Now Reading
परोपकारी आणि नि:स्वार्थी : डॉ. कविता बोंडे

परोपकारी आणि नि:स्वार्थी : डॉ. कविता बोंडे

Menaka Prakashan

आचार्य विनोबा भावे यांनी प्रकृती-विकृती-संस्कृती ही संकल्पना खूप सोपेपणानं समजावली आहे. आपल्या ताटातली अर्धी भाकरी भुकेलेल्याला देणं ही संस्कृती, तर दुसर्‍याच्या ताटातलं हिरावून घेणं ही विकृती. मूळ असलेल्या प्रकृतीतून संस्कृती किंवा विकृती उदयाला येते. थोडक्यात काय तर, आपल्याकडे असलेलं कसं वापरावं हे ज्याला कळलं त्यांना जीवन कळलं! असंच एक तेजवलयांकित व्यक्तिमत्त्व डॉ. कविता बोंडे… जाणून घेऊया त्यांचा प्रवास!

प्रश्‍न : नमस्कार कविता मॅडम, तुमचं बालपण कुठे गेलं?
कविताताई : माझं माहेर शिक्षणाला प्रचंड महत्त्व असलेलं जळगाव जिल्ह्यातलं फैजपूर! शैक्षणिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेलं माझं माहेर आहे, आई हिमा चौधरी ही बहिणाबाई चौधरी शाळेची ट्रस्टी आहे तर वडील डॉ. एस. के. चौधरी हे धनाजीनाना महाविद्यालय फैजपूर इथं उपाध्यक्ष आहेत. मधुकरराव चौधरी माझे आजोबा, त्यांचं मला बालवयात मार्गदर्शन मिळालं. घर आणि करियर सगळं सांभाळायला हवं, त्यासाठी शैक्षणिक दृष्टीनं स्त्री सक्षम हवी हे पालकांचे संस्कार होते. त्यामुळे आम्ही दोघी बहिणी डॉक्टर आणि भाऊ बी.फार्म. झालाय. मी शाळेत असताना शाळाबाह्य स्कॉलरशिप, चित्रकला, गणित परीक्षांमध्ये, आंतरराज्य स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे आणि वरचा क्रमांक पटकवायचे. संगीत, तबला वादनाच्या काही परीक्षाही दिल्या. मी बारावीनंतर पुण्याच्या टिळक आयुर्वेदिक महाविद्यालयात प्रवेश घेतला. शेवटच्या वर्षाला असताना वैद्यकीय पार्श्वभूमी असलेल्या डॉ. विलास बोंडे यांच्या कुटुंबात लग्न करून आले.

प्रश्‍न : हे सगळं आखीव-रेखीव आयुष्य होतं. प्रकृती आणि संस्कारक्षम मन तयार झालं मग, दातृत्व भान, समाजसेवेचं भान कसं आलं?
कविताताई : मुळात आई-वडिलांकडे सामाजिक भान कायम जपलं आहे, ते सगळ्यांसाठी आपल्या परीनं उभे राहत मग हे संस्कार नकळतपणे होतच होते. पुढे वैद्यकीय क्षेत्रात काम करताना रुग्ण यायचे तेव्हा त्यांच्या विश्वासानं एक दृढ बंध निर्माण झाला. म्हणजे फॅमिली डॉक्टर ही संकल्पना आता थोडी कमी होतीय, पण मी, या नात्यानं अनेक कुटुंबांशी जोडली गेले. रुग्ण आजार बरा झाला की वैयक्तिक सुख-दु:ख, प्रश्न सांगत. मग लक्षात आलं स्त्रियांचे बहुतेक आजार हे मानसिक असतात. वैद्यकीय अहवाल सगळं ठीक सांगतात तरी बायका आजारी पडून दवाखान्यात यायच्या, मग बोलताना लक्षात आलं, देव-देव केलं, बरं नाही असं म्हटलं की सहानुभूती मिळते. निम्न स्तरातल्या घरात नवर्‍याच्या मारहाणीपासून काही दिवस सूट मिळते तर इतर वर्गातल्या घरात थोडा आराम मिळतो, घरगुती कामातून सुटका होते असा छुपा अजेंडा असायचा. मग, या प्रश्नावर मात करण्यासाठी स्वत:पासून सुरवात केली. योगासनं, ध्यान-धारणा यातून डॉक्टर म्हणून स्वत: तंदुरुस्त रहावं लागे, त्याचं यांना महत्त्व पटवून द्यायला सुरवात केली. मग महिलांचे आर्थिकदृष्ठ्या सक्षम आणि आर्थिक दृष्टीनं कमकुवत असे दोन गट केले. पहिल्या गटाला घरी काम करण्यासाठी बाई हवी असायची तर दुसर्‍या गटात संसाराला हातभार देणारं काम हवं होतं, मग परस्परांची गाठ घालून दोघांच्या प्रश्नांची उत्तरं सापडली.

प्रश्‍न : वा! म्हणजे संवाद दुवा ठरला तर, त्यातून कुटुंबांना आधार आणि तुमच्याविषयी विश्वास वृद्धिंगत झाला, पण पुढेही अनेक प्रश्न असतात, त्यांची उत्तरं कशी गवसली?
कविताताई : हो, हे अगदी बरोबर आहे. अनेक हातांना काम हवं होतं हे लक्षात येत होतं. मग बचतगट हे माध्यम निवडलं. बायकांना येत असलेलं वाळवणाचं काम रोजगार निर्मितीसाठी सुरू केलं. कुठल्याही अनुभवाशिवाय भीमथडी जत्रेत भाग घेतला आणि अनुभव नसल्यामुळे दोन दिवसांत सर्व वाळवण म्हणजेच माल फस्त! पुन्हा आम्ही सगळ्यांनी अगदी उर फुटेस्तोवर धावपळ करून नाशिकवरून रात्रीतून सर्व सामग्री मागवली. त्या प्रदर्शनात आमच्या बचत गटाच्या सदस्यांना वीस हजार रुपयांचा नफा मिळाला आणि आम्हा सगळ्यांचा उत्साह दुणावला. स्थानिक पोलिस, अधिकारी, नगरसेवक, सगळ्यांचे कुटुंबीय या सार्‍यांनी खूप सहकार्य केलं. आम्ही बचतगटाच्या महिलांच्या शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक स्थैर्यासाठी काम करायचं ठरवलं. लक्षात आलं की, या बायकांची कुटुंबं कर्जाखाली आहेत, कुठे मृत नातेवाइकांच्या दिवसासाठी गावाला जायचं म्हणून, आजारपण, तर कधी मुलांचे शिक्षण म्हणून पाच ते दहा टक्के व्याजानं काढलेलं कर्ज फेडताना ह्या महिलांची कुटुंबं पाच-सहा वर्षांमध्ये उद्ध्वस्त व्हायची. या घटनांनी मन अस्वस्थ होई, मग त्यांचं समुपदेशन करण्याचं ठरवलं. आम्ही डॉक्टर मृत शरीर अभ्यासतो, मग आम्हाला भूत कधी दिसलं नाही की कधी त्यानी त्रासही दिला नाही. तेव्हा या भीतीतून बाहेर या. दडपण विरहित जगा! मुली-मुलांचं शिक्षण, त्यांचं आणि स्वत:चं आरोग्य मोलाचं आहे, ते जपायला शिका, त्यासाठी पैसे वापरा. आम्ही बचतगटाच्या माध्यमातून त्या त्या गटाच्या महिलांना वार्षिक फक्त एक टक्का व्याजदरानं कर्ज, यातून अर्थसाहाय्य अशी सुरवात केली. मग त्यासाठी मासिक शंभर ते पाचशे रुपयांनी बचतगट खाती सुरू केली. अतिशय पारदर्शी व्यवहार ठेवत समाजकल्याण भावनेनं आम्ही डॉक्टर व इतर मैत्रिणी एकत्र आलो. नंतर संस्थेची स्थापना केली. संस्थेच्या माध्यमातून कामांना आणखी गती मिळाली. सुपरवुमन होण्याचा आग्रह धरू नका. पुरुषांना काम करायला लावा, घरामध्ये मुलगा-मुलगी भेदभाव ठेवू नका, मुलींना त्यांचे मूलभूत हक्क, संस्कार द्या, स्वत:चा पैसा नीट वापरा, घरात भाजीपाला आणा, पौष्टिक अन्न शिजवा वगैरे सारं सांगत महिलांचं मानसिक सबलीकरण करत गेलो.

प्रश्‍न : हे सगळं दिशाहीन महिलांसाठी, कुटुंबांसाठी मार्गदर्शक ठरत असेल पण मग आदिवासी वर्गापर्यंत तुम्ही कशा पोचलात?
कविताताई : ‘समृद्धी बहुउद्देशीय सामाजिक संस्थे’च्या स्थापनेनंतर काम वाढत गेलं. समाजातल्या प्रेरणादायी महिलांचा गौरव करायला सुरवात केली. यामुळे इतर महिलांनाही प्रोत्साहन मिळालं. बरोबरीनं, डिस्पोजेबल ताटं-वाट्या यांचा उद्योग सुरू केला. स्थानिक मिठाईच्या सगळ्या दुकानांत हेच द्यायला सुरवात केली. संस्थेच्या माध्यमातून महिलांना स्वयंपूर्णतेसाठी व्यवसायाभिमुख शिक्षण द्यायला लागलो. फॅशन डिझायनिंग, दागिने, बॅगा तयार करणे, शाडूचे गणपती तयार करणे, वारली कला वगैरे गोष्टी महिलांकडून करून घ्यायला सुरवात झाली.
‘प्रदूषण मुक्त नाशिक’ या उपक्रमातून पाण्याचं प्रदूषण कमी व्हावं म्हणून शाळांमधून शाडूचे गणपती तयार करायला शिकवणं योजना तर ‘प्लॅस्टिक मुक्त नाशिक’ यासाठी कापडी पिशव्या शिवणं व वाटप उपक्रम यशस्वीपणे राबवला. आता आमच्या बचतगटाच्या महिला विविध व्यवसाय करत अर्थपूर्ण जीवन जगायला लागल्या. मी आता गरज नेमकी कुठे आहे हे शोधायला लागले आणि आदिवासी पाड्यावर ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ह्या उपक्रमांमधून येऊन पोचले. इथे आरोग्य, स्वच्छता, अकाली प्रसूती, शिक्षण, अर्थकारण सगळेच प्रश्न आ वासून उभे होते. त्यावर काम करायला सुरवात केली.

प्रश्‍न : मग, नेमकी सुरुवात कुठून केलीत?
कविताताई : मला असं वाटतं समाज म्हणजे जात, धर्म-पंथ एक असलेला नव्हे तर आपण जिथं राहतो तो परिसर! मग मी हा परिसर थोडा विस्तृत करायचं ठरवलं आणि आदिवासी मुलींच्या आरोग्यासाठी, त्यांच्या कुपोषणाच्या प्रश्नावर काम सुरू केलं. त्यांच्या परिसरात निसर्ग भरभरून असतो. कोरफड, हळद, अश्वगंधा, शतावरी लावून त्याचे काढे आश्रमशाळेतल्या स्वयंपाकघरात करायला आणि मुलींना प्यायला शिकवलं. कुणी साखर दान दिली तर ती घेऊन तिकडे जाऊन शतावरी कल्प करून त्यांना द्यायचे. डॉक्टर म्हणून सोप्या, सहज उपलब्ध मार्गानं आरोग्य राखायला शिकवलं. दरम्यान, केंद्र सरकारच्या ‘हनी मिशन, स्वीट रिव्हॉल्यूशन’ उपक्रमाची माहिती मिळाली. खादी ग्रामोद्योगच्या माध्यमातून शेतकर्‍यांना प्रशिक्षण देऊन मधाच्या पेट्या लाभार्थ्यांना मिळवून दिल्या. किमान स्वत:च्या कुटुंबापुरता पौष्टिक मध खाणं आवश्यक असल्याचं पटलं आणि त्यांना जोडव्यवसाय मिळाला. ह्या सर्व उपक्रमांमुळे माननीय पंतप्रधान महोदय नरेंद्र मोदी यांनी आम्हाला कौतुकाची थाप देऊन महिलांच्या सबलीकरणासाठी असलेल्या योजनेबाबत चर्चादेखील केली.

प्रश्‍न : म्हणजे कामाला दाद मिळाली मग पुढे काय?
कविताताई : मला यादरम्यान राष्ट्रीय हस्तकला प्रोत्साहन उपक्रमाविषयी कळलं. मग मी सगळ्या वैविध्यपूर्ण काम करणार्‍या महिलांना ओळखपत्रासाठी मार्गदर्शन केलं. मीसुद्धा आमच्या बायकांबरोबर दागिने, बॅगा तयार करणं, वारली, चित्रकला, शिलाई, ब्लाउज-ड्रेस शिवणं, शोभेच्या वस्तू, पेपर क्वेलिंग, बांबूच्या वस्तू तयार करणं असं सगळं शिकले आणि माझ्यासकट सगळ्यांना ‘कारागिर’ म्हणून ओळखपत्र मिळालं. त्यामुळे आता भारतभर व परदेशात भारतीय हस्तकला विभागाच्या माध्यमातून आपल्या देशातल्या कारागिरांना खास प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केलेल्या प्रदर्शनात आमच्या महिला सहभागी होऊ शकतात. कुटुंबीय माझ्यावर असलेल्या विश्वासानं महिलांना घराबाहेर एकटीला सोडायला तयार झाले. महिलांना त्यासाठी तुम्ही आपली कला वेगळ्या प्रकारे मांडू शकता का असा विचार करायला सांगितलं, मग त्यातून एका भगिनीनं ‘पेपर क्वेलिंग माध्यमातून वारली’ अशी संकल्पना आणली आणि आता ती कला राष्ट्रीय पातळीवर नावाजली जात आहे. प्रसारमाध्यमांनीही याची दखल घेतली. आम्ही मायक्रोनच्या वस्तूदेखील करायला सुरवात केली, त्या वस्तूंना तर थेट अमेरिकेतून भली मोठी ऑर्डर आली आणि आम्ही सगळ्यांनी अहोरात्र जागून ती पूर्ण केली.

प्रश्‍न : लहान मुलांसाठी काम करावं हे कसं जाणवलं?
कविताताई : मला असं वाटतं, परिवर्तनशील वय हे लहानपणीच असतं. मुलं फक्त बघत असतात, त्यातून संस्कार टिपत असतात. म्हणून मग मुलांचं समुपदेशन सुरू केलं. पण फक्त मुलांना, समजावून बोलून चालणार नाही म्हणून मग आईशी संवाद सुरू केला. संक्रातीच्या आसपास शाळांमध्ये ‘माता मेळावा’ भरवून त्यात मार्गदर्शन व विविध उपक्रम सुरू केले. साध्या ज्वारी-गव्हाच्या पिठाचे पदार्थ, पोळी-भाजी इथपासून ते बदाम-खारका काहीही घरचं अन्न खाऊन मुलं सुदृढ राहू शकतात, हे सांगण्यासाठी हा मेळावा. अगदी स्पेशालिस्ट डॉक्टर, नामांकित शेफ, आहारतज्ज्ञ या सगळ्यांना बोलावून मोठे कार्यक्रम घडवून आणले. जागतिक हृदयदिनाच्या निमित्तानं लो कॅलरी डाएट दिलं. ‘डाएट डायबिटीस’ हा लाईव्ह रेसिपी शो घेतला त्या वेळी कामाचं महत्त्व जाणून अनेक हात मदतीला आले.
एका टप्प्यावर लालबत्तीच्या भागातही समुपदेशन, आरोग्य मार्गदर्शन हे काम केलं. तिथल्या महिलांच्या व्यथा, प्रश्न, दु:ख अक्षरश: काळीज पिळवटून टाकणारं होतं. त्या कामाची दखल घेतली गेली. एकदा नको त्या जाळ्यात अडकलेली कन्या माझ्या संपर्कातून सुरक्षित घरी परतली. चांगल्या घरातल्या मुली आर्थिक मोहानं वाममार्गाला लागलेल्या बघितल्या. पण हे जाणवलं, काही वेळा काम करताना परीक्षा असते. व्यक्ती चांगलीच असते पण परिस्थिती वेगळं वागायला भाग पाडते. पण माणसातला चांगुलपणा हृदयाच्या एका कोपर्‍यात कायम असतो.

प्रश्‍न : अनेक उपक्रम कल्पकतेनं राबवलेत त्याबद्दल सांगा…
कविताताई : काय झालं… डोंगराच्या विरुद्ध बाजूला पाणी नेहमी तोकडं असतं मग त्यासाठी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या उपक्रमातून लोकसहभागातून श्रमदान सुरू केलं. सहल काढायला सुरवात केली. शनिवार-रविवार असणार्‍या या आमच्या उपक्रमामुळे परिसरातल्या इतर सेवाभावी संस्था या कामासाठी यायला लागल्या. आमचं काम करण्याचं उद्दिष्ट साध्य झालं. काम कुणीही करो, काम व्हायला हवं. देणार्‍यांचे हजारो हात व्हायला हवेत. परसबाग, सेंद्रिय खत संकल्पना समजावून राबवायला स्त्रियांना उद्युक्त केलं. अर्थातच मी आधी सगळ्या गोष्टी केल्या आणि मग त्यांच्या बरोबर उभी राहिले.

प्रश्‍न : कोविड काळात आपलं काम आणि विषाणूबरोबर लढा सुरू होता, त्याविषयी-
कविताताई : मी कोविडच्या पहिल्या टप्प्यात डॉक्टर म्हणून रुग्णसेवेचं काम करत होते. पुढे लोकांची घरं चालावीत म्हणून आम्ही धान्य गोळा करून कुटुंबांना द्यायला लागलो. मग, काम हवं म्हणून बायका यायला लागल्या. मग भाजीच्या हातगाड्या, मास्क, दर्जेदार-वाजवी टिफिन सेवा असे छोटे उद्योग त्यांना खास परवानगी घेऊन सुरू करून दिले. गणित विषयात ऑनलाईन शिकताना मुलं गोंधळून जातात असं कळल्यावर मुलांसाठी सोशल डिस्टन्सिंग ठेवत शिकवण्या सुरू केल्या. टाळेबंदी उघडल्यावर मुलांसाठी शाळेत व्याख्यानं, मातांसाठी मेळावे हे उपक्रम, तणावमुक्त जीवनशैली यावर विविध कार्यक्रम जोरकसपणे राबवायचे आहेतच. दरम्यानच्या काळात मलाही कोविडनं गाठलं, मग औषध आणि लोकांचे आशीर्वाद उपयोगी पडले, आणि मी बरी झाले.
माझं एक तत्त्व कायम आहे, पद, पैसा, प्रतिष्ठा मला नको, मी पदरचे पैसे घालून उपक्रम राबवले. कुणीही उपक्रम देऊन टाक म्हटलं तरी मी सहज देऊन मोकळी होते, मी समन्वयक म्हणून काम करत असते. मुळात कोणताही उपक्रम हा माझा एकटीचा कधीच नव्हता-नाही, तो लोकसहभागातून पुढे जातो. वेळप्रसंगी कृती, अर्थ, कष्ट सारे करण्याची तयारी खंबीरपणे ठेवली. जे येतात त्यांना बरोबर घेऊन जाते. ज्यांचे हेतू बदलले त्यांना त्यांच्या मार्गानं मार्गक्रमण करू दिलं. फारसा वाईट अनुभव नाही आला. समाजभान कायम जपलं.

प्रश्‍न : काय वाटतं या टप्प्यावर?
कविता : एवढ्या वर्षात एक जाणवलं बायकांना करोडपती वगैरे व्हायचं नसतं, तिला फक्त आपल्या संसाराला हातभार लावायचा असतो. घरात शांतता हवी असते. समाजात शिक्षण, सुदृढ शारीरिक-मानसिक आरोग्य हे मोलाचं आहे, ते प्रत्येकानं जपायला हवं, खासकरून स्त्रियांनी. कारण कुटुंबाच्या, मुलांच्या जडण-घडणीत आईचा सहभाग हा वडिलांपेक्षा अधिक असतो. माझ्या कामात कुठे काहीही प्रश्न निर्माण झाले तर माझे शिक्षणतज्ज्ञ आई-वडील, डॉक्टर असलेले पती, इंजिनीअर मुलगा, डॉक्टर बहीण, वहिनी यांचं मार्गदर्शन आवर्जून घेते. माझे प्रयत्न कुठे कमी पडत आहेत ते तपासते.
प्रत्येक गोष्टीची नोंद कुठे ना कुठे नक्की होते, चांगल्या आणि वाईट दोन्हीची! त्यामुळे मी समाधानी आहे पण थांबणार नक्कीच नाहीए…

मंडळी, डॉ. कविता बोंडे यांना भविष्यकालीन उपक्रमांना शुभेच्छा देताना रॉय किणीकर यांच्या ओळी आठवतात,
‘ऋण फळा-फुलांचे असते या धरतीला।
ऋण फेडावयाचे राहून माझे गेले!!’

– पल्लवी मुजुमदार

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.