Now Reading
प्रेम एक चिरमंगल स्वप्न

प्रेम एक चिरमंगल स्वप्न

Menaka Prakashan

प्रेम ही जगातली सगळ्यात सुंदर भावना. खरं तर ही भावनाच माणसाला जगण्याचं बळ देते, पण हेच प्रेम दुःखालाही सोबत घेऊन फिरत असतं, या सत्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण कोणाला कसं प्रेम भावेल, कधी कशाचं आकर्षण वाटेल हे सांगणं कठीणच. म्हणूनच तर रुसलेल्या रुक्मिणीला आपलंसं करण्यासाठी कृष्णाला विठ्ठल व्हावं लागलं. हा भक्ती-प्रेमाचा महिमा आपण ऐकत- अनुभवत आलो आहोत. त्याविषयी या लेखाच्या माध्यमातून एक सखोल चिंतन.

सातशे वर्षांपेक्षा जास्त अबाधित राहिलेल्या दैवी थोरवीचं मानवी रूप म्हणजे ‘विठ्ठल’. स्वतः भला असणं आणि माणसांवर निरतिशय प्रेम करणं यामुळे विठ्ठल इतर देवांपेक्षा खूप वेगळा ठरतो. विठ्ठल म्हणजे मूळचा ‘कृष्ण’ म्हणजे लोकसखाच. विठ्ठलाचं कृष्णरूपाचं पंढरीला येणं घडलं ते रुख्मिणीमुळे. रुख्मिणीच्या प्रेमापोटी. रुक्मिणीचं कृष्णावर मनापासून प्रेम होतं. त्या प्रेमानं तिला निष्ठा दिली होती आणि कृष्णाबरोबरच्या आयुष्यात तिनं सगळ्या भल्या-बुर्‍या प्रसंगात ती निष्ठा सांभाळली होती. तिनं सत्यभामेचा सवत म्हणून स्वीकार केला होता, राधा तिला माहीत होती. कृष्णानं घेतलेल्या सोळा सहस्र नारींची जबाबदारी तिनं समजून घेतली होती. तरी कृष्णाचं वागणं काही बदलत नव्हतं. रुक्मिणीनं एकदा राधेला कृष्णाच्या मांडीवर बसलेलं पाहिलं आणि ती संतापली. तिचा संताप स्वाभाविक होता. कृष्णासाठी तिनं आपलं श्रीमंत माहेर दूर ठेवलं, भावांचा रोष पत्करला, लग्नासाठी वर्‍हाड जमलेलं असताना कृष्णाबरोबर पळून जाऊन स्त्री जातीत दुर्मीळ असणारं साहसही दाखवलं; तरी कृष्णाचं हे वागणं बघून ती विलक्षण दुखावली. दुःख, अपमान, संताप यांनी भरून गेलेली ती एका निर्णायक क्षणी घर सोडून निघाली.

इकडे कृष्णाला तिच्यावाचून करमेना. ती त्याला सोडून जाईल यावर त्याचा विश्‍वास बसेना. त्याचे कितीतरी रंगढंग खपवून घेतलेले, त्याची लबाडी, त्याची चतुराई आणि या सर्वांवर मात करणारी त्याची प्रेमाची विलक्षण भुरळ पाडणारी रीत तिला पुरती ठाऊक असलेली. शिवाय राधेचं आणि त्याचं प्रेम तिला नव्यानं ठाऊक झालेलं आहे असंही नाही, तरीही ती गेली हे लक्षात आल्यानंतर कृष्णाचा जीव बेचैन झाला आणि तिला शोधत दिंडीरवनात- पंढरपुरात- पोचला. पण पंढरपुरात कृष्णाबरोबर रुक्मिणी नाहीच. राधा-कृष्ण, कृष्ण-तुळस, विठ्ठल-जनी या सार्‍या कथा कृष्णाच्या प्रेमाच्या गोष्टी सांगत राहतात आणि पंढरपूरच्या क्षेत्रमाहात्म्य कथेमागचं धार्मिक, सामाजिक वास्तव दूर ठेवून पंढरीत घडणारं घटीत वारंवार दिसून येतं, ते आहे ‘प्रेम’.

हे प्रेम स्त्री-पुरुषांमधल्या नात्याची लहानशी मर्यादा ओलांडून सर्वत्र पसरलेलं आहे. रुक्मिणीला ‘स्व’ गवसलेलं प्रेम, तर विठूचं त्याच्या भक्तांवरचं प्रेम. नेमकं कसं असतं माणसाच्या आयुष्यातल्या प्रेमाचं प्रेम सुंदर, मोहक, नाजूक स्थान? प्रेम अल्पजीवी असतं अशी सार्वत्रिक व सार्वकालिक समजूत आहे. प्रत्यक्षात माणसाच्या मनाशी संबंधित असलेल्या प्रेमभावनेला राग, द्वेष, मत्सर, क्रूरता, निर्दयताही चिकटलेली असते आणि बर्‍याचदा प्रेमाची ही दुसरी बाजू सहन होत नाही कारण प्रेमाभोवती कित्येक शतकांच्या परंपरेनं निर्माण केलेलं सुंदरतेचं व स्वप्नमयतेचं वलय.

स्त्रीनं प्रेमात पडणं आणि पुरुषानं प्रेमात पडणं यात फार मोठा फरक असतो व हा फरक बर्‍याचदा स्त्री-पुरुषांमध्ये गैरसमज व तेढ निर्माण करण्यास कारणीभूत ठरतो. बायरन यांच्या मते ‘पुरुषासाठी स्त्रीच्या प्रेमात पडणं हेच तिचं संपूर्ण अस्तित्व असतं.’ नित्शे यांनी आपल्या ‘गे सायन्स’ या पुस्तकात स्पष्ट केलेलं आहे की, प्रेम या शब्दाचा अर्थ स्त्री व पुरुष यांच्यासाठी भिन्न असतो कारण निसर्गनियमापेक्षा स्त्री व पुरुष यांचं सामाजिकीकरण हा घटक इथं महत्त्वाचा ठरतो. ‘पुरुष’ हे स्त्रीसाठी सार्वभौमत्वाचं, श्रेष्ठत्वाचं प्रतीक असतं. स्त्री ही बालपणापासून पुरुषाच्या आधिपत्याखाली पुरुषसापेक्ष जीवन जगत असते. त्यामुळे स्वतःमधल्या अमर्याद क्षमतांची जाणीव तिला होतच नाही. दुय्यमत्व हे तिच्यात ठासून रुजलेलं असतं त्यामुळे ‘प्रेम’ या भावनेचा अनुभव घेताना ती स्वतःला उदात्ततेकडे नेण्याची व पुरुषाच्या सार्वभौम सत्तेत विलीन होण्याची स्वप्नं बघते. याउलट पुरुष हे बहुतांश वेळा स्वतंत्र, महत्त्वाकांक्षी व ती महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी कृतिशील असल्यामुळे पुरुषांमध्ये प्रेमाची भावना कितीही तीव्र असली, तरी त्यांना ‘स्व’चा संपूर्ण विसर कधीही पडत नाही. ते प्रेम करत असलेली स्त्री त्यांच्या आयुष्यातल्या अनेक अमूल्य गोष्टींपैकी एक व त्यांच्या आयुष्याचं अविभाज्य अंग असली तरी स्वतःचं अस्तित्व ते तिच्यावर उधळून टाकत नाहीत. आपण अंतिम सत्ताधारी आहोत हा सुप्त भाव त्यांच्यामध्ये कायम असतो. साहजिकच सेसिल सॉवेजनं म्हटल्याप्रमाणे ‘प्रेमात पडल्यावर स्त्रीनं स्वतःचं व्यक्तिमत्त्व विसरायला हवं’ हे सामाजिक सत्य अधोरेखित होतं. प्रेमात पडल्यावर प्रेमाच्या वेगळ्या पातळ्यांचा आणि त्यातल्या गुंत्यांचा स्वीकार करण्यासाठी लवचिकता व साहसी वृत्ती अंगी बाणवणं आवश्यक ठरतं. प्रामुख्यानं विचार करता स्त्री-पुरुषांच्या मैत्रीमध्ये निसर्गतःच आकर्षणाचा एक धागा गुंतलेला असतो. खरं तर त्यात काही गैर नाही, ती एक स्वाभाविक नैसर्गिक घटना आहे व बहुधा उत्कट आणि खर्‍या खर्‍या प्रेमाचा गाभा हा मैत्रीचाच असतो.

प्रेमाचा स्वीकार सहज साधेपणानं करणं ही अवघड गोष्ट आहे, याचं कारण प्रेमाबरोबर येतो तो आनंद पोटात खूप मोठं दुःख घेऊन येतो. समस्या व ताण यांचा गुंता घेऊन येतो. त्याला सामोरं जायचं. जे घडेल त्यात मनःपूर्वक जाणिवेसकट उतरायचं आणि नवं अधिक प्रेम भोगायचं, अधिक खोल गुंत्याचा पुन्हा स्वीकार करायचा हे सर्वांना जमतंच असं नाही. कारण प्रेमाचा अनुभव दुःखासारखा असतो. ‘सुख पाहता जवाएवढे।’ दुःखाचं तसं नसतं. दुःखाची एक स्वतंत्र अस्मिता असते. त्यामुळे ते सहज आलं आणि नकळत गेलं असं होत नाही. याचा ठसा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात जगणार्‍यावर राहतो. प्रेमाचा अनुभव हाही दुःखासारखाच असतो. परिपूर्णता नसलेला व वाढण्याच्या अपार शक्यता असलेला अनुभव. आणि हा प्रेमाचा अनुभव जगणार्‍यावर निश्‍चित परिणाम करत असतो. कित्येक वेळा प्रेम म्हणून जे समोर येतं, ते प्रेम नसतंच. शारीर आकर्षणातून जन्म घेऊन तिथंच संपणारा तो एक मोह असतो. शरीर ही गोष्ट प्रेमानुभवात नाकारता येते यात फार तथ्य नाही, पण त्याचा भाग प्रेमात किती, किती महत्त्वाचा व किती वजनाचा यावरही बरंच काही अवलंबून असतं. एकमेकांना समजून घेण्याची असोशी, माणूस म्हणून दोघांमधलं अटळ अंतर लक्षात घेऊन एकमेकांबद्दलचा विश्‍वास, आपलेपणा, समजूत, स्वभावातले फरक, आयुष्यातल्या चढ-उतारांना प्रतिसाद देण्याच्या भिन्न तर्‍हा यांमधून प्रेमाचं रुजणं व वाढणं सांभाळताना दोघांच्याही संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा कस लागतो.

See Also

प्रेमाला नैतिक अनैतिक विशेषण लावणं योग्य नाही. मनापासून केलेलं प्रेम धर्म-वंशाची, जातीपातीची, कुलीन-अकुलीन, गरीब-श्रीमंत, धार्मिक-अधार्मिक अशी कोणतीच बंधनं मानत नाही. वैयक्तिक पातळीवर प्रामाणिक व विश्‍वासाच्या आधारानं उभं राहिलेलं प्रेम समजुतीच्या बळावर प्रतिष्ठा राखू शकतं. त्यामुळेच रुक्मिणीला कृष्णावरच्या प्रेमाच्या पोटी ‘स्व’ गवसला. तर मीरा, राधा, असंख्य गोपी यांबरोबरच्या कृष्णकथा शतकानुशतकं आपल्याला भक्तीप्रेमाचा महिमा सांगत राहिल्या.
एकूण काय, तर माणसाच्या आयुष्यात सर्जक प्रेम भेटणं, त्यामुळे माणसाचं मन, माणसाची समजूत समृद्ध होऊन जगता येणं ही एक अतिशय मौल्यवान गोष्ट आहे. तिथं समाजमान्यता, लौकिक उपचार, प्रेमाचं उघडं प्रदर्शन या सगळ्या गोष्टी गौण ठरतात.

– डॉ. सुषमा भोसले

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.