Now Reading
माधव मनोहर व्यासंगाचा ‘पंचम’ स्वर

माधव मनोहर व्यासंगाचा ‘पंचम’ स्वर

Menaka Prakashan

‘शिवाजी पार्क, तिसरा रस्ता- दादर’ या परिसराचं माझ्या जडणघडणीत एक वेगळंच स्थान आहे. आरंभीच ‘शंकर निवास’मध्ये विख्यात संगीतकार सुधीर फडके- अगदी समोर- यशवंत देव! तेही शब्द-स्वरांचे देव, आणि देवांच्या शेजारच्या म्हणाव्या अशा इमारतीत वाचनाचं, व्यासंगाचं गुरुकुल प्रा. माधव मनोहर!

‘सोबत’ या साप्ताहिकाची वैचारिक सोबत वाटण्याचे ते दिवस. मी त्यातलं ‘पंचम’ हे माधव मनोहरांचं नियमित लेखन वाचत असे. अनेक कारणांनी हे लेखन आवडत असे. एक तर त्यातली विस्तृत व सडेतोड विचार मांडण्याची संवाद शैली. पाश्‍चात्त्य लेखकाच्या मूळ कथाबीजावरून- मराठीत आणलेले, पण श्रेय न मान्य केलेल्या लेखनाची उभी-आडवी हजेरी माधव मनोहर घेत असत. विख्यात नाटककारांचे उतारेच्या उतारे माधवराव मूळ इंग्रजी नाटकातल्या उतार्‍यासह देत असत. साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेले लेखकही माधव मनोहर यांच्या तीव्र दृष्टीतून सुटत नसत. मग पुढचे काही आठवडे वादच वाद! अशा वैचारिक वादांची सवयच नव्हे, तर चटक लागलेला मी एक महाविद्यालयीन वाचक होतो.
‘माधव मनोहर’ या नावाचा मराठी साहित्यात प्रचंड दबदबा निर्माण झाला होता तो त्यांच्या निर्भीड समीक्षेमुळेच. त्यांची फिरकी घेऊ शकण्याची हिंमत फक्त ‘ठणठणपाळ’ करत असे. वसंत सरवटे यांनी तर माधव मनोहर यांचंच व्यक्तिचित्र समोर ठेवून, ‘ठणठणपाळ’ला गोड चेहरा दिला होता. म्हणूनच माधव मनोहरला भेटण्याची उत्सुकता होती. अर्थात ते कसं जमेल, याची साशंकता होतीच.

मी ग्रंथालयात माधव मनोहरांची इतर काही पुस्तकं मिळतात का ते पाहू लागलो. पण होत्या त्या अनुवादित कादंबर्‍या. त्याही एक-दोन. ‘दौरा’ ही त्याच दरम्यानची नाटकातल्या दौर्‍याविषयीची एक कादंबरी. एक अनुवाद क्रमशः ‘कागी’ या कादंबरीचा, ‘किल्ली’ या नावानं येत होता. पण माधव मनोहरांच्या अशा प्रकारच्या लेखनाचा मी चाहता नव्हतो. खरं म्हणजे त्या प्रकारच्या त्यांच्या लेखनाशी माझे सूर जमले नाहीत. मी ‘पंचम’कार माधव मनोहरांचाच चाहता वाचक होतो. पुढे वाचलेल्या साहित्यात या नावाचे व त्या नावाच्या दरार्‍याचे अनेक संदर्भ येत गेले. ‘ललित’मध्ये ‘ठणठणपाळ’ तर बहुतेक लेखकांमध्ये माधव मनोहरांची फिरकी घेत असे. ‘साहित्यातला पोलिस’ असंही बिरुद ‘ठणठणपाळ’नं माधव मनोहरांना दिलं. माधव मनोहरांनी विजय तेंडुलकर, वसंत कानेटकर इतकंच काय पु.लं.नाही आपल्या लेखणीनं ठोकून काढलं होतं. व्यंकटेश माडगूळकरांच्या ‘सत्तांतर’ या कादंबरीचाही त्यांनी स-चित्र पंचनामा केला होता. हे वाचतानाच माधव मनोहर यांच्याविषयी प्रचंड कुतूहल जागं झालं. तशात ठाकरे-बेहेरे वादात शिवाजी पार्कला उडालेली रणधुमाळी. ‘सेनापती की शेणापती’ या वादात उडालेला गदारोळ आणि ग. वा. बेहेरेंना झालेल्या धक्काबुक्कीत माधव मनोहरांनी त्यांना दिलेला जाहीर आधार. या सर्व घटनांचा मी एक जागरूक युवक वाचक म्हणून साक्षीदार होतो.

तशात ठाणे मराठी ग्रंथालयानं माधव मनोहरांचं जाहीर व्याख्यानच आयोजित केलं. मी पहिली रांग धरून असायचो. त्याच वेळी मी प्रथम माधव मनोहरांना पाहिलं.
आजही त्यांचं पहिलं दर्शन मूर्तिमंत समोर आहे. मराठी वाटू नये अशी सहा फूट उंची, स्वच्छ धोतर, संपूर्ण टक्कल, गोल चेहरा, बारीक डोळे (ज्यांची आचार्य अत्रेंनीही फिरकी घेतली होती) आणि गांभीर्यातही जाणवणारी तेजस्विता.
माधव मनोहरांनी अजिबात प्रास्ताविक पाल्हाळ न लावता विषयाला केलेला आरंभ आणि अस्खलित मराठीत विषयाचं केलेलं विश्‍लेषण, आधुनिक मराठी नाटकातल्या मूळ पाश्‍चात्त्य आधाराचा, त्यांच्या आवडीचा परखड विजय असल्यानं तो तेवढाच मजेशीर झाला. डिकन्स, शॉ, हेमिंग्वे अशा अनेक भारतीयेतर लेखकांचे संदर्भ मला पूर्ण नवे होते. खरं तर सारं भाषणच माझ्या दृष्टीनं खजिना होता. मी प्रथमदर्शनीच माधव मनोहर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, त्यांच्या करारीपणाच्या, अस्खलित भाषेच्या प्रेमात पडलो.

इथवर मीही महाविद्यालयात पोचलो होतो. पदवी व पदव्युत्तर परीक्षेलाही मराठी विषय प्रमुख घेऊन धडपड चालली होती. मनात एक ध्यास होता. एवढ्या प्रचंड वाचनसमृद्ध माणसाशी माझी केवळ पुस्तकी भेट नको; त्यांचा प्रत्यक्ष सहवास मला लाभेल का? पण ते कसं शक्य होतं? विश्‍वभाषेचे व्यासंगी आणि मराठीतले गाढे समीक्षक, कादंबरीकार, प्राध्यापक, स्पष्टवक्ते माधव मनोहर यांचा भल्याभल्यांना धाक होता न् त्यांच्यासमोर कुठल्याही प्रकारे समोर जाणं म्हणजे तपोवनातल्या डेरेदार वृक्षापुढे पालापाचोळ्यानं मिरवण्यासारखं होतं.
माझ्या मर्यादांचं मला जसं भान होतं, तशी माझ्या साधकपणाची व साधनेतल्या जिद्दीचीही मला खात्री होतीच की!
मी त्यांचा पत्ता मिळवून बेधडकपणे त्यांना पत्र पाठवलं आणि त्यांना लिहिलं, ‘मला आपल्याला प्रत्यक्ष भेटायचंय. प्रत्यक्ष भेटीतच मला काही विनंती करायची आहे. कृपया वेळ द्या.’
त्या काळात पत्र दोन-तीन दिवसांत मिळायची आणि उत्तरंही तेवढ्याच दिवसांत. मी पत्र लिहिल्यापासून अवघ्या चार-पाच दिवसांत एक आंतरदेशीय पत्र घरी येऊन धडकलं.
उघडण्यापूर्वीच जाणवलं ते रेखीव मोहोरदार अक्षर! प्रेषकाच्या रकान्यात ‘माधव मनोहर’ ही स्वाक्षरी आणि पुढे पत्ता.
उत्सुकतेनं पत्र उघडलं.
दीड-दोन ओळीतच लिहलं होतं- ‘रविवारी दुपारी एक वाजता या.’ खाली स्वाक्षरी. बाकी कुठलाच मजकूर नाही.
इतक्या मोजकेपणाची मला सवय नव्हती. व्याख्यानातून पाहिलेले, ऐकलेले व ‘पंचम’मधून वाचलेले माधव मनोहर यांनी तत्परतेनं वेळ दिली याचा आनंद मोठा होता.
‘शिवाजी पार्क- तिसरा रस्ता’ या दादरच्या पत्त्यावर मी अगदी- नेमक्या वेळी पोचलो.
दरवाजा माधवरावांनी उघडला.

आश्‍चर्य म्हणजे आताचे माधवराव व्यासपीठावरून पाहिलेल्या माधवरावांपेक्षा पूर्ण वेगळे होते. पूर्ण हसर्‍या चेहर्‍याचे. ‘‘याऽऽ’’ म्हणत त्यांनी स्वागत केलंच, पण वाकून नमस्कार करताच पाठीवर प्रेमळ थाप मारत आशीर्वाद दिले. थोडक्यात, त्यांच्याबद्दलच्या आदरातून आलेलं अंतर प्रेमळ कुटुंबीयांच्या नात्यानं त्यांनी कमी केलं. घरात मन वेधून घेणारं मोठ्ठं कपाट होतं ते फक्त पुस्तकांचं. आणि समोर दिसणारी सारी पुस्तकं इंग्रजीतली होती.
विचारायचं म्हणून मी विचारलं, ‘‘बहुतेक इंग्रजी पुस्तकं!’’
‘‘मी मूळ वाचतो!’’ आणि माधवराव मोकळं हसले. ते हसले म्हणून मग मीही हसलो. मी ‘पंचम’ लेखनाबद्दल मला काय वाटतं ते सांगण्याचा प्रयत्न केला; लेखनातली माझी पहिलीवहिली धडपड सांगण्यासाठी आणि तेवढ्यात चहा आला.
आम्ही त्यांच्या हॉलबाहेरच्या व्हरांड्यातल्या खोलीत आलो. लाकडी जाळी, पुरेशी मोठी बैठक. माधवरावांची आरामखुर्ची आणि समोर साधी खुर्ची माझ्यासाठी.
चहा घेता घेता मी मनातली विनंती विचारून मोकळा झालो.
‘‘माधवराव, मला आपलं लेखनिक व्हायचंय.’’
चहा घेता घेता माधवरावांनी आश्‍चर्यानं एक कटाक्ष टाकला. त्यांचे गोलमटोल डोळे चमकले, स्मित करून ते म्हणाले, ‘‘अहो, एम. एम.चा आपला अभ्यास सुरू आहे. हा वेळ कशाला घालवताय?’’
‘‘अभ्यासासाठीच…’’
मग जरा वेळ कुणीच काही बोललं नाही. माधवरावांच्या स्वरातच एक कमावलेली जरब होती. परंतु ते हसून बोलू लागले की टणक बदाम साजूक शिर्‍यातून द्यावेत तसं सारं मायाळू व्हायचं. आता परिचित झालेल्या त्यांच्या हसण्यासह त्यांनी कुठलाच पाल्हाळ न लावता थेटच विचारलं, ‘‘आपल्यात ‘व्यवहारा’चं काय?’’
‘‘आपण ‘सांगायचं’ आणि मी ‘लिहायचं’ हा आणि एवढाच व्यवहार!’’
माधवराव खूष झाले आणि हे खूष होणं मला सुखावणारं होतं.
तेवढ्यात खोलीच्या कोपर्‍यात कसलीशी हालचाल झाली.
मन वेधलं.
मी म्हटलं, ‘‘कासवं?’’
‘‘हो. कासवंच आहेत. गुणी आहेत.’’
कासवात काय गुणी असावं ते मला कळलं नाही, पण तो विचार बाजूलाच राहिला कारण माधवरावांनी विचारलं, ‘‘कुठल्या प्रकारातलं लेखन करणं तुम्हाला आवडेल?’’
‘‘कुठल्याही!’’
‘‘तसं नाही. म्हणजे कादंबरी- अनुवाद- कथा…’’
‘‘माधवराव, मला आपला वाचनविषयक प्रवास जाणून घ्यायचाय.’’
माधवरावांनी सकौतुक पाहिलं, ‘‘पण त्याचं दीर्घ लेखन?’’
‘‘हो, ‘आपल्या वाचनाचं चरित्र’ हे सूत्र घेऊन, क्षमा करा, असं काहीतरी लेखन किंवा समीक्षाही चालेल…’’

माधवरावांना लगेच कळलं, मला त्यांच्या ललित लेखनात तेवढासा रस नव्हता. ते एकदम म्हणाले, ‘‘ठीक, तर मग पुढच्या शनिवारपासून बसूया. दुपारी दोनला येत चला. शनिवार-रविवार मीही टिपण करतो.’’
आयुष्यातला तो भाग्यवंत क्षण.
माधवराव मनोहरांनी मला लेखनिक म्हणून यायला अनुकूलता दर्शवली होती.
मग सुरू झाला- भेटीगाठीचा रम्य प्रवास.
पण लेखनाचा पहिला दिवस मला आठवतो. आधी साध्या कागदावर त्यांनी काही मजकूर सांगितला व चटकन कागद मागून तो तपासला. व्याकरण आणि अक्षर दोन्ही पाहिलं.
कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही. तशी नाराजीही उमटली नाही. मला वाटतं कोर्‍या पानांची चौकोनी वही शंभर पृष्ठांची असावी. समोर दिली.
त्यांनी चिरूट शिलगावला. आधी थोडा गोळा गेला असावा, पण चिरुटाचा मस्त झुरका घेऊन शांतपणे मजकूर सांगायला सुरवात केली. कुठे अवाजवी घाई नाही, त्याप्रमाणे सुचवण्यासाठी थांबावं लागतंय असंही नाही. विशेष म्हणजे, माधवरावांच्या ज्या वाचन व्यासंगाची महाराष्ट्राला उत्सुकता होती, ‘त्या वाचनाचं चरित्रच’ त्यांनी मुळारंभापासून उलगडायला सुरवात केली. सांगण्याच्या योग्य गतीमुळे हात थकत नव्हता आणि त्यांच्याबद्दलच्या अपार आदर आणि श्रद्धेमुळे मनात उत्साह पाझरत होता तो वेगळाच. मराठीतल्या अनेक नामवंत लेखकांना, नाटककारांना आता ‘पंचम’मध्ये माधवराव मनोहर आपल्याबद्दल काय लिहितायत ही धडकी भरलेली असे, अशा व्यक्तिमत्त्वाचा सहवास आपल्याला मिळतोय ही गोष्टच माझ्या लेखन उमेदवारीच्या दिवसांत मला किती आश्‍वासक वाटली असेल हे लेखनाची आवड असणार्‍या उमेदीच्या वाचकांना कळू शकेल.
खरोखर माधव मनोहरांच्या बरोबरचा प्रत्येक दिवस न् त्या दिवसातला प्रत्येक क्षण ही चालती-बोलती आनंदयात्रा होती.
त्याचं कारण- माधवरावांच्या मनाला वेळेच्या व्यवस्थापनाची एक शिस्त होती. माझं अत्यंत वेळेवर येणं त्यांना आवडायचं, तर त्यांचं प्रस्तावनेचं चर्‍हाट न वळता लगेच कामाला सुरवात करणं मला भावायचं. दोन ते पाच-साडेपाच ही शब्द मैफल. चार-सव्वाचारला घरातून चहा यायचाच. घरातल्या कोणत्याही कारणावरून त्यांनी लेखन बैठक मोडली आहे हे घडलंच नव्हतं, आणि विशेष म्हणजे एखाद्या शनिवार-रविवारी त्यांची बाहेर कुठं व्याख्यानं असली की त्यांचं तीन दिवस आधीच पत्र यायचं. ‘येत्या रविवारी येऊ नका. अन्य ठिकाणी व्यग्र आहे.’ हे सगळं इतकं काटेकोर, त्यातून त्या घडत्या मनात मी खूप शिकलो.

आता सहवासभेटी वाढल्यामुळे मी जरा धीट होऊ लागलो. त्यांच्या स्वीकृत विषयाव्यतिरिक्त अनेक कुतूहलं मी त्यांना लेखन बैठक संपल्यावर विचारू लागलो. खूप वाङ्मयीन प्रश्‍न असण्याचं ते वय- आणि समोर साक्षात् वाचन व्यासंगाचं मुक्त विद्यापीठ- माधव मनोहर. त्या गप्पा हा स्वतंत्र लेखनाचा विषय आहे, परंतु साधारणतः काय होत त्या गप्पांमध्ये?
नाशिकचं त्यांचं वास्तव्य! कविश्रेष्ठ कुसुमाग्रज व माधवरावांची मैत्री. गंगेच्या काठावर (नाशिकला गोदा ही गंगाच) दोघांचं भटकणं- तात्यासाहेबांच्या नव्या कवितांचे पहिले श्रोते होण्याचं भाग्य; परखड लेखन केल्यावरचे नंतरचे काही ताप; स्वतंत्र ललित लेखन कमी झाल्याची खंत, इंग्रजी साहित्याचं एवढं वेड, इत्यादी इत्यादी…
माधवराव अशा वाङ्मयीन, पण वैयक्तिक विषयावर भरभरून बोलत. गप्पा- त्यांच्या मजकुरानं रंगत. माझी झोळी आकाशाची हो- ती भरत नव्हतीच. कारण देणारे हात होते, ते महर्षी व्यासांशी नातं सांगणारे.
एकदा एका लग्नसमारंभात आम्ही एकत्र होतो. एका शाळकरी मुलीला घेऊन तिचे वडील आले. माधवरावांना गाठून त्यांनी मुलीविषयी तक्रारीच्या सुरात म्हटलं, ‘‘माधवराव, अहो माझ्या लेकीला कृपया समजावून सांगा- ही फक्त इंग्रजीच साहित्य वाचते.’’
आता माधवराव काय बोलताहेत इकडे माझं बारीक लक्ष होतं.
माधवराव क्षणाचाही विलंब न करता म्हणाले, ‘‘तिला नाही. तुम्हाला समजावून सांगतो. तिला इंग्रजीच वाचू द्या. पुढे वाचेल ती मराठी साहित्यही. आधी वैश्‍विक कलाकृतींचा परिचय होऊ द्या.’’

त्या बापाचा चेहरा फोटो काढण्यासारखा झाला. जवळ फोटोग्राफर नव्हता म्हणून बरं. मग त्या मुलीला जवळ बोलावून, ‘‘इंग्रजी साहित्य वाचणं अजिबात सोडू नकोस. काय?’’ हे सांगायला ते विसरले नाहीत. वर शाबासकी दिली. त्या मुलीचा चेहरा आनंदानं, विजयी भावनेनं उजळला. माधवरावांच्या या तत्पर मार्गदर्शनाचं मला आश्‍चर्य वाटलं. उगीच देखल्या देवा कौतुक करणं, खोटी प्रशस्ती, न पटणार्‍या माणसाशी व्यर्थ संबंध ठेवणं हे माधवरावांच्या स्वभावात नव्हतं. सगळा विचारांचा मामला, अगदी रोखठोक. दणदणीत. मैत्रीही मनापासून! मतभेदही मनापासून!
माधवराव मनोहर म्हणजे वाचन-व्यासंगाचं मूर्तिमंत चारित्र्य होतं. परकीय-स्वकीय असा भेद ते साहित्यात मानत नव्हते. उत्कृष्ट आणि निकृष्ट एवढंच ते मानत. ‘उचलेगिरी’ करून कुणाचंही श्रेय हिरावून घेणं माधव मनोहरांना कधीही रुचत नसे. चोरी का करता? श्रेय मान्य कर. मग पुढे जा- या त्यांच्या सांगण्यात गैर काहीच नव्हतं. अतिशय स्वच्छ परखडपणामुळे त्यांनी जसं दृश्य व अदृश्य शत्रू निर्माण केले, तसे या क्षेत्रातल्या वैचारिक उंचीचे जिव्हाळ्याचे मित्रही मिळवले.
जसजशा माझ्या भेटी वाढत गेल्या, तसतसे ते मला अधिकच प्रेमळ वाटत गेले. त्यांचं हास्य अतिशय प्रसन्न होतं. त्यात एक खंबीर आत्मविश्‍वास जाणवत असे.
इतक्या वेळा मी त्यांना भेटलो, पण माझं लेखन त्यांना मी कधीही- ‘हे वाचा!’ म्हणून दाखवू शकलो नाही. उलट त्यांच्या अभिजात वाचनाचा परिचय जसजसा होत गेला, तसतसे ‘असे काही उत्तम लिहून व्हायला हवे’ ही जाण येत गेली.

माधवराव मनोहर हे खरोखर साहित्याचं गुरुकुल होतं.
अशा करारी, रुबाबदार गुरुकुलात मला ऐन विद्यार्थिदशेत लेखनिक म्हणून का होईना थोड्या वेळ वावरता आलं हे भाग्यच!
त्या वेळी ‘महाराष्ट्र टाईम्स’च्या रविवार पुरवणीत माझं विविध प्रकारचं लेखन प्रसिद्ध होऊ लागलं होतं. ते निश्‍चितच त्यांच्या वाचनात येऊ लागलं होतं. पण त्याविषयी ते चकारही कधी बोलले नाहीत. हे न बोलणंच पुरेसं बोलकं होतं.
एकदा काहीशा चिवट अधीरतेनं मी विचारलंच, ‘‘माधवराव, माझा आजचा लेख आपण वाचलात का?’’
माधवरावांनी माझ्याकडे रोखून पाहिलं. ओल्या चिरुटाचा मस्तीभरा गंध हवेत वलयं उठवत उडत गेला. मग म्हणाले,
‘‘मी आपल्या सर्जनशील साहित्याची अधीरतेनं वाट पाहतोय!’’
अपेक्षेतही निखळता असलेले असे माधवराव! परखडपणातही वात्सल्य असणारे माधवराव!

– प्रवीण दवणे

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.