Now Reading
बिरबलाची शिकवण

बिरबलाची शिकवण

Menaka Prakashan

प्रेरणाच्या स्वप्नात अकबराचाच दरबार आला. ती न्याय मागण्यासाठी अकबराच्या दरबारात गेली होती. सोनूच्या वाढदिवसाला गेली दोन वर्षं घडलेला सगळा प्रकार तिने राजाला सांगितला. राजानेही दखल घेतली आणि बिरबलाला दरबारात बोलावून घेतलं.

प्रेरणा, प्रतीक आणि त्यांचा मुलगा सोनू हे तिघंही एका अपार्टमेंटमध्ये राहत होते. या अपार्टमेंटमध्ये राहायला येऊन त्यांना नुकतेच सात-आठ महिने झाले होते. प्रेरणा आयटी कंपनीमध्ये नोकरीला होती तर कामानिमित्त प्रतीक बेंगळुरूला असायचा. एका प्रोजेक्टसाठी त्याला कंपनीने दोन वर्षं बेंगळुरूला पाठवलं होतं. लहानगा सोनू तिसरीमध्ये शिकत होता. प्रेरणाचं रोजचं वेळापत्रक काटेकोर ठरलेलं होतं. सकाळी घरातून आठ वाजता, ती सोनूला घेऊन बाहेर पडायची. त्याला शाळेत सोडून तशीच पुढे ऑफिसला जायची. शनिवार-रविवारची सुट्टी वगळता, हा दिनक्रम ठरून गेलेला होता. प्रतीक, महिन्यातून एक-दोनदा घरी यायचा, तेव्हा तिघं मिळून छान धमाल मस्ती करायचे.

प्रेरणा इथे नवीनच राहायला आल्याने आणि दिवसभर नोकरी करत असल्याने, तिच्या अद्याप ओळखी झाल्या नव्हत्या. ती ऑफिसला निघताना दिसली, की अपार्टमेंटमधल्या काही बायका आपसांत कुजबूज करताना तिला दिसायच्या. कदाचित त्या तिच्याबद्दलही बोलत असाव्यात! तिच्याशी मात्र स्वतःहून बोलायला त्यांच्यापैकी कधी कुणी यायचं नाही. अर्थात, तिलाही तेवढा वेळ नसायचाच. नोकरी करणार्‍यांना एवढा विचार करायला तरी कुठे वेळ असतो म्हणा! त्यातून सकाळची वेळ म्हणजे तर एक-एक सेकंद महत्त्वाचा असतो. त्यामुळे प्रेरणासुद्धा कोणी बायका गप्पा मारताना दिसल्याच, तर त्यांना एक छानसं स्माईल देऊन निघून जायची. एकदा गेली की तिच्या मागे, लोकांना चर्चा करायला उधाणच येत असणार, हे ती ही जाणून होतीच.
प्रेरणा खूप आखडू आणि अहंकारी आहे, असंच आसपासच्यांनी मत करून घेतलं होतं. त्यामुळे कधी सुट्टीच्या दिवशी ती आणि सोनू बागेत खेळताना दिसले, तरी कोणी तिला ओळख द्यायचे नाहीत. ती समोर दिसली की टाळायचे. कधीकधी तर, ती ऑफिसवरून येताना दिसली की घोळका करून गप्पा मारत थांबलेल्या बायका घरी निघून जायच्या.

प्रेरणाला आता हे सगळंच विचित्र वाटू लागलं होतं. इथे राहायला येऊन वर्ष होत आलं तरी तिच्या फार कोणाशी ओळखीही झाल्या नव्हत्या. या सगळ्यामुळे असेल कदाचित, पण सोनूलाही इथे आल्यापासून कोणीच नवे मित्र मिळाले नव्हते.
एक दिवस तिनं शांतपणे परिस्थितीचा विचार केला आणि इतरांना बदलवण्यापेक्षा, आपण स्वतःलाच थोडं बदलायचं, असं ठरवून टाकलं. परिस्थिती बदलावी असं वाटतं, तेव्हा जगाला बदलवण्यापेक्षा स्वतः बदलणं केव्हाही श्रेयस्कर असतं, हे ती जाणून होती.
***

सोनूचा वाढदिवस आठ दिवसांवर आला होता. वाढदिवसाची सगळी जय्यत तयारी झाली होती. चॉकलेट्स, मुलांसाठी रिटर्न गिफ्ट्स सगळं तिनं आणून ठेवलं होतं. बिल्डिंगमध्ये प्रत्येकाच्या घरी जाऊन सोनूनं वाढदिवसाला घरी येण्याचं आमंत्रण दिलं.
पण दुर्दैव! त्या दिवशी सोनूकडे कोणीच आलं नाही. शेवटी प्रेरणा-प्रतीक आणि सोनू, तिघांनी मिळूनच त्याचा वाढदिवस साजरा केला. या प्रकारामुळे सोनू खूप हिरमुसून गेला होता. पण त्याला प्रेरणानं समजावलं, ‘‘अरे! आपण या वर्षीच राहायला आलोय ना, अजून तुझी आणि बिल्डिंगमधल्या मुलांची छान मैत्री व्हायची आहे ना.. त्यामुळे कोणी आले नसतील. तू वाईट वाटून घेऊ नकोस. आपण तुझा पुढचा वाढदिवस छान सगळ्यांसोबत साजरा करूया.’’ सोनूची समजूत पटली आणि तो शांत झोपून गेला. दुसर्‍या दिवशी सोनूने सर्व चॉकलेट्स त्याच्या शाळेत वाटले. वर्गातले मित्र-मैत्रिणी खुश झाले आणि सोनूची नाराजीही कुठच्या कुठे पळाली.

***
पुढेही प्रेरणाचे दिवस असेच धावपळीचेच राहिले. कामाचा व्याप वाढतच राहिला. अजूनही, काही मोजक्या जुजबी ओळखी सोडल्या तर प्रेरणा आणि सोनूचं फार कोणी जीवाभावाचं झालं नव्हतं. असंच वर्ष सरलं आणि पुन्हा सोनूचा वाढदिवस जवळ आला.
या वर्षी प्रेरणानं स्वतः मुलांच्या घरी जाऊन, त्यांच्या पालकांशी बोलून निमंत्रण दिलं. पण दोघं-तिघं मुलं सोडली तर या वर्षीही फारसं कोणी आलं नाही. सोनू तर नाराज झालाच पण आता तर तिलाही खूप वाईट वाटलं. ती प्रतीकशीही बोलली. पण प्रतीक ‘जाऊ दे, सोडून दे, कशाला एवढा विचार करतेस?!’ इतकंच म्हणाला.

प्रेरणा मात्र अंतर्मुख झाली. यावर कसा मार्ग काढावा, याचा विचार करत राहिली. आयुष्यात घडणार्‍या घटना किंवा परिस्थितीवर आपलं नियंत्रण असतंच असं नाही. अशा वेळी योग्य वर्तन आणि सकारात्मक विचारांचा समतोल राखता यायला हवा, हे ती स्वतःलाच समजावत राहिली.
रोज रात्री झोपताना प्रेरणा, सोनूला अकबर-बिरबलाच्या गोष्टी सांगायची. एके दिवशी रात्री गोष्ट सांगून झोपल्यावर प्रेरणाच्या स्वप्नात अकबराचाच दरबार आला. ती न्याय मागण्यासाठी अकबराच्या दरबारात गेली होती. सोनूच्या वाढदिवसाला गेली दोन वर्षं घडलेला सगळा प्रकार तिने राजाला सांगितला. राजानेही दखल घेतली आणि बिरबलाला दरबारात बोलावून घेतलं. अकबराने बिरबलाला सगळं सांगितलं आणि उपाय विचारला. बिरबल चतुर होता. हसून म्हणाला,‘‘उपाय एकदम सोपा आहे. आधी समस्येच्या मुळाशी हात घालायला हवा.’’ कोणाला काही कळेना. अकबरानं त्याला नीट सविस्तर सांगायची आज्ञा केली. बिरबल म्हणाला, ‘‘लहान मुलं निरागस असतात. त्यांची मनं आधी जिंकायची. कशी ते मीच सांगतो. घरात एखादा फिश टँक आणायचा. रंगीबेरंगी मासे पाहण्यासाठी सोनूच्या ओळखीतली लहान मुलं आपोआपच घरी येतील. ती आली की त्यांच्या मागे, बिल्डिंगमधली इतर मुलं, मग त्यांना शोधत त्यांच्या आयाही आपसूकच घरी येतील. एकदा मुलं स्वतःहून बोलायला लागली की त्यांच्यात मैत्री व्हायला कितीसा वेळ लागणार?’’
बिरबलाची ही युक्ती ऐकून अकबर जोरजोरात हसायला लागला.

गडगडाटी हसण्याचा आवाज कानावर पडल्यासारखं वाटलं आणि प्रेरणाला खडबडून जाग आली. ती स्वप्नात होती, हे तिला लगेचच कळलं. पण आता तिच्याही चेहर्‍यावर हसू उमटलं. कारण आता प्रेरणाला तिच्या समस्येचं उत्तर मिळालं होतं.
रविवार उजाडला आणि तिनं ठरवल्याप्रमाणे एक छान फिश टँक घरी आणून खिडकीजवळ ठेवला. त्यातले रंगीत मासे बघून सोनू तर फारच खुश झाला. दोन-तीन दिवसांतच हळूहळू छोटी मुलं चोरून चोरून खिडकीजवळ येऊन मासे बघू लागली. काही दिवसांनी दारात आणि नंतर फिश टँकपर्यंत पोचली. आपल्या घरी आलेली मुलं बघून सोनूचा चेहरा खुलून जायचा. त्यांच्याशी गप्पा मारून सोनू आनंदी उत्साही राहू लागला. लवकरच त्यांची मैत्री वाढू लागली, इथेच खेळत रमणाा-या मुलांना शोधायला त्यांच्या आयाही येऊ लागल्या. आपसूकच प्रेरणाचीही सर्वांशी मैत्री झाली.
तिसर्‍या वर्षी, प्रेरणानं न चुकता बिल्डिंगमधल्या सर्वांना वाढदिवसाला बोलवलं. सगळेजण आनंदानं आले. खूप मोठा वाढदिवस साजरा झाला. त्या दिवशी, पहिल्या दोन वर्षांचे रिटर्न गिफ्ट्सही प्रेरणानं मुलांना वाटून टाकले. सोनूच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. प्रतीकही त्या दिवशी खूप खुश होता. ‘‘प्रेरणा तू जिंकलीस! तुझं नाव सार्थक केलंस!’’ असं म्हणून त्यानंही तिचं तोंडभरून कौतुक केलं.
घरामध्ये अकबर आणि बिरबलही आल्याचा प्रेरणाला भास झाला आणि तिनं मनोमन त्यांचे आभार मानले.

‘मनात प्रेमभाव असेल तर जंगलातही मंगल आहे आणि प्रेमभाव नसेल तर नगरातही नरक आहे’, असं सांगणारा बिरबल चतुर, हुशार , बुद्धिमानी आणि हजरजबाबी आहे हे प्रेरणाला मनोमन पटलं. ‘लोकांनी आपल्याशी कसं वागायचं हे जरी आपल्या हातात नसलं तरी त्यांच्याशी प्रेमपूर्वक वर्तन करणं आपल्या हातात नक्कीच असतं, प्रेमानंच माणसं जोडली जातात…’
स्वप्नात बिरबलानं दिलेली ही शिकवण प्रेरणासाठी तर लाखमोलाची ठरली होती.

– प्रतिभा सावंत

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.