Now Reading
बंगाली खाद्यसंस्कृती

बंगाली खाद्यसंस्कृती

Menaka Prakashan

बंगाल म्हटलं की आठवतात पांढरेशुभ्र रसगुल्ले, मिष्टी दोही, माशांचे विविध प्रकार आणि गोडवा असणारी बंगाली भाषा… मासे आणि भात हे जरी बंगालमधलं प्रमुख अन्न असलं तरी शाकाहारी पदार्थांमध्येही भरपूर वैविध्य बघायला मिळतं. गोडाबरोबरच माफक लसूण-कांद्याचा वापर केलेले तिखट पदार्थही रसना चाळवतात, अशा या बंगालच्या आगळ्यावेगळ्या आणि समृद्ध खाद्यसंस्कृतीविषयी….

बंगालचं नाव घेतलं की विविध क्षेत्रांतली असामान्य व्यक्तिमत्त्वं आठवतात. जगाला हिंदू धर्माची ओळख करून देणारे स्वामी विवेकानंद, त्यांचे आध्यात्मिक गुरू रामकृष्ण परमहंस, ब्राह्मो समाजाचे संस्थापक राजा राममोहन रॉय यांनी बंगालचं नाव मोठं केलं. तसंच आझाद हिंद सेनेचे संस्थापक सुभाषचंद्र बोस, भारताचं राष्ट्रगीत लिहिणारे आणि नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर, जगदीशचंद्र बोसांसारखे वनस्पतिशास्त्रातले संशोधक यांची जन्मभूमी बंगालच आहे. सती आणि बालविवाहाला विरोध करणारे राजा राममोहन रॉय आणि समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर बंगालमध्ये जन्मले. लाल-बाल-पाल या त्रयीतले बिपिनचंद्र पाल आणि प्रसिद्ध क्रांतिकारक खुदीराम बोस हे दोघे बंगालचेच सुपुत्र. चित्रपट सृष्टीतले अनेक तारे, दिग्दर्शक सत्यजित राय, बंकीमचंद्रांसारखे कित्येक लेखक आणि अभिनेते बंगालची शान आहेत.

संगीत, नाट्य, साहित्य, कला या सगळ्या क्षेत्रांत अग्रेसर असलेला बंगाल दुर्गापूजेच्या उत्सवासाठीही प्रसिद्ध आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणारा हा महोत्सव फक्त बंगालमध्येच नाही तर जिथे जिथे बंगाली लोक राहतात तिथे तिथे तो मोठ्या दिमाखात साजरा केला जातो.
स्वातंत्र्यपूर्व काळातला एकसंध बंगाल फाळणीनंतर दुभंगला, पूर्व बंगाल हा पूर्व पाकिस्तान म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याचंच नंतर स्वतंत्र बांगलादेशात रूपांतर झालं. पश्चिम बंगाल मात्र भारतातच राहिला. याच पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता ज्याला पूर्वी आपण कलकत्ता म्हणत असू. कोलकाता म्हणजे कालीक्षेत्र- सदासर्वकाळ असलेल्या तिथल्या ऊर्जापूर्ण आणि उत्सवी वातावरणामुळे कोलकाता हे ‘सिटी ऑफ जॉय’ या नावानं प्रसिद्ध आहे. या शहराला स्वत:ची अशी खास संस्कृती आहे. इथं राजकारण, संगीत, नाट्य आणि कलेच्या क्षेत्रात सतत काहीतरी घडामोडी होत असतात म्हणूनच कोलकाता ही ‘मोस्ट हॅपनिंग सिटी’ आहे असंही म्हणतात.

या प्रदेशाचा इतिहास वैदिक काळापासून सुरू होतो. इतिहासातली मौर्य, गुप्त घराणी याच प्रदेशात नांदली. ईस्ट इंडिया कंपनीमार्फत इंग्रजांचा भारतात प्रवेश झाला तो पहिल्यांदा कलकत्त्यातच.
गंगा-ब्रह्मपुत्रेच्या त्रिभुज प्रदेशात वसलेल्या बंगालची जमीन नद्यांच्या गाळानं सुपीक झालेली आहे. जूट-ऊस आणि तांदूळ ही मुख्य पिकं. नद्यांच्या सान्निध्यामुळे मासेही भरपूर म्हणूनच बंगाली लोक मत्स्यप्रिय म्हणून ओळखले जातात. भात, मासे हे लोकांचं प्रमुख अन्न. तिथल्या ब्राह्मणांनाही मासे वर्ज्य नसतात. रसगुल्ले हा तर बंगाल्यांचा प्राण. हा रसगुल्ला तोंडात ठेवून बोलल्यासारखी त्यांची गोड बंगाली भाषा. बंगाली मिठाईचा बेस म्हणजे पनीर, पनीरपासून केलेले रसगुल्ले, चपटे करून दुधात घातले की झाली रसमलाई, छोटे छोटे रसगुल्ले केले की झाले अंगूर. दुधात घालावे किंवा पाकातलेच खावे. लांबट करून आत माव्याचं सारण भरलं की होतात चमचम किंवा मलई सँडविच. असे अनेक प्रकार-त्यांची नावं मात्र आकर्षक. अगदी रसमाधुरी काय, राजभोग काय किंवा छेनार पायेश काय, सगळे रसगुल्ल्याचे अवतार. त्यामुळे दूध फाडून पनीर आणि त्याचे रसगुल्ले करायला एकदा जमलं की यातला कुठलाही प्रकार करणं अवघड नाही. तिथं साखरेबरोबर पाम शुगरचाही वापर केला जातो. पनीर हे भाजीतही वापरलं जातं पण पनीरयुक्त पंजाबी भाज्या आणि बंगाली भाज्या यामध्ये फरक आहे. पंजाबी पद्धतीच्या भाज्यांमध्ये कांदा-लसूण टोमॅटो यांचा मुक्त वापर असतो तर बंगाली भाज्यात तसा होत नाही. बंगाली स्वयंपाकात मुख्यत: मोहरीचं तेल वापरलं जातं. या तेलाबरोबरच पंचफोरन म्हणजे फोडणीसाठी वापरले जाणारे मेथी-मोहरी-जिरे-बडिशेप आणि कलौंजी हे पदार्थ ही बंगालची खासियत. मोहरीचं तेल आणि पंचफोरन या दोन्हीमुळे भाज्यांची चव एकदम वेगळी होते.

बंगाली मत्स्यप्रिय असले तरीही तिथलं शाकाहारी खाद्यजीवन समृद्ध का झालं याचं कारण थोडं वेगळं आहे. तिथल्या विधवांवर सगळ्याच प्रकारचे-विशेषत: खाण्यापिण्याचे खूप निर्बंध असायचे. विधवांसाठी मांस-मासे तर सोडा, कांदा-लसूणही वर्ज्य असल्यामुळे आपोआपच विविध शाकाहारी पाककृतींची निर्मिती झाली. भारतात सर्वसाधारणपणे सर्वत्र उपलब्ध असणार्‍या भाज्या बंगालमध्येही विपुल प्रमाणात मिळतातच. त्यामुळे बंगाल ‘मासेखाऊ’ म्हणून प्रसिद्ध असला तरी तिथं शाकाहारी पदार्थांची रेलचेल आहे. आपण फक्त शाकाहाराचाच विचार करणार आहोत…

पंचफोरन
साहित्य: प्रत्येकी एक टे. स्पून जिरे, मोहरी, बडिशेप, कलौंजी (कांद्याचं बी),
एक टी स्पून मेथी दाणे
कृती: सर्व जिन्नस एकत्र करावे. या मिश्रणाची भरड करूनही वापरली जाते.

मुरी मसाला
साहित्य: दहा-बारा तमालपत्र, सात-आठ लवंगा, एक टी स्पून बडिशेप, पाव कप जिरे, पाव कप धने, एक टे. स्पून काळं मीठ, दोन टे. स्पून काळी मिरी, दोन टे. स्पून आमचूर
कृती: तमालपत्र, लवंगा, बडिशेप, जिरे, धने आणि मिरी मंद आचेवर खमंग भाजून घ्यावे. त्यात मीठ आणि आमचूर घालून पावडर करावी.

कसुंदी (मोहरीचा सॉस)
साहित्य : दोन कप काळी किंवा पांढरी मोहरी, एक कप मोहरीचं तेल, अर्धा कप व्हिनेगर, एक टी स्पून मीठ, एक टी स्पून साखर, अर्धा टी स्पून हळद, भूत झोलकिया नावाची एक मिरची (प्रचंड तिखट असलेली)
कृती : व्हिनेगरमध्ये मोहरी रात्रभर भिजत घालावी. सकाळी त्यात मीठ, साखर, हळद, मिरची घालून पेस्ट करावी. त्यात तेल मिसळावं. नुसतं बोट जिभेला लावलं तरी नाकात झिणझिण्या जातील अशी तीव्र वासाची ही कसुंदी भाताबरोबर खाल्ली जाते. मोहरीच्या पावडरमध्ये पाणी घालून, फेसून लोणचं करण्याची पद्धत आपण महाराष्ट्रात वापरतोच.

बंगाली टोमॅटो चटणी
साहित्य : एक कप टोमॅटोच्या फोडी, अर्धा कप चिरलेला खजूर, पाव कप बेदाणे, एक टे. स्पून मोहरीचं तेल, अर्धा टीस्पून पंचफोरन, दोन लाल सुक्या मिरच्या, एक टीस्पून आमचूर पावडर, एक टे.स्पून साखर, अर्धा टीस्पून आल्याची पेस्ट, चवीनुसार मीठ
कृती: तेल तापवून त्यात पंचफोरन घालावं, परतून मिरच्यांचे तुकडे घालावे, टोमॅटोच्या फोडी घालून परताव्या. खजूर आणि बेदाणे घालावे, पाव कप पाणी घालावं आणि शिजवावं. त्यात आमचूर, आलं, साखर आणि मीठ घालून दोन मिनिटांत गॅस बंद करावा.

जालमुरी
जालमुरी म्हणजे भेळ.
साहित्य: अडीच कप कुरमुरे, अर्धा कप उकडलेल्या बटाट्याचे काप, अर्धा कप चिरलेली काकडी, अर्धा कप चिरलेला कांदा, अर्धा कप चिरलेला टोमॅटो, दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून, एक टे. स्पून लिंबाचा रस, एक टे. स्पून मुरी मसाला, एक टी स्पून लाल तिखट, अर्धा कप भाजलेले शेंगदाणे, चवीपुरतं मीठ, मूठभर कोथिंबीर, दोन टे. स्पून मोहरीचं तेल (लोणच्यातलं असेल तर जास्त चव येते), अर्धा कप शेव
कृती: कुरमुरे सोडून सर्व जिन्नस एकत्र करावे. नंतर त्यात कुरमुरे मिसळावे.

धोकार डालना
साहित्य: एक कप चणाडाळ, तीन-चार हिरव्या मिरच्या, दोन टी स्पून चिरलेलं आलं, चवीनुसार मीठ, दीड टी स्पून जिरे, चिमूटभर हिंग, चिमूटभर साखर, तळण्यासाठी तेल, एक कप बटाट्याचे चौकोनी तुकडे, दोन तमालपत्र, दोन मध्यम टोमॅटो, अर्धा कप दही, एक टी स्पून धने पावडर, एक टी स्पून लाल तिखट, चिमूटभर हळद, अर्धा टी स्पून गरम मसाला, एक टी स्पून तूप
कृती: चणाडाळ धुवून रात्रभर भिजत घालावी. भिजलेली डाळ, मिरच्या, मीठ आणि अर्धा टी स्पून आलं एकत्र वाटून घ्यावं. कढईत एक टे. स्पून तेल गरम करावं. त्यात जिरं घालावं. ते तडतडलं की हिंग, साखर आणि उरलेले आल्याचे तुकडे घालावे. नंतर त्यात वाटलेली डाळ घालावी. डाळ परतून, झाकण ठेवून शिजवावी. हा मऊ शिजलेला गोळा तेल लावलेल्या थाळीत थापावा. गार झाल्यावर त्याचे चौकोनी तुकडे कापावे. कढईत तेल तापवून हे तुकडे लालसर रंगावर तळून घ्यावे.
बटाटे बारीक चिरावे. तेही तेलात तळून घ्यावे आणि त्यावर थोडं मीठ भुरभुरावं. एक टे. स्पून तेल तापवून त्यात तमालपत्र, जिरं आणि हिंग घालावा. टोमॅटोची प्युरी करून त्यात घालावी. दह्यात धने पावडर, जिरे पावडर, तिखट आणि हिंग घालून मिसळावं आणि कढईत ओतावं. पाच-सात मिनिटं परतून त्यात बटाटे घालावे, लागेल तसं मीठ आणि पाणी घालावं, साखर आणि गरम मसाला घालून उकळावं. बटाटे शिजले की तळलेल्या वड्या आणि तूप घालून गॅस बंद करावा.

केळफुलाची भाजी
साहित्य: एक केळफूल, अर्धा कप बटाट्याचे चौकोनी तुकडे, पाव टी स्पून हळद, अर्धा टी स्पून लाल तिखट, अर्धा टी स्पून गरम मसाला पावडर, एक टी स्पून साखर, चवीला मीठ, पाव कप ओलं खोबरं, दोन हिरव्या मिरच्या, एक टे. स्पून मोहरीचं तेल, दोन तमालपत्र, अर्धा टी स्पून जिरे,
एक टी स्पून किसलेलं आलं, चार-पाच लसूण पाकळ्या (हव्या असल्यास),
एक टी स्पून तूप
कृती : केळफुलाच्या बाहेरची पानं काढावी. आतल्या प्रत्येक कळीच्या आतला चिवट दांडा आणि बाहेरचा पापुद्रा काढून टाकावा. सगळ्या कळ्या ताक आणि चिमूटभर हळद घातलेल्या पाण्यात टाकाव्या. पाणी काढून या कळ्या चिराव्या आणि कुकरमध्ये शिजवून घ्याव्या. तेल तापवून त्यात जिरे आणि तमालपत्र घालून परतावं. आल्याचे तुकडे आणि लसूण ठेचून घालावी. बटाटे, तिखट, मीठ आणि थोडं पाणी घालावं. बटाटे शिजले की शिजलेलं केळफूल घालावं. खोबरं आणि मिरच्या वाटून त्यात घालाव्या. मीठ, साखर, गरम मसाला घालून एक मिनिटानं गॅस बंद करावा. वाढण्याआधी तूप घालावं.

वांगी भजी
साहित्य: तीन मोठी लांबट वांगी, एक टे. स्पून आलं-लसूण पेस्ट, दोन टी स्पून लाल तिखट, एक टी स्पून हळद, एक टी स्पून धने पावडर, चवीला मीठ, दोन टे. स्पून लिंबाचा रस, एक कप चिरलेला कांदा, चार हिरव्या मिरच्या, एक टे.स्पून चिरलेलं आलं, एक कप मोहरीचं तेल, चार टे. स्पून चिरलेली कोथिंबीर, एक टी स्पून गरम मसाला
कृती: दोन वांग्याचे अर्धा इंच जाडीचे काप करावे. आलं-लसूण पेस्ट, तिखट, हळद, धने पावडर, गरम मसाला, मीठ आणि एक टे. स्पून लिंबाचा रस एकत्र करून त्यात वांग्याचे काप घोळवावे.
उरलेलं वांगं गॅसवर भाजावं आणि सोलून गर काढावा. त्यात कांदा, हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर, मीठ आणि लिंबाचा रस घालून कालवावं.
एका पॅनमध्ये तेल घालावं आणि वांग्याचे काप दोन्हीकडून परतावे.
हे काप भाजलेल्या वांग्याच्या भरताबरोबर खावे.

शुक्तो (व्हेज करी)
साहित्य: दोन मोठे बटाटे, एक कारलं, एक कच्चं केळं, एक कप चिरलेली फरसबी, तीन-चार शेवग्याच्या शेंगा, एक टे. स्पून आल्याची पेस्ट, एक टे. स्पून मोहरीची पेस्ट, पाव टी स्पून लाल तिखट, अर्धा टी स्पून हळद, एक टी स्पून पंचफोरन, तीन टे. स्पून मोहरीचं तेल, अर्धा कप पाणी, चवीला मीठ
कृती: सगळ्या भाज्यांचे बारीक काप करावे. पाण्यात घालून शिजवावे. शिजताना थोडं मीठ आणि हळद घालावी. एका कढईत तेल घालावं. तेल तापलं की त्यात पंचफोरन घालावं. आल्याची पेस्ट घालून परतावी. मसाल्याचा सुगंध येऊ लागला की मोहरीची पेस्ट, तिखट, हळद घालून तेल सुटेपर्यंत परतावं. भाज्यांमधलं पाणी काढून शिजलेल्या भाज्या घालाव्या. लागेल तसं मीठ घालावं. भाज्या परताव्या. नंतर काढलेलं पाणी घालावं. चार-पाच मिनिटं शिजू द्यावं.

पँता भात
साहित्य: एक कप शिजलेला भात, पाणी, चवीपुरतं मीठ, हिरव्या मिरच्या
कृती: शिजलेला भात तो बुडेल एवढं पाणी घालून बारा ते चोवीस तास फडक्यात झाकून ठेवावा. त्यानंतर त्यात मीठ, मिरच्या कुस्करून घालाव्या किंवा त्याला हवी तशी चव आणून खावा. भात आंबल्यामुळे त्यातली पोषणमूल्यं वाढतात. हा भात बंगाल आणि परिसरात विशेषत: नाश्त्यासाठी खाल्ला जातो. त्याच्याबरोबर बटाट्याची किंवा दुसरी कसलीही भाजी चालेल.

आलू पोस्तो
साहित्य: अर्धा किलो बटाटे, चार टे. स्पून खसखस, दोन टे. स्पून मोहरीचं तेल, अर्धा टी स्पून जिरे, अर्धा टी स्पून कलौंजी (कांद्याचं बी), दोन-तीन हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ
कृती: बटाटे सोलून चौकोनी तुकडे करावे. खसखस किंचित भाजून पावडर करावी. कढईत तेल तापवून जिरे आणि कलौंजी घालावी. मिरच्यांचे तुकडे घालावे. बटाटे घालावे. परतून त्यात खसखस पावडर घालावी. थोडं पाणी घालावं आणि झाकण ठेवून बटाटे शिजवावे, मीठ घालावं.
हवं असेल तर त्यात तेलात कांदा परतून घालावा.

पनीर करी
साहित्य: चारशे ग्रॅम पनीर, दोन कप कांद्याचे काप, एक टी स्पून आल्याची पेस्ट, एक टी स्पून साखर, अर्धा कप ओलं खोबरं, एक कप नारळाचं दूध, अर्धा कप चिरलेला टोमॅटो, एक टे. स्पून लाल तिखट, एक टे. स्पून जिरे पावडर, एक टे. स्पून धने पावडर, अर्धा टी स्पून हळद, एक टी स्पून गरम मसाला, दोन तमालपत्र, एक दालचिनीचा तुकडा, अर्धा टी स्पून जिरे, दोन वेलची, तेल, चवीपुरतं मीठ
कृती: पनीरचे चौकोनी तुकडे करून तेलात पटकन तळून घ्यावे. नंतर त्याच तेलात वेलची, दालचिनी, तमालपत्र, जिरे घालून परतावं. नंतर कांदा घालून परतावा. मग टोमॅटो घालून परतावं. हळद, साखर घालून परतावं. नंतर त्यात खोबरं, आलं पेस्ट, धने-जिरे पावडर, लाल तिखट, मीठ आणि गरम मसाला घालून परतावं. नंतर तळलेलं पनीर घालावं. नारळाचं दूध घालावं. एक कप पाणी घालून पाच-दहा मिनिटं उकळू द्यावं.

भाप्पा पनीर
साहित्य: पाव किलो पनीर, एक टे. स्पून मोहरी, दोन टे. स्पून खसखस, अर्धा कप दही, अर्धा टी स्पून हळद, पाच-सहा हिरव्या मिरच्या, दोन टे. स्पून मोहरीचं तेल, मूठभर चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ
कृती: मोहरी आणि खसखस थोड्या पाण्यात पंधरा मिनिटं भिजत घालावी आणि तीन मिरच्यांबरोबर बारीक वाटून घ्यावी. ही पेस्ट, दही, हळद, मीठ आणि मोहरीचं तेल एकत्र करावं, त्यात थोडं पाणी घालावं आणि त्यात पनीरचे तुकडे घालून अर्धा तास ठेवावे.
त्यानंतर मध्यम आचेवर हे मिश्रण वीस मिनिटं वाफवून घ्यावं. कोथिंबीर घालावी.

खसखस टिक्की
साहित्य: अर्धा कप खसखस, एक लहान कांदा, दोन हिरव्या मिरच्या, दोन-तीन टी स्पून मैदा, मोहरीचं तेल, चवीनुसार मीठ
कृती: खसखस किंचित गरम करून मिक्सरमध्ये बारीक पावडर करावी. एक-दोन टी स्पून पाणी घालून पेस्ट करावी. त्यात कांदा, बारीक चिरलेल्या मिरच्या, मीठ आणि अर्धा टी स्पून तेल घालून गोळा तयार करावा. त्याचे लहान लहान गोळे करून ते चपटे करावे आणि तेलात तळावे.

घुगनी
साहित्य: एक कप हरभरे किंवा पिवळे/पांढरे वाटाणे, एक टी स्पून किसलेलं आलं, अर्धा टी स्पून कलौंजी, पाव टी स्पून हळद, दोन टी स्पून मूरी मसाला, तीन टे. स्पून मोहरीचं तेल, मूठभर चिरलेली कोथिंबीर, चवीपुरतं मीठ
कृती: हरभरे रात्रभर भिजत घालून सकाळी कुकरमध्ये मऊ शिजवून घ्यावे. तेल गरम करून त्यात कलौंजी घालावी. आलं आणि हळद घालावी. शिजलेले हरभरे घालावे. मूरी मसाला आणि मीठ घालून एक-दोन मिनिटं उकळावं. कोथिंबीर घालावी.
हवं असेल तर त्यावर कांदा, टोमॅटो, शेव घालून चाट करूनही खावं. बहुधा संध्याकाळच्या चहाबरोबर घुगनी खाण्याची पद्धत आहे.

मिष्टी दोई
साहित्य: तीन कप दूध, पाऊण कप साखर, एक टे. स्पून दही, एक टे. स्पून पाणी
कृती: कढईत दूध उकळायला ठेवावं. त्यात अर्धा कप साखर घालावी. दूध आटून निम्मं झालं की गॅस बंद करावा. उरलेली साखर दुसर्‍या कढईत घालून परतावी. साखर विरघळून कॅरॅमल व्हायला लागलं की पाणी घालावं आणि त्यात आटवलेलं दूध घालावं. कॅरॅमल दुधात मिसळलं की गॅस बंद करावा. दूध कोमट झालं की त्यात दही मिसळावं आणि चार-पाच तास तसंच ठेवावं. दही विरजलं गेलं की फ्रीजमध्ये ठेवावं.

बंगाली गुलाबजाम
साहित्य: एक कप पनीर, दोन टे. स्पून खवा, चिमूटभर बेकिंग पावडर, एक टे. स्पून मैदा, एक टे. स्पून तूप, तळण्यासाठी तेल
एक कप साखर, एक कप पाणी, अर्धा टी स्पून वेलची पावडर, चिमूटभर केशर
कृती: साखर आणि पाणी एकत्र करून उकळत ठेवावं. एकतारी पाक झाला की गॅस बंद करावा. वेलची आणि केशर घालावं.
पनीर चांगलं मळून घ्यावं, खवा, मैदा, तूप, बेकिंग पावडर मिसळून मळावं. हे मिश्रण पनीरमध्ये मिसळून खूप मळावं. तेल सुटू लागलं की मिश्रणाचे लहान लहान गोळे करावे. तापलेल्या तेलात मंद आंचेवर तळावे आणि पाकात टाकावे.

गोकुळ पिठे
साहित्य: पाव किलो खोबरं, अर्धा किलो खवा, खजूर गूळ अर्धा कप, अर्धा कप साखर, पाऊण कप मैदा, एक कप तूप
कृती: साखरेत अडीच कप पाणी घालून पाच मिनिटं उकळत ठेवावं. एकतारी पाक झाला की गॅस बंद करावा आणि पाव कप किसलेला गूळ त्यात मिसळावा. खवा किसून त्यात खोबरं आणि उरलेला गूळ मिसळावा. हे मिश्रण गॅसवर ठेवून दहा-बारा मिनिटं शिजवावं. त्यातला ओलावा कमी झाला की या मिश्रणाचे बारा-पंधरा गोळे करावे. मैद्यात एक कप पाणी घालून पीठ भिजवावं. तूप तापवावं. तयार गोळे या पिठात बुडवून तळावे. नंतर पाकात घालावे.

रसगुल्ले
साहित्य: एक लिटर दूध, दोन टे. स्पून लिंबाचा रस, एक कप साखर, चार कप पाणी
कृती: दूध तापत ठेवावं. उकळी फुटली की लिंबाचा रस आणि तेवढंच पाणी एकत्र करून घालावं. दूध फाटेल. एका फडक्यावर हे फाटलेलं दूध ओतावं. त्यावर पाणी ओतावं आणि धुवून घ्यावं. फडक्याची पुरचुंडी बांधून अर्धा तास टांगून ठेवावी. त्यानंतर हे पनीर चांगलं मळून मऊ लुसलुशीत करावं आणि त्याचे लहान लहान गोळे करावे. साखर आणि पाणी एकत्र करून गॅसवर पातेलं ठेवावं. पाक उकळायला लागला की हे गोळे त्यात सोडावे. अर्धवट झाकण ठेवून १५ मिनिटं उकळावं. गोळे शिजून वर तरंगू लागले की रसगुल्ले झाले.

पतिशप्ता
साहित्य: एक कप मैदा, अर्धा कप रवा, पाव कप तांदळाचं पीठ, दोन कप दूध, कण्डेन्स्ड मिल्क, तेल,
तीन कप ओलं खोबरं, दोन टे. स्पून खजुराचा गूळ, अर्धा टी स्पून वेलची पावडर
कृती: खोबरं आणि गूळ एकत्र करून शिजवावं. शिजवताना थोडं दूध घालावं. मिश्रण घट्ट झालं की वेलची घालावी.
मैदा, रवा आणि तांदळाचं पीठ एकत्र करून त्यात दूध घालून पातळसर पीठ भिजवावं. तव्यावर थोडं तेल घालून धिरडी घालावी. त्यावर खोबर्‍याचं सारण पसरून रोल करावा. त्यावर कण्डेन्स्ड मिल्क घालून खायला द्यावं.

चमचम
साहित्य: एक लिटर दूध, दोन-तीन टे. स्पून लिंबाचा रस, दोन कप साखर, एक टे. स्पून कॉर्नफ्लोअर, पाव कप मावा, तीन टे. स्पून पिठीसाखर, अर्धा टी स्पून वेलची पावडर, एक टे. स्पून पिस्त्याचे काप, केवडा इसेन्स अर्धा टीस्पून, पिवळा रंग
कृती: दूध तापत ठेवावं आणि ढवळत राहावं. उकळलं की गॅस बंद करावा, पाच मिनिटांनी लिंबाच्या रसात तेवढंच पाणी घालावं आणि दुधात घालत ढवळत राहावं. दूध फाटलं की फडक्यावर ओतावं, त्याची पुरचुंडी बांधावी आणि वाहत्या नळाखाली धरावं. पनीरमधलं पाणी दाबून काढावं. मग त्यात कॉर्नफ्लोअर मिसळून खूप मळावं. अर्ध्या पनीरमध्ये पिवळा रंग मिसळावा. पनीरचे पिवळे चार आणि पांढरे चार लांबट चपटे गोळे करावे. कुकरमध्ये दोन कप पाणी आणि साखर घालून उकळावं. हे मिश्रण उकळलं की यात पनीरचे गोळे सोडावे.
कुकरची शिटी लावून सात-आठ मिनिटं गोळे शिजवावे आणि गॅस बंद करावा. मावा, पिठीसाखर, वेलची पावडर एकत्र करावी. प्रत्येक गोळ्याला आडवी चीर द्यावी, त्यात केलेलं सारण भरावं आणि वर पिस्त्याचे काप लावावे.

– वसुंधरा पर्वते

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.