Now Reading
बाई

बाई

Menaka Prakashan

ओ’हेन्री या अमेरिकन लेखकाच्या एका फारशा प्रसिद्ध नसलेल्या कथेचा हा भावानुवाद. ओ’हेन्रीच्या कथानकात सहसा न आढळणारा खट्याळपणा या कथेत ठासून भरलेला आहे. ओ’हेन्रीचा अतिशय आवडता, धक्कातंत्रावर आधारित शेवट; या कथेत भलताच खट्याळ आहे. आजकालच्या एका अतिशय जिव्हाळ्याच्या समस्येला भिडणारी ही कथा रहस्यकथेचा बाजही झोकात मिरवते. व्यक्तिरेखांपेक्षा कथानकच मस्त फिरकी घेते. ‘ती’ आणि ‘तो’ या आदिम पाठशिवणीला झकास खोडकरपणे पेश करते.

त्या कार्यालयाचा दर्शनी दरवाजा भलताच देखणा होता. पाच वाजून गेले होते. कर्मचारी पांगले होते. सफाई कर्मचार्‍यांची, काम आटोपून घरी परतण्याची लगबग चालू होती.
पन्नासेक वर्षांचा गलेलठ्ठ रॉबिन्स या कंपनीचा प्रमुख भागीदार होता खरा, पण त्याला जास्त पसंत होती छानछोकी. ‘‘आज रात्रीही भयानक उकाडा असणार आहेच पण तुला काय फरक पडणार आहे म्हणा! मस्तपैकी हवेशीर, शहराच्या वेशीबाहेर राहणारे लोक तुम्ही! तुमच्यासाठी रात्र म्हणजे चांदण्याची बरसात!’’ तो म्हणत होता.
हार्टली, त्याचा धाकला भागीदार. या प्रशंसेवर नुसताच उसासला. हार्टली- वय वर्ष एकोणतीस- जरासा गंभीर, छानपैकी देखणा, अजून काही बोलणार इतक्यात घाई-घाईनं एक व्यक्ती आत आली.
‘‘मला कळलंय ती कुठे राहतेय.’’ तो गुप्तहेर कुजबुजला.
हार्टलीनं चमकून इकडे-तिकडे पाहिलं. सुदैवानं तेवढ्यात रॉबिन्स तिथून सटकला होता. आयताच श्रोतृवृंद अशा प्रकारे निसटल्यानं नाराज झालेल्या गुप्तहेरानं आता खडा स्वर लावला.
‘‘हा तिचा पत्ता.’’
हार्टलीनं तो चुरगाळलेला चिटोरा घेतला.

‘‘ती या पत्त्यावर आठवड्यापूर्वी राहायला आलीये. तिच्या हालचालींवर अजून नजर ठेवायची असेल तर पाळतीसाठी माझा पगार नगण्य आहे. दररोज संध्याकाळी रिपोर्ट मिळेल. व्यवस्थित टाईप वगैरे केलेला.’’ गुप्तहेराची वटवट चालूच होती.
‘‘काहीच गरज नाही.’’ हार्टलीनं त्याचा धबधबा थोपवला. ‘‘मला फक्त पत्ता हवा होता. आजचे पैसे किती द्यायचे?’’
गुप्तहेराला कटवल्यावर हार्टलीनं ऑफिस बंद केलं आणि टॅक्सीला हात केला. शहराच्या पूर्व दिशेला पोचल्यावर त्याला तो रस्ता सापडला. जरासा एकाकी, कोणे एकेकाळच्या भव्य वास्तूंच्या भग्नावशेषांनी भकास. थोडं चालल्यावर एकदाची ती इमारत सापडली. इमारतीच्या दर्शनी भागी वाळायला टाकलेले कपडे लोंबकळत होते. आजूबाजूला लहान मुलांचा हैदोस चालू होता.
हार्टलीनं बेल दाबल्यावर दर्शनी दरवाजा उघडला. जरासा रडतखडत, किंचितसा करकरत. हार्टली चौथ्या मजल्यावर पोचण्यासाठी पायर्‍या चढायला लागला. त्याच्या पावलांत अधीरता होती; जवळच्या मित्राला भेटू इच्छिणार्‍या परिचिताची.
ती चौथ्या मजल्यावर एका उघड्या दाराशी उभी होती. विवियन. तिनं त्याला आत बोलावलं. तिच्या चेहर्‍यावर हसूू पसरलं होतं. तिनं त्याला बसायला खुर्ची दिली. खिडकीशेजारी असलेल्या एका सुबकशा पण अवाढव्य आणि जुनाट पलंगाला ती स्वत:ही टेकली.
हार्टलीनं बोलायला सुरवात करण्यापूर्वी तिच्याकडे कटाक्ष टाकला. त्याला पुन्हा एकदा आपल्या निवडीचा अभिमान वाटला.
विवियन एकविशीची होती. सोनेरी, सळसळते, मऊ-रेशमी केस. नितळ, गोरीपान त्वचा. निळेशार, निष्पाप डोळे. तब्येत तशी धडधाकट होती तिची, पण तिच्या रोमारोमांत एक अनामसा हळुवारपणा भिनला होता. तिनं पांढरा टॉप आणि काळा स्कर्ट परिधान केला होता. साधेसे कपडे. मोलकरीण असो वा इनामदारीण, कोणाच्याही अंगावर खुलणारे.

‘‘विवियन,’’ हार्टली अजिजीनं म्हणाला, ‘‘तू माझ्या पत्राला उत्तर नाही दिलंस! आठवडाभर हुडकल्यावर पत्ता लागला तुझा. मला तुला भेटायचंय हे माहीत असूनही का हा असला खेळ?’’
स्वप्नाळू डोळ्यांनी खिडकीबाहेर पाहत खळखळत्या शब्दांत ती म्हणाली, ‘‘कसं सांगू मी तुम्हाला? मला तुमचा प्रस्ताव तसा छानच वाटतो. पण काय करणार? मी पडले शहरी मुलगी! असे तुमच्या घरचे पार शहराच्या हद्दीपलीकडचे एकाकीपण मला कधीकधी अवघड वाटतं.’’
‘‘सांगितलंय ना मी तुला?’’ हार्टली उत्कटतेनं म्हणाला. ‘‘मी तुला जे हवं ते सगळं द्यायचा माझ्या परीनं पूर्ण प्रयत्न करेन. तू नाटक-सिनेमा पाहायला, मैत्रिणींना भेटायला, खरेदीसाठी, हव्या तितक्या वेळा शहरात येऊ शकतेस. माझ्यावर विश्‍वास आहे ना तुझा?’’
‘‘पूर्णपणे.’’ ती म्हणाली, ‘‘मला तुमच्याबद्दल सारं काही माँटगोमेरींकडेच कळलंय.’’

‘‘हो, आठवतेय ना…मला ती संध्याकाळ… जेव्हा मी तुला माँटगोमेरींकडे पहिल्यांदा पाहिलं. बाईसाहेब मनापासून तुझी स्तुती करत होत्या. पण मला ती स्तुती फिकीच वाटली. मी ते जेवण विसरूच शकत नाही. विवियन, मला वचन दे. चल माझ्याबरोबर. तुला इतकं चांगलं घर कधीच नाही मिळणार.’’
तिनं सुस्कारा सोडला. ती बोटांशी खेळत बसली.
हार्टलीला अचानक एका आगळ्याच संशयानं घेरलं.
‘‘विवियन, तू दुसर्‍याच कोणाला तरी…’’
जराशी लाजत ती म्हणाली, ‘‘नाही म्हणजे मी कोणाला तसं वचन नाही दिलंय.’’
‘‘नाव काय त्याचं?’’
‘‘टाऊनसेंड.’’
‘‘रॅफोर्ड टाऊनसेंड?’’ हार्टलीचा चेहरा ताठरला होता. ‘‘त्याला तुझा पत्ता कसा लागला? मी त्याच्यासाठी काय काय नाही केलं?’’
‘‘आलेत ते इथे. माझ्या उत्तरासाठी. वरतीच येताहेत. आता मी काय बरं करू?’’
इतक्यात दाराची बेल वाजली.
‘‘तू थांब इथेच. मी बघतो.’’
हार्टलीला पाहून टाऊनसेंडचा चेहराच पडला.
‘‘परत फिरायचं! चालू पड. मी तुझ्यासाठी काय काय नाही केलं…’’

‘‘तुमचा गैरसमज होतोय.’’ टाऊनसेंड म्हणाला. ‘‘मी सुताराचा पत्ता शोधत होतो.’’ टाऊनसेंड जिना उतरताना स्वत:शीच शिव्या पुटपुटत होता.
‘‘विवियन,’’ हार्टलीनं मनधरणी सुरू केली. ‘‘आता टंगळ-मंगळ पुरे. आत्ता चल, निघूयात.’’
‘‘आता मी तिथं यायचं? ती तिथं असताना?’’
कोणीतरी थोबाडात मारल्यासारखा हार्टलीचा चेहरा पडला. हात पाठीमागे बांधून त्यानं खोलीत तीन-चार येरझार्‍या मारल्या.
‘‘ठीक आहे.’’ सरतेशेवटी तो गंभीरपणे म्हणाला. त्याच्या कपाळावर घर्मबिंदू साचले होते. ‘‘ती जाईल. मी तिच्यापायी अडचण का सोसू ? तिनं मला एक दिवस धड जगू दिलं नाही. ठीक आहे विवियन, तुला घरी नेण्याआधी तिनं घर सोडलेलं असेल. शब्द आहे माझा.’’
‘‘कधी जाईल ती?’’
‘‘आज रात्री.’’ हार्टली ठामपणे म्हणाला.
‘‘मग माझी कसलीच ‘ना’ नाही.’’ विवियन म्हणाली. तिनं गोड हसून भाबड्या चेहर्‍यानं हार्टलीकडे पाहिलं. तिचं मन इतकं सहज वळेल, वाटलंच नव्हतं हार्टलीला.
‘‘मला वचन हवंय.’’ हार्टली म्हणाला.
‘‘दिलं.’’ ती म्हणाली.
दरवाजाशी तो जरासा थबकला. आपल्याच भाग्यावर विश्‍वास नसल्यासारखा.
‘‘उद्या.’’ बोट रोखून तो म्हणाला.
‘‘हो, उद्या.’’ ती हसून उत्तरली.
दीड-दोन तासांनी हार्टली या उपनगरातल्या रेल्वे स्टेशनवर उतरला. अर्धा-पाऊण तास भरभर चालल्यावर तो एका देखण्या दुमजली बंगलीच्या दारी पोचला. बंगलीभोवती छान बाग फुलली होती. दुतर्फा मऊ-मखमली हिरवळ दाटलेल्या वाटिकेतून तो बंगलीपर्यंत पोचणार, तोच ती धावत आली. त्याच्या गळ्यात पडली. हातात हात गुंफून दोघं दिवाणखान्यात पोचले.

See Also

‘‘ममा आली होती. जेवणासाठी. पण चाललीये परत.’’ ती म्हणाली.
‘‘मला तुला काही सांगायचंय.’’ हार्टली म्हणाला. ‘‘मी हे गुपित हळुवारपणे फोडणार आहे. पण आता तुझी ममा आलीच आहे तर सांगूनच टाकतो कसा!’’
तो तिच्या कानात काहीतरी कुजबुजला.
ती किंचाळली, चित्कारली. तिची आई धावतच दिवाणखान्यात आली. ती पुन्हा किंचाळली. लाडाच्या बायकोची आनंदाची किंकाळी.
‘‘ओ, ममा…’’ ती आनंदानं उसळत होती. ‘‘तुला माहितीये! ती परत येतेय. हो गं, तीच ती, माँटगोमेंरींकडून आपल्याकडे आलेली, बाई मिळाली. बाई येणार.’’
उत्साहाचा पहिला भर ओसरल्यावर उत्कट आनंदानं ती नवर्‍याकडे वळली. ‘‘चल, चालू कर तुझं दुसरं काम. जा, किचनमध्ये जा. तिला हाकल. नाहीतरी नुसती झोपाच काढते ही बया!’’

मूळ कथा : गर्ल । लेखक : ओ’हेन्री
अनुवाद : प्रतिमा अग्निहोत्री

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.