Now Reading
बाईचा धर्म…!

बाईचा धर्म…!

Menaka Prakashan

कुंतीचा त्याग, समर्पण याबद्दल कृतज्ञतेचे शब्द दिसत नाहीत. का? कारण हे तर बाईच्या जातीचं कर्तव्यच आहे. त्यात काय फार मोठं, असं आजही समजलं जातं. कुंतीचं आयुष्य समजून घेताना तर हे प्रकर्षानं जाणवतं. पण अजूनही त्यात फार बदल नाही, हे वास्तवही नाकारून चालणार नाही.

माणसाच्या आयुष्यात स्वतःच्या हातून घडलेल्या गोष्टींपेक्षा सर्वस्वी इतरांच्या हातात आयुष्य देऊन वार्‍यानं इतस्ततः भरकटणार्‍या पानाप्रमाणं जगणं पराधीन केलेलं दिसून येतं. ‘बाईचं’ आयुष्य तर यात अगदी तंतोतंत फिट बसतं. अगदी रामायण-महाभारतातल्या बायकांचं आयुष्यही पराधीनतेचं उदाहरण म्हणूनच आपल्याला दिसतं. यामध्ये प्रामुख्याने कुंतीचं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल. कुंतीच्या बाबतीत सुख जवाएवढंसुद्धा नव्हतं. पण ती दुःखाचे पर्वत मात्र जन्मभर उरावर बाळगून होती. जेवढ्या पुरुषांशी तिचा संबंध आला, त्या सर्वांनी आपापल्या परीनं तिला दुःखच दिलं. कुंतीचे वडील शूरसेन. हा राजा होता आणि कुंतिभोज हा त्याचा आतेभाऊ. कुंतीच्या जन्माआधीच तिचं भविष्य ठरलं होतं. तिच्या आधी मुलगा झाला असता तर ते टळलं असतं, कारण तो शूरसेनानं अजिबात दिला नसता कारण तो राज्याचा वारस झाला असता. पहिली मुलगी ‘कुंती’ झाली आणि ब्राह्मणांच्या अनुग्रहासाठी आसुसलेल्या कुंतिभोजाला ती शूरसेनानं दिली कारण शूरसेनानं ‘माझं मूल तुला देईन’ अशी शपथ घेतलेली होती. मुलींचे जे नाना उपयोग त्यातलाच हा एक. लग्नानं ती परघरी जाईच, पण त्याआधीही तिला एखाद्या मित्राला/आप्ताला देऊन टाकणं, ब्राह्मणांच्या, ऋषीमुनींच्या सेवेसाठी देणं यात विशेष काहीच नव्हतं. कुंतीचं नाव ‘पृथा’. परंतु कुंतिभोजानं खाष्ट ऋषींची सेवा करण्यासाठी तिला घेतलं, कुंती-देशाच्या भोजाची मुलगी म्हणून ‘कुंती’ नाव पडलं. ‘दुर्वास’ नावाच्या भयंकर कोपिष्ट ऋषीची या कुंतीनं वर्षभर सेवा (?) केली. एकदाही त्याला राग येऊ दिला नाही. त्यानं जाताना तिला प्रसन्न होऊन पुत्रप्राप्तर्थ मंत्र दिला. या मंत्रांनी आवाहन केलं की, कोणतेही देव कुंतीला वश होतील असे हे मंत्र होते. पोरबुद्धीनं कुंतीनं सूर्याला बोलावलं. कुंवारपणीच सूर्यापासून झालेला हा मुलगा म्हणजे कुंतीनं जन्मभर पोटात बाळगलेलं एक दुःख होतं. एकदा टाकून दिल्यावर तिला तो जवळही करता येईना. मोठेपणी सर्व जन्मरहस्य सांगूनही तो आईचं (कुंतीचं) कृत्य विसरू शकला नाही व तिला क्षमाही करू शकला नाही.

कर्णाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत क्षणाक्षणाला कुंती त्याला जन्माला घालण्याच्या पापाची व त्याला टाकून देण्याच्या अन्यायाची भरपाई करत होती. एका बापानं दत्तक दिली. त्यातून हे दुःख निर्माण झालं. दुसर्‍या बापानं लग्न लावलं ते एका व्यंग असलेल्याशी- पंडूराजाशी- त्यातून निर्माण झालेली दुःखं, तिच्या पहिल्या दुःखाच्या जोडीला जन्मभर सोबतीला राहिली. सवती-सवती असणं हे त्या वेळच्या बहुसंख्य स्त्रियांचं नशीब. त्या सवतीपणात वडीलपणा मिळवण्याची धडपड कुंतीच्याही नशिबाला आली. दुर्वासांनी दिलेल्या मंत्राचा वापर करून युधिष्ठिर, भीम, अर्जुन यांची ती आई झाली. न्यायबुद्धी असल्यामुळे तिच्या सवतीला- माद्रीलाही मंत्र दिला. त्यामुळे माद्रीला नकुल व सहदेव झाले. पांडूच्या चितेवर माद्रीनं स्वतःला जाळून घेतलं आणि कुंतीनं कोणताही सावत्रभाव मनात न ठेवता पाच पांडवांचं आईपण मनापासून स्वीकारलं व निभावलं. कुंतीचं आयुष्य कायमच खडतर राहिलं. पंडूबरोबर राज्य सोडून वनवास, वारणावतातलं लाक्षागृह, त्यानंतरचा वनवास, पुढे मूल व सून वनवासात त्यामुळे एकाकी जीवन व आयुष्याच्या शेवटी स्वेच्छेनं धृतराष्ट्र व गांधारी, विदुरासोबत वानप्रस्थाश्रम. त्याग-समर्पण हे कुंतीच्या आयुष्याचे जीवनभराचे भोग. त्यामुळे पंडूची बायको असणं आणि पांडवांची आई असणं या दोन अगदी वेगळ्या गोष्टी होत्या आणि कुंतीनं त्या आयुष्यभर निभावल्या. ‘आईपण’ व ‘बायकोपण’ न्यायबुद्धीनं त्याच समर्पणाच्या भावनेतून! पण तिचा त्याग, समर्पण याबद्दल कुठेही कृतज्ञतेचे शब्द दिसत नाहीत. का? कारण हे तर बाईच्या जातीचं कर्तव्यच आहे. त्यात काय फार मोठं,असं समजलं जातं. अजूनही त्यात फार बदल नाही.

धर्मशास्त्र सांगतं की, माणसाच्या अधःपतनाला, अधोगतीला, अनर्थाला कारण ‘स्त्री’च आहे. जन्मदात्री, संगोपनकर्ती, अन्नपूर्णा, संस्कार, शिक्षिता, अर्धांगिनी, नवनिर्मितीक्षमता या तिच्या भूमिकांची दखल घेणं आणि महत्त्व मान्य करण्याइतपतही गरज वाटत नाही. पुरुषांच्या कर्तृत्वामागे पत्नीचा/आईचा वाटा मोठा आहे, हे ऐकताना विचार मनात येतो की, हे वाक्य तिचे कष्ट अधोरेखित करतात का? तिचा त्याग-बलिदान दर्शवतात का?
पुरुषाला यशाच्या शिखरावर चढवताना ती का पायाची दगड होते? त्याच्या कर्तृत्वाची कमान उंचावताना त्यात तिनं स्वतःच्या कर्तृत्वाची ऊर्मी, स्वतःचा वकुब ओतला होता का? याचं उत्तर जर ‘होय’ असेल तर ही तिची स्वतःची इच्छा होती की तिच्यावर लादलेल्या अपेक्षा होत्या? याचं उत्तर काहीही असलं तरी प्रश्‍न उरतो की का तिला पायरीचा दगड व्हावंसं वाटतं? का तिनं स्वेच्छेनं अथवा परच्छेनं स्वतः स्वत्वाचा बळी दिला? का पुरुषाच्या यशाच्या आनंदाला स्वतःचा आनंद मानून जगत राहिली? जर पुरुष पराक्रमी, कीर्तिमान, कष्टाळू, धडपड्या होता तर तिच्यासाठीही घरात पोषक, प्रोत्साहनात्मक वातावरण सहज उपलब्ध होऊ शकलं असतं. तीही त्याच्या बरोबरीनं वाटचाल करत करत स्वतःलाही त्याच्या बरोबरीच्या दर्जावर आणू शकली असती, पण तसं न करता स्वतःच्या गृहिणीपदाच्या जबाबदारीबरोबरच त्याच्या जबाबदार्‍याही समर्थपणे अंगावर पेलून त्याच्यासाठी विहारायला विराट आसमंत उपलब्ध करून देऊन स्वतः धन्य झाल्याचं मानत राहिली. का त्याग, नीती, निष्ठा, समजूतदारपणाच्या बेड्या पायात घालून ती त्याच्यासाठी चालत राहिली? का खरंच तिला त्याच्याशी बरोबरी नको होती? या प्रश्‍नाचं उत्तर समजून घेताना परत धर्मग्रंथांकडे वळावं लागतं. धर्मग्रंथ, धर्मसंस्थापकांनी नियम, नीतिशास्त्र, पापपुण्य याची भीती दाखवून वेळोवेळी बाईच्या मुसक्या आवळण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. समाजनियम आणि धर्मशास्त्राचा बडगा उगारून तिचं जग बंदिस्त केलं. स्त्रीचं दुय्यम स्थान, स्त्री कनिष्ठ, कमी महत्त्वाची आहे हे विचार समाजमनात खोलवर रुजवण्यात ते यशस्वी झाले. सासर आणि नवरा ह्यांचंच महत्त्व अधोरेखित होईल अशी व्यवस्था केली गेली. वर्षानुवर्षं या विचारांचा मारा एवढा होता की, या परिस्थितीला, या शास्त्राला सत्य मानून बाई स्वतःच विझत गेली. तिला स्वतःला याची गरज वाटेनाशी झाली की मान वर करून, स्पष्ट शब्दांमध्ये याचा जाब विचारावा. स्वतःला देण्यात आलेला कनिष्ठ दर्जा, घालण्यात आलेल्या अनावश्यक अटी- नियम, ठेवल्या गेलेल्या निराधार अपेक्षा याला विरोध करणं तर दूरच, उलट यालाच स्त्री ‘नशीब’ म्हणून ‘बाईचा धर्म’ म्हणून मिरवू लागली. बलिदान करणं, त्याग करणं, उपाशी राहणं, छळ सहन करणं, आजारपणं अंगावर काढणं, सासुरवास सहन करणं याला ती आपलं कर्तव्य समजू लागली. आणि हेच तिच्या बाईपणाचं सार आहे. म्हणून हाच धर्म स्वतःच्या मुली, सखी, सून, बहिणींनाही ती समजावू लागली आणि फक्त समजावण्यावर न थांबता त्यांनी तसं वागणं किंवा हेच सत्य समजून अंगीकारणंच कसं महत्त्वाचं आहे, हे पटवून देऊ लागली.

उच्चशिक्षित स्त्री जेव्हा सासरच्या छळाला कंटाळून नवर्‍याच्या मनमानीला कंटाळून आयुष्य संपवते, तेव्हा तिचं हे बाईपणाचंच ओझं आडवं येतं. कारण सर्व साधनं, कायदे, सुशिक्षितपणा, पैसा उपलब्ध असूनही हा मरणाचा मार्ग का योग्य वाटतो? तर बर्‍याचदा घरात नवरा फक्त नावाला किंवा नको त्या वेळी जग सोडून गेलेला, अशा वेळी भल्या भल्या एकट्या पुरुषांना न पेलवणारा, संसाराचा गाडा स्वतःच्या खांद्यावर घेऊन ती बाई रेटत असताना तिची होणारी दमछाक, भावनिक वंचना, मानसिक खच्चीकरण तिची काय अवस्था करत असेल याचा विचारही अंगावर काटा आणणारा असतो आणि तशाही बिकट परिस्थितीत समाजातल्या वाईट नजरांना दूर ठेवण्यासाठी गळ्यात मंगळसूत्र आणि कपाळाला कुंकू लावून पुन्हा त्याच्याच नावानं ती पुढे जगत असते, याची मांडणी ‘स्त्री’च्या चौकटीत कुठे करायची, हा प्रश्‍न उरतोच.

जागतिक स्तरावरचे उद्योग, बँकिंग, पर्यटन क्षेत्र असो अथवा देशातील मोठमोठ्या उद्योगक्षेत्रांत, पत्रकारिता, अभिनय, राजकारण, खेळ, शासन यामध्ये विविध पदं विभूषित करणार्‍या स्त्रिया काही कमी नाहीत. उच्चशिक्षण, प्रचंड धैर्यशीलता, त्वरित निर्णय घेण्याची धडाडी, मानमरातब, पैसा यांचे लौकिक यशही त्यांच्या वैवाहिक जीवनाशी व मुला-बाळांच्या प्रगतीशी सांगड घालून तोललं जातं. त्या वेळी जगाशी संघर्ष करून आपलं स्थान निर्माण केलेली धडाडीची यशस्वी बाई आपल्या पती व मुलांच्या बाबतीत मात्र कमालीची हळवी असते. कारण बाईपणातली ‘आई’ आणि ‘बायको’ची भूमिका तिच्यावर कायम कुरघोडी करत असते.

या सगळ्या पारंपरिक मनोभूमिकांच्या जोखडातून बाहेर पडण्याची ताकद स्त्रीमध्ये आहे. गरज आहे ती फक्त या गोष्टी तरारून बहरून येण्यासाठीच्या वातावराणची. स्वतःमधली खोलवर प्रकाशशलाका फुलवण्यासाठी तिला गरज आहे थोड्याशा प्रेमाची व खूप सार्‍या तिच्यावरच्या विश्‍वासाची. आजची स्त्री धिम्या गतीनं का होईना पण स्वतःला आणि समाजाला ओळखायला शिकत चाललेली आहे. खूप मोठी मजल मारायला तिनं पावलं उचलायला सुरवात केलीय. बाईचा धर्म समाजाला जरी अजून नीट कळला नसला, तरी तिला मात्र तिच्या क्षमता व तिचा वकूब ओळखता येऊ लागलाय हे नक्की!!

– डॉ. सुषमा भोसले

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.