Now Reading
न तुटणारी नाळ

न तुटणारी नाळ

Menaka Prakashan

साईशेठ साडेतीन क्विंटल कांदा आणलाय नजर मारून घ्याल का?’’ साईनाथ आपल्याच तंद्रीत छताकडे नजर लावून बसला होता. कसल्या तरी गाढ विचारात हरवल्यासारखा वाटत होता. त्याच्या कानापर्यंत काहीच पोचत नव्हतं.

‘‘शेठ कांदा चांगला हाय. तुम्ही बघाच एकदा. मग भाव करा. पण तुम्ही बगीतल्या बगर घेणार नाय म्हणतो बघा तुमचा मुनीम, नजर मारा म्हणजे मी मोकळा होईन.’’ तो शेतकरी गयावया करत बोलत होता. अजूनही साईनाथ तंद्रीतून बाहेर येत नव्हता. मग मात्र शेतकरी उठला आणि साईनाथाला हलवून जागं करू लागला.
‘‘काय आहे बाबा? कशाला उठवतोस मला?’’ साईनाथ तंद्रीतून बाहेर येत शेतकर्‍यावर जवळ जवळ खेकसला.
‘‘काय करू शेठ? दोनदा सांगितलं तरी ऐकलं नाय तुमी. विचारात बसला होता. म्हणून हालवावं लागलं शेठ! माफ करा. गावी परतायची घाई हाय. तेवढं मालावर नजर मारून घ्या म्हणजे मुनीम माल घ्यायला मोकळा.’’ शेतकरी अजीजीनं बोलत होता.
‘‘शांतारामजी यांचा माला बघा आणि उतरून घ्या. हिशोब देऊन टाका आजच. तीन चार क्विंटलच्या मालासाठी माझ्याकडे का पाठवता? देऊन टाका त्यांचे पैसे आजच्या बाजारभावाने.’’
‘‘हो साहेब,’’ म्हणत शांताराम मुनीम उठले व शेतकर्‍याला घेऊन निघाले. त्यांना खूप आश्चर्य वाटलं. प्रत्येक वेळी माल बघूनच घेणारे आपले शेठ आज असे काय वागतायत. काय बिनसलंय?
साईनाथला सकाळी आंघोळ करून देवाला धूप निरांजन करताना एकदम कानात कोणीतरी कुजबुजल्यासारखं झालं. ‘‘झिलू! झिलूडडड रे?’’ बरेच वर्षांनी कोणीतरी आपल्या लहानपणीच्या नावाने बोलावत आहे याची त्याला जाणीव झाली आणि तो अस्वस्थ झाला. खरंतर मागचं सर्व आयुष्य विसरून गेला होता. गावावरून पळून आल्यापासून त्याचं आयुष्यच बदललेलं होतं. आयुष्यच कशाला, सर्वच बदललेलं होतं. मूळ नाव, गाव सर्व मागे पडून त्याची आता एक नवी ओळख तयार झाली होती.
साईनाथ शेठची आताच चाळिशी उलटली होती. अडत बाजारात स्वत:ची अशी ओळख त्याने तयार केली होती. मेहनतही घेतली.

गावाहून पळून तो मुंबईला आला त्यावेळी जेमतेम बारा-तेरा वर्षांचा होता. आजही तो प्रवास त्याला आठवत होता. सकाळी ती हाक कानांत गुंजली आणि सगळं गत आयुष्य डोळ्यांसमोरून झरझर सरकू लागलं. बाबाच्या कुशीत झोपायचं लहानपण, त्यांच्या बरोबर होडीतून मासे पागायला जायचा हट्ट, आईची आणि बाबाची भांडणं. सगळं काही डोळ्या समोरून सरकत होतं. साईनाथ अस्वस्थ होत होता. लहानपणी बघितलेली आयुष्याची स्वप्नं आणि आताचं आयुष्य यात फार फरक होता. बाबा समुद्रात होडी घेऊन जायचा. रात्रभर मासे पागून सकाळी सकाळी परत यायचा मग आई कालवणा साठी थोडे मासे काढून ठेवायची व बाकीचे घेऊन बाजारात विकायला जायची. सहा सात वर्षांचा झिलू एखादा मासा गपचूप काढून बाजूला दडवे. आई गेली की चुलीच्या मुंबरात भाजून मीठ, तिखट लावून खाऊन टाके. तृप्त होऊन मग तो झोपलेल्या बाबाच्या कुशीत शिरे. बाबा चळवळे आणि झिलूला जवळ ओढून झोपून जाई. बाबा आणि झिलू दोघंही एकमेकांत असे मायेने गुंतले होते. आई बाजारातून आली की जेवणाला लागे. ताज्या माशांचं सार आणि डोंगरासारखा वाढलेला भाताचा ढीग बापलेक ओरपत, भुरके मारत चूपचाप खात असत. आईचं तोंड चालू असे. झिलूला आईचा रागच येत असे. तोंडाळ बाई होती.

बाबाला जेवतानादेखील तावातावाने काहीतरी बोल लावत बसे. नेहमी पैसा, कपडे, कमाई यांवरून बोल लावत असे. बाबा काही न बोलता गप्प भात गिळत असे. तो खोल समुद्रात होडी घेऊन जायचा म्हणून समुद्रासारखाच शांत झाला होता असं झिलूला वाटायचं. बाबा खूप मेहनत करून मासे पागून आणी. आई ते विकून पैसे मिळवी आणि आपल्याकडेच ठेवी. तरी देखील ती बाबालाच बोल लावी. झिलूला बाबा आवडायचा. संध्याकाळी बाबा त्याला खांद्यावर घेऊन समुद्रावर जाई. वाळूवर उतरून धावायची मजा येई. बाबाचे इतर सवंगडी पण येत ते काहीतरी बाटलीतून घेऊन येत. पानांच्या द्रोणातून ते एकएक जण पीत नसत. झिलू वाळूवरच्या कुरल्यांच्या मागे दौडत खेळत बसे. अंधार व्हायला आला की बाबा झिलूला घेऊन निघे. आता तो त्याला खांद्यावर घेत नसे. चालताना तो भेलकांडत चालत असे. झिलू मागे लागे.
‘‘बाबा दमलंय मिया. उचलून घी ना.’’
‘‘नाय रे माझ्या झिला. तुजो हात पकडतय, घेवक सांगा नुको. दोघव पडाव ना रे.’’ बाबा झिलूला समजावे. समुद्रावर जाताना सरळ, ताठ चालणारा बाबा परतताना असा का चालतो हे झिलूला समजत नसे. पण बाबावर जीवापाड प्रेम असल्याने तो त्याचं ऐके.
***

ही चित्रं साईनाथाच्या डोळ्यांसमोरून झरझर चालत होती. आता इथे बसण्यात अर्थ नाही, त्याला कळून चुकलं.
‘‘शांतारामजी, आज दुकान सांभाळा. जमलं तर संध्याकाळी येईन. नाहीतर उद्या हिशोब घेईन तुमच्याकडून एवढं बोलून साईनाथ उठला आणि सरळ खोलीवर निघाला. रेल्वे लाईनला लागून असलेल्या एका चाळीत त्यानं खोली मिळवली होती. एकटा जीव त्यामुळे जास्त गरजा नव्हत्या. घराच्या जवळच असलेल्या राणेच्या खानावळीत कायम जेवणाची सोय झाली होती. घरी चहा करण्यापुरती दोन-चार भांडी. झोपायची स्टील फोल्डिंग कॉट, एक स्टीलचे कपाट व एक भक्तिभावाने सजवलेला देव्हारा, ज्यात रवळनाथ आणि गणपतीच्या मूर्ती ताज्या फुलांच्या हारांनी सजून बसल्या होत्या.
साईनाथने घरी येऊन पलंगावर अंग झोकून दिलं. कधीच न अनुभवलेली एक आगळीच हुरहुर मनात दाटत चालली होती. उजवा हात चेहर्‍यावर आडवा ठेवून तो उताणा पडला होता. तेवढ्यात परत एकदा कानांत आवाज गुंजला.

‘‘झिलूऽऽ रे?
हा आवाज बायकी होता. साईनाथ थरथरला, मनांत आलं आईचं काही बरं वाईट नाही ना झालं? तिचं भूत होऊन कानात बोलत तर नाही? आपल्या या विचारासरशी तो झटकन उठून बसला. ‘भूत बीत काय नाय!’ असं पुटपुटून परत आडवा झाला. आणि आईची कदर तरी का करायची? त्याच्या आवडत्या बाबा बरोबर ती भांडायची. आठ वर्षांचा झाला त्यावेळी थोडी थोडी समज त्याला येत होती. काळोख्या रात्रींना बाबा होडी घेऊन जात नसे, घरीच असे. जसा तो झिलूला कुशीत घ्यायचा तसाच तो आईला कुशीत घ्यायला बघायचा पण आई त्याला ढकलून द्यायची, बडबडायची, ‘सोर्‍याचो वास आणि घामटान हा आंगाक तुमच्या. माका उलटी येता. बाजूक व्हा.’
बाबा तरीदेखील झटापट करायचा. अर्धवट झोपेत झिलूला समजायचं. आई सुटायचा प्रयत्न करतेय, पण बाबा तिला जखडून जवळ घेतोय. ही झटापट थांबली की आई वैतागत उठायची. तिची बडबड चालूच असायची.

‘‘रांडेचो छळता. रात्री काय थंड पाण्यानं न्हाव. राडो करून ठेवता नुसतो.’’ मग उठून मागच्या पडवीत बदाबदा पाणी ओतल्याचा आवाज येई. थोड्या वेळाने आई न्हाऊन आलेली वाटे. तोपर्यंत बाबाने झिलूला कुशीत घेतलेला असे. झिलूदेखील कुशीत शिरून राही. बाबा आईला कशाला कुशीत घेतो! ती ढकलते, बडबडते. मला घेऊन झोपावं बाबाने. तिच्या वाटेला जाऊच नये असं वाटे. आता बाबाच्या कुशीतली उब त्याला गाढ झोपेत घेऊन जात असे. सकाळी सकाळी आई उठवी. त्या उठवण्यात कधी माया दिसली नाही. ‘मुडद्या उठ! केवाचा उजवाडला. माका जावचा हा सावताच्या बागेत पोफळी येचूक. उठ लवकर.’ झिलू गडबडून उठे. मागे जाऊन राखोंडीने तोंड धुवून येई. आई नटून तयार असे. त्याच्या पुढ्यात पेजेचा वाडगा आपटे आणि तरातरा निघून जाई. बाबाचं मासे पागायला जाणं, चंद्रावर अवलंबून असे. तिथीप्रमाणे तो जायचा. वेळ बदलायची. पण घरातून मात्र तो रात्री जेवून बाहेर निघून जाई. झिलू दहा-अकरा वर्षांचा होत होता आणि त्याला थोडी समज यायला लागली होती. सकाळी बाबा यायच्या अगोदर आई तयार होई. पहाटेच उठून पाणी भरून न्हाऊन धुवून भात आणि निसत्याक बनवून ठेवी. स्वत: बकाबका खाऊन घेई. तिला हर्‍या सावंताच्या बागेत सुपारी वेचायला जायची घाई असे. तरी पण जाताना ती पाथी नाहीतर वळेसर बनवून केसात माळी. पावडरीने तोंड सफेद करून टाकी. मगच निघे. आपल्याला लागणारे सामान ती मासे विकायला जाई तेव्हाच घेऊन येई.

ती बाहेर पडली की वाडीतल्या बायका तिच्याकडे पाहून तिच्यामागे फिदीफिदी हसत. हळूहळू मला त्यांनी मारलेले ताशेरे ऐकू येत. मला आईची लाज वाटे.
‘‘सुपार्‍यो निवडूक काय थोबाड रंगवून जावक होया?’’
‘‘हरोय तसलो नी ह्याय तसला. घोवाक फसवता. मरात एक दिवस.’’
‘‘पोराक एकटो टाकून ओवजत जाता बग कसा. लाजय नाय मेल्याक.’’
बहुतेक सगळे वाडकरी आमचेच जातवाले. पावसात थोडीफार शेती व चार-दोन नारळी पोफळी एवढीच संपत्ती असलेले. खपाटीला गेलेली पोटं आणि कमरेला आकडी- कोयता लावून फिरणारी प्रजा. हळूहळू सगळे मासेमारी बंद करत होते. कामासाठी मालवण गाठत होते. काही लोक नारळी-पोफळीवर चढण्यात तरबेज होते. ते मोठ्या जमीनदारांचे नारळ पाडण्याचं व पोफळी पाडण्याचं काम करून एकवेळचे जेवण व थोडे फार पैसे कमवत. इतर वेळी भट्टी लावून दारू काढणे हा उद्योग. पण माझा बाबा तसा नव्हता. होडी घेऊन जायचा आणि मासे पागून आणायचा. होडी व्हलवून त्याचे दंड मल्लासारखे फुलून आलेले असायचे. कित्येक वेळी दिवसापण होडी घेऊन जायचा व तीन-चार तासांत परत यायचा. अर्धी टोपली तरी मासे आणायचा. समुद्राच्या पाण्यात फिरल्यामुळे काळा शाळीग्राम झाला होता. तरी तरतरीत, टुकटुकीत, चमकदार वाटायचा. फक्त संध्याकाळी चौपाटीवर वाडीतल्या चार लोकांबरोबर हातभट्टीची घेऊन तर्र व्हायची एकच खोड त्याला होती.

आई मात्र दररोज त्याच्यावर तोंडसुख घेत असायची. मला राग राग व्हायचा. पण मी काय करणार? मी लहान होतो. घरातून पळून जाऊ लागलो. आमच्या शेजारीच दोन घरं होती. एक सखूकाकीचं आणि दुसरं मंगीकाकूचं. त्या बाहेर येऊन बोलताना दिसायच्या.
‘‘ऐकलंस मंग्या, हिरग्यान आरती ओवाळूक सुरवात केल्यान घोवाची. दुसरो धंदोच नाय तेका. सांज पडली की बोंबबराडो सुरू करता.’’
‘‘होय गे काय वाटात ता बोलत गो तेका. तो ऐकान बरो घेता. पैलवान हा एक लात पेकटात घातलान तर सरळ होयत रांगड्या.’’
बाबा खरंच का ऐकून घेतो? का बोलत नाही? झिलूला प्रश्न पडायचा. आईचा राग यायचा. शेजारच्या बायांचाही राग यायचा. कशाला दुसर्‍यांच्या घरातले ऐकत बसतात. मग झिलू भरधाव सुटायचा समुद्रावर जायचा. वाटेत एक सुकी काटकी घ्यायचा. आणि ओल्या वाळूत खणू लागायचा. जोर जोरात खणून वाळूचा ढीग एका बाजूला करत बसायचा. फूट, दोन फूट खोलीवर पाणी झिरपायला लागायचं आणि अंगातून घामाच्या धारा लागायच्या. अंगावरून समुद्रावरचा वारा हात फिरवायचा आणि थंड थंड वाटायचं. राग थंड व्हायचा. झिलू बराच वेळ तिथेच बसून राहायचा. रात्रीचा अंधार दाटत जायचा. चांदणं हळूहळू पसरायला लागायचे. भरती येऊ लागली की समुद्राची गाज वाढायला लागायची. जोरात वाहणार्‍या वार्‍याने माडांच्या झावळ्यांची सळसळ वाढायची. त्यांच्या सावल्या वाळूवर डुलायला लागायच्या. एखाद्या माडाखालची जुनी बोट व त्याच्यावर पडलेली माडाची अक्राळविक्राळ सावली डोलायला लागली की पोटात भीतीचा गोळा उभा रहायचा आणि त्यातच एकदम मागून हाक यायची…

‘‘झिलू ऽऽऽ’’
दचकून झिलू उभा व्हायचा. ही हाक त्याच्या बाबाची असायची.
‘‘झिलू ऽऽऽ रे खंय आसस?’’
झिलू आवाजाच्या दिशेने धावत सुटायचा. तोंडाने बोंबटत असायचा, ‘‘बाबाऽऽऽ पुळणार आसाय रे! तू खंय दिसत नाय माका.’’
एवढ्यात बाबा किनार्‍याच्या झुडपातून वाळूवर दिसू लागायचा. झिलू धूम ठोकत त्याच्याकडे जाऊन घट्ट मिठी मारायचा. आज त्याने हातभट्टीची लावलेली नसायची. आज तो पहाटे बोट घेऊन जाणार असायचा. झिलूचा हात पकडून तो घरची दिशा पकडायचा.
‘‘अरे जेवक नुको तुका? उपाशी रवतलं? वाडीत शोधान ईलय. तुझो पत्त्योच नाय खंय.’’ झिलू गप्प राहायचा. काहीच बोलायचा नाही. मग तोच म्हणायचा, ‘‘आयशेचा बोलणा ऐकान वैतागलं रे? काय मनार नाय घ्यायचा आपण. आपला काम करायचा नि गप खायचा. मग भांडाण वाढत नाय. मी काय बोलतय काय? असता एक एकाचो सोभाव.’’
तोपर्यंत वाडी आलेली असायची. घरी पोचलो की आई परत आरती ओवाळणार का याची भिती पोटात उभी व्हायची. पण ती काय पण बोलायची नाही. दोन पत्रावळीवर भात घालायची, वर सार ओतायची एक एक मासा मधेच काढून घालायची. हे सगळे करताना भांड्यांचा आवाज वाढायचा. तोंड मात्र बंद असायचे. बाबा आणि झिलू भात ओरपून उठायचे. आणि खाटल्यावर एकमेकांशेजारी गपगार बसायचे. ते दोघं घरात एकमेकांशी कधी फारसे बोलायचेच नाहीत.
मग आई हर्‍या सावंताच्या बागेत जास्त काम म्हणून अगदी रात्र पडेस्तोवर राहू लागली. तिची नाटकं वाढू लागली. येताना ती ओच्यातून एक दोन नारळ आणि पसा- दोन पशे सुपार्‍या आणू लागली. एका मडक्यात ती सुपार्‍या भरून ठेवे. मडकं भरले की ते घेऊन ती बाजारात जाई व विकून येई. आता तिच्या पायात चप्पल आली. घरात पावडरीचे डबे आले आणि आई रंगू लागली. मला राग येई. बाबाने ही तिची नाटकं बंद करावी असं वाटे. पण तो काहीच बोलत नसे.

पावसाळा आला की समुद्र खवळायचा. मग बाबाची होडी बंद. एक लहान जाळं घेऊन बाबा बाहेर पडायचा. आता त्याची मासेमारी खाडीत सुरू व्हायची. खाडीला होऊर नसेल तर मासे मिळत. बाबा कधीपण अर्धी टोपली भरल्याशिवाय घरी येत नसे. तिघांचं भागायला तेवढे मासे पकडणं जरुरी असे. पण तो केव्हा येईल याचा नेम नसे. कधी सकाळी सकाळी गेलेला बाबा दुपारला जेवायच्या वेळी येई. तर कधी दुपार टळून जाई. केव्हाही आला तरी आई मासे घेऊन संध्याकाळीच बाजारात जाई. कधी कधी बागेतून तिला यायला उशीर झाला तर मग मासे फुकट जात. शेजारच्यांना देखील नको असत. प्रत्येकाच्या घरातील कोणीतरी मासेमारी करीतच असे. नंतर तर आई हर्‍याच्या बागेत रात्रीपर्यंत थांबू लागली आणि मासे दुसर्‍या दिवशी सकाळीच घेऊन जाऊ लागली. ती आता मासे कुणालातरी घालून घाईनेच परत यायची आणि तयार होऊन हर्‍याच्या बागेत जायची. माशांचे पैसे कमी मिळायचे. बाबाची मेहनत फुकट जायची, असं झिलूला वाटे. त्याचा बाबा काही बोलत नसे.
***

साईनाथच्या डोळ्यासमोरून हे चित्र झरझर सरकत होतं. आजूबाजूचं कसलंच भान त्याला नव्हतं. गाव सोडून तो आला त्यावेळीपासून आत्तापर्यंत गावी गेलाच नव्हता. मग आज एवढी गावची आठवण का येतेय? मनात अशी अस्वस्थता का? हे त्याला उमगत नव्हतं. दुपार टळून गेली होती. पोटात भूक लागल्याची जाणीव झाली. त्यानं चहा बनवला. चहा बिस्किटं खाऊन तो परत कॉटवर आडवा झाला. परत एकदा साईनाथ आठवणीत हरवला.
मुंबईच्या भाजी बाजारातली ती मजुरी त्याला आठवली. पहाटे तीन वाजता उठून बाजारात जावं लागे. भाजीचे मोठे गोण, टोपल्या ट्रकमधून उचलून ते अडत व्यापार्‍यांच्या दुकानांसमोर ठेवायचे. भूक लागली की ढिगातले दोन-चार टोमॅटो, दोनचार काकड्या खायच्या आणि परत कामाला लागायचं. गावी कामाची सवय नव्हती, संध्याकाळी अंग ठणकत असे. बाबाची खूप आठवण येई. डोळे पाण्यानी भरून जात. आता ठेले बंद झालेले असत आणि तो एखाद्या फळीवर आपलं अंग मुटकळी करून झोपून जाई. त्याच्या अबोल आणि कामसूपणामुळे, एका अडत व्यापार्‍याने त्याला कायम कामी ठेवून घेतलं. पण त्या वेळी त्याची गडबड उडाली होती. त्यांनी नाव विचारताच झिलू गडबडला, पण तोंडातून निघून गेलं- साईनाथ- त्याने त्या दिवशी स्वत:चं बारसं स्वत:च केलं होतं. मग मात्र पुढे त्याला खूप खोटं बोलावं लागलं होतं. त्याचं सबंध नाव साईनाथ मोरे झालं. नावाबरोबर जातही बदलली. हळूहळू त्याने भाजी व्यापार्‍यांकडून उरलेली भाजी उचलायला सुरवात केली. अडत बाजार दुपारी दोन-तीन तास बंद असे त्यावेळी हा त्यातली चांगली भाजी निवडून वेगळी करू लागला. छोटे व्यापारी उपनगरातून येत व याच्याकडून स्वस्तात भाजी नेत. हळूहळू जम बसू लागला. तीन-चार वर्षांत त्याने स्वत:चा होलसेलचा ठेला घेतला. पैसे चांगले मिळू लागले. वर्षं निघून जात होती. झिलू आता जगासाठी साईनाथ मोरे म्हणूनच ओळखला जाऊ लागला. कित्येक ओळखी झाल्या. काहींनी नावावरून त्याला जातभाई ठरवला. सोयरिका आणल्या पण साईनाथने ठरवलं कुणाला फसवायचं नाही. लग्न करायचंच नाही. आपल्या बाबासारखा ताप नकोच. त्याचा लग्न या शब्दावर पुरता राग होता. तो आपल्या खोलीत साईनाथ मोरे म्हणून आरामात जगत होता, त्यात त्याला बदल नको होता.
‘‘झिलू ऽऽ रे’’ परत तीच हाक मनात गुंजली आणि साईनाथची तंद्री तुटली. ही हाक परत परत का ऐकायला येते? त्याला समजेना. प्रत्येक वेळी ही हाक त्याला गावाकडे नेत होती. आताही तो परत लहानपणात शिरला.
***

आईचं आता बरं चाललं होतं असं वाटू लागलं. नारळ आणि सुपार्‍या ढिगानं यायला लागल्या होत्या. बाबा मासे आणायचा पण आईला विकायला जायला वेळच मिळत नसे. पोफळी पाडपाचे दिवस आले की, किंवा नारळ उतरवले की, ती त्यातच असे. एकदा हर्‍या घरी आला. बाबा घरीच होता.
‘‘हिरग्या आसा?’’ हर्‍याची हाळी ऐकून झिलू आणि मागून आई दारात धावले. काळ्या फटफटीवरून हर्‍या रुबाबात उतरला. गाडीची चावी काढून बोटाभोवती गरगर फिरवत पडवीत आला. आईची तारांबळ उडाली होती.

‘‘येवा बसा! पण आमच्याकडे खुर्ची नाय.’’ ओशाळत आई म्हणाली. बाबा ढीम हलत नव्हता. पण आता त्याच्या नाकपुड्या फुलत होत्या. चेहरा ताठरत होता. ओठ थरथरत होते पण तो काहीसुद्धा बोलत नव्हता. मधेच एकादा उसासा जोरात बाहेर पडत होता.
‘‘हिरग्या तुझी नारळ सुपारीची बाग चांगली इली गो! माझीय एवढी चांगली नाय येवक.’’ हर्‍याने हसर्‍या चेहर्‍याने आईला सांगितले. झिलूला नवल वाटलं. आईची बाग? आमचं झोपडंसुद्धा वाळूवर सरकारी जागेत बांधलेलं. आमची अशी नखभर पण जमीन नव्हती. आणि हर्‍या म्हणतोय आईची बाग? बाबा आईकडे चमकून पाहू लागला. त्याच्या डोळ्यात अंगार पेटला होता. का ते समजत नव्हते. बाबा तरातरा घरातून बाहेर पडला. खांद्यावर जाळे घेऊन मासे पागायला निघाला. झिलू त्याच्या मागे धावला.
‘‘बाबा थाम मी येतंय’’ झिलूची बोंब बाबाच्या कानापर्यंत पोचत नव्हती. वाळूत धांवताना झिलूची दमछाक झाली होती. तो वाळूतच लोळण घेत रडू लागला. आज काहीतरी विपरीत होणार असं त्याला वाटू लागलं. रात्र पडली तसा उठून त्यानं घरचा रस्ता धरला. परत येताना सखूकाकी दिसली. बाहेरच तांदूळ पाखडीत उभी होती. मिणमिणत्या चिमणीच्या प्रकाशात तिने विचारलं.
‘‘को रे तो? झिलू काय रे!’’
झिलू न बोलताच घराकडे
निघाला होता.
‘‘काय बोलतलो बिचारो. रांडग्यान सगळ्याचो ईस्कोट करुचा काढल्यान हा. सखुकाकी पुढेही काही बोलत होती. घरी पोचला तर आई मजेत होती. हर्‍या निघून गेला होता. आईने रांधायला घेतलं होतं. आज तिने नारळ घालून सार बनवलं होतं. रात्र वर चढत होती पण बाबा येत नव्हता. झिलूला बाबाच्या आठवणीने रडू येत होतं. दोन तीन घटका गेल्यावर आईची टकळी सुरू झाली.
‘‘खंय गेलो हा रामाक ठावक. जेवकय येळेर येवचो नाय. माझा काय मी जेवन गप झोपतलय. झिलू जेवतलं काय रे? की तुय बापासाठी थांबतलं?’’
झिलू हलला नाही. बाबा रागावून गेलाय तो आला की त्याच्या बरोबरच तो जेवणार होता. हिरग्याने स्वत:ला वाढून घेतलं आणि जेवून भांडी साफ करायला बसली. बाहेरून जोरात आवाज आला. कोणीतरी धडपडलं होतं. झिलू धावत बाहेर गेला. बाबा झोकांड्या खात उभा रहात होता. खांद्यावर जाळं नव्हतं पण हातात बांबूचा पुरुषभर उंचीचा दांडा होता. तो घरात शिरला आणि त्याने उरकाळी फोडली.

‘‘रांडग्या खंय आसस तू? ये हय बघतय तुझा आज तुझा कांडातच काडतय.’’
आई भांडी टाकून घरात धांवली. तिला बघून बाबा पिसाळला! ‘‘गरीब आसलय तरी तुका भुक्या ठेवलय काय गो?’’ एवढं बोलत त्याने एक दांडा आईला लगावला.
‘‘मेलय गे बाय! शिरापडो हेच्या तोंडार. दारू पिऊन मारता माका, धावा गे बायानो.’’ आईने बोंब ठोकली आणि वाडीतल्या सगळ्या बायका आणि पुरुष दारात जमले. झिलू घाबरून बोंब मारत रडत बाहेर पळाला. दार अडवून उभ्या असलेल्या बायकांना ढकलून तो बाहेरच्या पारीवर हमसून हमसून रडत बसला.
‘‘पयल्यानच करूक होया होता ह्या. आता मारान काय उपेग. भंडलली बाय ती. सुदारतली थोडीच?’’
‘‘कसा नटून ओवजत जाय, भोग आता कर्माची फळा.’’ हे ताशेरे कशासाठी हे झिलूला समजत नव्हतं. त्याला एवढंच माहीत पडत होतं की बाबा आईवर जाम तापलाय. आईनेच काय तरी केलं असणार. त्या शिवाय का या बायका बाबाची बाजू घेऊन बोलतायत. आता हे केव्हा थांबणार? बाबा केव्हा जेवायला घेणार? सगळे प्रश्न त्याला भेडसावत होते. बाबा दांड्यानी झोडायचा तेवा आईची बोंब उठायची. मग त्याने बोलायला सुरवात केली.
‘‘घर बाटवलंस. काय कमी होता तुका? गरीब होतय तरी दोन घांस सुकाचे मिळतीत बघत होतय ना? काय अवदसा आठवली तुका. जा जावन तुझ्या बागेतच रव तोंड दाखवू नको माका.’’ आई नुसते बोंबलत होती नाहीतर गळा काढून रडत होती. बाबाची इज्जत समुद्राच्या वार्‍याबरोबर गावात पार चोळामोळा होऊन उडत पोचली होती आणि शेजारच्या वाडीतले लोकही येऊन पोचले होते. काही जाणत्या लोकांनी घरात जाऊन बाबाच्या हातातला दांडा हिसकावून घेतला. हळू आवाजात त्याला समजावू लागले. झिलूला वाटलं होतं तेच झालं. आज वाईट कायतरी घडणार ते घडलं होतं. थोड्याच वेळात सगळं शांत झालं.

तमाशा संपला म्हणून बायांनी घरचा रस्ता पकडला. मोठी मंडळीदेखील बाबा आता शांत झाला म्हणून निघून गेली. झिलू हळूच घरात शिरला. बाबा एकटाच खाटेवर निपचित पडला होता. त्याच्या कुशीत शिरत बाबाला त्याने मिठी मारली. बाबाचा हात त्याच्या डोक्यावरुन फिरू लागला.
थोड्या वेळाने आईचा आवाज आला.‘‘नारळ घालून निस्त्याक केलंय. खावक बसतास?’’
‘‘घाल मढ्यावर तुझ्या! माका कायएक खावचा नाय तुझ्या हातचा!’’
‘‘अहो! झिलू पण जेवलो नाय हा! तेच्या साठी तरी उठा. अन्नार राग काढू नुको.’’
‘‘झिलू! जेव जा तू माका काय नको हा.’’
‘‘मी नाय बाबा. तू जेवलस तरच जेवान. भूक लागली तरी उपाशी रवान. तू खाशीत तेवाच खायन मीया.’’
बाबाने झिलूला उठवलं. हात धरून जेवायला बसवलं. एकाच पत्रावळीवर वाढलं आणि त्याला भरवू लागला. चारपाच घास खाल्ले. मग लक्षात आलं, बाबा खातच नाही. झिलू घास हातात घेऊन बाबाला भरवायला गेला. बाबाचा चेहेरा बदलला. ओठ थरथरू लागले. चेहरा वेडावाकडा हलू लागला आणि बाबाला रडू फुटलं. तो मुसमुसू लागला. त्याचा भरवण्यासाठी वर केलेला हात तसाच होता. मग झिलूचा हात पकडून त्याने घास भरवून घेतला.
***

साईनाथच्या डोळ्यासमोरून हा प्रसंग झरझर सरकत गेला. त्यालाही गळ्यात आवंढा आलेला गिळवेना. दाटून आलेला गळा ठणकू लागला. डोळ्यांतून धारा सुरू झाल्या. उठून एक पेला पाणी पिण्यासाठी निघाला तेव्हा त्याचा झोक जात होता. कितीतरी वेळ आपलं गतजीवन त्याच्या डोळ्यासमोर येत होतं. त्याला आज कुठेही जावंसं वाटत नव्हतं. पाणी पिऊन तो परत कॉटवर आडवा झाला. कॉटच्या कुरकुरण्यातूनही त्याला परत तो आवाज आला, ‘झिलू ? खंय आसस रे!’ आता ती हाक विचारणारी झाली होती. ‘खंय आसस!’ विचारत होती. कोणाची असेल. बाबाची ? बाबाची नसणारच बाबातर केव्हाच गेला. समुद्राला दररोज जिंकणारा एक दिवशी त्यालाच कायमचा भेटायला गेला. झिलूला मग घरी राहणं असह्य झालं होतं. ‘झिलू ऽऽ खंय आसंस?’’ कोण बोलवतंय त्याला समजत नव्हतं. बाबा आपल्याकडे तर बोलवत नाही ना? या विचाराबरोबर तो थरथरून गेला.

त्या भांडणानंतर घर सुधारलंच नाही. आई बागेत जायचीच. तिनं ते सोडलं नाही. माझी बाग आहे. मी कमवली आहे, असे काही तरी बरळायची. बाबा चिडायचा. पापाची कमाई कोण खाईल, म्हणायचा. संध्याकाळ झाली की निघून जायचा, तो तर्र होऊन यायचा. मग काहीतरी भांडण चालू व्हायचं आणि आई दांड्याचा मार खायची. बोंब पाडायची, पहिल्यांदा वाडीतल्या शेजारणी खास करून सखुकाकी व मंग्याकाकी मधे पडून आईला सोडवायच्या. मग बाबा कॉटवर पडायचा. कायतरी बरळत असायचा. आईला घाल घाल शिव्या घालायचा. हे दररोजचं होऊन बसलं होतं.
आम्ही मासेमारी करून पोट भरणारे लोक. आमच्यातही जमीनदार होते. कित्येकांच्या नारळी पोफळीच्या बागा होत्या. आंबे फणसदेखील होते. पण झिलूच्या बाबाकडे काहीच नव्हतं. आज्याने देखील मासेमारीशिवाय काहीच केलं नाही. बाबाने चांगली मासेमारी करून स्वत:ची होडी तरी केली होती.
आईने साथ दिली असती तर त्याने खूप काही केलं असतं. पण आई खूप श्रीमंत व्हायचा विचार करीत असावी. पण तिची बाग, हे कोडे उलगडत नव्हते. बाबा कधीही न बोलणारा पण आत्ता दररोज शिवीगाळ करत बसे.
एक दिवशी हर्‍या सावंत घरी आला. आई घरी नव्हती. बाबा कॉटवर आडवा झाला होता. झिलू त्याच्याजवळ बसून काहीतरी बोलत होता.
‘‘ईष्ण्याऽऽ घरात आसस काय रे?’’ हर्‍याची हाळी ऐकून बाबा उठून बसला. हर्‍या आत आला. बाबा काहीच बोलत नव्हता. हर्‍यानेच बोलणं सुरू केलं.
‘‘ईष्ण्या! तुका सांगतय ता ऐक, तुझ्या बायलेन माझ्या कडसून चार एकराची बाग नांवार करून घेतल्यान हा. तेचा पीक पाणी खावन गप रव. हिरग्याक तरास देव नको. गांठ माझ्याशी हा.’’

बाबा थरथरत होता. हर्‍या सावंत जमीनदार. पाटलाचा नातेवाईक, पैशाने मातब्बर. त्याच्यापुढे बाबाचा काय निभाव लागणार. राग येऊन देखील तो अन्याय सहन करण्याशिवाय काहीच करू शकत नव्हता. तरी देखील तो बोलला.
‘‘आमका नुको तुझी बाग. माशेमारीत्सून गावता ता पुरत होता आमका. कोणी सांगीतल्यान बाग देवक? मी नाय मागीतलय.’’
‘‘होय? ईचार तुझ्या बायलेक. हां ठेवलंय मी तेका. काय करशीत तू? तेचा पोटपाणी म्हणून दिलय चार एकराचो तुकडो. गप खावन रव. तेका तरास दिलस तर बग.’’ हर्‍या तरातरा निघून गेला. बाबाचा चेहरा वेडावाकडा होऊन थरथरायला लागला होता. दांडा घेऊन त्याने इकडेतिकडे आपटायला सुरवात केली. आईचा आरसा फोडून टाकला. घरभर येरझार्‍या घालू लागला. त्याचा आज रंग काही बरोबर वाटत नव्हता.
संध्याकाळी आई येईपर्यंत त्याने कसाबसा तग धरला. आईने घरात पाय ठेवताच तो डरकाळला.
‘‘कोणाक इचारून ईकलस तुका. चार एकरांच्या बागेसाठी घर सोडून दुसर्‍याची रांड होवक शरम नाय इली?’’ एवढं बोलून त्याने दोन चार दांडे आईला हाणले आणि मोठे जाळे उचलून समुद्राकडे निघाला. झिलू त्याच्या मागे धावला. झपझप चालत बाबा होडीकडे पोचला. होडीत जाळं टाकून, दोर सोडून होडी व्हलवत समुद्रात शिरला. अवसेचा काळोख हळूहळू पसरत होता आणि त्याची होडी खोल समुद्रात ठिपका होऊन नाहीशी झाली होती. झिलू पायाने वाळू उडवत रडत घराकडे परत निघाला.

घरी आईची रडारड चालू होती. मधूनच बाबाला शिव्या घालत होती. तिची कटकट ऐकत झिलूने खाटल्यावर झोकून दिलं. आज बाबा ओहोटीच्या वेळी कसा गेला? भरतीला जातो नेहमी. असे बाबाचेच विचार मनात येत होते. केव्हा झोप लागली समजलंच नाही. रात्री केव्हातरी जाग आली. पोटात गलबलल्यासारखं होत होतं. उपाशी झोपलो, म्हणून असेल असं वाटलं. भात आणि कालवण घेतलं. पण घशाखाली एकही घास उतरेना. पोटातली गलबलही थांबत नव्हती. काहीतरी विचित्र वाटत होतं. झिलू तसाच लोळत पडला होता. उजाडलं तसा समुद्रावर धावत सुटला. बाबाची बोट किनार्‍यावर नव्हती. बाबा अजून आला नव्हता. एवढा वेळ तो कधीच बाहेर राहिला नव्हता. दिवस बरा वाटेनासा झाला. भरकटत फिरत परत घरी आला. त्या वेळी आई निघून गेली होती. झिलू तळमळत झोपायचा प्रयत्न करत होता. संध्याकाळी आई घरी आली.
‘‘बाबा खंय रे झिलू?’’ तिने विचारलं.
‘‘अजून नाय ईलो.’’ हुंदका गळ्यात दाटत होता.
‘‘खंय रवलो देवाक ठावक’’ असं म्हणत आईने जेवण करायला घेतले. झिलू रात्री पासून भुकेला होता, तरी आताही खायची इच्छा होत नव्हती. रात्रभर तळमळत होता, बाबाची वाट बघत होता.
दुसर्‍या दिवशी सकाळी दोघेजण मासेमार आले. आईला विचारू लागले
‘‘इष्णो हा घरात?’’
‘‘नाय परवाच रात्री जाळा घेवून गेले हत. आजून येवक नायत.’’ झिलूच्या पोटात धस्स झाले. तो लक्ष देऊन ऐकू लागला.
‘‘नाय! काय झाला हा. तेची होडी आमका समुद्रात दिसली. आत कोण दिसा नाय, म्हणून दोर पकडून घेवन ईलव. होडयेच्या आजूबाजूक शोधलंव पण कोणच दिसाक नाय. होडयेत जाळा नाय, माणूसय नाय. आमका वाटला होडी व्हावत इली असात. ईष्ण्याची होडी आमी वळाकतव म्हणून घेवन ईलव. ईष्ण्याक सांगाक म्हणून ईलव. तो गेलो खंय?’’
‘‘तो माशे पागाक परवाच होडी घेवन गेलो. मी बगीतलय. मोठा जाळा घेवन गेल्लो.’’ झिलू जोरात ओरडला आणि बाबाला हाका मारत समुद्राकडे धावला. थोड्या अंतरावर त्याला आईची बोंब ऐकू आली.

‘‘समुद्रान गिळल्यान गोऽऽऽ’’
झिलूच्या कानांत ही बोंब तापल्या सळीसारखी घुसली. ‘बाबा बाबा’ अशा हाका मारत तो समुद्रावर पोचला. भरती पुरी आली होती. लाटा किनार्‍यापर्यंत येत होत्या दोन तीन होडया लांबवर दिसत होत्या.
बाबा बुडाला काय? पट्टीचा पोहणारा बुडेल कसा? न खाता पिता एवढावेळ राहिलच कसा? काल पोटात गलबलत होतं. आता दोन दिवस झाले होते. काय बरं वाईट झालं नसेल ना? रागावून गेलेला बाबा. जीव तर दिला नसेल ना? समुद्र आपल्या पोटात काही ठेवत नाही. बाबाचे प्रेत किनार्‍यावर लागेल. झिलू समुद्राकडे पाहत बसला. हळूहळू भरतीचं पाणी वाढत होतं. भरतीबरोबरच समुद्र सगळे बाहेर आणून किनार्‍यावर टाकतो. मेलेले देवमासेसुद्धा किनार्‍यावर फेकून देतो.
ऊन वर येऊ लागलं तसं झिलू उठला आणि समुद्राच्या जवळ गेला. किनार्‍यावरून पुर्‍या चौपाटीवर धावत सुटला. मैलभर लांबीच्या वाळूच्या किनार्‍यावर कुठेही काही दिसत नव्हतं. एक मोठी लाट पायापर्यंत पोचली तसा तिला लाथ मारून ओरडला, ‘‘बाबाक गिळलंस तू. लवकर प्रेत दी तेचा.’’ मग रडत घराकडे धांवत सुटला.
घरी लोकांची गर्दी जमली होती. घरा समोरच मंग्या काकी, सखुकाकी इतर बायकांसोबत उभ्या होत्या. सखुकाकीने रघूला जवळ घेतला.
‘‘ल्हान हा अजुन कसा होतला गो हेचा?’’
‘‘स्कोटच झालो सगळो.’’
‘‘तर काय! हिरग्या जायत ओवजत कोणाबरोबर तरी. हेचा कसा होतला?’’
मग काही पुरुष मंडळीतून आवाज सुरू झाले.
‘‘भरती सोपली काय ध्यान ठेवक होया. खंयय लागात प्रेत. बाजूच्या गावच्या होडीवाल्यांका पण सांगाक होया. प्रेत दिसला तर कळवा म्हणून.’’
हे ऐकताना झिलूला रडू फुटत होतं. आतातर तो हमसा हमशी रडू लागला. सखुकाकी त्याला आपल्या घरी घेऊन गेली. डोक्यावरून हात फिरवत म्हणाली.
‘‘वांयच भात नि कालवण खातंस? दुपार होवन गेली. भुकेलो असशीत.’’
झिलूला काहीच खावंसं वाटत नव्हतं. पण सखुकाकीनं दिलेला भात आणि कालवण हुंदके देत देत तो खाऊ लागला.
असेच तीन-चार दिवस गेले. झिलू दररोज समुद्रावर जाऊ लागला. सबंध किनारा ओहोटीच्या वेळी पालथा घालू लागला. पण त्याला बाबा मिळाला नाही. आजूबाजूच्या गावातूनही काही सांगावा आला नाही.

तो सखुकाकीकडेच राहू लागला. केव्हाही घरी जाई. आई त्याला जेवायचं विचारी. तो सखुकाकीकडे जेवल्याचे सांगे. मग आई बडबडायला सुरू करे.
‘बापाशीन घात केल्यान. पोर पण घराभायर. माका पाणी देणारा तरी कोण रवात काय? मरतय मी घरासाठी. पण सगळे चल्ले माका सोडून.’ मग हुंदके देऊन रडणं सुरू. झिलू कॉटवर अंग झोकून देई. बाबाचा चेहरा डोळ्यासमोर येई. डोळ्यातून धारा लागत. आवाज न काढता तो डोळ्याचं पाणी वाहू देई.
पंधरा दिवस झाले आणि आई कामावर जाऊ लागली. झिलू विचार करू लागला. बाबा गेला, आता आपल्यालाच कमवायला शिकलं पाहिजे. तो समुद्रावरच्या होडीवाल्याबरोबर बोलू लागला. त्यांना जाळे टाकायला, मासे पागायला शिकवा; म्हणून मागे लागला. पण त्यांनी तेवढं लक्ष घातलं नाही. बाबाचे लहान जाळं घरी होतं. तो ते घेऊन समुद्रात गेला. कंबरभर पाण्यात गेल्यावर जाळं फेकायला गेला तर ते सगळं गुंतून गेलं. बाकीचे टाकत तेव्हा जाळं फुलोरा होऊन पडे. याचं खूप प्रयत्न करूनही तसं पडत नव्हतं. लाटा त्याला मागे ढकलत नेत होत्या. दोन-एक तास अशी मेहनत केल्यावर दमछाक झाली. एकही मासा मिळाला नव्हता. जाळे नीट गोळा करून बाबा जसा खांद्यावर टाकून घरी यायचा तसाच तोही निघाला.
‘‘कोणाचो रे तू?’’ एक असेच मासे पागून परत जाणार्‍याने विचारलं.
‘‘ईष्णूचो झील.’’
‘‘हां! हां! तो बुडालो तो? मग माशे पागूक गेललं? किती गावले?’’
‘‘काय नाय गावक. पयल्यांदाच जाळा घेवन इलंय. टाकूचा म्हायत नाय. शिकवश्यात माका?’’
‘‘अरे तुझी उंची खंय आसा. माशे पागूक कमीत कमी तीन-चार फूट पाण्यात जावक होया. तरच गावतीत. अजून ल्हान हस तू.’’
‘‘पण माका जाळा पसरवून टाकूचा तरी शिकवा. मग मी होडयेत्सून टाकीन जाळा जरा आत जावन.’’
***

साईनाथच्या डोळ्यांसमोरून हे प्रसंग झरझर निघत होते. आता रात्र पडायला आली होती. तो उठला आणि रोजच्याप्रमाणे देवाला दिवाबत्ती करायला निघाला. धडपडतच त्याने दिवाबत्ती केली. चाळीतून खाली जाऊन केळी घेऊन आला. आज जेवायची त्याला इच्छाच नव्हती. घरी येऊन केळी खाऊन परत आडवा झाला आणि त्याच विचारचक्रात शिरला.
***

आता आईकडे हर्‍या सावंत राजरोस येत होता. शेजारपाजारचे सबंध आईमुळे तुटत चालले होते. एक दिवशी हर्‍या जेवणाच्या वेळी आला. आईने नारळ घालून माशे केले होते. हर्‍याने मासे भातावर ताव मारला आणि आईने सुरू केलं.
‘‘हे गेले. माशाचे पैशे येणा बंद झाला. बागेतल्या नारळ नि सुपारीवर जगायचा कसा? काय तरी पैशाची तजवीज करूची लागतली.’’ स्वत:शीच बोलत होती तरी ती हर्‍याला सुचवीत होती.
‘‘गो! चार एकर दिलंय तेचा उत्पन काय थोडा नाय. दोघांचा सज भागात. आणि काय देव तुका. माका माझे घरचे भायर काढतीत आणखी जमीन दिलंय तर.’’
‘‘जमीन नुको. महीन्याक दोन पांचशे दिलास तरी चलात.’’ मग हर्‍या चिडला आईला अद्वातद्वा बोलला. आणि रागाने निघून गेला. खाटल्यावर पडून सगळे ऐकताना वाटलं, आईला पैशाची हाव सुटली आहे. आता हर्‍या यायचा नाही. बरं झालं.
पण तसं झालं नाही दुसर्‍या दिवशी हर्‍या आला आणि आईला पाचशे रुपये देऊन गेला. वर सांगून गेला, ‘‘आज पाचशे दिलंय. पुढच्या म्हयन्यापासून तीनशे देयन तेवढयात भागव.’’

पण आता आईचं आणि त्याचं मधून मधून भांडण होतच असे. झिलू कंटाळून गेला आणि घाबरुनही गेला होता.
एक दिवशी तडक उठला आणि त्यानं बसस्टँड गाठला. सगळे मुंबईला जातात आणि चांगले पैसे कमवतात असं त्यानं ऐकलं होतं. खिशात एक दमडीदेखील नव्हती. बस स्टँडवर मुंबईची बस केव्हाची आहे ते माहीत नव्हतं. दुपारी कधीतरी आहे, समजल्यावर तो घाबरला. घरून कोणी शोधत आलं तर परत घेऊन जातील, वाटू लागलं. त्याला परत जायचं नव्हतं. पण येणार कोण? आई रात्रीच येणार. सखू काकी दुपारी जेवणाच्या वेळेला शोधणार, नाही पोचलो जेवायला तर चार-दोन हाका मारून पाहील आणि गप्प बसेल.
दुपार टळली तशी पोटात भूक पेटली. बसस्टँड वरच्या पाण्याच्या टाकीतून पोट टम्म होईपर्यंत त्यानं पाणी पिऊन घेतलं. दुपार चांगलीच टळून गेल्यावर मुंबईची बस लागली. शेवटच्या बाकावर अगदी कोपर्‍यात अंग चोरून तो बसला. गाडी भरून गेली. आणि सुटलीदेखील. झिलूला हायसं वाटलं.
कंडक्टर तिकिटं देत येत होता. शेवटच्या रांगेपर्यंत पोचला. दोघा तिघांना तिकिटं दिली. पण तेवढयात बस थांबली. कोणीतरी चढू लागलं आणि कंडक्टर ओरडू लागला.
‘‘बस फुल आसा बसाक जागा नाय. चढु नुको.’’
तरी दोघेजण चढलेच. सीटच्या मधेच खाली बसून गेले. बस सुरू झाली. कंडक्टर वैतागला होता. झिलू शेजारच्या दोन पॅसेंजरना तिकीट देऊन त्या नवीन चढलेल्या लोकांकडे वळला. कोपर्‍यात अंग चोरून बसलेल्या झिलूकडे त्याची नजर गेलीच नाही. झिलूने सुटकेचा निश्वास सोडला. थोड्याच वेळात भुकेने आणि सकाळपासूनच्या पायपिटीने दमलेला झिलू गाढ झोपी गेला.

दुसर्‍या दिवशी सकाळी बस मुंबईत पोचली. गाडी परळ पर्यंतच होती. कंडक्टर आता मुंबईची भाषा बोलू लागला होता. झिलू उतरला. सगळीकडे गर्दीच गर्दी दिसत होती. मुंग्यांसारखे लोक इकडे तिकडे धावत होते. झिलू बावरून, काय करावं या विचारात गढला होता. एवढ्यात एका वयस्क माणसाने त्याला विचारलं, ‘‘बॅग नेशील कारे पोरा टॅक्सीपर्यंत? धा रुपये देईन.’’ झिलूला आनंद झाला. पटकरून त्यांची बॅग उचलून तो चालू लागला. मिळालेले दहा रुपये घेऊन वडापाव खायला धावला. पोटाची भूक थोडी तरी निवळली. मुंबई खरंच कोणाला भुकं ठेवीत नाही. मग त्याने ठरवलं, स्टँडवरच हमाली करू. सगळीच सोय आहे स्टँडवर!
त्या दिवशी संध्याकाळपर्यंत त्याला साठ रुपये मिळाले होते. स्टँडच्या बाजूलाच असलेल्या हॉटेलात जेवण घेतलं, तर लग्नात वाढतात तसं ताट समोर आलं. पुर्‍या, दोन भाज्या, आमटी कोशिंबीर, कांदा लिंबू सगळंच होतं. भात आणि मासे एवढंच खाणं माहीत असलेल्या झिलूला ही मेजवानीच वाटली. स्टँडवरच्या एका बाकावर मुटकुळी करून तो तिथेच झोपी गेला.

अशी परळच्या स्टँडवरची हमाली करता करता भायखळ्याला पोचला. भाजी बाजारात पहाटेपासूनच हमाली मिळत असे. सारखे ट्रक येत. भाजी उतरवून अडत्यांच्या ठेल्यावर नेऊन ठेवायची. संध्याकाळपर्यंत दोनशे ते अडीचशे रुपये मिळायचे. झिलूचं आता बरं चाललं होतं. हळूहळू त्याने भाजीचा होलसेल व्यापार करायला सुरवात केली. एका चाळीत खोलीही घेतली. अंगावर चांगले कपडे आले. पण या सगळ्यात तो आपलं नाव बदलून साईनाथ झाला. सगळेच त्याला साईनाथ म्हणून ओळखू लागले. कुठून तरी ऐकलेलं मोरे हे आडनावही तो सांगू लागला, आणि गावच्या झिलूचा साईनाथ मोरे झाला. कामाच्या व्यापात गाव, आई बाबा, गत आयुष्य, समुद्र, होड्या, जाळी, वाडी, सखुकाकी, मंग्याकाकी सगळं सगळं पुसट होत चाललं.
***

रात्र बरीच झाली होती. साईनाथच्या डोळ्यासमोरून आपलं पूर्वायुष्य झरझर सरकत होतं. पूर्ण दिवस त्याने अस्वस्थतेत लोळत काढला होता. पण मन थार्‍यावर येतच नव्हतं.
‘‘झिलूऽऽ झिलूऽऽ ये ना रे एकदा.’’ आता ही हाक स्पष्टच ऐकू आल्यासारखी वाटली. साईनाथ डोळे फाडून आजूबाजूला पाहू लागला. आवाज ओळखीचा वाटत नव्हता, पण बोलण्याचा ढंग मात्र ओळखीचा वाटत होता. कोण असेल? बाबा? त्याचं तर प्रेतही मिळालं नव्हतं. मग तो काय जिवंत असेल? इतके दिवस कुठे र्‍हायला होता? परत आला असेल का? पाहण्यासाठी उतावळा झाला असेल का? तोच हाक मारीत सुटलाय का? कित्येक प्रश्नांनी थैमान घालून डोकं भणभणवलं.पण हा आवाज आणि बोलण्याचा ढंग बाबाचा वाटत नव्हता.

गावी जावं का हे मनात आलं आणि हळूहळू जोर पकडू लागला. रात्र अशी तळमळत घालवली. सकाळी उठला आणि घाईघाईने ठेल्यावर गेला. ठेल्यावरची थोडीफार भाजी होती ती बाजूच्या ठेलेवाल्याला देऊन म्हणाला, ‘चार दिवस गावी जातोय. आल्यावर पैसे घेईन,’ असं म्हणाला. ठेला बंद करून घरी आला. बस संध्याकाळी होती. थोडीफार खरेदी करावी वाटली. सखुकाकी आणि मंग्याकाकीसाठी मिठाईचे पुडे घेतले. दोघींनाही साड्या घेतल्या. मग आई आठवली. तिच्यासाठीही एक साडी घेतली. खरंतर, घेऊ नये असं वाटत होतं. पण मग घ्यायचा विचार सारखा सारखा येऊ लागला, म्हणून घेतली.
सर्व सामान एका बॅगेत घातलं. थोडे कपडे, टॉवेल, साबण गोळा करून बॅगेत कोंबले. दुपार होत आली होती. साईनाथ बाहेर पडला. परळ स्टँडवर जाता जाता एका हॉटेलात जेवून घेतलं.

बसमधे बसल्यावर साईनाथचे विचार गावाकडे धावायला लागले. त्यात तो गुंगून गेला. समुद्र डोळ्यासमोर आला. बाबाची होडी डोळ्यासमोर आली. आपली केंबळ्याची झोपडी आली. अठ्ठावीस-तीस वर्षांनी तो गावाकडे परतत होता. मुंबईने त्याला चांगलं आयुष्य दिलं होतं. शिक्षण नसतानाही त्याचा भाजीच्या धंद्यात जम बसला होता. चार पैसे गाठीला बाळगून होता.
त्यानं लग्नच केलं नव्हतं. एकटाच सुखात जगत होता. गावाची आठवणही विसरत चालला होता. पण अचानक त्याला ती हाक ऐकू आली आणि सगळंच बदललं. गावाकडे जायची ओढ लागली.
थंड हवेच्या झुळकांनी त्याला डुलकी येऊ लागली आणि बसच्या खिडकीत डोकं टेकून तो झोपी गेला.
दुसर्‍या दिवशी सकाळी सकाळी बस गावी पोचली होती. गावचा नूर पालटला होता. सगळे रस्ते डांबरी झाले होते. बस स्टँडवर रिक्षा दिसत होत्या. आता पायपीट करायची जरूर नव्हती. रिक्षा करून तो घराकडे निघाला. कोळी वस्तीत रिक्षा पोचली. सखुकाकीच्या झोपडीवरूनच त्याच्या झोपडीकडे जायचा रस्ता होता.
‘‘सखुकाकी गे सखुकाकी!’’ साईनाथने साद घातली.

‘‘सासूमाय हिरग्याआतेकडे गेली हा!’’ असं ओरडत एक मुलगी दारात आली. हिरवी साडी, हिरवा चुडा. नुकतंच लग्न झालेली वाटत होती. सखुकाकीला मुलगा झालेला दिसतोय. लग्नपण झालं त्याचं? असा विचार चमकून गेला. तो आपल्या घराकडे वळला. घराच्या दारात पोचताच त्याला आतलं संभाषण ऐकू येऊ लागले.
‘‘खा गो वायच! ताकत येवक नुको?’’ हा आवाज तर सखुकाकीचा होता. साईनाथ घरात शिरला. आई खाटल्यावर पडली होती. सखुकाकी तिला भरवत होती. हे चित्र बघून साईनाथ जागच्या जागी थबकला. सखुकाकीचे केस पांढरे झालेले केस तिच्या वाढलेल्या वयाचा अंदाज देत होते.
‘‘सखुकाकी?’’ साईनाथने साद घातली.
‘‘गे बाय! कोण?’’ म्हणत सखुकाकी वळली.
‘‘कोण तुमी वळाखलय नाय वो.’’
साईनाथ पुढे झाला. वाकून त्याने सखुकाकीच्या पायांना स्पर्श केला.
‘‘मी साई…..अरर्र. झिलू.. ओळखलंस नाय?’’
‘‘झिलू! अरे खय होतंस रे? आमी शोधून थकलाव. वाटला बापाशीच्या पायार पाय ठेवन गेलस की काय? किती वरसा झाली रे! खंय होतस रे? बघ गो हिरग्या तुझो झिलू ईलो.’’
सखूकाकीला उमाळा आला होता. आनंद ओसंडून वाहत होता. डोळ्यांतून झरकन् दोन धारा निघाल्या आणि तिने पदर डोळ्याला लावला. उठत तिच्या रडक्या थरथरत्या आवाजात म्हणाली, ‘‘झिलू! भरव आता तुझ्या आयशीक. लय ध्यास घेतलान तुझो. झिलू खंय! झिलू खंय! चो जप करा होती. बरा झाला ईलस तो.’’ आणि मागून एक हुंदका फुटला.
साईनाथ पुढे होत आईकडे पाहू लागला. आईला लकवा झाला होता.
‘‘ये बस! हय’’ आईने हुंदका दाबत उजव्या हाताने जागा दाखवली. तिने कॉटवर तिच्या शेजारी बसायची खूण केली. पण साईनाथने एक स्टूल ओढून कॉटजवळ घेतलं आणि त्यावर तो बसला.

‘‘लांब बसलं रे! अजून राग हा माझ्यार?’’ आईचा आवाज बदलला होता. लकव्याने डावी बाजू निकामी केली होती. पण चेहेर्‍यापर्यंत आला नव्हता. सखुकाकीच्या हातून भांडं घेऊन त्याने चमच्याने आईला पेजेचा घास पुढे केला आणि आईला हुंदका फुटला. ती हमसून हमसून रडू लागली. सखुकाकीने उशाजवळ जाऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवायला सुरवात केली.
‘‘गप रव गो बाय! आता इलो हा ना झिलू? झाला ना तुझ्या मनासारखा? किती आठाव काढी होतस चार दिवस. झिलू खंय, झिलू ये रे! ह्याच बोला रे दिवसभर. माका म्हायत होता ही हाक काय झाला तरी पोचतली तुका. जनमल्यार नाळ कापली तरी तुटत नाय रे. ती दिसली नाय तरी जुळललीच रवता. आणि अशी काळजात्सून हाक मारली की खंयय आसलंस तरी आयकूक येताच.’’
सखुकाकी सांगत होती आणि साईनाथला आठवत होता तो भास. मुंबईला त्याला ऐकू आलेली हाक. म्हणजे ती आईची होती तर! आईचा आवाज घोगरा झालेला. पण बोलण्याचा ढंग बदलला नव्हता.
‘‘आता राग ईसर आणि बस तेच्या जवळ. भरव तेका. आमी कायव झाला तरी परकी. जाग्यार पडला त्या वेळपासून दिवसभर मी बगतय आणि रात्री मंग्या येता.’’ सखुकाकी झिलूला हाताला धरून उठवता उठवता बडबडत होती. तिने त्याला आईजवळ खाटल्यावर नेऊन बसवलं. त्याला आईची सवयच नव्हती. पण आगतिक होऊन पडलेल्या तिला पाहून झिलूच्या पोटात गलबलल्यासारखं होत होतं. तिच्या शेजारी जाऊन बसला. आणि तिने डोळे भरून मला पहायला सुरवात केली तसा उठला आणि म्हणाला,
‘‘हात पाय धुवून येतय गे सखुकाकी, मग सांग माका हिचा असा कसा झाला ता?’’

‘‘हा मीय जेवन येतय, तुकाय जेवान हाडतय. फणसाची भाजी, खाशीत ना’’ सखुकाकीच्या या एका वाक्यात प्रेम, जिव्हाळा, माया सगळं समावलं होतं.
कोकणात सगळेच गरीब. निसर्गाची रेलचेल असूनही गरिबी पाचवीलाच पुजलेली. समुद्रात, रानात, बागेत पेरलेले असे काही ना काही दिवसाकाठी मिळवून त्यातच समाधानाने राहणारे, पाव्हणा पै आला की त्या वेळी सण उजवणारे, घरी आलेल्याला आपण अर्धपोटी राहून जेवू घालणारे. साईनाथचे मन सखुकाकीच्या त्या वाक्याने हलून गेले. काय होतं सखुकाकीकडे? अठराविश्वं दारिद्य्र. तरीदेखील गाव सोडायच्या अगोदर तिने साईनाथला कितीतरी दिवस जेवू घातलं होतं. आजही ती सांगत होती, ‘जेवाण घेवन येतय.’
‘‘थांब सखुकाकी! भेट हाडलय तुझ्या साठी घेवन जा.’’ साईनाथ उठला आणि तिच्यासाठी आणलेली साडी व मिठाई बॅगेतून काढून तिच्या हातात ठेवली.
‘‘बघ माका म्हायत नाय तुका सून ईली ती, नायतर तिच्यासाठीय आणलं असतय. आणि मंग्याकाकीक सांग जाता जाता बोलावलंय म्हणून.’’
‘‘रे माझो गुणी झिलू तो! हिरग्या बग गो, झिलून नवी कोरी साडी हाडलान माका. अरे! आयशीक नाय हाडलंस?’’
‘‘हाडलंय तर. पण तिका वायच उठान उभी रवांदे मग नेशीत.’’
तोपर्यंत साडी उघडून खांद्यावर टाकून ती आनंदी सखुकाकी डोळे मिचकावीत घराकडे निघाली. झिलू हातपाय धुवेपर्यंत मंग्याकाकी येऊन हजर झाली. ‘‘खंय होतं रे झिलू एवडी वर्सा? सगळ्यांका इसारलं काय रे?’’
साईनाथने तिलाही साडी दिली, मिठाई दिली. पाया पडायला गेला तर तिने घट्ट मिठी मारली. डोक्यावरून हात फिरवत राहिली. एवढ्या वर्षात मनात साठवलेली माया भरभरून बाहेर पडत होती.
गाव सोडलं त्या वेळी तो बारा-तेरा वर्षांचाच होता. विचार करण्याचं वय नव्हतं. आता तो विचार करू शकत होता. ‘गाव सोडून गेलो आणि या निर्मळ प्रेमाला मुकलो.’ त्याच्या मनात आलं.

‘‘जेवन घे रे’’ दारातून येताना सखुकाकी ओरडतच आत शिरली. ताट जमिनीवर ठेवून तिनं पाट म्हणून एक फळकूट ठेवलं. बसेपर्यंत पाण्याचा लोटा भरून आणला. एका बाजूला मंग्याकाकी आणि दुसर्‍या बाजूला सखुकाकी बसून मग एवढ्या वर्षांचा इतिहास झिलूला सांगायला लागल्या. साईनाथ असा कधी जेवलाच नव्हता. एकटेपणाची सवय पडलेला साईनाथ बावरत जेवत होता. पण त्याचं लक्ष त्यांच्या गोष्टीत शिरत होतं.
झिलू निघून गेल्यावर दुसर्‍या दिवशी त्याच्या आईने सगळीकडे शोधाशोध सुरू केली होती. आणि संध्याकाळी बोंब मारून गाव गोळा केला होता.
‘‘बापाशी पाठसून समुद्रात घुसलो रेऽऽऽ माजो झील. रोज जाळा घेवन जाय समुद्रार’’ अशा अनेक आठवणी काढत ती रडत होती. अशा बर्‍याच आठवणी एकदा मंग्याकाकी तर एकदा सखुकाकी साईनाथला सांगत होत्या. मग विषय आईच्या बागेतल्या घरावर आला, आणि त्याला नव्याच गोष्टी समजू लागल्या.
तो गाव सोडून गेला आणि हळूहळू आई थारावली. सखुकाकी आणि मंग्याकाकीनी तिला रोखून धरलं, ती बागेतल्या घरात जायला निघाली होती. त्यांनी तिला समजावलं, ‘‘झिलू आणि झिलूचा बाबा दोघांचीही प्रेतं मिळाली नाहीत. कशावरून ते जिवंत नसतील. कोणी परत आले आणि झोपडी रिकामी बघून निघून गेले तर काय करशील? हर्‍या सावंताने, त्याच्या त्या बागेने दोघांचा घास घेतला. कशाला जाते तिथे?’’ अशी समजूत काढून तिला राहायला लावलं. ही गोष्ट ऐकताना एकदम सखुकाकी आई काय म्हणाली ते बोलू लागली आणि साईनाथचा घास हातातच राहिला. सखुकाकी सांगत होती.
‘हिरग्या होय म्हणाला. नाय जायत त्या घरात म्हणाला. तेका जमीनवाला व्होयचा होता…’

आईला दारिद्य्रातून वर यायचं होतं. बाबासाठी आणि माझ्यासाठी. गोष्ट पुढे सरकायच्या आधीच आईला जोराचा ठसका लागला तशी सखुकाकी धावली. मंग्याकाकी पाण्याचा पेला घेऊन आली. साईनाथने जेवण तसंच ठेवलं आणि हात धुवून तो आईकडे धावला. हळूहळू डोक्यावरून हात फिरवत तो तिच्याशेजारी बसला. आई म्हणून की फक्त माणूसकी म्हणून हे त्याला समजलं नाही. हळूहळू आई थारावली. सखुकाकी म्हणाली, ‘‘चल गो मंग्या, बसू दे आयस आणि लेकाक बर्‍याच वर्सान भेटतं हत. झिलू हाळी दी रे काय लागला तर.’’ दोघी निघाल्या. साईनाथ आईजवळ बसून होता. आईच्या डोळ्यातून आता धारा सरू झाल्या होत्या. तिला झिलूचा डोक्यावरुन फिरणारा हात सुखावत होता. ती एकदम घोगर्‍या झालेल्या आवाजात बोलू लागली.
‘‘आयकलंस ना? अरे खरोखर मी सगळा घरासाठी करी होतंय. तुझो बापूस दिवसा-रात्री केवाय उठा नी समुद्रात जाय. किती जणांका समुद्रान गिळल्यान. माजो जीव थार्‍यार नसा रे तो गेलो काय. त्या माशात्सून काय मिळा? माका ह्या गरिबीत्सून भायर पडूचा होता. सावंताच्या बागेत सुपार्‍यो निवडूक जाय. तेच्यात्सून जा काय मिळा ता खावकच पुरा पडी. एक दिवस हर्‍याची नजर माझ्यार पडली. तो माज्याकडे बगतच रवललो.’’

त्या नजरेनं तिला बरेच काही सांगितलं. तिनं ठरवलं, हर्‍या सावंताला जाळ्यात ओढायचा. त्याला झुलवायचा. त्याची खूप बागायती जमीन होती. एखादा तुकडा नावावर करून घ्यायचा. आपल्याकडे देण्यासारखे एकच आहे, ते शस्त्र वापरायचं. आणि ही गरिबी कायमची मिटवायची. ह्या असुरी विचारानं तिला झपाटलं. ती त्याच्या बागेत जास्त वेळ राहू लागली. हक्काने पाच-सात नारळ आणि चार-पाच पशे सुपारी बिनदिक्कत घेऊन येऊ लागली. हर्‍या पाही पण नजरे आड करी. इथेच तिचा पहिला विजय झाला. एक दिवस हर्‍याने तिचा हात पकडायचा प्रयत्न केला. तो हिसडून टाकून ती म्हणाली, ‘‘आम्ही गरीब आहोत. तुमच्या तोडीचे थोडेच आहोत! मला एक जमिनीचा तुकडा दे. दहा-पंधरा माड आणि पोफळी असलेला तरच जमेल. नायतर घरी येईन तुझ्या बायलेला सांगायला.’’ तिला माहीत होतं हे पाप आहे. लोकं नावं ठेवणार, पण दारिद्य्र जायला आणि झिलूला आणि त्याच्या बाबाला चांगले जमीनदार होण्याच्या आणि श्रीमंत करण्याच्या भुताने ती पछाडली होती. पुढचं रामायण घडत गेलं. बाबा समुद्रात गेला. माणसांच्या समुद्रात झिलू हरवला. ती एकटी झाली. चार एकरांची बाग तिनं मिळवली होती. पण तिघांचाही बळी दिल्यानंतरच ती मिळाली होती.
झिलू गेल्यानंतर तिने स्वत:साठी म्हणून बाग कशीतरी सांभाळायला सुरुवात केली. ध्यास होता तो झिलूचा. झिलू एक दिवस येईल. बाबाही एक दिवस येईल; म्हणून ती जिवंत होती.

तिला जगण्याची गरज म्हणूनच बाग राहिली होती. तिला केव्हाच समजलं होतं. तिची खरी श्रीमंती हातून निसटून गेली होती. बागेत हळूहळू पैसे जमवत ती घर बांधत होती. हर्‍या घर होईपर्यंत चूप होता. मग त्यानं त्रास द्यायला सुरवात केली. ‘बाग माजी हा. खंड दी नायतर बाग सोड’ म्हणू लागला. नारळ, सुपार्‍या परस्पर काढून नेऊ लागला. भांडणं वाढू लागली. शेवटी हिरा पंचायतीत गेली.
‘‘बाग माजी हा, हेणीच नावार करून दिल्यान नी आता पीक चोरून नेता. खंड दी नायतर बाग सोड म्हणता. ईस, तीस वर्सा बाग माजी हा या गावाक म्हायत हा.’’ पंचाकडे तिनं दरखास्त केली. पंच बसले, हिर्‍याला बोलावलं. त्यानं जे उत्तर दिलं, ते ऐकून सगळे चक्रावले. तो म्हणाला, ‘‘बाग माजीच हा. हेच्याकडे काय पुरावो हा? रुजू करूक सांगा.’’
पंचांना याचे ढंग माहीत होते. बाग कित्येक वर्षं ‘हिरग्याची बाग’ म्हणूनच सगळे ओळखत होते.
‘‘कागद लिवन दिल्यान माका. हा माज्याकडे.’’
‘‘हाडून दाकव काय तो कागद. बगांदे पंचांका काय हा ता.’’
‘‘अरे पण सगळ्या गावाक म्हायत हा तू ती बाग हिरग्याक दिलस ती.’’ पंच.
‘‘होय पण बाग ईकत दिलय, बक्षीस दिलय की पट्ट्यान दिलय. कशी दिलय ता सांगांदे तेका. नायतर कागाद दाकवु दे.’’
हिराला संशय आला. आपल्याला वाचता येत नाही. याने काय लिहिलेय त्यात तिला समजेना. ती उठली आणि घरी धावली. कागद घेऊन परत आली. पंचांच्या हातात कागद ठेवून म्हणाली,
‘‘ह्यो घेवा. काय लिवला ता मोठ्यान वाचा माकाय समजांदे.’’
पंचांनी कागद वाचला. आणि ते हिर्‍या सावंतावर उखडले.
‘‘हिर्‍या लाज नाय वाटत एखाद्याक फसवूक? तेका नादाक लावलंस. तेचा घर नासवलंस. शिकलंला नाय बगून ह्यो असो कागद बनवलंस? खंय फेडशीत ह्या पाप?’’
‘‘काय लिवला काय हा त्यांत?’’ हिरग्यानं विचारलं.
पंचानी तिला फोड करून सांगितलं. जोपर्यंत हिरग्या सावंताबरोबर राहील, तोपर्यंत ती या बागेचा उपभोग करेल. ती जर त्याला सोडून गेली तर बाग परत घेण्याचा अधिकार सावंताकडेच असेल. या बागेवर हिरग्याच्या नवर्‍याचा किंवा मुलाचा कोणताही अधिकार नाही.
हर्‍याचा संग तिने केव्हाच सोडला होता. आता हे ऐकल्यावर तिच्या पायाखालची जमीन सरकली. ती हिर्‍या सावंतावर वाघिणीसारखी धावून गेली. पण मधेच अडखळली, धडपडली. उठली. तरी चालत घरी आली. खाटल्यावर पडली तर डावी बाजू हुळहुळी झाली. आकसल्यासारखी वाटू लागली. डोकं दुखत होतं. उठायला गेली तर कोसळलीच. डावा पाय लुळा पडला होता. हात थोडाफार हलवता येत होता. तिनं जोरात किंचाळी मारली.
सखुकाकी धावत आली. न हलणार्‍या हिरग्याला बघून तिनं मंग्याकाकीला आणि इतर बायकाना बोंब मारून बोलावलं.
‘‘झिलू रेऽऽ खंय आसस?’’
‘‘झिलू रेऽऽ एकदा तरी ये ना?’’
***

आईच्या डोक्यावरून फिरणारा हात आता फक्त माणूसकी म्हणून नव्हे तर भरलेल्या मायेनं फिरत होता. तो त्याच्या आईला समजून घेत होता. तिला समाधान मिळत होतं. ती डोळे मिटून शांत पडली होती. मधेच जागी होऊन म्हणाली,
‘‘माका पोचवल्याशिवाय परत जाव नुको हा. कसली रे माजी शिरमंती. सगळाच घालवून बसलंय.’’ साईनाथचा हात पटकरून तिच्या तोंडावर गेला.
‘‘असा बोलू नये! मी खंय नाय जात.’’ त्या वाक्याने आणि त्या स्पर्शाने. त्याच्या आईच्या मुखावर शांत भाव पसरला आणि दुसर्‍या क्षणी ती झोपी गेली. आपण आधीच इथे यायला हवं होतं, साईनाथला वाटून गेलं.
रात्री मंग्याकाकी आली आणि म्हणाली, ‘‘झिलू झोपतय रे मी हंयच. तुका नाय जमुचा आयशेचे कपडे बदलूक. आज बरा दिसता हा हिरग्या. पेज बरी जेवला. तू ईलस ना म्हणून थारावला रे!’’

तिनं आपली पथारी आईच्या कॉटशेजारी लावली. साईनाथ झोपडीच्या दारात डाळी टाकून आडवा झाला. सगळ्याच आयुष्याचं, संबंधांचं त्याला कोडं पडलं होतं. विचार करता करता त्याला वाटलं, गावाला आईने काढलेली आठवण मुंबईपर्यंत आपल्याला कशी काय ऐकू आली? आणि पोटात गलबलल्या सारखं का वाटलं? बाबा रागाने समुद्रावर गेला त्या रात्रीसुद्धा असंच गलबललं होतं. हा कुठला संकेत मिळतो? सखुकाकी म्हणते तशी, नाळ कापली तरी जन्मभर तुटत नसते का? अदृश्यपणे जोडलेलीच राहते का? दोनदा आलेला हा अनुभव बघता सखुकाकीचा हा समज का मानायचा नाही? पांच इंद्रियांच्या बाहेर सहावी ही नाळ संकेत देत राहते, हेच खरं. आता आईला बरोबर घेऊन मुंबईला जायचं आणि चांगला उपचार करवून घ्यायचा. साईनाथाचा निश्चय झाला. दुसर्‍या दिवशी त्यानं तो सगळ्यांना सांगितला. सखुकाकी व मंग्याकाकी दोघींनाही आनंद झाला.
हिरग्याला तिची खरी श्रीमंती परत मिळाली होती. मुलाबरोबर जोडलेल्या नाळेमुळे!

– अरुण कुळकर्णी

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.