Now Reading
नंदिनी

नंदिनी

Menaka Prakashan

मार्च महिना उजाडला, गुढीपाडवा पार पडला अन् एकदम लॉकडाऊन घोषित झालं. अगदी शंभर टक्के संचारबंदी. ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू झालं. पूर्वी कधीही नाव न ऐकलेल्या कोरोना या विषाणूनं सगळंच उलटंपालटं करून ठेवलं होतं.
मनीषा खरं तर वैतागलीच होती, पण करणार काय? ‘आलीया भोगासी’ म्हणत तिनं हे नवं रुटीन स्वीकारलं. घरच्या आघाडीवर तसं फार काम नसायचं. पण आता सोसायटीत कामवाली बाई, स्वयंपाकाच्या मावशी येणंसुद्धा बंद झालं. म्हणजे घरातली कामं जवळजवळ दुपटीनं वाढली. ती सगळी करायची. मंगेश- तिचा नवरा त्याचंही घरूनच काम सुरू झालं होतं आणि दहा वर्षांचा तिचा मुलगा- परितोष तोही दिवसभर घरातच असणार होता. शाळा बंद म्हणून त्याच्या खोड्यांना जणू उधाण आलं होतं. सगळ्यांचा ताळमेळ बसवत ऑफिसचं काम करताना तिची अक्षरशः तारेवरची कसरत चालली होती!
तक्रार तरी कुणाकडे करायची? जीव प्रिय आहे, स्वतःचाही अन् कुटुंबीयांचाही. मग स्वच्छतेचे सगळे नियम पाळा आणि मूग गिळून गप्प बसा, असंच चाललं होतं.

जेमतेम आठवडा उलटला असेल, ती ऑफिसचं काम करत बेडरूममध्ये बसली होती. अचानक बेल वाजली. या वेळी कोण आलं असेल, तिनं आश्‍चर्यानं अन् नाराजीनंच दार उघडलं. दारात मंगेशच्या गावचे ओळखीतले काका आणि त्यांच्या मागे एक तरुणी. दोघांच्याही तोंडाला मास्क लावलेले. काका जरी गावात राहणारे असले, तरी सध्या ते इथेच लोकनगरीत राहायला होते, पण ही तरुणी कोण बरं? बरीचशी गोंधळलेली वाटत होती. मास्कच्या वरच्या डोळ्यांत घाबरल्याचे भाव होते.
‘‘मंगेश आहे का?’’ काकांनी विचारलं.
‘‘हो हो, आहे नं.’’
मंगेश लगेच बाहेर आला.
‘‘ही बघ बाबा, ही मुलगी तुझा पत्ता शोधत होती. वाटेत मला भेटली. मी आपलं तिला तुझ्याकडे आणून सोडलं हो! मी निघतो. भाजी आणायला बाहेर पडलो होतो. उशीर झाला तर ही रागवायची.’’
‘‘अरे, बसा थोडा वेळ काका. चहा तरी घेऊन जा.’’ मंगेश तोंड पुसत म्हणाला.
‘‘ही मुलगी या शहरात नवीन आहे. चुकू नये म्हणून तुझ्याकडे आणून सोडली झालं.’’ असं म्हणत काका तडक माघारी फिरले.
काका जाताच मनीषानं त्या मुलीकडे पाहिलं. मनीषाच्या नजरेत परकेपणाच होता.
‘‘नाव काय तुझं? आपण याआधी कधी भेटल्याचं मला आठवत नाही.’’ मनीषा जरा नाखुशीनंच म्हणाली.
‘‘मी नंदिनी. नानाकाकांची मुलगी. दादा ओळखतात मला.’’ तिनं मास्क काढला.
मंगेशनं तिच्याकडे पाहिलं.
‘‘अरे नंदिनी, तू होय? गावी कसे आहेत सगळे अन् इथे कसं काय येणं केलं तू अचानक?’’
‘‘दादा, मी अन् अनू- माझी मैत्रीण इथे नोकरीच्या इंटरव्ह्यूला आलो होतो. एक दिवस लेखी आणि दुसर्‍या दिवशी तोंडी इंटरव्ह्यू होता आमचा एका कंपनीत. इंटरव्ह्यू तर झाला, पण लॉकडाऊन जाहीर झालं आणि आम्ही इथे अडकलो. माझी मैत्रीण तिच्या मावशीकडे गेली, पण मी कुठे जाणार? गावी जायचे रस्ते बंद.. पैसे संपलेले अन् इथे तुझ्याशिवाय कुणी ओळखीचंही नाही. मग आले पत्ता शोध तुझ्याकडे. वाटेत ते काका भेटले. त्यांनीच इथे आणून पोचवलं. दादा, मला थोडे दिवस तुमच्याकडे राहू द्याल का? लॉकडाऊन संपलं की मी लगेच निघून जाईन वहिनी.’’ हे विचारताना नंदिनीच्या डोळ्यांत पाणी आलं होतं.

मंगेशला वाईट वाटलं आणि मनीषाकडे न पाहता तो थेट नंदिनीला म्हणाला, ‘‘अगं, त्यात काय विचारायचंय? राहा की. अशा संकटाच्या वेळी आपल्याला आपले जवळचेच मदत करणार नं!’’
मनीषाला असा राग आला! नंदिनीला ‘राहा’ असं सांगताना मंगेशनं खुशाल मला गृहीत धरलं? इथे ‘घरचं झालं थोडं अन् व्याह्यांनी धाडलं घोडं’ अशी स्थिती झाली आहे. ती तणतणतच बेडरूममध्ये निघून गेली. आता आपली खैर नाही हे मंगेशनं ओळखलं. मंगेशनं स्वतः नंदिनीला पाणी, चहा, सकाळच्या नाश्त्यातले उरलेले पोहे खायला दिले. बाथरूम दाखवलं. गिझर लावून दिला. नंदिनी अंघोळीला गेल्यावर तो बेडरूममध्ये गेला आणि बेडरूमचं दार आठवणीनं आतून बंद केलं. आता मनीषाच्या रागाचा मोठा स्फोट होणार अन् तसंच झालं.
‘‘तू मला न विचारता तिला होकार का दिलास? अन् झोपणार कुठे ती? तुझ्या-माझ्या की पारितोषच्या बेडवर? चार खणी माडीच आहे जणू मालकीची.’’
‘‘अगं, ती खाली झोपेल हॉलमध्ये नाहीतर किचनमध्ये, पण आता सांभाळून घे.’’ त्यानं मनीषासमोर हात जोडले.
‘‘हात नको जोडूस, पण मला हे बिलकूल आवडलेलं नाही. कळलं तुला?’’
‘‘अगं, ती कशी रडवेली झाली होती, पाहिलंस ना तू?’’
‘‘हो, पण तू काय ठेका घेऊन ठेवला आहेस का तिचा?’’
‘‘बाई गं, या वेळी सांभाळून घे. तसंही मी तुला विचारल्याशिवाय काही करतो का?’’
मनीषानं नकार दिला नाही, पण रागाचा एक कटाक्ष मात्र मंगेशवर टाकला.
जेवणाच्या वेळी मनीषानं नंदिनीलाही बोलावलं आणि त्याचा जीव भांड्यात पडला. अगदीच माणुसकी सोडलेली नाही तर!
दिवसभर नंदिनी संकोचल्यासारखी, अवघडलेली वागत होती.
संध्याकाळी नंदिनीनं मंगेशला घरी आंजर्ल्याला कळवायला सांगितलं. नानाकाकांना त्यानं फोन केला.

‘‘इंटरव्ह्यू झाल्याचं तिनं कळवलं होतं. पण कालपासून तिचा फोन नाही. आम्ही काळजीत पडलो होतो. तिला कसं शोधावं की पोलिसांची मदत घ्यावी, कळत नव्हतं. पण ती तुमच्याकडे आहे म्हटल्यावर जीव भांड्यात पडला हो. तशी शहाणी आहे ती. तुम्हाला काही त्रास देणार नाही.’’ मुलगी सुखरूप असल्याचं कळल्यानं नानाकाका आनंदून गेले होेते.
रात्री झोपताना मंगेशनं तिला हॉलमध्ये पारितोषच्या बेडच्या बाजूला खाली अंथरूण घालून दिलं. बेडरूममध्ये तो झोपायला आला, तर मनीषा पाठ करून केव्हाच झोपली होती. आता काही दिवस हिचा अबोला असणार.. माझ्याशीही कामापुरतंच बोलणार.. त्यानं गृहीत धरलं.
सकाळी उठून मनीषा बेडरूमबाहेर आली आणि चकितच झाली. किचन, हॉल, लॉबी, बाल्कनी झाडून पुसून लख्ख. दाराबाहेर छोटी रांगोळी, उंबरठ्यावर लक्ष्मीची पावलंसुद्धा काढली होती नंदिनीनं आणि किचनमध्ये एका कोपर्‍यातल्या खुर्चीत बसून ती मनीषा उठायची वाट बघत बसली होती.
मनीषा किचनमध्ये आली. तिला पुन्हा धक्का बसला. सिंकमधला खरकट्या भांड्यांचा ढीग नंदिनीनं स्वच्छ घासून ठेवला होता. ती म्हणाली, ‘‘अगं, चहा घेतलास की नाही? फ्रीजमध्ये दूध होतं की. करायचा की स्वतःसाठी छान.’’
‘‘नाही वहिनी, मी म्हटलं तुम्ही उठल्यावर करू. वहिनी, मी करू चहा? तुमचं आवरायचं असेल ना अजून.’’
‘‘अगं, आधीच केवढं तरी आवरून ठेवलंयस तू..’’
‘‘तुम्ही आवरा तोवर मी चहा करते.’’
मनीषानं तिला दूध, चहा, साखर, आलं सगळं काढून दिलं. तिचं आवरेपर्यंत चहा झाला होताच. गरमागरम वाफाळलेला आयता चहा… मनीषा खूष झाली. तिला आईची आठवण आली, आई असाच आयता चहा हातात ठेवायची.
नंदिनीनंच जरा वेळानं पुन्हा मंगेशसाठी चहा बनवला. पारितोष उठला असं वाटून त्याचं प्रोटीन ड्रिंकही बनवलं.
मनीषानं आदल्या दिवशी इडलीचं पीठ तयार करून फ्रीझमध्ये ठेवलं होतं. मनीषानं इडली-चटणी बनवली अन् नंदिनीला आग्रह करून दोन जास्तच खायला लावल्या. हे बघून मंगेशच्या मनावरचं मोठंच ओझं हलकं झालं.

आठवड्याभरात मनीषा आणि नंदिनीचं छान जमून गेलं. दोघींनी मिळून घरातली सगळी कामं वाटून घेतली होती. बाहेरची कामं मंगेश करायचा. पारितोषचंही नंदूआत्याशी जमून गेलं होतं. त्याला ल्यूडो, सापशिडी, कॅरम खेळायला सोबत आत्या मिळाली होती. तो जरा वेळ खाली खेळायला गेली तरी नंदिनी त्याच्यासोबत जात असे. त्याच्यावर नीट लक्ष ठेवत असे. त्यामुळे मनीषाचं ऑफिसचं कामही निश्‍चिंतपणे होत असे.
मनीषा आता सकाळी लवकर उठून अपार्टमेंटच्या खालच्या वॉकिंग ट्रॅकवर फेर्‍या मारायला जात असे. संचारबंदीमुळे सोसायटीच्या गेटबाहेर जाणं शक्य नव्हतं. बाहेरून आल्या आल्या आयता चहा नंदिनीच्या हातचा मिळायचा. ती एकदम प्रसन्न होऊन जायची. तिनं स्वतःजवळचे दोन ड्रेस, नवीन साडी, बेंटेक्सच्या बांगड्या, कानातलं असं काय काय नंदिनीला दिलं होतं. ‘बिलकूल संकोच करू नकोस. लॉकडाऊन संपेपर्यंत निश्‍चिंत आमच्याकडे राहा.’ तिनं बोलता बोलता नंदिनीला दोनदा सांगितलं होतं.

नंदिनी आता आपली गावाकडची चुलतबहीण आहे की मनीषाची, हेच मंगेशला कळेनासं झालं होतं. ती इथे आली तेव्हा मनीषा किती रागावली होती आणि तिचा विरोधही होताच. पण आता हे मनीषा स्वतःच विसरून गेली होती.
त्या दिवशी तर कहरच झाला.
समोरच्या फ्लॅटमधल्या शहाबाईनं मनीषाला विचारलं, ‘तुमच्याकडच्या बाई आमच्याकडे येतील का कामाला?’
‘अहो शहामॅडम, काय बोलता तुम्ही? नंदिनी बाई नाहीये, नणंद आहे माझी नणंद. माझ्या मिस्टरांची चुलत बहीण आहे ती. आंजर्ल्याला राहते कोकणात. लॉकडाऊनमुळे आमच्याकडे राहतेय. लक्षात आलं ना नीट तुमच्या? कझिन सिस्टर आहे ती मंगेशची…’ मनीषाच्या रागाचा पारा चांगलाच चढला होता. तर एकंदरीत हे असं.
मार्चमध्ये सुरू झालेलं लॉकडाऊन टप्प्याटप्प्यानं जूनपर्यंत वाढत गेलं. जूननंतर काही नियम हळूहळू शिथिल झाले. बाहेर वाढणार्‍या कोरोनामुळे सगळे चिंताग्रस्त होते. पण मंगेशच्या कुटुंबाला नंदिनीचा आणि नंदिनीला दादा-वहिनीचा छान आधार मिळाला होता. नंदिनीचे आई-वडील तिकडे कोकणात निश्‍चिंत होते. आपली तरुण लेक चुलत चुलत भावाच्या घरात का होईना, पण सुरक्षित आहे, याचाच त्यांना दिलासा होता.
या काळात, अगदी खास कोकणी रेसिपी नंदिनीकडून मनीषानं शिकून घेतल्या आणि पास्ता-पिझ्झा-मंच्युरियन नंदिनीनंही शिकून घेतलं. दरम्यान लॉकडाऊनचे नियम शिथिल होताच मंगेशनं विचारलं, ‘‘नंदिनी, काढायचा का तुझा कोकणात जायचा पास?’’ तर मनीषाच म्हणाली, ‘‘आता गणपती होईपर्यंत थांब की नंदिनी! काय घाई आहे? मग जाशील. आली आहेस तर मला उकडीचे मोदक शिकवूनच जा.’’

नंदिनीला काय बोलावं कळेना तिला. घरी परत जाण्याची घाई लागली होती, पण वहिनीचा प्रेमळ आग्रह मोडवेना. ती गप्प राहिली. पण गावाहून फोन आला, ‘‘मंगेशभाऊ, खूप दिवस राहिली मुलगी. आता न्यावं म्हणतो. तुम्ही आणून सोडू शकाल का नंदिनीला? की आम्ही घ्यायला येऊ?’’
आता मात्र सगळ्यांचा नाइलाज झाला. पारितोषचा चेहरा रडवेला झाला. मनीषाही नाराज झाली होती.
मंगेशनं तीन पास काढून आणले. नंदिनीनं बॅग भरली. उद्या ती आंजर्ल्याला परत जाणार होती. मनीषाला भरून आलं. ती नंदिनीजवळ प्रेमानं जाऊन बसली. ‘‘नंदिनी, तू आली तेव्हा मला काळजी पडली होती, आमचा हा वन बेडरूम किचन फ्लॅट. कुणी आलं की येणार्‍याची आणि आमचीही गैरसोय होते. पण तू आलीस अन् आमच्यात सामावून गेलीस. कशाची तक्रार नाही की काही चिडचिड नाही. मला सगळ्या कामात मदत करत होतीस अन् पारितोषची तर किती काळजी घेत होतीस प्रत्येक वेळी! हात धुतोय नं, मास्क लावतोय नं, सॅनिटायझर वापरतोय नं… उद्या जाशील तू, पण तुझी खूप आठवण येईल गं. पुन्हा इकडे आलीस की आमच्याकडे नक्की यायचंस. आणि हो, तुझ्या हातचा गरमागरम आल्याचा चहा… तो तर मी विसरूच शकत नाही. तसा मला फक्त आईच द्यायची हातात. त्यानंतर तूच दिलास. आता आई-बाबा दादाकडे अमेरिकेला गेलेत तेव्हापासून तर मी खूपच मिस करत होते तो आल्याचा चहा. पण तुझ्यामुळे माहेरची उणीव दूर झाल्यासारखी वाटली.’’

‘‘अहा वहिनी, चहाचं काय एवढं? तो देईनच की मी तुम्हाला. तुम्हीही गणपतीला गावी येत जा. चहाबरोबर भरपूर मोदकसुद्धा मिळतील.’’
मनीषानं होकार दिला आणि पारितोषही खूष झाला. कारण त्याला नंदिनीनं विहिरीत स्वीमिंग शिकवण्याचं प्रॉमिस केलं होतं.
बाहेर कोरोनाचे पेशंट वाढत होते. आजूबाजूच्या बिल्डिंगमध्ये तो राहत होता त्या अपार्टमेंटमध्येदेखील. सगळीकडे चिंतेचं आणि टेन्शनचं वातावरण होतं, पण मंगेशकडे मात्र जुनी नाती पुन्हा नव्यानं उदयाला येत होती. आनंदाचं आणि प्रेमाचं कारंजं हृदयात थुईथुई नाचत होतं. मंगेशही मनात सुखावला होता. लग्नानंतर त्यानं दोन-तीन वेळा, गणपतीसाठी गावी जाऊ, असं मनीषाला म्हटलं होतं. पण मनीषा नकार द्यायची. ‘नको रे, आपलं सख्खं असं कुणी नाही तिकडे. तुझे चुलत नातेवाईक, अन् मी ही अशी ड्रेस वापरणारी, लिपस्टिक लावणारी. ती सगळी मंडळी मला उगीच नावं ठेवतील.’ मग त्यानंही तिला गावी चलण्याचा आग्रह करणं सोडून दिलं होतं. गावाकडूनही कुणी फारसं त्याच्याकडे येत नव्हतं. नात्यांचे बंध तुटल्यातच जमा होते.

आज ते नंदिनीच्या अचानक येण्यानंच पुन्हा जुळले होते. नंदिनीच्या प्रेमळ आमंत्रणानंतर मनीषाही गावी जायला उत्सुक झाली होती. मंगेशनं मनातल्या मनात गणपती बाप्पाचे आभार मानले. जानेवारी-फेब्रुवारीत त्यानं ऑफिसमध्ये एक भारी प्रोजेक्ट यशस्वीरीत्या पूर्ण केला होता. त्याचं इन्क्रिमेंट मिळालं की, मनीषाला केरळला फिरायला घेऊन जायचं त्यानं मनाशी ठरवलं आणि तिघांनीही हसून नंदिनीला निरोप दिला.

– सुजाता सोमण

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.