Now Reading
दुसरे हौतात्म्य

दुसरे हौतात्म्य

Menaka Prakashan

त्यांनी स्वत:ला कपड्यांसमवेत समुद्राच्या हवाली केलं. लाटांवर झुलताना कपड्याला लागलेली वाळू निघून गेली. वाळूचा कसा स्वभाव आहे नं, चिकटून राहत नाही. नेहमी निसटून जाते. डेव्हिडदेखील त्या वाळूप्रमाणे तिच्या जीवनातून निसटून गेला होता. आता उरली त्याच्या प्रेमात आकंठ बुडालेली ती एकटीच आणि…

मिसेस मॅथ्युजच्या प्रत्येक भेटीच्या वेळचा तिच्या अंगावरच्या कपड्यांचा रंग आता एनीला आवडू लागला होता. आधी एनीला उबल्यासारखं वाटायचं, पण आता तिला मजा वाटू लागलीय. एक तर्‍हेचा खेळच चालायचा रोज…. गेसिंग गेम… आज ती कोणत्या रंगसंगतीत येऊन चकित करेल. परवा पिवळ्या-गुलाबी रंगात भेटली होती. त्या वेळी पिवळ्या-गुलाबी रंगाचा सलवार-कुर्ता घालून संध्याकाळी इव्हिनिंग वॉकच्या वेळी, मिसेस मॅथ्युजनं तिचा रस्ता अडवला होता आणि तिला म्हणाली होती, ‘पस्तीस वर्षांची होत आलीस, आता तरी लग्न कर!’ आणि एनी हसून पुढं निघून गेली. या पिवळ्या-गुलाबी सूटमध्ये मिसेस मॅथ्युज आपल्या छपन्नाव्या वर्षीसुद्धा चांगली दिसते. तिच्या प्रत्येक भेटीनंतर एनी मुथन्ना आंटीकडे जाते. खूप वेळपर्यंत दोघीही लॉनमध्ये शांत बसून राहतात. कधी कधी आंटी एनीचा हात धरून आपल्या मांडीवर ठेवते आणि असंच कितीदा तरी एनी आपलं डोकं आंटीच्या खांद्यावर ठेवते.

आज मिसेस मॅथ्युज चर्चमध्ये भेटली तेव्हा चमकदार लाल स्कर्ट घालून आली होती. आता तिला कोण सांगणार की ती या ड्रेसमध्ये अगदी फनी दिसते. भेटली आणि पुन्हा तोच राग आळवत बसली. ‘अगं बयो, लग्न कधी करणार? लग्न केलंस तर घरात मुलं-बाळं येतील. गॉड सगळं चांगलं करेल!’ ती आणखी काय काय बोलत राहिली. एनीच्या मनात दडलेला सूप्त ज्वालामुखी एकदम जागृत झाला आणि आतला लाव्हा एकदम उसळून बाहेर प्रवाहित झाला. ती म्हणाली, ‘मार्था आंटी आपण, गॅरेंटी घेता का, की मला जे मूल होईल, तो डेव्हिडच असेल? मला केवळ डेव्हिडच हवा, कळलं?’ त्या वेळी आंटी गप्प बसली, पण संध्याकाळी सगळ्या कॉलनीत हलकल्लोळ माजला. आंटीनं तिला थर्ड क्लास आणि असभ्य घोषित केलं. इतकंच नव्हे, तर संध्याकाळी फादरजवळही तिची तक्रार केली. लोकांना तिनं असंही सांगितलं ‘डेव्हिडबाबाला याच पोरीनं बिघडवलं. तो पोरगा तर गॉडसारखा होता.’

खरोखरच गॉडच होता डेव्हिड. अगदी पहिल्यापासून… तो निघून गेल्यानंतर कॉलनीतल्या लोकांच्या नजरेत ती मात्र सैतानासारखी झाली होती. ‘स्त्रीला स्त्री बनून राहण्यासाठी लग्नं करणं किती जरुरीचं आहे?’ हे वर बसलेला डेव्हिड देवाला विचारू शकला तर? तशी आत्तापर्यंत त्याची गॉडशी चांगली दोस्ती झालेली असणार. खूप जमत असेल दोघांचं. त्याला वर जाऊन सतरा वर्षांपेक्षा जास्त दिवस झाले. त्यानं एव्हाना गॉडला पक्का बिअरबाज करून टाकलं असेल. माझ्यासारख्या शांत आणि लाजाळू मुलीला त्या महाभागानं बारावीत असतानाच बियर पाजली होती. गॉड तर एक नंबरचा आवारा आहे.

तो दिवस ती कधी तरी विसरू शकेल का? पावसाळ्याचे दिवस होते ते. मार्चचा महिना. तिची बारावीची परीक्षा झाली होती. अजून रिझल्ट लागायचा होता. डेव्हिडची खडकवासला इथल्या नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमीत निवड झाली होती. जूनमध्ये त्याला आपल्या तीन वर्षांच्या शिक्षणासाठी निघून जायचं होतं. एकमेकांबरोबर घालवण्यासाठी फक्त दोन-अडीच महिनेच शिल्लक उरले होते. किती खूश होता डेव्हिड त्या दिवशी आणि त्याच्या खुशीत सहभागी झालेली तीसुद्धा. डेव्हिडनं आपली बुलेट काढली आणि तो तिला घेऊन जंगलात फेरफटका मारायला निघाला. जंगलात ते खूप आत पोचले. तिथं कुठे तरी त्यानं आपली बुलेट उभी केली. आपल्या बॅग पॅकमधून बिअरचे दोन कॅन बाहेर काढले. स्वत: घेतलीच आणि ती ‘नको नको’ म्हणत असताना तिच्या ओठांचं हळुवार चुंबन घेत तो म्हणाला, ‘घे ना!’ त्या हळुवार मनधरणीनंतर तिला स्वत:ला थांबवणं कसं शक्य होतं? आत्तापर्यंत… होय आत्तापर्यंत ते दोन्ही स्वाद तिच्या मनात दरवळताहेत. ओठांवर डेव्हिडच्या ओठांचा आणि जिभेवर बिअरचा. किती वर्षं झाली बरं… मोजायला गेलं, तर एकवीस वर्षं… होय! एकवीस वर्षंच. सतरा वर्षं कारगीलच्या लढाईलाच झाली. त्या आधी एक वर्षं आय. एम. ए. डेहराडूनचं ट्रेनिंग आणि त्याच्या तीन वर्षं आधी खडकवासला इथल्या नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमीतलं ट्रेनिंग. हो. एकवीस वर्षांच्या वरच. आणि तरीही तो स्वाद अजून तरुण आहे. तसंही स्वादाचं थोडंच वय असतं? डेव्हिडच्या सहवासातला प्रत्येक स्वाद तिच्याबरोबर जगेल आणि तिच्याबरोबरच मरेल नं! या दृष्टीनं पाहिलं, तर प्रत्येक स्वादाचं सरासरी वय काय असेल?
कदाचित डेव्हिड वरून या प्रश्नाचं उत्तर देऊ शकला असता पण तो कसा कुठल्या वयाबद्दल सांगू शकेल? त्याच्या वयाला सुरवात झाली होती, तोवरच त्या दुष्ट देवानं त्याला आपल्याकडे येण्याचा हुकूम बजावला. त्याची एन. डी. ए. मध्ये एक वर्ष उशीरा निवड झाली असती तर… मग कारगीलच्या लढाईच्या वेळी तो कॅडेटच असता आणि त्याला युद्धावर जावं लागलं नसतं.

अजून त्याच्या युनिफॉर्मवर लागलेले लेफ्टनंटचे दोन तारे खांद्यावर नीट बसलेलेही नव्हते. जूनचा तो महिना पुढे येणार्‍या प्रत्येक वर्षासाठी केवढी तरी वेदना घेऊन येतो. आता हा महिना गोराईच्या समुद्रकिनार्‍याची नाही, तर तिरंग्यात लपेटून कॉलनीत आलेल्या कॉफीनची आठवण करून देतो. सतरा वर्षांनंतरही; तिरंग्यात लपेटून कॉलनीत आलेल्या कॉफीनची आठवण दूर सारून, गोराईच्या समुद्रकिनार्‍याची स्मृती जागवणं किती कष्टदायक काम आहे… डेव्हिड हे समजू शकला तर…

कोणता जून होता तो? १९९७ मधलाच नं?.. हो. तोच ९७ मधलाच. डेव्हिड आपल्या चौथ्या सत्रानंतरच्या एक महिन्याच्या सुट्टीत घरी आला होता. एका पावसात न्हाऊन निघालेल्या दुपारी, आपल्या डुगडुगत्या, फर्राटा भरणार्‍या बुलेटवर आपल्याबरोबर तिला घरातून उचलून गोराईच्या किनार्‍यावर घेऊन गेला. आता बाकी सगळं धूसर धूसर होऊन गेलंय. केवळ एकच गोष्ट लख्खपणे मनासमोर उजळतीय. अचानक डेव्हिड आपल्या गुडघ्यांवर खाली बसला आणि तिचा हात हातात घेऊन त्यानं तिला जन्मभर साथ देण्याचं वचन दिलं. ती तेव्हा त्या ओल्या ओल्या वाळूवर केवढी घाबरली होती. प्रथमच पुरुष आणि प्रकृतीबरोबर एकटी. अजब-गजब अशी अनुभूती. त्या ओल्या वाळूवर दोन्ही कानशिलांचं गरम होणं आणि ती हृदयाची धडधड. त्या ओल्या वाळूच्या स्मृतीत एवढं काय आहे कुणास ठाऊक! इतक्या वर्षांनंतरही त्याच्या आठवणीनं कानशिलं एकदम गरम होतात आणि हृदयात धडधड होऊ लागते. ‘ओ डेव्हिड, कुठे आहेस तू?’ सगळ्या कपड्यांना वाळू लागून ते घाण झाले होते. आता अशा कपड्यांनी घरी जाणं म्हणजे डॅडींशी खोटं बोलणं आणि मम्मीचे नकोसे प्रश्न झेलणं. मग त्यांनी स्वत:ला कपड्यांसमवेत समुद्राच्या हवाली केलं. लाटांवर झुलताना कपड्याला लागलेली वाळू निघून गेली. वाळूचा कसा स्वभाव आहे नं, चिकटून नाही राहत. नेहमी निसटून जाते. डेव्हिडदेखील त्या वाळूप्रमाणे तिच्या जीवनातून निसटून गेला होता. किती तरी वचनं घेऊन डेव्हिड एन. डी. ए.त आपलं ट्रेनिंग पूर्ण करण्यासाठी निघून गेला. आज, त्याच शपथा ती निभावते आहे. बस! रंगी-बेरंगी कपड्यात रोज रोज भेटणार्‍या या टोळ्या… त्यांना काय माहीत असणार हे सगळं! आता एवढंच आहे की ज्या जून महिन्याबद्दल तिला अतिशय प्रेम वाटायचं, त्या जून महिन्याबद्दल, १९९७ नंतरच्या जूनपासून तिला अतीव तिरस्कार वाटू लागलाय.

एन. डी. ए.त पोचल्यानंतर किती छान पत्र पाठवलं होतं त्यानं… ब्रायन अ‍ॅडम्सच्या त्या सुरेख गाण्याला आपले शब्द देत त्यानं लिहिलं होतं… ‘समर ऑफ नाइंटी-सेवन …’ गिटार वाजवणारा डेव्हिड… ब्रायन अ‍ॅडॅम्सच्या सुप्रसिद्ध गीताची नक्कल करत होता…
‘ओ… आय गॉट माय फर्स्ट रिअल सिक्स स्ट्रिंग
बॉट इट अ‍ॅट फाईव्ह अँड डाइम,
प्लेड इट टिल माय फिंगर्स ब्लेड,
वाज द समर ऑफ सिक्स्टी नाईन..’
(मला माझी पहिली गिटार मिळाली…जी मी पाच डॉलर आणि एक डाईम देऊन खरीदली होती… १९६९ चा ग्रीष्म ऋतू होता तो…त्या वेळी मी ती गिटार जोपर्यंत माझ्या बोटातून रक्त निघालं नाही तोपर्यंत वाजवली.)

जेव्हापासून तो गेला, तेव्हापासून या सतरा वर्षांत कुठंही हे गाणं लागलं, तरी घरातल्या सगळ्यांचेच डोळे डबडबतात. मग ते डॅड असू देत, अँटनी आणि अनेकदा ममाही डोळे पुसत राहते. अँटनी तर अनेकदा नकळत डेव्हिडच्याच शैलीत जेव्हा-तेव्हा हे गीत गातो. त्याला वाटतं, तिच्या काही लक्षात येणार नाही पण त्याची एक एक लकब, हालचाल तिच्या श्वासात भरून राहिलीय, तिच्या लक्षात कसं येणार नाही? कितीदा तरी चिडून अँटनीला रागवावं असं तिच्या मनात येतं पण ती प्रत्येक वेळी स्वत:ला सावरते. कंबाईंड डिफेन्समध्ये शेवटची संधीही तो साधू शकला नाही. आता तर तो ओव्हर एज झालाय. किती विझल्या विझल्यासारखा असतो. डॅडची पण इच्छा होती, की त्यांची परंपरा निदान अँटनीपर्यंत तरी शाबूत राहावी. ते स्वत: कर्नल पदावरून निवृत्त झाले. मुलगा निदान ब्रिगेडियरपर्यंत जाईलच, असा विचार करत राहिले. मुलीबाबत ते निश्चिंत होते. डेव्हिडसारखा कर्तबगार साथीदार तिला मिळाला होता. एन. डी. ए.च्या रिझल्टची यादी बाहेर पडली, तेव्हा ते किती खूश होते. डेव्हिड टॉप टेनमध्ये होता. दोघांच्या संबंधाला त्यांची मूक संमती त्याच दिवशी मिळाली होती. पण डॅडचं तरी नशीब असं… आताही तिला आठवतंय, आपले अश्रू रोखून डेव्हिडचं कॉफिन त्यांनी आर्मी ट्रकमधून उतरवलं होतं. काश्मीरहून स्वत:च तर ते घेऊन आले होते. डेव्हिडचे मम्मी-पापा, मुथन्ना आणि आंटी यांना दिवसभर सांभाळत राहिले आणि घरी आल्यावर एनीला धरून रात्रभर केवढे तरी रडले. डॅडींच्या डोळ्यात पहिल्या प्रथमच ती अश्रू बघत होती. ती तेव्हा आपले स्वत:चे अश्रू विसरूनच गेली होती.

अगदी कळायला लागल्यापासून, मेजरपासून कर्नल होईपर्यंत तिनं आपल्या डॅडींना मोठमोठ्यानं हसताना तरी पाहिलं होतं किंवा मग गंभीर विचारात गढून गेलेलं पाहिलं होतं. डॅडचा मृत्यूदेखील कदाचित त्या दिवसापासून हळूहळू जवळ येऊ लागला होता. नाही… त्या दिवसापासून नाही… कदाचित त्यानंतर तीन महिन्यांनी. त्या दिवशी त्यांचे फौजी फर्मान घेऊन आणखी एक हौतात्म्य आलं होतं. त्यानंतर आपल्या लाडक्या मुलीकडे पुन्हा त्यांनी कधी डोळे वर करून बघितलंही नाही. त्यांना काही प्रमाणात तरी अपराधीपणाची भावना जाणवत असणार. त्या फर्मानांनंतर त्यांची पोस्टिंग जोशीमठला झाली आणि ते तिला न भेटता गुपचूप निघून गेले.

त्यानंतर जवळ जवळ वर्षभर डॅडींशी फोनवरसुद्धा बोलणं झालं नाही. मग एक दिवस अचानकच त्यांनी ममाबरोबर आपल्याला आपल्याजवळ बोलावून घेतलं. जबरदस्तीनं. कदाचित मनानं दूर गेलेल्या मुलीला पुन्हा आपल्या जवळ आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता. अँटनी आपल्या सी.डी.एस. परीक्षेच्या तयारीत व्यग्र होता त्यामुळे तो येऊ शकला नाही. बस-स्टँडवर फौजी जिप्सी घेऊन डॅडी स्वत:च न्यायला आले होते. तेव्हा ते आपल्या लाडक्या मुलीच्या नजरेला नजरही देऊ शकले नव्हते. एनीला मात्र वाटत होतं, मागचा सगळा आक्रोश विसरून डॅडींच्या गळ्यात पडावं. बस-स्टँडपासून जोशीमठ आर्मी बेस कँपचा रस्ता इतका वळणदार, भोवर्‍याच्या फिरण्यासारखा होता, की एनीला रस्ताभर उलट्या होत होत्या. केवढी थंडी होती. ओह! हाडं गोठल्यासारखी झाली होती. लाकडांनी बनलेल्या त्या छोट्याशा आर्मी गेस्ट हाऊसच्या भिंती बर्फानं पूर्णपणे झाकलेल्या होत्या. उघडे-बोडके पर्वत, अरुंद दर्‍या, खोल खड्डे, आणि बर्फाच्छादित उंच पर्वत शिखरं.

अशाच एका बर्फानं झाकलेल्या पहाडावर डेव्हिड, शत्रूच्या घेर्‍यात एकटाच फसला होता. गोळ्यांनी शरीराची चाळण झालेला तो, शुभ्र बर्फावर कसा पडला असेल? असं ऐकलंय की वर्दीतून वाहणारं रक्त सरहद्दीवर हिरवं होऊन पडतं आणि वर्षानुवर्षं थंड बर्फात तसंच राहतं. एनीच्या अनेकदा मनात यायचं की डॅडना म्हणावं की एकदा तरी तिला, डेव्हिड घायाळ होऊन पडला होता, तिथे घेऊन चला. तिथलं थोडंस बर्फ ती गोळा करून घेऊन येऊ इच्छिते आणि सांभाळून ठेवू इच्छिते. पण डॅडशी अद्याप बोलणं कुठे होतंय? अनेकदा तिला त्यांची कीवही वाटते. त्यांची दया येते. त्यांनी जे काही केलं, ते आपल्या लाडक्या लेकीच्या भल्याचा विचार करूनच केलं. पण इच्छा असूनही आपल्या डॅडींना ती माफ करू शकत नाही. सरहदीवर दुश्मनांशी बहादुरीनं सामना करणारे डॅड, समाजाच्या रिवाजाच्या उंबरठ्यावर कसे कमजोर पडले?

वरून बघताना डेव्हिडला काय वाटलं असेल? त्याला तर कल्पनाही नसेल की तो त्याचा अंश एनीजवळ सोडून आलाय आणि जरी त्याला माहीत असतं, तरी त्यानं काय केलं असतं वरून? डॅडींच्या हुकमाची अंमलबजावणी न करणं इथं एनीला जमिनीवर राहून शक्य नव्हतं, तसा डेव्हिडदेखील वर गॉडजवळ विवशच असणार. असेच कसले कसले प्रश्न एनीच्या मनात उठत. समजा डेव्हिड इथं जिवंत असता, तर त्यानं या प्रसंगी कोणता निर्णय घेतला असता? तो विरोध करू शकला असता? तो, मुथन्ना अंकल-आंटीचा एकुलता एक आदर्श मुलगा, कॉलनीतला आदर्श मुलगा आणि मिल्ट्री अ‍ॅकॅडेमीचा आदर्श कॅडेट होता.

जोशीमठच्या कॅम्पमध्येच ‘इंडियन मिल्ट्री अ‍ॅकॅडमी’मधून नव्यानंच आलेले तीन लेफ्टनंट भेटले. छोटे छोटे कापलेले केस… अगदी लहान मुलांसारखे दिसत होते. अ‍ॅकॅडमीत डेव्हिडला ते ज्युनियर होते. सारखं म्हणायचे, ‘डेव्हिडसर असे होते… डेव्हिडसर तसे होते.’ दिवसभर ते सगळे एनीच्या मागे ‘मॅम मॅम’ म्हणत असायचे. त्यांनी अ‍ॅकॅडमीत डेव्हिडच्या खोलीत तिचा मोठा फोटो टांगलेला पाहिला होता. एनीला वाटायचं, किती मोठ्या झालो आहोत आपण! डेव्हिड तिला नेहमी ‘लिटिल डॉल’ म्हणायचा. ती आपली गुपचूप त्यांच्याकडे टक लावून बघत त्यांचं बोलणं ऐकत रहायची. एक दिवस जिद्दीनं ममाशी हट्ट करून ती पुन्हा आपल्या शहरात, आपल्या कॉलनीत परत आली. डॅडनी गुपचूप तिला बसमध्ये बसवून दिलं. परत येताना तिला हिमालय जळताना दिसला. डोळे राखेप्रमाणे मृत होते. डोक्यावर बर्फाची टोपी ठेवलेली होती. हिमालयाला जसा काही ताप चढला होता. सरहदीला नेहमीच स्वत:चं असं रहस्य असतं. एक तर ती तीर्थ बनते किंवा मग यद्धभूमी!

… आणखी एक युद्धभूमी त्या दिवशी, घराच्या उंबरठ्यापासून डॅडचे जोधपूरचे दोस्त डॉ. सुदीप अंकलच्या नर्सिंग होमपर्यंत बनली होती. डेव्हिड अनंतात विलीन झाल्यानंतर केवळ तीन महिन्यांनी… तेव्हा कारगीलच्या बर्फाळ उंचीवर शेकडो हुतात्म्यांचं बलिदान घेऊन युद्ध थांबलं होतं आणि लोक मीडियाच्या कथित बहादूर ‘लाईव्ह कव्हरिंग’ला कंटाळून, सगळं काही विसरून आपापल्या दिनचर्येत रमून गेले होते… त्याच दिवसांत आणखी एक आघाडी एनीच्या घरात उघडली गेली. त्याचा पाया डेव्हिड जेव्हा आय. एम. ए.हून आपलं ट्रेनिंग यशस्वरीत्या पूर्ण करून आला होता आणि त्याच्या खांद्यावर लेफ्टनंट रँकच्या दोन चांदण्या चमकत होत्या, त्या दिवशी घातला गेला होता.

‘लेफ्टनंट डेव्हिड मुथन्ना रिपोर्टिंग मॅम!’ कडक सॅल्यूट मारून एकदम चकितच केलं होतं त्यानं. आपल्या त्या नीटस युनिफॉर्ममध्ये किती देखणा नि रुबाबदार दिसत होता डेव्हिड. ओह!! किती खुश होते सगळे. कॉलनीत दररोज सेलिब्रेशन होत होतं. त्या वेळी कुठे माहीत होतं, की शेजारच्या देशाद्वारे तिकडे युद्धाची रेषा आखली जाते आहे. सुखद अशा मे महिन्याचे ते शेवटचे दिवस होते. अशाच एका सेलिब्रेशननंतर …
तार्‍यांनी चमकणार्‍या त्या रात्री नशेत बुडून गेलेला डेव्हिड आणि त्याच्यात बुडून गेलेली ती… बुडतच चालले होते एकमेकांत. तिला तर केव्हा काय झालं, कळलंच नाही. काही तरी असं होतं, जे आत्तापर्यंत अज्ञात होतं, अस्पर्शित होतं. पण खूप खूप आपलंसं होतं. मग शुद्धच कुठे राहिली?
दुसर्‍याच दिवशी आदेश आला, सर्व सैनिकांची सुट्टी रद्द. सगळ्यांनाच आपआपल्या ड्युटीवर जायला हवं होतं. डेव्हिडही गेला. डेव्हिड गेला आणि काही दिवसांतच परतला. परतला तो तिरंग्यात लपेटून. शरीरातला कण न् कण आक्रोशत असताना लक्षातच आलं नाही की या महिन्याची पाळी आला नाही. शुद्धीलाच शुद्ध नव्हती, तर पाळीची काळजी कोण करणार? आणि मग सप्टेंबरच्या त्या अपशकुनी दुपारी घरात जसं काही तूफान आलं. त्या दिवशी तिला जाणीव झाली की तिच्या पोटात एक तान्हा डेव्हिड वाढू लागलाय. ममा आणि डॅडींच्या पुढे तिनं सांगून टाकलं की त्या छोट्या डेव्हिडला ती जन्म देईल. घर तर त्यामुळे डळमळलंच, पण डॅडींच्या ओरडण्यानं आसमंतसुद्धा थरकापून उठला. ओरडताना डॅडींनी अ‍ॅबॉर्शनचं फर्मान जाहीर केलं आणि स्वत: मैदान सोडून जोशीमठला पळून गेले. एकदासुद्धा त्यांनी तिचा विचार केला नाही का? ती तर सैनिकाची मुलगी होती. लढणं तिला माहीत होतं. पोटाच्या असीम खोलात वाढणारा अनपेक्षित पाहुणादेखील एका शूर सैनिकाचाच अंश होता, पण डॅड भित्रे निघाले. लोक आपल्या लाडक्या मुलीला ‘कुमारी माता’ म्हणून टोचून खातील, या विचारांनी कर्नल साहेब घाबरले. ममाला आपला निर्णय सांगून ते आपल्या ड्युटीवर निघून गेले.

नंतर त्या कॉलनीपासून, ओळखीच्या, नात्या-गोत्याच्या लोकांपासून ममा तिला दूर घेऊन गेली. सभ्य समाजाला या गोष्टीची कुणकुणही लागू नये, अशी तिनं काळजी घेतली. राजस्थानच्या त्या रेताड शहरात ममा घेऊन गेली. रेतीच्या त्या अथांग समुद्रात कुठल्याही पाऊलखुणा न ठेवता एनी आपल्या देहाच्या गाभ्यातल्या छोट्या जिवाला सांभाळत प्रवासाला निघाली. कितीदा वाटलं ममाच्या या बंदीखान्यातून बाहेर पडावं आणि रेतीच्या एखाद्या टेकाडामागे लपून बसावं. जोपर्यंत तान्हा जीव तिच्या शरीरातून बाहेर पडून स्वत:चं शरीर बनवत नाही, तोपर्यंत त्या टेकाडामागेच लपून बसावं. पण जे मनात येतं, ते आपण नेहमीच कुठे करू शकतो? वाळवंटाच्या त्या चमचमत्या शहरात डॉ. सुधीर अंकलच्या आलिशान प्रायव्हेट नर्सिंग होममध्ये संधिप्रकाशात बुडून गेलेला तो शल्यकक्ष डेव्हिडच्या दुसर्‍या हौतात्म्याचा वधस्थळ बनला. चार महिन्यांपूर्वी डेव्हिड, दुश्मनांनी घेरलेल्या तुकडीपुढे आपला जीव गमावून बसला. आता चार महिन्यांनंतर दुसरा डेव्हिड आपल्याच घरात बसलेल्या दुश्मनांच्या कात्रीची शिकार झाला. एक हास्यविभोर जीवन कारगीलच्या युद्धभूमीवर ढासळलं, दुसरं हसण्यासाठी, किलबिलण्यासाठी आतुर जीवन दोन पायांच्यामध्ये तुकडे तुकडे होऊन वाहून गेलं.

डेव्हिडचं हौतात्म्य सगळ्यांनी पाहिलं. त्याचं कौतुक केलं. देशातल्या सगळ्या चॅनेल्सनं त्याला हीरो बनवून त्याची पूजा केली. त्याच्या हौतात्म्यानंतर त्याला सन्मानित केलं गेलं, त्याला मरणोत्तर शौर्य पुरस्कार दिला गेला. राष्ट्रपतींच्या हस्ते चमचमतं मेडल दिलं गेलं. पण त्या पोटातल्या डेव्हिडचं हौतात्म्य…? ते तर सांगितल्याविना, लिहिल्याविना तसंच राहिलं. त्याच्या अस्तित्वाची जाणीवच कुणाला नव्हती. ऐकलंय की, डेव्हिडनं शत्रूच्या गोळ्यांची बरसात आपल्या चेहर्‍यावर आणि आपल्या छातीवर झेलली. क्षणार्धात त्याला वीरगती प्राप्त झाली. त्याला कुठल्याही वेदनेची जाणीव झाली नाही. पण त्याच्या हौतात्म्याचं दु:ख घेऊन एनी अजूनही आक्रोशते आहे. आता तर दुसर्‍या हौतात्म्याच्या वेदनाही घेऊन तिला फिरावं लागतंय. राष्ट्रपतींच्या हस्ते डेव्हिडला मरणोत्तर पदक मिळणार होतं, तेव्हा ती किती व्याकूळ झाली होती. त्या समारंभात जाण्यासाठी तिची तडफड होत होती. पण जगाच्या दृष्टीनं ती डेव्हिडची कुणीच नव्हती. कशी जाणार? आपल्या घरच्या ड्रॉइंगरूममध्ये बसून अश्रूंच्या महापुरात स्वत:ला बुडवून घेत तिनं तो भव्य समारंभ पाहिला. मुथन्ना आंटी राष्ट्रपतींच्या हातून पदक घेताना हुंदके देऊन देऊन रडत होती. किती हृदयद्रावक दृश्य होतं ते!

एनीला किती तरी वेळा वाटतं, की जाऊन मुथन्ना आंटीला या दुसर्‍या हौतात्म्याबद्दल सांगून टाकावं आणि या दुसर्‍या हौतात्म्याबद्दल तिच्याकडून मेडल मागून घ्यावं. आज पण ती तिथं गेलीय पण नेहमीप्रमाणेच आंटीबरोबर गुपचूप लॉनमध्ये बसून राहिलीय. आज आंटीनं नेहमीप्रमाणे तिचा हात धरून मांडीवर ठेवला नाही. तिला डेव्हिडचा युनिफॉर्म घातलेला फोटो नि:शब्दपणे न्याहाळताना बघून एनीचा हात नकळत आपल्या पोटावरून फिरू लागला.

मूळ कथा : दूसरी शहादत । लेखक : गौतम राजऋषि
अनुवाद : उज्ज्वला केळकर

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.