनात कोणी आहे का ते. पण तोपर्यंत माझंही काही निश्चित नव्हतं, म्हणून मी त्यांना तसं काही नाही म्हणून सांगितलं. यथावकाश दोन-तीन स्थळं बघण्याचा कार्यक्रम झाला. पण काही ना काही कारणाने योग जुळला नाही. अशात एका सेमिनारच्या निमित्ताने अवी मुंबईत आला होता. आल्या आल्या त्याने मला कॉल केला आणि आम्ही अरू आणि श्रीच्या घरी भेटायचं निश्चित केलं. संध्याकाळी आम्ही चौघंही बाहेरच जेवलो. मनसोक्त गप्पा मारल्या. तुम्हा सर्वांची आवर्जून आठवण काढली. निघता निघता खूप लेट झाला म्हणून अवीने मला घरी सोडण्याची जबाबदारी घेतली. त्याला कंपनीची कार होती. परतीच्या मार्गी काही ध्यानीमनी नसताना अचानक अवीने मला लग्नासाठी प्रपोज केलं आणि मी एकदम मूक झाले. याच मागणीची मी कॉलेजमध्ये चातकासारखी वाट पाहिली होती. पण या अचानक प्रस्तावावर काय बोलावं ते सुचलंच नाही. त्याने माझी मनःस्थिती जाणली असावी बहुतेक. म्हणूनच त्याने मला विचार करून कळवं असं सुचवलं.

दुसऱ्या दिवशी ही बातमी अरूशी प्रथम शेअर केली. ती प्रचंड आनंदित झाली. अवी असे काही सुचवेल असे तिला कधीपासून वाटत होते. अरू आणि श्रीने मला अवी मला कसा योग्य आहे हे समजावण्याचा जणू विडाच उचलला त्यानंतर. मग मात्र मीही विचार केला की काय वाईट आहे. तो करिअरमध्ये सेटल झाला होता. मराठी भाषिक होता आणि मला खूप चांगला जाणत होता.

अरू आणि श्रीने घरी येऊन बाबांनाही या प्रस्तावाची माहिती दिली. आई-बाबांचीही काही आडकाठी नव्हती. मग मी आणि अवी राजरोस भेटायला लागलो.

आणि अशातच एके दिवशी अचानक श्रीचा रडक्या आवाजातला फोन आला. काही न बोलता सुरभी प्रसूतिगृहात ये म्हणून सांगून फोन ठेवलाही. मी सर्व काम सोडून तिकडे धावले. अरूची अवस्था एकदम वाईट होती. पोटात प्रचंड कळा येत होत्या. डॉक्टरांनी सर्व इमर्जन्सीचे सोपस्कार करून तिला ऑपेरेशन टेबल वर घेतलं. २-३ तासांनी तिला बाहेर आणण्यात आलं. डॉक्टर फक्त तिलाच वाचवू शकले. तीही क्रिटिकल अवस्थेतच होती. श्री खूप कोलमडून गेला. तिला पूर्ववत यायला जवळजवळ पंधरा दिवसांचा काळ गेला. पण ती परत आई कधीच होऊ शकणार नव्हती.

या काळात अवीला अचानक परदेशाची टूर आली आणि त्याला घाईत एच१ व्हिसा वर जावं लागलं. जाताना मात्र सगळ्यांना वेळ काढून भेटून गेला. बाबांनी त्याला परत आल्यावर त्याच्या आई-वडिलांना भेटून आमच्या लग्नाची बोलणी करण्याचा मनसुबा व्यक्त केला. त्यानेही त्यावर तत्काळ त्याच्या घरचा नंबर देऊन तेही कधीपासून वाट पाहत आहेत हे सांगितलं. बाबांना निर्धास्त करून अवी निघून गेला.

त्याच्या जाण्याने मला मात्र खूप पोकळी जाणवायला लागली होती. अरू तिच्या दुःखातून बाहेरच पडत नव्हती. श्रीही फार अबोल झाला होता. मी तो काळ पूर्णपणे माझ्या नवीन जॉबसाठी देऊन टाकला. खूप लवकरच मला यश मिळू लागलं. अवीचा मात्र नियमित कॉन्टॅक्ट असायचा. तो आवर्जून अरू आणि श्री ची चौकशी करायचा. याच काळात मला एका कामानिमित्त सांगलीला जावं लागलं. अवीचे आई-वडील पण तिथेच स्थायिक होते. अवीच्या आग्रहावरून मी मुद्दाम त्यांना भेटून आले. दोघांनीही माझं छान स्वागत केलं. आग्रहाने जेवायला ठेवून घेतलं. पण ते थोडे पुरातन रीती बाळगून असल्याचं मला जाणवलं. अवी त्यांच्या मानाने बराच पुढारलेल्या विचारांचा होता. कदाचित बारा गावी फिरल्यामुळे विचारसरणी बदलली असावी त्याची. निघताना त्याच्या आईने कुंकू लावून मला नवीन ड्रेसचा पीस दिला. मीही आमच्या घरी येण्याचं आमंत्रण दिलं, पण त्यावर मात्र तुझ्या वडिलांनी बोलावल्याशिवाय आम्ही येऊ शकत नाही असं त्याच्या वडिलांनी ठणकावून उत्तर दिलं. मी मग त्यांचा काही न बोलता हसून निरोप घेतला.

परत येऊन बाबांना न बोलता अवीच्या कानावर सर्व वृत्तांत तपशीलवार घातला. त्याने मला अजिबात काळजी न करता सर्व त्याच्यावर सोपवावं असं सुचवलं. काही काळ मी थोडी अस्वस्थ झाले खरी, पण लग्नसंबंधात या गोष्टी कॉमन असतात असा विचार करून गप्प राहिले.

या सगळ्याचा अरूला काही थांगपत्ताच नव्हता. मी सांगलीला गेले होते हे पण तिला कळलं नाही, इतकी ती तिच्या दुःखी विश्वात बुडाली होती. दुष्काळात तेरावा महिना म्हणून की काय याच काळात ती त्या साध्वी मातेच्या पूर्ण आहारी गेली होती. उपासतापास, व्रत वैकल्य, आणि त्या साध्वीची रोजची प्रवचनं यातच तिचा पूर्ण वेळ जायचा. श्रीही हळूहळू या सर्वाला वैतागला होता. पण कोणालाच यातून मार्ग काही सुचत नव्हता.
एके दिवशी मीच त्यांना विचारांती सुचवलं, की त्यांनी एक बाळ दत्तक घ्यावं. श्रीने या प्रस्तावावर आडकाठी दर्शवली नाही, पण अरू एकदम गप्प झाली. तिच्या मनात काय होतं हे कळणं त्या काळी खूपच कठीण होतं. म्हणून त्या दोघांना विचार करायला वेळ देऊन मी घरी परत आले. २-३ दिवसांनी मला अरूने काही महत्त्वाचं बोलण्यासाठी घरी बोलावलं. खूप काळाने अरूने स्वतःहून मला फोन केला होता. माझ्या घरच्यांना उशिरा येणार असे कळवून मी तिच्या घरी पोहचले. श्री पण घरीच होता. अरूने डायरेक्ट विषयाला हात घातला. ती एकदम उत्तेजित झाल्यासारखी दिसत होती.

‘मला तुझा दत्तक घेण्याचा प्रस्ताव मुळीच रुचला नाही मनू. खूप वाईटही वाटलं. मला माझं स्वतःचं बाळ हवं आहे. दुसऱ्याचं बाळ मी माझं म्हणून स्वीकारू नाही शकत…’

मला खरं तर धक्का होता तो. पण वाईट स्थितीत कोण कसा निर्णय घेतं याच्या बऱ्या-वाईटाचा निकष तिसऱ्याने लावू नये, या ठाम मताची मी होते. मग काय ठरवलं आहेस तू? तिचं बोलणं तिथंच संपलं नव्हतं हे मला तिच्या उत्साहावरून जाणवलं होतं.

‘मी सरोगसीचा विचार करते आहे. आज-काल हे खूप कॉमन आहे. आमच्यासारख्या जोडप्यानं जर मूल होऊच शकणार नाही असं मेडिकल टर्म्समध्ये डिक्लेअर केलं तर आम्ही हा मार्ग चोखाळू शकतो. मी याची माहिती काढली आहे खूप.’

‘अगं पण सांगोवांगीची माहिती आहे की कुठे अधिकृतपणे मिळवली आहेस?’ माझा धास्तावून प्रश्न गेला.

‘तीच काढायला हवी. मी डॉक्टर शहांची अपॉइंटमेंट घेतली आहे. ते या गोष्टीत तज्ज्ञ आहेत.’ इतका वेळ गप्प असलेला श्री पहिल्यांदाच बोलला. त्याच्या बोलण्यावरून मला जाणवलं की तोही या नवीन प्रस्तावात सामील आहे.

त्यांची अपॉइंटमेंट दोन आठवड्यांनंतरची होती. त्या काळात अरूत खूप बदल जाणवला. घर खूप नीट सांभाळू लागली. मला नियमित कॉल करायची. ती खूपच उत्सुक होती. जणू तिला तिचे आयुष्य नव्याने जगायची पुन्हा एकदा संधी मिळाली असावी. मी या सर्व घडामोडी अवीच्या कानी घालत होते.

त्यालाही अरूची प्रचंड काळजी वाटत होती.

ठरल्या दिवशी दोघेही डॉक्टरकडे जाऊन आले. मी उत्सुकतेने संध्याकाळी श्रीला कॉल केला. तो मीटिंगमध्ये बिझी होता. पण तो त्या संदर्भात वकिलाची अपॉइंटमेंट घेणार म्हणाला आणि मनात पाल चुकचुकली. वकिलाचा या गोष्टीत काय संबंध हे कळलं नाही. पण मग मी विचार केला, सर्व माहिती मिळाल्यावर दोघं मला सांगतीलच. घाई कशाला करायची?

वीकेंडपर्यंत काहीच न कळल्यामुळे मी त्यांच्या घरी गेले. दोघंही घरी होते. घरी एकदम सुतक्यासारखं वातावरण होतं. अरू खूप रडलेली असावी. चेहरा, डोळे सुजल्यासारखे वाटत होते. दोघे बराच वेळ बसूनही काहीच बोलेनात, तेव्हा मीच कोंडी फोडली.

‘काय झालं ते सांगाल की नाही? मी कधीची तुमच्या फोनची वाट पाहत होते. काय ठरलं तुमचं?’

‘आम्ही तो विचार सोडून दिला, मनू. ते होणे शक्य नाही.’ श्रीचं बोलत होता. अरू तर नुसतीच शून्यात नजर लावून बसली होती.

डॉक्टर म्हणत आहेत की आमची पार्श्वभूमी लक्षात घेता आम्ही सरोगसीचा पर्याय निश्चित निवडू शकतो. पण वकिलांना भेटल्यावर त्यातला फोलपणा लक्षात आला. कायद्याप्रमाणे जी सरोगेट आई असते ती कायद्याने त्या गर्भाची, म्हणजेच मुलाची आई असते. जर तिने नंतर विचार बदलला तर आपले बीज ती आपल्याला द्यायला नकार देऊ शकते. म्हणजे नऊ महिने वाट पाहून, एवढी आशा लावून जर ती बाई उद्या फिरली तर होणारा मनस्ताप कोण सहन करणार? आजकाल सख्ख्यांची शाश्वती देता येत नाही, तर या परक्या स्त्रीची खात्री कोण देणार मनू? हताशपणे श्री बोलत होता.

वकील म्हणाले कोणी ओळखीतील स्त्री असेल तर बघा. पण आता आमच्या नात्यात कोणी अशी विधवा किंवा परित्यक्ता नाही जी हे आमच्यासाठी करू शकेल.

मी अवाक होते. त्यांची ही शेवटची आशाही जवळजवळ नष्ट झाली होती. फारसं काही न बोलता मी घरी आले. पण दुसऱ्याच दिवशी अरूने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने मला आणि बाबांना हॉस्पिटलला धावावं लागलं. अरू खूप खचली होती. डोळ्याखाली काळी वर्तुळं, सुजलेला चेहरा, भकास नजर, अगदीच रया करून घेतली होती तिने स्वतःची. आता मात्र मला तिच्याविषयी खूप काळजी वाटू लागली होती. श्री एकदम वेडापिसा झाला होता. तिला भेटून मी रात्री घरी आले, पण झोप कशी ती लागलीच नाही. अख्खी रात्र विचारात तळमळत घालवली. अरूसाठी मी काहीही करू शकत होते. पण मला तिला या अवस्थेतून बाहेर काढायचं होतं आणि सकाळ होईपर्यंत माझा विचार पक्का झाला.

अरू पूर्ववत ठीक होऊन घरी येईपर्यंत मी तिच्याबरोबर सावलीसारखी राहिले. तिच्या मनात नैराश्य येऊ नये म्हणून ती घरी आल्यावर मी श्रीला सांगून लोणावळ्याला एक सहल काढली. त्या दोघांबरोबर मीही गेले होते, आणि श्रीला पण माझा मानसिक आधार वाटत होता.
लोणावळ्याला मी त्यांच्यापुढे माझा प्रस्ताव मांडला. मी त्या दोघांच्या बाळाची सरोगेट आई होण्याची तयारी दाखवली. मी खूप विचारांती हा निर्णय घेतला होता.

‘चल, काहीतरी काय बोलतेस तू मनू. भावनेच्या भरात जाऊन काही पण विचार करू नकोस. तुझं अजून लग्न व्हायचं आहे. पूर्ण भविष्याचा प्रश्न आहे तुझ्या.’ मला थांबवत अरू बोलली. खरं तर मला वाटलं होतं अरू आनंदी होईल. पण ती माझं काही ऐकायलाच तयार होईना.

‘श्री, तिला वेड लागलं आहे. मला याविषयी काही ऐकायचं नाही आहे. हा विषय इथेच संपला.’ अरू ठाम आवाजात बोलत होती. श्री गप्प होता.
‘श्री…’ मी श्रीशी काही बोलण्याआधीच त्याने तोंडावर बोट ठेवलं.
‘श श …काही बोलू नकोस. तू हा विचार केलास हेच खूप आहे. अवीचा विचार केलास का पण?’

‘अरे.. यात वावगंं काय आहे श्री.. तुमचं बाळ हे माझं कोणी नाही का? अरूवर मी बहिणीपेक्षा अधिक प्रेम केलं आहे आणि यात मी काही अनैतिक वागत नाही आहे, अवीने आक्षेप घ्यायला. तोही समजूतदार आहे. मी बोलेन त्याच्याशी. तसंही आमचं लग्न होईपर्यंत अजून एक – दीड वर्ष जाईल. हां..जर तुमचा माझ्यावर पण विश्वास नसेल तर गोष्ट वेगळी..’

वैतागून माझ्याकडे बघत श्रीने नकारार्थी मान हलवली. पण मीही मनात ठाण मांडूनच बसले होते. त्या दोघांचा होकार घेऊनच मी तिथून निघणार होते.

दोन दिवस माझ्याशी हुज्जत घालून शेवटी माझ्या प्रस्तावावर विचार करण्याचं वचन त्यांच्याकडून मी मिळवलं.
घरी परत गेल्यावर मी पहिली त्या डॉक्टरांची भेट घेतली. त्यांना मी तयार असल्याचं कळवलं. त्यांनीही माझं बौद्धिक घेण्याचा प्रयत्न केला. पण मी माझ्या विचारावर ठाम असल्याचं पाहून त्यांनी शेवटी हार मानली आणि श्रीला कॉल केला.
आता मात्र श्री हबकला होता. माझ्या निर्णयाची गंभीरता त्याच्या लक्षात आली.

त्याच संध्याकाळी अरू आणि श्री दोघे रात्री नऊ वाजता माझ्या घरी आले बाबांना भेटायला. हा नवीन डावपेच मला जरा अवघड गेला. कारण मी आमच्या घरी काहीच सूतोवाच केलं नव्हतं.

‘मूर्ख आहेस तू. अक्कल गहाण ठेवलीस की काय?’ प्रचंड वैतागून बाबांनी त्या दोघांच्या समोरच माझी यथेच्छ हजेरी घेतली. पण जसजसे त्यांचे नकार येत होते, तसतसा माझा निर्णय अधिकाधिक ठाम होत होता.
असं काही केलंस तर माझ्याशी संबंध संपला म्हणून समज.. बाबांनी शेवटचं हत्यार काढलं.

पुढचा अख्खा आठवडा आमच्या घरी कोणीच कोणाशी बोलत नव्हतं. आईने तर अरूशी मैत्री सोडून दे हाही घोषा लावला. याच काळात नेमकं अवीचं प्रोजेक्ट शेवटच्या स्टेजला आलं. त्यामुळे त्याचे कॉल्स खूप कमी झाले होते. झाले तरी मोघम बोलून तो फोन ठेवायचा. त्याच्या या काळात त्याला फुकटचं टेन्शन मला द्यायचं नव्हतं. आणि अवी माझ्या कुठल्याही निर्णयात माझ्या ठाम बाजूला असणार हा माझा पूर्ण विश्वास होता, त्यातून अरू आणि श्री संदर्भातलं काही असेल तर विचार करायची पण आवश्यकता नव्हती.

जितके जास्त दिवस जातील तितका पुढच्या प्रक्रियेला वेळ लागणार होता. उगाच वेळ काढत बसणारी मी नव्हतेच पहिल्यापासून. एकतर मला अरूला तिचं बाळ लवकर द्यायचं होतं आणि दुसरं असं की यातून मोकळी झाले की मी माझं अवीबरोबर आयुष्य सुरू करू शकणार होते.”
आता मात्र मनू थोडी थांबली. दुःखाची एक झालर तिच्या नजरेत तरळली होती.

‘आपण बरेच वेळा उत्साहात आपल्या जवळच्या लोकांना गृहीत धरतो, आणि ती चूक आहे हे कळेपर्यंत वेळ निघून गेलेली असते..’ मनू हे बहुधा स्वतःशीच बोलत होती. कारण त्यानंतर ती थोडा वेळ गप्प बसली.

”त्रास होत असेल तर नंतर बोलू.” तिच्या खांद्यावर हात ठेवत प्रीती हळूच बोलली. प्रीतीने कॉफीचे मग भरून आणले होते.

”नाही गं, खूप दिवसांनी मोकळी होते आहे. बराच निचरा होता डोक्यात. एकदा काढला की मी पण मोकळी होईन..” थोडी क्षीण हसत मानसी बोलली.

वाफाळलेल्या कॉफीचा एक घोट घेत ती पुनः बोलू लागली.

एका सकाळी निर्णय घेऊन मी बाबांच्या पाया पडले. त्यांना सांगितलं मी अरू आणि श्री च्या घरी राहायला जात आहे. मोजके कपडे आणि स्वतःची सगळी कागदपत्रं घेऊन मी बाहेर पडले. मी घरून बाहेर पडताना हा काहीच काळाचा दुरावा आहे या विश्वासात होते. एक तर अवी परत आला की तो माझ्या बाजूने उभा राहणार आणि आमचं लग्न झालं की घरचे या सगळ्या गोष्टी विसरूनही जाणार हा विश्वास होता मनात. पण विधिलिखित वेगळंच होतं. अरू आणि श्री मला बघून गोंधळून गेले होते. मी घर सोडून येईन हे त्यांना कधीच वाटलं नव्हतं. शेवटी अरूने हार मानली. तिच्या डोळ्यात क्षीण हसू होतं. त्यात खूप भाव होते असं मला वाटलं. एक अंधुकशी आशा, आणि माझ्याविषयी कृतज्ञता दोन्हीचं मिश्रण होतं.

त्याच आठवड्यात त्या दोघांना घेऊन मी डॉक्टरकडे पुढची ट्रीटमेंट सुरू करण्यासाठी गेले. योग्य कालावधीनंतर तो छोटा अंश माझ्या उदरात सरकवण्यात आला. मी माझी खूप काळजी घेत होते. योग्य तो आहार, चांगलं वाचन, नियमित झोप सर्वच दक्षतेने करत होते.

नाही म्हणायला अरू आणि श्री पण उत्साही झाले होते. आशा ही जीवनासाठी किती आवश्यक असते, याचं प्रत्यंतर त्या दोघांकडे बघून येत होतं. दोघंही माझी अतोनात काळजी घेत होते. सगळे काही छान चालू होतं आणि अवीचा फोन आला…

”मनू एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी. मी मुंबईत येत आहे पुढच्या आठवड्यात. माझं प्रोजेक्ट पूर्ण झालं आहे. एवढेच नाही तर आई-बाबा पण येत आहेत तुझ्या घरच्यांना भेटायला. मीच सांगितले त्यांना. मी कदाचित परत जाईन ५-६ महिन्यांत. त्याच्या आत बोलणी करून लग्न करून घेऊ म्हणून सुचवलं. तू घरी जरा बोलून ठेव बाबांशी. अरू आणि श्री ला पण सांग. एका दमात अवी सगळं बोलून गेला.

मी इकडे सुन्न होते. ही कलाटणी मिळेल असं मला वाटलंच नव्हतं. आता अवीला मी गप्प आहे ते जाणवलं होतं बहुतेक. त्याला वाटलं, मी भेटायला गेले तेव्हा त्याच्या वडिलांचं बोलणं अजून माझ्या मनातून गेलं नाही.

‘अगं राणी, काळजी करू नकोस. मी बोललो बाबांशी, थोड्या जुन्या विचारांचे आहेत ते. पण मुलाच्या आनंदापुढे त्यांना कुठलेही रीतिरिवाज मोठे नाहीत.’ मला समजावण्याच्या सुरात अवी बोलत होता.

‘अवी, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. खरं तर तुला आधीच सांगायला हवं होतं, पण तू खूपच बिझी होतास. तुला अंधारात ठेवून मला काही नव्हतं करायचं, पण …. ” मी हळूहळू त्याला सर्व वृत्तांत तपशीलवार सांगितला. मी घाई करण्याचं कारणही सांगितलं.

अवी खूप शांत झाला होता. त्याची काहीच प्रतिक्रिया नव्हती. माझं बोलणं झालं तरी तो काही बोलला नाही.

‘मनू, तू माझ्याशी तरी डिस्कस करायला हवं होतंस, इतका मोठा निर्णय घेताना. मी असा डिसिजन एकट्याने कधीच नसता घेतला. मी पण तुझ्या आयुष्याचा महत्त्वाचा घटक आहे हे तू विसरून गेलीस. एनीवे मला आता आई-बाबांशी बोलायला हवं. त्यांनी टिकेट्स बुक करण्याच्या आधी थांबवतो त्यांना. चल बाय…’ अवीने फोन कट केला.

मी एकदम सुन्न झाले होते. मला त्याचा कल काय आहे तेही कळलं नव्हतं. अचानक सगळी दुनिया फिरल्यासारखं वाटलं. त्याने मला माझी तब्येत कशी आहे तेही विचारलं नाही फोन ठेवण्यापूर्वी. की मीच त्याच्याकडून जास्त समजूतदारपणाची अपेक्षा करत होते. त्यालाही अचानक हा बदल स्वीकारायला मी वेळ देणं आवश्यक होते ना? विचारांचं काहूर मनात उठलं होतं.

अरू आणि श्रीला यातलं काही सांगायचं नाही असं ठरवून मी झोपून गेले. पण माझं काही तरी बिनसलं आहे हे त्या दोघांना स्वाभाविकच कळलं. शारीरिक बदलामुळे होणारा मानसिक त्रास असेल असं धरून दोघं माझी आणखीनच काळजी घ्यायला लागले.

त्याच्या पुढच्या आठवड्यातच अवीच्या वडिलांचा मला फोन आला. ते प्रचंड संतापले होते. मी अवीची फसवणूक केली आहे हे त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं आणि पुन्हा अवीला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला तर पोलिसात जाऊ अशी काहीशी धमकी देऊन त्यांनी फोन बंद केला. अरू या वेळ माझ्या शेजारीच बसलेली असल्याने तिच्यापासून ही घटना लपून राहू नाही शकली. तिने तत्काळ श्रीला फोन करून बोलावून घेतलं. दोघंही या नवीन कलाटणीमुळे प्रचंड अस्वस्थ झाले होते. श्रीने अवीला फोन लावायचा प्रयत्न केला पण त्याचा फोन ‘संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे’ असंच येत होतं.

काही झालं तरी अवी मुंबईत आल्यावर मला भेटायला येईल हा माझा अजूनही विश्वास होता. पण श्री आणि अरू मात्र थोडे घाबरले होते. त्यांना जी भीती वाटत होती तीच साकार तर होणार नाही या विचाराने दोघंही हबकून गेले होते.

हळूहळू दिवस पालटत गेले. अवीचा कॉलही नाही आणि तो आलाही नाही. मी त्याच्या भारतातल्या ऑफिसला कॉल केला तेव्हा तो रजेवर असून त्याच्या गावी गेला आहे असं सांगितलं. काहीशा सांशक मनानेच मी त्याच्या घरी कॉल केला, तेव्हा त्याच्या आईने फोन घेतला. माझं नाव घेताच तिने फोन कट करून टाकला. आता मात्र मी पूर्ण हताश झाले होते. अवीच्या बाबतीतला माझा अंदाज पूर्ण चुकला होता याची मला खात्री झाली. अचानक सर्व गणितच चुकलं हे जाणवलं. अवीशिवायच्या आयुष्याच्या मी विचारही केला नव्हता. ती रात्र मी कशी काढली ते माझं मलाच माहीत. सकाळी अरूने सहज मला नाश्ता देताना अवीचा विषय काढायचा प्रयत्न केला. तेव्हा मात्र पाषाण सुरात ‘तो अध्याय संपला आता अरू..’ एवढं बोलून मी माझ्या खोलीत निघून गेले. अरू आणि श्री प्रचंड अस्वस्थ झाले होते. या सगळ्या परिस्थितीला ते स्वतःलाच जबाबदार मनात होते.

मला जवळजवळ नववा महिना लागला होता.

डॉक्टरांनी दिलेली तारीख जवळ आली होती. मी भविष्याच्या विचारांनी घाबरून गेले होते. बाळ जन्माला आल्यावर मी कुठे राहू, हा प्रश्न आता मला सतावू लागला होता. काही झालं तरी बाळात आणि अरूत नातं निर्माण होण्यासाठी मी या घरातून बाहेर पडणं आवश्यक होतं, इतके कळण्याइतकी मी सुज्ञ होते.

हळूहळू मी रोज न्यूज पेपर मधून मुंबई बाहेरच्या जॉब अपॉर्च्युनिटीज शोधू लागले. आता अधूनमधून काका म्हणजे अरूच्या वडिलांच्याही फेऱ्या सुरू झाल्या. पण घरात एक विचित्र पोकळी होती. अरू खूप अस्वस्थ होत चालली होती. तिची तिच्या साध्वीला भेट देण्याची इच्छा परत बळावू लागली होती. पण या नाजूक अवस्थेत मला एकटीला सोडायला आता श्री तयार नव्हता. तशातच एक दिवशी मला सकाळी प्रसूतिवेदना सुरू झाल्या. श्री आणि अरूने मला ताबडतोब प्रसूतिगृहात नेलं. दोन-तीन तासांतच बाळाचा जन्म झाला. एका क्षणात आमचं विश्व बदललं होतं. त्या निरागस जिवाने जणू सारे तणाव दूर पळवून लावले. काकांना इतकं आनंदी मी कधीच पहिलं नव्हतं.

डॉक्टरांनी मला तीन दिवसांनी घरी जाऊ शकाल असं सांगितलं.

घरी… कुठल्या… कोणाच्या. माझ्या मनातले विचार जणू अरूने वाचले.

‘आपण आपल्या घरी जाणार मनू. तुझ्याशी कधीपासून बोलायचे म्हणत होते. पण या तणावांत काय आणि कसं हेच सुचत नव्हतं. आता नील आला आणि सगळेच मार्ग सुरळीत दिसायला लागले. तू कुठेही जाणार नाहीस आता. आपल्याच घरी तू कायम रहायचं. तुझे पुढचे काही वेगळे प्लॅन होत नाहीत तोपर्यंत आपले बाळ आपण दोघी मिळून वाढवू आणि तू कधीही भविष्यात नवीन आयुष्य सुरू केलंस तरी माझं घर हे तुझं कायमचं माहेर राहील. माझ्या केसांत मायेने हात फिरवत ती बोलत होती. तिचा प्रत्येक शब्द तिच्या हृदयातून निघाल्याचं मला जाणवत होतं आणि माझ्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या.

माझे अश्रू आपल्या हाताने पुसत तिने विचारलं… अगं हो..नील नाव आवडलं ना तुला.. काही वेगळे ठरवलं असशील तर
सांग गं.

तिचा हात हलकेच दाबत मी म्हणाले ..नील.. इतकं सुंदर नाव मला सुचलंच नसतं.

आणि हो..आजची संध्याकाळ जरा सांभाळून घेशील का? मी जरा घर तुम्हा दोघांच्यासाठी डेकोरेट करण्याचं म्हणते आहे. आणि संध्याकाळी जरा साध्वी माँच्या पण पाया पडून येऊ आम्ही दोघं. एकदा नील घरी आला की इतक्यात काही बाहेर नाही पडता येणार मग. चालेल ना गं?
अगं माझी काहीच हरकत नाही. पण त्यांचा आश्रम दूर आहे ना गं. जाण्या येण्यातच पाच-सहा तास जातील. उगाच रात्री ड्रायविंग कशाला करता? आता माझा काळजीचा स्वर लागला.

काळजी नको करूस गं. सवयीचा रस्ता आहे तो. थोडा वेळ मी आणि थोडा वेळ श्री, आळीपाळीने चालवू. मग कोणा एकाला दमायला पण होणार नाही. आश्वासक शब्दात अरू बोलत होती. खरं तर मला हे साध्वी प्रकरण अजिबात पटत नसे. पण माझ्या मधल्या गोंधळांत अरूचं जाणं पुढे ढकललं होतं. एकदा ती साध्वीकडे जाऊन आली की मनाने शांत होईल, या एकाच आशेने मी मूक संमती दर्शविली.

आणि तसेही बाबा आहेतच काही लागलं तर. नीलचे संध्याकाळचे कपडे मी आत्ताच आणून ठेवले आहेत. उद्या सकाळी मी परत ड्युटीवर हजर होईन ना… मिस्कील हसत अरू बोलली. खूप काळाने तिला अशी हसरी मिस्कील पाहिली. कुठेतरी आत सर्व घडी सुरळीत बसत चालल्याची सुखद जाणीव झाली.

अरू गेली.. तिची आणि माझी आयुष्यातली ती शेवटचीच भेट असेल असं मला आधी माहीत असतं तर तिच्याशी मनातल्या साऱ्या गोष्टी बोलून घेतल्या असत्या,. आधी तिला जाऊच दिलं नसतं.

पण… आता मनूच्या घशात आवंढा आला. तिने समोरच्या ग्लासमधलं पाणी हळुवार प्यायलं. बहुधा ती शब्द जुळवत असावी. दुसऱ्याच दिवशी ती भयानक बातमी काकांना मिळाली. हायवे वर कुठल्या तरी ट्रकचा बॅलन्स जाऊन त्याने अरूच्या गाडीला ठोकरलं. दोघेही ऑन द स्पॉट गेले. नियती माझ्याशी काय भयानक खेळ खेळत होती. एका दिवसात परत जग उलथंपालथं होऊन गेलं होतं. माझी तर अवस्था वेडीपिशी झाली होती. सगळेच रस्ते बंद पडले होते.

हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन मी, आमच्या म्हणजे अरू आणि श्रीच्या घरी आले. काकांनी फार धैर्याने साऱ्या गोष्टी केल्या. कोणाच्या तरी हाती हॉस्पिटलची फीज पाठवून दिली. ते स्वतः, अरू आणि श्रीच्या शेवटच्या विधींमुळे मला घ्यायला येऊ शकले नाहीत. बातमी कळल्यावर श्रीच्या घरचे स्मशानभूमीत जाऊन परस्पर घरी गेले.

पोरी…आपल्याला हे बाळ श्रीच्या घरच्यांना सुपूर्द करायला हवं, शेवटी त्यांच्या घराण्याचा वंशज आहे तो… घसा खाकरत काका बोलले. आणि तुझ्या भविष्याच्या दृष्टीने पण हे योग्य आहे. अख्खं आयुष्य काढायचे आहे तुला. ते दोघं असते तर गोष्ट वेगळी होती. कधीही सुटी होऊ शकली असतीस. एकटीने दोन जिवांचा गाडा ओढणं खूप कठीण आहे या जगात.

मी शून्य नजरेने सारं ऐकत होते. एक हात नीलच्या छातीवर होता. त्याची चिमुकली स्पंदने अचानक वाढली असं उगाच वाटून गेलं. पण कुठल्याही गोष्टीवर स्वतःचं मत मांडण्याची पण माझी मनःस्थिती नव्हती. त्या संध्याकाळी काका मला घेऊन श्रीच्या घरी गेले. छोटा नील कदाचित आता कायमचा दुरावणार या कल्पनेनेच मी अर्धमेली झाले होते. तिथे गेल्यावर मात्र जगातल्या माणुसकीवरचा माझा विश्वास पुरता उडाला.

त्यांनी नील त्यांचा वंशज आहे हे मानायला पुरता नकार दिला. कुठलेही कागदी पुरावे त्यांना ग्राह्य नव्हते. नीलच्या कोवळ्या चेहऱ्याकडे पाहूनही त्यांना पाझर नाही फुटला. खूप वादावादी झाली. काकांनी त्यांना समजावण्याचे सारे प्रयत्न व्यर्थ ठरले. सरते शेवटी जेव्हा त्यांनी माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा काकांचा राग अनावर झाला. त्यांच्याशी बोलण्यात काही हशील नाही हे मला पुरतं कळून चुकलं होतं. कसंबसं काकांना शांत करून मी त्या लोकांचं परत तोंड न पाहण्याचा निर्णय घेऊन तिथून काढता पाय घेतला.

आता मात्र माझ्यात एक वेगळीच शक्ती संचारली होती. माणसाच्या सगळ्या बाह्य आशा नष्ट झाल्या की तो स्वतःच्या आंतरिक ऊर्जेवरच स्वतःला तारून न्यायचा प्रयत्न करतो. तिथून परत आल्यावर मी हळूहळू स्वतःला माणसात आणलं. खूप काळ कुढत राहून माझं भागणार नव्हतं आता.

प्रथम गरज होती ती उदरनिर्वाहाची. मधल्या काही काळामध्ये माझं नाव माझ्या सर्कलमध्ये उगाच बदनाम झालं होतं. काही समाजचिंतकांनी माझ्याविषयी कारण नसताना वाईट गोष्टी पिकवल्याने आता मला मुंबईत लोकांच्या कुत्सित नजरा झेलाव्या लागल्या असत्या. मी नीलला घेऊन मुंबईबाहेर जायचं ठरवलं.

एके दिवशी ध्यानीमनी नसताना मला माझ्या एका जुन्या क्लायंटचे मेल आले. तिच्यासाठी मी काही डिझाइनर क्लॉथ्स स्वतः करून दिले होते एका इव्हेंटला. तिला पुण्याला एक बुटिक काढायचं होतं आणि मी त्यात इच्छुक आहे का असा तिचा प्रश्न होता. काहीही विलंब न करता माझा होकार मी तिला कळवून टाकला. त्या घरात माझं असं काही नव्हतंच. त्यामुळे माझे जुजबी सामान, नीलचं सारंं सामान आणि अरू आणि श्रीचे काही विरळे फोटो एवढंच सामान मी माझ्याबरोबर नेण्यासाठी बॅगेत भरलं. बाकी सर्व सामान भरून श्रीच्या घरी पाठवून दिलं. त्यांना हवं तर ते ठेवतील नाही तर फेकतील आणि तशीही नीलच्या पुढच्या आयुष्याची तजवीज करायला मी समर्थ होतेच.

काका मला पुण्यात सेटल करून द्यायला आले. आम्ही या सोसायटीतच एक भाड्याने ब्लॉक घेतला. नीलसाठी बेबी सीटिंगची सोय पहिली आणि मी कामाला सुरवात केली. सुरवात केली म्हणण्यापेक्षा झोकून दिलं हे म्हणणं जास्त योग्य ठरेल. काही काळातच रेवाचं नाव पुण्यात प्रसिद्ध झालं. पुण्याबाहेरहूनही आम्हाला ऑर्डर्स यायला लागल्या. रेवाचे भांडवल वसूल होऊन ते वर्षातच स्वतःची वेगळी बिल्डिंग बांधण्याइतकं मोठं झालं. बघता बघता दोन अडीच वर्षं कशी गेली कळलंच नाहीत. सुरवातीला दर महिन्याला फेरी टाकणारे काका तब्येतीच्या कुरबुरींमुळे हळूहळू पाच-सहा महिन्यांतून एक फेरी टाकायला लागले. मी त्यांना माझ्या घरी शिफ्ट होण्याचा केलेला आग्रह मात्र व्यर्थ ठरला. ते थोडे जुन्या मतांचे होते. त्यांना मुलींच्या घरी जाऊन राहणं अजिबात रुचत नव्हतं. अरूच्या घरी तरी ते कुठे राहायला कधी आले होते?

नील आता शिशुवर्गात जायला लागला होता. मी माझ्या आयुष्यात पूर्ण सेटल झाले होते. रेवाच्या प्रचंड यशानंतर मी दुसरीकडे जाऊ नये म्हणून मला अनंतिकाने फिफ्टी पर्सेंट पार्टनरशिप दिली. आता मागे बघण्याचं काही कारण उरलं नव्हतं. नाही म्हणायला नीलच्या वडिलांविषयी अधूनमधून होणाऱ्या चौकशा सुरवातीला अस्वस्थ करून सोडायच्या. पण हळूहळू मला त्याचीही सवय झाली. नीलच्या शाळेच्या अ‍ॅडमिशनच्या वेळी मी एक कठीण निर्णय घेऊन टाकला. नील यापुढे फक्त माझे नाव लावणार होता. सगळ्याच चौकश्यांचा मी सोक्षमोक्ष लावायचं ठरवलं होतं आणि यात कोणी आडकाठी घेणारं नव्हतंच.

त्यातच हा फ्लॅट विकायला काढल्याचं मला कळलं. प्रथम तो मालक एका सिंगल मदरला फ्लॅट विकायला तयार होईल का ही शंका मला होती. नशिबाने मी काही वर्षं इथेच राहत असल्याने बरेच हितचिंतक मिळवले होते. ते सर्व माझ्या बाजूने त्या मालकाशी बोलले आणि फ्लॅट माझ्या ताब्यात आला. काका खूप खूष झाले होते.

कधी नव्हे ते आई-बाबांची मला प्रचंड आठवण आली. पण त्यांच्या जगात आता मला स्थान नव्हतं हे पूर्ण माहीत असल्याने ती कळ तशी हृदयात दडवून मी पुढचा मार्ग धरला.

त्यानंतर मी मागे वळून पाहिलं नाही. यशाची शिखरं एकामागून एक पादाक्रांत करत मी रेवा, पुण्याचा नंबर वन ब्रँड बनवला. तशातच अनंतिकाला अमेरिकेला सेटल व्हायला लागलं. त्यामुळे तिचा रेवामधला शेअर तिने मला विकला. आता मी रेवाची सर्वेसर्वा झाले. रेवा आता ऑनलाईन पण प्रसिद्ध झालं होतं.

हळूहळू वेस्टर्न क्लॉथसाठी एक नवीन ब्रँड काढण्याचं माझ्या मनात बळावू लागलं आणि मी त्यासाठी योग्य जागा शोधू लागले. त्या जागेसंदर्भात फिरताना माझी गाठ अचानक अवीशी पडली. अचानक सामोरे आल्याने काय बोलावं तेच सुचेना. पण आश्चर्य म्हणजे मला वाटलं तितकी मी अस्वस्थ नाही झाले. त्याला शांतपणे समोरच्याच रेस्टोरंटमध्ये कॉफीसाठी येतोस का विचारलं. तोही आढेवेढे न घेता यायला तयार झाला. कॉफी पिता पिता मी त्याला माझ्या तिथे येण्याचं कारण सांगितले. रेवा माझ्या मालकीचं आहे हे ऐकून मात्र तो स्तंभित झाला होता. बोलता बोलता त्याने अरू आणि श्री विषयी त्याला कळल्याचं सांगितलं. अरू, श्री विषयी बऱ्याच काळाने कोणी तरी आत्मीयतेने बोलत होतं. माझा चेहरा अचानक बदलला.

माझा हात हातात घेत अवी म्हणाला.. ‘ती बातमी कळली आणि मी तातडीने मुंबईला आलो तुला भेटायला. पण तू मागे कसलाच थांग ना ठेवता तिकडून नाहीशी झालीस. तुला मी खूप शोधायचा प्रयत्न केला मनू. तुझ्या घरी पण गेलो. पण तिथे तर पारच निराशा झाली.’

हं…ठीक आहे रे. जे होते ते चांगल्यासाठीच. नाही तर मला गरज असताना तू माझ्याकडे तशी पाठ फिरवली नसतीस. त्या वेळी तुला कॉन्टॅक्ट करायचे मी किती प्रयत्न केले.. मी हलके हसत त्याला कोपरखळी दिली.

काय म्हणते आहेस तू मनू? मी तुझ्याकडे पाठ फिरवली? तुझ्या फोननंतर मला जाणवलं की या लग्नाला माझे घरचे कधीच संमती देणार नाहीत. पण तुला सोडून राहणं मला शक्य नव्हतं. शेवटचा प्रयत्न म्हणून इंडियात परत आल्यावर मी घरी जाऊन त्यांच्याशी बोलायचं ठरवलं. तुला डायरेक्ट घरी येऊन सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं. पण विधिलिखित काही वेगळंच होतं. घरी गेलो आणि माझं आणि बाबांचं खूप मोठं भांडण झालं. त्यातच बाबांना हार्ट अटॅक आला. खूप क्रिटिकल स्थिती होती त्यांची. पाच दिवस आयसीयूमध्ये राहिल्यावर त्यांना अजून एक अटॅक आला, जो ते झेपवू नाही शकले. ते गेले आणि त्यांच्या मृत्यूला मी स्वतःला जबाबदार धरलं. आईने पण माझ्याशी बोलणं सोडलं. मी त्यंत खचून गेलो होतो.

अवी बोलत होता आणि मी दिङ््मूढ होऊन दुसरी बाजू ऐकत होते. अचानक त्याच्याविषयीच्या कीवेने मन भरून गेलं. किती सहन केलं होतं त्याने, आणि तेही काही चूक नसताना..

सर्व विधी आटोपून मी नोकरीवर रुजू झालो. बऱ्याच काळाने मी माणसांत आलो होतो. पहिल्याच दिवशी लंच ब्रेकमध्ये मेल्स चेक केली आणि त्यात ऋषीचे मेल होते. अरू आणि श्री विषयी कळवण्यासाठी त्याने मेल पाठवले होते. इंडियात आल्यावर माझा नंबर बदलला असल्याने मला कोणालाच कॉन्टॅक्ट करणं शक्य झालं नव्हतं. आणि मी अचानक भानावर आलो. तुझी काय परिस्थिती झाली असेल या विचारानेच अस्वस्थ झालो. मागचा पुढचा विचार न करता गाडी काढली आणि मुंबईला आलो… आणि तेव्हापासून जे तुला शोधतो आहे ते आजपर्यंत. अवीने एक उसासा सोडला. त्याचं बोलून संपलं होतं आणि मला अचानक नीलची आठवण झाली. आज त्याची बेबी सीटिंगवाली बाहेर जाणार होती. मला त्याला जाऊन घेणं आवश्यक होतं.

अवीला माझे कार्ड देत मी तिथून काढता पाय घेतला. त्या रात्री मात्र बिछान्यात शांत झोप लागली. एक गुंतलेला धागा आज सुटला होता. आता जाणण्यासारखं अथवा हळहळण्यासारखं काही मागे राहिलं नव्हतं. सगळं गणित कसं नीट सुटलं होतं. मी तृप्त झाले होते. अवीच्या दुःखाने नाही पण आयुष्यातलं ते एक सुंदर पर्व आता सुंदर आठवण म्हणूनच मी बाळगू शकणार होते म्हणून. त्या आठवणींचे सारे सल गेले होते म्हणून..

त्या नंतर अवी बरेच वेळा घरी आला. मी त्याच्या आयुष्याविषयी एका अवाक्षराने त्याला मात्र कधी विचारलं नाही. मला त्याची खरंच कधी गरजच भासली नाही. आम्ही भेटायचो तेव्हा बुटिक आणि बिझिनेसच्याच गप्पा व्हायच्या, हे त्याला हळूहळू जाणवायला लागलं. मी परत एकदा माझ्या व्यापात गुंतायला लागले. मेघना… माझ्या नवीन बुटिकची जागा निश्चित झाली. त्यानंतरचे दिवस एकदम धावपळीचे होते. मेघनाचे डेकोरेशन, त्याच्या लीगल प्रोसिजर्स, त्याचे कारागीर, नवीन सेल्स स्टाफ …मी गळ्यापर्यंत कामात बुडाले. आणि उरलेल्या वेळेवर नीलची सत्ता असायची.

अवीकडे तसं दुर्लक्षच होऊ लागलं. कदाचित हा बदल त्याला अपेक्षित नसावा. त्याचे फोन पण बऱ्याच वेळा नंतर कॉल करते म्हणत मी घाईघाईत बंद केले, आणि तो नंतर काही उगवायचाच नाही.

आणि एके रविवारी तो सकाळीच घरी न सांगता सावरता आला. नशिबाने माझे इतर काही विशेष प्लॅन्स नव्हते.
मानसी.. मी मुद्दाम आलो आहे सकाळी.. तेही सुट्टीच्या दिवशी.. तू थोडी मोकळी असशील आणि आपल्याला जरा भविष्याविषयी बोलता येईल स्पष्टपणे.

अवी गंभीर असला की मला नेहमी मानसी म्हणायचा. मी आतून एकदम शांत होते. तो काय बोलणार आहे याची पुरती कल्पना आली होती मला आतापर्यंत. त्याला अजून कसं कळलं नव्हतं की मी या सगळ्याच्या आता पलीकडे गेली आहे. मला या बंधाची, नात्याची आता ओढच वाटत नव्हती. अवी हा माझ्या आयुष्यातला एक सुंदर सोनेरी भूतकाळ होता, हृदयाच्या कोपऱ्यात ठेवलेला. आता ती सुगंधी कुपी उघडून परत तिचा वास घ्यावा अशी मुळी इच्छाच होत नव्हती.

थोडं थांब अवी.. मी काय बोलते ते नीट ऐक. तू काय सुचवत आहेस ते मला कळत आहे, पण आता परतीची वाट मी कधीच बंद केली. माझ्या आयुष्याने आता वेगळीच दिशा धरली आहे. त्यात आता कुठलीही नवीन गुंतवणूक किंवा जबाबदारी मला नकोच आहे.
अगं.. पण नवीन काय आहे ? आपण एकमेकांना नवीन नाही आहोत. आणि उरला नील, तर त्यालाही वडिलांची गरज आहेच ना. अवी मला समजावण्याचा प्रयत्न करत होता.

मी संयमित हसत नकारार्थी मान डोलावली.

अहं ..नीलचं सगळं करायला त्याची आई समर्थ आहे. त्याला आता कोणाचीच गरज नाही आणि मलाही. माझा आवाज एकदम ठाम होता.
अवीच्या डोळ्यात एकदम काळोख दाटून आला. मी आता कायमची दुरावले याची जाणीव त्याला स्पष्ट झाली. दोष कोणाचाच नव्हता. मी माझ्या आयुष्यात समाधानी होते, इतकंच सत्य होतं.

त्या दिवशी अवी जो गेला, तो परत एकदाच भेटायला आला. तो परत इंडिया सोडून इटलीला चालला होता. आता अवी परत येणार नाही हे मला जाणवलं. त्याला एक घट्ट मिठी मारून मी त्याचा निरोप घेतला. आयुष्यात त्याला आंतरिक समाधान मिळावं ही मात्र एकच इच्छा आता मनात उरली होती आणि आहे …”

मनूचं बोलून संपलं होतं. मी आणि प्रीती एकदम भारावलेल्या अवस्थेत होतो. बऱ्याच कोड्यांची उत्तरं एका दिवसात मिळाली होती. आणि तरीही मन संभ्रमित होतं.. मनुसारख्या स्वयंशक्तीना प्रणाम करावा की त्यांच्या विचारसरणी जपाव्यात हे ठरवणं कठीण होतं.

– चारूशीला सिंग
charukulsingh@yahoo.co.in

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.