Now Reading
पंजाबी खाद्यसंस्कृती

पंजाबी खाद्यसंस्कृती

Menaka Prakashan

पंजाबचं नाव उच्चारताच डोळ्यासमोर येतात लज्जतदार पराठे, मलईदार लस्सी आणि पनीरचे शानदार पदार्थ. पंजाब म्हणजे उंच्यापुर्‍या आणि अंगानं भरभक्कम लोकांचा प्रदेश, त्यामुळेच तिथलं खाणंही दणदणीतच. दूध-दुभतं आणि अन्नधान्याने समृद्ध असणार्‍या या प्रदेशात खाण्याची चंगळच पाहायला मिळते. तंदुरी रोटी आणि ढाबा या पंजाबच्याच देणग्या आहेत. अशा या सुजलाम-सुफलाम प्रदेशातल्या संपन्न खाद्यसंस्कृतीविषयी…

पंज म्हणजे पाच आणि अब म्हणजे पाणी. पाच नद्यांच्या खोर्‍यात वसलेला पंजाब हा भारताची शान आहे. १९४७ मध्ये पाकिस्तान निर्माण झालं, पंजाब प्रांताची फाळणी झाली आणि पश्चिम पंजाब पाकिस्तानात गेला. भारतात राहिला तो पूर्व पंजाब. मुळातच पंजाब भारताच्या वायव्य सरहद्दीवर वसलेला असल्यामुळे आजवर अनेक परकीय आक्रमणांना तोंड देत आलाय. त्यामुळेच पंजाब लढवय्या म्हणून गणला जातो. गुरुनानक यांनी स्थापन केलेल्या शीख धर्माचे साठ टक्के अनुयायी इथं आहेत. गुरू तेगबहादूर, गुरू गोविंदसिंहासारख्या सुपुत्रांनी देशाचं आणि धर्माचं प्राणपणानं रक्षण केलं. त्यासाठी आपल्या प्राणांच्या आहुती दिल्या. भगतसिंग, मदनलाल धिंग्रा यांसारखे क्रांतिकारक, लाल-बाल-पाल या त्रयीतले लाला लजपतराय हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातले अध्वर्यू पंजाबचेच होते. प्रत्येक कुटुंबातला एक तरी सैन्यात जायला हवा ही परंपरा पंजाबचीच. त्यामुळे लष्कर आणि हवाईदल यात पंजाब्यांची संख्या जास्त असल्याचं दिसतं. पंजाबची भाषा पंजाबी आणि लिपी मात्र गुरुमुखी.
नद्यांच्या खोर्‍यांमुळे पंजाबची भूमी सुपीक आहे. शेती हा इथला प्रमुख उद्योग. याशिवाय इथली होजिअरी, यंत्रसामग्री यांना परदेशातही मान्यता आहे. पंजाबचं दरडोई उत्पन्न भारतात सर्वांत जास्त आहे.

निसर्गाचा वरदहस्त लाभलेली इथली सुपीक जमीन, हिरवीगार शेतं, भांगड्याच्या तालावर नाचणारे दणकट युवक आणि युवती, त्यांची आतिथ्यशीलता आणि वीरश्री ही पंजाबच्या गौरवशाली संस्कृतीची प्रतीकं आहेत. भारताच्या हॉकीच्या टीममध्ये सर्वाधिक खेळाडू पंजाबचे असतात. सतलज नदीवरचं भाक्रा धरण, अमृतसरचं सुवर्णमंदिर, जालियनवाला बाग या स्थळांना भेट दिल्याखेरीज पंजाबची सहल पुरी होत नाही.
मुळात पंजाबी माणूस हाडापेरानं मोठा आणि दणकट. पंजाबी स्त्रियादेखील नाजूक सापडणं कठीणच. त्यांची सलवार-कमीजची वेशभूषा तिच्या सुटसुटीतपणामुळे संपूर्ण देशातल्या स्त्रियांना ‘प्यारी’ झालेली आहे. मुबलक दूधदुभतं, पौष्टिक खाणं आणि त्याचबरोबर वृत्तीही दिलदार. तिथे औपचारिकपणाला थारा नाही. पाहुण्यानं पाणी मागितलं तर मलईनं काठोकाठ भरलेल्या लस्सीचा ग्लासच पुढे येईल. पंजाबमधल्या कुठल्याही लंगरमध्ये जा, तिथल्या सामूहिक स्वयंपाकघरात बनलेला प्रशाद, नान-दाल खाऊन पाहुणा तृप्त झालाच पाहिजे. तंदूर ही पंजाबची खासियत. त्याचं मूळ कुठेतरी हडप्पा संस्कृतीत आढळतं. जमिनीत पुरलेली, घंटेच्या आकाराची मातीची तंदूर ही पंजाबच्या खेड्यात अजूनही सापडते. आपापली भिजवलेली कणीक घेऊन गावातल्या बायका तिथल्या सामूहिक तंदूरवर रोट्या भाजायला येत असत, अजूनही येतात. या तंदूरला ‘सांजाचुल्हा’ असं म्हटलं जातं. काळानुसार आता तंदूरचं स्वरूप बदललं पण तरीही तंदुरी रोटी आणि ढाबा या पंजाबच्याच देणग्या आहेत.
गहू, बासमती तांदूळ, मका, सरसों, विविध भाज्या इथं मुबलक प्रमाणात पिकतात आणि दुग्धजन्य पदार्थांची तर पंजाबमध्ये रेलचेल असते.

पंजाबी माणूस खवय्या. सरसोंका साग, मकईकी रोटी, मॉकी दाल, राजमा, तंदुरी रोटी, छोले आणि पनीर-क्रीमयुक्त केलेली अनेक तोंडीलावणी ही पंजाबी खाण्याची खासियत आहे. पराठा-खरं म्हणजे पराठा हा दिवसभरात एकदा तरी हवाच. मग तो मुळ्याचा असेल, आलू पराठा असेल किंवा कॉलीफ्लॉवरचा. चांगला जाडजूड, तुपानं माखलेला पराठा ब्रेकफास्टला खावा नाहीतर जेवणात. याशिवाय नान, कुलचा, रोट्या तर हव्याच. मजबूत बांध्याच्या पंजाब्यांना लस्सीदेखील हातभर ग्लासातून आणि खास मलईवाली लागते. स्वयंपाकात अस्सल तुपाचा वापर आणि पनीरखेरीज तर त्यांचं पानच हलत नाही. खाण्याच्या बाबतीत नाजूक-साजुकपणा त्यांना चालणारच नाही.

आज परदेशात भारतीय मेनू म्हटला की पनीर टिक्का, पालक पनीर, दाल माखनी, नान, छोले-भटुरे हेच पदार्थ समोर येतात आणि ते तिथल्या कुठल्याही भारतीय रेस्टॉरंटमध्ये मिळतात. तरीही पंजाबबाहेर मिळणारे पदार्थ आणि पंजाबमधल्या घराघरातून पकवले जाणारे हेच पदार्थ यात खूप फरक आहे. मसाल्यांचा कमी वापर आणि शक्यतो ताज्या पदार्थांचा समावेश ही पंजाबी घरातल्या अन्नाची वैशिष्ठ्यं आहेत. पंजाब्यांची तगडी शरीरयष्टी आणि बेडर वृत्ती यांचं तेच रहस्य असावं. इथे मांसाहारी पदार्थही फार मोठ्या प्रमाणावर खाल्ले जातात, आपण इथे शाकाहारी पदार्थांचा विचार करणार आहोत.

पंजाबी गरम मसाला
साहित्य : शंभर ग्रॅम धने, पंचवीस ग्रॅम जिरे, पंचवीस ग्रॅम काळी मिरी, पंधरा ग्रॅम शाहीजिरे, पंधरा ग्रॅम सुंठ पावडर, दहा ग्रॅम मोठी वेलची, दहा ग्रॅम लवंगा, पाच ग्रॅम दालचिनी, पाच ग्रॅम तमालपत्र
कृती : सुंठीखेरीज इतर जिन्नस कोरडे भाजून घ्यावे आणि सुंठीसकट सर्वांची पावडर करावी.

पंजाबी कैरी लोणचं
साहित्य : पाच-सहा मध्यम आकाराच्या कैर्‍या, दीड टे. स्पून मेथी दाणे, दोन टे. स्पून मोहरीची डाळ, दोन टे. स्पून बडिशेप, दीड टे. स्पून कलौंजी, एक टे. स्पून हळद, दोन टे. स्पून लाल तिखट, चवीनुसार मीठ, मोहरीचं तेल
कृती : कैर्‍या धुवून, पुसून काप करावे. कैर्‍यांच्या कापात तेलाखेरीज सर्व जिन्नस एकत्र करून बरणीत भरावेत. ही बरणी चार दिवस उन्हात ठेवावी. त्यानंतर त्यात कैर्‍या बुडतील एवढं मोहरीचं तेल घालावं.

गाजर- कॉलिफ्लॉवर- सलगम लोणचं
साहित्य : एक कप गाजराचे लांबट काप, दोन कप कॉलिफ्लॉवरचे तुरे, दोन कप सलगमचे चौकोनी तुकडे, चार टे. स्पून मोहरीचं तेल, एक टे. स्पून आल्याचा कीस, पाव टी स्पून हिंग, एक टे. स्पून मोहरीची पावडर, अर्धा टी स्पून हळद, पाव टी स्पून मेथी पावडर, दोन टी स्पून लाल तिखट, पाव कप व्हिनेगर, दोन टे. स्पून गूळ, चवीपुरतं मीठ
कृती : चिरलेल्या भाज्या कपड्यावर टाकून कोरड्या कराव्या. व्हिनेगरमध्ये गूळ घालून एक उकळी आणावी आणि गार करावं. तेल तापवून त्यात हिंग आणि आलं घालावं, मोहरीची पावडर, हळद, मेथी, लाल तिखट आणि भाज्या घालून एक मिनीट परताव्या. गॅस बंद करावा. मग त्यात मीठ आणि व्हिनेगर मिसळून गार झाल्यावर लोणचं बरणीत भरावं.

भटुरे
साहित्य : दोन कप मैदा, पाव कप गव्हाची कणीक, दोन टे. स्पून तेल, एक टे. स्पून दही, अर्धा टी स्पून साखर, अर्धा टी स्पून यीस्ट पावडर, चवीला मीठ, तळण्यासाठी तेल
कृती : यीस्टमध्ये साखर आणि अर्धा कप कोमट पाणी घालून दहा मिनिटं झाकून ठेवावं. कणीक, मैदा, तेल, दही आणि मीठ एकत्र करावं. त्यात फुगलेल्या यीस्टचं पाणी आणि लागेल तसं पाणी घालून पीठ भिजवावं आणि झाकून एक तास ठेवावं. या पिठाच्या पुर्‍या लाटून गरम तेलात तळाव्या.

पंजाबी राजमा
साहित्य : दीड कप राजमा, तीन टे. स्पून तेल, एक तमालपत्र, दोन मसाला वेलची, एक कप बारीक चिरलेला कांदा, बारीक चार लसूण पाकळ्या, एक टी स्पून बारीक चिरलेलं आलं, दोन कप बारीक चिरलेले टोमॅटो, बारीक चिरलेल्या दोन हिरव्या मिरच्या, एक टी स्पून धने पावडर, अर्धा टी स्पून जिरे पावडर, एक टी स्पून लाल तिखट, अर्धा टी स्पून आमचूर, एक टी स्पून गरम मसाला, चवीपुरतं मीठ, सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती : राजमा रात्रभर भिजवून कुकरमध्ये पाणी घालून शिजवावा. शिजताना थोडं मीठ घालावं. कढईत तेल गरम करून त्यात तमालपत्र आणि मसाला वेलची घालून मिश्रण परतावं. आलं, लसूण आणि कांदा घालून परतावं. कांदा शिजला की मिरच्या, जिरे आणि धने पावडर घालावी. टोमॅटो घालून परतावं. लाल तिखट, आमचूर घालावं. घोटून त्यात शिजलेला राजमा घालावा. गरम मसाला आणि लागेल तसं मीठ घालावं आणि दोन मिनिटं शिजवावं. वरून कोथिंबीर घालावी.

पनीर लबाबदार
साहित्य : पाव कप काजू, तीन हिरव्या वेलची, तीन-चार लवंगा, आठ-दहा लसूण पाकळ्या, एक टे. स्पून आल्याचा कीस, तीन कप चिरलेले टोमॅटो, दोन टे. स्पून बटर, दोन तमालपत्र, दीड कप बारीक चिरलेला कांदा, एक टे. स्पून लाल तिखट, दोन टे. स्पून धने पावडर, एक टे. स्पून जिरे पावडर, पाच-सहा-हिरव्या मिरच्या, एक टी स्पून मध, दोन टी स्पून कसुरी मेथी, चवीनुसार मीठ, चारशे ग्रॅम पनीर, दोन टे. स्पून क्रीम
कृती : पाण्यात काजू, वेलची, लवंगा, आलं, लसूण आणि टोमॅटो घालून मिश्रण उकळावं. गार झाल्यावर मिक्सरमध्ये पेस्ट करावी. कढईत दोन टे. स्पून बटर गरम करून त्यात तमालपत्र घालावं. कांदा घालून परतावं. लाल तिखट आणि वाटलेली पेस्ट घालून परतावं. धने-जिरे पावडर घालावी आणि झाकण ठेवून दहा मिनिटं शिजू द्यावं. नंतर झाकण काढून पाच-सात मिनिटं शिजवावं, ढवळत राहावं. तेल सुटायला लागलं की हिरव्या मिरच्या, मध आणि मीठ घालावं. कसुरी मेथी घालावी. पनीरचे चौकोनी तुकडे करावे आणि पाव कप पनीर किसून घ्यावं. पनीरचे तुकडे घालून पाच मिनिटं शिजू द्यावं. क्रीम आणि किसलेलं पनीर घालावं.

पंजाबी ग्रेव्ही
साहित्य : तीन टे. स्पून तेल, एक टे. स्पून किसलेलं आलं, एक टे. स्पून लसूण पेस्ट, पाच-सहा लाल सुक्या मिरच्या, तीन-चार लवंगा, एक दालचिनीचा तुकडा, एक टी स्पून जिरे आणि एक टे. स्पून धने यांची पावडर, अर्धा कप कच्च्या कांद्याची पेस्ट, दोन टी स्पून गरम मसाला, पाव कप बटर, पाव टी स्पून हळद, अर्धा कप टोमॅटो प्युरी, पन्नास ग्रॅम काजू, चवीनुसार मीठ
कृती : काजू गरम पाण्यात भिजवून पेस्ट करावी. कढईत तेल तापवून त्यात आलं, लसूण पेस्ट घालून परतावी. कांद्याची पेस्ट घालून परतावं. मसाल्याची पावडर आणि हळद घालून मिश्रण परतावं. टोमॅटो प्युरी घालून तेल सुटेपर्यंत परतावं. काजूची पेस्ट आणि बटर घालून परतावं. मीठ आणि थोडं गरम पाणी घालून बारीक गॅसवर दहा मिनिटं उकळावं. ही ग्रेव्ही अनेक भाज्यांसाठी वापरता येते.

अमृतसरी वडी (सांडगे)
साहित्य : एक कप चणे, एक कप उडीद किंवा मूग डाळ, एक टे. स्पून जिरे, अर्धा टी स्पून हिंग, एक टी स्पून लवंग पावडर, एक टी स्पून काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ
कृती : चणे आठ-दहा तास भिजत घालावे. डाळ दोन-तीन तास भिजत घालावी आणि अगदी कमी पाणी घालून दोन्ही वेगवेगळं वाटून घ्यावं. दोन्ही एकत्र करून त्यात सर्व जिन्नस घालून कालवावं आणि या मिश्रणाचे चपटे गोळे करून उन्हात प्लॅस्टिकवर वाळवावे. खडखडीत वाळल्यावर डब्यात भरून ठेवावे.

अमृतसरी आलू-वडी रस्सा
साहित्य : दोन मध्यम बटाटे, एक कप टोमॅटो प्युरी, एक हिरवी मिरची, अर्धा कप वड्या (सांडगे), एक कप चिरलेला कांदा, अर्धा टी स्पून जिरे, दोन टी स्पून धने पावडर, अर्धा टी स्पून लाल तिखट, अर्धा टी स्पून हळद, चिमूटभर हिंग, दोन टे. स्पून दही, तीन टे. स्पून तेल, मूठभर चिरलेली कोथिंबीर, चवीला मीठ
कृती : बटाटे धुवून, सोलून त्याचे चौकोनी तुकडे करावे. वड्याचे लहान-लहान तुकडे करावे. एक टे. स्पून तेल तापवून त्यात वड्यांचे तुकडे घालून परतून घ्यावे आणि बाजूला ठेवावे. उरलेलं तेल तापवून त्यात जिरे, हिंग घालावं. कांदा घालून लालसर होईपर्यंत परतावं. मग त्यात धने पावडर, तिखट, हळद घालून परतावं. टोमॅटोची प्युरी घालावी. दही घालावं आणि ढवळत राहावं. त्यात बटाटे, वड्यांचे तुकडे, मीठ अणि चार कप पाणी घालून बटाटे शिजत ठेवावे. बटाटे आणि वड्या मऊ झाल्या की गॅस बंद करावा. कोथिंबीर घालावी.

कढी-पकोडे
साहित्य : दीड कप घट्ट आंबट दही, तीन-चार कप पाणी, एक टी स्पून लाल तिखट, अर्धा टी स्पून हळद, एक टी स्पून गरम मसाला, चिमूटभर हिंग, दीड कप बेसन, एक कप लांबट चिरलेला कांदा, अर्धा कप बारीक चिरलेला कांदा, एक टे. स्पून बारीक चिरलेला लसूण, आठ-दहा मेथी दाणे, अर्धा टी स्पून ओवा, चवीनुसार मीठ, दोन हिरव्या मिरच्या, दोन लाल सुक्या मिरच्यांचे तुकडे, एक टी स्पून जिरे, आठ-दहा कढीपत्त्याची पानं, तेल
कृती : दही घुसळून त्यात अर्धा कप बेसन, अर्धा टी स्पून गरम मसाला, अर्धा टी स्पून तिखट, अर्धा टी स्पून हळद आणि मीठ घालून एकजीव करावं. त्यात तीन कप पाणी घालावं. उरलेलं बेसन, ओवा, हळद, हिंग, मसाला, तिखट आणि मीठ एकत्र करावं. त्यात कांद्याचे काप मिसळून थोडा वेळ तसंच झाकून ठेवावं. तेल गरम करून त्यात पकोडे तळून घ्यावे. दोन टे. स्पून तेल गरम करावं आणि त्यात जिरे घालावे. जिरे तडतडले की मेथ्या घालाव्या, हिंग घालावा. बारीक चिरलेला कांदा घालून मिश्रण परतावा. आलं-लसूण, लाल मिरच्या, कढीपत्ता घालून परतावं. दह्याचं मिश्रण घालून ढवळत राहावं. लागलं तर थोडं गरम पाणी घालावं. पकोडे घालून गॅस बंद करावा.

मॉ की दाल
साहित्य : एक कप अख्खे उडीद, अर्धा कप चिरलेला कांदा, एक कप टोमॅटो प्युरी, चार ठेचसेस्या लसूण पाकळ्या, एक टी स्पून आल्याचा कीस, एक बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरून, एक टी स्पून धने पावडर, अर्धा टी स्पून जिरे, अर्धा टी स्पून हळद, अर्धा टी स्पून लाल तिखट, अर्धा टी स्पून गरम मसाला, एक टे. स्पून तूप, चार कप पाणी, चवीनुसार मीठ आणि मूठभर चिरलेली कोथिंबीर
कृती : उडीद रात्रभर पाण्यात भिजवावे. भिजलेले उडीद आणि मीठ घालून कुकरमध्ये मऊ शिजवावे. तूप तापवून त्यात जिरे घालून ते तडतडलं की कांदा घालून परतावा. टोमॅटो प्युरी घालावी, आलं-लसूण, धने पावडर, गरम मसाला, हळद, तिखट घालून परतावं. हिरवी मिरची घालावी आणि तेल सुटेपर्यंत मिश्रण परतत राहावं. लागेल तसं मीठ घालावं. नंतर एक उकळी आणून तूप आणि कोथिंबीर घालावी आणि गॅस बंद करावा.

सरसोंका साग
साहित्य : एक जुडी मोहरीची भाजी, अर्धी जुडी पालक, अर्धी जुडी चंदनबटवा आणि एक कप मेथीची पानं, पाव कप मुळ्याचे काप, एक टे. स्पून आल्याचे काप, दोन हिरव्या मिरच्या, सात-आठ लसूण पाकळ्या, एक टी स्पून लाल तिखट, पाव टी स्पून हिंग, तीन कप पाणी, दोन टे. स्पून मक्याचं पीठ, एक कप बारीक चिरलेला कांदा, तीन टे. स्पून तेल, चवीनुसार मीठ
कृती : सगळ्या पालेभाज्या धुवून, चिरून कुकरमध्ये घालाव्या. शिजताना त्यात आलं, लसूण, मिरच्यांचे तुकडे, मुळ्याचे काप, तिखट, हिंग मिसळावं. शिजल्यावर मक्याचं पीठ आणि थोडं पाणी घालून कालवावं. गार झाल्यावर मिक्सरमध्ये घालावं. तेल तापवून कांदा परतावा. त्यात वाटलेला पाला घालून मीठ घालावं, दोन-तीन मिनिटं उकळावं.
सरसों का साग आणि मकई की रोटी हे पदार्थ ही पंजाबी खाद्यसंस्कृतीची ओळखच मानली जाते.

मकईकी रोटी
साहित्य : तीन कप मक्याचं पीठ (हे जरा जाडसर असतं, कॉर्नफ्लोअर वेगळं), दोन टे. स्पून तेल, चवीपुरतं मीठ आणि पाणी
कृती : मकईकी रोटी म्हणजे मक्याच्या पिठाची भाकरी. मक्याच्या पिठात मीठ, तेल आणि गरम पाणी घालून पीठ भिजवावं. पीठ भिजवून थोडा वेळ ठेवायची गरज नाही. लगेच रोट्या करता येतात. भाकरीप्रमाणे थापायची किंवा पोळपाटावर लाटायची. नंतर आधी तव्यावर आणि मग जाळावर भाजायची. पिठाला चिकटपणा कमी असतो त्यामुळे कडेला चिरा पडू शकतात. त्यात थोडी कणीक घातली तर लाटायला त्रास कमी होतो.

पंजाबी आलू पराठा
साहित्य : दोन कप कणीक, चवीनुसार मीठ, चार टे. स्पून तेल, मॅश केलेले चार मध्यम बटाटेे, एक टी स्पून हिरव्या मिरच्यांची पेस्ट, एक टे. स्पून आलं-लसूण पेस्ट, पाव टी स्पून हळद, अर्धा कप बारीक चिरलेला कांदा, अर्धा टी स्पून जिरे पावडर, एक टी स्पून धने पावडर, एक टी स्पून पंजाबी गरम मसाला, अर्धा टी स्पून आमचूर पावडर, मूठभर चिरलेली कोथिंबीर, तेल
कृती : कणकेत तेल, मीठ आणि लागेल तसं पाणी घालून भिजवावी. तेलाचा हात लावून झाकून ठेवावी. दोन टे. स्पून तेल गरम करून त्यात कांदा, मिरची, आलं-लसूण पेस्ट परतावी, त्यात बटाटे घालावे. मीठ, जिरे-धने पावडर, गरम मसाला, आमचूर घालून लगदा तयार करावा.
भिजलेल्या कणकेचे साधारण बारा गोळे करावे, बटाट्याचेही तेवढेच करावे. कणकेची पुरी लाटून त्यावर सारण ठेवून सगळ्या बाजू दुमडाव्या आणि हा गोळा पिठावर लाटावा. लाटलेला पराठा, गरम तव्यावर दोन्ही बाजूंनी भाजावा. भाजल्यावर तेल सोडावं.

पनीर कुलचा
साहित्य : एक कप गव्हाची कणीक, एक कप मैदा, पाव टी स्पून सोडा, दोन टे. स्पून दही, दोन टे. स्पून तेल, एक टी स्पून साखर, चवीनुसार मीठ
सारणासाठी : दोनशे ग्रॅम पनीर, मूठभर चिरलेली कोथिंबीर, दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या बारीक चिरून, पाव टी स्पून लाल तिखट, पाव टी स्पून ओवा, अर्धा टी स्पून आमचूर, एक टे. स्पून तीळ, चवीनुसार मीठ, तेल, बटर
साहित्य : कणीक, मैदा, तेल, साखर, सोडा, मीठ, दही एकत्र करावं. लागेल तसं पाणी घालून पीठ भिजवावं. तेल लावून झाकून ठेवावं. पनीर किसून घ्यावं. त्यात मिरच्या, कोथिंबीर, तिखट, मीठ आणि आमचूर घालून कालवावं. कणकेचे गोळे करावे. एक गोळा घेऊन चार-पाच इंचांची पुरी लाटावी. त्यावर दोन-तीन टे.स्पून सारण ठेवून कडा बंद कराव्या. पोळपाटावर थोडे तीळ पसरून त्यावर हा गोळा ठेवून लाटावा. तव्यावर दोन्ही बाजूंनी भाजावा. भाजताना तेल सोडावं.

मूलीका पराठा
साहित्य : चार कप मुळ्याचा कीस, अर्धा टी स्पून ओवा, अर्धा टी स्पून जिरं, एक टी स्पून आल्याची पेस्ट, दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, एक टी स्पून लाल तिखट, अर्धा टी स्पून गरम मसाला, अर्धा टी स्पून आमचूर पावडर, दीड कप गव्हाची कणीक, तेल, चवीपुरतं मीठ
कृती: तेल तापवून त्यात ओवा आणि जिरं घालावं. जिरं तडतडलं की मिरच्या, आल्याची पेस्ट आणि मुळ्याचा कीस घालून परतावं. मग त्यात तिखट, गरम मसाला, आमचूर पावडर आणि लागेल तसं मीठ घालावं. मुळा शिजला की गॅस बंद करावा. नंतर कणीक, तीन टे. स्पून तेल आणि मीठ घालून कालवावं. लागेल तसं पाणी घालून पीठ भिजवावं. पीठ अर्धा तास झाकून ठेवावं. पिठाचा एक गोळा घेऊन त्याची वाटी करावी, त्यात सारण भरून गोळा बंद करावा आणि पिठावर पराठा लाटावा. तवा गरम करून त्यावर तेल सोडून पराठा दोन्ही बाजूंनी भाजावा.

कडा प्रसाद
साहित्य : एक कप गव्हाची कणीक, एक कप तूप, एक कप साखर, एक टी स्पून वेलची पावडर, एक कप पाणी, दोन कप दूध
कृती : दूध-पाणी एकत्र करून त्यात साखर घालावी, साखर विरघळली की गॅस बंद करावा. कढईत तूप घालावं. ते वितळलं की त्यात कणीक घालून खमंग भाजावी. त्यात उकळतं दूध-पाण्याचं मिश्रण घालत ढवळत राहावं. म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. वेलची पावडर आणि बदामाचे काप घालावे.

पंजिरी
साहित्य : एक कप गव्हाची कणीक, एक टे. स्पून रवा, अर्धा कप पिठीसाखर, दोन टे. स्पून सुंठ पावडर, एक टे. स्पून कमरकस, एक टी स्पून ओवा, अर्धा कप डिंकाचे बारीक खडे, दोन टे. स्पून मखाणे, दोन टे. स्पून सुक्या खोबर्‍याचे पातळ काप, एक टे. स्पून कलिंगडाच्या बिया, पंधरा-सोळा बदाम, आठ-दहा पिस्ते, अर्धा टी स्पून जवस, एक टी स्पून खसखस, पाव किलो तूप
कृती : तूप तापवून त्यात डिंक फुलवून घ्यावा. जवस, मखाणे, बदाम, काजू, पिस्ते, खोबर्‍याचे काप, कमरकस, कलिंगडाच्या बिया हे पदार्थ वेगवेगळे तळून घ्यावे. गार झाल्यावर हे सर्व जिन्नस मिक्सरमधून भरड काढावे. उरलेल्या तुपात कणीक आणि रवा खमंग भाजावा. ओवाही भाजून घ्यावा. भाजलेलं पीठ गार झालं की त्यात पिठीसाखर, ओवा, सुंठ पावडर, ड्राय फ्रुट्सची भरड घालून कालवावं.
पौष्टिक अशी पंजिरी तयार होते.

गाजरका हलवा
साहित्य : अर्धा किलो गाजर, एक कप साखर, दोन कप दूध, पाच-सहा टे स्पून तूप, दहा-बारा काजू, सात-आठ बदाम, एक टी स्पून वेलची पावडर
कृती : गाजरं धुवून किसावी. बदाम भिजत घालून तासाभरानं सालं काढावी आणि काप करावे. दोन टे. स्पून तूप कढईत घालून त्यात काजू परतून घ्यावे आणि बाजूला काढावे. मग त्यात गाजराचा कीस घालून परतावा. मग दूध घालून शिजवावा. मग साखर घालून परतावा. उरलेलं तूप घालून परतावा. तूप सुटायला लागलं की वेलची पूड, काजू, बदामाचे काप घालावे.

– वसुंधरा पर्वते

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.