Now Reading
बौद्धिक संपदा म्हणजे काय?

बौद्धिक संपदा म्हणजे काय?

Menaka Prakashan

बुद्धी हे मानवाला मिळालेलं अनमोल वरदान आहे. या बुद्धीच्या जोरावरच माणसानं आदिमानव ते आधुनिक मानव अशी मजल मारली आहे. बुद्धीचं आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे तिची कोणी चोरी करू शकत नाही. पण तिच्या मूर्त रूपाची चोरी होऊ शकते, म्हणूनच तिचा उल्लेख ‘बौद्धिक संपदा’ असा केला जातो आणि या संपदेची चोरी होऊ नये, तिची नक्कल होऊ नये किंवा तिचा गैरवापर होऊ नये, यासाठी अनेक कायदेही आहेत. त्याविषयी अधिक विस्तृतपणे आणि अगदी सोप्या भाषेत जाणून घ्या या लेखमालिकेतून.

‘बौद्धिक संपदा’ संकल्पनेची ओळख
‘प्रॉपर्टी’ या इंग्रजी शब्दाचा अर्थ आहे मालमत्ता. ‘आज मेरे पास बिल्डिंग है, बँक बॅलन्स है, बंगला है, गाडी है’ हा ‘दीवार’ या चित्रपटातला सुप्रसिद्ध संवाद आजही आपल्याला आठवतो. स्वत:कडे असलेल्या सगळ्या मालमत्तांची जंत्री भावाला सांगत स्मगलर भाऊ हे सांगायचा प्रयत्न करत असतो, की मी श्रीमंत आहे! ज्याच्याकडे भरपूर स्थावर अथवा जंगम मालमत्ता आहे, तो माणूस श्रीमंत आहे असं समजलं जातं. पण मालमत्तेत असं काय विशेष असतं, की ज्यामुळे माणूस ‘पैसेवाला’ आहे, असं मानलं जातं? तर, मालमत्तेचं एक वैशिष्ठ्य असतं, ते म्हणजे तिला एक किमान मूल्य असतं. वेळ पडल्यास, ही मालमत्ता विकली जाऊ शकते. ती मौल्यवान असल्यामुळे, ती विकत घेण्यात अनेकांना रस असतो. त्यामुळे अडीअडचणीत आपली मालमत्ता विकून तिचं रूपांतर चटकन रोख रकमेत केलं जाऊ शकतं. अर्थातच, ज्याच्याकडे भरपूर मालमत्ता, त्याच्याकडे भरपूर पैसा हे समीकरण अगदी योग्य ठरतं. यात जमीन, इमारती वगैरेंसारख्या स्थावर मालमत्ता (इम्मूव्हेबल प्रॉपर्टीज) आल्या, त्याचबरोबर सोनं, चांदी, रत्न अशा जंगम (मूव्हेबल प्रॉपर्टीज) मत्ताही आल्या.
आपण मनुष्यप्राणी एका बाबतीत इतर प्राणिमात्रांपेक्षा वेगळे आहोत. ती खास गोष्ट म्हणजे आपला मेंदू. मानवी मेंदूमध्ये विकसित होत जाण्याची निसर्गदत्त देणगी आहे, म्हणूनच आज आपण इतकी अफाट प्रगती साध्य करू शकलो आहोत. आपली सुरवात झाली, तेव्हा आपण आदिमानव होतो, पण आज आपण अत्याधुनिक, प्रगतिशील मानव झालेलो आहोत. कशामुळे हे साध्य होऊ शकलं? अर्थातच, आपल्या मेंदूमुळे, आणि त्याच्या अधिग्रहण करण्याच्या वृत्तीमुळे. मेंदूचा, अर्थातच बुद्धिमत्तेचा वापर करून आपण कोणतंही शिखर पादाक्रांत करू शकतो. आज असं कोणतंही क्षेत्र नाही, जे मानवी मेंदू काबीज करू शकत नाही. या अर्थानं, मनुष्यप्राणी हा एक ‘बुद्धिवंत’, अर्थातच एक ‘इन्टलेक्चुअल’ प्राणी आहे.

मानवी मेंदूमध्ये एखादी कल्पना जन्म घेते. ती कल्पना प्रत्यक्ष साकारही केली जाऊ शकते. या कल्पनेमुळे अनेकांचं आयुष्य सुखकर होऊ शकतं, कारण या कल्पनेच्या मूर्त स्वरूपाला एक मूल्य असतं. हे मूर्त रूप कसं वापरायचं, कोणाला विकायचं, त्याचा कसा उपयोग करायचा याचा निर्णय सर्वस्वी त्याचा निर्माणकर्ता घेतो. म्हणजेच, मानवी मेंदूतून निर्माण झालेली कल्पना आणि तिचं मूर्त स्वरूप ‘मालमत्ता’ म्हणून सगळ्या कसोट्या पार करते.
मानवाच्या मेंदूतून काय काय निर्माण झालेलं आहे? शास्त्रीय, वैज्ञानिक, यांत्रिक अशी हरतर्‍हेची संशोधनं. (‘चाक’ हे मानवाचं पहिलं संशोधन आहे, असं मानलं जातं.) मानवानं केलेल्या संशोधनांमुळं आपल्या जीवनात आमूलाग्र बदल झाले. या संशोधनांवर अर्थातच अधिकार असतो त्यांची निर्मिती करणार्‍या संशोधकांचा, कारण ते त्यांच्या बुद्धिमत्तेतून निर्माण झालेलं असतं. ती त्यांची बौद्धिक संपदा असते. त्याचप्रमाणे, जगात अनेक प्रकारचं साहित्य, कलाकृती, संगीत, शिल्प निर्माण होत असतात. या कलांमुळे आपल्याला अतिशय समाधान मिळतं, आनंद मिळतो. कलेवर कोणा एकाचा अधिकार नसला, तरी कलेच्या मूर्त स्वरूपावर त्याच्या निर्माणकर्त्याचा अधिकार असतो. म्हणजेच, त्याच्यादेखील या मालमत्ताच असतात.
मानवी बुद्धिमत्तेच्या झेपेमुळे या जगात अशा अनेक मालमत्ता निर्माण झालेल्या आहेत. मेंदूच्या क्षमतेच्या बळावर निर्माण झालेल्या मालमत्तांना म्हणूनच म्हणतात- ‘बौद्धिक संपदा’ आणि इंग्रजीमध्ये ‘इन्टलेक्चुअल प्रॉपर्टी.’

इन्टलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स म्हणजे काय?
राईट म्हणजे अधिकार. ही जमीन माझी आहे, हा बंगला माझा आहे, हे दागिने माझे आहेत, असं आपण म्हणत असतो, म्हणजे आपण काय करत असतो? आपण आपल्या मालमत्तांवर आपला अधिकार सांगत असतो. या मत्तांवर आपली मालकी असते. मालकी म्हणजे काय? एखादी मालमत्ता आपल्याला हवी तशी, हव्या त्या पद्धतीनं वापरणं आणि तिची पाहिजे तेव्हा, पाहिजे तशी विल्हेवाट लावणं हे अधिकार ज्याच्याकडे असतात, तोच त्या मालमत्तेचा मालक असतो. साधं उदाहरण बघूया- एका घराचं. घराच्या मालकाला त्या घराचा पूर्ण उपभोग घेण्याचा आणि त्याला पाहिजे तसं त्या घरात राहण्याचा अधिकार असतो. ते घर स्वच्छ ठेवणं किंवा न ठेवणं, घराची रचना करणं, ते पाडून नवीन बांधणं, त्याचं नूतनीकरण करणं किंवा ते घर कोणालाही विकणं हे निर्णय केवळ मालकाचे असतात. ते घर कोणाला, किती किमतीला विकायचं हे ठरवण्याचा अधिकार फक्त मालकाला असतो. त्याला एखाद्याला त्याचं घर अगदी फुकट जरी द्यायचं असेल, तरी तो तसं बिनदिक्कत करू शकतो. ‘तू असं का करतोस?’ असं विचारायचा किंवा ‘तू असं करू शकत नाहीस’, असं सांगण्याचा अधिकार कोणालाही नाही. कारण हेच, की तो त्या घराचा मालक असतो. यालाच इंग्रजीत म्हणतात, ‘राइट टू एन्जॉय द प्रॉपर्टी टू द एक्सक्यूलजन ऑफ आदर्स.’ याउलट त्या घरात एखादा भाडेकरू राहत असेल, तर त्याला भिंतीवर खिळा ठोकण्यासाठीसुद्धा घरमालकाची परवानगी घ्यावी लागते. भाडेकरूला घराच्या उपभोगाचा हक्क असतो, पण मर्यादित. मालकाला मात्र वर लिहिल्याप्रमाणे (कायद्याच्या कक्षेत राहून) अमर्याद अधिकार असतात.
अर्थातच मग, यावरून हेदेखील गृहीत आहे, की या अधिकारांची पायमल्ली होत असेल, किंवा त्यांच्या अंमलबजावणीत कोणाचा अडथळा येत असेल, तर मालकाला त्या विरुद्ध कायदेशीर संरक्षण मिळेल. उदा. तुमच्या मालकीच्या घरात कोणी अनधिकृतपणे, तुमच्या परवानगीविना वास्तव्य करत असेल, तर तुम्ही पोलिसांत तक्रार नोंदवून त्यांच्या मदतीनं असं वास्तव्य करणार्‍याला कायदेशीर मार्गानं घराबाहेर काढू शकता. शिवाय, दिवाणी न्यायालयात त्या व्यक्तीविरुद्ध खटला चालवून त्याच्याकडून नुकसानभरपाईही मागू शकता.
हे असे अधिकार आपल्याला आपल्या सगळ्याच मालमत्तांवर असतात. बौद्धिक संपदा हीदेखील मालमत्ता असते हेही आपण पाहिलं आहे. मग, स्थावर आणि जंगम मालमत्तांसंबंधी असलेले उपरोल्लिखित मूलभूत अधिकार बौद्धिक संपदेलाही लागू होतात का? याचं उत्तर होकारार्थी आहे.
मालमत्तेचा मुक्त वापर, तिच्या विल्हेवाटीचे संपूर्ण हक्क, कायदेशीर संरक्षण हे अधिकार बौद्धिक संपदेच्या मालकाकडेही असतात.
मग, जसे स्थावर आणि जंगम मालमत्तांच्या रक्षणासाठी कायदे आणि न्याययंत्रणा आहेत, तसंच बौद्धिक संपदेमुळे निर्माण झालेल्या मालमत्तांच्या रक्षणासाठीदेखील कायदे आहेत का? तर याचंही उत्तर होकारार्थी आहे. पण, प्रत्येक प्रकारच्या बौद्धिक संपदेकरता वेगवेगळे कायदे आहेत.
बौद्धिक संपदेचे प्रमुख प्रकार म्हणजे- पेटंट्स, ट्रेड मार्क्स, कॉपीराईट्स, डिझाइन्स आणि जॉग्रफिकल इन्डिकेशन्स. त्यांच्या रक्षणासाठी आणि त्यांच्या योग्य वापरासाठी जगातल्या जवळपास प्रत्येक देशानं आपापले स्वतंत्र कायदे केलेले आहेत. अर्थातच, भारतानंही असे कायदे केलेले आहेत. या सर्व कायद्यांचं एकत्रित संबोधन म्हणजे- इन्टलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स, अर्थात बौद्धिक संपदा हक्क किंवा स्वामित्व हक्क कायदे.

भारतातले बौद्धिक संपदेच्या रक्षणाविषयी असलेले कायदे

१) द इंडियन पेटंट्स अ‍ॅक्ट, १९७०
नवनवीन संशोधनांमुळे सामान्य माणसाचं आयुष्य सुखकर होतं. एखाद्या देशातले संशोधक जितकी अधिक नावीन्यपूर्ण संशोधनं करतील, तितकी त्या राष्ट्राची प्रगतीही होईल. द इंडियन पेटंट्स अ‍ॅक्टद्वारे भारतात निर्माण होणार्‍या सर्व वैज्ञानिक, जैविक, औषधनिर्माण, तंत्रज्ञानविषयक, तांत्रिक सुधारणा घडवून आणणार्‍या संशोधनांना सुरक्षितता मिळते. एखाद्या संशोधकानं एखादं नावीन्यपूर्ण संशोधन केलं, की त्यासाठी त्याला या कायद्याअन्वये ‘पेटंट’ दिलं जातं. म्हणजेच, एका ठराविक कालावधीसाठी तो संशोधक त्या संशोधनाचा ‘मालक’ होतो. अर्थातच, इतर कोणालाही त्या कालावधीत त्या संशोधनाचा वापर करता येत नाही. चोरीची किंवा ‘कॉपी’ची भीती नसल्यामुळे संशोधकाला त्या संशोधनावर एकचित्तानं काम करता येतं, त्यात अधिकाधिक सुधारणा घडवून आणता येते. इतकं करूनही या पेटंटचा कोणी भंग केलाच, तर या कायद्याचा वापर करून दोषीवर कारवाईदेखील करता येते. संशोधकांना सुरक्षा देणारा असा हा एक अतिशय महत्त्वपूर्ण कायदा आहे.

२) द ट्रेड मार्क्स अ‍ॅक्ट, १९९९
ट्रेड मार्क, म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं, तर ‘लोगो.’ सध्या प्रत्येक व्यवसायाची ओळख ही त्याच्या नावापेक्षा अधिक त्याच्या ‘लोगो’नं होते. एखादा स्थानिक व्यवसाय त्या भागात त्याच्या नावानं आणि त्याच्या ‘लोगो’नं लोकांना माहीत होतो. हा स्थानिक व्यवसाय जेव्हा नवीन शहरांमध्ये पाय रोवायला बघतो, तेव्हा त्याच्या जाहिरातीत प्रामुख्यानं असतो तो त्याचा ‘लोगो.’ हा लोगो म्हणजे नक्की काय असतं? तर व्यवसायासंबंधी किंवा व्यवसायाच्या मालकासंबंधी ‘चित्रमय’ माहिती देणारं हे एक चिन्ह असतं. हे चिन्ह म्हणजे त्या व्यवसायाची ओळख होते. हे चिन्ह म्हणजे त्या व्यवसायाच्या गुणवत्तेबद्दल लोकांना आश्वस्त करणारी एक खूण होते. अर्थातच त्यामुळे त्याला संरक्षण देणं हितावह असतं. हे संरक्षण या ट्रेड मार्क्स अ‍ॅक्ट अन्वये मिळतं. एकदा एखाद्या व्यवसायाचा ट्रेडमार्क नोंदणीकृत झाला, की अनेक प्रकारची सुरक्षा त्याला मिळते. मुख्यत्वे, त्या व्यवसायात असलेले स्पर्धक या चिन्हाचा गैरवापर करू शकत नाहीत.

३) द कॉपीराईट अ‍ॅक्ट, १९५७
शास्त्रीय, वैज्ञानिक, तांत्रिक इत्यादी संशोधनांमुळे आपलं आयुष्य सुखकर होतं, तर संगीत, कला, चित्रपट आदींमुळे आपलं आयुष्य आनंदी आणि समाधानी होतं. या कलांचे जनक, त्यांचे निर्माणकर्ते हे अलौकिक अशी अद्भुत प्रतिभा घेऊन जन्माला आलेले असतात. त्यांना आणि त्यांच्या कलाकृतींना संरक्षण देणारा कायदा म्हणजे ‘द कॉपीराईट अ‍ॅक्ट’. १९५७ साली संमत झालेला हा कायदा २०१२ साली नव्यानं लिहिला गेला आणि त्याची व्याप्तीही वाढली आहे. मुख्यत्वे, सर्व प्रकारच्या कलांना संरक्षण देणारा हा कायदा आहे. या कायद्याची आपल्याला नक्कीच माहिती असते. कोणतंही पुस्तक उघडा, त्याच्या पहिल्या डाव्या पानावर (लेिूीळसहीं ) हे चिन्ह दिसेल. हे चिन्ह काय दर्शवतं? की, लेखनाचे हक्क लेखकाकडे (किंवा त्यानं निर्देशित केलेल्या व्यक्ती/संस्थेकडे) आहेत, हे लेखन लेखकाच्या परवानगीशिवाय कुठंही छापता येणार नाही, त्याचा प्रसार करता येणार नाही इ. हा हक्क लेखकाला या कॉपीराईट कायद्याखाली मिळतो. असेच हक्क संगीतकारांना, शिल्पकारांना, चित्रकारांना, नाटककारांना, चित्रपटाच्या निर्मात्यांनादेखील मिळतात.

४) द डिझाइन्स अ‍ॅक्ट, २०००
आपलं उत्पादन जास्तीत जास्त आकर्षक दिसावं, त्यानं आपल्या वैशिष्ठ्यपूर्ण रंगरूपानं ग्राहकाला आकर्षित करून घ्यावं असं प्रत्येक उत्पादकाला वाटतं. कधी त्या उत्पादनाचा विशिष्ट आकार, एखादं वळण, त्याचं वजन, त्याचे कोन यासाठी विशेष मेहनत घेऊन तो त्या उत्पादनाचं ‘दिसणं’ वैशिष्ट्यपूर्ण करतो. त्याच्या या मेहनतीचं फळ त्याला मिळायला हवं. याकरता आहे २००० साली संमत केलेला डिझाइन्स कायदा. या कायद्याअन्वये तुम्ही तुमच्या उत्पादनाचं वैशिष्ट्यपूर्ण रूप नोंदणीकृत करू शकता. एकदा ते तसं नोंदवलं गेलं, की तुमचे स्पर्धक तुमच्या उत्पादनाच्या डिझाइनची नक्कल करू शकत नाहीत. उत्पादनाच्या केवळ बाह्य रंगरूपासाठीच्या संरक्षणासाठीचा हा कायदा आहे, याचीही इथं नोंद करणं अगत्याचं ठरेल.

५) जॉग्रफिकल इंडिकेशन ऑफ गुड्ज (रजिस्ट्रेशन अ‍ॅन्ड प्रोटेक्शन) अ‍ॅक्ट, १९९९
कल्पना करा, की तुम्ही एका लग्नाला गेला आहात, जिथं नवर्‍या मुलानं ‘कोल्हापुरी चप्पल’ घातली होती, नवर्‍या मुलीनं ‘कांचीपुरम सिल्क’ नेसली होती, तर जेवायला ‘बंगाली रसगुल्ले’ होते. तुमच्या लक्षात आलं असेल की यातलं प्रत्येक विशेषण म्हणजे गावाचं नाव आहे. एखाद्या गावाचा पदार्थ, वस्तू किंवा कापड इतकं प्रसिद्ध होतं, की तीच त्या गावाची ओळख होते. सहसा ते गाव या वस्तूची निर्मिती पारंपरिकपणे करत आलेलं असतं. हीच गोष्ट पिकांनाही लागू आहे. एखाद्या गावाची हवा एखाद्या वाणाला इतकी पोषक असते, की तिथं सर्वोत्कृष्ट प्रतीचा वाण निर्माण होतो. हे भौगोलिक वैशिष्ठ्य जपलं जातं भौगोलिक निर्देशक, म्हणजेच जॉग्रफिकल इंडिकेशन कायद्याखाली. उद्या ‘कोल्हापुरी’ म्हणून वेगळ्याच गावात बनवलेली चप्पल कोणी विकू नये आणि त्या चप्पलेचा दर्जा कायम रहावा ही इच्छा समस्त कोल्हापुरी चप्पल कारागीरांची असते. या त्यांच्या इच्छेला या वरच्या कायद्याचं रक्षण मिळतं. या कायद्याचं वैशिष्ठ्य असं, की ही सुरक्षा एका व्यक्तीला मिळत नाही, तर संपूर्ण गावाला / संस्थेला एकत्रित मिळते.

– पूनम छत्रे

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.