Now Reading
द ग्रेट बँक रॉबरी

द ग्रेट बँक रॉबरी

Menaka Prakashan
View Gallery

‘‘लाज वाटत नाही का तुला? ही अख्खी गल्ली आपल्या तोंडावर थुंकते. ‘चिल्लर’, ‘चिंधीचोराची फॅमिली’, मुफतखोर’ अशा नावांनी मला आणि बेबीला हिणवतात आणि तुम्हाला काहीच फरक पडत नाही? जर कुठंच काही काम मिळवता येत नसेल तर उपयोग काय तुमच्या शिक्षणाचा? जा निघा आता. काहीतरी काम मिळवून चार पैसे मिळवा आणि आम्हा मायलेकींना इथून कुठंतरी दूर घेऊन जा. अशा ठिकाणी जिथं कोणीही आपल्याला ओळखत नसेल. शांतपणे मेहनतीच्या कमाईचे चार घास पोटात ढकलता येतील…’’ नेहमीप्रमाणे बिबीजान आरडाओरडा करत होती आणि ‘मिर्झा बेग’ कानावर आदळणारे शब्द दुर्लक्षून दुसऱ्या कानातून सोडून देत होता. तिच्या तारस्वरातल्या कर्णकटू शब्दांनी त्याची शांती ढळली नव्हती की चित्तही जरादेखील विचलित झालं नव्हतं. कारण अशा आरड्याओरड्याची त्याला फार पूर्वीपासून सवय होती. शांतपणे त्यानं पुन्हा एकदा आरशात डोकावून भांग पाडला. चेहऱ्यावर-मानेवर थोडी पावडर मारली व एक धुवट शर्ट अडकवून तो एक शब्दही न बोलता, तिला काहीही न सांगता घराबाहेर पडला. ‘‘आता किती दिवसांनी काळं तोंड घेऊन परतणार…’’ त्याच्या कानावर पुन्हा शब्द आदळले, आणि पाठोपाठ खास शिव्याही. पण सवयीनं सारं दुर्लक्षून आपल्याच नादात झपझप चालत तो मुख्य रस्त्यावरून बाजारात आला.
गर्दीनं भरलेल्या अरुंद गल्लीत पोचल्यावर त्यानं एका इसमाला जाणूनबुजून धक्का मारला आणि शरीफपणाचं सोंग आणून माफी मागत असताना त्यानं त्या इसमासोबत असणाऱ्या व्यक्तीचं पाकीट शिताफीनं मारलं. तिथून जल्दीनं दूर निघून एका कळकट हॉटेलमध्ये शिरून त्यानं चहाची ऑर्डर दिली व कोपऱ्यातलं बाकडं निवडून, त्यावर बसून त्या पाकिटातले पैसे शांतपणे मोजायला सुरवात केली.

रोकड-चिल्लर मोजून झाल्यावर त्याच्या चेहऱ्यावर निराशा पसरली कारण तेवढ्या तुटपुंज्या पैशात त्याचा दोन-चार दिवसांचाही ‘जेबखर्च’ निघू शकत नव्हता. आम्लेट-पावावर पुन्हा आणखी एकदा चहा पिऊन झाल्यावर मिर्झा बेग आता काय करावं या विचारात पडला. घरी जाऊन बिबीचं तोंड पाहण्यात त्याला अजिबात अर्थ वाटत नव्हता. ‘आता वेळ कसा काढावा’ या विचारात असताना त्याला समोरच्या थेटरात नवीन लागलेल्या सिनेमाचं पोस्टर दिसलं. ‘लुटेरा!’ त्याला हे नाव एकदमच पसंत पडलं. जवळ जाऊन पोस्टर निरखत असताना त्याला त्या पोस्टरवर पेंटरनं चितारलेल्या ‘हिरो’च्या अंगकाठी व चेहरेपट्टीचं आपल्याशी असलेलं साम्य जाणवलं. मग काहीसं फुशारून आपल्या चेहऱ्यावरून कौतुकानं हात फिरवून, स्वतःवरच खूश झालेल्या मिर्झा बेगनं त्या सिनेमाचं बाल्कनीचं तिकीट काढलं.

एकदम तल्लीन होऊन सिनेमा बघत असताना मिर्झा बेगला पदोपदी त्या हिरोशी आपलं साधर्म्य असल्याचं जाणवत होतं. सिनेमा पाहताना त्याच्या डोक्यात एक विचारचक्रही फिरत होतं. आपणही आता, त्या हिरोप्रमाणे काहीतरी शक्कल लढवून, ‘बडा हात’ मारला पाहिजे, ‘चिंधीगिरी’ सोडून आपण ‘हिरोगिरी’ केली पाहिजे या विचारानं त्याच्या मनात मूळ धरलं. त्या सिनेमानं मिर्झाला जणू झपाटूनच टाकलं. त्या हिरोप्रमाणे आपण जमीनदाराच्या किंवा पिढीजात खानदानी नवाबाच्या इस्टेटीवर डल्ला मारावा असं त्यानं ठरवूनच टाकलं व तो तशा प्रयत्नांना लागला. परंतु जमीनदारी कधीचीच संपुष्टात आली होती आणि लब्धप्रतिष्ठित त्याच्यासारख्याला रस्त्यातही उभं करत नव्हते. हे सारे ‘अमिर’ लोक त्याच्या अपेक्षेहूनही अधिक चलाख निघाले होते. निराशेच्या गर्द डोहात तरंगताना काळ्याकभिन्न ढगातून कडाडणाऱ्या विजेप्रमाणे, मिर्झाच्या मनात अचानकपणे एक विचार लख्खकन चमकला. ‘आपण जर एखादी बँकच लुटली तर…’ आणि लगेचच त्यानं आपल्यासारख्याच काही मित्रांना फोन लावला. काहींनी त्याला वेड्यात काढलं, तर काहींनी त्याला प्रोत्साहन दिलं.

बँकेवर दरोडा घालायच्या संधी… कधी… कसा… कुठे आणि त्यासाठी नक्की काय करायचं’ अशांसारखे यक्षप्रश्न मिर्झासहित त्याच्या साऱ्या दोस्तांपुढे उभे ठाकले. वारंवार होणाऱ्या चर्चा, बैठका निष्फळ ठरल्यावर मिर्झानं न हरता सरळ कॉम्प्युटरची मदत घेण्याचं ठरवलं. त्याचं कॉम्प्युटरचं शिक्षण त्यानं या कामासाठी उपयोगात आणणं सुरू केलं. दिवस-रात्र मोठ्या चिकाटीनं, तो इंटरनेटवरून जगभरातले गाजलेले बँकेवरचे दरोडे व त्यांच्या हकिगती शोधून काढून अभ्यासू लागला. बँकेवर कशा प्रकारे, कोणती वेळ साधून दरोडे घातले गेले आणि दरोडेखोर केव्हा, कसे व कोणत्या कारणामुळे पोलिसांच्या तावडीत सापडले याचीही नोंद तो स्वतःपाशी व्यवस्थित ठेवू लागला.

या सर्व दरोड्यांच्या हकिगतीमधल्या तीन घटनांनी त्याचं लक्ष वेधून घेतलं. त्याचे डोळे आनंदानं चमकले व किंचित बारीक डोळ्यांनी तो लक्षपूर्वक वाचू लागला.

३० डिसेंबर २००७ ला मल्लापुरम इथल्या ‘स्टेट बँक ऑफ केरला’ इथून लॉकर तोडून चोरट्यांनी तब्बल ८० किलो सोनं आणि ५० लाखांच्या वर रोकड लुटली. ज्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही बँक होती, त्या मजल्याच्या खाली, तळमजल्यावर असलेलं रेस्टॉरंट चोरट्यांनी भाड्यानं घेतलं होतं. या हॉटेलचं शटर ओढून चोरट्यांनी छताच्या भिंतीला भोक पाडून, त्यामधून थेट बँकेच्या स्ट्राँगरूममध्ये अलगद प्रवेश मिळवला आणि प्रचंड लूट सहजासहजी केली होती. मोठ्या सफाईनं दरोडा घालून सर्व चोरट्यांनी यशस्वीपणे पोबारा केला होता. रिनोव्हेशनच्या कामासाठी म्हणून तात्पुरतं बंद असणाऱ्या रेस्टॉरंटच्या भाडोत्री मालकानंच हा दरोडा आखला असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला. मग पोलिसांनी त्या रेस्टॉरंटच्या भाडोत्री मालकाचं व त्याच्यासोबत काम करणाऱ्या नोकरांचं स्केच बनवून सर्वत्र प्रसारित केलं, पण चोरट्यांचा काहीच थांगपत्ता लागू शकला नाही. भिंतीवर लिहिलेल्या ‘जय माओ’ या बटबटीत अक्षरातल्या उद्‌घोषणेमुळे हे माओवादी नक्षलवाद्यांचंच काम असावं, असं पोलिसांना वाटून त्यांनी त्या दिशेनं पुढील तपासकामाला सुरवातही केली, परंतु काहीच हाती लागू शकलं नाही; कारण पोलिसांची मुद्दामच दिशाभूल करण्यासाठी चोरट्यांनी ही कुटील खेळी खेळली होती. निराश झालेल्या केरळच्या पोलिसांनी जवळच्या मोबाईल टॉवरवरून त्या वेळी त्या परिसरात कार्यान्वित असलेल्या लाखो मोबाईल नंबरची व त्या नंबरच्याधारकांची काळजीपूर्वक छाननी करायला सुरवात केल्यावर त्यांनी अक्षेपार्ह नंबर शोधून काढले आणि ‘धूम’ या सिनेमातून प्रेरणा घेऊन या दरोड्याची आखणी करणारा मुख्य सूत्रधार ‘वेण्यापुरक्कल जोसेफ’ ऊर्फ ‘जेसन’ याला व नंतर त्याच्या साथीदाराला (त्यामध्ये दोन तरुणीही होत्या) यशस्वी अटक केली आणि चोरी गेलेला जवळजवळ सारा मुद्देमाल परत मिळवण्यात आला.

वरच्या केसचं टिपण काढल्यानंतर मिर्झानं आणखी एका दरोड्याचा अभ्यास केला. या दरोड्यानं मिर्झाला अगदी भारून टाकलं होतं. ऑक्टोबर २०१४ मध्ये सोनीपत, हरियाना इथल्या ‘पंजाब नॅशनल बँके’च्या शाखेत जमिनीखालून १२५ फूट लांब आणि अडीच फूट रुंद बोगदा खणून चोरट्यांनी बँकेच्या लॉकरच्या कक्षातच थेट प्रवेश मिळवला आणि एका रात्रीतून सुमारे ८९ लॉकर्स तोडून १०० कोटींची लूट केली होती. याही वेळेला मोबाईल टॉवरवरून, त्या परिसरात कार्यान्वित असलेल्या मोबाईल नंबरची यादी बनवून, तिची छाननी करून नेमका नंबर शोधून काढला. या दरोड्याच्या मुख्य सूत्रधारानं पोलिसांच्या तावडीत सापडण्याऐवजी आत्महत्या करण्याचा निर्णय घेऊन, स्वतःला संपवून टाकलं, तर बाकीचे सूरिंदर, बलराज व सतीश हे साथीदार तुरुंगात खितपत पडले.

यानंतर डिसेंबर २०१६ मध्ये उल्हासनगर इथं ‘मन्नापुरम फायनान्स’चं सेफ डिपॉझिट फोडून अंदाजे ९ कोटी रुपये इतक्या किमतीच्या सोन्याची लूट चोरट्यांद्वारे केली गेली होती आणि पोलिसांनी अगदी वरच्या दोन घटनांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे यशस्वी तपासकाम केलं होतं. याही दरोड्यातल्या साऱ्या बाबींचा मिर्झानं लक्षपूर्वक अभ्यास केला.

या सर्व दरोड्यांच्या अभ्यासातून मिर्झानं पुढील अनुमान व निष्कर्ष काढले –

१) सर्व दरोडे अयस्वशी होण्यामागचं म्हणजे दरोडेखोर पकडले जाण्यामागचं कारण एकच ते म्हणजे सेलफोन! म्हणून दरोडे घालते वेळी दरोडेखोरानं स्वतःपाशी ‘अॅक्टिव्ह स्थितीत’ सेलफोन ठेवू नये.

२) बँकेच्या सेफ व्हॉल्ववर, लॉकरवर दरोडा घालण्यासाठी जमिनीखालून बोगदा खणणं हे भिंतीला भोक पाडण्यापेक्षा जास्त सोयीचं व कमी धोक्याचं आहे. त्यासाठी जवळपास गाळे-दुकानं भाड्यानं देण्यासाठी उपलब्ध आहेत अशीच बँक निवडण्यात यावी.

३) जी व्यक्ती बँकेवर दरोडा घालण्यासाठी जवळच असलेला गाळा भाड्यानं घेईल, त्या व्यक्तीनं कदापि प्रत्यक्ष दरोड्यात भाग घेऊ नये. दरोड्यासाठी आवश्यक असलेलं प्राथमिक काम पूर्ण होताच त्या तोतया दुकानधारकानं तिथून दूर निघून जावं.

४) दरोड्यासाठी शक्यतो दोन-तीन दिवस जोडून सुट्ट्या येणारा दिवस किंवा शनिवार निवडावा म्हणजे दरोड्याचं वृत्त जाहीर होण्यास वेळ लागून, एक संपूर्ण दिवसाचा अवधी सर्व साथीदारांना पलायनासाठी मिळू शकतो.

यानंतर मिर्झानं आपल्या सर्व साथीदारांची आणखी गुप्त बैठक घेतली आणि सर्व दरोड्यांच्या हकिगती, चोरट्यांच्या पकडलं जाण्यामागची कारणं सर्वांना सविस्तरपणे सांगून आपले निष्कर्षातले मुद्दे स्पष्ट केले.

पकडलं जाणं टाळण्यासाठी मिर्झा बेगनं सर्वांना सेलफोनच्या वापरावर काट मारून, एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी वॉकीटॉकीचा वापर करण्याची सूचना दिली व सर्वांसाठी खास चायनीज वॉकीटॉकीची ऑर्डर ऑनलाईन देण्यात आली. मिर्झा बेग आणि त्याचे साथीदार एका चोरलेल्या व्हॅनमधून, भरवस्तीतल्या, आजूबाजूला बरेच छोटे छोटे बोळ, अरुंद गल्ल्या असणाऱ्या, आसपास भाड्यानं घेण्यासाठी, तात्पुरत्या वाणसामानाचं दुकान काढण्यासाठी, गाळा उपलब्ध असणाऱ्या एखाद्या नामांकित बँकेची शाखा म्हणजेच लोकेशनच्या शोधार्थ मुंबई, ठाणे इथल्या शहरांमधून, उपनगरातून वणवण हिंडू लागले. कल्याण, डोंबिवली, भिवंडी इथपर्यंत शोध घेऊनही मनाजोगती ‘लोकेशन’ न मिळाल्यानं सर्वांनी पनवेलपर्यंत धाव घेतली. तिथंही निराशाच हाती लागल्यानं सर्वजण अतिशय उदास होऊन नवी मुंबईमार्गे घरी परतत असताना ‘सानपाडा’ इथली नव्यानं विकसित झालेली संकुलं पाहून मिर्झाला थोडी आशा वाटू लागली.

जुईनगर स्टेशनपासून एकामागून एक असे सानपाड्यातले सेक्टर पिंजून काढताना सेक्टर अकरा इथल्या प्लॉट नंबर सहाजवळ आल्यावर मिर्झानं कारचा वेग अतिशय कमी केला आणि ‘भक्ती रेसिडेन्सी’कडे बोट दाखवत तो आनंदानं उद्‌गारला, ‘‘ती पाहा, ती पाहा सोन्याची खाण.’’ काहीच अर्थबोध न झाल्यानं, बुचकळ्यात पडलेल्या साथीदारांना कारमधून त्यानं त्या इमारतीच्या समोरून पुढं नेलं आणि समोरच्या बाजूला एका दिशेकडे बोट दाखवत तो म्हणाला, ‘‘नशीब उघडलं.’’ बोटाच्या दिशेला ठळक अक्षरात ‘बँक ऑफ बरोडा’ असं लिहिलेला साईनबोर्ड होता आणि त्या शेजारीच इस्टेट एजंटच्या ऑफिसला लागून एक गाळा रिकामा होता. त्या गाळ्याच्या शटरवर मोठ्या अक्षरात, लाल रंगात लिहिलं होतं- ‘भाड्याने देणे आहे’. क्षणार्धात सर्वांचे चेहरे उजळले आणि सर्वांना सोबत घेऊन मिर्झा भरवेगात मुंबईच्या दिशेनं निघाला. पूर्वी तुरुंगात ओळख झालेल्या, एका जुन्या, वयस्क, अनुभवी आणि गुन्हेगारीच्या विश्वात चांगल्यापैकी मुरलेल्या राजस्थानी सोबत्याच्या शोधात.

मिर्झानं ‘लोकेशन’ फिक्स केली होती. आता या कपटनाट्याच्या सूत्रधाराला मुख्य व साहाय्यक अभिनेत्यांची गरज होती.

‘‘प्लॅन तर ठीक आहे. एकदम मस्त! पण मी यात काम करू शकतो?’’ खोकल्याची ढास कशीबशी थोपवत भवानी सिंह उत्तरला. तुरुंगातल्या जुन्या दोस्तांना भेटून त्याला जरी आनंद झाला असला, तरी त्याच्या मनात आपण पूर्वीसारखं चपळपणे काम करू शकू की नाही याबाबत शंका होती कारण त्याची तब्येत हल्ली सारखीच खराब होत होती. त्याचा खोकलाही फार रेंगाळला होता आणि त्याला सारखी घरच्यांची आठवण येऊन गावी जावंसं वाटू लागलं होतं. ‘‘हे बघ, मुंबईला आखरी सलाम ठोकण्याच्या आधी काहीतरी कमावून जा. यात मेहनत नाही. फक्त एका जागी बसून दुकानदारी करायची आहे. आमची अडचण ही आहे की, आमची सूरत पाहून कोणीही आम्हाला दुकान भाड्यानं देणार नाही. तू मारवाडी. एकदम दुकानवाला म्हणून फिट बसतोस. दुकान पाहिलेलं आहे. पैसे तयार आहेत. तू फक्त त्या एजंटशी बोलणी कर आणि दुकान भाड्यानं घे. दिवसभर तू दुकानात बस. रात्री कारागीर काय करायचं ते करतील.’’ मिर्झानं भवानी सिंहला शांतपणे समजावताच भवानीनं आढेवेढे घेणं थांबवलं.
दोन दिवसांच्या आत भवानीच्या हातात एक नवं सिमकार्ड घातलेला सेलफोन, चार फोटो कॉपीसह एक नवीन (अर्थातच नकली) पॅनकार्ड, सहा पासपोर्ट साईज फोटो या गोष्टी येऊन पडल्या. त्या नकली पॅनकार्डवर कुठला तरी झारखंडचा खोटा पत्ता दिलेला होता आणि भवानी सिंहच्या फोटोखाली एक नवीन नाव होतं, ‘गेन बच्चन प्रसाद.’
‘‘तीन लाख रुपये डिपॉझिट आणि तीन महिन्यांचं भाडं, अॅडव्हान्समध्ये मंजूर असेल तर पुढचं बोला. चेक जेव्हा क्लीअर होईल, तेव्हाच चाव्या ताब्यात मिळतील.’’ एजंटनं जरा ठणकावूनच सांगितलं. ‘‘ठीक है, ठीक है’’ भवानी सिंह तोंडातल्या तोंडात पुटपुटला. ‘अरे, असा कसा हा मारवाडी? रेटमध्ये जरादेखील घासाघीस करत नाही.’ एजंटच्या मनात विचार आला. समोरची पार्टी भाड्याच्या रेटमध्ये बार्गेनिंग करणारच असं त्या एजंटला पूर्वानुभवामुळे ठाऊक असल्यानं त्यानं रेट जरा थोडा वाढवूनच सांगितला होता. पण हा नवा भाडोत्री त्यानं म्हटलेल्या रेटला राजी झाला होता. कमालच होती. ‘‘हा गाळा जरा छोटा आहे. त्यापेक्षा तो पलीकडचा पाहा ना… स्पेशिअस आहे.’’ धंद्यात मुरलेल्या एजंटनं चिकाटीनं संभाषण वाढवलं.

‘‘नाही नाही. वास्तूच्या हिशोबानं हाच शुभ आहे. हाच द्या.’’ असं बोलून भवानी सिंहनं सदऱ्याच्या आतल्या खिशातून एकदम लाखा-लाखांची रोकड काढताच एजंटचे डोळे कोऱ्या करकरीत नोटांच्या दर्शनानं चमकले. ड्रॉवरमधून फॉर्म काढून त्यावर त्यानं भवानी सिंहची सही घेतली आणि गाळ्याच्या किल्ल्या ताब्यात दिल्या. परंतु त्यापूर्वी भवानी सिंहचं पॅनकार्ड नीट निरखून पाहत, त्या कार्डाच्या दोन फोटो कॉपीज फॉर्मला जोडायला तो विसरला नाही.

एजंटच्या ऑफिसला अगदी खेटूनच रिकाम्या, भाड्यानं देण्यासाठी उपलब्ध असलेल्या गाळ्यावर, शॉप नं. 7 वर आता नवीन, रंगीत नामफलक चढला. ‘श्री बालाजी जनरल स्टोअर्स. प्रोप्रा. गेना बच्चन प्रसाद. सेल नं. …’. दुकानाचं उद्‌घाटन मिर्झाच्या हस्ते मे महिन्यात, अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर झालं अन् पेढे वाटून लगेचच दुकानाचं कामही चालू झालं.

मिर्झानं दुकानात चांगला माल ठासून भरला होता. आपल्या मिठ्ठास बोलण्यानं भवानी सिंह ऊर्फ गेनजी गिऱ्हाइकंही वाढवत होता. सेक्टर ११ मध्ये किराण्याच्या, किरकोळ वस्तूंच्या दुकानाची तशी गरजच असल्यानं दुकान तसं गजबजलेलं असे. संशय घ्यायला कुणालाही कसलाही वाव नव्हता. दुकानाला भेट देऊन मिर्झा व त्याचा साथीदार एक ऑफिस सोडून पलीकडच्या बँक ऑफ बरोडाच्या शाखेत गेले. तिथं लॉकर उघडायचं आहे अशी थाप मारून त्यांनी लॉकररूम कुठे आहे ते पाहून ठेवलं. तसंच बँकेत आणखी तीन-चारदा जाऊन मिर्झाच्या तल्लख साथीदारांनी त्या शाखेत कुठे कुठे सीसीटीव्ही बसवलेले आहेत त्याची व्यवस्थित पाहणी केली. तसंच आजूबाजूच्या गाळाधारकांशी व इमारतीच्या वॉचमनशी सहजी गप्पा मारताना त्यांनी बँकेच्या सुरक्षारक्षकाविषयीही काही माहिती काढून घेतली. या सर्व बाजारगप्पांतून आणि टेहळणीतून त्यांना दोन प्रमुख गोष्टींची माहिती मिळाली ती म्हणजे एक तर लॉकर रूममध्ये सीसीटीव्ही नव्हता आणि दुसरं म्हणजे बँकेनं पहारा देण्यासाठी चोवीस तास सुरक्षारक्षक मुळी नेमलाच नव्हता. रात्री त्यामुळे त्यांना निर्धोकपणे दरोडा घालून निसटता येणं सहजी शक्य होतं.

बँकेच्या शाखेच्या वास्तूची प्राथमिक माहिती मिळाल्यावर संजयनं मोठ्या सफाईनं त्या जागेचा आराखडा बनवला. हा संजय कांबळे जणू एक कुशल ‘वास्तू-रचनातज्ज्ञ’ होता. एकदा एखाद्या इमारतीची पाहणी करून झाली की भिंतीला कुठे भगदाड पाडून वा जमिनीखालून मार्ग बनवून आत शिरता येईल याची व्यवस्थित सचित्र, समजण्यास सोपी अशी मांडणी कागदावर करणं म्हणजे जणू त्याच्या डाव्या हाताचा मळ होता. अशा प्रकारे बऱ्याच ठिकाणच्या विविध इमारतींमधून भिंतीफोड करून वा जमिनीखालून रस्ता बनवून त्यानं पुष्कळदा चोऱ्या केल्या होत्या. या गुन्ह्यांखाली वारंवार ‘अंदर-बाहर’ होणारा संजय कांबळे एक महत्त्वाचा ‘वाँटेड’ असलेला गुन्हेगार होता.

संजयनं सफाईदारपणे ड्रॉइंग पेपरवर किराण्याच्या दुकानाच्या जमिनीखालून थेट बँकेच्या लॉकर रूममध्ये उघडणाऱ्या भुयारी मार्गाचा आराखडा बनवून दिला. सर्वांना वाटेत जर जलवाहिनी वा सांडपाण्याची वाहिनी यांचा अडथळा चुकून आला तर त्यांना टाळून खोदकाम कसं पुढे चालवावं याविषयी माहितीवजा अशा काही सूचनाही दिल्या. त्यानं खोदकाम करताना वरून माती ढासळून भुयार बुजून जाऊ नये, मजुरांचा श्वास कोंडला जाऊ नये म्हणून भुयाराच्या छतावर फळकुटं लावून त्यांना बांबूच्या काठ्यांचे टेकू आधारासाठी लावण्यासही सांगितलं. यापूर्वी हरियानात सोनीपत इथं घातल्या गेलेल्या दरोड्यात लुटारूंनी सोबत आणलेल्या मोबाईल फोनमुळे त्यांचा घात झाला आणि त्या मोबाईल फोनच्या नंबरच्या आधारे तिथल्या पोलिसांनी त्यांना हुडकून काढलं असल्याची माहिती साथीदारांना देऊन मुख्य सूत्रधार मिर्झानं सर्वांनाच दरोडा घालतेवेळी मोबाईल सोबत न आणण्यासाठी निक्षून बजावलं. त्या वेळी फक्त चायनीज ब्रँडच्या वॉकीटॉकीवरूनच एकमेकांशी संपर्क साधण्याचा हुकूम मिर्झानं सर्वांना दिला.

मुहूर्ताचा नारळ वाढवून दुकान ताब्यात आल्यावर भवानी सिंहनं आपल्या पावलांनी दुकानाच्या अंतर्भागापासून ते इस्टेट एजंटच्या ऑफिसपर्यंतचं अंतर मोजून संजयला सांगितलं होतं व त्यावरून संजयनं बँकेच्या अंतर्भागात थेटपणे शिरण्यासाठी कमीत कमी २५ फूट लांबीचा बोगदा खणावा लागेल तसंच एका माणसाला अंग आकसून जाण्यापुरती म्हणजे कमीत कमी दीड ते दोन फूट इतकी रुंदी ठेवावी लागेल असा निष्कर्ष अंदाजानं काढला होता. दोन टपोरी साथीदारांना मदतीला घेऊन दिवसा भवानी सिंह दुकान चालवत असे. तर ज्योतिषानं काढून दिलेल्या शुभवेळी पहिली कुदळ मारून नंतर संजयच्या आराखड्याप्रमाणे इतर साथीदार रात्री काम करू लागले. भुयाराचं काम संथगतीनं पुढे चालू होतं. अशा वेगानं जर काम केलं गेलं तर ठरलेल्या वेळेत पूर्ण होणं अशक्यप्रायच असल्यानं मग संजयनं मिर्झाला कामावर आणखी चार मजुरांना लावण्याची विनंती केली. त्यानुसार उत्तर प्रदेशात दारिद्र्यात पिचलेल्या चारजणांना कामाचं आमिष दाखवून मुंबईला बोलावून घेण्यात आलं. परिस्थितीची पूर्ण कल्पना आल्यावर या सर्व उत्तर प्रदेशी मजुरांनी काम करायला नकार दिला, पंरतु मिर्झानं समजावताच त्यांच्यापैकी आदेश वर्मा, शुभम वर्मा, किशन मिश्रा पैशांसाठी खोदकामात सहभागी झाले. बोगदा खणण्याचं काम वेगानं सुरू झालं. महिना, मग दोन महिने उलटले आणि भवानी सिंहची तब्येत ढासळली. त्याचा खोकला बळावला आणि प्रकृतीही क्षीण झाली. आता कदाचित आपण यातून वाचत नाही असं वाटल्यानं भवानी सिंहनं यातून बाहेर पडून कायमचं गावी जाण्याचा मानस मिर्झाला बोलून दाखवला आणि ‘माझे दोन भाचेच माझं दुकान सांभाळतील’ असं एजंटला निरोपाचं सांगून त्याच्यासमक्ष किल्ल्या मिर्झाच्या साथीदारांच्या हातात देऊन, सामान बांधून भवानी सिंह राजस्थानातल्या राजसमंद जिल्ह्यातल्या दौलतपुरा या आपल्या गावी जायला निघाला. परंतु वाटेतच त्याची तब्येत खूपच खालावली आणि उदेपूरच्या सरकारी दवाखान्यात त्याला ॲडमिट व्हावं लागलं. उपचारांच्या दरम्यान ऑगस्ट महिन्यात क्षयरोगानं त्याचा बळी घेतला.

बोगदा खणण्याचं काम नवी मुंबई इथे अव्याहतपणे चालूच होतं. हां हां म्हणता नोव्हेंबर महिना लागला. बोगदा खणण्याचं काम जवळपास पूर्ण झालं होतं. आता मिर्झा फक्त योग्य वेळेची वाट पाहत होता. त्याला त्याच्या चौर्यकर्मासाठी बँकेला लागून दोन-तीन दिवस सुट्टी असणारा आठवडा सोयीचा होता.

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातला शुक्रवार उजाडला. बोगदा पार बँकेच्या लॉकर रूमच्या तळापर्यंत पोचला होता. आता फक्त बोगद्याचं तोंड उघडण्याचं म्हणजे लॉकर रूमची फरशी फोडायचंच काम बाकी होतं. मिर्झाचे साथीदार बँक बंद व्हायची आणि सुरक्षारक्षक ‘वीकएंड’च्या सुट्टीवर जायचीच वाट उतावीळपणे पाहत होते. लॉकर कापण्यासाठी मेटल कटर, हातोडा, टॉर्च, प्लॅस्टिकच्या मोठ्या पिशव्या आदी दरोड्यासाठी आवश्यक ते सामान त्यांनी आधीच बालाजी स्टोअर्समध्ये रात्रीचं गुपचूप आणून ठेवलं होतं. बँकेपासून थोड्या दूर अंतरावर मुख्य रस्त्यावर एका व्हॅनमध्ये या दरोड्याचे मुख्य सूत्रधार मिर्झा व मोमीन खान, मोई उद्दीन शेख, श्रवण हेगडे, अंजन मोहती बसून वॉकीटॉकीवरून मजुरांना सूचना देत होते. रात्रीची वेळ असल्यानं रहदारी तुरळकच होती तरीही दूरवर कोणी येताना दिसलं तर व्हॅनमधून टॉर्चनं सिग्नल दिला जाई आणि मग दुकानामधून कनेक्शन ऑफ करून भुयारातले लाईट्स तातडीनं घालवले जात. मजूरही काम थांबवून चिडीचूप बसत. लॉकर रूमच्या जमिनीची फरशी सरतेशेवटी फुटली. भुयाराचं तोंड उघडलं. सर्वांचे चेहरे उजळले आणि दबक्या आवाजात सर्वांनी एकच स्वरात जल्लोष केला.

शनिवार, ११ नोव्हेंबरची रात्र सुरू झाली. बालाजी स्टोअर्समधल्या खोलीत मिर्झा आपल्या सहकाऱ्यांना सूचना देत होता. फायनल सूचना देऊन झाल्यावर सर्वांनी आपले चेहरे मळकट पंचानं झाकून घेतले. दरोड्यासाठी आवश्यक ते सामान सोबत घेऊन एकापाठोपाठ एक हळूहळू भुयारात उतरू लागले. मिर्झा आत शिरणार तोच अचानक कोणाचा तरी सेलफोन वाजला. तोंडातल्या तोंडात एक शिवी हासडून मिर्झानं त्या सेलफोनवाल्याची मानगूट पकडली व ताबडतोब त्याचा फोन हिसकावून बंद केला. कित्येक वेळा बजावून सांगूनही त्या मूर्ख मजुरानं सोबत सेलफोन आणल्याचं पाहून खरं तर मिर्झाच्या अंगाचा तिळपापड झाला होता, पण आता आगपाखड करण्यात वेळ घालवणं परवडण्यासारखं नव्हतं. व्हॅनमधल्या दोघा साथीदारांना टॉर्चचा सिग्नल देऊन मिर्झाही शेवटी भुयारात उतरला.

लांबच लांब बोळकांडीवजा भुयारातून लॉकर रूमपर्यंत सारे पोचले, लॉकर रूमच्या जमिनीच्या फरशीला पाडलेल्या भल्या थोरल्या भगदाडातून प्रथम हात बाहेर काढून मग आपापल्या कोपरांवर भार देऊन सर्वांनी आपापली शरीरं वर घेतली आणि लॉकर रूमच्या थेट अंतर्भागातच प्रवेश केल्यावर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

मेटल कटरनं आधी लॉकर कापायला सुरवात होताच बाहेरच्या व्हॅनमधून खुणेचा इशारा दिला गेला अन्‌ त्या भुयारातले सारे लाईट्स बंद झाले. लॉकर रूममधल्या मिर्झानंही आपला टॉर्च बंद केला. वॉकीटॉकीवरून संदेश खणखणला, ‘बंद करो ये मशिन! साला आवाज जोर का आता है।’ सर्वजण एकदम हतबुद्ध झाले. तेवढ्यात तल्लख डोक्याच्या मिर्झाच्या डोक्यात एकदम विचार चमकला. घरफोडी करताना नेहमीच त्याला सोबत करणारा त्याचा साथीदार ‘पेचकस’ म्हणजेच खास स्क्रू ड्रायव्हर खिशातून काढून त्यानं लॉकर उघडायला सुरवात केली. पहिले दोन-तीन लॉकर उघडल्यावर ते पूर्णतया रिकामे निघाले, तर नंतरच्या तीन-चार लॉकरमध्ये फक्त कागदपत्रंच म्हणजे सर्वांच्या दृष्टीनं ‘फालतू कचरा’ निघाला. वेळ मोठ्या झपाट्यानं पुढे सरकत होता. उजाडण्यापूर्वी जास्तीत जास्त लूट करून सर्वांना गर्दीच्या वेळेच्या, रहदारी सुरू होण्याच्या आधी निसटणं अत्यावश्यक होतं. मिर्झानं लॉकर मोजले. तब्बल २२५ लॉकर्स होते आणि एकामागून एक लॉकर जर रिकामे वा कचरपट्टीचे निघाले तर सकाळपर्यंत काहीही लुटता येऊ शकणार नव्हतं. सर्वांचे चेहरे निराशेनं काळवंडले. तेवढ्यात तल्लख डोक्याच्या मिर्झाच्या डोक्यात एक मस्त कल्पना आली. एक बारीक तार त्यानं लॉकरच्या किल्लीच्या भोकातून आत घातली अन्‌ थोडी हलवली. मग मान हलवून त्यानं ती दुसऱ्या लॉकरच्या किल्लीच्या भोकातून आत सरकरली. पुन्हा नकारार्थी मान हलवून तो भराभर एकामागून एक लॉकरच्या किल्लीच्या भोकातून तार आत घालू लागला.

डावीकडच्या लॉकरच्या सेक्शनपाशी आलेल्या मिर्झानं पुन्हा तार आत घालताच त्याचे डोळे आनंदानं चमकले. त्यानं साथीदारांना खुणेनं प्लॅस्टिकच्या बॅगा घेऊन त्याच्यापाशी बोलावलं. आपल्या हत्यारानं पहिला लॉकर उघडून आतला खचाखच भरलेला माल त्यानं प्लॅस्टिकच्या पिशवीत भराभर फेकला आणि त्या साथीदाराला दागिने काढून घेऊन रिकामे बॉक्सेस जमिनीवर फेकून द्यायला सांगितलं.

भराभर लॉकर्स उघडले जात होते आणि ‘कचरा’ म्हणजे रिकाम्या पेट्या, डब्या जमिनीवर इतस्ततः विखुरल्या जात होत्या.

‘‘अण्णा, आपीने कैसे पैचाना कौनसा लॉकर भरेला है?’’ श्रवणनं कानडी-हिंदीत विचारतच मिर्झा हसून उत्तरला, ‘‘अरे, सीधीसी बात है बच्चा! तार बीचमें अटकता है तो लॉकर भरा हुआ, वरना लॉकर खाली।’’

एकूण पस्तीस लॉकर्स उघडून झाले. साऱ्या पिशव्या मालानं गच्च भरल्या. सकाळचे जवळजवळ सात वाजायला आले होते. सोन्याचे दागिने, चांदीची भांडी यासोबत भरपूर रोख रक्कमही लॉकरमधून लांबवली गेली होती. व्हॅनमधून पुन्हा इशारा मिळाला आणि तोंडं पूर्णपणे झाकून घेऊन, आजूबाजूचे सीसीटीव्ही चुकवत सारेजण व्हॅनपाशी आले.

इमारतीच्या मागच्या गल्लीतून दोन मोठ्या मोटारी सुसाट निघाल्या व मुख्य रस्ते घेण्याऐवजी निरुंद गल्लीबोळातून, आडवी तिडवी वळणं घेत, शक्य तितके सीसीटीव्ही चुकवत सरतेशेवटची हायवेवर गेल्या. तुफान वेगानं टोलनाका फक्त एकाच मोटारीनंच गाठला. दुसरी मोटार जणू रस्त्यात मध्येच गडप झाली होती किंवा एखादं आडवाटेचं वळण घेऊन शॉर्टकटनं एखाद्या ठरलेल्या गुप्त ठिकाणी आली होती. दुसरी मोटार मात्र टोलनाका ओलांडून मुंबईच्या हद्दीबाहेर पडून जवळच असलेल्या दुसऱ्या जिल्ह्याच्या दिशेनं बायपास रोड घेऊन धावत होती. लवकराच लवकर नियोजित ठिकाण गाठायची तिला घाई झाली होती.

१३ नोव्हेंबर २०१७ ची सकाळ होती. बँकेची शाखा नुकतीच उघडली होती. दोन दिवसांच्या सलग सुट्टीनंतर बँकेचे सारे कर्मचारी थोडेसे सुस्तावून कामावर आले होते. हळूहळू काहीसं रेंगाळतच बँकेचं काम सुरू होऊ लागलं होतं. बँकेत सफाईवालाही आला नव्हता आणि चहाची ऑर्डर द्यायला गेलेला प्यूनही परतला नव्हता. तेवढ्यात बँकेचे एक खातेधारक आणि लॉकर होल्डर बबनराव एक पाऊच घेऊन घाईत बँकेत आले. त्यांना आपल्या कुटुंबीयांसोबत समारंभाला जायचं होतं. अकराच्या मुहूर्ताआधी लॉकरमधून सुवर्णालंकार काढून त्यांना घरी पोचायचं असल्यानं, त्यांनी लॉकर खातं सांभाळणाऱ्याकडे पटकन लॉकर उघडण्यासाठी घाई करायला सुरवात करताच, आपलं बोलणं थांबवून अधिकाऱ्यानं एका कर्मचाऱ्यासोबत किल्ली देऊन बबनरावांना त्या पोरगेल्या कर्मचाऱ्यासोबत लॉकर कक्षाकडे जायला सांगितलं. तुरुतुरु चालणाऱ्या त्या पोरगेल्या कर्मचाऱ्यापाठी बबनराव हळूहळू डुलत डुलत निघाले.

लॉकर रूमचं लोखंडी दार उघडून आतला पडदा बाजूला करून त्या कर्मचाऱ्यानं आत पाऊल टाकताच, वाटेतल्या एका अडथळ्यामुळे तो धडपडला आणि जर त्याला पाठून येणाऱ्या बबनरावांनी धरलं नसतं तर तो सपशेल आडवाच झाला असता. त्याला सावरून बबनरावांनी समोर पाहिलं आणि भीतीयुक्त आश्चर्यानं त्यांनी आ वासला. त्यांच्या तोंडून एकही शब्द फुटेना. सोबतच्या बँक कर्मचाऱ्याच्या ध्यानात हा सारा प्रकार आल्यावर एक मोठ्यानं किंकाळी मारली आणि तो मोठमोठ्यानं आरडाओरडा करू लागताच आपापली कामं टाकून, बँकेतले सारे कर्मचारी आपापल्या जागा सोडून लॉकर रूमच्या दिशेनं धावले. जमिनीवर विखुरलेली कागदपत्रं, दागिन्यांचे रिकामे बॉक्सेस आणि लॉकर कक्षात उजव्या बाजूला जमिनीवर कृष्णविवराप्रमाणं भासणारं भलं-थोरलं भगदाड पाहून आश्चर्यचकित झालेल्या साऱ्यांनी काही क्षणात सावरल्यावर एकच गलका करायला सुरवात केली. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून मॅनेजरनं ताबडतोब पोलिसांना फोन केला. तिथे हजर असलेल्या बँकेच्या दोघा-तिघा ग्राहकांनी लगेचच आपल्या आप्तमित्रांना सेलवरून मेसेजेस पाठवले. मेसेज वाचल्यावर आणखी पंधरा-वीस जणांना एसएमएस गेले आणि त्या पंधरा-वीस जणांकडून आणखी पंचवीस-तीस जणांना ही अघटित बातमी काही मिनिटांत पोचली.

या घटनेचं वृत्त व्हॉट्स अॅपवरून फोटोसहित मिळताच फक्त भारतातल्याच नव्हे, तर बीबीसीसारख्या विदेशी वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी तसंच विविध वृत्तवाहिन्यांचे कॅमेरामन, पत्रकार पाऊण तासाच्या आत घटनास्थळी पोचले व सर्वप्रथम सर्वोत्तम बाईट घेण्यासाठी, खमंग वृत्त मिळण्यासाठी सर्वांमध्ये एकच चुरस सुरू झाली. कुंभमेळ्यासाठी गर्दी झाली आणि मासळी बाजारासारखा गोंगाट चालू असताना तिथे सायरन वाजवत पोलिसांची गाडी आली अन्‌ पोलिसांनी ताबडतोब गर्दी हटवून परिस्थिती नियत्रंणात आणायला सुरवात केली.

पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि हवालदारांसह एक वरिष्ठ पोलिस अधिकारी लॉकर रूमपाशी आले आणि पुरावे जमा करायला सुरवात झाली. अधिकाऱ्यांच्या आज्ञेवरून दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी त्या भुयारात उड्या घेतल्या आणि हळूहळू वाटेत सापडणाऱ्या वस्तू काळजीपूर्वक गोळा करत ते पुढे पुढे मार्गक्रमण करू लागले. त्या बोळकांडीवजा भुयाराच्या शेवटी असलेल्या भगदाडातून वर आल्यावर, आपण एका कुलूपबंद दुकानाच्या आत आल्याचं आढळल्यावर त्या पोलिस कर्मचाऱ्यांनी जोरजोरात दुकानाच्या (बाहेरून कुलूपबंद असलेल्या) शटरवर गुद्दे मारत, हाकारे घालायला सुरवात केली. त्यांच्याकडे लक्ष वेधलं जाताच लागलीच कुलूप तोडून शटर उघडून त्यांना बाहेर घेण्यात आलं.

सारा प्रकार वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या लक्षात आला होता. अत्यंत नियोजनबद्ध रीतीनं, व्यवस्थित आखणी करून बँकेवर यशस्वीपणे दरोडा घातला गेला होता. फक्त बँकेतल्या सीसीटीव्हीचं फुटेजच नव्हे, तर संपूर्ण इमारतीमधलं तसंच आजूबाजूच्या आणि मागच्या-पुढच्या इमारतीतल्या सीसीटीव्हीचं फुटेज परीक्षणासाठी मागवण्यात आलं. त्या जनरल स्टोअर्सच्या मूळ मालकाला चौकशीसाठी पोलिसांनी बोलावून घेतल्यावर, त्याच्याकडून त्याला ज्यानं भाडेकरू पाहून दिला, त्या जनरल स्टोअर्सच्या बाजूच्याच ऑफिसमधील एजंटचा फोन व पत्ता मिळवण्यात आला. त्या एजंटकडून व त्या जनरल स्टोअर्सच्या भाडेकरूचा करारनामा व पॅनकार्डची झेरॉक्स पोलिसांनी घेतली. पॅनकार्डवर नोंदवलेल्या ‘गेना बच्चन प्रसाद’च्या दूरच्या उपनगरातल्या पत्त्यावर पोलिसांची जीप रवाना झाली. तर त्याच्या मूळच्या म्हणून नोंदवलेल्या झारखंड इथल्या पत्त्यावर त्याच्याविषयी चौकशी सुरू झाली. तपासाअंती हे दोन्ही पत्ते खोटेच असल्याचं आढळल्यावर पोलिसांनी ‘गेना बच्चन प्रसाद’चा फोटो आजूबाजूच्या तसंच मुंबई-ठाण्यातल्या सर्व ठाण्यांकडे पाठवून दिला. यानंतर जागोजागी ‘मोस्ट वाँटेड’ या मथळ्याखाली ‘गेना बच्चन प्रसाद’चा फोटो असलेले पोस्टर्स चिकटवण्यात आले व स्थानिक वृत्तपत्रातून जाहीरातही देण्यात आली.

घटनास्थळी सापडलेल्या वस्तूंमध्ये (खास करून भुयाराच्या आत आढळलेल्या) सर्वांत जास्त, मोठ्या प्रमाणात गुटखा खैनीची पाकिटं आढळली. महाराष्ट्रात गुटख्यावर बंदी असल्यानं दरोडखोर परराज्यातून खास करून उत्तर प्रदेशातून आले असावेत, असा प्राथमिक निष्कर्ष त्या गुटख्यांच्या पाऊचच्या लेबलाच्या निरीक्षणातून पोलिसांनी काढला.

अशा पद्धतीनं दरोडा घालणं हे काही एकट्या-दुकट्याचं काम नसून, कमीत कमी आठ ते दहा जणांचा समावेश असणाऱ्या एका टोळीनं सुसूत्रपणे बँकेला लुटलं आहे आणि एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी ते नक्कीच मोबाईलचा वापर करत असणार हे उमजून पोलिसांच्या टीमनं जवळच्या मोबाईल टॉवरचा कॉलचा डेटा तातडीनं मागवला आणि लाखाहून अधिक मोबाइल नंबर्सची छाननी सुरू झाली.

सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये जरी दरोडेखोरांचे चेहरे सुस्पष्टपणे दिसत नसले तरी आजूबाजूच्या इमारतींच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन गाड्या संशयास्पद रीतीनं भरधाव वेगानं जाताना आढळल्यावर ताबडतोब सर्वच टोलनाक्यांवर त्या गाड्यांचं सविस्तर वर्णन करून राज्याबाहेर पडणाऱ्या सर्वच वाहनांची कसून तपासणी करण्याचा आदेशही पोलिसांकरवी दिला गेला होता.

दरोडेखोरांचा तपास सर्वत्र जारी होता. गेना बच्चन प्रसाद म्हणजेच भवानी सिंह दिसायला अत्यंत सभ्य, सज्जन वाटत होता. याशिवाय त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या सर्वांना त्याचं बोलणं, वागणं नम्र व सुसंस्कृतपणाचं वाटायचं. त्यामुळे पोलिसांनी तो दरोड्याशी संलग्न असल्याचा संशय व्यक्त करताच प्रचंड धक्का बसला होता. पोलिस चौकशीत हादरलेल्या त्या इस्टेट एजंटने गेना ऊर्फ भवानीच्या दोन भाच्यांवरच आपला तीव्र संशय व्यक्त केला. मग पोलिसांनी लागलीच स्केच आर्टिस्टकडून त्या दोन गुंडसदृश्य अशा गेनाच्या भाच्यांचं रेखाचित्र काढून घेऊन सर्व पोलिस ठाण्यांत व खबऱ्यांच्या नेटवर्कमध्ये प्रसारित केलं.
***

दरोड्याची घटना घडल्यानंतर बँकेनं हिशोब करून झालेल्या लुटीच्या रकमेचा अंदाजे आकडा उघड करताच सर्व लोक व प्रसिद्धिमाध्यमांचे सारे प्रतिनिधी थक्क झाले. जवळजवळ १०,५८६ ग्रॅम सोने, ६,३९१ ग्रॅम चांदी, करोडोंचे हिऱ्यांचे दागिने आणि ७०,००० रुपयांची रोकड बँकेच्या लॉकरमधून लुटली गेली होती. बऱ्याच जणांनी आयुष्यभराची कमाई सोन्यामध्ये रूपांतरित करून सुरक्षिततेसाठी लॉकरमध्ये ठेवली होती. (एकट्या बबनरावांचं ५५ तोळं सोनं लुटलं गेलं होतं.) सारेजण मनोमन उद्ध्वस्त झाले होते. त्यातच आरबीआयच्या व भारतीय घटनेच्या नियमानुसार, बँक लॉकरफोडी झाल्यास कोणत्याही प्रकारे कोणास नुकसानभरपाई म्हणून देण्यासाठी कवडीदेखील देय नाही हे समजताच हताश झालेल्या लॉकरधारकांनी भराभर वकिलांकडे धाव घेतली.

पोलिस उच्चाधिकाऱ्यांनी लागलीच एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यामध्ये बँकेचा सुरक्षा व्यवस्थेच्या बाबतीतला गलथानपणा उघड केला. लॉकर रूममध्ये सीसीटीव्ही नसणं, चोवीस तास सुरक्षारक्षक नसणं तसंच ‘बर्गलर्स अलार्म बेल’ नसणं या तीन सुरक्षा व्यवस्थेतला ढिसाळपणा दर्शविणाऱ्या बाबींकडे पोलिस आयुक्तांनी सामान्य जनतेचं व प्रसिद्धिमाध्यमांचं लक्ष वेधलं. या दरोड्यामध्ये सुरक्षिततेच्या बाबतीत बँकेनं हलगर्जीपणा केला असल्यानं पोलिसांनी बँकेविरुद्धही कारवाई करावी, लॉकरच्या भाड्यापोटी भारंभार पैसे घेऊनही लॉकरधारकांचा ऐवज नीट सांभाळू न शकल्यानं संबंधित कर्मचाऱ्यांना अटक करावी, अशी मागणी, फसवणुकीच्या भावनेनं संतप्त झालेल्या लॉकरधारकांकडून केली जात होती. ‘समजा पोलिसांनी त्या दरोडेखोरांना पकडलं आणि यदाकदाचित चोरीला गेलेल्या सोन्यापैकी काही तोळे सोनं परत मिळवलं तरी ते वितळवलेले बार किंवा चिपेच्या रूपातलं सोनं दरोड्यास बळी पडलेल्या तीस लॉकरधारकांना समप्रमाणात कशा प्रकारे वाटणार?’ या मोठ्या प्रश्नावर चर्चा चालली होती.

देशी तसंच विदेशी प्रसिद्धिमाध्यमांकडून या दरोड्याला वारेमाप प्रसिद्धी दिली गेली होती. ‘ग्रेट बँक रॉबरी ऑफ एशिया’ या मथळ्याखाली शतकातला मोठा दरोडा म्हणून नोंदही झाली होती. आता पोलिस या गुन्ह्याची उकल कशी करतील याकडे सर्वांच्या उत्सुक नजरा लागल्या होत्या.

एका दूरच्या पोलिस स्टेशनवरून फोनवर ‘गेना’चं खरं नाव, त्याचा मूळ पत्ता व ‘प्रिझन रेकॉर्ड’मधली माहिती कळताच एक पोलिसांची टीम राजस्थानातल्या त्याच्या गावी घरी भेट देण्यास गेली, परंतु त्याचं निधन झाल्याचं कळताच निराशेनं मुंबईला परतली. त्यांनी गेना ऊर्फ भवानी सिंहचा खासगी मोबाइल नंबर त्याच्या पत्नीकडून मिळवला आणि त्या नंबरचा कॉल डेटा मागवण्यात आला. परंतु त्यामधून काहीही माहिती मिळू शकली नाही आणि शोधपथकात काहीसं निराशेचं वातावरण पसरलं.

दरोड्याच्या वेळी, घटनास्थळी कार्यरत असणाऱ्या साऱ्या सेलफोनच्या ‘डंपडेटा’ची कसून तपासणी करणाऱ्या पोलिसांच्या एका तुकडीला एक संशयास्पद नंबर आढळला. हा नंबर त्या घटनास्थळी काही काळापुरता कार्यरत झाला होता आणि काही क्षणांतच बंद होऊन मग एकदम दरोडा पडल्यानंतर (म्हणजे त्या रात्रीचा नंतर दुसऱ्या दिवशीच्या पहाटे) काही तासांनी पुन्हा कार्यरत झाला होता. आता शोधपथकात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आणि त्या सेल नंबरचा सारा कॉलडेटा मागवण्यात आला. त्या सेल नंबरहून फक्त एकाच नंबरला अधूनमधून पण सातत्यानं कॉल केले गेले होते. त्या मोबाइल नंबरच्या संपर्कात असणाऱ्या व्यक्तीचा पत्ता मोबाईल कंपनीकडून मिळवून, पोलिस नवी मुंबईहून बरेच दूर दुसऱ्या जिल्ह्यातल्या एका आडवस्तीतल्या एका बदनाम वस्तीमधल्या खोलीत पोचले.

दारात पोलिसांना पाहून ती स्त्री प्रथम घाबरली, परंतु त्यामागचं कारण समजताच तिनं तो नंबर आपल्या एका खास व नियमित येणाऱ्या गिऱ्हाइकाचा आहे असं सांगून आपल्या मोबाइल फोनमध्ये सेव्ह केलेली सेल्फीही पोलिसांना दाखवली. आता आणखी एका गुन्हेगाराचा चेहरा पोलिसांच्या नजरेसमोर आला. लगेचच तो फोटो आसपासच्या पोलिस ठाण्यात व खबऱ्यांमध्ये प्रसारित केला गेला.

जरी त्या गुन्हेगारानं खोट्या पॅनकार्डच्या आधारे सेलफोन घेतला असला आणि खोटं नाव-पत्ता नोंदवला असला, तरी त्याची पार्श्वभूमी गुन्हेगाराची असल्यानं कोणत्या ना कोणत्या पोलिस ठाण्याहून त्याची संपूर्ण ‘कुंडली’ मिळू शकेल कारण त्याचा खरा चेहरा उघडकीस आलेला आहे ही पोलिसांची अटकळ अचूक ठरली. प्रथम रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचं सामान उचलणारा उचल्या ते घरफोडी करणारा निर्ढावलेला सराईत असा सारा जीवनप्रवास त्या आरोपीच्या नाव-पत्त्यासह पुढ्यात आल्यावर पोलिसांच्या शोधपथकात आनंदाचं वातावरण पसरलं आणि त्या आरोपीच्या पत्त्यावर साध्या वेशातल्या खास पोलिसांना नजर ठेवायला सांगितलं गेलं. खबऱ्यांनाही दक्ष राहून माहिती काढण्याची सूचना दिली गेली.

(त्या आरोपीचा सेल नंबर काही काळापुरता कार्यरत होऊन एका ठिकाणी बंद झाला होता त्या ठिकाणीही फोटो दाखवून त्याच्याविषयी चौकशीही सुरू केली गेली. पोलिसांजवळ चारजण एका मोठ्या गाडीतून हमरस्त्यावरून हायवेहून मुंबईच्या बाहेर पडले एवढीच माहिती होती. चौकशी सतत चालू होती. तो मोबाइल नंबर सततच्या निरीक्षणाखाली ठेवला गेला होता.)

एके दिवशी शोधपथकाला फोनवरून त्यांना हवी असलेली व्यक्ती आपल्या साथीदाराला ठरलेल्या ठिकाणी एका उंच इमारतीपाशी उशिरानं संध्याकाळी भेटणार असल्याची ‘पक्की खबर’ मिळताच सर्वांच्या उत्साहाला उधाण आलं. त्या इमारतीच्या भोवती साध्या वेशातल्या पोलिसांचं जाळं विणलं गेलं. गोवंडीची ‘खास चौकशी’ चांगली फायदेशीर ठरली होती. खबऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार या दरोड्यामध्ये मिर्झानं साडेआठ लाखांची ‘इन्व्हेस्टमेंट’ केली असल्यानं जास्तीचा वाटा त्यानं स्वतःसाठी ठेवून घेऊन, बाकीची लूट सर्वांमध्ये सारखी वाटली होती आणि लुटीमधलं काही सोनं दूर मुंबईबाहेर विकलं गेलं होतं. यापुढची बोलणी करण्यासाठी या गँगमधले ‘बडे भाई’ सांकेतिक ठिकाणी भेटून मग मुंबईबाहेर पडणार होते. (त्याच्या मते बहुतेक ११ जणांच्या गँगमधील फक्त पाच-सहाजणच मुंबईत होते, तर बाकीचे उत्तर प्रदेश, बंगाल इथं परतले होते.) पोलिसांची तुकडी घाटकोपरमधल्या इमारतीत धडकली.

संध्याकाळ संपून रात्र व्हायला सुरवात झाली. काहीच हालचाल न झाल्यानं एका पोलिस उपनिरीक्षकानं त्या उंच इमारतीच्या पार्किंग लॉटमध्ये जाऊन चूपचाप पाहणी केली असता त्याला सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये दिसलेल्या कारसारखीच एक कार दिसली. त्यानं लागलीच मोबाइलवरून फोटो पाठवून खात्री करून घेतली. तेवढ्यात दुरून दोन माणसं पार्किंग लॉटच्या दिशेनं येताना दिसताच पोलिस आपापल्या जागी दक्ष व सावध झाले.

या दोघांनी गाडीमध्ये शिरून, गाडी पार्किंग लॉटच्या बाहेर काढताच पोलिसांनीही त्यांचा पाठलाग सुरू केला. वाटेत त्या इसमांनी आणखी दोन साथीदारांना गाडीत घेतलं आणि आपला कुणीतरी पाठलाग करत आहे हे जाणवल्यावर एकदम भरवेगात गाडी मुख्य रस्त्यावरून हायवेवर काढली व जोरात ते वाशी टोलनाक्याच्या दिशेनं मोटार हाकू लागले. परंतु टोलनाक्याच्या थोडं आधी त्यांची गाडी अडवून, त्यातील चौघांना जेरबंद करण्यात पोलिस यशस्वी ठरले. पोलिसांनी पकडलेले चौघं दुसरे-तिसरे कोणी नसून या दरोड्यातले मुख्य सूत्रधार मिर्झा बेग व त्याचे अव्वल साथीदार मोईन शेख, श्रवण हेगडे व अंजान मोहेती हे होते.

पोलिसांनी या सर्वांचा पूर्वेतिहास पडताळल्यावर या साऱ्यांनी मिळून फक्त मुंबई, नवी मुंबई इथंच नव्हे, तर पुणे, नागपूर, अमरावती, धुळे या महाराष्ट्रातल्या शहरांत तसंच गुजरात इथल्या अहमदाबाद, बडोदा, सुरत, राजकोट इथं आणि सिल्व्हासा, दमण इथंही घरफोडी, छोटे-मोठे दरोडे घातल्याचं आढळून आलं. हे ‘मोस्ट वाँटेड’ गुन्हेगार हाती आल्यानं उपरोक्त ठिकाणी असलेल्या पोलिसांना आनंद झाला.

हे कसलेले आरोपी कोठडीत अजिबात तोंड न उघडता तपासकामात सहकार्य करत नसल्यानं त्यांच्या तोंडून सारी हकिगत वदवून घेण्यासाठी, पोलिसांनी खास त्यांच्यासाठीच ‘उलवा’ या गावाहून खेकडे मागवले आणि नांग्या काढलेले खेकडे साऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या अंगावर सोडण्यात आले. त्याबरोबर ते निगरगट्ट भीतीपोटी आपल्याजवळची सारी माहिती धडाधड सांगायला तयार झाले.

मिळालेल्या माहितीनुसार कमलेश, शुम्मम यांना उत्तर प्रदेश इथल्या त्यांच्या गावाहून आणण्यासाठी पोलिसांची एक टीम रवाना झाली, तर एका मजुराला अलाहाबाद रेल्वे स्टेशनवर रेल्वे पोलिसांनी धरलं. तसंच भारत-बांग्लादेश सीमेजवळ असलेल्या ‘पंचाली’ गावातून एका आरोपीच्या-शेखच्या- नातेवाइकाकडून ठेव म्हणून ठेवलेलं सोनं जप्त करण्यात आलं. तसंच मूळच्या बांग्लादेशी असलेल्या त्या आरोपीला अटकही झाली.

मिर्झा बेगनं दिलेल्या कबुलीजवाबाच्या व माहितीच्या आधारे जेव्हा पोलिसांनी मालेगाव इथून प्रसिद्ध ज्वेलर ‘राजेंद्र वाघ’ यांना चोरीचं सोनं विकत घेण्याच्या आरोपावरून अटक केली, तेव्हा या बातमीला ‘मोस्ट ब्रेकिंग न्यूज’चा दर्जा मिळून, वर्तमानपत्रातून पहिल्या पानावर फोटोसहित ठळक मथळ्याखाली ती छापली गेली. त्या सोनाराकडून वितळवलेल्या सोन्याचे बार पोलिसांनी जप्त केल्याचं वाचल्यावर ‘आपला लुटलेला ऐवज काही प्रमाणात का होईना परत मिळू शकेल’ असा दिलासा त्या दुर्दैवी लॉकरधारकांना मिळून त्यांना हायसं वाटलं. एकूण लुटल्या गेलेल्या साडेतीन कोटींच्या तुटीपैकी पोलिसांनी अंदाजे दीड कोटीहून अधिक ऐवज परत मिळवला. या ऐवजामध्ये साडेपाच किलो सोनं, ४.१२ ग्रॅम चांदी, बारा लाखांच्या वर रोकड, तसंच चोवीस लाखांच्या चार मोटारी या जप्त केलेल्या गोष्टींचा समावेश होता.

मिर्झानं आपल्याजवळचं सोनं आपली बहीण मेहरुन्निसा ऊर्फ सोनिया हिच्याजवळ ठेवायला दिलं होतं. मिर्झाच्या अटकेची बातमी वाचताच आपल्याजवळचा मोबाइल एका रिक्षात टाकून ती सोन्यासहित फरार झाली होती. (आपला मोबाइल फोन पोलिस पाळतीवर ठेवतील हे जाणून तिनं ही शक्कल धूर्तपणे लढवली होती.) अखेर तिलाही अटक करण्यात पोलिस यशस्वी ठरले आणि तिच्याजवळ असलेलं सोनंही जप्त केलं गेलं.

(पोलिसांनी मुख्य आरोपीपैकी एक संजय कांबळेव्यतिरिक्त जवळजवळ साऱ्यांनाच कोठडीत डांबलं होतं. आगरवाडी इथल्या घराला कुलूपबंद करून ठेवून, सतत पत्ते बदलत फिरत राहणाऱ्या संजय कांबळेला अटक करण्यात बरोबर एका वर्षांनं पोलिसांना यश मिळालं.)

अशा रीतीनं बीबीसीनं ‘स्ट्रेट फ्रॉम ओशन्स इलेव्हन’ आणि ‘सुपीक डोक्यांची करामत’ म्हणून विदेशी प्रसिद्धी माध्यमांनी भरपूर प्रसिद्धी देऊन, सर्व जगात गाजलेल्या या आगळ्यावेगळ्या दरोड्याची उकल नवी मुंबईच्या पोलिसांनी यशस्वीपणे केली. पोलिसांच्या बऱ्याच तुकड्यांनी एकमेकांशी उत्तम ताळमेळ राखून, परस्पर सहकार्य व साहचर्यानं अगदी युद्धपातळीवर घेतलेल्या अविश्रांत श्रमांची ही फलश्रुती होती. त्यांचं हे कर्तृत्व नक्कीच नोंद घेण्याजोगंच आहे!

बँकधारकांसाठी खास माहिती!
१) वर्षाला हजार रुपये अथवा जास्त रक्कम भाड्यापोटी देऊन आणि पन्नास हजार किंवा त्याहूनही अधिक रुपयांचं फिक्स्ड डिपॉझिट काढून आपल्या नावानं बँकेत लॉकर घेण्याची जवळजवळ सर्वच नागरिकांची मनोवृत्ती असते. काही अर्थतज्ज्ञ आणि मानसशास्त्रज्ञांच्या मतानुसार, अगदी साधारण स्थितीतले सामान्य नागरिकही जरी लॉकरचं भाडं महाग वाटलं तरी आवर्जून लॉकर घेतात, कारण आपल्या मौल्यवान वस्तूंच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी बँकेवर असून जर त्या वस्तूंची नुकसानी झाली, तर बँकेकडून आपणास निःसंशय भरपाई प्राप्त होईल, असं सर्वांनाच खात्रीपूर्वक वाटत असतं. परंतु ही समजूत बऱ्याच अंशी चुकीची आहे. लॉकरमध्ये ठेवलेल्या आपल्या मौल्यवान वस्तू शंभर टक्के सुरक्षितच आहेत व त्या गहाळ झाल्या तर त्यांचं मूल्य आपल्याला नक्कीच मिळेल या भ्रमात कोणीही राहू नये. कारण आपल्या नियमावलीत लॉकरसंबंधी कलमात रिझर्व बँकेनं अगदी स्पष्टपणे नमूद केलं आहे की, ‘‘चोरी, दरोडा यांसारख्या घटना घडून जर लॉकर फोडून वस्तू गायब झाल्या असतील तर ग्राहकांच्या लॉकरमधल्या चोरीला गेलेल्या वस्तूंबाबत बँक नुकसानदेय असणार नाही.’’ पुढे असंही नमूद केलं गेलं आहे की, ‘‘पूर, आग, भूकंप आदी नैसर्गिक आपत्ती व युद्ध, अंतर्गत बंडाळी यांसारख्या संकटजनक परिस्थितीत, लॉकरमधल्या ग्राहकांच्या मौल्यवान वस्तूंबाबतची कोणतीही जबाबदारी बँकेवर अजिबात नाही.’’

२) जर बँकेच्या वा कर्मचाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे, गलथानपणामुळे, कामातली त्रुटी यामुळे ग्राहकाच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तू गहाळ झाल्या अथवा नाश पावल्या तर मात्र ग्राहकाला ‘नॅशनल कन्झूमर्स रिड्रेसल कमिशन’कडे तक्रार नोंदवून कोर्टात दाद मागता येते. अशा रीतीनं, कोर्टात बँकेविरुद्ध फिर्याद करून यशस्वी झालेल्या ग्राहकांचीही बरीच उदाहरणं आहेत. यापैकी काही उदाहरणं पुढीलप्रमाणे-

अ) महेंद्रसिह विरुद्ध पंजाब अँड सिंध बँक : मेरठ इथल्या पंजाब अँड सिंध बँकेतलं लॉकर नं. १३१. एका व्यक्तीनं २४ ऑक्टोबर १९९१ ला बँकेच्या स्वाधीन केला. या व्यक्तीनं स्वतःजवळची लॉकरची किल्ली लॉकर विभागाच्या अधिकाऱ्याच्या स्वाधीन केली अथवा नाही याची शहानिशा बँक मॅनेजरकडून केली नाही. (या इसमानं आणखी एक तिसरी किल्ली, डुप्लिकेट चावी बनवून घेतली होती आणि ती त्यानं स्वतःपाशी ठेवली होती.) यानंतर तो लॉकर प्रतीक्षा यादीत असणाऱ्या महेंद्र सिंह व त्यांची पत्नी राजेंद्री देवी यांना देण्यात आला. या लॉकर क्र. १३१ ची १४३ क्रमांकाची एक चावी बँकेपाशी तर दुसरी महेंद्र सिंह यांच्याजवळ ठेवण्यात आली होती.

या लॉकर क्र. १३१ च्या भूतपूर्व मालकानं, रामिंदर सिंह ग्रोव्हरनं २४ नोव्हेंबर १९९७ ला त्या बँकेच्या शाखेत येऊन आपल्याजवळच्या लॉकरच्या किल्लीनं तो लॉकर बेकायदेशीरपणे उघडून, महेंद्र सिंह यांच्या मालकीचे दहा-बारा लाखांचे मौल्यवान दागिने, सोन्याची वळी-नाणी, तसंच चांदीच्या चिपा व भांडी आदी ऐवज लुटून लॉकर पूर्णपणे रिकामा केला.

१० मार्च १९९८ ला महेंद्र सिंह आपला लॉकर उघडण्यासाठी बँकेत गेला असता आपला लॉकर फोडला गेल्याचं त्यांना कळताच अंदाजे २० ते २५ लाखांच्या नुकसानीमुळे त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला. पोलिसी कारवाईनंतर रामिंदरला पकडण्यात आलं, परंतु त्याच्याकडून फक्त लाखभर रुपये आणि २८९.९८ ग्रॅम वितळवलेले सोन्याचे तुकडेच फक्त परत मिळू शकले.

चौकशीमधून २० ऑक्टोबर १९९७ ला रामिंदर याला, त्यानं बँकेकडे लॉकरची चावी हरवल्याची तक्रार केली असल्यानं एक डुप्लिकेट चावी बँकेतर्फे देण्यात आली होती हे उघडकीला आलं. लॉकर सरेंडर केल्यावरही बँकेच्या कर्मचाऱ्यानं रामिंदरसिंह याला लॉकर उघडून दिला. मालकी हक्क नसतानाही एखाद्याला लॉकर उघडून देण्याचा हलगर्जीपणा बँकेकडून घडला. यात पूर्णतया बँकेच्या कर्मचाऱ्याची म्हणजेच बँकेचीच चूक असल्यानं ‘नॅशनल कन्झ्युमर डिस्प्यूट्‌स रिड्रेसल कमिशन’नं बँकेला या घटनेची जबाबदारी पूर्णतया स्वीकारून महेंद्र सिंह यांना नुकसान-भरपाई देण्याचा आदेश दिला.

(वरील घटनेसारखीच घटना मुंबईत १९९१ मध्ये घडली. श्रीमती शेट्टी यांचा पंजाब नॅशनल बँकेतला लॉकर असाच बेकायदेशीरपणे उघडून त्यातले लाखो रुपयांचे दागिने लंपास करण्यात आले. श्रीमती शेट्टी यांनी नॅशनल कमिशनकडे दाद मागितली असता, पूर्णतया बँकेचीच चूक असल्यानं बँकेनं श्रीमती शेट्टी यांना नुकसान भरपाई द्यावी, असा आदेश देण्यात आला.)

ब) १७ जानेवारी २००६ ला याच पंजाब अँड सिंध बँकेच्या पटियाला इथल्या एसएसटी नगर शाखेत चोरट्यांनी अपरात्री जसबीर कौर आणि इंद्रजीत सिंह यांच्या मालकीचा एकतीस नंबरचा लॉकर तसंच श्रीमती ब्रिजवाला व अनिलकुमार यांच्या मालकीचा पंचेचाळीस नंबरचा लॉकर हे दोन्ही लॉकर तोडून आतला मौल्यवान ऐवज पळवला. या दोन्ही जोडप्यांनी हकिगत समजल्यावर लगेचच वेळ वाया न घालवता १८ जानेवारी २००६ ला पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवली. पोलिसांच्या तपासकामातून बँकेनं सुरक्षारक्षक न ठेवल्याचं तसंच सुरक्षा व्यवस्थेसाठी कुठलीही ठोस उपाययोजना न केल्याचं आढळून आलं. बँकेनं निष्काळजीपणा, कर्तव्यात कसूर, कामात हयगय केल्याचं सिद्ध होऊन या दोन्ही जोडप्यांना संपूर्णपणे नुकसानभरपाई देण्याचा आदेश नॅशनल कमिशनकडून देण्यात आला.

क) १८ जुलै १९८८ ला उगमसिंह यांनी आपल्या नव्यानं उघडलेल्या लॉकरमध्ये आपल्या सोन्या-चांदीच्या मौल्यवान वस्तू व दागिने ठेवून लॉकर व्यवस्थित बंद केला व नंतर लॉकरशी संबंधित बँकेच्या कर्मचाऱ्याकडून तो व्यवस्थित बंद केला गेला आहे ना याची खात्रीही करून घेतली.
त्यानंतर ५ डिसेंबर १९९० ला उगमसिंह लॉकरमधून वस्तू काढण्यासाठी स्टेट बँकेत आले असता त्यांना पाहून बँकेचा मॅनेजर उद्‌गारला, ‘‘अरे, हे जर उगमसिंह आहेत तर मागच्या वेळी ज्यांनी लॉकर उघडले ते कोण होते?’’ हे ऐकताच थोड्याशा हादरलेल्या स्थितीत उगमसिंहांनी लॉकर उघडल्यावर त्यांना तो पूर्णतया रिकामा आढळला. उगमसिंहांचं अंदाजे पंधरा लाखांचं नुकसान झालं होतं. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी तसंच मॅनेजरनं हात झटकल्यावर प्रथम पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवून उगमसिंहांनी नॅशनल कमिशनकडे फिर्याद नोंदवण्यासाठी धाव घेतली. पोलिसी चौकशीतून बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या संगनमतानं डुप्लिकेट चावी बनवून लॉकर उघडला गेला आणि रजिस्टरमध्ये याची नोंदही केली गेली नाही असा संशय व्यक्त करण्यात आला. अर्थात ही बँकेचीच चूक असल्यानं उगमसिंहांना नुकसानभरपाई मिळाली.

(अगदी अशीच घटना २००३ मध्ये शिवकुमार यांच्या बाबतीत घडली. युको बँकेतला लॉकर बेकायदेशीरपणे अज्ञात व्यक्तीकडून उघडून लुटला गेल्यावर बँकेचीच चूक असल्यानं नुकसानभरपाई देण्याचा आदेश युको बँकेला देण्यात आला.)

ड) १२ मे १९८७ ला श्रीमती अॅग्नेस डिनेलो व तिची वहिनी यांनी कॅनरा बँकेतल्या आपल्या लॉकरमध्ये आपले सुवर्णालंकार ठेवून लॉकर बंद केला व व्यवस्थित बंद केला असल्याची तपासणीही संबंधित अधिकाऱ्याकडून करून घेतली.
१३ ऑगस्ट १९८७ ला त्यांना कॅनरा बँकेच्या मॅनेजरनं फोन करून त्यांचा लॉकर उघडला गेल्याचं कळवताच त्यांना धक्का बसला. बँकेमध्ये पोचल्यावर लॉकर सताड उघडा असून आतमध्ये काहीही नसल्याचं आढळलं असल्यानं त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी प्रथम पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवून मग नॅशनल कमिशनकडे दाद मागितली. कोर्टात श्रीमती डिमेला यांच्या बाजूनं निकाल लागल्यावर बँकेनं स्टेट कमिशनकडे त्याविरुद्ध अपीलही केलं, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. कॅनरा बँकेला श्रीमती डिनेलो यांना नुकसानभरपाई देणं भागच पडलं.

वरील सर्व उदाहरणांवरून सर्व लॉकरधारकांनी, त्यांचा लॉकर बेकायदेशीरपणे उघडला गेल्याचं व लुटला गेल्याचं आढळल्यावर, सर्वप्रथम पोलिसांत तक्रार नोंदवून मग कायदेशीर उपाययोजना केल्यावर कालांतरानं का होईना नुकसानभरपाई प्राप्त करून घेता येते हे कृपया ध्यानात घ्यावं.

कल्पिता राजोपाध्ये
editor@menakaprakashan.com

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.