Now Reading
प्रयोगशील शाळा : विठ्ठलराव पटवर्धन उत्कर्ष आश्रमशाळा

प्रयोगशील शाळा : विठ्ठलराव पटवर्धन उत्कर्ष आश्रमशाळा

Menaka Prakashan

प्रयोगशील शिक्षणाला सध्या अनन्यसाधारण महत्त्व आहे. पारंपरिक शिक्षणाच्या मर्यादा या प्रयोगशील शिक्षणाद्वारे पूर्ण केल्या जात आहेत. त्यातूनच त्यांच्या पुढच्या जीवनाचा डोलारा उभा राहतो, यात शिक्षक आणि संस्था यांचा सकारात्मक दृष्टिकोन मोलाचा असतो. अशा प्रकारचं शिक्षण सध्या ज्ञानरचनावाद पद्धतीनं दिलं जातं. या प्रकारचं शिक्षण हे काळाच्या पुढे विचार करायला लावणारं आणि मुलांना कार्यक्षम बनवणारं असतं. याच पद्धतीनं काम करणारी नाशिक जिल्ह्यातली विठ्ठलराव पटवर्धन उत्कर्ष आश्रमशाळा. या शाळेची झेप इतकी मोठी आहे की इथल्या मुलांनी मातीत सोनं पिकवण्यापासून ते एव्हरेस्टचं शिखर गाठण्यापर्यंतची सर्वोच्च कामगिरी केली आहे. या शाळेविषयी अधिक विस्तारानं…

नाशिकमधल्या प्रसिद्ध अशा महाराष्ट्र सेवा संघ (द्वारा रचना विद्यालय नाशिक) संचालित वाघेरा इथली विठ्ठलराव पटवर्धन उत्कर्ष आश्रमशाळा ही नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात असणार्‍या आदिवासी भागातल्या वाघेरा या गावात आहे. शाळा खासगी अनुदानित आश्रमशाळेत मोडते. सध्या ही आश्रमशाळा सहा एकर परिसरात उभी आहे. शाळेची स्थापना १९९९ साली वासाळी गावी झाली होती. पुढे हीच शाळा २००४ मध्ये वाघेरा या गावी स्थलांतरित झाली. आज या आश्रमशाळेत पहिली ते बारावी (कला व विज्ञान) पर्यंतचे वर्ग भरतात. या परिसरातल्या गरजू आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ही शाळा सुरू करण्यात आली आहे. यात निवासासह शिक्षण व्यवस्था आहे. पहिली ते दहावीपर्यंत विद्यार्थी विनाशुल्क शिकतो. इयत्ता अकरावीलाही प्रवेश मिळतो. अकरावी व बारावीही (कला व विज्ञान शाखा) मोफत शिक्षण दिलं जातं. ही अंशतः अनुदानित शाळा आहे. यातील मुख्य शिक्षकांच्या वेतनाचा भार हा शासनाकडे आहे, उर्वरित खर्च हा संस्थेच्या निधीतून पुरवला जातो. यात संगीत, संगणक, क्रीडा व कला शिक्षक हे संस्थेच्या निधीतून नेमले आहेत. संस्थेला हा निधी बॉश कंपनीचे कर्मचारी यांच्या प्रायमावेरा, बंगळूरू या सह संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध होतो. तसंच महिंद्रा आणि महिंद्रा, नाशिक रन, बॉश, टपारिया टूल्स या संस्थांनी शाळेच्या इमारत उभारणीत मोलाचं योगदान दिलं आहे. वाघेरा इथं प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभाग आहेत. प्राथमिक मुख्याध्यापक म्हणून संदीप चौधरी आणि माध्यमिक ते कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक पदाचे कामकाज नितीन पवार हे बघतात, यांपैकी संदीप चौधरी हे शाळेच्या स्थापनेपासून संस्थेशी जोडले गेलेले आहेत.

या शाळेत पहिली ते बारावीपर्यंत प्रत्येक वर्गात ई-लर्निंग यंत्रणा आहे, त्याला इंटरनेटच्या जोडणीसह अद्ययावत गोष्टींचा अंतर्भाव आहे. ही शाळा गेल्या पाच वर्षांपासून ज्ञानरचनावादाच्या सिद्धान्तानुसार काम करते. ही पद्धत सुरू करण्याआधी इथले विद्यार्थी हे अभ्यासात कमी पडत असतं, तेव्हा सातारा जिल्ह्यातल्या कुमठे-बिट इथल्या ज्ञानरचनावादी शाळेची माहिती मिळाली. लागलीच या शाळेतले दोन शिक्षक यशवंत शिवदे आणि प्रदीप मोरे हे तिथं ज्ञानरचनावाद पाहणीला गेले, त्यांनी ही पद्धती जाणून घेतली. इतर सहकार्‍यांसह ती आत्मसात केली, त्यानंतर हा प्रयोग या शाळेतही राबवायला प्रत्यक्ष सुरवात केली. कुमठे-बीट इथं तुलनेनं कमी विद्यार्थी होते. मात्र वाघेरा या शाळेत विद्यार्थी संख्या जास्त असल्यानं हे मोठं आव्हान होतं. तरी यावर मात करत शाळेनं हा प्रयोग राबवला. त्यावर कष्ट घेतले. त्याचं कालांतरानं फळ मिळालं आणि शाळेत आमूलाग्र बदल जाणवले. याचा आदर्श दाखला म्हणजे इथली मुलं इंग्रजीत छानपणे बोलायला लागली, त्यांची गणितं सहजगत्या सुटू लागली. चौथीची मुलं तर नियमित इंग्रजी बोलायला लागली. पाचवी तसंच आठवी ते दहावी-बारावीच्या मुलांमध्ये मोठे बदल दिसून आले, त्यांचा स्पर्धा परीक्षा व बोर्डाच्या परीक्षा निकाल उत्तम लागला. देशात आदर्श मॉडेल ठरलेल्या दत्तात्रय वारे सरांच्या पुण्यातल्या वाबळेवाडी शाळेतून प्रेरणा घेऊन ही शाळा वाटचाल करते आहे. शाळेनं जवळपास सर्वच क्षेत्रांत प्रावीण्य मिळवलं आहे. दहावी-बारावीच्या परीक्षेत राज्यातल्या आदिवासी भागातल्या आश्रमशाळांची वेगळी गुणवत्ता यादी असते. यात गेल्या काही वर्षांपासून विठ्ठलराव पटवर्धन शाळा कायम अग्रगण्य असते.

तिरंगा एव्हरेस्टवर फडकवणारी शाळा
क्रीडा क्षेत्रातही शाळेनं चमकदार कामगिरी केली आहे. इथले खेळाडू सर्व खेळ प्रकारांतही यशस्वी होतात. यातीलच सर्वोच्च कामगिरी म्हणजे राज्य शासनाच्या ‘मिशन शौर्य-२’ अंतर्गत राज्यातले दहा विद्यार्थी २०१८ मध्ये माउंट एव्हरेस्टच्या मोहिमेवर गेले होते. या टीममधल्या विठ्ठलराव पटवर्धन आश्रम शाळेच्या मनोहर हिलीम या विद्यार्थ्यानं एव्हरेस्ट शिखर सर करून त्यावर अभिमानानं तिरंगा फडकवला. या कामगिरीबद्दल खुद्द शासनानंदेखील त्याचा सन्मान केला. या आश्रमशाळेत संस्था सदस्य रत्नाकर पटवर्धन यांच्या प्रेरणेनं नामदेव कचरे या प्राथमिक शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी जुदो प्रशिक्षणही सुरू केलं आहे, त्यात शाळेनं अनेक राज्यस्तरीय पदकं पटकावली आहेत. पुण्यातल्या मार्शल कॅडेट फोर्सच्या माध्यमातून संस्थेचे दोनशे विद्यार्थी सैनिकी प्रशिक्षण घेत आहेत, हादेखील प्रयोग आश्रमशाळेच्या माध्यमातून राज्यात पहिल्यांदा होतो आहे. एकूणच शिक्षण, कला आणि क्रीडा या क्षेत्रात इथले विद्यार्थी चमकदार कामगिरी करत आहेत, त्यामुळे कणखर आणि यशाचं उत्तुंग शिखर गाठण्यासाठी कायम तत्पर असणार्‍या विद्यार्थ्यांची ही शाळा आहे. यासाठी भरत पाटील, सुशील पाटील, राजेश भोये यांच्यासह त्यांचे सर्व सहकारी शिक्षक हे मनापासून कष्ट घेत आहेत. तर इथले सगळे शिक्षक व वसतिगृह कर्मचारी अतिशय कल्पक व कष्टाळू आहेत.

या ठिकाणी मुलं-मुली एकत्र शिकतात. त्यात जवळपास साठ टक्के संख्या ही मुलींची आहे. आदिवासी विभागातल्या बहुतांशी शाळांत दिसणारं एक साधारण चित्र म्हणजे बारावी झाल्यावर त्वरित मुलींच्या पालकांचा त्यांचे लग्न लावून देण्याकडे कल असतो, मात्र याबाबतही ही शाळा काहीशी अपवाद असून या शाळेतल्या बहुतांशी मुली या शिक्षण घेण्यावर ठाम असून त्या पुढील शिक्षण घेत आहेत. यासाठी शिक्षकांना त्या पालकांचं आणि विद्यार्थिनींचं सतत प्रबोधन करावं लागतं. तसंच शाळेतली मुलींची गळती थांबावी म्हणून संस्थेनं ‘नन्ही कली’ हा उपक्रम सुरू केला आहे. यासाठी महिंद्रा आणि महिंद्रा व नांदी फाउंडेशन ही सह संस्था प्रायोजक आहे.

ज्ञानरचनावादातील नावीन्यपूर्ण प्रयोग
ग्रामीण भागातल्या मुलांना वाचन, लेखन या बाबी सुरवातीच्या काळात अवघड जातात. यात अभ्यासक्रम आणि या मुलांना वेगानं गणितं जमत नाहीत. ग्रामीण भागातल्या मुलांना खेळ फार आवडतात, त्यांच्या आसपासच्या निसर्ग-संपदेतून मुलांना शिकता आलं तर या मुलांना शिकणं ही क्रिया खूप सोपी वाटते, हीच बाब हेरून इथल्या शिक्षकांनी खेळातून शिक्षण हा प्रयोग सुरू केला आहे. दगडगोट्यांना रंग दिला गेला, त्यातून ही मुलं गणन शिकत आहेत. आईस्क्रीमच्या काड्यातून शतक ही संकल्पना त्यांना समजावून घेता आली. पूर्वी पाचवीपर्यंतही त्यांना एबीसीडी येत नव्हतं अशा वेळी फोनिक्समधून त्यांना शिकवण्याचा प्रयोग करण्यात आला. त्यासाठी आधी फोनिक्सचा अभ्यास इथल्या शिक्षकांनी स्वतः केला. या अशा घटकांच्या माध्यमातून सुरवातीच्या काही वर्षांतच इथं पाया मजबूत केला जातो. मुलांची बोली भाषा ते प्रमाणभाषा आणि तिथून इंग्रजीपर्यंत नेण्याचा प्रयत्न यातून केला जातो. त्यातून आता चौथी-पाचवीपासूनच विद्यार्थी अस्खलित इंग्रजी बोलत आहेत, हा आमूलाग्र बदल हा ज्ञानरचनाच्या माध्यमातून झाला आहे, त्यातून पुढील इयत्तेसाठी ज्ञानरचनावादातला पुढचा टप्पा म्हणजे कृतियुक्त शिक्षण हा होय. उदाहरणार्थ क्षेत्रफळ या विषयी माहिती द्यायची असल्यास ते वर्गात न शिकवता वर्गखोलीची, शाळेची, परिसरातल्या मोकळ्या जागांची, शेतीच्या ॉटची मोजणी केल्यानंतर त्यांना क्षेत्रफळ हा विषय समजतो. भूगोल प्रत्यक्ष आकाशदर्शन करून परिसरात फिरून अभ्यासक्रमाशी निगडित कृती करायला लावली जाते. जास्तीत जास्त वेळ ही मुलं वर्गाऐवजी शाळेच्या विस्तीर्ण अशा सहा एकर परिसरात वावरतात, तिथूनच कृतियुक्त शिक्षण मिळतं. शाळेत भव्य मैदान आहे, रनिंग ट्रॅक आहे, दोन एकरांत शेती आहे. त्यात ही निवासी मुलं कार्यानुभवाच्या तासाला व रविवारी शेतीकाम करतात. त्यात भाजीपाला कसा पिकवावा याचं प्रशिक्षण दिलं जातं. यात प्रत्येक वर्गानुसार एक-एक प्लॉट ठरवून भाजी पिकवली जाते, शेतीशी नातं घट्ट राहावं म्हणून परसबाग हा उपक्रम राबवला जातोय. यातून वार्षिक वीस ते तीस हजार रुपये किमतीचा भाजीपाला पिकवला जातो. तो इथल्या निवासी मुलांच्या खानावळीत वापरला जातो. आपण पिकवलेला भाजीपाला आपण खातोय याचं एक वेगळंच समाधान या विद्यार्थ्यांना लाभतं.

शाळा चालवण्यासाठी भक्कम यंत्रणा
आजमितीला शाळेत सातशे मुलं-मुली शिकतात, त्यात सरासरी चारशे मुली आणि उर्वरित तीनशे मुलगे आहेत. प्रत्येक वर्गात पन्नास विद्यार्थी असतात, त्यात चाळीस जण हे निवासी आहेत. तर उर्वरित दहा जण गावातली मुलं असून ते दररोज ये-जा करतात. शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे दर वर्षी साधारण दोनशे जणांची प्रवेशासाठी प्रतीक्षा यादी असते. त्यात पन्नास जणांना प्रवेश मिळतो. उर्वरित दीडशे जणांना नकार सांगावा लागतो. शाळेत राहण्याकरता मुला-मुलींना प्रशस्त असं वसतिगृह आहे. चोवीस तास पाण्याची व विजेची सुविधा, सगळ्या विद्यार्थ्यांना बंकरबेड, अंघोळीसाठी गरम पाणी, मुबलक स्वच्छतागृहं आहेत, त्यात सर्व सुविधा या संस्थेच्या खर्चातून भागवल्या जातात. त्यात मोठी दालनं आहेत. स्वतंत्र स्वयंपाक गृह, महिला व पुरुष अधीक्षक, शिपाई आणि आठ स्वयंपाकी आहेत. डायनिंग टेबलसह भव्य भोजन कक्ष आहे. मुलींच्या वसतिगृहाला विशेष सुरक्षा व्यवस्था आहे. शाळेत एकूण चौसष्ट सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. कोणालाही परवानगीशिवाय शाळेत प्रवेश दिला जात नाही. विशेषतः वसतिगृहात सुरक्षितता म्हणून प्रवेशास पूर्णतः मनाई आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची पूर्ण दक्षता घेतली जाते. भोजनात दररोज सकाळी दूध, केळी, सफरचंद नाश्ता मिळतो. दुपारी भाजी-पोळी व वरण-भात असं पूर्ण जेवण असतं. तीन वाजता नियमित नाश्ता दिला जातो. त्यात सांजा, मिसळ, पोहे असा मेनू वारनिहाय ठरलेला असतो. संध्याकाळी सात वाजता पूर्ण जेवण दिलं जातं. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांची इथंच राहण्याची सोय करण्यात आली आहे. त्यांचीही मुलं याच शाळेत शिकतात. मुलांना मनोरंजनासाठी रविवारी सायंकाळी शैक्षणिक सिनेमा दाखवला जातो. उन्हाळा आणि दिवाळी वगळता इतर वेळी मुलं शाळेतच शिक्षकांसमवेत सर्व सण-उत्सव, कार्यक्रम साजरे करतात. शाळेत वीस शिक्षक आणि पंधरा शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. वसतिगृह विभागाचं कामकाज हे खूपच जबाबदारीचं आहे व ते अधीक्षक राजेश पवार हे पंधरा वर्षांपासून उत्तमपणे बघतात. शाळेत नियमित उपक्रम तर असतातच पण या व्यतिरिक्त व्यावसायिक कला-गुणांच्या गोष्टीही शिकवल्या जातात, जेणेकरून ही मुलं जीवनात आत्मनिर्भर बनतील. खेळ, कला आणि संगीतासह मुलांचं व्यक्तिमत्त्व खुलतं. या सर्व शैक्षणिक यशप्राप्तीसाठी संस्थेचे सचिव सुधाकर साळी, कोषाध्यक्ष निरंजन भाऊ ओक हे मार्गदर्शन करतात. संस्था ही स्वतःच्या बळावर उभी आहे. शासनाकडून शिक्षकांचं वेतन व भोजन खर्च वगळता यासाठी कोणतीही मदत घेतली जात नाही, दानशूर व्यक्ती आणि संस्था यांच्याकडून आलेल्या देणगीतून शाळेचा खर्च चालतो, या निधीसाठी पुण्यातल्या ‘देणे समाजाचे’ सारख्या उपक्रमात शाळा सहभागी होते.

शाळा स्थापनेमागचा प्रेरक इतिहास
महाराष्ट्र सेवा संघ या मातृसंस्थेकडून शाळेची निगा राखली जाते, त्यांना प्रोत्साहन दिलं जातं. महाराष्ट्र सेवा संघ, नाशिक या संस्थेची तेवीस सप्टेंबर १९६० साली नाशिकमधल्या काही विचारवंतांनी मिळून स्थापना केली. त्यात स्वातंत्र्यसैनिक आणि ज्यांच्या नावानं ही शाळा चालवली जाते ते विठ्ठलराव पटवर्धनदेखील होते. तसंच त्यांच्यासोबत रावसाहेब ओक, माधवराव लिमये, कुमुदताई ओक, शांताबाई लिमये या मंडळींनी आपल्या दूरदृष्टीनं नाशिकमधल्या औद्योगिक कामगारांच्या मुलांसाठी शाळा काढायचं ठरवलं. त्यांनी त्यासाठी मोफत शिक्षणासाठी रचना विद्यालय ही शाळा सुरू केली. त्यानंतर पुढील काळात संस्थेनं नवरचना विद्यालय, औद्योगिक संस्था, श्रवण विकास विद्यालय, इंग्रजी माध्यमाची शाळा, बालवाड्या आदी संस्था सुरू केल्या.
स्वातंत्र्यसैनिक कै. विठ्ठलराव पटवर्धन यांच्या पत्नी दिवंगत कुसुमताई पटवर्धन या रचना विद्यालयाच्या पहिल्या मुख्याध्यापिका होत्या. त्यांचंच या आदिवासी भागात एक उत्कृष्ट शाळा सुरू करण्याचं स्वप्न होतं, त्यासाठी त्यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. यातूनच तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या काळात ‘भगीरथ’ प्रकल्पांतर्गत ही शाळा सुरू करण्यास पाठबळ मिळालं आणि ही शाळा सुरू झाली.
आदिवासी विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेत संधी मिळावी याकरता संस्था वरिष्ठ महाविद्यालय सुरू करणार आहे, याचा आराखडा तयार असून शासनानं मंजुरी दिल्यास या ठिकाणी नव्या इमारतीसह नवीन वरिष्ठ महाविद्यालय सुरू होईल.
शाळेला पाच वर्षांपूर्वी राज्यशासनाचा एक लाख रुपयांचा आदर्श आश्रमशाळा पुरस्कार प्राप्त झाला आहे. या व्यतिरिक्त शाळेतल्या शिक्षकांना दर वर्षी अनेक पुरस्कार मिळत आहेत.
निवासी आश्रम चालवताना अनेक अडचणी असतात. त्यातली महत्त्वाची अडचण आणि जिकिरीची जबाबदारी म्हणजे या मुला-मुलींचं आरोग्य सांभाळणं हे आहे. हे कठीण असलं तरीही संस्थेचे कर्मचारी हे आव्हान दररोज लीलया पार करतात. यात मुलांना काही तातडीची गरज भासली तर त्यासाठी शाळेची स्वत:ची रुग्णवाहिका व मार्शल जीप गाडी आहे. त्यातून रुग्णालयात नेण्यात येतं.

आदर्श शेतकरी बनवण्याचं प्रशिक्षण
शाळेतर्फे विद्यार्थ्यांसाठी कायम नवे प्रयोग राबवण्यात येतात. आपले हे विद्यार्थी जीवनात शंभर टक्के यशस्वी व्हावं यासाठी शाळा कायम प्रयत्नशील असते. यात त्यांनी केवळ शहरात जाऊन नोकरी करणं इतकंच अभिप्रेत नसतं, हा विद्यार्थी आधुनिक शेतकरी कसा बनेल याकडेही शाळेचं लक्ष असतं. शेती म्हणजे करिअर नव्हे किंवा ती कालबाह्य गोष्ट आहे, असे मानणार्‍या या आजच्या काळात शेतीही एक महत्त्वाचं करियर आहे, असं ही संस्था ठामपणे मुलांच्या मनावर बिंबवते. जवळपास सर्वच विद्यार्थ्यांकडे थोडी-फार शेतजमीन आहे. त्यांनी त्यात सोनं पिकवावं. हा संस्थेचा प्राथमिक उद्देश असतो. रचना विद्यालय, माजी विद्यार्थी संस्था या संस्थेमार्फतही विद्यार्थ्यांना तू फक्त लढ म्हण! या उपक्रमातून विविध स्पर्धा परीक्षा, विविध व्यावसायिक शिक्षण व यशस्वी व्यक्तींचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना दरमहा दिलं जातं. त्यासाठी शाळेत पोलीस दलातल्या अनेक मान्यवर, सनदी अधिकार्‍यांना व्याख्यानासाठी बोलावलं जातं.

ऑनलाईन शिक्षणातही नवे प्रयोग
आता सध्या शासनाच्या नियमानुसार नववी ते बारावी शाळा सुरू आहे. त्याआधी पंधरा जूनपासून पहिली ते बारावीच्या मुलांचे नियमित ऑनलाईन वर्ग घेतले. त्यासाठी प्रत्येक वर्गाचे व्हॉट्सअप ग्रुप बनवण्यात आले होते. झूम आणि गुगलमीटवर अनेकांना नेटवर्क नसायचं, त्यामुळे यातला मध्यममार्ग म्हणून संबंधित विषयाचे व्हीडिओ बनवण्यात यायचे. त्याची लिंक विद्यार्थ्यांना पाठवण्यात यायची. ते नेटवर्क मिळेल त्या ठिकाणी संबंधित व्हीडिओ पाहून तो अभ्यास पूर्ण करायचे. त्यातही अंदाजे साठ टक्के विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हायचा, त्यामुळे उर्वरित मुलांना फोन करून अभ्यास घेतला जायचा, त्या विद्यार्थ्यांचा पाठपुरावा केला जायचा. कधी कधी चार-पाच जणांच्या ग्रुपला एकत्र फोन करून त्यांना मार्गदर्शन केलं जायचं.
आता नववी ते बारावी वर्ग शासन-नियमानुसार सुरू आहेत, त्यात शारीरिक अंतराचे नियम, तसंच सर्व वर्ग हे सॅनिटाईज केले आहेत. विलगीकरणाचा कालावधीदेखील पूर्ण करण्यात आला आहे. त्यातून नियमित तास होतात.
आज चंद्रकांत धामणे (अध्यक्ष), विजय डोंगरे (उपाध्यक्ष), सुधाकर साळी (सचिव), निरंजन ओक (खजिनदार) शांताराम आहिरे (सहसचिव) हे संस्थेची धुरा सांभाळत आहेत, यांच्याच दूरदृष्टीमुळे इथं ज्ञानरचनावाद कृतियुक्त शिक्षणाचा पाया रुजतो आहे. या संकल्पनेला शिक्षकांनी प्रत्यक्षरूप दिलं आणि विद्यार्थ्यांच्या सकारात्मक प्रतिसादानं हे स्वप्न साकार होताना दिसत आहे.

वाघेराची ही खासगी आश्रमशाळा सर्वार्थानं आदर्श अशी म्हणता येईल, कारण मर्यादित अनुदान असूनही सातशे विद्यार्थ्यांना घेऊन ही शाळा अनेक नावीन्यपूर्ण प्रयोग करते आहे. शाळेनं आपलं अस्तित्व फक्त या नव्या प्रयोगापुरतं न ठेवता प्रखर राष्ट्रनिष्ठाही आपल्या विद्यार्थ्यांत मुळापासून रुजवली आहे. त्यातूनच एव्हरेस्टवर राष्ट्रध्वज फडकवण्याची अतुलनीय कामगिरी इथला विद्यार्थी करू शकतो. देशाच्या रक्षणासाठी ही मुलं कमांडो प्रशिक्षणाच्या माध्यमातून सज्ज आहेत, अन् एकीकडे भारताची प्रामुख्यानं ओळख असलेल्या शेतीत उच्च शिक्षणासोबत करिअर करण्याची स्वप्नं देखील इथले विद्यार्थी सत्यात उतरवत आहेत. त्यामुळे ‘‘जय जवान, जय किसान’’ ही केवळ इथं एक घोषणा नव्हे तर सर्वांना प्रेरणादायी वास्तव बनलं आहे.

– संतोष गोगले

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.