Now Reading
दुर्गाबाई भागवत शब्दांचा प्रपंच सांभाळणारी संन्यासिनी!

दुर्गाबाई भागवत शब्दांचा प्रपंच सांभाळणारी संन्यासिनी!

Menaka Prakashan

साहित्ययोगिनी म्हणावं असं दुर्गा भागवतांचं व्यक्तिमत्त्व! दुर्गाबाईंची कितीतरी रूपं मी जाणिवेनं अवलोकिली. पुस्तकातून लेखिका म्हणून भेटणार्‍या दुर्गाबाईंपासून ‘आणीबाणी’त लेखन स्वातंत्र्यासाठी झगडणार्‍या रणदुर्गा दुर्गाबाई! ग्रंथालयात वाचणार्‍या, व्याख्यात्या, संपादकांशी चर्चा करणार्‍या, ‘आकाशवाणी’त ध्वनिमुद्रणासाठी आलेल्या, अशी अनेक रूपं!
पण इतक्या जवळ जाऊनही ते तेज पेलून संवाद मनातच राहिला त्याही दुर्गाबाई! एका अनाम नात्याचा हा शब्दबंध!

‘ऋतुचक्र’मधून प्रत्येक ऋतूचं महाकाव्य तरलतेनं व्यक्त करणार्‍या दुर्गा भागवतांमध्ये ‘स्व’त्वाचा अंगार व्यक्त करणारी साक्षात ‘दुर्गा’ अनुभवण्याची भाग्यशाली वर्षं मला लाभली. एरवी पाठ्यपुस्तकापुरत्याच वाचलेल्या दुर्गाबाई आणीबाणीच्या काळात लेखणीच्या मोकळ्या श्‍वासासाठी किती प्राणपणानं मुठी आवळून लढत होत्या, ते मी माझ्या ऐन सतराव्या-अठराव्या वर्षी अनुभवलं. आणि यानंतर ‘दुर्गा भागवत’ हे नाव माझ्यापुरतं केवळ एक लेखिका-विचारवंत एवढंच उरलं नाही; तर स्वाभिमान, अस्मिता यांचा मूर्तिमंत ‘दीपस्तंभ’ ठरलं. दुर्गाबाईंना मी अधिक जाणून घेतलं ते त्यांना प्रत्यक्ष पाहिल्यानंतर.

पंच्याहत्तर-शहात्तर साली लेखन पारतंत्र्याविरुद्ध ‘भूमिका’ घेणारे मराठी साहित्यिक तुरळक होते. होते तेही आपली ही भूमिका कुणाला कळू नये याची काळजी घेणारे. त्यातले काही नामवंत पु. भा. भावे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात आयोजिलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात. पण ते नाट्य-काठावरून पाहणारा, अचंबित होणारा विद्यार्थी- हेच माझ्या कुतूहलाचं स्वरूप होतं. साहित्य क्षेत्रातल्या त्या वेळच्या दिग्गजांचे मुखवटे आणि चेहरे जाणून घेणं-न घेणं, त्यातलं कवडसं टिपणं, निसटणं असंच ते अपरिपक्व उत्सुकतेचं आयुष्य होतं.

त्याच सुमारास कराड इथल्या साहित्य संमेलनात पु. ल. देशपांडे यांच्याकडे सूत्रं सोपवताना दुर्गा भागवतांनी केलेलं भाषण व शासनातल्या मंडळींना दाखवलेली त्यांची ‘जागा’ यामुळे बातमी वाचतानाही रोमांचक वाटे. लगोलग पु.लं.ची ‘विचारांची नसबंदी करू नका’ अशी ठणकावणारी भाषणं आणि लेखन स्वातंत्र्यासाठी घेतलेली उघड भूमिका यामुळे पंचाहत्तर ते सत्त्याहत्तर ही वर्षं माझ्यासाठी ‘एकोणीसशे बेचाळीस’सारखी क्रांतिकारक वर्षं होती.
मी ज्या महाविद्यालयात शिकत होतो, तिथं अचानक आमचे मराठीचे प्राध्यापक डॉ. म. पु. केंदुरकर यांना झालेली अटक, त्यांच्या नेतृत्वानं महाविद्यालयाच्या प्रांगणात दुमदुमलेल्या घोषणा- हे सारं काय घडतंय हे न उमजण्याच्या वयात एक बातमी थडकली. ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या गच्चीवर साक्षात दुर्गा भागवत यांचं भाषण आहे आणि विषय अर्थातच लेखणीवर घातलेल्या बंधनाविरुद्ध त्या बोलणार हे उघडच होतं.

सगळं सविस्तर सांगण्याचं कारण हे की, काही वेळा नातं प्रत्यक्ष भेटीतून घडतं, तर क्वचित प्रत्यक्ष न झालेल्या भेटीतूनही त्या तेजोवलयाच्या कठड्यावर उभं राहून आपली व त्या व्यक्तिमत्त्वाची मनाची गाठ जुळते. दुर्गा भागवत यांच्याबाबत तसं घडलं.
वादळाचा एक तेजोमय झंझावात घेऊन येणार्‍या दीपशिखा रूपातच मी त्यांना अगदी प्रथम पाहिलं. उसळलेल्या प्रचंड गर्दीनं गच्चीच काय, तिन्ही मजल्यांचे जिने, कठडे ओसंडून भरले होते नि दोन्ही बाजूला पोलिसांनी कडं केलेल्या नि मधून धीरोदात्त चालत, मध्येच क्षणभर थांबून छायाचित्रकारांना ‘क्लिक्’ करण्यासाठी पुरेसा अवसर देत व्यासपीठाकडे निघालेल्या दुर्गा भागवतांना धडधडत्या अंतःकरणानं मी पाहतच राहिलो.
साधेपणाही उंची वाटावी, इतका साधेपणा. नऊवारी साडी, शुभ्र सुती ब्लाऊज, ताठ कणा, दमदारपणे चालणारी देहयष्टी, डोळ्यात निळसर-हिरवट घारेपण नि त्यात तीव्र, भेदक करारीपण! पहिल्या रांगेत घुसून मी दुर्गा भागवतांचं, केव्हाही अंगार उसळेल असं भाषण अनुभवलं. दुसर्‍या दिवशी त्याच भाषणाच्या मथळ्यांनी गजबजलेली वृत्तपत्रं वाचताना, आपण हे सारं कालच ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवलं याचाच थरार होता. वक्तृत्व असं प्रभावी नव्हतं, पण त्यात जी निर्भयतेची ज्वाला होती, त्यामुळे ते शब्द ठिणग्यांच्या प्रवाहात वाहून नेणारे होते.

याच त्यांच्या प्रथम दर्शनानंतर खर्‍या अर्थानं मी एका भारावल्या संवेदनांनी दुर्गाबाईंचं मिळेल ते लेखन वाचत सुटलो. ‘व्यासपर्व’नं मला महाभारताकडे बघण्याची दृष्टी दिली. ‘पैस’मधल्या लेखनानं ललित लेखांना मिळालेला वैचारिकतेचा वेगळा आयाम चिंतनाची वेगळी डूब देऊन गेला. ‘पैसाचा खांब’ हा पहिलाच लेख मी इतक्या सखोल जाणिवेनं वाचला की पुढे नेवासे इथं गेल्यानंतर दुर्गाबाईंचा तो लेख माझ्या मनात पथदीप होऊन प्रत्यक्ष ‘पैस’ उजळत होता.
दुर्गाबाईंच्या स्पष्टवक्तेपणाच्या, करारी स्वभावाचे किस्से आपापसांत सांगताना रुचीनं ऐकणं हा माझा विद्यार्थिदशेतला एक उद्योगच झाला होता. त्यांच्या लेखनाइतकाच त्यांच्या व्यक्तिमत्त्वानंही मी भारून गेलो होतो. घरातली ‘आजी’ वाटणारी ही साधी बाई अशी लेखणी व वाणीची रणरागिणी आहे- या दोन गोष्टी एकत्र आणणं मला शक्य होत नव्हतं. त्याच काळात म. टा. मध्ये पु.लं. व दुर्गाबाई यांचा वैचारिक वाद वाचणं, त्यात जयवंत दळवी यांनी उडी घेणं, लेखकांनी शासन पुरस्कार परत करणं अशा अनेक गोष्टींतून दुर्गाबाई पुन्हा पुन्हा कुतूहलाचा व त्यांच्याविषयी अधिक जाणून घ्यावं या औत्सुक्याचा विषय होत असत.
आमच्या ग्रंथपालांनी – ह. श्री. परांजपे यांनी- मला सांगितलं, ‘तुला एवढं वाटतं त्यांच्याबद्दल तर त्यांना जाऊन भेटत का नाहीस? एशियाटिक लायब्ररीत त्या नियमानं वाचायला बसतात.’

मला एवढा धागा पुरेसा होता. आणि संधीचा स्वर्ग गाठायला तो सोडायचा नाही, एवढा चिवटपणा अंगीभूत होता. ‘युवावाणी’तलं रेकॉर्डिंग उरकून मी चालत एशियाटिक लायब्ररीपर्यंत आलो. त्या प्रचंड ग्रंथालयाच्या विस्तीर्ण पायर्‍याच पाहून मी थबकलो, पण धीरानं त्या चढून गेलो व प्रवेशद्वारातच विचारलं, ‘दुर्गाबाई भागवत यांना भेटायचं आहे. कुठे असतात त्या?’
एका टेबल-खुर्चीजवळ त्या गृहस्थांनी मला नेलं, पण त्या दिवशी ‘आल्या नाहीत’ हे कळलं. मी दुरूनच त्यांचं टेबल-खुर्ची न्याहाळलं.
पण आदर आणि ओढीचा माझा चिवटपणा सतत जागा राहिला. एकदा मी म. टा. मध्ये माझ्या सदराचा लेख द्यायला गेलो असताना अचानक थबकलो. दुर्गा भागवत गोविंदराव तळवलकरांशी बोलत होत्या. काचेपलीकडून दोन समुद्रांचं हितगूज सुरू असताना बघणं हा माझ्या श्रद्धाळू लेखक वयातला सोहळा होता. पुढे म. टा.त मी त्यांना लेखन आणण्याच्या निमित्तानं पाहिलं, पण त्या इतक्या वेगानं निघून जात की, ‘पैस, डूब, जातककथा, ऋतुचक्र, दुपानी’ मी वाचलंय हेही सांगण्याचा धीर मला झाला नाही. धीर एकवटून मी पुढे जायच्या आतच त्या खूप पुढे निघून गेलेल्या असत. त्यांची गती पकडणं, त्यांना गाठणं हे आवाक्यापलीकडचं आहे हे कळत होतं.
मग अचानक न बोलून त्यांना भारावून ‘बघत’ राहण्याचा आणखी एक ‘अचानक’ योग आला.
‘आकाशवाणी’त माझं रेकॉर्डिंग असो-नसो, सहजही जाऊन भेटीगाठींचा माझा आवडता छंद होता. त्या छंदामुळे किती दिग्गज दीपस्तंभांना अगदी जवळून पाहू शकलो. त्याचाच एक वेगळा लेख होईल. पण त्या छंदिष्ट भेटीतच, भाषण विभागाचे प्रमुख आणि विख्यात ललित लेखक रवींद्र पिंगे मला म्हणाले, ‘वेळ असेल तर थांब. भाषण ध्वनिमुद्रित करायचंय. दुर्गाबाई येत आहेत.’

See Also

माझ्यासाठी ही चालून आलेली पर्वणी होती. थोड्याच वेळात दुर्गाबाई भागवतांच्या रूपानं स्वप्नाचं भाग्य चालत आलं. त्यांना केवळ नमस्कार करू शकलो आणि मग त्यांचं ते एकेक कागद समोर ठेवून धीम्या लयीतलं भाषण ऐकलं. एकाच ‘टेक्’मध्ये सारं भाषण ध्वनिमुद्रित झालंही. नेमका मजकूर आठवत नाही, पण निसर्ग आणि नवनिर्मिती याबाबत काहीसा असावा. रवींद्र पिंगे आणि दुर्गा भागवत यांच्या औपचारिक गप्पांत तसा मी ‘उगीचच’ श्रद्धेनं ओथंबलेला पण तसा तिर्‍हाईतच.
काय असेल ते असो, जिवलग वाटणार्‍या अनेक व्यक्तिमत्त्वांना मी त्याही उमेदीच्या वयात भेटलो, थोड्या धिटाईनं बोललो, पुढे त्यांचा-माझा वाङ्मयीन स्नेहाचाही प्रवास सुरू झाला. पण ‘दुर्गा भागवत’ हे एकच व्यक्तिमत्त्व असं आहे की, खूपदा जवळून भेटूनही मी त्यांच्याशी संवाद साधू शकलो नाही. त्यांच्या वत्सल शीतलतेतही व्यासंगाची, तपश्‍चर्येची एक धग होती, ती विद्युत वर्तुळाची कडा मला काठावरच ठेवत राहिली.
प्रसंगही तसेच घडत.
‘टॉनिक’ या बालकुमारांच्या वार्षिकाचे संपादक मानकरकाका अचानक घरी येत; तसे ते आले. मानकरकाका म्हणजे एक उत्साही, हसतमुख चित्रकार-संपादक. त्यांची खासियत म्हणजे, कुठलीही गोष्ट असो, ते मजेनंच सांगायचे. त्या मजेनंच ते म्हणाले, ‘प्रवीण, ही गंमत बघ…’
गंमत म्हणून त्यांनी माझ्या हाती एक उघडं पोस्टकार्ड दिलं. आता कार्डात ती ती काय गंमत असणार, असं मला वाटतानाच केवळ दोन अक्षरांचं ते पत्रलेखन पाहून चकित झालो. काहीच कळेना, कारण पूर्ण कोर्‍या कार्डावर ‘ना… व नंतर दु.’ एवढीच अक्षरं.
‘ना- दु-’
कुणीही चकित व्हावं अशीच ती गंमत होती, पण मी स्तब्धच झालो.
‘‘मानकरकाका, काय आहे हे?’’
‘‘हे…!’’ मानकरकाका खो खो हसू लागले. हसून झाल्यावर म्हणाले, ‘‘अरे, हे दुर्गा भागवतांचं, साहित्य देण्यास नकार देणारं पत्र आहे.’’
‘‘अं?’’
‘‘दिवाळी अंकासाठी मी साहित्य मागणारं पत्र त्यांना लिहलं होतं. अर्थात उत्तरासाठी माझा पत्ता लिहलेलं कार्ड- त्यात टाकून.’’
‘‘बरं- मग?’’
‘‘त्यांनी देणार नाही ऐवजी ‘ना’ आणि स्वाक्षरी म्हणून ‘दु’ एवढंच लिहलं.’’
आता खो खो हसण्याची पाळी माझी होती. मनात मी म्हटलं, आपण एवढ्या गोष्टीसाठी आख्खा लेख वाटावा एवढं पत्र लिहितो, पण दुर्गाबाई अक्षरांची उधळण करत नव्हत्या. खरंच, पण इतका अक्षरसंकोच?
अशा घटना क्वचित घडत असतील. त्यामागे वेळ, प्रकृती, मनःस्थिती, व्यक्तींचे आधीचे संदर्भ अशीही कारणं असू शकतील. पण ते तेव्हा व आजही माझ्या आकलनाबाहेरचे आहेत.
हे काहीही असलं तरी दुर्गाबाईंचं लेखन, व्यक्तिमत्त्व यांवरची माझी भक्ती वाढतच राहिली. मात्र त्यांच्या समीप जाऊन संवाद साधायची ओढ अधांतरातच राहिली.
एका दुपारी कळलं-
दुर्गा भागवत गेल्या. त्यांचं जाणं म्हणजे एका व्यक्तीचं जाणं नव्हतं. व्यासंगाच्या मूर्तिमंत विद्यापीठाचं ते निधन होतं. संशोधन आणि व्रतस्थ चिंतनाचं महापर्व या ज्ञानयोगिनीच्या ‘निघून जाण्या’नं अस्त पावलं होतं.
मी गिरगावातलं त्यांचं घर गाठलं. आता मी त्यांच्या खूप जवळ होतो, पण त्या खूप दूर- खूप दूर होत्या.
मुंबईत असूनही साहित्यिक मंडळी फारशी फिरकली नव्हती. दुसर्‍या दिवशी त्यांच्या निधनाच्या प्रतिक्रिया वर्तमानपत्रांना भरभरून देणारी मंडळी, हाकेच्या अंतरावर होती. पण तिथं केवळ, कवी नामदेव ढसाळ, कलावंत विक्रम गोखले, गायिका पद्मजा फेणाणी एवढेच दिसले. पद्मजाताईंनी तर त्यांचेच अमृतमय शब्द त्या महायात्रेच्या क्षणी त्यांच्या पार्थिवाजवळ बसून आळवले.
परतताना मी आठवत राहिलो दुर्गाबाईंची अनेक रूपं!

‘ऋतुचक्र’मधून प्रत्येक ऋतूतलं लाघव काव्यात्मकतेनं उलगडून दाखवणार्‍या दुर्गाबाई, ‘पैस’, ‘डोह’, ‘दुपानी’मधल्या ललित चिंतनानं जगण्याचा परिघ रुंदावत मनात डूब घेणार्‍या गंभीर दुर्गाबाई! जातक कथांमधून महात्मा बुद्धांच्या रूपक कथांचा वर्तमानाशी धागा जोडणार्‍या दुर्गाबाई!
‘आणीबाणी’तील रणदुर्गा! निःस्पृह जगण्याचं आणि संन्यस्त जीवनातही शब्दांचा प्रपंच सांभाळणारं एक वत्सल ‘मन’!
अनेकदा पाहून व जवळून झालेल्या भेटीतूनही मी त्यांच्याशी एक ‘शब्द’ही बोलू शकलो नाही. पण आज त्या गोष्टीचा थोडाही पश्‍चात्ताप मला नाही. उलट मी ते तपोधिष्ठित व्यक्तिमत्त्व साधकाच्या भावपूर्णतेनं टिपू शकलो, हेही भाग्यच!
आणि संवादाचं म्हणाल तर-
संवाद प्रत्यक्षच व्हावा लागतो; असं कुठे?
आजची शब्द-संस्कृतीची कोडी मला अगदी आतून पडली- की ध्यानात येतं-
दुर्गाबाई माझ्यासमोर आहेत.
मी त्यांना मनातलं अनवट गणित विचारतो आहे नि त्या ते सोडवून देत आहेत. आकाश निरभ्र होत आहे… दुर्गाबाईंशी मी न भेटता बोलतोच आहे- बोलतोच आहे.

– प्रवीण दवणे

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.