Now Reading
‘नियमित व्यायाम‘ हीच ‘फिटनेस’ची गुरुकिल्ली!

‘नियमित व्यायाम‘ हीच ‘फिटनेस’ची गुरुकिल्ली!

Menaka Prakashan

‘पढोगे लिखोगे तो बनोगे ‘नवाब’, खेलोगे, कुदोंगे तो बनोगे ‘खराब’…’ असं आजही अनेकांना वाटतं. मात्र पालकांचा दृष्टिकोन हळूहळू बदलतोय, ही नक्कीच सुखावणारी गोष्ट आहे. पण जबरदस्त इच्छाशक्ती असेल तर आकांक्षांना गरुड भरारीचं बळ मिळतंच, याची अनेक उदाहरणं आपण आपल्या आजूबाजूला बघतो. असंच एक उत्साही, उमदं आणि जिद्दी व्यक्तिमत्त्व म्हणजे मुंबईतल्या फंक्शनल फिटनेस ट्रेनर प्रचिता शेट्ये-कनावजे.

‘‘गेल्या वर्षभरात आपण नव्यानं जगायला शिकलोय. कोरोना काळानं आपल्याला आपल्या आरोग्याविषयी अधिक जागरूक केलं/. फिटनेस हा आपला अग्रगण्य प्राधान्यक्रम झालाय. आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपण आरोग्यदायी आहाराबरोबरच व्यायामाकडेही लक्ष द्यायला लागलोय. फिटनेस मिळवण्यासाठी आपण जिम, योगा सेंटर, व्यायामशाळा अशा अनेक पर्यायांचा विचार करतो. खरंतर हे क्षेत्र आता खूप विस्तारत आहे. फिटनेससाठी वेगवेगळी तंत्र, फॉर्म्युले वापरले जात आहेत. त्यामुळेच फिटनेस ट्रेनरचं महत्त्व वाढू लागलंय. म्हणूनच हा करिअरचा एक विस्तृत पर्याय ठरत आहे. या करिअरचा आवाका खूप मोठा आहे, पण आजही या क्षेत्राविषयी अनेकांना पाहिजे तेवझी माहिती नाही,’’ असं सांगत आहेत, मुंबईतल्या फंक़्शनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये मास्टर फंक्शनल फिटनेस ट्रेनर असणार्‍या प्रचिता शेट्ये-कनावजे…

आपण जे काम करतो, त्याचं मूळ आपल्या लहानपणात असतं, असं म्हणतात. प्रचिता यांच्या बाबतीतही हे खरं ठरलं. एक फिटनेस ट्रेनर होण्यापर्यंतचा प्रवास उलगडताना त्या सांगतात, ‘‘माझं लहानपण मुंबईतल्या परळ भागात गेलं. लहानपणापासूनच मला खेळाची प्रचंड आवड. मी हायपर अ‍ॅक्टिव्ह होते असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळे माझ्यात असलेली प्रचंड ऊर्जा मी खेळातून खर्च करायचे. पण एक मुलगी म्हणून मला घरातून अनेक बंधनं घातली जायची. शिवाय आधी अभ्यास, मग बाकीचं, अशीच माझ्याही पालकांची धारणा असल्यानं घरातून खेळण्याला विरोधच होता. तरीही मी मला जे जमायचं त्यातून माझी आवड पूर्ण करायचे. अगदी चमचा-लिंबूपासून सगळ्या खेळांमध्ये, स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे. फिटनेसचा एक भाग म्हणून मी शाळेत ‘एनसीसी’चा एक भाग झाले. कॉलेजमध्येही ‘एनसीसी’ सुरू ठेवलं. तरी माझ्यावर काही बंधनं होतीच. आमच्या घरी व्यवसायाची पार्श्‍वभूमी. त्यामुळे मी सुद्धा काहीतरी व्यवसाय करावा, लग्न करावं, सेटल व्हावं असंच घरच्यांना वाटत होतं. पण मला वेगळं काहीतरी शिकायचं होतं. माझं गणित चांगलं असल्यानं मी अ‍ॅक्युएरिअल सायन्सला प्रवेश घेतला.’’

खरंतर आजही अनेकांना ‘अ‍ॅक्युएरिअल सायन्स’ पर्यायाविषयी माहीत नाही. याविषयी अधिक विस्तारानं काय सांगाल, असं विचारताच प्रचिता म्हणाल्या, ‘‘मी मुंबईतल्या डी. जी. रूपारेल कॉलेजमधून कॉमर्सची पदवी घेतली. एमबीए, सीए हे नेहमीचे पर्याय निवडावेत, असं माझ्या आई-वडिलांनाही वाटत होतं. पण मला काहीतरी वेगळं करायचं असल्यानं मी ‘अ‍ॅक्युएरिअल सायन्स’ हा पर्याय निवडला. यामध्ये गणित आणि सांख्यिकीचा वापर करून इश्युरन्स आणि फायनान्स इंडस्ट्रीमधल्या जोखिमेचं आकलन केलं जातं. अर्थातच हा मार्ग सोपा नव्हता. पण चिकाटीच्या जोरावर मी ही परीक्षाही पास केली. आता मला चांगली नोकरी मिळाली, पगारही उत्तम मिळत होता. लग्नही झालं. थोडक्यात मी ‘सेटल’ झाले, पण तरीही काम करताना जी मजा यायला हवी, ती काही येत नव्हती. कारण खेळ, फिटनेस ही माझी मूळ आवड, शिक्षणात, पैसे कमवण्याच्या नादात कुठेतरी मागे पडली होती.’’

‘‘लग्नानंतर दोन वर्षांनी मला मुलगा झाला. घर आणि नोकरी करताना माझी खूप तारांबळ उडायची. शेवटी मी नोकरी सोडली. अर्थातच माझे सासू-सासरे, पती प्रथमेश आणि दीर यांची मला खंबीर साथ होती. तरी माझ्या बाळाला माझा पूर्ण वेळ देता यावा आणि त्याचं बालपण अनुभवता यावं म्हणून मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. या काळात मी माझ्या सासू-सासर्‍यांच्या खूप जवळ आले. मला माझ्या सासूबाईंना सासू म्हणताना खूप जिवावर येतं, त्या माझी आईच आहेत. कारण आजही आपल्याकडे सिझेरियनच्या बाबतीत खूप वेगळ्या धारणा आहे. सिझेरियन झालेली बाई नीट चालू शकत नाही, तिची पाठ-कंबर खूप दुखते, तिचा मणका पूर्ववत होत नाही वगैरे वगैरे. पण याबाबतीत माझ्या सासूबाई माझ्या मागे भक्कम उभ्या राहिल्या. या सगळ्या मनाच्या समजुती आहेत, तू आधीसारखं सगळं करशील हा धीर त्यांनी मला दिला.’’

नोकरी सोडली होती, पूर्ण वेळ आई म्हणून तुम्ही काम करत होता पण फिटनेस ट्रेनरपर्यंतचा तुमचा प्रवास कसा झाला, असं विचारताच प्रचिता खूप उत्साहानं सांगू लागल्या कारण अर्थातच हा त्यांच्या जिव्हाळ्याचा आणि आवडीचा विषय होता. त्या म्हणाल्या, ‘‘माझा मुलगा विआन झाल्यानंतर साधारण अडीच-तीन वर्षं मी एवढी बिझी होते की, मला आरशात बघायलाही वेळ मिळायचा नाही. खोटं वाटेल पण खरंच अशीच स्थिती होती. शिवाय या काळात मी हळीवाचे लाडू, डिंकाचे लाडू असं भरपूर पौष्टिकही खात होतेच. त्यामुळे माझं वजन पंचावन्न वरून चक्क ऐंशी किलो झालं होतं. आता तर मला आरशात बघायलाच भीती वाटू लागली. डबल एक्सेल साइजही बसेना. माझ्या मनात अपराधी भावना निर्माण झाली. वजन कमी करण्यासाठी मी चालायला सुरवात केली. पण माझाच भार मलाच झेपत नाही, हे लक्षात आलं. त्याच काळात आम्ही दिरासाठी मुलगी बघत होतो. मुलींचे फोटो बघताना एका जाड मुलीचा फोटो बघून आम्ही खूप हसलो, तेव्हा माझे सासरे म्हणाले, दुसर्‍याला हसण्यापूर्वी स्वत:कडे बघावं. ते मला पटलं. तो माझ्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला आणि आपण वजन कमी करायचं, हा चंग मनाशी बांधला आणि गेली पाच वर्षं मी सातत्यानं माझ्या शरीरासाठी योग्य पद्धतीनं व्यायामाद्वारे फिटनेससाठी प्रयत्न करतीये.’’

वजन कमी करणं हे तुमचं एकमेव ध्येय होतं का, असं विचारताच प्रचिता म्हणाल्या, ‘‘हो, तेव्हा तरी माझं एकमेव ध्येय वजन कमी करणं हेच होतं. माझ्या घरापासून शिवाजी पार्क फक्त सात मिनिटांच्या अंतरावर आहे. मग मी तिथे जायला लागले. तिथे खूप वेगवेगळ्या अ‍ॅक्टिव्हिटीज चालू असतात. मग मी पण रोज काहीतरी वर्कआऊट करायचं ठरवलं. जिमला जायला लागले. पण जिम सोडल्यानंतर पुन्हा वजन वाढलं. त्यामुळे नेमकं काय करायचं हे समजत नव्हतं. त्याविषयी माहिती गोळा करत असताना मला ‘रिबॉक मास्टर ट्रेनर’विषयी माहिती मिळाली. तिथे मला विनाता शेट्टी या एक उत्तम गुरू भेटल्या. या अंतर्गत मी फंक्शनल ट्रेनिंग घ्यायला सुरवात केली. भरपूर क्लास केले, हे मला खूप आवडायला लागलं. म्हणून मी ग्रुप इंस्ट्रक्टर अलायन्सचा कोर्स केला. फंक्शनल ट्रेनिंग हा व्यायामाचा खूप छान पर्याय आहे, यामध्ये शरीर शास्त्राविषयी माहिती दिली जातेच. प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं, त्यामुळे प्रत्येकाला एकसारखा व्यायाम फायदेशीर ठरत नाही, याविषयी शिकवलं जातं. ़फंक्शनल ट्रेनिंग हे व्यायामाचं एक शास्त्र आहे, तो एक अभ्यास आहे. व्यायामाच्या माध्यमातून मानसिकरीत्याही स्ट्राँग कसं व्हायचं हे सुद्धा यामध्ये सांगितलं जातं. हे तर केलंच त्याचबरोबर ‘अ‍ॅनिमल मूव्हमेंट’, ‘झुम्बा’, ‘पिलाटेज’ हे सगळं व्यवस्थित शिकले. मला असं मनापासून वाटतं की, हल्ली इंटरनेटवर, यू ट्यूबवर अनेक व्हिडिओज, अ‍ॅप्स असतात, पण त्यावर आंधळेपणाने विश्‍वास ठेवू नका. योग्य ट्रेनरकडूनच मार्गदर्शन घ्या, तेव्हाच फायदा होईल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रयत्नांमुळे माझं वजन चक्क बावीस किलोंनी कमी झालं. त्यानंतर मी ऑस्ट्रेलिया बेस्ड ‘फंक्शनल ट्रेनिंग इन्स्टिटट्यूट’चा फिटनेस ट्रेनिंगचा एक वर्षाचा कोर्स केला. ‘एफटीआय’ंमधूनच मोबिलिटी, सस्पेंशन ट्रेनिंग, बॅटलरोप याचंही प्रशिक्षण घेतलं. यादरम्यान मला फिलिप पेरेइरा आणि विपिन कुमार या दोन कोचचं उत्तम मार्गदर्शन मिळालं. मी फिटनेस कोच झाले. या कोर्समुळे मी अधिक कुशल होत गेले. ़शिवाजी पार्क इथं गेली अनेक वर्षे ट्रेनर चारू अडारकर या फिटनेससंबंधी ग्रुप क्लासेस घेतात. माझं काम आणि आवड बघून त्यांनी मला तू माझा क्लास पुढे घेशील का, अशी विचारणा केली. हे नक्कीच माझ्यासाठी मोठं आव्हान होतं. तसंच त्यांच्या विश्‍वासास मी पात्र ठरले याचा आनंदही मोठा होता. यामुळे या क्षेत्रात आपण निश्‍चितच काहीतरी काम करू शकू, ही पावती यानिमित्तानं मला मिळाली होती.’’ प्रचिता आनंदाने सांगत होत्या.

‘‘कोर्समुळे मी ट्रेनर झाले, पण त्याचा इतरांना फायदा कसा होणार हा प्रश्‍न होताच. पण इथेही माझ्या सासूबाई माझ्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्या. मी पर्सनल ट्रेनर म्हणून काम करणार होते, त्यामुळे मला वेगवेगळ्या लोकांच्या घरी जाऊन शिकवावं लागणार होतं. माझ्या सासूबाईंनी घरची सगळी जबाबदारी घेतली. म्हणूनच मी निश्‍चिंत मनानं मलबार हिल, वाळकेश्‍वर, केन्स कॉर्नर अशा वेगवेगळ्या ठिकाणी अगदी पहाटे पाचच्या ट्रेनने जाऊन पर्सनल ट्रेनिंग देऊ लागले. मला लोकंही छान मिळाली. यामध्ये मला वेगवेगळे स्वभाव कळले. स्वभावाचा आणि व्यायामाचाही जवळचा संबंध आहे, हे लक्षात घेऊनच फंक्शनल ट्रेनिंग दिलं जातं. व्यायाम करताना वागणूकही महत्त्वाची भूमिका बजावते, हा धडा मला फंक्शनल ट्रेनिंग दरम्यान मिळाला. माझ्या या कामामुळे मी अनेक लोकांपर्यंत पोचू शकले. प्रत्येकाच्याच आयुष्यात चढ-उतार येतात, आरोग्यविषयक समस्या येतात पण आपण सरावाच्या साहाय्यानं त्यावर मात करू शकतो, हे मला माझ्या प्रोफेशननं शिकवलं. या क्षेत्रात मला माझ्या नोकरीपेक्षा कमी उत्पन्न मिळतं, पण मला माझ्या आवडीचं काम करायला मिळतंय, याचा आनंद मोठा आहे.’’

See Also

‘‘आपल्या आयुष्याचं ध्येय हे आपल्या दैनंदिन हालचाली सुरळीत व्हायला हव्यात हे असायला हवं. हे ध्येय जर आपण ठेवलं तर व्यायामाचा, वर्कआऊटचा कधीच कंटाळा येणार नाही. काम आपल्या सगळ्यांनाच आहे, त्याशिवाय कोणालाच पर्याय नाही. पण एका तासात दोन-तीन मिनिटं आपण स्वत:ला नक्कीच देऊ शकतो. या दोन-तीन मिनिटांत शरीराची हालचाल करा. प्राण्यांकडे बघा, ते सतत हालचाल करत असतात. आपणही शक्य तेवढी हालचाल करायला हवी. आपल्याला एक शरीर, एक आयुष्य मिळालंय ते आपण अधिक चांगल्या पद्धतीनं जगायला हवं. मागच्या वर्षानी आपल्याला हेच शिकवलं. त्यासाठी थोडा वेळ काढा, व्यायाम करा. वजन कमी करणं हा व्यायामाचा उद्देश नाही. ताकद, लवचिकता आणि स्टॅमिना वाढविणं तसंच कोणताही अवयव न दुखता हालचाली करता येणं, हा व्यायामाचा उद्देश आहे. वजन उचलणं म्हणजेच व्यायाम असं नाही, तुम्ही तुमच्या मुलाला उचलून चालू शकणं हा सुद्धा वेट ट्रेनिंगचा एक भाग आहे. शरीराचे सगळे अवयव व्यवस्थित असणं किंवा होणं हे सुद्धा व्यायामानं साध्य होतं. म्हणजे तुमचा मणका वाकलेला होता, पण योग्य व्यायामामुळे तो थोडा सरळ झालाय, हे समाधानही व्यायामामुळेच मिळतं. अर्थातच व्यायाम योग्य पद्धतीनं केला तरच व्यायाम फायदेशीर ठरतो. म्हणूनच सध्याच्या काळात फिटनेस ट्रेनरचं महत्त्व वाढलंय.’’

क्लाएंटच्या अनुभवांविषयी सांगताना प्रचिता म्हणाल्या, ‘‘मला खूप छान माणसं भेटत गेली. त्यांच्यात आणि माझ्यात एक कोच किंवा ट्रेनर असं नातं आता राहिलेलंच नाही. मी त्यांच्या कुटुंबाचा एक भाग झालेली आहे. ट्रेनिंग देणं हा माझ्या व्यवसायाचा भाग आहे, त्याबदल्यात मला पैसेही मिळतात पण हा एका बाजूचा व्यवहार नाही. हे लोकही मला तेवढंच प्रेम देतात, त्यांना मिळणार्‍या समाधानातून मलाही खूप आनंद मिळतो. आणखी एक उल्लेख करावी अशी गोष्ट म्हणजे आलेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्याचं कसब माणसाकडे आहे आणि ते उल्लेखनीय आहे. गेल्या वर्षात हे मला प्रकर्षानं जाणवलं. कोव्हिडमुळे मला ट्रेनिंग द्यायला जाणं शक्य नव्हतं मग मी ऑनलाइन ट्रेनिंग सुरू केलं. ज्या व्यक्ती टेक्नॉलॉजी फ्रेंडली नव्हत्या, त्या व्यक्तींनी हे सगळं शिकून घेतलं. यामुळे ट्रेनिंगमध्ये खंड पडला नाही. मलाही असा फायदा झाला की, माझा प्रवासातला वेळ वाचला. शिवाय माझं काम हे केवळ मुंबईपुरतं मर्यादित न राहता मी परदेशातल्या क्लाएंटनाही ट्रेनिंग देऊ शकले. माध्यमाची शक्ती या निमित्तानं अनुभवता आली.’’

एक फिटनेस ट्रेनर म्हणून तुम्हाला काय सल्ला द्यावासा वाटतो, यावर प्रचिता म्हणतात, ‘‘प्रत्येकालाच फिटनेस ट्रेनर ठेवणं शक्य होईल असं नाही. पण आपल्या शरीरासाठी काही ना काही व्यायाम करायला हवा. सध्या पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय अशा वेळेस तुम्ही एकटे चालायला, पळायला जाऊ शकता. सातत्य आणि कष्ट यावर माझा विश्‍वास आहे. राहुल द्रविड माझा आदर्श आहे. तुम्हीही एक मोठं ध्येय ठेवा, त्याची छोट्या छोट्या तुकड्यात विभागणी करा, छोटं छोटं ध्येय साध्य करा. तुमचा आत्मविश्‍वा़स वाढेल, तुम्ही जगण्याचा आनंद घेऊ शकाल. आपली स्पर्धा ही आपल्याशीच असायला हवी आणि माझ्या कालच्या दिवसापेक्षा आजचा दिवस अधिक चांगला कसा असेल, यासाठी आपला प्रयत्न असायला हवा, असं केलं तर फिट आणि आनंदी राहणं मुळीच अवघड नाही. कारण मन आनंदी असेल तरच शरीर फिट राहू शकेल!’

मुलाखत : श्रद्धा पतके

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.