Now Reading
बिर्‍हाड

बिर्‍हाड

Menaka Prakashan

एकदा कोणीतरी विचारलं, ‘‘मारुती घडवतो का?’’ आबा ‘हो’ म्हणाला. म्हणजे आबा देवही घडवतो. मला कळलं… येईल ते काम करत रहायचं आणि त्यातूनच शिकायचं हे त्याचं तत्त्व. आबा माझ्या शिक्षणाची स्वप्नंही रंगवायचा. ‘तू सायेब झाल्याव गाढवं कशी संभाळवा गा? दगड कसं घडवणार’ ही त्याची माझ्या भविष्याची चिंता. स्वतःच्या नाकासमोर बघून चालणारा आबा पोलिसांसमोर ढळाढळा रडताना मी पाहिला. माझं मन चिरत गेलं. छातीत चर्रर्र झालं…

खाटल्यावर उताणा पडून आबा आभाळात बघत होता. डेर्‍यात कंदिलाच्या उजेडात माझं प्रकट वाचन सुरू होतं. शाळेनं माझ्यावर लयच लय मेहरबानी केली म्हणून आता लिहता-वाचता येत होतं. वाचनातली गंमत कळत होती. पुढच्या वर्षी दहावीचा अभ्यास. डेरा एखाद्या मोठ्या शहराबाहेर एकाच जागी ठोकणार असं स्वप्न माय आजकाल डोक्यात रंगवायची…

पंधरा-वीस दिवसांत, महिन्यात आमची गावं बदलायची. अशात माझं शिक्षण बोंबलणारच होतं. आर.टी.ई.च्या नव्या शिक्षण हक्क कायद्यानं तारलं. अकरा वर्षांचा झाल्यावर वयानुसार थेट सहावीच्या वर्गात माझा प्रवेश झाला. कोंबडीच्या पिलांत बदक झाल्यासारखं वाटायचं मला. तेही त्या जगताप गुरुजींची कृपा. शाळाबाह्य मुलांच्या शोधातून माझा शोध लागला. त्या आधी शाळेचं तोंड बघितलं नव्हतं. वाचन-लेखन लयच दूर. बाराखडीही धड जमेना, अशी गत बघून पोरं हसायची. मग मास्तरांची छडी वाजे छम छम झालं आणि सातवीला जाईस्तोवर वाचणं आलं. शाळेत मन रमायला लागलं. एका शाळेत चित्-मन रमलं की आमचं बिर्‍हाड गाढवावरून आडतनवाडी घुमायचं.
मग नवी शाळा. नवे गुरू, नवे मित्र. मित्र त्यामानानं नाहीच. आमची कापडं आवडायची नाही कुणाला आणि भाषाही.
असं सगळं नववीपर्यंत जमलं. आबाच्या आणि मायच्या मनाजोगं झालं ते सगळं. मला पुस्तक वाचताना पाहिलं की मायला कलेक्टरची माय झाल्यागत वाटायचं. उन्हात गाढवं हाकण्यापेक्षा मलाही पुस्तकात डोकं घालून बसणं आवडायचं. कधी कधी अभ्यासाची नाटकं चालायची नाही. काम महत्त्वाचं.
आबा रात्री आभाळात असायचा. त्याच्या डोक्यात रुखीचं लगीन बिगीन असलं काहीतरी असायचं आजकाल. मस्त फेटा बांधून छोरीच्या मुंडावळ्या बांधीत असायचा तो. ‘जिऊन घ्या’ अशी मायची ऑर्डर आल्यावर आबाची तंद्री भंगली. मायनं बाजरीच्या रोट्या आणि बोंबलाचं साळण केलं होतं. आबाला लय आवडायचं ते.

आबा खाटल्यावरून उठला. आज त्यानं लय मोठं झेंगाट करून ठेवलं होतं. उठून त्यानं गुंतलेल्या गाढवांच्या रश्श्या मोकळ्या केल्या. तोवर समोरून पोलिसांची गाडी येऊन डेर्‍याजवळ उभी राहिली. उजेडानं आबाचं डोळं दिपलं. माझं प्रकट वाचन खपलं. पीठभरल्या हातानं माय बाहेर आली. आबा खांबासारखा उभा. कोनतरी मोठ्या गुश्श्यात ओरडला.
‘‘योच तो दगडफोड्या?’’ गाडीतून तीन-चार पोलीस भराभर खाली उतरले. एकानं आबाच्या मनगटाला धरलं. आबा जागेवरच भांबावल्यासारखा कावराबावरा.
‘‘काय रं भडव्या… लय माज आला काय रं तुला? च्यायला चल तुह्या माज उतरवतो चल.’’ असं म्हणत दोघा -तिघांनी आबाला गाडीकडं ढकललं. माझ्या छातीत गोळा धडधडला. तव्यावर मायची भाकरी करपली. पिठाच्या हातानं ती धावतच पुढं आडवी झाली. हाता-पाया पडली.
‘‘सायेब, सोडा त्यानला… आमी गरीब मानसं… गरिबावर दया करा.’’
‘‘च्यायला गरीब? पोलीस पाटलाच्या पोराला नडलाय तो… लय जिगरबाज गडी हाये तो… कायला गरीब? शेवटाचं रामराम करून घे… खडी फोडाय पाठवतो त्याला… इथं लय दगड फोडलं त्यानं.’’ त्यातला एक पोलीस कडाडला. माय हात जोडून कळकळायची त्याच्या पुढं.
‘‘सायेब, मनं ऐका… एकवार मनं बी ऐका.’’ आबा बोलला.
‘‘आयकतोनं… चल आमच्या संग… लय चरबी झालीनं? मायला कुठनं कुठनं येतारं तुमी आन् हित्त दादागिरी… आमच्या डोक्याला ताप?’’ दोघा-तिघांनी आबाला जबरदस्ती गाडीत घुसवलं. त्याचं कोणी ऐकेना. माय सैरावैरा… याच्या त्याच्या तोंडाकडं बघते.
‘‘सायेब, त्येना सोडा… मनं ऐका… आमचं गाढवावरचं बिर्‍हाड. पाया पडत्ये मी…’’ माय धाय मोकळून रडली. ओरडली… एका पोलिसानं तिला ढकललं. ती खाली पडली. गाडी सुरू झाली. मी डेर्‍यापाशी मुठी आवळून गुस्सा गिळून उभा. माय गाडीमागं धावली.
आबाला पोलिसानी नेलं.

तिथंच बसून माय घारमुरी होऊन रडली. रुखी डेर्‍यात कानकडी होऊन रडत्येय. कुणी मेल्यावं रडत्यात तशी, मी गप उभा. माझं वाचन गडबडलं.
‘लय दुख झालं की सुख आठवायचं. म्हंजी दुख कमी व्हतं’ असं माय नेहेमी म्हणायची. आता या दुखात ती कोणतं सुख आठवनार. मला कळंना. पण मला आठवलं. आठवीया वर्गात असतानाची गंमत आठवली. सगळी पोरं माझ्या उत्तराला खो खो हसली होती. सरांनी निबंधाला विषय दिला होता, ‘माझा आवडता प्राणी.’ मी लिहिलं होतं, ‘ माझा आवडता प्राणी आहे गाढव. गाढवाला चार पाय अन् एक शेपटी असते. गाढवाचे कान लांब असतात. माझं गाढव लय गुनी आहे. ते मला फार म्हंजे फारच आवडतं. मी लाडानं त्याला भुर्‍या म्हणतो.’ जसं मी वाचायला सुरवात केली तसं सगळीच फिदी फिदी हसायला लागली. मला काही कळंना. माझं वाचन थांबलं. काय चुकलं म्हणून मी कोड्यात. माझ्यावर हसं झाल्यावर सरांनी सगळ्यांना दटावलं. म्हणाले, ‘ठीक आहे… गाढवबी चालतं… त्यात काय हसण्यासारखं. गाढवं बी लय लोक पाळत्यात.’ मग पोरं गप झाली. तरी मला लयच मोठी गफलत झाल्यागत झालं. मी मनात म्हंटलं, ‘गाढवाचं काय चुकलं गड्या… छोरं का बु हासली आपल्याला? जसं गाय, म्हशी, बकरी तसं गाढव.’ उरफट्या आकलेची पोरं का हसली असतील मला? सर म्हणाले, ‘वाच म्होरं’ तरी मी गप्प उभा. आबा सदाकदा म्हणतोय, ‘गाढवं हीच आपली संपत्ती. गाढवं हायीत म्हून आपन हावत. चार भावांना तीन-तीन गाढवं हिश्श्यात आली व्हती. आज आपल्याकडं सा हायीत. गाढवं कष्ट करत्यात म्हून आपन सुखानं खातू. आपन काय करतूं? आपलं बिर्‍हाडच गाढवावरचं… गाढवं एवढी चांगली असून मानसं कुनालाबी गाढव म्हनत्यात… हित्तच गल्लत हाये.’ मला सगळं आठवलं.

शाळेतून वैतागानं मी थेट डेर्‍याकडं धूम पळत आलो.
माय दारात मोठ्या दगडावर बसून मशेरी करत बसलेली.
‘‘कायवं माय… म्या साळंत निबंद लिवला गाढवाचा… माझं गाढव लय म्हंजी लय गुनी हाये… मला गाढव लय आवडतो तर पोरं हसली फिदी फिदी. जावदे मी न्हाय जानार साळंत उद्यापासनं. पोरं चिडवत्यात.’’ माझ्या बोलण्यावर माय हसली. मग लयच जिवावर आलं माझ्या.
‘‘बग आसक्या, हासूदे हसनार्‍याला… सुख-दुख, भलं-बुरं ज्याचं त्याला. जग हसाय आलंय. समद्यानलाच गाढवं नाय भावत बाबा. तुजा निबंद अगदी बराबर हाये. कायबी गल्लत नाय तुजी.’’ माय पुस्तकातल्या चांगल्या चांगल्या ओळी वाचून दाखवल्यागत शिकवत होती. मी म्हंटलं, ‘माय, तू किती शिकली?’ तर ती म्हणाली, ‘नाय शिकली तेच सुधरलं. नाय तं मास्तर साळा सोडून पळळा असता.’ माय जोक करते.
रुखी अजून हसत होती. तिनं तर शाळेचं तोंडही पाहिलं नव्हतं. पाच वर्षांची झाली तकसरच तिच्या अंगाला हळद लागली. कुशाली होऊन तिचा बिंद सोनगावला मंदिर घडवणार्‍यांच्या डेर्‍यात राबतोय. माय म्हणते, ‘तो लय भारी कलाकार हाये.’ माय त्याला पाव्हनं म्हणते.
आज आबाला पोलिसांनी पकडून नेलं. त्याचं काय चुकलं बरं? तिथं नेऊन मारझोड करतील का पोलीस त्याला? तसा आबा पन लेचा पेचा नाही. मायचं रडू घडीभर थांबलं. कंदील मंद होता. मी माय जवळ जाऊन बसलो. बाहेर कभिन्न अंधार.
‘‘माय, आता यो गाव सोडूया. आदली मानसं लय नडत्यात. कामाचं पैसंबी द्याला कचरत्यात. आपन सोनगावला जाव… कसाय व सोनगाव?’’
‘‘कोनं पाहयलं… कोनाला ठाव… गाढवं जातील तिकडं जायचं… चांगली जागा दिसली की तिथंच डेरा ठोवायचा माय जेमतेम बोलली.
ती नेहेमी असंच काहीतरी जगण्याचं वेगळं तत्त्व मांडायची. सरत्या आयुष्यात तिनं अनेक गावाला गाढवावरनं बिर्‍हाडं हलवली. आबाला साथ दिली. तिचं एक पोरगं म्हणजे माझ्यापेक्षा थोरलं कोन्यातरी गावाला डेर्‍यातच मेलं. ते मेलं आणि मायच्या काळजाला कायमचं दुखरं झालं. ती माझ्या जिवंतपणापेक्षा त्याच्या मरणावर जास्त झुरायची.

‘आपला डेरा सोडला तर कोणत्याच गावी आपलं काही नसतं. तिथली माणसं, जागा जमीन, झाडंझुडपं काहीच आपलं नसतं. आपण झोपतो ती भुई बी आपली न्हाय.’ तिचं हे जगण्याचं तत्त्व माझ्या मनात ठसत गेलं. आजची रात माय डोळे उघडे ठेवून जागत होती. ज्या वाटेनं पोलिसांची गाडी गेली त्या वाटेकडं तिचे डोळे. जणू ते पोलीस आबाला सोडतील आणि आबा तिकडून येईल असं. एकदा रुखीनं टोपलीभर शेण पुढ्यात पसरून गोवर्‍या थापायला घेतल्या. लयच मोठं काम होतं ते. मी म्हणालो, ‘माय हिला साळंतली गंमत नगो सांगू… चिडवते मला.’ माझ्याकडं बघून माय गप्पच होती. रुखी हसत होती. माझं डोळं झालं मोठं. का हसते रुखी मला कळंना.
‘‘नाय बा… म्या कशाला हासू? म्या माझं माझं मनचच हसते. पर या गवर्‍या आसक्यासाठी कळवते. माय म्हनते, या गवर्‍या वाळवून इकल्यावं आसक्याला भारी चड्डी घिऊ म्हनं.’’ रुखी कामातनं बोलली.
रुखी का हसली आणि माय गप्प का हे मला कळलं.
माझी चड्डी ढुंगणावर फाटली होती. माय गप्प का? तर आपल्याच दारिद्य्रावर आपण का हसावं? रुखी हसत होती. भावासाठी राबण्यात कष्टापेक्षा आनंद मोठा होता. पोट रितं असलं की ढुंगणावरचं फाटलेलं नाही कळत. म्हणून फाटक्या कापडातल्या मुलांना मित्र नसतील.
तेव्हा मला कळलं.
एकदा मी म्हंटलं, ‘गाढवं इकली तं?’ माझ्या प्रश्‍नावर माय खवली. म्हणाली, ‘येडा झाला का गा? आरं आपला संसार हाये त्यो.. तू मोठ्या राजागत नोकरी केलीस तरी गाढवं सुटायची नाय.’
मी माझ्या दारिद्य्रात सुखाची घडी आठवतोय. हुंदका कमी झाला. मला वाटलं माय झोपली. मी वळून पाहिलं तर तिचे डोळे उघडेच.
‘‘आसक्या झोप ना बाबा… घनी रात झाली.’’ माय म्हणाली. मी कंदील कमी केला. बाहेर गाढवं उठून बसून डरकत होती.
चुल्ह्यातले निखारे निवले. बोंबलांचं साळण गार झालं. आबा डेर्‍यात नाही. घर सुनं.
आबाचं आणि मायचं तसं रोजच भांडणं. सकाळी काही न झाल्यागत गोडव्यात बोलायची दोघं. भांडण त्यांच्या सुखी जीवनातल्या जगण्याचा एक भाग होता. मनात काळं-गोरं नव्हतं. तुझं-माझं जमना आणि तुझ्या वाचून सरना असं.

एक दिवशी सुटाबुटातली तीन-चार माणसं गाडी घेऊन डेर्‍यापाशी आली. आबानी एक उथाळा त्यांच्या समोर ठेवला. त्यांचं पैशांवरनं ठरत नव्हतं. ती माणसं ‘पाचशात दिऊन टाक’ म्हणायची. बा म्हणायचा, ‘नाय परवडत… लय मेहनत असती त्यात. एखादी कपची जास्त उडली की समदी मेहनत कायबार जाती. केलं काम हातातून जातं. घे रट्टा हाण करून नाय चालत. आपलं आठशात ठरलंय… भले पाच-पन्नास कमी द्या पर पाचशात नाय व्हनार,’ गयावया करत फाटक्या कापडातला बा शंभर-दोनशांसाठी रडायचाच बाकी. तो माणूस शंभराच्या पाच नोटा परत परत मोजत होता. एखादी नोट जास्त गेली तर आयुष्याचं नुकसान होईल असं.
‘‘आसं कर… हे आणिक शंभर घे… सा शे झाले. आता कर, काय बोलू नगं… आम्हाला मोकळं कर… आम्हाला पण सगळं कळतंय… दगड काय इकत घेत नाय तू तसंतर.. साशेबी जास्तच व्हत्यात. पन घे चल.’’ उपकार केल्यासारखे त्याने पैसे बळे बळे आबाच्या हातात कोंबले. दगड फुकटच पण त्यावर केलेली मेहनत कुणाला कळली नाही.
जीवा पोटावर उथाळे उचलून आबानी मोटारीत चढवले. मोटार गेल्यावर माय खवली. सौद्यात झालेला आबाचा घाटा तिला खपायचा नाही. ती बारा महिने फाटक्या लुगड्यात असायची. सगळ्यांसाठी ती आयुष्यभर खपली. कधीतरी मला समोर बसवून मास्तरांसारखं शिकवायची. ‘शिकून मोठा हो’ म्हणायची. परिस्थितीवर कुढायची.
‘‘आसक्या, साळा शिकशील तं सायेब व्हशील. ही आशी कष्टाची कामं करून बारा मैनं उपाशी राशील. गरीब दुबळ्या मानसांचं आज जगात काय खरं न्हाय. राबनार्‍याच्या हातुनबी हिसवाऊन घेनारी मानसं असत्यात. तू आपली साळा शिक.’’ तिचं जगण्याचं तत्त्व असं होतं. तिला माझं शिक्षण आणि गाढवं दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या होत्या. का ते कळायचं नाही. आबा कष्टाची कामं करतो तशी कामं माझ्या आयुष्यात नको असं वाटत असावं तिला. तिचं स्वप्न असावं, मी सायबच व्हणार.

डाव्या बाजूला दगडांचा ढीग. उजव्या बाजूला दगडांचे घडीव आकार. एका हातात छिन्नी घेऊन आबा दगड घडवायचा. एक दगड त्याने चारी बाजूंनी पाहिला. काय पाहिलं ते त्यालाच ठावं. मग डाव्या हातात तंबाखू मळून तोंडात टाकली. टक् टक् आवाजात त्याचं काम सुरू झालं. तंबाखू आणि कामाचा काय संबंध असावा असं कुतूहल वाटून मी एकदा त्याला विचारलं तर तो वाकला. ‘तुला काय कर्‍याचं. जा तू तुझं पुस्तक काढ’ म्हणाला. सरळ सरळ उत्तर देईल तो आबा कसला. आमच्यासाठी त्याची उत्तरं ही अशीच हिडीसफिडीस. पण लोकांशी बोलताना प्रेमळ आणि मनमोकळं. आबाचं जग वेगळं.
एकदा कोणीतरी विचारलं, ‘‘मारुती घडवतो का?’’ आबा ‘हो’ म्हणाला. म्हणजे आबा देवही घडवतो. मला कळलं. येईल ते काम करत रहायचं आणि त्यातूनच शिकायचं हे त्याचं तत्त्वं. आबा माझ्या शिक्षणाची स्वप्नंही रंगवायचा. ‘तू सायेब झाल्याव गाढवं कशी संभाळवा गा? दगड कसं घडवणार’ ही त्याची माझ्या भविष्याची चिंता. स्वतःच्या नाकासमोर बघून चालणारा आबा पोलिसांसमोर ढळाढळा रडताना मी पाहिला. माझं मन चिरत गेलं. छातीत चर्रर्र झालं.
रात्र दाट अंधारली. रुखी रडली आणि कानकडी होती तशीच झोपली. माय आसवं गाळतेय. आबाला पोलिसांनी फरपटत नेलं. एकटा काय म्हणून मी पोट भरू… भूक मेली. डेर्‍यांचं कापड वार्‍यानं फडफडतंय. सुखाचं काही आठवंना… काय घडलं ते माझ्या डोक्यातून जाई ना…
संध्याकाळी गाढवं माघारी टाकून रुखी डेर्‍याकडं धूम पळत आली होती. मायचं जात्यावरचं दळण खडखडत थांबलं. ‘काय झालं व रुखें?’ म्हणत माय तिच्या मागं धावतीय. रुखी डेर्‍यात घुसली. माय तिच्या पायात इचू काटा डसला की काय अशी तिला भीती.

‘‘अगं काय जालं बोल तरी’’ माय रुखीला हालवून विचारतेय. रुखी धड बोलंना. ती रडते. तिला काय सांगावं धड कळना.
‘‘सरपंचाच्या पोरानं… हात धरला मना…’’ एवढं बोलून मोठ्यानं रडं झालं रुखीचं.
‘‘अरे देवाऽऽ’’ मायनं डोक्याला हात मारला. मंग रुखीला कुशीत घेतलं. मायचं डोळं ओलं झालं. माय लेक धुसमुस रडतात. काय बोलावं, काय विचारावं मला कळंना. मग बराच वेळ रुखी रडत राहिली. हात धरला म्हणजे काय झालं? कुणी हात धरणं इतकं वाईट का असतं? मला कळंना. माय धड सांगणार नव्हतीच. ‘तुला नाय कळायचं तू गप’ असं सांगून झिडकारणार. मी गप्प.
‘‘आगं, बाईच्या जातीला ह्योच भेव असतो. तुला कितीदा सांगलं… गाढवं जास्त लांब घिऊन जाव नगो म्हून. नजरंच्या टप्प्यात राहवं हमेशा. त्या मेल्यांचं काय करनार आपन? आपलं आपन न्हेमी शानं असावं… ह्यो गाव ना आपला ना शीव.’’ माय बडबडत राहिली.
रुखी न ऐकल्यागत रडतीय.
गाढवं आली. ज्याच्या त्याच्या जागी उभी झाली. काही डरकत होती. भुर्‍यानं जमिनीवरची धूळ उडवली. खांद्यावर मोठा दगड घेऊन आबा आला. गाढवं मोकळीच बघून कुरबूर केली. मग त्यानीच ज्याच्या त्याच्या रस्स्या बांधल्या. आबाला काय झालं माहीत नव्हतं.
‘‘रुखी रडतीय… कोन्या छोर्‍यानं हात धरला म्हंती..’’ मी आबाला सांगितल्यावर तो घामाचा दमून तरी ताड्कन उठला. एकदम डेर्‍यात घुसला. त्याचे डोळे कावरेबावरे लाल झाले.
‘‘कोन्या पोरानं.. काय केलं?’’ आबा मायकडं बघून गरजला. रुखी आणखी रडायला लागली. माय तिच्या केसांवरून हात फिरवतीय.
‘‘सरपंचाचं पोरगं..’’ माय म्हणाली.
‘‘काय केलं त्यानं?’’ आबा गुश्श्यात गरजला. त्याच्या उरात आग. छातीत धडधड.
‘‘जावदे .. हाताला धरलंय फक्त… झंझट नगं…’’ माय म्हणाली.
‘‘काय?’’
‘‘हे गाव आपलं न्हाय… इथली मानसं उरफट्या आकलंची. जावदे झालं गेलं. मोठी मानसं हायीत ती…’’
‘‘काय करतील ती… कोनाच्या पोरीला कोनीबी हात धरावं का? तिचा बाप जिता हाये.’’ आबा चवताळल्या बैलासारखा तडफडला. हातात लांब दांडूका घेऊन तो डेर्‍याबाहेर पडला. ‘‘आरं माज्या कर्मा… कयाला सांगलंस रं बाबा..’’ माय माझ्यावर खवली.
‘‘आवं जावद्या… नगो इचारू…’’ म्हणत माय बाहेर आली. आबा रागानं अंधारल्या वाटेनं बेडर होऊन दिसेनासा झाला.

माय म्हणायची, ‘त्यांशी भांडू नगा. आपन खालच्या जातीचे.’ जात म्हणजे काय? खालची जात म्हणजे काय? आबा तर म्हणतो आपन जेन्टलमन. आपलं खानदान वरचं. बिर्‍हाड गाढवावरनं घुमतंय म्हणून नायतर एक आख्खं राज्य असतं आपलं. खालची जात, वरची जात माझ्या डोक्यात शिरत नव्हती. जात कोन शिकवतं आपल्याला? मला नाही उमगलं ते जात प्रकरण. जे नाय उमगलं ते सोडून द्याचं. माय म्हनायची.
शाळेच्या पाराजवळ टवाळ पोरं खी खी खिदळत होती. आबानी नीट ताडलं. हीच चौकडी असावी. आबा जवळ गेल्यावर ती गप्प झाली. खूप भ्याल्यागत. पण भ्याली नव्हतीच ती.
‘‘सरपंचाचं पोरगं कोण?’’ आबानी विचारलं. सगळी गप. मग ते टारगट पोरगं धटिंगपणानं छाती पुढं काढीत ‘मी मी’ म्हणत पुढं आलं. ‘‘मी… मी हाये…. काय करतुस?’’ शिरजोरीनं आणखी पुढं येऊन मागं सवंगड्यांकडं बघून कुत्सित हसायला लागलं. त्याच्या त्याच वागण्याची चीड आबाच्या मस्तकात गेली.
‘‘मया पोरी संग काय चाळे केलं तनं?’’ आबाच्या बोलण्यावर पोरं खी खी हसली. मग दुसरे दोघं पुढं आले. करून करून हा बाप्या काय करणारा अशी खिजवत राहिली. मग आबाचा माथा भणकला.
‘‘पैसे देतो म्हनलं तर हेलपटून देते साली..’’ एक पोरगं म्हणालं.
‘‘एक आईसकॅन्डी दोगं खाऊ म्हनलं तर कुत्र्या बोलते साली..’’
‘‘म्या फक्त वढ्याव येतेस का इचारलं…’’ सरपंचाचं पोरगं बोललं नि आबाच्या जखमेची खपली सोलल्यागत सललं.
‘‘माजी पोरगी काय वाटंव पडली कायरं भाड्यानू..’’ म्हणत आबानी काठी उगारली तर सरपंचाचं पोरगं, ‘मार मार’ म्हणत पुढं आलं.

‘‘तिया बाप आजून जिता हाये..’’ म्हणत त्यानं काठी हाणलीच त्या पोराच्या डोक्यात. मग दुसरे दोघे मागे सरकले. आणखी दोघं टरकले. सरपंचाच्या पोरानं डोक्यात रगत आलं का हात लावून पाहिलं आणि हाताला आलेलं रक्त बघून थरथरत टकामका इकडं तिकडं बघायला लागलं. ‘बघून घेतो’ म्हणत सरार माघारी पळालं. तसं त्या मागं त्याची चौकडी पशार. आबाचा गुस्सा निवल्यागत झालं. डेर्‍यापाशी येऊन लोकं आमच्या आकलेची मापं काढायला लागली.
‘‘तुमची लायकी आहे का? कोन इचारतो तुम्हाला?… दर्जा आहे का तुम्हाला?’’ मी मनात म्हटलं दर्जा कोण ठरवणार? ज्यानं जन्म दिला त्यालाही नाही ठरवता आला दर्जा. देवानं फक्त माणसं जन्माला घातली. दर्जा ज्यानं त्यानं आपापल्या अक्कल हुशारीनं ठरवला.
अशी भानगड करून आबा डेर्‍यापाशी आला. माय तशीच बडबडत भाकर्‍या थापत होती. आबा खाटल्यावर उताणा पडून आभाळात बघत होता. उपाशीपोटी आबाला हे नवं दुखरं. नेलं पोलिसांनी पकडून. कंदिलाच्या उजेडातही किर्र काळोख.
‘‘कुठनं आला रं तू… बोलना ये भाड्या… हे गाव कुणाचं आहे माहीत आहे का? तालुक्यात नाव हाये सरपंचाचं… तुझं काय हाय रं..? च्यायला.. रावनाचा माज दाखवतो…’’ असं म्हणत फरपटत नेलं आबाला.
कशीबशी रात्र सरली. डेर्‍यावरच्या कोंबड्या खाली उतरल्या. गाढवं तशीच बांधलेली. माय मला घेऊन पोलीस पाटलाच्या दारात न्यायासाठी पदर पसरून ठाण मांडून बसली. पाटलाच्या घरात आबाच्या नावाची खडेफोड सुरू होती. त्यांच्या पोराला मारलेलंच घरात दुखत होतं. त्यानं काय केलं याचा लवलेश नाही. तिथं मायचं ऐकायला कुणी तयार नाही.
सरपंचानं आबाच्या नावाची पोलिसात तक्रार केल्यामुळे त्यांचच खरं झालं आणि गावालाही पटलं ते. माय बरोबर म्हणते. ‘हे गाव आपलं नाही.’ पोलिसातल्या एका भल्या माणसानं आबाला जवळ घेऊन समजावलं.

‘‘गप गुमान हो हो म्हणत राह्याचं. तू काय सरपंचाच्या तोडीची तोड व्हनार नाय. तू कायबी कर कितीबी आतडी पिळवटून खरं खरं म्हून कोकललास तरी तुजा आवाज हितं कुनाच्या कानात शिरनार नाय… उगाच मार खान्यापेक्षा गलती झाली सांगून मोकळा व्हय.’’
आबाला आता सगळं अवघड झालं होतं. पोलीस चौकीत आबाची खातीरदारी सुरू होती.
‘‘माजलाय … तीनशे साठ लावा त्याला…’’ दुसरा पोलीस भयंकर संतापानं ओरडला.
‘‘सायेब, माझं गरिबाचं ऐकून घ्या..’’ आबा कळकळला.
‘‘काय ऐकून घ्या… हापमर्डरची केस आहे ही.. च्यायला वर तोंड करून माझं ऐका… माझं ऐका.. रातच्याला दारू ढोसायची आन माज दाखवायचा.’’ मोठं साहेब आबावर भलते खवळले.
‘‘सायेब मया पोरीचा हात धरला.’’
‘‘मग?.. हातच धरला नं?’’
‘‘छेडछाड केली…’’
‘‘छेडछाड का? तुजी पोरगी म्हंजी काय आप्सरा हाय का? तिनं बी काय तरी केलं असनार.. वय काय रे तिचं…?’’
‘‘सायेब मयी रुखी आसं काय करनार नाय… लगीन ठरलंय तियं..’’ आबाला काही बोलवंना.
‘‘दादा झालां का तू …? दांडकं घेऊन कोनालाही मारत सुटायचं लायसन काडलं का तू? ये पवार घे रे याला… च्यायला…’’
‘‘सायेब… मी हात जोडतो… मनं ऐका.’’
‘‘घेतलं.. घेतलं ऐकून.. लय ऐकलं… च्यायला रेप बीप केला असता तर… मर्डरच केला असता भडव्यानं.. घ्या आत साल्याला.’’
दोघांनी आबाला ओढीत ताणीत आत नेलं.
आबाला त्यातनं एक गोष्ट कळली. गरिबाला न्याय नसतो आणि न्याय मागण्याचा हक्कही नसतो. गरिबाला कुणी ऐकत नाही.
सरपंचाच्या दारात मायनं बस्तान ठोकलं. घरातल्या बाया बापड्यांपुढं पदर पसरला. रडून-कळकळून हात जोडून माफी मागितली.
‘‘पाया पडते मी… चुकलं आमचं… मालकाला सोडवा माझ्या.’’ माय आसवं पुशीत पाटलिणीच्या पायावर कळवळतीय. पाटलिणीला तिच्या पोराला मारण्याचं दुःख मोठं होतं. गरिबाच्या इज्जतीचा प्रश्‍नच नव्हता.

‘‘चालती हो इथून.’’ त्या घरातला हा एकमुखी सर्वांचा आवाज.
रुखी सकाळी उठून डेर्‍यातल्या आरशात स्वतःला बघत राहिली. मी शाळा सोडून दिवसभर गाढवं घेऊन भटकत राहिलो.
‘तरुण असणं इतकं जड असतं का बाईच्या जातीला?’ रुखीला कळंना. माय दिवसभर विझल्या चुल्ह्यापाशी आसवं गाळीत बसली.
सानच्याला मी गाढवं घेऊन डेर्‍यापाशी आलो. कधी पाहिला नाही असा आबा खाटल्यावर हळदीच्या अंगांनी तळमळत होता.
मायच्या हातात हळदीचं ताट. आबा तळमळतोय. मी माय जवळ गेलो. विचारलं.
‘‘काय झालं वं माय?’’
‘‘न्याय जाला. उद्या दिस उगवायच्या आत हे गाव सोडायचं.’’
‘‘उद्या नाय… आज रातच्यालाच बिर्‍हाड हालवूया.’’ आबा कण्हत जेमतेम बोलला. त्याला मारण्यात पोलिसांनी कसलीही कसर केली नव्हती. तो गळत्या अवसानातून गाव सोडण्याच्या निर्धारावर ठाम झाला. गाढवं ज्याच्या त्याच्या जागी उभी होती. काल रात्रीपासून आम्ही उपाशी …
सूर्यास्त झाला. झुंजरूक पडायला लागलं.
बाहेरचं खाटलं मायनं भुर्‍यावर उताणं बांधलं. रुखीनं भांडीकुंडी मोठ्या टोपल्यात जमा केली. कोंबड्यांची टोपली एका गाढवावर बांधली. कुदळ, फावडी, हातोड्या, सरपण मायनं खाटल्याच्या झोळीत आटून बांधलं. घडवलेले पाटे, वरवंटे आणि कपडेलत्ते भरलेला बोचका एका गाढवावर चढला. सभोवताली काळी कुट्ट रात्र. रुखीनं डेर्‍याच्या दोर्‍या सैल केल्या. गाव शांत झोपलं. कंदील मोठा करून मायनं अवती भवती काय राहिलं याची झडती घेतली. चुल्ह्याची तीन दगडं आणि राख सोडली तर सगळं बिर्‍हाड आता गाढवावर चढलं. गाढवं तयार झाली.
‘‘आता कोन्या गावला जायचं?’’ मी विचारलं.
‘‘तुला कितीदा सांगलं.. गाढवं नेतील तिकडं जायाचं. मानसापेक्षा गाढवंच बरी. पर मानुस न्हेमी त्याच्या आकलंचं माप काडतो.’’ माय म्हणाली.
काठी टेकीत आबा त्याही वेदनेत पुढं डचकत-लंगडत चालायला लागला. त्याच्या मागं गाढवं.. त्यांच्या मागं मी आणि रुखी.. आमच्या मागं माय. तिच्या डोक्यावर भलं मोठं बोचकं. त्यात माझ्या शिक्षणाची आणि रुखीच्या लग्नाची स्वप्नं. माय सगळ्या बिर्‍हाडाच्या मागं चालतीय. ती म्हणते, ‘मला कोन खातं? मला नाय कसली भीती….’

काळीकुट्ट भयान रात्र. कंदिलाच्या उजेडातली पावलं. काटेनं शेतं आली, गावं आली. नदी नाले आले. दूरवर कुत्री भुंकत होती.
गाढवांच्या खुरांचा आवाज वातावरणात घुमत होता.
रात्र सरली. झाडांवरची पाखरं जागी झाली. उजाडलं. सकाळच्या उजेडानं दिशा दिली. त्या वाटेनं दूर एक मोठं शहर दिसलं.
आबाच्या डोळ्यात कायतरी चमकलं. माय बी सुख लागल्यागत हसली. जुनं सगळं विसरून गेली. दोघांच्या डोळ्यात माझी शाळा दिसली.
एका माळावर गाढवं थांबली. रात्रभर ओझं ताणून थकली ती.
‘‘इथं डेरा ठोकुया’’ आबा म्हणाला. मायनं आभाळात पाहिलं. ती म्हणते, ‘तो न्हेमी करून बघतोय.’ कोण ते तिलाच ठावं. बिर्‍हाड खाली उतरलं. कोंबड्या सुटल्या. भांडी चमकाय लागली.
‘‘ह्यो कंचा गाव?’’ मी उत्सुकतेनं विचारलं. ती घडीभर गप्प.
‘‘गाव कंचंबी असूदे.. आपन ते आपलंसं कर्‍याचं. नायच जमलं तं गाढवं तयार हायीतच. माय म्हणाली. तिनं पाटे, वरवंटे उतरवले. आबाच्या अंगात कुठचं बळ आलं कळलं नाही. त्याच्या अंगाची हळद उजेडात खुलायला लागली. ‘रुखे…. गाढवं हाक’ एवढं बोलून त्यानं लोखंडी पट्ट्या हातोड्यानं जमिनीत ठोकल्या. डेर्‍याच्या रश्श्या बांधल्या, मायनं दगड धुंडाळून चुल्हा थाटला. हुर्रर्र करीत रुखीनं गाढवं हाकलली. शाळा कुठं दिसते मी शहराच्या दिशेनं बघत होतो. मला पोलिसांपेक्षा मोठ्ठा साहेब व्हायचंय. खूप शिकायचंय. खूप खूप शिकायचंय…

– विजय जोगमार्गे

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.